भाग -१>>
भाग -२>>
भाग -३>>
भाग -४>>
भाग -५>>
भाग -६>>
भाग -७>>
भाग -८>>
भाग -९>>
भाग -१०>>
इंद्रधनुषी धबधब्याची गोष्ट
बिग आयलंड वर वाइलुकु नदी हिलो गावाजवळ एका पहाडावरून खाली उडी मारते.
इथे पुढे एक धबधबा आहे. त्यावर बरेचदा इन्द्रधनुष्य पडलेले दिसते , त्यामुळे त्याला रेनबो फॉल्स म्हणतात. तर त्या ठिकाणची ही आख्यायिका.
हा तो सुंदर धबधबा. मला त्या इन्द्रधनुष्याचा फोटो मात्र नाही मिळाला!
या धबधब्याच्या मागच्या बाजूला एक गुहा आहे. फार फार वर्षांपूर्वी तिथे माउई हा दैवी शक्तीचा तरुण आणि त्याची आई हिना हे रहात होते.
माउई मासे पकडण्यासाठी रोज त्याची होडी घेऊन नदीतून पुढे समुद्रावर जात असे. घरी हिना एकटीच असे.
माउई आणि हिना ही दोन पात्रं समोआ,न्यूझीलंड आणि इतर काही पॉलिनेशियन कथांमधेही सापडतात. काही ठिकाणी ते बहीण भाऊ दाखवलेत, तर काही कथांत ते प्रियकर प्रेयसी किंवा नवरा बायको म्हणूनही दिसतात. या कथेत जरी ते आई - मुलगा दाखवले असले तरी त्यांची 'केमिस्ट्री' वेगळीच वाटते! गुंतागुंतीची नाती !!
तर या वाइलुकु नदीच्या वरच्या भागात एक कुना नावाचा राक्षसी सरडा रहात होता. तो बर्याचदा धबधब्याच्या काठावर येऊन खाली पाण्यात नहात किंवा कपडे धूत असलेल्या हिनाकडे बघत पडून रहात असे. तिचे कमनीय शरीर, लांब केस, कापडांवर कलाकुसर करताना नृत्य केल्याप्रमणे लवलवणारी लांबसडक सुबक बोटे ..... तिच्या सौंदर्याने कुना तिच्याकडे फारच आकर्षित झाला होता! अर्थात हिना त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत असे.
कुना तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेपटीने दगड धोंडे पाण्यात फेकत असे. पण हिनाला त्याच्या खवल्यांनी भरलेल्या हिडीस आकाराचे काय कौतुक वाटावे ? उलट त्याच्या दगड फेकण्यामुळे तिच्या कपड्यांचं आणि सामानाचं नुकसान व्हायचं, त्यामुळे एक दिवस तिने माउईला सांगून त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. हिनाच्या वाटेला गेल्यास त्याची काही खैर नाही असे माउईने त्याला धमकावले होते!
हिनाच्या संरक्षणासाठी ढगांच्या देवतेला तिच्याकडे लक्ष ठेवण्यास त्याने सांगून ठेवले.
या प्रकारामुळे कुना संतप्त झाला होता आणि हिनावर सुडाची संधी पहात होता. तिच्या प्राप्तीची शक्यता मावळल्याने तिला आता चिरडून ठार मारायचे असे त्याच्या मनाने घेतले!
एकदा माउई सकाळीच मासे पकडायला त्याच्या होडीत बसून निघून गेला. कुना वरून ते पहातच होता. त्याची होडी दिसेनाशी होताच कुना आवाज न करता धबधब्याच्या बाजूने सरपटत वरून खाली उतरला.
हिना आपल्याच नादात आपल्या गुहेच्या बाहेर एका पलंगपोसावर बांबूच्या छापांनी सप्तरंगी नक्षीकाम करण्यात दंग होती. अचानक तिने वळून पाहिले तर काय! कुना तिच्यापासून केवळ काही फुटांवर स्स स्स असे फुत्कार टाकत उभा होता !! पहिल्यांदाच ती त्या राक्षसी सरड्याला इतक्या जवळून पाहत होती . घाबरून गुहेत पळून जायला ती झटकन उठली पण कुनाने शेपटीच्या फटकार्याने मोठ्या शिळा टाकून तिची गुहेत जाण्याची वाटच बंद केली. कुनाने हिनावर झेप घेऊन तिचे लांब केस धरलेच होते पण ती कशीतरी निसटली आणि नदीच्या पात्रातून दगड गोट्यांतून धावत सुटली. कुनाच्या राक्षसी ताकदीपुढे आपला निभाव लागणार नाही हे तिला कळून चुकले होते. कुना झेपा घेत तिचा पाठलाग करू लागला.
हिनाला एक कल्पना सुचली. तिने हातातल्या त्या लांब कापडाचे एक टोक कमरेला बांधले आणि दुसर्या टोकाला दगड बांधून त्याचा फास तयार केला. तो फास तिने नदीपलिकडल्या उंच झाडावर फेकला. फांद्यांमधे दगड आपसूक अडकला. कुना आता तिच्यावर झेप घेणार, एवढ्यात हिनाने त्या कापडाला लोंबकळून त्या उंच झाडावर झेप घेतली.
वर ढगांच्या देवतेने ही झटापट पाहिली आणि तत्काळ ढगांचे आकार बदलून आणि सांकेतिक गडगडाट करून दूरवर समुद्रात मासेमारी करत असलेल्या माउईला सावध केले. माउईकडे दैवी शक्ती असल्याने त्याच्या होडीने झटक्यात मधले अंतर पार करून माउई धबधब्याजवळ पोहोचला!
हिनासोबत आगळीक करू पाहणार्या त्या हिडीस सरड्याला बघून माउईची तळपायाची आग मस्तकात पोहोचली. माउईची दैवी शक्ती ठाऊक असल्यामुळे कुनाही मागे सरकला. माउईने त्याला त्याच्याजवळच्या सोट्याने तडाखे द्यायला सुरुवात केली. दोघात तुंबळ युद्ध झाले. माउईची आता सरशी होणार असे वाटत असतानाच कुनाने धबधब्याच्या वरच्या अंगाला उडी घेतली आणि तिथे नदीतल्या खोल डोहात जाऊन तो लपून बसला. माउई त्याचा पाठलाग करत वर चढून आला, पण त्याला कुना काही सापडला नाही. त्यामुळे तो पुन्हा खाली उतरुन गेला.
कुनाला वाटले चला आता धोका टळला !! पण माउई हार मानणार्यातला नव्हता आणि कुनासारख्या राक्षसाला सोडून तर अजिबात देणार नव्हता. त्याने पेलेची (ज्वालामुखीची देवता) आराधना केली. तिला नैवेद्य म्हणून आपली होडी अर्पण केली आणि वाइलुकु नदीत लाव्हा सोडण्याची विनंती केली.
पेले त्याच्या प्रार्थनेने जागृत झाली.तिने त्याची विनंती मान्य करून मौना किआ शिखरावरून लाव्हाचा लोट वाइलुकु नदीत सोडला! खदखदणार्या लाव्हाने आणि विषारी वायूने आपले काम केले आणि कुना जागीच ठार झाला!
पेले अंतर्धान पावली. हिना पुन्हा एकदा निर्धास्तपणे कलाकुसर करू लागली आणि माउईला तिची काळजी करण्याची गरज उरली नाही.
अजूनही वाइलुकु नदीत मेलेल्या त्या सरड्याचे कलेवर आहे. थंड झालेल्या लाव्हामुळे त्याचा एक दगड बनून नदीच्या पात्रात बेटासारखा पडला आहे. उन्हे पडली की हिनाच्या त्या सप्तरंगी कापडाचे रंग आजही त्या धबाधब्यात अवतरतात!
- क्रमशः
मस्तच लिहीत आहेस. सुरस
मस्तच लिहीत आहेस. सुरस चमत्कारीक गोष्टींना साजेसे व ओघवते लिखाण.:)
मस्त
मस्त
ही पण गोष्ट आवडली
ही पण गोष्ट आवडली
ही पन मस्त.
ही पन मस्त.
मस्त आहे. माउवी ऐवजी माउई नको
मस्त आहे.
माउवी ऐवजी माउई नको का?
ही पण गोष्ट आवडली !
ही पण गोष्ट आवडली !
सायो , हो गं, माउई जास्त
सायो , हो गं, माउई जास्त बरोबर आहे . करते दुरुस्त.
छानच !
छानच !
सुरेख
सुरेख
भारीच आहे ही गोष्ट!
भारीच आहे ही गोष्ट!
वाव.. चला लोककथांमध्ये
वाव.. चला लोककथांमध्ये सुखांत गोष्टीसुद्धा आहेत तर.. मला भिती वाटायला लागलऑली की आता हिनाचा अंत होणार आणि तिच्या हाततल्या कापडाचे सप्तरंगच तेवढे माऊईच्या हाती उरणार म्हणुन... या परिकथा वाचताना आपण किती गुंतून जातो कळत नाही.
साधना हो ना दुर्मिळच आहे
साधना हो ना दुर्मिळच आहे सुखांत
मै.. कथा छान आहे पण आधीच्या
मै.. कथा छान आहे पण आधीच्या भागांच्या लींक्स गंडल्या आहेत.
खरंच की. धन्यवाद पियू!
खरंच की. धन्यवाद पियू! दुरुस्ती केली आहे.
मस्तच... छान चालली आहे ही
मस्तच... छान चालली आहे ही मालिका
छान कथा! छानच चाललीय ही
छान कथा!
छानच चाललीय ही लेखमालिका.
मस्त लिहिताय . मजा येतेय
मस्त लिहिताय . मजा येतेय वाचताना . या कथेतला सुखांत आवडला
मस्त कथा. तूम्ही मस्त
मस्त कथा. तूम्ही मस्त लिहिताय.
मस्त. आवडली ही पण. साधना
मस्त. आवडली ही पण. साधना म्हणत्येय तसंच वाटलेलं आधी
मलापण दु:खान्त वाटली होती, पण
मलापण दु:खान्त वाटली होती, पण वाचून अगदी हायसं झालं!
मस्त चाललिये लेखमालिका.
छान चाललीय ही लेखमालिका.
छान चाललीय ही लेखमालिका.
वा मस्तं, नो ट्रॅजेडी . किती
वा मस्तं, नो ट्रॅजेडी :).
किती छान दंतकथा बनतात निसर्गाच्या चमत्कारांवर !
ही कथादेखील सुंदर!
ही कथादेखील सुंदर!
सरडा व्हिलन कन्सेप्ट भारी आहे
सरडा व्हिलन कन्सेप्ट भारी आहे
उगीच नाही क्रिपी वाटत रेप्टाइल्स !
ही गोष्ट पण खूप आवडली..
ही गोष्ट पण खूप आवडली..
तुमच्या लिखाणाची शैली पण खूप रोचक आहे..
विलन सरडा अगदी डोळ्यासमोर उभा केलात!! वाह!! मस्तं!!!!!!!!!!
ही कथा पण आवडली. पण कथा आणि
ही कथा पण आवडली.
पण कथा आणि वास्तव याचा मेळ बसत नाहीये
कुनाने धबधब्याच्या वरच्या अंगाला उडी घेतली आणि तिथे नदीतल्या खोल डोहात जाऊन तो लपून बसला >>> आणि पहिल्या फोटोत कुनाचा दगड धबधब्याच्या खालच्या अंगाला दिसतोय.
मस्त लिहिताय .
मस्त लिहिताय .
गोष्ट आवडली .
गोष्ट आवडली .
धन्यवाद सगळ्यांना ! माधव,
धन्यवाद सगळ्यांना !
माधव, पहिल्या फोटोत जे दिसतायत ते नदीच्या आधीच्या टप्प्यातले लहान धबधबे आहेत. रेनबो फॉल्स पुढे आहे.
असं आहे का? खुलाशाबद्दल
असं आहे का? खुलाशाबद्दल धन्यवाद.
सहसा लोककथा आणि सद्यस्थिती यांचा मेळ बसतोच आणि त्यामुळेच त्यांची गुढता वाढते.
Pages