आजकाल माघात थंडी असतेच असे नाही, पण लहानपणी मात्र चांगलीच थंडी असायची. गणेशजयंती किंवा दासनवमीच्या निमित्तानं छान उत्साह असायचा वातावरणात. अर्थात आम्ही लहान असल्यानं त्या उत्सवाशी आमचं नातं 'देवाला नमस्कार कर आणि प्रसाद घ्यायला जा' इथपर्यंतच असायचा. (आता तसे लग्नात होते:-p)
प्रसाद म्हणजे गव्हाची खीर ! समोर पत्रावळ मांडलेली, डावीकडे एखादी कोरडी चटणी किंवा भोपळ्याचं भरीत, उजवीकडे मस्त चवळीची उसळ किंवा बट्टूची भाजी. सुरुवातीचा गरम गरम वरणभात हा नंतर येणाऱ्या खिरीसाठी पटकन संपवण्यासाठीच असतो ! भात संपला तरी पत्रावळ जास्त स्वच्छ करायच्या फंदात पडायचं नाही. खीर त्यावरच येऊ द्यायची. खीर संपत आली की वरण-भात आणि खजूर यांची मिश्र चव न्यारीच असते. जर थोड़ी आमटी घेतली असेल भातावर तर अजूनच छान. पत्रावळभर पसरणारी खीर प्रत्येक बाजूने आडव्या हाताने आत घेत एक एक घास खावा लागायचा. खूप भरभर बोलणाऱ्याला आम्ही "काय पत्रावळीवर खीर खात असल्यासारखा बोलतोयस" असं म्हणतो. गरम खीर अशी पटपट पोटात जायची. पोटात गरम जाणवायचं अगदी. देव त्यावेळी अशा रसनापरिपोषातून भेटायचा. त्या प्रसादाच्या नादाने बेंबीच्या देठापासून नामघोष करायचो. जनी भोजनी नाम वाचे वदावे । अती आदरे गद्यघोषे म्हणावे । असे करत श्लोक म्हणत प्रसाद घेतला जायचा. देव आणि भक्त दोघेही खुश!
घरी गव्हाची खीर कितीही साग्रसंगीत खोबरं, खसखस, बेदाणे, काजू-बदाम वगैरे घालून केली तरी त्या प्रसादाच्या खिरीची गोडी वेगळीच. कदाचित् त्या वातावरणाचाही परिणाम असावा, पण घरी ती गोडी नाहीच. अर्थात घरात केल्या जाणाऱ्या गव्हाच्या खिरीचेही आम्ही स्वागतच करायचो आणि अजूनही करतो. गहू छान भरडलेले हवेत. त्या विकत मिळणाऱ्या दलियामध्ये काय दम नाय ! लहानपणी घरी खीर करायची असा ठराव झाला की गिरणीत आम्हीच छोटेकंपनी जायचो. आईपण जाताना "त्याला म्हणाव खिरीसाठीची भरड हवीये". गिरणीवाले काका पण मिश्कीलपणे "मग कधी येऊ खीर खायला?" असं विचारायचे. मला वाटतं एखादा पदार्थ आपल्याला आवडतो तो केवळ त्याच्या चवीमुळे नव्हेच, त्याच्या निर्मितीशी अशा प्रकारे आपण जोडले गेलेलो असतो आपल्याही नकळत आणि म्हणूनच तो आपल्याला आवडतो.
गव्हाच्या खिरीलाच हुग्गी म्हणतात कोल्हापूरपासून खाली. मला हे नावही जाम आवडलंय, खिरीसारखंच. हे नाव मला नुकतंच समजलंय, त्यामुळे आता आईला गव्हाची खीर कर असं न म्हणता 'हुग्गी' कर असंच सांगणार आहे. माघातलाच उत्सव हवा आहे असे नाही. उलट गव्हाची खीर खाण्यासाठीचाच एखादा 'हुग्गी-उत्सव' सुरू करायला हरकत नाही असं वाटतंय. आषाढ़ शुद्ध द्वादशी ही आता माझ्यासाठी तरी 'हुग्गीतिथी' असेल !!!
हुग्गी-उत्सव
Submitted by चैतन्य दीक्षित on 12 July, 2016 - 06:03
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर लेख! आमच्या गावात
सुंदर लेख!
आमच्या गावात खिरीचा प्रसाद दत्त जयंती आणि पारायणाच्या सप्ताहात असतो. त्या प्रसादाच्या खिरीची चव घरच्या खिरीला कधीच येत नाही.
छान
छान
छान लिहलयं! घरी गहु आहेत पण
छान लिहलयं!
घरी गहु आहेत पण खीर करायला अजुन मुहुर्त लागला नाहीयं..आता श्रावणातच!
नागपंचमीची आठवण झाली मस्त
नागपंचमीची आठवण झाली
मस्त लिहिले आहे.
खूप छान लिहिलंस चैतन्य! खरंच
खूप छान लिहिलंस चैतन्य!
खरंच ...कुठेही जा, प्रसादाचं जेवण / प्रसादाचा कोणताही पदार्थ नेहेमीच अत्यंत रुचकर लागतो.
किती होलसेलमधे करतात तो...तरीही!
माझे सासर्यांचं बालपण धारवाडला गेलं होतं. त्यांच्या तोंडून हुग्गी शब्द ऐकलाय. त्यांना अतिशय आवडायची गव्हाची खीर.
त्यांची फर्माइश असायचीअधून मधून हुग्गी ची.
हल्लीच्या जेवणांमधे विविधता
हल्लीच्या जेवणांमधे विविधता असते, पण मानवी प्रेमाचा स्पर्श हरवला आहे, हे अशा लेखांवरून
जाणवते. सुंदर लेख. जुने दिवस आठवले. गव्हाची खीर फारच छान लागते. अर्थात प्रसाद म्हणून केलेली अधिक
चविष्ट असते.
वाह.. अरे पण मी नं हुग्गि
वाह..
अरे पण मी नं हुग्गि ह्या नावानं तांदूळ आणि मूगडाळीची खीर.. गोड भात म्हणूया.. खाल्लीये.
ते प्रसादाच्या खीरीच्या चवीबद्दल.. तर अगदी अगदी कबूल.
दाद, कानडीत 'खीर' या
दाद, कानडीत 'खीर' या शब्दासाठी 'हुग्गी' हा शब्द आहे.
कसलीही हुग्गी करू शकतात.
ही चेतनने लिहिल्येय ती 'गोदी हुग्गी' अशीच ज्वारीची केल्यास 'ज्वाळद हुग्गी' भाताची केल्यास 'अन्ना/अक्की हुग्गी' असते.
चैतन्म, लेख हुग्गीसारखाच गोड आहे.
आता यी वीकेंड्ला मी हुग्गी
आता यी वीकेंड्ला मी हुग्गी करणार!!! तुझ्या लेखामुळे आता करायलाच लगणार!
छानच !
छानच !
खीरीला हुग्गी म्हणतात होय.
खीरीला हुग्गी म्हणतात होय. मला वाटले गव्हाच्याच खीरीला हुग्गी म्हणतात. गव्हाची खीर माझी प्रचंड आवडती. आमच्या शेजारच्या काकू खास माझ्यासाठी आईला खलात सडलेले गहू आणुन द्यायच्या. अप्रतीम लागते ही आणी काय सुगंध असतो, अहाहा!
हुग्गीसारखाच गोड लेख
हुग्गीसारखाच गोड लेख
खूप गोड लेख..
खूप गोड लेख..
छान आठवणी. आमच्याकडे
छान आठवणी.
आमच्याकडे सोलापुरला जोडाच्या गव्हाची खीर करतात , अप्रतिम चव लागते.
धन्यवाद मंडळी _/\_ गोदी
धन्यवाद मंडळी _/\_
गोदी हुग्गी म्हणजे गव्हाची खीर.
जाता जाता- यातला गोदी हा शब्द गोधूम या संस्कृत शब्दावरून आलेला आहे. गोधूम म्हणजे गहू.
या गोधूम शब्दावरून एक
या गोधूम शब्दावरून एक प्राचीन काळातली कविता आठवली ....तेव्हापासून हा गोधूम शब्द डोक्यात पक्का बसलाय.
कुणा तरी एका मुलीचं वर्णन करणारी कविता..... गोधूम वर्ण तीचा....
गुलगुलीत मलमलीपरी करी झराझर कश्या पुरणपोळ्या
अश्या काही रॅन्डम ओळी आठवताहेत. माहिती आहे का ही कविता कुणाला?
मला आठवतंय तसं सरु किंवा असंच काहीसं मुलीचं नाव हे कवितेचं शीर्षक असावं?
लय भारी लेख! देवस्थानांच्या
लय भारी लेख!
देवस्थानांच्या ठिकाणी मिळणार्या प्र्सादाची आंबिल(बाळूमामा - श्री क्षेत्र आदमापूर), खीर ह्या गोष्टींची चवच न्यारी!
मानुषी, गोधूम वर्ण तीचा,
मानुषी,
गोधूम वर्ण तीचा, हरणाच्या पाडसापरी डोळे ।
स्नेहाळ वदन नामी, विधुबिंब जेवि वाटोळे ।।
ही ती आर्या.
ग्रेट .... मग त्या बाकीच्या
ग्रेट ....
मग त्या बाकीच्या ओळी ...पुरण्पोळी...इ.इ. ...ती दुसरीच कविता आहेका? ओह...आत्ता अचानक नाव आठवलं त्या कवितेचं???? "जिऊ"???
नीट आठवत नाही.
थॅन्क्स चैतन्य.
http://cart.ebalbharati.in/Ba
http://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
इथे आहे ती कविता, जिऊ.सातवीला होती.
लिंबीला सांगितले पाहिजे ,
लिंबीला सांगितले पाहिजे , उद्या उपास सोडायला गव्हाची खीर कर... आय मीन हुग्गी कर...!
फारच सुन्दर लिहिलेय! <<घरी
फारच सुन्दर लिहिलेय!
<<घरी गव्हाची खीर कितीही साग्रसंगीत खोबरं, खसखस, बेदाणे, काजू-बदाम वगैरे घालून केली तरी त्या प्रसादाच्या खिरीची गोडी वेगळीच<< अगदी अग्दी.
स्लर्प...!
नागपन्चमीची आठवण झाली. गव्हाची खीर, कानवले.
उद्या करावीच उपास सोडायला.
मस्त लेख! प्रसादाच्या पानाचं
मस्त लेख! प्रसादाच्या पानाचं वर्णन खासच!
छान लिहील आहे.
छान लिहील आहे.
आषाढ़ शुद्ध द्वादशी ही आता
आषाढ़ शुद्ध द्वादशी ही आता माझ्यासाठी तरी 'हुग्गीतिथी' असेल !!!
>>>>
म्हणजे उद्याच की !!
सातार्यात आहेस कि पुण्यात ? किति वाजता येवु घरी ?
धन्यवाद विकु. बालभारतीचा
धन्यवाद विकु. बालभारतीचा खजिनाच मिळाला.
धन्यवाद विकु. बालभारतीचा
धन्यवाद विकु. बालभारतीचा खजिनाच मिळाला. >>>>> +१११
पुनश्च सर्वांना मनापासून
पुनश्च सर्वांना मनापासून धन्यवाद.
द्वादशीला मस्तपैकी सासूबाईंच्या हातची हुग्गी चापली मी
हा लेख वाचल्यावर मी रविवारी
हा लेख वाचल्यावर मी रविवारी नेटवर रेसिपी पाहुन हुग्गी केली. मी नेहमी दलियाची खिर करते, दुध घालुन. नेटवर ज्या कानडी पाकृ सापडल्या त्यात दुध अजिबात नव्हते, सुके खोबरे आणि खसखस होती. विकतचा दलिया न आणता गहुही घरच्या जात्यावर भरडुन घेतले. मी मग त्यापैकी एक फॉलो करुन मस्त हुग्गी बनवली. इतके बरे वाटले जिवाला. फक्त नंतर अंमऴ झापड आली डोळ्यांवर.