शारीरिक ओढीच्या पलीकडचे प्रेम कसे असते ? जाणून घ्यायचंय ?
मग अवश्य वाचा सच्च्या प्रेमाची मधुर गाथा ....
ती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या १६ व्या वर्षी असंवेदनशील, व्यसनी आणि थोराड पुरुषाबरोबर तिचं लग्न झालं तर ?
ती त्याच्याशी विवाह करते, मात्र त्याला पूर्णतः स्वीकारत नाही, ती त्याला तन देऊ शकते पण मन देऊ शकत नाही.
एकमेकाचे विचार भिन्न असूनही एकत्र राहणे योग्य की अयोग्य ?
मग 'तिला'च याची जाणीव होते अन ती स्वतःची सारी कुचंबणा त्याच्या गळी उतरवते. पुढे ते विभक्त होतात, पण तोवर तिच्या पोटी त्याचं बीज वाढतं.
या दरम्यान तिच्या आयुष्यात तिच्या सारखाच हळव्या मनाचा,प्रतिभाशाली, संवेदनशील व उमदा कवीमनाचा पुरुष येतो.
ती त्याच्यात पूर्ण गुंतून जाते आणि एके दिवशी आपल्या कवितेच्या इप्सिताच्या शोधात तो तिला अर्ध्यात निरोप देऊन आपलं राहतं शहर सोडून मुंबईला निघून जातो.
पुढे ती त्याच्या प्रेमात दग्ध होऊन झुरत जाते. त्याच्या साठी एक काव्य रचते - 'आखरी खत' त्याचं नाव !
या 'आखरी खत'च्या मुखपृष्टाच्या निमित्ताने तिची ओळख तिच्यापेक्षा खूपच लहान असणाऱ्या एका देखण्या चित्रकाराशी होते. ते दोघे एकेमेकात इतके एकरूप होतात की जणू दोघांचा आत्मा एक असावा !
तिकडे मुंबईला गेलेल्या कवीने तोपर्यंत प्रचंड लोकप्रियता व नावलौकिक मिळवला, मात्र तो तिला विसरू शकला नाही. तो आयुष्यभर अविवाहित राहिला !
इकडे वयाची चाळीशी गाठल्यावर तिला भेटलेला पस्तीशीच्या उंबरठयावरचा चित्रकार आणि ती एकत्र राहिले, एक होऊन राहिले अन एकजीव झाले ! तब्बल पन्नास वर्षे ते एकमेकासोबत राहिले, कोणत्याही नात्याच्या 'लेबल'शिवाय.कारण त्याची त्यांना गरजच नव्हती...ते दोघे एकत्र राहत असताना त्याने तिच्या हृदयात असणाऱ्या 'कवी'ला देखील स्वीकारले होते !
आयुष्याच्या मध्यावर भेटलेला हा तरुण 'तिला' बाप, भाऊ आणि मुलगा यांच्या जाणिवा देऊन गेला !
जेंव्हा 'तिचे' पती आजारी पडले तेंव्हा त्यांच्या अखेरच्या काळात 'तिने' त्यांना घरी आणून त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत सेवा सुश्रुषा केली....
अखेरीस 'ती' ही आयुष्याच्या पटावरून एक्झिट करून 'प्रेमाचा खरा अर्थ' सांगायला स्वर्गात गेली !!
ही कथा आहे एका थोर साहित्यकार, ज्ञानपीठासह विविध पुरस्कारांनी सन्मानित अशा प्रतिष्ठित कवयित्रीची. जिची नाममुद्रा केवळ पंजाबीच नव्हे, तर सर्वच भारतीय भाषांमध्येही ठळक उमटली आहे अशा विदूषीची. जिच्या अंगी बंडखोर स्वभाव अन हळवे मन असे दोन परस्पर विरोधी प्रवाह सुखाने नांदत होते.....ही कथा 'तिची' म्हणजे अमृता प्रीतमची आहे ! यातला कवी म्हणजे सुप्रसिद्ध शायर कवी साहिर लुधियानवी होय अन चित्रकार म्हणजे इमरोज !
आताच्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबातील गुजरांवाला या शहरात ३१ ऑगस्ट १९१९ ला जन्मलेल्या अमृतांचा वयाच्या सहाव्या वर्षी साखरपुडा झाला, अकराव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले, सोळाव्या वर्षी पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले अन सोळाव्या वर्षीच प्रीतमसिंहांशी विवाह झाला, पुढे साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते तर इमरोजबरोबर त्या पन्नास वर्षे एकत्र राहिल्या ! तीन ओळीत सांगता येईल अशी अमृता प्रीतम यांची कथा आहे.
अमृतांचं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी प्रीतमसिंग नावाच्या गृहस्थाशी लग्न झालं होतं. त्यांना त्यांच्यापासून दोन मुलंही झाली. परंतु या व्यसनी, असंवेदनशील नवऱ्याशी अमृतासारख्या संवेदनशील, प्रतिभावान स्त्रीचं निभणं अवघड नव्हे; अशक्यच होतं. त्यांनी तसं नवऱ्याला स्पष्ट सांगितलं. आपण वेगळे होण्यातच दोघांचं भलं आहे, हे त्यांनी त्याच्या गळी उतरवलं आणि दोघं वेगळी झाली.
याचदरम्यान कवी साहिर लुधियानवी अमृतांच्या आयुष्यात आले होते. त्यांच्या विलक्षण काव्यप्रतिभेनं, भावविभोर शब्दकळेनं आणि व्यक्तिमत्वानं त्यांना झपाटलं. इतकं, की त्यांच्याशिवाय आयुष्याची त्या कल्पनाच करू शकत नव्हत्या. अमृता आणि साहिरची साहित्यिक कारकीर्द याच काळात फुलत.. बहरत होती. या काळात साहिरनं अमृताचं अवघं जगणंच व्यापलं होतं. अमृतांच्या लेखनातही त्याचे पडसाद स्वच्छपणे जाणवतात.
साहिरनी अमृतांचं भावविश्व इतकं व्यापलं होतं की, मुलाच्या वेळी गरोदर असताना तो साहिरसारखा दिसावा म्हणून त्या सतत साहिरचं चिंतन करीत असत. .. आणि चमत्कार वाटावा अशी बाब म्हणजे अमृतांचा मुलगा नवराज हा दिसायला साहिरसारखाच आहे! त्यामुळे- नवराज हा साहिरचाच मुलगा असावा, अशी पंजाबी साहित्यवर्तुळात तेव्हा बोलवा होती. एवढंच कशाला, १३ वर्षांचा असताना खुद्द नवराजनेच अमृतांना एकदा विचारलं होतं- ‘ममा, मी साहिर अंकलचा मुलगा आहे का?’ तेव्हा अमृतानं त्याला उत्तर दिलं होतं- ‘काश! यह सच होता!’ त्यालाही त्यांचं हे उत्तर पटलं. कारण ते निखळ सत्य होतं!
अमृता लाहोरला होत्या तेंव्हा साहिर त्यांना भेटायला त्यांच्या घरी यायचे. घरी आले की या दोघांच्या मनसोक्त गप्पा व्हायच्या. गप्पा मारता मारता साहीर सिगारेटी फस्त करत राहायचे. अमृता मात्र साहिरनी सोडलेल्या धुम्रवलयात आपली स्वप्ने पाहायच्या. साहिर तिथून गेल्यावर त्यांनी पिऊन टाकलेल्या सिगारेटची थोटके त्या गोळा करायच्या, अन हळूहळू त्यांना पुन्हा शिलगावून ओठी लावायच्या ! त्या आपल्या ओठांवर साहिरना अनुभवायच्या ! या नादात अमृतांना सिगारेटचे व्यसन जडले. अमृता साहिरला कधीच विसरू शकल्या नाहीत. 'मेरे शायर, मेरा महबूब, मेरा खुदा और मेरे देवता' अशी त्यांची साहिरबद्दलची व्याख्या होती.
पुढे साहिर मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावायला आले आणि मग इथलाच झाले. चित्रपट गीतकार आणि शायर म्हणूनत्यांनी अमाप ख्याती मिळवली. साहीर मुंबईला गेल्यावर या दोघांतल नातं तसच उत्कट राहिलं अन त्याला पत्रांचा आधार मिळत गेला. दोघेही रोज एकमेकाला पत्रं लिहित. काही काळ सुधा मल्होत्राच्या रूपाने त्यांच्यात दरी निर्माण करता येते का याचा प्रयत्न नियतीने करून पहिला पण तिलादेखील अपयश आले. त्यांचे भावनिक नाते एकमेकाशी न बोलताही अबाधित राहिले. चित्रपटसृष्टीच्या या मायावी दुनियेत अनेक स्त्रिया साहीरच्या आयुष्यात आल्या; परंतु त्यापैकी कुणाशीही ते संसार थाटू शकले नाहीत. मात्र प्रेमप्रकरणांतील या कटु-गोड अनुभवांनी त्यांचं आयुष्य वेगळ्या अर्थानं समृद्धही केलं. त्यांच्यातला रोमॅण्टिक प्रियकर त्याच्या गाण्यांतून, शायरीतून अलवारपणे व्यक्त झालेला दिसतो, तो या उत्कट अन् तरल जीवनानुभूतींमुळेच ! ज्या प्रमाणे अमृतांनी साहिरची सिगारेटची थोटके जतन करून ठेवली होती तशाच स्मृती साहिरनी देखील एका चहाच्या कपात जपून ठेवल्या होत्या. अमृतांनी आपल्या ओठाला लावलेला चहाचा कप साहिरनी कित्येक वर्ष न धुता तसाच आपल्याजवळ जपून ठेवला होता !! साहिरनी सुनीलदत्तच्या 'गुमराह'साठी लिहिलेले गाणं जणू त्यांच्या प्रेमासाठीच होतं - "चलो इक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों,...."
'साहिर मुंबईला गेले आणि त्या मायानगरीचाच झाले', या वास्तवानं अमृता एकीकडे आतून उन्मळून पडल्या.उद्ध्वस्त झाल्या. तर दुसरीकडे साहिर यशाच्या पायरया चढत गेले याचाही अमृतांना आनंद झाला. या संमिश्र भावनांचं परिणत रूप म्हणजे त्यांचं ‘आखरी खत’ हे पुस्तक! ज्याला पुढे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ही आनंदाची बातमी कळवणारा फोन आला तेव्हा अमृतांना आनंद होण्याऐवजी रडू कोसळलं. कारण त्यांनी त्या कविता साहिरसाठी लिहिल्या होत्या. पण साहिरला मात्र गुरुमुखी (पंजाबी) येत नव्हती. त्यामुळे ते हे पुस्तक वाचू शकत नव्हते. ज्याच्यासाठी आपण या कविता लिहिल्या, त्याच्यापर्यंत जर त्या पोचणार नसतील, तर त्या पुरस्काराला अमृताच्या लेखी काहीच अर्थ नव्हता. म्हणूनच त्यांना रडू कोसळलं होतं. साहिर जरी त्यांच्यापासून दूर गेले तरी त्या कधीही त्यांना विसरू शकल्या नाहीत. अगदी इमरोजचं उत्कट, निस्सीम प्रेम त्यांच्या वाटय़ाला येऊनही !
पुढे साहिरबद्दल लिहिताना अमृतांनी एके ठिकाणी म्हटलंय- "साहिर आणि माझ्यात नि:शब्दतेचं एक अनोखं नातं होतं. त्यात शारीरिक ओढीचा अंश नव्हता. मला ‘आखरी खत’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झाल्यावर एका प्रेस रिपोर्टरनं मी लिहीत असतानाचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे तो फोटो काढून निघून गेल्यावर मी त्या कागदाकडे पाहिलं, तर त्यावर ‘साहिर.. साहिर.. साहिर’ हा एकच शब्द मी अनेकदा लिहिला होता. माझ्या त्या वेडेपणाचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी तो फोटो प्रसिद्ध झाला. पण तो कागद कोरा असल्यासारखा भासत होता. साहिर आणि माझ्यातलं नातं तेव्हाही नि:शब्दच होतं. आणि अखेपर्यंत ते तसंच नि:शब्द राहिलं." साहिरनीही 'शादी का जोडा' कधी अंगावर चढवला नाही. त्यांच्यातला शायर म्हणूनच वेदनांत जास्त रमला, विरहाची नवी भाषा बोलू लागला अन प्रेमाचे स्वतः अनुभवलेलं जग काव्यात मांडत राहिला.
'मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है...'
'मेरे महबूब कहीं और मिला कर मुझसे, बज़्म- ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या माने..''
'कल और आयेंगे नगमो की खिलती कलियाँ चुनने वाले, मुझसे बेहतर कहनेवाले...'
'तुम अगर साथ देने का वादा करो ...'
'ऐ मेरी जोहराजबी ...'
'मेरे दिल में आज क्या हैं, तू कहे तो मै बता दूं...'
'आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू ...'
'कभी कभी मेरे दिल में खयाल आता है ...'
'मन रे तू काहे ना धीर धरे, संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे...'
'ये दिल तुम बिन कही लगता नही अब क्या करे ...'
'तोरा मन दर्पण कह्लाये ...'
'नीले गगन के तले धरती का प्यार ....'
'मै जिंदगी का साथ निभाता चला गया , फिक्र को धुयेंमें उडाता चला गया ...'
साहिर लुधियानवी यांनी विविध चित्रपटासाठी लिहिलेल्या या सर्व गाण्यांचा अर्थ आपल्याला ' अमृतांचा साहिर' कळला की आपोआप कळू लागतो......
साहिरसाठी अमृतांनी लिहिलेल्या ‘आखरी खत’चं कव्हर तयार करण्यासाठी म्हणून चित्रकार इमरोजशी त्यांची पहिली भेट १९५८ मध्ये झाली. योगायोग म्हणजे साहिरच्या प्रेमापोटी लिहिलेल्या कवितेच्या अनुषंगाने झालेल्या या भेटीनं अमृतांच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. इमरोजशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांची मैत्री वाढत गेली. इमरोज खरं तर अमृतांपेक्षा सहा वर्षांनी लहान होते; पण साहिरच्या विरहानं पोळलेल्या अमृतांना दु:खाच्या त्या खाईतून बाहेर काढलं ते इमरोजनंच! इमरोज त्यावेळी ख्यातनाम चित्रकार म्हणून सर्वपरिचित होते. तर अमृतांना नुकतीच कुठं साहित्यिक वर्तुळात प्रसिद्धी आणि मानमान्यता मिळू लागली होती. साहिरच्या दु:खातून अमृतांना बाहेर काढताना इमरोज नकळत त्यांच्यात गुंतत गेला. अर्थात् अमृतांनासुद्धा त्याच्याबद्दल हुरहूर वाटू लागली होती. पण ती त्यांनी कधी व्यक्त केली नव्हती.
अशातच चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्तने इमरोजना त्याच्या नव्या चित्रपटाच्या कामासाठी मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं. इमरोजना या कामाची भरभक्कम बिदागीही त्यानं देऊ केली होती. ही बातमी कळताच अमृतांना आनंदही झाला आणि त्याचवेळी आतून काहीतरी तुटल्यासारखंही वाटलं. आपण पुन्हा एकदा काहीतरी गमावतो आहोत, या भावनेनं त्यांचं मन खिन्न, उदास झालं. मात्र त्यांनी इमरोजला अडवलं नाही. साहिरही एकेकाळी असाच मुंबईला गेले होते, ते पुन्हा परतले नव्हते. आता इमरोजही गेला तर आपल्या जगण्याचा आधार जाईल या भावनेने त्या कासावीस झाल्या.
इमरोजबरोबरच्या आयुष्याबद्दल ‘रसिदी टिकट’मध्ये लिहिताना अमृतांनी म्हटलंय- ‘कुणा व्यक्तीला एखाद्या दिवसाचं प्रतीक मानता येत असेल तर इमरोज माझा ‘१५ ऑगस्ट’ होता.. माझ्या स्वातंत्र्याची ग्वाही देणारा! याउलट, साहिर हा एक विचार होता. हवेत तरळणारा. कदाचित माझ्याच कल्पनाशक्तीची ती जादू होती. मात्र, इमरोजबरोबरचं आयुष्य ही एक अखंड धुंदी होती.. कधीही न सरणारी.’
अमृतांनी एकदा इमरोजना सहज हसत हसत म्हटलं होतं की, ‘साहिर मला मिळाला असता तर मी तुला कधीच भेटले नसते.’ तेव्हा इमरोजनं त्यांना तितक्याच सहजतेनं उत्तर दिलं होतं की, ‘हे शक्यच नाही. साहिरच्या घरी नमाज पढतानाही मी तुला शोधून काढलं असतं आणि हाताला धरून ओढून आणलं असतं.’
‘इमरोज भेटला आणि बाप, भाऊ, मुलगा आणि प्रियकर या सगळ्याच शब्दांना अर्थ प्राप्त झाला.. ते जिवंत झाले,’ असं अमृतांनी लिहिलंय. तर इमरोज म्हणतात- ‘माजा (अमृता) माझी मुलगी आहे; आणि मी तिचा मुलगा!’ इमरोज त्यांच्या आयुष्याच्या मध्याच्या वळणावर अमृतांना अकस्मात भेटले. अमृता प्रीतम आणि इमरोज यांचा सहवास जवळपास पन्नासेक वर्षांचा होता...या दोघांनी इतकी वर्षे एकत्र राहून आपसातल्या तादात्म्यतेला नात्याचे नाव दिले नाही. ‘अमृतामध्ये तुम्हाला इतकं काय आवडलं?,’ असा प्रश्न कुणीतरी इमरोजना एकदा विचारला असता ते उत्तरले होते- ‘तिचं असणं!’ सहा दशकांपूर्वीची ही घटना म्हणजे समाजाच्या मुल्यांविरुद्ध न डगमगता केलेला एक दृढ विद्रोह होता..
अमृता रात्रीच्या निरव शांततेत आपलं लेखन करायच्या, कुठलाही गोंगाट - आवाज नसताना त्यांची लेखणी प्रसवत असे. अमृता रात्रीतून तासंतास लेखन करत राहायच्या, आणि रात्री एकच्या सुमारास इमरोज आपल्या पावलांचा आवाज न करता हळुवारपणे येत व त्यांच्या पुढ्यात गरम चहा ठेवून जाई. रात्री एक वाजताचा हा चहा इमरोजनी जवळपास चाळीसेक वर्षे अव्याहतपणे अन प्रेमाने बनवून दिला. इमरोजकडे चारचाकी नव्हती तेंव्हा ते आपल्या स्कूटरवरून अमृतांना घेऊन जात. यावेळी मागे बसलेल्या अमृता त्यांच्या पाठीवर आपल्या तर्जनीने लिहित असत, बहुतांश करून ती अक्षरे 'साहिर' या नावाची असत. अमृतांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती तेंव्हा देखील इमरोज आपल्या गाडीत स्वतः ड्राईव्ह करून संसदभवनापाशी घेऊन जात. अमृता गेटमधून आत गेल्यावर ते बाहेर बसून राहत. संसदेचे कामकाज संपल्यावर अमृता कधीकधी मुख्य गेटवरील उदघोषकाला इमरोझला बोलावण्याची विनंती करत, तेंव्हा तो पुकारा करत असे - 'ड्रायव्हर इमरोज अंदर आओ !' कारण त्याला तो अमृतांचा ड्रायव्हर वाटत असे. मात्र या दोघांनीही जग काय म्हणते याची कधीच फिकीर केली नव्हती. कारण एकाच घरात दोन वेगवेगळ्या खोलीत राहणारया ह्या दोन व्यक्तींचे आत्मे एक झाले होते !!
आपलं आयुष्य आपल्या विचारांनुसार जगणारया अमृता कर्तव्यसन्मुख राहिल्या, त्या मुक्त होत्या पण स्वैर स्वच्छंदी नव्हत्या. याचं बोलकं उदाहरण म्हणून उल्लेख करता येईल अशा पुष्कळ घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. त्यापैकीच एक त्यांच्या पतीच्या संदर्भात आहे. अमृतांचे पती प्रीतमसिंग यांना त्यांच्या अखेरच्या एकाकी दिवसांत अमृतांनी आपल्या घरी आणलं होतं आणि त्यांची सारी सेवासुश्रूषा केली होती. अमृता-इमरोजच्या घरातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता. त्याच बरोबर जेंव्हा १९८० मध्ये साहिरचं मुंबईत हार्टअॅटॅकने अकाली निधन झालं तेव्हा अमृतांना जणू आपलाच मृत्यू झालाय असं वाटलं होतं. त्यातून त्या कधी बाहेर आल्या नाहीत. या सर्वांतून त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा अधिकाधिक समृद्ध होत गेल्या.
अमृताबद्दलच्या आपल्या नात्याबद्दल इमरोज म्हणतात - 'ज्या जोडप्यांना परस्परांच्या प्रेमाची खात्री नसते, त्यांनाच समाजाच्या मान्यतेची गरज भासते. आम्ही आमची मनं पूर्णपणे जाणतो आहोत; मग समाजाची लुडबूड हवीच कशाला? आमच्या या प्रकरणात समाजाला काही स्थानच नाही. आम्ही एकमेकांशी वचनबध्द आहोत, याची समाजापुढे कबुली द्यायची गरजच काय ? तुम्ही एकमेकांना बांधील असा वा नसा, कुठल्याच बाबतीत समाज तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागायची तयारी नसेल अथवा स्वत:च्या करणीची जबाबदारी घ्यायची तयारी नसेल, तेव्हाच समाजाने आपल्या वतीने काही निर्णय घ्यावा अथवा आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावं, अशी आपली अपेक्षा असते. जे निर्णय आपले आपण घेत असतो, ते चुकीचे ठरले, तरी त्याचं खापर आपण दुसर्या कोणावर फोडता कामा नये. खरं तर अशा वेळीच आपल्याला समाजाची गरज वाटते. एक आधार म्हणून. म्हणजेच आपल्या सोयीसाठी. अमृता आणि मी - आम्हाला दोघांनाही अशा सोयीची गरज नव्हती." अमृतांच्या आजारपणात इमरोजनी त्यांची खूप सेवा केली. इमरोज तोवर मोठे चित्रकार झाले होते तरीही अमृतांपुढे ते तसे झाकोळलेले राहिले. त्यावर ते स्वत: म्हणतात, 'लोक म्हणतात की, तुमचं आयुष्य तुम्ही केवळ अमृताला वारा घालण्यातच व्यतीत केलं. पण त्यांना हे माहीत नाही की तिला वारा घालता घालता मलाही हवा लागत होती.'
'अमृता-इमरोज ए लव्ह स्टोरी' या पुस्तकाच्या लेखिका उमा त्रिलोक यांनी अमृतांचे चरित्रलेखन करताना एकदा अमृताजींना विचारलं, "एक सामाजिक नियम मोडून एक वाईट उदाहरण तुम्ही समाजापुढे ठेवलं आहे, असं नाही का तुम्हाला वाटत?" यावर काही वेळ अमृता काहीच बोलल्या नाहीत. नंतर जणू स्वगत बोलावे तशा त्या उत्तरल्या, 'नाही, उलट आम्ही दोघांनी हे प्रेमाचे बंध अधिक घट्ट केले आहेत. प्रेम हा लग्नाचा मुख्य आधार असतो. आम्ही सामाजिक नियम तोडला असं तरी का म्हणायचं? तन, मन, करणी, वचन या सार्यांद्वारा आम्ही एक्मेकांशी अत्यंत एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिलो आहोत. इतर जोडप्यांना इतकं जमलं असेलच असं नाही. प्रत्येक समस्येशी आम्ही एकत्रपणे सामना केला आहे. आणि अत्यंत सच्चेपणाने आमच्यातलं नातं जपलं आहे, जोपासलं आहे.' जराही न कचरता अत्यंत अभिमानाने त्या पुढे म्हणाल्या, 'खरं तर समाजापुढे आम्ही एक अत्यंत ठाशीव, परिणामकारक उदाहरण ठेवलंय. समाजाला आम्ही बळकट केलंय. आम्ही काय म्हणून या गोष्टीची लाज बाळगावी ? उलट, आमच्याबद्दल चुकीचा समज करून घेतल्याबद्दल समाजालाच लाज वाटायला हवी."
जगाचे आपल्या प्रेमाबद्दल काय मत आहे याच्या फंद्यात न पडलेल्या अमृतांनी आपल्या प्रेमाबद्दल आपले काय विचार आहेत किंवा या जगावेगळ्या प्रेमत्रिकोणाबद्दल आपल्याला काय वाटते यावर एक कविता लिहिली होती. अमृतांनी आपल्या मरणापूर्वी काही दिवस आधी आपल्या जीवलग प्रियकराला आणि आयुष्याच्या अभिन्न जोडीदाराला इमरोजला उद्देशून लिहिलेली ही कविता अत्यंत प्रसिद्ध आहे ! तिचे अनेक भाषांत अनुवाद झाले होते.
आपल्या आयुष्यात इतकं सारं घडत असताना अमृतामधील लेखिका स्वस्थ बसणे अशक्य होते. त्यांची लेखणी प्रेम आणि विद्रोहाची गाथा एकाच वेळी रचत होती. अमृतांच्या या धगधगत्या लेखणीने प्रस्थापित लेखनाला व विचारांना जबरदस्त धक्का बसला. मात्र त्या डगमगल्या नाहीत. आपल्या कथांनी त्यांनी एक वादळ निर्माण केले. अमृतांच्या जीवनाप्रमाणे त्यांचं लेखन बहुआयामी होत गेलं. याला काही अंशी इमरोजदेखील कारणीभूत आहे. परस्परांवरील प्रगाढ प्रेमातून कायदेशीर लग्नबंधन न स्वीकारताही ४० वर्षांहून अधिक काळ अखंड धुंदीचं त्यांचं सहजीवन त्यांच्या वैचारिक परिपक्वतेची जाणीव करून देण्यास पुरेसं आहे. या सहजीवनात इमरोजनं साहिरचं अमृताच्या आयुष्यातील ‘असणं’ सहजगत्या स्वीकारून आपला सच्चेपणा सिद्ध केला होता. याच विषयाला अनुसरून एका प्रख्यात हिंदी लेखकाने अमृतांना विचारलं होतं की, "त्यांच्या साहित्यातील सर्व नायिका सत्याच्या शोधात घर सोडून निघाल्या, हे समाजाला घा्तक ठरणार नाही का?" यावर अमृतांनी शांतपणे उत्तर दिलं होतं, ' चुकीच्या सामाजिक मूल्यांमुळे घरं मोडली असतील, तर सत्याच्या आग्रहासाठी आणखीही घरांची मोडतोड झाली पाहिजे.' अशा विचारसरणीमुळेच अमृतांच्या काव्यात बंडखोरीचे रसायन प्रेमरसातून पाझरत राहते. पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी इतर आशय विषयांनादेखील हात घातला आहे. या अद्भुतरसाने उत्कट ओथंबलेली कविताही त्यांनी लिहिली आहे. २०व्या शतकातील हिंदी आणि पंजाबी भाषेतील या कवयित्रीने साहित्य अकादमीचा पुरस्कार घेणाऱ्या पहिल्या महिलेचा मान मिळवला. अमृता एक सिद्धहस्त कादंबरीकार तसेच निबंधकार होत्या. सहा दशकांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी १०० पुस्तके लिहिली. यात कविता, चरित्र, निबंध, पंजाबी लोकगीते, भारतीय आणि परकीय भाषांमधील आत्मचरित्रांचा समावेश आहे. त्यांना साहित्यसेवेबद्दल पद्मविभूषण आणि साहित्याचा भारतातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कारदेखील मिळाला होता.
दोन मुलांची आई आणि विवाहित असलेल्या असलेल्या अमृताजींचा इमरोजबरोबर राहण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठं बंडच होतं. त्यावर 'अमृता-इमरोज ए लव्ह स्टोरी' या पुस्तकाच्या लेखिका उमा त्रिलोक म्हणतात- 'बदल पाहिजे, बदल पाहिजे अशा गप्पा आपण मारतो. पण प्रत्यक्षात बदल घडून येतो, तेव्हा मात्र घाबरतो. अमृता-इमरोजनं स्त्री-पुरुष संबंधाबद्दलची नवी वेगळी भाषा दिली आहे.' खरंच बदल पचवणे आपल्या समाजाला कठीण जाते. आजकालच्या सकाळी कनेक्ट, दुपारी ब्रेकअप अन संध्याकाळी पुन्हा दुसरीकडे कनेक्ट अशा बेगडी प्रेमयुगात साहीर- अमृता - इमरोज यांचं प्रेम खऱ्या प्रेमाचं चिरंतन आत्मिक सत्य अजरामर करून जातं. आपण साहिर -अमृता - इमरोज यांचं प्रेम जेंव्हा जेंव्हा वाचत जातो तेंव्हा दरवेळेस आपल्या प्रेमाच्या व्याख्या अन संदर्भ बदलत जातात. आपल्यात परिपक्वता येत जाते. आपल्यात भले अमृतांच्या प्रेमाइतकी पारदर्शकता येत नसेल तरी माझ्या मते किमान इतकी परिपक्वतेची टोचणी आपल्याला होणे हे ही काही कमी नाही. जगण्याचा खरा अर्थ अन प्रेमातलं जगणं शोधायचं असेल तर दर दोन वर्षांनी अमृता-इमरोजच्या प्रेम अध्यायाचे वाचन व्हायलाच हवे .....
लेखाच्या शेवटी अमृतांनी इमरोजसाठी लिहिलेल्या 'मै तैनू फिर मिलांगी ..'या प्रसिद्ध कवितेचा गुलजारजींनी केलेला अनुवाद देतोय कारण त्या शिवाय हा लेख अधुरा आहे -
मैं तुम्हे फ़िर मिलूंगी …
कहाँ किस तरह यह नही जानती
शायद तुम्हारे तख्यिल की कोई चिंगारी बन कर
तुम्हारे केनवास पर उतरूंगी
या शायद तुम्हारे कैनवास के ऊपर
एक रहस्यमय रेखा बन कर
खामोश तुम्हे देखती रहूंगी I
- समीर गायकवाड.
सुरेख लेख!
सुरेख लेख!
छान लिहिलंय. काही ठिकाणी काही
छान लिहिलंय.
काही ठिकाणी काही वाक्य दोनदा आलीयेत तेवढं बघा जरा.
आवडले. २-३ परिच्छेद रिपीट
आवडले. २-३ परिच्छेद रिपीट झालेत.
सुरेख लेख! + १
सुरेख लेख! + १
छान लेख!
छान लेख!
अप्रतिम बापू !! अमृताजींचे
अप्रतिम बापू !!
अमृताजींचे लिखाण वाचले ऐकले ते गुलजार साहेबांनी केलेल्या त्यांच्या कवितांच्या अनुवादातून च. मग पुढे कधी तरी 'अमृता-इमरोज ए लव्ह स्टोरी' हातात आले आणि मुग्ध होऊन ते वाचल्या गेले.
'मै तैनू फिर मिलांगी च्या त्या लाईन्स नी तुम्ही समारोप केला ह्या लेखाचा..माझी अत्यंत आवडती कविता धन्यवाद
सुंदर लेख!
सुंदर लेख!
खुपच सुरेख. साहिर लुधियानवी
खुपच सुरेख.
साहिर लुधियानवी आवडते गीतकार.अमृता प्रीतम यांच्याबद्दल इतकी विस्त्रुत माहिती नव्हती. बर्याच नविन गोष्टी कळल्या या लेखाच्या अनुषंगाने.
सुरेख.
सुरेख.
सुरेख!
सुरेख!
मस्त!
मस्त!
सुरेख!
सुरेख!
अप्रतिम लेख!
अप्रतिम लेख!
मस्त लिहीलय.
मस्त लिहीलय.
सुरेख लिहिलय
सुरेख लिहिलय
चांगला लेख. लेखातला निदान
चांगला लेख.
लेखातला निदान काही भाग अगोदर वाचल्यासारखा वाटतोय. अंबरीश मिश्रंनी लिहिलं होतं का कुठल्या दिवाळी अंकात?
छान लेख.. तूम्हारी अमृता, हा
छान लेख..
तूम्हारी अमृता, हा नाट्यप्रयोग याच नात्यावर आधारीत होता ना ? ( शबाना आझमी आणि फारुख शेख सादर करत असत तो. )
नाही. 'तुम्हारी अमृता'चा या
नाही. 'तुम्हारी अमृता'चा या अमृताशी काहीही संबंध नाही.
>>लेखातला निदान काही भाग
>>लेखातला निदान काही भाग अगोदर वाचल्यासारखा वाटतोय>> सहमत. खूप नव्याने वाचल्यासारखं वाटलं नाही त्यामुळे.
मस्त लेख.
लेखातला निदान काही भाग अगोदर
लेखातला निदान काही भाग अगोदर वाचल्यासारखा वाटतोय. अंबरीश मिश्रंनी लिहिलं होतं का कुठल्या दिवाळी अंकात?>>
ओके, म्हणजे कुणितरी आहे ज्यांनाही असेच वाटते आहे.
ह्याच नाही तर ह्यांच्या बहुतांश लेखाबद्दल मला सतत असे वाटत आहे. कदाचित माझी चुकही होत असेल.
पण कुठलाच लेख कुणा एका व्यक्तीने लिहला आहे असे नाही वाटत. थॉट प्रोसेस वेगळी वाटते एखाद-दुसर्या पॅर्यानंतर.
मला कुठला वाद नाही घालायचा आहे. फक्त जे जाणवले ते नमुद केले इतकेच.
लिखाण छानच आहे. काही
लिखाण छानच आहे.
काही फॅक्टसची गफलत आहे का? त्यांचं साहिरवर चं प्रेम एकतर्फा होतं. जेव्हा साहिर आणि सुधा मल्होत्रा यांचं अफेअर सुरु झालं त्याच सुमाराला इमरोज त्यांच्या आयुष्यात आले इ.
विकी पण हेच सांगतं.
https://en.wikipedia.org/wiki/Amrita_Pritam
छान लेख.
छान लेख.
फारच सुंदर
फारच सुंदर लिहिलंय....
अमृता-साहिर-इमरोज या संबंधात अनेक वेळा वाचलेले आहे पण हे वाचन नेहेमीच मनात एक उत्सुकता निर्माण करत आलंय... अशा तर्हेनेही प्रेमभावना जपता येते, जगता येते हे वाचून एक सुखद आश्चर्यच मनात दाटून रहाते...
छान लेख, अफलातुन आयुष्यांची
छान लेख, अफलातुन आयुष्यांची माहिती. (या आयुष्यांवर "ती अशीच का अन तशीच का - योग्य की अयोग्य" असे काही बोलण्याची मजसारख्या सामान्य वकुबाच्या कुवतीच्या माणसांची पात्रता नसतेच! उलट यांच्या आयुष्यातुन काही सकारात्मक बोध घेता आला तर तेच आमचे नशिब म्हणायचे !)
लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
छान
छान
फारच सुंदर लेख. अमृता आणि
फारच सुंदर लेख.
अमृता आणि साहिर यांच्या उत्कट प्रेमाबद्दल ऐकले आणि वाचले होते, पण प्रथमच तपशीलात इतका मोठा लेख वाचला. काही लोक मनस्वी आणि अदभूत असतात. अमृता, इमरोज आणि सहिर हे तिघेही मला तसेच वाटतात.
फारच सुंदर
फारच सुंदर लिहिलंय....
अमृता-साहिर-इमरोज या संबंधात अनेक वेळा वाचलेले आहे पण हे वाचन नेहेमीच मनात एक उत्सुकता निर्माण करत आलंय... अशा तर्हेनेही प्रेमभावना जपता येते, जगता येते हे वाचून एक सुखद आश्चर्यच मनात दाटून रहाते...>>>>>> + कितीतरी.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/21416 - नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम - अकुचा एक अतिशय सुंदर लेख...
मस्त!
मस्त!
अप्रतिम.आधी कुठे तरी वाचलं
अप्रतिम.आधी कुठे तरी वाचलं असण्याची शक्यता असतेच पण म्हणून हे त्यांचं लेखन नाहीये असं म्हणू नये असं वाटत . बरीच माणसं एकसारखा एक विचार करू शकतात. बऱ्याच ऐकलेल्या आणि वाचलेल्या गोष्टींवर एक सारखा विचार करण्याची खूप शक्यता असते . आपण सुद्धा एखाद्याचं लेखन वाचतो तेव्हा अरे मला पण याच आणि याच शब्दात व्यक्त व्हायचं होत असं वाटू शकत. पण माझ्या आधी ती व्यक्ती आधी व्यक्त झाली एवढाच काय तो फरक
Pages