शिप ऑफ थिसीयस.. माझी वैयक्तीक मते

Submitted by दिनेश. on 18 June, 2016 - 07:32

शिप ऑफ थिसस..

हा चित्रपट ज्या वेळी प्रदर्शित झाला होता, त्यावेळी त्या बद्दल बरेच वाचले होते. त्याला अनेक पुरस्कार देखील
मिळाले आहेत. ( मायबोलीवर पण चर्चा झाली होती ) विकिपिडीया वर तर अनेक तज्ञांनी अफाट स्तुति केली आहे.

अगदी अजिबात चुकवू नका पासून नाही पाहिलात तर जीवन व्यर्थ आहे, इथपर्यंत लिहिलेले आहे.
गेल्या भारतभेटीत सिडी नाही मिळाली पण यू ट्यूबवर तो आहे, तो काल बघितला.

खाली जे लिहितो आहे ती माझी वैयक्तीक मते आहेत आणि तसेच ज्यांना अजून तो बघायचा आहे, त्यांनी ती वाचू
नयेत.

या चित्रपटात तीन कहाण्या आहेत. आणि त्या सर्व अवयव रोपणाशी संबंधित आहेत. शिप ऑफ थिसस हा एक पौराणिक गहन प्रश्न आहे. एका जीर्ण जहाजाचे सर्व भाग दुरुस्ती दरम्यान बदलले तर ते मूळ जहाज राहिल का ? आणि अश्या काढलेल्या भागांचा वापर करून जर दुसरे जहाज बांधले, तर मूळ जहाज कुठले ?

याचे आजचे रुप म्हणून या तीन कहाण्या. कहाण्या म्हणून त्या अतिशय सुंदर आहेत. मूळात असे प्रश्न आपल्याला
क्वचितच पडत असतील. त्या तीन कहाण्यांची ओळखही करून देतो.

पहिल्या कहाणीत एक इजिप्शियन मुलगी दिसते. ती अंध आहे पण तरीही ती उत्तम फोटोग्राफर आहे.
आवाजाचा वेध घेऊन ती फोटो काढते आणि तिचे फोटो उत्तम येतातअ, त्याची प्रदर्शनेही भरतात. तिच्या डोळ्याचे
ऑपरेशन होते आणि तिला दूष्टी प्राप्त होते. त्यानंतरही ती फोटो काढते, पण तिला स्वतःलाच आपल्या कलेत
काहीतरी कमी झालेय असे वाटत राहते.

दुसर्‍या कहाणीत, एक जैन साधू, ( मी सोयीसाठी जैन हा शब्द वापरतोय )औषधांच्या चाचणीसाठी लहान प्राण्यांवर जे अत्याचार होतात, त्याने व्यथित झाला आहे. त्यासंबंधात त्याने हायकोर्टात पेटीशन दाखल केले आहे. त्या अर्जावर सुनावणी सुरु आहे. पण पुढे त्यालाच लिव्हरचा विकार होतो. त्याचे मित्र आणि डॉक्टर त्याला औषधोपचाराचा आग्रह धरतात. पण ते त्याच्या तत्वात बसत नाही. पुढे तो अन्नत्यागही करतो. ( या कहाणीचा निश्चित शेवट दाखवलेला नाही.)

तिसर्‍या कहाणीत, एक शेअर ब्रोकर किडनी ट्रान्सप्लांट करून घेतो. तिथे त्याला एका किडनी चोरीच्या केसबद्दल
कळते. आधी त्याला वाटते कि त्याला मिळालेली किडनीच चोरलेली आहे. पण मग त्याला कळते कि ती किडनी
स्वीडनमधल्या एका माणसाला मिळालेली असते. तो त्या माणसाला जाऊन भेटतो आणि किडनी परत दे म्हणून
सांगतो. अर्थातच ते शक्य नसते. पण तो भरपाई देतो.

परत एकदा सांगतो, कि मूळ कथा कल्पना मला खुपच आवडली. दुसर्‍या आणि तिसर्‍या भागातले नायक अत्यंत
दूराग्राही असले तरी कथा म्हणून ते मला आवडलेच. पण एकंदर चित्रपटाचे सादरीकरण मात्र मला अजिबातच
आवडले नाही.

त्याबद्दल लिहितो.

वर लिहिल्याप्रमाणे मी बघितला तो यू ट्यूबवर. त्या आधी रितसर सेन्सॉरचे सर्टीफिकेट दाखवलेय. त्यावर भाषा, हिंग्लीश असे लिहिलेले आहे !
आता मला पडलेला प्रश्न. अशी एखादी भाषा अस्त्तित्वात आहे ? जर ती हिंदी आणि इंग्लीशचे मिश्रण मानायचे, तर
दोन्ही भाषांची टक्केवारी काय ? सर्टीफिकेट देताना, इंग्रजी आणि हिंदी असे लिहिता आले नसते का ?
मग याला जे पुरस्कार मिळाले ते कुठल्या भाषेसाठी ?

बरं याशिवायही चित्रपटात अनेक भाषा आहेत. एखाद दुसरा संवाद मराठीत आहे. पण तो परवडला. पहिल्या
भागातली नायिका तिच्या घरच्यांशी अरेबिक मधे बोलते. त्यावेळी पडद्यावर सबटायटल्स नाहीत. म्हणजे तिचे
अरेबिक बोलणे पूर्ण वस्तविक आहे पण ती भाषा प्रेक्षकांना कळावी, हि अपेक्षा मात्र मला अवास्तव वाटते.
पण तेही परवडले, कारण ते संवाद कथेशी फारसे संलग्न असावेत असे वाटत नाहीत.

तिसर्‍या भागात तो स्वीडीश माणूस ( चक्क आपल्या वपूंसारखा आहे तो ) अनेक संवाद स्विडीश भाषेत बोलतो.
तेही नैसर्गिक. आपल्या शेअर ब्रोकरला अर्थातच ती भाषा येत नाही. म्हणून तो एक मित्र दुभाषा म्हणून नेतो.
पण मजा म्हणजे, तो मित्र सर्वच संवादाचे भाषांतर करत नाही. बरेच महत्वाचे संवाद मला कळले नाहीत ( पडद्यावर
सबटायटल्स नाहीत )

आपले सेन्सॉर बोर्ड जसे शब्दाशब्दाची छाननी करते, तसे या भांषेंच्या बाबतीत केले असेल का ? सेन्सॉर नंतर तर
पूर्वी दूरदर्शन स्वतःचे नियम लावत असे. सौतन नावाच्या सिनेमात अछूत शब्द अनेकवेळा येतो. दूरदर्शन तो म्यूट
करत असे, पण ओठांच्या हालचालीवरून तो काहीतरी भलताच शब्द वाटत असे.

हा चित्रपट भारताची शान आहे असे काही विचारवंतानी म्हंटलेय ( विकिपिडीयावर आहे ते. त्या सर्व प्रतिक्रिया
मूळ रुपात लेखाच्या शेवटी देतो ) मग भारतातील किती व्यक्तिंना ( पक्षी प्रेक्षकांना ) या भाषा समजतात ?
बरं, संदर्भावरून, हावभावावरून वा हालचालीवरुन ते संवाद कळावेत, असे काही नाही. ( मला कळले नाहीत.)

प्रत्येक भागात ज्या बाबी मला कळल्या नाहीत, त्याबद्दल लिहितोच. पण संपूर्ण चित्रपटभर कॅमेराने जे काही केलेय,
त्यातलेही बरेचसे मला कळले नाही. काही काही दृष्य चौकटी अप्रतिम आहेत ( जैन साधू अत्यवस्त असताना,
दिसणारे शेत किंवा स्वीडन मधील खडक ) पण बर्‍याचदा कॅमेरा हवे ते टिपतच नाही. उदा. जेव्हा डॉक्टर त्या
जैन साधूला सांगतात, कि त्याला कसला आजार झालाय, त्यावेळी तर कॅमेरा दोघांपैकी एकाच्याही चेहर्‍यावर
नाही. चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत.

संगीत काही जाणवण्याइतपत वेगळे नाही. एका प्रसंगात ऐकू येणारे भजन खास या चित्रपटासाठी पाकृत भाषेत
लिहिलेले आहे ( घ्या, आणखी एक भाषा ) असे विकिपिडीयावर कळले.

आता एकेका भागाबाबत

१) या भागाचे चित्रीकरण त्यातल्या त्यात बरे आहे. आईदा अल खशेफ ही मूळातच इजिप्शियन अभिनेत्री आहे.
विलक्षण बोलका चेहरा आणि डोळे आहेत तिचे. या चित्रपटात ती आवाजाचा वेध घेत जे फोटो काढते, त्यासाठी
एक खास उपकरण तिच्या कॅमेरावर बसवलेले दाखवलेय. पण तसे कुठलेही उपकरण सध्या तरी उपलब्ध
नाही. मूद्दाम हे लिहितोय, कारण एवढ्यापुरती तरी दिग्दर्शकाने वास्तवापासून फारकत घेतलीय. ( सिनेमॅटीक
लिबर्टी !! ) त्यामूळे ती जे फोटो काढते ते रँडमली काढते.

ती फोटो काढताना तिला सगळ्यांचेच ( म्हणजे रस्त्यावरच्या लोकांचे ) सहकार्य मिळते आणि तिथे बघे जमत नाहीत,
हे मला पटले नाही. शिवाय तिची दॄष्टी परत आल्यानंतर ती सैरभैर होऊन रस्त्यावरुन फिरताना दाखवलेय,
त्यावेळी बराच वेळ कॅमेरा निरर्थकपणे रस्त्यावरची माणसे टिपत राहतो. ( वेल, त्यात काही गूढ अर्थ असेल तर
म्या पामरास तो कळला नाही. )

२) दुसर्‍या भागात, रस्त्यावरची काही दृष्ये छुप्या कॅमेरने सुंदर टिपली आहे. ( पण तिला प्रातिनिधिक मुंबई
म्हणणे, मला जरा अतिच वाटते. )
या साधूचाच नव्हे तर एकंदर अहिंसेचा विचार मला फारसा पटत नाही. मी स्वतः शाकाहारी आहे तो निव्वळ आवड
( किंवा नावड म्हणा ) म्हणून. पण मांसाहार करण्यात फार हिंसा वगैरे आहे असे मी मानत नाही. कारण अन्न म्हणून
खाल्ली जाणारी हर एक वस्तू ( मीठासारखे अपवाद वगळल्यास ) जीवांपासूनच मिळते कि. अशोक नायगावकरांची, एक छान कविता आहे. शाकाहारातल्या हिंसेबाबत. पण असो निव्वळ आठवण आली.

इथे या साधूला सुनावणीसाठी जाताना, रस्त्यावर एक किडा दिसतो. तो किडा तो कोर्टाच्या स्टँप पेपर वर उचलून
एका पानावर सोडतो. हे फार पुण्याचे काम झाले का ? तो पानावर ठेवल्यावर एखाद्या पक्ष्याच्या नजरेस पडणार
नाही का ? तो किडा तर त्या पक्ष्याचे आणि त्याच्या पिलांचे अन्नच आहे. मूळात जिथे किडे उपलब्ध होतील,
अश्याच ठिकाणी पक्षी घरटी बांधतात. मग यात हिंसेअहिंसेचा प्रश्नच कुठे येतो ?

कोर्टातील दृष्ये मात्र अस्सल आहेत. तिथेही सरकारी वकिलांनी मांडलेले मुद्दे योग्यच आहेत. औषधांची चाचणी
होणे गरजेचे नाही का ? मग ती छोट्या प्राण्यांवर करण्याशिवाय कुठला पर्याय आहे ? गरीब देशांतील लोकांवरही
असे प्रयोग होतात. त्याबाबतीत काय करायचे ? याच चित्रपटात मात्र प्रत्यक्ष गिनी पिग च्या डोळ्यावर होणारी
एका शाम्पूची ( औषधाची नाही ) चाचणी विस्ताराने दाखवलीय.

याशिवाय दोन मुद्दे आहेत. ( जे चित्रपटातही आलेत ) ज्या काळात पायाखालच्या किडा मुंगीलाही इजा पोहोचू
नयेत, अशी तत्वे धर्माने स्वीकारली असतील. त्या काळात बहुदा ज्ञान नसावे किंवा सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध
लागलेला नसावा. मग मानवी शरीरात राहणार्‍या करोडो जीवाणूंचे काय ? का ते जीवच नाहीत ?
आणि अत्यंत आजारी असताना, औषधोपचार नाकारणे, हि देखील स्वतःवरची हिंसाच नाही का ?
वर लिहिल्याप्रमाणे हे मुद्दे चित्रपटात आलेत पण त्यावर प्रतिवाद झालेला नाही.

या भुमिकेत नीरज काबी आहे. औषधोपचार नाकारल्यानंतर त्याचे झालेले कृश शरीर दाखवण्यासाठी त्याने खरेच
स्वतःची उपासमार करुन घेतली होती. खोल गेलेले डोळे, बाहेर आलेल्या बरगड्या, पाठीला झालेल्या
जखमा ( बेड सोअर्स ) अगदी नको तितक्या विस्ताराने दाखवलेय.

मला वैयक्तीक रित्या हे अजिबात पटले नाही. कितीही कॅल्क्यूलेटेड रिस्क असेना. पण ती घ्यायची काय गरज आहे ?
नाट्यकला आणि चित्रपट कला या आभासी कला आहेत ना ?
डॉ. लागूनी स्वच्छपणे असे सांगितले होते, कि भुमिका जगणे वगैरे झूठ आहे. नटाला सर्व व्यवधाने ठेवावीच लागतात. केवळ प्रेक्षकांना तसा आभास झाला पाहिजे.
झिम्मा पुस्तकात, विजयाबाईंनी सुरवातीलाच एक भद्रकाली देवीचा किस्सा लिहिला आहे. त्या देवीची सुंदर रांगोळी
काढून तिची मनोभावे पूजा करतात. तिच्यासमोर नाटकाचा प्रयोग करतात आणि तो झाल्यावर पुजारी पायाने
ती रांगोळी पुसून टाकतात. सादर होणारा हा केवळ एक प्रयोग आहे, हेच त्यातून सांगायचे असेल का ?

चित्रपटात तर अनेक बाबतीत तांत्रिक मदत मिळण्यासारखी असते. चित्रीकरण, मेक अप तर आहेतच शिवाय
कॅमेरा ट्रिक्स आणि स्पेशल इफेक्टसही असतात. एखादी व्यक्ती आंधळी दाखवायची ( याच चित्रपटात आहे म्हणून
उदाहरण घेतोय ) तर तिला मुद्दाम अंध करायची का ? मग ही तंत्रे आणि अभिनय कला काय कामाची ?

काबीचे अनेक जणांनी यासाठी कौतूक केलेय. पडद्यावर केवळ काहि मिनिटे तसे दिसण्यासाठी, हे करणे म्हणजे
अभिनय का ?

याशिवाय चित्रपटात या अवस्थेत असताना मलमूत्राने अंथरुण खराब झालेले, ते स्वतः नीट करण्याचा अट्टहास
हे सगळे विस्ताराने दाखवलेय. या सगळ्याचा चित्रपटाच्या परिणामकारकेत आणि कलामक मूल्यात काय
व्हॅल्यू अ‍ॅडीशन होते ?

३) या भागाचा गोषवारा वर आलेलाच आहे. यातल्या नायकाला एक वृद्ध आजी आहे. ती त्याला कायम रागे
भरत असते कि तो केवळ पैश्याच्याच मागे असतो. पुस्तके वगैरे वाचतच नाही ( घ्या, हा गुन्हा आहे तर )

आता या आजीच्या संदर्भात एक प्रसंग सविस्तरपणे चित्रीत केलाय. पायाला फ्रॅक्चर झाल्याने ती हॉस्पिटलमधे
बिछान्यावर आहे. तिला लघवी करायची आहे. नायक नर्सला बोलवायला जातो, तर त्या ओ टी मधे बिझी असतात.
तर नायक म्हणतो, मीच बेड पॅन देतो. तो तिच्या बेडखालचे पॅन काढतो. बेसिनमधे धुतो, त्यावर कापूस ठेवतो.
मग तिच्या पायाखाली सरकवतो. ती लघवी करते. ( तिचा आवाज येतो ) त्यावेळी तो मात्र भिंतीकडे तोंड करून
उभा आहे. पण कॅमेरा मात्र सगळे बघतोय, दाखवतोय. मग तो ते पॅन काढतो. बाजूच्या रूममधे जाऊन धूतो... हो मी जितक्या विस्ताराने लिहिलेय, तितक्याच विस्ताराने चित्रपटात आहे ते. काय गरज होती या दृष्याची ?

त्याला त्या किडनी रॅकेट बद्दल कळल्यावर तो थेट स्वीडनला जातो. आणि त्या माणसाला सांगतो कि किडनी
परत दे. किती अविचार आहे हा ? अशी किडनी परत करता येते ? नेटवर शेअर ट्रेडींग करणार्‍या माणसाला एवढेही समजत नाही ?

या बाबतीत त्या स्विडिश माणसाने घेतलेला पवित्रा खुपच प्रॅक्टीकल आहे. तो त्या दात्याची सर्व जबाबदारी घेतो.
त्त्याला कायम आर्थिक मदत करायची तयारी दाखवतो आणि करतोही. याशिवाय ज्याची किडनी चोरली गेलीय,
तो माणूसही याने समाधानी आहे. तर आपला नायक त्याला सांगतो, कि ते पैसे नाकार, मी तूला यापेक्षा
जास्त पैसे मिळवून देतो ( ब्रोकर आहे तो ) तो माणूस अर्थातच त्याला झिडकारतो.

या भागातही निरर्थक दृष्ये आहेतच. ( पोलिस स्टेशनच्या बाहेर दोन महिला पोलिस अधिकारी, बॅडमिंटन खेळताना
दाखवल्यात. बराच वेळ )

आपला नायक त्या माणसाला शोधायला जातो, त्या प्रसंगातही अशीच निरर्थक लांबड लावलीय. ( अरुंद जागेत
गाडी घुसवणे. अरुंद गल्ल्यातून जाणे, तिथल्या रहिवाश्यांचे चित्रण.. हे सगळे तर मला थट्टाच वाटले त्या लोकांची )

यानंतर आणखी घोळ.. शेवटी कुठली तरी बिगर सरकारी संस्था भाऊ दाजी लाड संग्रहालयात ( जिथे एरवी
फोटोग्राफीला परवानगी नाही ) एका माहितीपटाचे आयोजन करते ( तिथेच का, मुंबईत मिनी थिएटर्स नाहीत का ?)
आणि तिथे आपली नायिका आणि दोन्ही नायक आलेले असतात. ( बस एवढेच, पुढे काही होत नाही.)

माहितीपटात एका जमिनीखालच्या गुहेत आपण जातो... आणि जात राहतो. दी एन्ड !!!!

विकिपिडीयावर कौतूक म्हणून आणखी काही बाबी आहेत. म्हणजे एका पात्राचे नाव चार्वाक आहे, किंवा एका
प्रसंगात ते पुस्तक दिसते ते म्हणे अमूक तमूक आहे.

अरे भारतीयांसाठी बनवला आहे ना हा चित्रपट, मग भारतीयांना समजेल अशी प्रतीके वापरा ना ! का केवळ
पुरस्कारांसाठीच बनवला आहे. मग अशा चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यापेक्षा, बाहुबली सारख्या चित्रपटांना
मिळाला तर काय वाईट ?

परत एकदा.. ही माझी वैयक्तीक मते आहेत. तूमची मते वेगळी असतील तर जरूर लिहा.. पण माझी मते
कशी चुकीची आहेत, हे मला समजावण्यावर वेळ घालवू नका. प्लीजच !!!

हि विकीपिडीयावरची मते....

Shekhar Kapur tweeted, "Finally a brilliant new filmmaker emerges in Anand Gandhi with `Ship of Theseus’."[49][50]

Actor Hugo Weaving said, "Ship Of Theseus is an absolutely rare and profound piece of cinema, full of wonder and enlightenment. Anand Gandhi has proved himself as a groundbreaking filmmaker."[33][34]
Anurag Kashyap called it, "The most brilliant film to have been made in India in decades. Puts all of us to shame."[51][52][53]

Veteran filmmaker Shyam Benegal deemed it, "A rare film that engages your mind, emotions and senses in equal measure providing the viewer a cinematic experience that is both hugely entertaining and stimulating."[54][55]

Celebrated documentary filmmaker and polemicist Anand Patwardhan wrote, "Anand Gandhi’s 'Ship of Theseus' is Kieslowskian in scope and delivery, playing between serendipity and causality, but it took me that crucial step further in its rediscovery of the human."[56][57]
Man Booker Prize winning author and political activist Arundhati Roy wrote, "Ship of Theseus is a profound and fearless film. It is fearlessly contemporary, fearlessly un-noisy and utterly beautifully observed."

Atul Kulkarni called it, "Ship of Theseus. A must, must , must watch. Go with lots of patience and you shall be rewarded with a 'life' time experience ..."[58]
Dibakar Banerjee said, "Ship of Theseus gave me serious doubts about myself as a filmmaker. I seriously introspected for two-three days about my thinking as a filmmaker... This was one film which captivated you, which held you, which mesmerised you without manipulating even once."[59] He also wrote a favourable review on the film and afforded it much praise, encouraging readers to watch the film twice.[60]

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंयत !

मी हा सिनेमा पाहिलेला नाही. पण लेख वाचत असताना, मी पाहिलेल्या इतर अनेक सिनेमांशी नकळतच संदर्भ जोडत गेलो. मी कुठलीही नावं इथे घेणार नाही. असंबद्ध वाटतील.
पण 'कोर्ट'चा मात्र आवर्जून उल्लेख करतो.
कारण अनावश्यक दृश्यांबाबत जे तुम्ही लिहिलं आहे, तोच माझा 'कोर्ट'बद्दल मोठा आक्षेप आहे. कदाचित कलात्मक सिनेमा म्हणजे लोकांना किती जास्तीत जास्त कंटाळा आणता येईल किंवा जे काही दाखवलं आहे ते किती जास्तीत जास्त अनाकलनीय वाटेल, असा प्रयत्न असावा की काय असंच मला वाटायला लागलं आहे आताशा.
सिनेमाच का ? कुठल्याही कलाकृतीबाबत असंच आहे एकंदर.

ह्म्म्म... बर्याच वेळा अनाकलनीय किंवा इतरांना कंटाळवाणे अथवा असंबद्ध वाटतील अशा गोष्टी चित्रपटात दाखवल्या जातात. जे लोक relate करू शकतात त्यांना त्या असंबद्ध वाटत नाहीत. हे relate करणे कित्येक पातळींवर असते. इथे मायबोलीवरच लंचबॉक्स, फाईंडिंग फँनी, सैराट अशा चित्रपटांविषयी पाने भरभरून लिहिली गेलीत. तेही कित्येकांना सामान्य, असंबद्ध वाटले.

मी शिप... बद्दल वाचलेय. यु ट्युबवर आहे तर नक्कीच पहायचा प्रयत्न करेन. बघते, मला कसा वाटतो ते.

ह्म्म्म... बर्याच वेळा अनाकलनीय किंवा इतरांना कंटाळवाणे अथवा असंबद्ध वाटतील अशा गोष्टी चित्रपटात दाखवल्या जातात. जे लोक relate करू शकतात त्यांना त्या असंबद्ध वाटत नाहीत. हे relate करणे कित्येक पातळींवर असते. इथे मायबोलीवरच लंचबॉक्स, फाईंडिंग फँनी, सैराट अशा चित्रपटांविषयी पाने भरभरून लिहिली गेलीत. तेही कित्येकांना सामान्य, असंबद्ध वाटले.

मी शिप... बद्दल वाचलेय. यु ट्युबवर आहे तर नक्कीच पहायचा प्रयत्न करेन. बघते, मला कसा वाटतो ते.

लंचबॉक्स, फाईंडिंग फँनी

>> मस्त आठवणी.. हे दोन्ही बघायला ज्या ग्रुपसोबत गेले त्या अख्ख्या ग्रुपमध्ये मला एकटीला आवडले आणि इतरांनी शिव्या दिल्या. त्यामुळे मीच अ‍ॅबनॉर्मल आहे का काय असे वाटले होते. आता या सिनेमांवरचे धागे काढून वाचते परत एकदा. Happy

लेखात उपस्थित झा(के)लेल्या प्रश्नांना माझ्या परिने काही उत्तरे :

१. अशी एखादी भाषा अस्त्तित्वात आहे ?

होय. भारतात सामान्यतः बोलल्या जाणार्‍या, व भारतीय धाटणीच्या इंग्रजीला हिंग्लिश हा शब्द आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो ऑक्सफर्ड डीक्शनरीतही समाविष्ट केलेला आहे.

२. यूट्यूब व सबटायटल्स.

  • माझ्या माहितीप्रमाणे सबटायटल्स दाखवायचे की नाही, असा ऑप्शन यूट्यूबवर असतो.
  • अनेकदा (नव्हे, ऑल्मोस्ट नेहेमीच) यूट्यूबवर अपलोड केलेल्या सिनेमाच्या प्रती पायरेटेड असतात, त्यात सबटायटल असतीलच असे नाही.
  • सबटायटलची वेगळी फाईल डाऊनलोड करून आपल्या भाषेतील सबटायटल पहायची सोय असते.

३. एका प्रसंगात ऐकू येणारे भजन खास या चित्रपटासाठी पाकृत भाषेत
लिहिलेले आहे ( घ्या, आणखी एक भाषा ) असे विकिपिडीयावर कळले.
<<
दिनेशदा, बस का? तुम्ही पाककृतींचे बादशहा आहात. पण म्हणून प्राकृताची पाकृ? Wink Light 1

४. आवाजवेधी उपकरण.
<<
जन्मांध व्यक्तिंना प्रौढ वयात दृष्टी "परत" येते, ती नॉर्मल माणसाइतकी असते, हीच मुळात एक मोठ्ठी सिनेमॅटिक लिबर्टी आहे.

५. स्वतःवरची हिंसा
<<
स्वतःच्या जिवाचे हालहाल केल्याशिवाय देव भेटत नाही अशी एक कन्सेप्ट फार पूर्वीपासून व फार खोल रुजलेली आहे. बुद्धानेही आधी त्याकाळच्या प्रचलित कल्पनेनुसार अती उपास वगैरे करून अर्धमेला झाल्यानंतर जेवण खाण सुरू केले, व त्यानंतर त्याला बोध झाला, असे वाचनात आहे.

पण कितीही सांगितलेत तरी "अहिंसक" लोकांना स्वतःवरची हिंसा ही कन्सेप्ट पटत नाही.

-.-.-.-

याव्यतिरिक्त इतर बाबींबद्दल बोलण्यासारखे माझ्याकडे काही नाही. कुणी काय दाखवायचे अन ते पाहून कुणी काय बोध
घ्यायचा वा निष्कर्ष काढायचा ते आपल्या हाती थोडंच आहे? बाकी शिणुमामा कलात्मक व विचारप्रवर्तक वगैरे आहे. आर्टफिल्ममधे आयटम साँग तो नही आनेवाला. या फिर आ भी सकता है... शेवटी दिग्दर्शकालाही वैयक्तिक मते आहेत. त्यांचा आदर आहेच.

"विकीपेडीया वाचून परिक्षण लिहितात का?" असा प्रश्न मायबोलीवर उपस्थित केलेला पाहिला. अन माबोच्या रेसिडेंट समिक्षक/लेखक(?)/विचारवांती/ संस्कृतीरक्षकांनी त्यावर दात काढणार्‍या कुजकट स्मायल्याही टाकलेल्या पाहिल्या. म्हणून हा प्रतिसादप्रपंच Wink

ता. क. ते टायटलात थिसियस करणार का? मला वाटतं थिसस नसून थिसियस्/थिसिअस आहे.

शीप ऑफ थीसीयस असे हवे आहे असं मला वाटतं.
मला स्वतःला हा चित्रपट अतिशयच आवडतो परत परत पहायला देखील. मी ह्या प्रश्नावर स्वतः विचार केलाय, कदाचित म्हणून मी ह्या टॉपीकला खूपच रीलेट करू शकले. जेव्हा मी पहिल्यांदा ऑर्गन ट्रानस्प्लांट मधे काम चालू केलं, पुढे नंतर स्टेम सेम मधे रीसर्च चालू केला, आणि लिव्हर जनरेशनच्या कामात आले, तेव्हापासून मला हा प्रश्न होता. की असे वेगवेगळे ऑर्गन एकतर ट्रान्स्प्लांट केल्यावर किवा आता स्टेम सेल टेक्नीकने नव्याने जनरेट केल्यावर, तो माणूस नक्की कशापासून बनलाय असं म्हणायचं?
हाच विचार पुढे वैचारीक लेव्हलाला नेता, आपल्यावर आयुष्यात भेटणार्‍या लोकांचा इतका इनप्लूएन्स होतो वेळोवेळो, की आपण खरे कसे हा प्रश्नही पडतो. आणि स्वतःचा शोध घेण्याची वेळ येते. मी ह्या फेजमधूनही गेलीये, विचार केलाय.
त्यामुळे हे आपल्याला पडणारे प्रश्न कोणी इतक्या एफेक्टीव्हली सिनेमा माध्यमातून मांडतंय हे पाहून मला खूप समाधान वाटलं होतं हा चित्रपट पाहून. परत पाहिला की नवीन काही रीयलाईज होतं.
जबरदस्त सॉलींड थींकींग प्रोसेस आहे आणि अनेकदा अ‍ॅबस्ट्रॅक्ट वाटणारं, बीटवीन द थॉटस मांडायच्या गोष्टीही खूप इफेक्टीव्हली प्रेसेंट केल्या आहेत सिनेमात, जे खूपदा अवघड असतं. मी एकुणच ह्या सिनेमावर टोटल फिदा आहे. अगदी त्याच्या नावापासूनच.

त्या आंधळ्या फोटोग्राफरच्या स्टोरीमधे तिला दृष्टी आल्यावर सैरभैर होते कारण सडनली आयुष्यातला 'व्हीज्युअल नॉइज वाढतो'. आयुष्यातला हा फोकस, सिग्नल टू नॉइज रेशो प्रचंड विषम प्रमाणात बदलतो असं ते दाखवायचं आहे.
गोष्टी फील होणं आणि दिसणं ह्यातलाही फरक.
त्यातल्या प्रत्येक स्टोरीबद्दल असं खूप डीटेल लिहिता येईल. पण सध्या इतकंच.

दिनेश, तुम्हाला सिनेमा आवडला नाहीये आणि तुम्ही लिहिल्याप्रमाणे तुम्हाला त्यात काय आहे हे समजावण्याचा मी प्रयत्न करणार नाहीये. प्रत्येकाच्या वैयक्तिक मताला जागा असावीच..
माझा अतिशय आवडता सिनेमा. विशेषतः दुसरी गोष्ट तर फारच आवडली आहे, एकाच वेळा वेगवेगळ्या पातळ्यांवर वावरणारी आणि प्रतीत होणारी आहे. सिम्प्ली ब्रिलियन्ट!

इथे फक्त एवढंच लिहिते -
दुसर्‍या कहाणीचा शेवट अनिश्चित नाही. तो भिक्षु/साधू त्याचं 'भिक्षुत्व' सोडून देऊन सामान्य जीवनाकडे परततो (लिवर ट्रान्स्प्लांट स्वीकारून अर्थातच). शेवटच्या दृश्यामधे तो नेहेमीचे कपडे घालून धडधाकट तब्येतीने बसला आहे

आणि शेवटची 'मीटिंग' आहे ती ज्या एका व्यक्तीच्या अवयवदानाने तीन व्यक्तींची आयुष्यं बदलली त्याच्या स्मरणार्थ आयोजित केली आहे.

त.टी. - चित्रपटाची मुख्य कल्पना ग्रीक मिथकावरून घेतली असली (शिप ऑफ थीसीयस) तरी चित्रपटात वापरलेली बहुतेक सर्व प्रतीके तद्दन भारतीय आहेत. विशेषतः दुसर्‍या गोष्टीत. आता बरेचदा भारतीयांनाच काही ठळक पौराणिक किंवा लोकप्रिय साहित्यिक प्रतीके सोडून इतर पारंपरिक भारतीय मिथके/गोष्टी/प्रतिके माहित नसतात ते जाऊद्यात!
ते प्राकृत गाणं तर केवळ महान आहे. त्याचा अर्थ, शब्द, संकल्पना याच्यावर मी फिदा आहे. अगदी अस्सल पारंपरिक भारतीय विचारधारेचा अर्क तर आहेच पण शब्दयोजनाही सुरेखच!

<मग याला जे पुरस्कार मिळाले ते कुठल्या भाषेसाठी ?>

आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधले पुरस्कार चित्रपटासाठी असतात, भाषेसाठी नाही. एका चित्रपटात अनेक भाषा असू शकतात.
राष्ट्रीय पुरस्कारामध्ये हिंदी-इंग्रजी असा उल्लेख आहे.

< यानंतर आणखी घोळ.. शेवटी कुठली तरी बिगर सरकारी संस्था भाऊ दाजी लाड संग्रहालयात ( जिथे एरवी
फोटोग्राफीला परवानगी नाही ) एका माहितीपटाचे आयोजन करते ( तिथेच का, मुंबईत मिनी थिएटर्स नाहीत का ?)
आणि तिथे आपली नायिका आणि दोन्ही नायक आलेले असतात. ( बस एवढेच, पुढे काही होत नाही.)

माहितीपटात एका जमिनीखालच्या गुहेत आपण जातो... आणि जात राहतो. दी एन्ड !!!!>

भाऊ दाजी लाड संग्रहालयात टीव्ही मालिकासुद्धा चित्रित झाल्या आहेत. नियमितपणे तिथे कार्यक्रम आयोजित होत असतात. गेल्या आठवड्यातच तिथे चित्रीत झालेल्या एका कार्यक्रमात मायबोलीच्या एका सभासदानं भाग घेतला होता. तिथे खाजगी कार्यक्रमही नियमितपणे होतात.

शेवट तुम्ही लिहिला तितकाच नाही.

शिप ऑफ थिसियस ही संकल्पना प्लुटार्कची आहे. प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा हा खंदा समर्थक आणि अभ्यासक. प्लेटोनं 'रिपब्लिक'मध्ये सांगितलेल्या 'allegory of the cave'शी मी या प्रसंगाचा संबंध जोडतो. फार सुरेख प्रसंग आहे तो. तो माणूस गुहेतून बाहेर येत नाही. बाकीच्यांचं काय? आणि प्रेक्षकांचं?

*

नवीन त्या माणसाचं घर शोधत हिंडतो, तो प्रसंगही सुरेख आहे. Labyrinth.

*

चित्रपटातल्या वकिलाचं नाव चार्वाक असणं, हे महत्त्वाचं आहे. तो उगाच वापरलेला तपशील नाही. त्या एका नावासरशी त्या कथेतला इहवादी दृष्टिकोन समोर येतो. मग इतर कशाची फारशी गरज भासत नाही.

मैत्रेयच्या आयुष्यातल्या प्रसंगांचे, विशेषतः तो खंगतो, ते तपशील त्याचं नाव मैत्रेय असण्यात सापडतील. ते अनावश्यक नाहीत. तो जे फळ खातो, त्याचाही संदर्भ आहे आणि तो शंभर टक्के भारतीय आहे. मैत्रेय नाव धारण करणार्‍याची गोष्ट काही परदेशी नाही.

*

नवीन स्वीडनलाच का जातो? Happy तिन्ही कथांमध्ये प्रवास आहे. Duality of identity आहे. चित्रपटाच्या शेवटी तिन्ही कथांमधली पात्रं बदलली आहेत का? गुहेबाहेर कोण पडलं? की कोणीच नाही?

चित्रपट या माध्यमाबद्दलचं भाष्यही मला पहिल्या आणि तिसर्‍या कथेत दिसतं.

*

अतिशय सुरेख पटकथा आहे चित्रपटाची. चित्रपटकर्त्यांनी ती उपलब्ध करून दिली तेव्हापासून तीनचारदा वाचली असेल. दरवेळी नवं काही सापडतं.

असो.

चिनूक्स, पोस्ट लैच आवडली Happy त्या allegory of cave बद्द्ल अनुमोदन... मलाही तेच आठवलं होतं
आता एकदा निवांत वेळ काढून पटकथा वाचली पाहिजे आणि मग परत एकदा सिनेमा बघितला पाहिजे

चंपालाल,

बुद्धाला, स्वतःवरची हिंसा नंतर निरर्थक वाटली होती ना ? पुढे मांस खाल्याने अतिसार झाला व त्यामूळेच अंत झाला अशी कथा आहे ना ?

वरदा,

जर तूम्ही भारतीय तत्वज्ञानावर चित्रपट काढता आहात तर ग्रीक मायथॉलॉजी का घ्यायची ?

भारतीय प्रेक्षकांना प्रतीके नसतील माहित, पण चांगले चित्रपट नक्कीच उचलून धरले जातात. त्यांना असे सरसकट कमी लेखणे मला नाही पटले.

बाकी चिनूक्स,
शक्य असल्यास विकिपिडीया वर पण हे बारके सारके संदर्भ लिहिणार का ? कारण असे कुणी समजाऊन सांगितल्याशिवाय कुणालाच तो चित्रपट समजणार नाही.

कुठलाही चित्रपट बघण्यासाठी, इतके संदर्भ माहित असणे गरजेचे आहे ?

नाव मैत्रेय म्हणून हे आणि नाव चार्वाक म्हणून ते. फार विचित्र वाटतेय मला हे. म्हणजे चित्रपटात कुणाचे नाव आले, कुठल्या कुठल्या पुराणात / इतिहासात / साहित्यात ते नाव आलेय, त्याचे काय संदर्भ आहेत, ते तपासायचे का, प्रेक्षकांनी ?

नंतर निवांतपणे लिहीन.

या धाग्यामुळे मी गेल्या सप्ताहांतात याच नावाचा एक सुंदर चित्रपट पाहिला. खरंतर त्यासाठी धागाकर्त्याचे आभार मानायला हवेत, पण मी बहुधा निराळा चित्रपट पाहिला.

मी पाहिलेल्या चित्रपटात ती फोटोग्राफर मुलगी कॉर्निअल इन्फेक्शनमुळे दृष्टीहीन झालेली असते. फोटोग्राफी त्यानंतर आवश्यकता म्हणून सुरू करते आणि पुढे तो छंदच होतो. कशाचा फोटो काढायचा हे ती आवाजांचे वेध घेत ठरवते. (आवाजाच्या वेधाने मृगया करणारा दशरथ राजा आठवतो का? तसंच.) तिच्या कॅमेराचं काय सेटिंग ती फायनल करते आहे (ॲपर्चर इ.) ते ध्वनित करणारं उपकरण तिच्या कॅमेऱ्याला जोडलेलं आहे. ('फोटोग्राफी फॉर ब्लाइंड्स' असं गूगल केलं तर अशा अनेक उपकरणांची माहिती मिळेल.) तरीही ती ॲमॅचर फोटोग्राफर आहे आणि आपलं होणारं कौतुक हे आपल्या अंधत्वाचं कौतुक (पेट्रनायझेशन) आहे अशी शंका तिला येते. तसंच ती फोटोंच्या क्वालिटीबद्दल सतत खूप असमाधानी असते (like any true artist!) आणि त्यावरून तिच्या बॉयफ्रेन्डशी तिचे सारखे वादविवाद होतात. हे असमाधान तिच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे, आणि तो पुढे कॉर्निअल ग्राफ्टिंगने दृष्टी परत आल्यावरही बदलत नाही. इमोशनल इश्यूजमुळे ती ऑपरेशनलाही काही काळ टाळाटाळ करते असाही उल्लेख आला आहे. दृष्टीलाभानंतर वरदा म्हणाली तसा व्हिज्युअल नॉइज तिला ओव्हरव्हेल्मिंग वाटायला लागतो. मग ती डोळे मिटून फोटो काढायचा प्रयत्न करते. पण तिचा खरा प्रॉब्लेम दृष्टीहीनता हा नव्हताच, असमाधान हा होता. हे बहुधा तिलाही जाणवतं - तिची गोष्ट संपताना दिग्दर्शक आपल्याला हिमालयात (?) एका अतिशय निसर्गरम्य शांत (serene) ठिकाणी तिच्यासह घेऊन जातो. तिला समाधान मिळालं का?

मैत्रेयाच्या गोष्टीत त्याच्या चार्वाकाबरोबर होणाऱ्या चर्चा किंवा कोर्टातली आर्ग्युमेन्ट्स उद्बोधक आहेतच, पण डांबरी रस्त्यांवरून, इलेक्ट्रिकच्या तारांखालून, धूळ उडवत भरधाव धावणाऱ्या वाहनांच्या बाजूने अनवाणी चालणारे भिक्षू, एका प्रसंगात भव्य आभाळाच्या पार्श्वभूमीवर दिसणारी एक इमारतीची चौकट, त्यात एका कोपऱ्यातल्या लहानशा खिडकीत दिसणारे मैत्रेय आणि चार्वाक अशी काही अतिशय परिणामकारक आणि विचारप्रवर्तक दृश्यं आहेत! ती वाहनं जास्त गतानुगतिक की ते भिक्षू? चार्वाक काय आणि मैत्रेय काय - सगळी तत्वज्ञानं शेवटी कुठल्यतरी चौकटीतच सीमित आहेत का? मग सत्य म्हणजे काय? ते त्या तत्वज्ञानांच्या किती पलीकडचं आणि निर्मम आहे?

बरं इतकं तत्वज्ञान कोळून प्यायलेला मैत्रेय काय आणि तिसऱ्या गोष्टीतल्या नवीनची अनुभवलक्षी आजी काय - देहाबद्दलची लाज दोघांची सारखीच! खरंतर हे दर्शवणाऱ्या प्रसंगांचं धागाकर्त्याने इतकं अकारण विचित्र वर्णन केलं आहे की मला ते जवळ आल्यावर आता काय बघावं लागतंय आणि काय नाही अशी भितीच वाटली होती, पण हा चित्रपटच निराळा होता. यात ही दोन्ही दृश्यं दूरान्वयानेसुद्धा किळसवाणी वाटत नाहीत. उलट नवीनचं आजीला बेडपॅन देणं हे बॅडमिंटन खेळणाऱ्या पोलिस मुलींना पडलेलं शटल उचलून देण्याइतकंच किंवा मैत्रेयाने सुरवंटाला पानावर उचलून ठेवण्याइतकंच सहज घडतं. आजीच्या अपरोक्षसुद्धा त्याच्या कपाळावर अनिच्छेची किंवा घृणेची आठी उमटत नाही.

हाच नवीन सतत पैशाच्या उलाढालींत गुंतलेला असल्यामुळे life to it's fullest जगत नाहीये याचं आजीला वाईट वाटत असतं. आपल्या कुठल्याही कृतीमुळे इतरांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो याचं भान असलं की जगणं अनुभवसमृद्ध होतं अशी तिची फिलॉसॉफी. नवीन तिच्याशी भांडतो खरा, पण चोरलेल्या किडनीच्या प्रसंगात बहुधा त्यामुळेच गुंतत जातो. 'अपनेको क्या!' म्हणून ती बाब झटकू शकत नाही. त्या किडनीमागे स्वीडनपर्यंत जातो. त्या किडनी रेसिपियन्टनेही छोट्याश्या प्रसंगात फार प्रभावी अभिनय केला आहे. हा काही मुळात वाईट माणूस नाही, किडनी त्याने पैसे देऊनच विकत घेतली होती, त्यापुढच्या नैतिक प्रश्नांनामात्र आपली गरज आणि 'भारतात असंच चालतं' या समर्थनाची मलमपट्टी केली होती. ती आता निघते. शल्य उघडं होतं आणि त्या प्रसंगी वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू झालेल्या त्या माणसाला या अनोळखी लोकांसमोर लहान मुलासारखं रडू फुटतं!

इतकं करून किडनीदात्याला न्याय नकोच असतो - तो मिळालेल्या मोबदल्यात खुश असतो. त्याच्या घराकडे जाणारी वाट इतकी अरुंद आहे की नवीनच्या मित्राला तिथे शिरतासुद्धा येत नाही! ज्याच्या 'शूजमध्ये पाय घालणं' इतकं कठीण त्याला जज तरी कसं करायचं? त्याला पैसे मिळणं याला नवीनचा विजय म्हणायचा की न्याय न होणं हा पराजय? आधीची फारसे प्रश्नच न पडणारी स्थिती बरी होती की एक पराजयसुद्धा इतका आसुसून जगल्यामुळे आता त्याचं आयुष्य आजी म्हणत होती तसं enrich झालं?

उत्तम कलाकृती उत्तरं देत नाहीत, प्रश्न ऐरणीवर आणतात. अंतिम सत्य म्हणजे काय? असं काही मुळात असतं का? गणितात limits शिकलेल्यांना 'x tends to infinity' ही concept आठवत असेल. तो बिचारा त्याच्या उत्तराच्या / ध्येयाच्या जवळ, आणखी जवळ जात राहतो, पण ते गाठू शकत नाही! गुहेच्या दुसऱ्या तोंडाशी उजेड दिसत राहतो, पण तिथवर पोचता येत नाही!!

असो - तर हे मी पाहिलेल्या चित्रपटाबद्दल. सबटायटल्स नसल्यामुळे, मिथकं न कळल्यामुळे, प्राकृताचा गंध नसल्यामुळे अर्थांचे काही स्तर कदाचित निसटले असतीलही, पण समजला तितकाही फार आवडला!

बाकी कधीतरी (इनडोअर प्लान्टवरसुद्धा) पक्षी मारणारच म्हणून आत्ता सुरवंटाला पायदळी तुडवलं जाण्यापासून वाचवायचा प्रयत्न करणं वेडगळ असेल तर नीरज कबीला कधीतरी आजार/वृद्धत्व/मृत्यू गाठणारच हे माहीत असून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली स्वेच्छेने कमी केलेल्या वजनाची काळजी करण्याला काय म्हणायचं?

<शक्य असल्यास विकिपिडीया वर पण हे बारके सारके संदर्भ लिहिणार का ? कारण असे कुणी समजाऊन सांगितल्याशिवाय कुणालाच तो चित्रपट समजणार नाही.>

हा चित्रपट समजलेले आणि आवडलेले अनेक आहेत.
चित्रपट समजवून सांगण्याची जबाबदारी माझी नाही. Happy

<कुठलाही चित्रपट बघण्यासाठी, इतके संदर्भ माहित असणे गरजेचे आहे ?>

चित्रपट ही एक दृश्यकला आहे. या कलेद्वारे मनोरंजन होते. मनोरंजनाच्याही तर्‍हा असतात.
प्रत्येक कला ही प्रत्येकासाठी नसते. ज्याने त्याने आपापल्या तर्‍हेने कलेचा आस्वाद घ्यावा. एखादी कविता / लेख / शिल्प / चित्र कळलं आणि आवडलं तर उत्तम. नुसतंच आवडलं, तरीही हरकत नाही. अर्थ समजून घ्यायचा की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न.

<नाव मैत्रेय म्हणून हे आणि नाव चार्वाक म्हणून ते. फार विचित्र वाटतेय मला हे. म्हणजे चित्रपटात कुणाचे नाव आले, कुठल्या कुठल्या पुराणात / इतिहासात / साहित्यात ते नाव आलेय, त्याचे काय संदर्भ आहेत, ते तपासायचे का, प्रेक्षकांनी ?>

एखाद्या कलाकाराला काय सांगायचं आहे, ते मला कळलं नाही तर मी ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी हेही एका प्रकारे मनोरंजनच आहे. 'शिप ऑफ थिसियस' बघताना दिग्दर्शकाला काय काय सांगायचं आहे, ते सगळंच कळलं नाही. आजही सगळं कळलं असेलच असं नाही. पण हा चित्रपट मला निदान महिनाभर पुरला. त्यातले प्रसंग, संवाद, कॅमेर्‍याचे अँगल हे आठवत राहिलो, दिग्दर्शकाला काय सांगायचं आहे, त्यावर विचार करत राहिलो.

हे प्रत्येकानेच करावं, असं माझं म्हणणं नाही. पण मला कोणी सगळं समजवून सांगितलेलं आवडणार नाही. सगळं समजावत बसणारे किंवा फार सुलभीकरण करणारे चित्रपट मला आवडत नाहीत. मला ज्या प्रकारचे चित्रपट आवडतात, त्याच प्रकारचे चित्रपट सर्वांनी बघावे, आणि तयार करावे, हे म्हणणं गैर आहे. मला न आवडलेलं टाकाऊ आहे, असं मी म्हणणार नाही.

बाकी तुम्ही 'प्रेक्षकां'चा अनेकदा उल्लेख केला आहे. नक्की कुठल्या प्रेक्षकाबद्दल बोलताय? Happy

कलाकृती बघायच्या आधी सगळ्या गोष्टी माहित नसल्या, तरी एखादी कलाकृती पाहिल्यावर जर प्रश्न पडणार असतील, आणि खोलात जाऊन काही प्रतिकांचा शोध घ्यायची इच्छा झाली, तर ती कलाकृती मला भावते.
असाच एक सिनेमा म्हणजे 'स्प्रींग, समर, फॉल, विंटर अ‍ॅन्ड स्प्रींग ..." इतक्या वेळा पाहिलाय तरी सगळी प्रतिकं समजली आहेतच याची खात्री नाही. दरवेळी नवीन काही सापडतं आणी प्रश्न वाढतात. शोध वाढतो. माझा हा सिनेमाही अतिशय आवडीचा आहे.
माझ्याकडे 'शीप ऑफ थीसीयस' सिनेमाची ऑफीशीयल डीव्हीडी आहे. फार कष्ट करून मिळवलेली. त्यात सबटायटल्स आहेत असं वाट्तंय. चेक करायला हवं. (रीड अ‍ॅस परत एकदा सिनेमा पहायला हवा :))

ह्या चित्रपटावर लिहावं असं अनेकदा वाटलंय. आणि प्रयेक स्टोरीबद्दल फार लिहिताही येईल. पण शीप ऑफ थीसीयस अशी उलगडून, पार्ट पार्ट वेगळा करून दाखवावी का? ते करताना तिचं 'शीप ऑफ थीसीयस' असणंच आपण डीस्टर्ब तर करत नाही ना? असे फार प्रश्न आहेत मला.

ह्या चर्चेत पडण्याचा वकूब नाही. पणः

>>>उत्तम कलाकृती उत्तरं देत नाहीत, प्रश्न ऐरणीवर आणतात. अंतिम सत्य म्हणजे काय? असं काही मुळात असतं का? <<<

हे बाईंच म्हणणं फार आवडलं.

असो.

स्वाती, शोधून देतो. आनंद गांधीच्या फेसबुक पानावर ती आहे. एका ब्लॉगावर त्यानं ती टाकली होती.
या सिनेमाचं संपूर्ण रॉ फूटेजही उपलब्ध आहे. 'या संपूर्ण रॉ फूटेजातून तुम्हांला हवा तसा तुमचा चित्रपट तयार करा' असं त्यानं सांगितलं होतं. असा प्रयत्न कोणी केला असल्यास माहीत नाही, पण मला हे नव्यानं संकलित केलेले चित्रपटही बघायला आवडतील.

आनंद गांधीची राज्यसभा टीव्हीवरची ' गुफ्तगू' मधली मुलाखत पण मस्त आहे. त्यातल्या सगळ्याच मुलाखती आवर्जुन पाहते मी. आवडतात.

विजयाबाई आणि लागूंची मतं नाट्यप्रयोगांबद्दल होती. (भद्रकाली कुठून आली माहीत नाही - मुडियाट्टु विधीचं वर्णन आठवतंय.)
चित्रपट हे निराळं माध्यम आहे. त्याचे वारंवार नव्याने प्रयोग करायचे नसतात.
(असं माझं वैयक्तिक मत आहे, ते चुकीचं असेल तरी मला तसं कोणीही सांगू नये प्लीजच!)
नीरज कबीने अंगाला खरे बेड सोअर्स पाडून घेतले नाहीत कारण ते मेकअपने दाखवणं शक्य असतं. नाटक असतं तर काही प्रत्येक प्रयोगासाठी (प्रत्येक प्रवेशासाठी!) वजन कमीजास्त केलं नसतं. (असं माझं इ. इ.)

दिनेश.,

नीरज काबींनी 'शिप'साठी कमी केलेलें वजन 'तलवार'साठी वाढवलं. ते पुन्हा एका ऐतिहासिक चित्रपटासाठी बरंच कमी केलं. हे त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि अतिशय संथ गतीनं केलं.

असं वजन वाढवणारे आणि कमी करणारे काही कलाकार आहेत. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली शक्यतो ते असे प्रकार करतात. जिथे धोका वाटेल, तिथे माघारही घेत असतील. मला माहीत असलेलं हे एक उदाहरण -
http://www.healthaim.com/christian-bale-enzo-ferrari-movie-abandoned-due...

Immortal नावाचा एक अफाट सुंदर इराणी चित्रपट गेल्या वर्षी आला होता. त्यातल्या एका पात्राचं खंगत जाणं नीरज काबींपेक्षाही भयानक होतं.

बाकी नीरज काबींच्या वजनाचा या चित्रपटाच्या दर्जाशी संबंध नसावी, असं वाटतं. Happy

मी सिनेमा पाहिलेला नाही पण इथल्या प्रतिक्रिया वाचून पहावासा वाटतोय!
सिनेमा पाहण्याच्या प्रोसेस बद्दल चिनूक्स शी सहमत.. Even I love exploring this way.. It's a very enriching process.
>उत्तम कलाकृती उत्तरं देत नाहीत, प्रश्न ऐरणीवर आणतात. अंतिम सत्य म्हणजे काय? असं काही मुळात असतं का? >>अगदी अगदी! चांगली कलाकृती कधीच सोपी नसते/नसावी.
पण चिनूक्स तुझं "चित्रपट समजवून सांगण्याची जबाबदारी माझी नाही" हे वाक्य आजिबात पटलं नाही. माझं बरेचदा उलटं होतं म्हणजे मला जर असे काही शोध लागले तर मला दुसर्‍याला सांगितल्या शिवाय चैन पडत नाही!

मला विचारलं तर सांगेन. न विचारता सांगायला जाणार नाही. जाहीरपणे तर नक्की समजवणार नाही (न विचारता). दुसर्‍याला खाजगीत सांगणं वेगळं आणि आंतरजालावर जाहीरपणे लिहिणं वेगळं. रसभंग होऊ शकतो. चित्रपटाबद्दल चर्चा करणं वेगळं, समजवणं वेगळं. जे खुद्द दिग्दर्शकानं केलं नाही, ते इतर कोणी का करावं?

>> चांगली कलाकृती कधीच सोपी नसते/नसावी.

चित्रपट बघितलेला नाही. पण हे विधान कळत नाही. काही लोकांनां प्रश्न उपस्थित करणारी कलाकृती आवडू शकते आणि काही लोकांनां सगळं पूर्णपणे उलगडून सांगणारी कलाकृती आवडू शकते.

मग एक कलाकृती वाईट (किंवा चांगली नाही) आणि एक चांगली असं कशावरून ठरवता येईल? आणि ते कोणी ठरवायचं?

वरच्या एक प्रतिसादातील पोस्ट वाचून वाटले की, इतका अट्टाहास कसला चाललाय...
प्रत्येक जण चित्रपट आपल्या नजरेने बघतो. मग दुसर्‍याला त्याच्या नजरेने समजलेला चित्रपट कसा चुकीचा आहे, हे सांगण्यात/पटवण्यात काय अर्थय? आणि त्यात इथे पुर्ण गोष्ट लिहिणं किंवा तु कसा चुकीचा अर्थच काढलाय.

आणि खरी गोष्ट हि अशी आहे हे सांगणे म्हणजे निव्वळ आगाउपणा आहे. Wink

Pages