FAN - एका फॅनच्या नजरेतून ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 June, 2016 - 13:47

कॉमनसेन्स इज सो अनकॉमन...

इट इज वेरी डिफिकल्ट टू बी सिंपल..

याच धर्तीवर असेही म्हणता येईल की स्वत:चा अभिनय करणे हा जगातील सर्वात कठीण अभिनय आहे.

म्हणजे जसे तुम्ही रोजच्या आयुष्यात वागता तसेच वागायचे आहे, पण त्याचवेळी ते रोजचे घरात वावरल्यासारखे न वाटता अभिनय वाटला पहिजे. असेच काहीसे जमवायचे होते शाहरूखला फॅन या चित्रपटात. यातली एक भुमिका त्याला त्याची स्वत:चीच करायची होती. जर हा अभिनय फसला असता तर त्याचे हसे होणार होते. पण जमला असता तर यात काय एवढे मोठे, स्वत:सारखेच तर वागायचे होते म्हणत कोणी कौतुकही करणार नव्हते. पण याहीपुढे जाऊन आणखी एक दिव्य करायचे होते, ते म्हणजे स्वत:च साकारत असलेल्या आपल्या दुसर्‍या आणि भावखाऊ भुमिकेला आपल्यापेक्षा वरचढ होऊ द्यायचे नव्हते. अभिनेत्या शाहरूखने सुपर्रस्टार शाहरूखला मात देऊ द्यायचे नव्हते... आणि अखेर दाद याला द्यावी की त्याला द्यावी या संभ्रमात प्रेक्षकांना सोडण्यात अदाकार शाहरूख यशस्वी ठरला.

एखाद्याला वाटेल आज एवढ्या दिवसांनी याला फॅनवर लिहायचे का सुचले? तर उत्तर सोपे आहे. मी काल पाहिला.
चित्रपटाला मिळालेला रिस्पॉन्स पाहता फारश्या अपेक्षा नव्हत्या. म्हणूनही असेल कदाचित, आवडला!

काही लोकांकडून ऐकलेले की यात त्याने त्याच्या सुरुवातीच्या काळातला डर, बाजीगर आणि अंजामसारखा अभिनय केलाय, तर काही लोकांनी यातील काही दृश्यांना वा पटकथेला अतर्क्य म्हटले होते. पण मनाची पाटी साफ कोरी ठेवून पाहिली आणि या कश्यातही तथ्य नव्हते हे चित्रपट संपल्यावर जाणवले. चित्रपट बघायला सुरुवात केली तेव्हा डोळ्यावर झोप होती. जरा जरी बोर झालो असतो तर कुठल्याही क्षणी मान कलंडली असती. पण पडद्यावरच्या द्रुश्यांनी नजरेला ईथे तिथे हलायची संधी दिली नाही तिथे मान कसली कलंडतेया. आता चित्रपटात एकही गाणे नसल्याने म्हणा मला जागे राहायला सोपे पडले असावे, अन्यथा चित्रपटात गाण्याच्या जागा बर्‍याच होत्या.

असो, धागा मात्र या चित्रपटाचे कौतुक करायला नाही तर फॅनच्या नजरेतून प्रामाणिक मत मांडायला काढला आहे. किंबहुना टिकाच जास्त आढळल्यास नवल नसावे.

आणि पहिलेच प्रामाणिक मत क्रमांक १) शाहरूखने अ‍ॅक्शनचा अट्टाहास सोडावा!

या चित्रपटातील अ‍ॅक्शन रावण सारखी अगदीच टाकाऊ नाही. काही ठिकाणी बर्‍यापैकी जमलीही आहे. पण हे सारे करायला ईंडस्ट्रीत आज ईतके नवे जुने अ‍ॅक्शन कलाकार आहेत, तर यासाठी शाहरूखच का हवा? शाहरूखने ते करावे ज्यात त्याची स्वत:ची मास्टरी आहे. जे तो सोडून ईतर कोणालाच जमू नये. वा जमले तरी ती शाहरूखचीच कॉपी वाटावी. शाहिद असो वा आर माधवन, वा गेला बाजार रणबीर कपूर वा रणवीर सिंग, यां सर्वांनी कुठे ना कुठे त्याला कॉपी करायचा प्रयत्न केला आहेच.

असो, पण एक मात्र कबूल करावे लागेल की या वयातही यात त्याने जी अ‍ॅक्शनदृश्ये दिली आहेत, मूळचा अ‍ॅक्शनहिरोचा पिंड नसतानाही, त्या एनर्जी लेव्हलला तोड नाही. हॅटस ऑफ! पण तरीही असे वाटते की तो स्वताला सिद्ध करायला जर हे करत असेल तर त्याच्या फॅन्सना त्याची गरज वाटत नाही. फॅन बघताना त्यातील अ‍ॅक्शन द्रुश्ये संपून शाहरूखचा अभिनय आणि संवाद कधी सुरू होतो याची मी वाट बघायचो, यातच सारे आले.

२) जबरा फॅन हे गाणे चित्रपटात कुठेच नव्हते. ना आधी ना शेवटी. ना इंटरवलला वाजले. शेवटी तर असे वाटले की आपल्या मोबाईलमधलेच वाजवावे आणि खुर्चीवर उभे राहून नाचावे. त्या गाण्यावर नाचताना एक शाहरूख फॅन म्हणून वेगळाच आनंद मिळतो. हे गाणे चित्रपटात न ठेवण्याची आयडीया ज्या कोणाची असेल त्याला देव कधी माफ करणार नाही.

३) शाहरूखचा चित्रपट म्हटला की लोकं मनोरंजनाची अपेक्षा ठेवतात. कारण त्याच्यासारखा एंटरटेनर बॉलीवूडमध्ये दुसरा कोणी नाही. फिल्मफेअर अ‍ॅवार्ड फंक्शनमध्ये तो दरवर्षी याची नव्याने आठवण करून देतो. चेन्नई एक्स्प्रेसचेच उदाहरण घ्या. म्हटलं तर खूप काही भारी नव्हता. त्याच्या आधीच्या गाजलेल्या कैक प्रेमपटांच्या तुलनेत तसा कमीच होता. तरीही त्यात त्याने मनोरंजन केले आणि लोकांना तो आवडला.

फॅनमध्ये देखील पहिल्या भागात एका फॅनचा वेडेपणा आणि त्यातून घडणार्‍या गंमती दाखवायची संधी होती. पण तो भाग टाळून किंवा जेमतेम पाचेक मिनिटांत उरकून चित्रपट फक्त एक थ्रिलर बनून राहील याची काळजी घेण्यात आली. जे माझ्यामते चुकलेच!

४) चित्रपटातील एकही कॅरेक्टर चित्रपट संपल्यावर लक्षात राहत नाहीत. कुठलेही कॅरेक्टर त्या ताकदीचे उभे केले नाहीये, किंबहुना असेही म्हणून शकतो की शाहरूख आणि त्याचा फॅन वगळता कोणालाही जास्त फूटेज दिले गेले नाहीये. आणि या दोन्ही भुमिका शाहरूखनेच साकारल्या असल्याने सतत चित्रपटभर प्रत्येक द्रुश्यात पडदा व्यापत तो आणि तोच दिसून राहतो. एखाद्या फ्रेममध्ये तो नसलेली सलग तीन सेकंदे मिळणे मुश्कील ईतका तो चित्रपटभर पसरलेला आहे.

अर्थात हे शाहरूखपटांचे वैशिष्ट्य असले तरी ईतर कलाकार चित्रपटात असूनही उठून न दिसणे हे चित्रपटासाठी मारक ठरले.
माझ्यासारख्या फॅन्सनाही आजवर त्याने समोरच्याला गुंडाळून पडदा काबीज केलेले बघायला आवडत आलेय.

५) एखाद्या स्टेज शो मध्ये स्वत:वर विनोद करणे हे शाहरूखसाठी नवीन नाही. या चित्रपटात त्याने शाहरूख उभा करताना बरेच ठिकाणी तो कितीही मोठा किंग खान असला तरी तीसमार खान नाहीये हे प्रामाणिकपणे दाखवलेय. परक्या देशात तेथील कायद्यासमोर हतबल होणे असो वा एखाद्याच्या लग्नात नाचणे असो. अगदी त्याच्या वाढत्या वयाचेही त्याला एक सुपर्रस्टार म्हणून टेंशन असल्याचे चित्रपटात दाखवणे कमाल होते. एकंदरीत एक सुपर्रस्टार फक्त आणि फक्त त्याच्या फॅन्समुळेच असतो आणि फॅन्स नाही तर तो काहीच नाही, हे त्याने प्रामाणिकपणे पोहोचवलेय.

६) क्लायमॅक्सला एके ठिकाणी त्या फॅन गौरवची आई त्याच्या वडिलांना म्हणते, चूक आपलीच झाली जे आपण आपल्या मुलाला शाहरूखच्या आयुष्यातील चमकधमक दाखवली. पण आज जिथे तो पोहोचला आहे आहे तिथे पोहोचण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी त्याने जी मेहनत घेतली आहे, ती दाखवली असती तर आपला मुलगा तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून वेगळा वागला असता.
चांगला विचार, चांगला संदेश. पण हा चित्रपटातून तितकाच समर्थपणे समोर आला नाही. खरे तर शाहरूखच्या स्ट्रगलला पडद्यावर बघायलाही आवडले असते.. किंबहुना आवडेल.. त्याच्या आयुष्यावर देखील एक चित्रपट बनायला हवा. हिरोईन, फॅशन, पेज थ्री बनवणार्‍या मधुर भंडारकरने "सुपर्रस्टार" नावाचा सिनेमा बनवायला मनावर घ्यायला हरकत नाही.

असो, शेवटच्या चार ओळीत एवढेच म्हणेन की,
चित्रपट शाहरूखचा असूनही कुठेही खदखदवून हसवत नाही. कुठेही टाळ्याफेक संवाद नाहीत. शेवटचा एक किंचितसा अपवाद वगळता कुठेही डोळ्यातून पाणी यावे असे काही नाही. थोडेसे च्चं च्च मात्र अध्येमध्ये होत राहते. उत्कंठाही चित्रपटभर कायम राहते. पण असा एखादा फॅन आपल्या आसपास आपण कधीही पाहिला नसल्याने चित्रपटाशी आपण हवे तसे रिलेट होत नाही. शेवटी जाता जाता तो फॅन शाहरूखला बोलतो, "रहन दे, तु नही समझेगा.." ते कुठेतरी आपल्यालाही लागू होते. याच कारणामुळे आपल्याला त्या शेवटाचा धक्का हवा तसा बसत नाही. किंवा बसलाच तरी मनात घर करून राहत नाही. कदाचित हेच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाचे कारण असावे आणि म्हटलं तर हेच त्या कलाकृतीचे यश आहे..

पर रहन दे, तु नही समझेगा .. कारण प्रत्यक्षात देखील आपण कमीच पडतो, अश्या एखाद्या फॅनला समजायला..

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष,

तो फॅन आला न, म्हणजे त्याचे ट्रेलर्...तेव्हा खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र सांगतो, मला त्या गौरव च्या जागी "ऋन्मेष" च दिसत होता [ जरी तुला कधी ही प्रत्यक्षपणे भेटलो नाहीये Wink ] बाकी शा.खा. चे चित्रपट पाहू नये हा निर्णय घेउन पण आता जमाना झालाय Lol तू म्हणतोस >>शाहरूखने अ‍ॅक्शनचा अट्टाहास सोडावा! << रादर त्याने आता मीच लय भारी, माझ्या पुढे दिवे ओवाळा, मीच सर्वोत्तम रोम्यांटिक हिरो हा पण अट्टाहास सोडावा, तो जेव्हा असा अट्टाहास सोडतो ना, किंवा कमी करतो ना त्यावेळी तो नितांत सुंदर अभिनय करतो. मुळात तो गुणी अभिनेता आहेच्...स्वदेस, चक दे, पहेली सारखे विषय असलेल्या चित्रपटांमध्ये फार सहज सुंदर अभिनय केलाय त्याने...पण आपल्या इथले पब्लिक ही त्याला वाय. झेड. पणा करायला लावतं आणि त्या गोष्टी ला डोक्यावर घेतं...
असो, तुझा लेख आवडला....As usual Proud

Honestly speaking, I didnt expect this write up to be as good ! वाटलं होतं की अजून एक ओवाळणीचा बाफ सुरु केलायस की काय !!

पण सुखद आश्चर्याचा धक्का का काय म्हणतात, तो बसला मित्रा..!

चांगलं लिहिलं आहेस. विचारपूर्वक लिहिल्यासारखं वाटत आहे. विचार जुळणे न जुळणे हा भाग निराळा, पण 'विचार केला आहे' हे जाणवलं पाहिजे, नाही का ?

लेखातील पहिला परिच्छेद आणि पुढे मत क्र.१ आणि ४ बऱ्यापैकी पटले !

भक्त हा गांधारीसारखा आंधळा असतो. धृतराष्ट्रासारखा नाही. फरक इतकाच की गांधारीने नसलेलं अंधत्व प्रामाणिकपणे निभावलं आणि भक्त पट्टी सरकवून मधूनच चोरून पाहत असतो, पण मान्य करत नाही की त्याला दिसतंय.
- असा एक धडा तुझ्या ह्या लेखातून मिळाला.

चोरून का होईना, पाहत राहा भावा ! Lol

प्रसन्न, मला स्वतालाही पुर्ण पिक्चरभर गौरवच्या जागी मीच दिसत होतो Proud

रसप धन्यवाद, प्रामाणिकपणाचा जमाना नाही. म्हणून अधूनमधूनच दाखवावा.

प्रसन्न, मला स्वतालाही पुर्ण पिक्चरभर गौरवच्या
जागी मीच दिसत होतो>>>>>>>>
स्वआरती व आत्मस्तुतीसाठी तयार!

रिव्ह्यू आवडला. एका भक्ताच्या नजरेतून न लिहिता, फॅनच्या नजरेतून लिहील्यासारखा वाटला.
सिनेमा पाहिला नाही, पहायची शक्यता पण कमीच आहे. पण अवधूत गुप्तेच्या आवाजातलं मराठी 'जबरा फॅन' सध्या रिपीट मोडवर आहे.

चेन्नई एक्स्प्रेस नंतर शाहरुख खानचा आवडलेला हा चित्रपट .

त्यातला तो रहेन्दे तू नही समझेंगा हा डायलॉग भारी आहे..

ऋन्मेष, भक्तपणाचा ओव्हरडोस न करता चांगलं लिहिलेस

चांगले लिहिलेय. आणि खुप प्रामाणिक.

आपल्याकडे अभिनेते वाढते वय का स्वीकारत नाहीत, कळत नाही. बच्चन ने देखील आता आता वयाला अनुसरून भुमिका स्वीकारल्या.

काल एका चॅनेलवर कमल हासनचा दशावतार दाखवत होते, काय तो सोस गेट अप चा.. आणि अनेक गेट अप कळून येत होते ( फारच बटबटीत ) बरं ते स्वतःला तंदुरुस्त सुद्धा राखत नाहीत. तसे असते तरी बघवले असते.

मस्त लिहिलेयस .
मी चित्रपट बघायचा प्रयत्न केला . पहिल्या १५ मि. चिड्चिड झाली मग बन्द करून टाकला.
मूळात तो गौरव काय बोलतो तेच कळलं नाही .

कमल हसन बाबत सहमत.
लोकं म्हणतात म्हणून तो माझ्यासाठी चांगला अभिनेत आहे. अन्यथा मी त्याचे हिंदीत जे काही चित्रपट पाहिलेत ते मेक अप शेक अप थापलेलेच.

बाकी मी शाहरूखचा फॅन आहे भक्त नाही.
त्याचा हॅपी न्यू ईय्यर आणि दिलवाले अजून पाहिला नाही. जब तक है जान अर्ध्यावर सोडला. रावण दुसरे काहीच करायला नसल्याने पाहिला.

चेन्नई एक्स्प्रेस मात्र आवडलेला. इनफॅक्ट काल हे लिहिता लिहिता झी सिनेमावर लागलेला तो पुन्हा एकदा तासदिड तास पाहिला.

सांगायचा मुद्दा हा की त्याने काहीही करावे आणि मी आवडून घ्यावे असे नाहीये. तर त्याने मला नव्हे तर सर्वांनाच आवडेल असे काम करावे असे मला वाटते. जसे एखाद्या सचिनच्या चाहत्याला त्याचे शतक व्हावेसे वाटते तसेच शाहरूखचे चांगले पिक्चर यावेत असे मला वाटते.
बाकी त्याच्यावरून ईथे तिथे भांडणे हे तर फॅन म्हणून चलता है. एखाद्या भ्रष्ट राजकीय नेत्याचा चमचा बनत भांडण्यापेक्षा हे नक्कीच वाईट नाही Happy

आर्यनमॅन (योगायोग बघा, शाहरूखचेही फॅनमधील नाव आर्यनच Happy )
मी स्वताला शाहरूखच्या जागी नाही तर गौरवच्या जागी बघितले असे म्हणालो. जर स्वताला शाहरूखचा फॅन समजणे हे तुम्हाला आत्मस्तुती वाटत असेल तर मी याला शाहरूखची महानता समजू का Wink

स्वस्ति,
मला तर तसे काही वाटले नाही की त्याच्या बोलण्यात अस्पष्टता वगैरे. जमल्यास पुन्हा पुर्ण बघायचा प्रयत्न करा..
बाकी ते बोलायचे राहू द्या पण काही द्रुश्यात गौरव झालेल्या शाहरूखने डोळ्यातून मस्त अभिनय केलाय.

आप की अदालत

हा शाहरूखचा वीस बावीस वर्षांपूर्वीचा डर बाजीगर काळातील ईटरव्यू
https://www.youtube.com/watch?v=DleMBQ617ms

आणि हा खालचा त्याचा हल्लीचा ईंटरव्यू
https://www.youtube.com/watch?v=t_FyYz1pOVg

दोन्ही पाठोपाठ रांगेत बघा. मजा येईल. बराच प्रामाणिकपणा दाखवलाय. काही कबूली जवाब आहेत. अगदी फिल्मफेअर विकत घ्यायचा प्रयत्न केलेला ईथपासून. एरोगन्स दोन्हीमध्ये थोडाफार जाणवतो. जुन्यामध्ये किंचित जास्त जाणवतो. तो ते स्विकारतोही. पण या सर्वात एक गोष्ट कबूल करावी लागेल. याच्यासारखा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर फक्त याच्याकडेच ..

शाहरुख चांगला एंटरतेनर आहे हे मी प्रत्यक्ष पाहिले त्याला तेव्हा स्वतःशीच कबुल करावे लागले Happy नाहीतर मी आधी त्याला शिव्याच घालायचे. त्याला चांगले दिग्दर्शक मिळाले तर पुढेही ती दर्जेदार काम करेल. त्याच्यात कपॅसिटी आहे, पण निर्माते (ज्यात तो स्वतःही आहेच) कसलीही रिस्क घेऊ इच्छित नाही. खरेतर हे खूप फसवे आहे. ज्यांनी रिस्कस घेतल्या त्यांचे ते प्रयोग यशस्वी झालेत, जसे शाहरुखचा चक दे मधला रोल. नेहमीच्या पठडीतला नसूनही खूप यशस्वी.

शाहरुखला अक्कल यावी आणि निदान स्वतःच्या निर्मितीत तरी त्याने वेगळे प्रयोग करावेत आणि स्वतःच्या गुणवत्तेला अधून मधून हवा द्यावी हीच इच्छा.

,

साधनाजी प्लस वन ..

तो सेकंड इनिंग एवढ्यात सुरू करू इच्छित नाही.. आता हे चूक की बरोबर हे काळच ठरवेल.. मात्र अमिताभ सारख्यालाही हा मोह सुटला नव्हताच.. लाल बादशाह, इन्सानियत वगैरे नंतर बडेमिया छोटेमियामध्ये गोविंदाचा सहाय्यक अभिनेता म्हणून काम करण्यात धन्यता मानत होता .. लेटस सी .. शाहरूखचे चित्रपटांप्रती पॅशन आणि त्यातील टॅलेंट पाहता तो संपला असे कधीच होणार नाही.

मी शाहरूखचा फॅन नसून भक्त आहे आणि त्याची स्तुती एके आंधळी स्तुतीच करतो या रसप यांच्या धाग्यावर झालेल्या माझ्यावरच्या या आरोपाला खोडायला हा धागा वर काढत आहे.

हायझेनबर्ग, लाभ घ्यावा. आणि सांगा यात स्तुती एके स्तुती कुठे दिसली तुम्हाला?
पण जर त्याची ओवरऑल कारकिर्द पाहता तो एक सुपर्रस्टार म्हणून ओळखला जात असेल तर त्याला सुपर्रस्टार म्हणण्यात माझे चुकले काय?

मी शाहरूखचा फॅन नाही पण माझा बेस्ट फ्रेंड आहे सो तो घेऊन गेलेला "फॅन" बघायला...

खरं सांगू.. अजिबात आवडला नाही चित्रपट..म्हणजे असं वाटलं कसातरी सिनेमा संपवलाय....आणि फॅन इतक्या टोकला जाऊ शकतात अगदी आपल्या रोल माॅडेलची बदनामीही करायला धजत नाही आणि स्वतःच निर्माण केलेल्या पेचात स्वतःलाच अडकवून वरती मृत्यूला कवटाळून शेवटच्या घटकेला ...रेहने दे तु नही समझेगा..असं म्हणणं कुठेतरी पटतं नाही ..

शाहरूख ग्रेट अॅक्टर आहे त्यात नो डाऊट...त्याची अॅक्टींग आवडली आणि ह्या चित्रपटातही खुप छान काम केलयं त्याने इतकीच काय ती जमेची बाजू...

हो अजय चव्हाण, शाहरूखने छान अभिनय केला आणि मेहनतही घेतलेली जाणवते. स्टारडम आयते मिळालेय वा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला नाहीये तो. मेहनतीने मिळवलेय त्याने. आणि आज टॉपला पोहोचल्यावरही तिथे मेहनतीच्या जीवावरच टिकून आहे. त्याच्यातील अफाट उर्जा ईथेही जाणवते. त्यामुळे शाहरूखने निराश केले नाही. फॅनबाबत त्याच्या चित्रपटनिवडीनेही केले नाही. मात्र पटकथा आणि सादरीकरणात फसला.