एक नवीन मित्र

Submitted by विद्या भुतकर on 18 May, 2016 - 19:55

लग्न लागलं, कौतुक सरलं, पाहुणे रावळे आपापल्या घरी परतले. महिनाभर होऊन गेला. पाठराखीण म्हणून आलेली आक्का पण आपल्या घरी परत निघून गेली होती. घर मोकळं झालं. आता मोजून चार माणसं आणि नवीन सुनबाई इतकेच काय ते राहिले. शैलूला अजूनही नवीन घराची, माणसांची सवय झाली नव्हती. नवरा घरी असतानाच काय ते मन रमायचं. तो ऑफिसला जाईपर्यंत त्याच्या मागे मागे फिरत राहायची. तो एकदा बाहेर पडला की घर खायला उठायचं. कुठल्याही घराला अचानक आपलं माननं इतकं सोपं असतं का?

सासूबाई समजून घ्यायच्या, त्यामुळे ती दिवसभर त्यांच्याच भोवती घोटाळत असायची. त्या सांगतील ते काम पटापट करायची. त्याही घरच्या सर्वांची माहिती हळूहळू देत राहायच्या. दिराला काय आवडतं, सासऱ्याना काय लागतं, त्यांच्या आवडी, वेळा, सवयी सर्व सांगत रहायच्या. ती ऐकून घ्यायची. कधी जमेल तर भाज्या चिरून देणे, केर काढणे, पसारा जागच्या जागी लावणे अशी कामं करायची. चहा नेऊन दिला तरी अजून बनवला नव्हता. त्यांना कसा लागतो तेही कळायला वेळ लागणार होताच. दिराशी हळूहळू गट्टी जमत होती. तो कॉलेज वरून आला की गप्पा मारत बसायचा. कितीही सहभाग घेतला तरी पूर्ण घराची जबाबदारी काही तिच्यावर नव्हती आणि तिला त्याची घाईही नव्हती.

परवा मात्र सासूबाईनी चार दिवस एका लग्नासाठी परगावी जाणार म्हणून सांगितलं होतं तिला. तेव्हढाच जरा नव्या जोडप्याला एकांत आणि आपल्यालाही रोजच्या कामातून सुटका असा विचार करून दोघेही परगावी जाणार होते. उद्या जायचे म्हटल्यावर त्यांनी शैलूला सर्व माहिती देऊन ठेवली. लाईट कधी येते, किती वेळ जाते, पाणी किती वेळ येते आणि कशात भरून ठेवावं हे सांगून ठेवलं. रवा, तांदूळ, पीठ-मीठ सर्व दाखवून ठेवलं. तिला थोडी भीती वाटत होतीच पण थोडा आनंदही होता की जरा मोकळीक मिळणार होती. रात्री सासू सासऱ्यांची तयारी तिने करून दिली. पहाटे त्यांच्यासोबत उठून त्यांना डबा बनवून दिला. ते निघून गेल्यावर पाणी भरून घेतलं, घर साफ केलं. नवऱ्यालाही सर्व नीट हवं नको ते पाहिलं. निघताना त्याच्या सूचक स्पर्शाने थोडी शहारलीही. दीर उठल्यावर त्याला चहा-नाश्ता दिला आणि तो कॉलेजला गेल्यावर एकदम मोकळी झाली.

सगळे गेल्यावर एकदा घराकडे बघून घेतलं आणि आवरू नंतर म्हणून आईला फोन लावून बोलत बसली. जरा गादीवर लोळत पडली. थोडा टिव्ही पाहिला. दुपारचे दोन वाजत आले होते, दीर आल्यावर त्याच्यासोबत जेवूनही घेतलं. जेवण झाल्यावर भांडी घासायला घेतली. सकाळपासून पडलेल्या त्या भांड्यांकडे पाहून तिला नकोसं वाटलं. इतके दिवस सासूबाई घासून घेत आणि ती धुवून घेई. त्यामुळे सर्वांच्या ताटात राहिलेलं खरकट, त्या तशाच सिंक मध्ये पडलेल्या प्लेट, चहाचे कप सगळं बघून शिसारी आली. कितीही म्हटलं तरी क्षणभर लोकांच्या घरची भांडी घासण्याची तिला किळस वाटली. कसेतरी तिने ते काम पूर्ण केले. सकाळपासून एकेक केलं तरी काम संपत नव्हतं. कोवळं वय ते, घरी कधी इतक्या कामाची सवय नाही. त्यामुळे शैलूचा इतुकासा जीव दमून गेला होता.

बाथरूममध्ये गेल्यावर तिच्या लक्षात आले की सकाळी सासूबाई कपडे बुट्टीत साबणाच्या पाण्यात भिजवून गेल्या होत्या. नवरा, ती आणि दिरानेही त्यातच कपडे भिजायला टाकले होते. बाहेर टीव्ही बघत पहुडलेल्या दिराकडे तिने पाहिलं आणि नाईलाजाने कपडे धुवायला गेली. कितीतरी वेळ त्या भिजलेल्या कपड्यांकडे बघत राहिली. नवरा म्हणून आपलं मानलं तरी त्याचे कपडे धुवायची पहिलीच वेळ होती. धीर धरून तिने मळकं साबणाचं पाणी बाहेर काढलं, एकेक करून आपले कपडे धुतले. पण पुढे होऊन नवऱ्याची किंवा सासऱ्यांच्या अन्डरपॅन्ट ला हात लावायची तिची इच्छा होईना. लोकांच्या घरी असं आपलं म्हणून अशी कामं मीच का करायची? या घरचा मुलगा असून तो दीर बाहेर पडलाय निवांत. नवराही स्वत:चे कपडे, भांडी न धुता निघून गेला. या सर्वांचा तिला संताप येऊ लागला. तिला आता रडू यायला लागलं.ती तशीच रडत बसून राहिली.

पाचेक मिनिटांत दीर येऊन म्हणाला, "वहिनी काय झालं गं? रडतेयस का? काही झालं का? "

ती एकदम भानावर आली, डोळे पुसू लागली. पण रडू थांबत नव्हतं.

ती रडत रडत बोलली, "तू सांगू नकोस हं कुणाला? "

तो काळजीने म्हणाला, "नाही नाही हो, तुम्हाला काय होतंय सांगा मला. "

ती, "मला हे असे कपडे धुवायला नको वाटतंय. काय करू ? "

तो हसला, तिच्याशेजारी बसला, म्हणाला,"सांगायचं ना मग. आई करते रोज त्यामुळे आम्हाला लक्षातच आले नाही. थांबा मी करतो तुम्ही बसा इथे. मला सवय आहे तशी. आई कधी गावाला गेली की आम्ही करतोच की. "

त्याने एकेक करत बनियन, अन्डरपॅन्ट धुतले, पिळून घेतले. सासूचेही साडी, ब्लाउज धुतले. तिने ते पिळून घेतले. धुतलेले सर्व कपडे बादलीत घालून बाहेर घेऊन गेला, वाळत घातले. ती त्याच्या मागे मागे फिरत होती. तो गप्पा मारत सराईताप्रमाणे सर्व कामे करत होता. तिला थोडा वेळ लाजल्यासारखे झाले. पण तो इतका निवांतपणे सर्व करत होता की हळूहळू तीही स्थिरावली. आजचं मोठ्ठ काम त्याने पार पाडलं होतं.

नवरा घरी आल्यावर सर्वांनी बसून चहा घेतला. संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला ती स्वयंपाकघरात आली तेव्हा सिंकमधले तिन्हीही कप आधीच धुतलेले होते. तिने दीराकडे पाहीले. त्याचं आश्वासक हसू पाहून तिला एक नवीन मित्र भेटल्याची खात्री झाली होती.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेज्स्मि, पियु, मी काय बोलू आता? आपल्या लढाया आपणच लढाव्या लागतात. जे चुक आहे ते चूक म्हणून भान्डणे योग्य आहे असे मला म्हणायला सोपे आहे. पण प्रत्यक्शात तुमच्या आयुश्यात काय अडचणी आहेत त्या तुम्हालाच माहीत.
I feel that one has to be strong enough to set the things right for their own self.
Anyways, I am glad at least you could relieve your feelings here.

Vidya.

असा दीर प्रत्यक्षात अस्तीत्वात असतो का?>>>>
हो असतो असा दीर...माझा आहे आणि माझा नवरा ही माझ्या जावेसाठी असाच चांगला दीर आहे

मुळात सगळ्यांचे कपडे, भांडी हे सुनेचंच काम आहे हा दृष्टीकोणच चुकीचा आहे. घरात बाई लावायची नसेल तर प्रत्येकाने आपले कपडे, भांडी अशी कामे करून टाकण्यात काहीच गैर नाही. अपवाद घरातल्या वृद्ध व लहानांचा.

माझा नवराही असाच दीर आहे हे माझ्या जावा मान्य करतात. उलट तोच म्हणतो की 'भारतीय बायकांना सासरी आणखी समजुतीने वागवायची गरज आहे. त्यांच्या डोक्याला फार त्रास असतो'

Pages