एक नवीन मित्र

Submitted by विद्या भुतकर on 18 May, 2016 - 19:55

लग्न लागलं, कौतुक सरलं, पाहुणे रावळे आपापल्या घरी परतले. महिनाभर होऊन गेला. पाठराखीण म्हणून आलेली आक्का पण आपल्या घरी परत निघून गेली होती. घर मोकळं झालं. आता मोजून चार माणसं आणि नवीन सुनबाई इतकेच काय ते राहिले. शैलूला अजूनही नवीन घराची, माणसांची सवय झाली नव्हती. नवरा घरी असतानाच काय ते मन रमायचं. तो ऑफिसला जाईपर्यंत त्याच्या मागे मागे फिरत राहायची. तो एकदा बाहेर पडला की घर खायला उठायचं. कुठल्याही घराला अचानक आपलं माननं इतकं सोपं असतं का?

सासूबाई समजून घ्यायच्या, त्यामुळे ती दिवसभर त्यांच्याच भोवती घोटाळत असायची. त्या सांगतील ते काम पटापट करायची. त्याही घरच्या सर्वांची माहिती हळूहळू देत राहायच्या. दिराला काय आवडतं, सासऱ्याना काय लागतं, त्यांच्या आवडी, वेळा, सवयी सर्व सांगत रहायच्या. ती ऐकून घ्यायची. कधी जमेल तर भाज्या चिरून देणे, केर काढणे, पसारा जागच्या जागी लावणे अशी कामं करायची. चहा नेऊन दिला तरी अजून बनवला नव्हता. त्यांना कसा लागतो तेही कळायला वेळ लागणार होताच. दिराशी हळूहळू गट्टी जमत होती. तो कॉलेज वरून आला की गप्पा मारत बसायचा. कितीही सहभाग घेतला तरी पूर्ण घराची जबाबदारी काही तिच्यावर नव्हती आणि तिला त्याची घाईही नव्हती.

परवा मात्र सासूबाईनी चार दिवस एका लग्नासाठी परगावी जाणार म्हणून सांगितलं होतं तिला. तेव्हढाच जरा नव्या जोडप्याला एकांत आणि आपल्यालाही रोजच्या कामातून सुटका असा विचार करून दोघेही परगावी जाणार होते. उद्या जायचे म्हटल्यावर त्यांनी शैलूला सर्व माहिती देऊन ठेवली. लाईट कधी येते, किती वेळ जाते, पाणी किती वेळ येते आणि कशात भरून ठेवावं हे सांगून ठेवलं. रवा, तांदूळ, पीठ-मीठ सर्व दाखवून ठेवलं. तिला थोडी भीती वाटत होतीच पण थोडा आनंदही होता की जरा मोकळीक मिळणार होती. रात्री सासू सासऱ्यांची तयारी तिने करून दिली. पहाटे त्यांच्यासोबत उठून त्यांना डबा बनवून दिला. ते निघून गेल्यावर पाणी भरून घेतलं, घर साफ केलं. नवऱ्यालाही सर्व नीट हवं नको ते पाहिलं. निघताना त्याच्या सूचक स्पर्शाने थोडी शहारलीही. दीर उठल्यावर त्याला चहा-नाश्ता दिला आणि तो कॉलेजला गेल्यावर एकदम मोकळी झाली.

सगळे गेल्यावर एकदा घराकडे बघून घेतलं आणि आवरू नंतर म्हणून आईला फोन लावून बोलत बसली. जरा गादीवर लोळत पडली. थोडा टिव्ही पाहिला. दुपारचे दोन वाजत आले होते, दीर आल्यावर त्याच्यासोबत जेवूनही घेतलं. जेवण झाल्यावर भांडी घासायला घेतली. सकाळपासून पडलेल्या त्या भांड्यांकडे पाहून तिला नकोसं वाटलं. इतके दिवस सासूबाई घासून घेत आणि ती धुवून घेई. त्यामुळे सर्वांच्या ताटात राहिलेलं खरकट, त्या तशाच सिंक मध्ये पडलेल्या प्लेट, चहाचे कप सगळं बघून शिसारी आली. कितीही म्हटलं तरी क्षणभर लोकांच्या घरची भांडी घासण्याची तिला किळस वाटली. कसेतरी तिने ते काम पूर्ण केले. सकाळपासून एकेक केलं तरी काम संपत नव्हतं. कोवळं वय ते, घरी कधी इतक्या कामाची सवय नाही. त्यामुळे शैलूचा इतुकासा जीव दमून गेला होता.

बाथरूममध्ये गेल्यावर तिच्या लक्षात आले की सकाळी सासूबाई कपडे बुट्टीत साबणाच्या पाण्यात भिजवून गेल्या होत्या. नवरा, ती आणि दिरानेही त्यातच कपडे भिजायला टाकले होते. बाहेर टीव्ही बघत पहुडलेल्या दिराकडे तिने पाहिलं आणि नाईलाजाने कपडे धुवायला गेली. कितीतरी वेळ त्या भिजलेल्या कपड्यांकडे बघत राहिली. नवरा म्हणून आपलं मानलं तरी त्याचे कपडे धुवायची पहिलीच वेळ होती. धीर धरून तिने मळकं साबणाचं पाणी बाहेर काढलं, एकेक करून आपले कपडे धुतले. पण पुढे होऊन नवऱ्याची किंवा सासऱ्यांच्या अन्डरपॅन्ट ला हात लावायची तिची इच्छा होईना. लोकांच्या घरी असं आपलं म्हणून अशी कामं मीच का करायची? या घरचा मुलगा असून तो दीर बाहेर पडलाय निवांत. नवराही स्वत:चे कपडे, भांडी न धुता निघून गेला. या सर्वांचा तिला संताप येऊ लागला. तिला आता रडू यायला लागलं.ती तशीच रडत बसून राहिली.

पाचेक मिनिटांत दीर येऊन म्हणाला, "वहिनी काय झालं गं? रडतेयस का? काही झालं का? "

ती एकदम भानावर आली, डोळे पुसू लागली. पण रडू थांबत नव्हतं.

ती रडत रडत बोलली, "तू सांगू नकोस हं कुणाला? "

तो काळजीने म्हणाला, "नाही नाही हो, तुम्हाला काय होतंय सांगा मला. "

ती, "मला हे असे कपडे धुवायला नको वाटतंय. काय करू ? "

तो हसला, तिच्याशेजारी बसला, म्हणाला,"सांगायचं ना मग. आई करते रोज त्यामुळे आम्हाला लक्षातच आले नाही. थांबा मी करतो तुम्ही बसा इथे. मला सवय आहे तशी. आई कधी गावाला गेली की आम्ही करतोच की. "

त्याने एकेक करत बनियन, अन्डरपॅन्ट धुतले, पिळून घेतले. सासूचेही साडी, ब्लाउज धुतले. तिने ते पिळून घेतले. धुतलेले सर्व कपडे बादलीत घालून बाहेर घेऊन गेला, वाळत घातले. ती त्याच्या मागे मागे फिरत होती. तो गप्पा मारत सराईताप्रमाणे सर्व कामे करत होता. तिला थोडा वेळ लाजल्यासारखे झाले. पण तो इतका निवांतपणे सर्व करत होता की हळूहळू तीही स्थिरावली. आजचं मोठ्ठ काम त्याने पार पाडलं होतं.

नवरा घरी आल्यावर सर्वांनी बसून चहा घेतला. संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला ती स्वयंपाकघरात आली तेव्हा सिंकमधले तिन्हीही कप आधीच धुतलेले होते. तिने दीराकडे पाहीले. त्याचं आश्वासक हसू पाहून तिला एक नवीन मित्र भेटल्याची खात्री झाली होती.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

असा दीर प्रत्यक्षात अस्तीत्वात असतो का?

- स्वतःची परीस्थिती शब्दबद्ध झाल्याने हुंदका अनावर झालेली शैलू Sad

मस्तयं . असतो गं पियु.

अवांतर ,
आमच्या शेजारीच एक गुजराथी फॅमिली रहाते. तरूण पिढी २५-३५ वयोगटातली असेल.
अगदी कालच मी लिफ्टसाठी थांबले होते , दीर ऑफिसला निघाला होता आणि वहीनी त्याच्याशी बोलत बोलत बाहेर आली. तो तिला काहितरी कामाच समजावत होता - कुठल्यातरी ऑफिसमध्ये जाउन काहितरी बोलायच होतं (उदा. बॅंकेत जाउन मॅनेजरशी बोलायचं वगैरे .. किन्वा तत्सम - नीटसं कळलं नाही ) पण दोघांची केमिस्ट्री ईतकी मस्त वाटली. ती एरवीपण बोलताना त्याच्याविशयी फार आदराने बोलते. तो कसे सल्ले देतो , मदत करतो . एकच एजग्रुप असल्यामुळे कशा मनमोकळ्या गप्पा मारता येतात वगैरे . आपल्याला असा एखादा दीर का नाही म्हणून क्शणभर खंत वाटली.

असा दीर प्रत्यक्षात अस्तीत्वात असतो का?>>>> हो माझा पन हाच प्रश्न्न आहे?

अम्हाला भेटलेले दिर अगदि याचा ३६० उलट आहेत.....

शैलू नशिबवान आहे बाबा....

असा दीर प्रत्यक्षात अस्तीत्वात असतो का?>>>> हो माझा पन हाच प्रश्न्न आहे?
कथा सुंदर

असा दीर प्रत्यक्षात अस्तीत्वात असतो का?>>>> हो माझा पन हाच प्रश्न्न आहे? माझापण.:अरेरे:
आणखी मला हाही प्रश्न पडलाय की सासुबाई सुन आल्यावरपण कामे करतात? दहा वर्षात आमच्या घरी हा योग पाहिला नाही कधी म्हणुन विचारतेय Wink

>>>अम्हाला भेटलेले दिर अगदि याचा ३६० उलट आहेत.....<<<

३६० म्ह्णजे सुलटच झाले. १८० म्हणजे उलट असते.

==========

कथा निखळ आहे.

विद्या, त्तुझ्या कथेचा शेवटचा छोटुसा पॅरा किंवा सांगतेची ओळ फार सुंदर असते.
लेख/कथा साधीशी असली तरी शेवटाने कशी 'पिक'ला जाते. मस्त सुंदर कथा.
सगळ्यांना पडलेला प्रश्न आणि आश्चर्याचा उत्तर - येस ! असे मित्र-मैत्रिण असलेले दीर-जाऊ, सासु सासरे फक्त सिनेमात नाही तर खरे सुद्धा असतात. मज्जा असते. जाऊ तर बेस्ट फ्रेंड आणि partner in all the crimes आहे.

ही गोष्ट लिहिण्यात काही कारणे होती:

१. असा दीर प्रत्यक्षात अस्तीत्वात असतो का? >> प्रश्न हा आहे की का नाहीयेत? माझा दीर समंजस आहे. त्याच्या लक्षात येत नाही पण सांगितले तर नक्की करेल. अजून ती वेळ आली नाहिये. एकदा नवऱ्याला कपडे धुवायला सांगितले आहेत. त्याने ते केलेही आहे.

२. अशी गोष्ट आपल्याला अजूनही स्वप्नवत का वाटते? म्हणजे आपणच आपल्या अपेक्षा खालावल्या आहेत का? त्या उंचावण्याची गरज आहे.

३. मुली कितीही शिकल्या तरी लग्नानंतर ही अशी कामे त्यांनी करणे गृहीत का धरले जाते? कुणाचे तरी आतले कपडे धुणे, भांडी घासणे ही कामे किळसवाणी वाटू शकतात आणि ते समजून घेतले पाहिजे.

४. या कथेमुळे एका जरी दीराला आपली चूक समजली किंवा आपले वागणे सुधारावेसे वाटले तर चांगलेच आहे.

५. सुप्रीम कोर्टाने नुकताच 'सुनेला घरची एक व्यक्ती समजावे, मोलकरीण नाही' असा एक आदेश नुकताच कुठेतरी वाचला. लिंक मिळाली नाही इथे द्यायला.
६. आपल्या मुलांना तरी असा दीर होण्यासाठी नक्की योग्य ते वर्तन शिकवा.

कमेन्ट्बद्द्ल सर्वान्चे आभार. Happy

विद्या.

जगात सर्व प्रकारची माणसे असतात..
जर नसली आणि तशी असावीत असे वाटले तर आपल्याला तसे बनायला कोणी अडवले नाहीये हे लक्षात ठेवायचे Happy

ऋन्मेऽऽष, जगात सर्व प्रकारची माणसे असतात..>> मान्य आहे. पण भारतात असमानेत्मुळे आणि सुनेकदून असलेल्या अपेक्शान्मुळे तिला अनेक प्रकारे जुळवून घ्यावे लागते. सर्वानी तिलाही समजून घेतले तर अनेक नाती जुळतील. Happy

विद्या.

करेक्टे विठ्ठल. पण ही सवय त्यांच्या घरातल्या बायकांनी लावायला हवी. अनेक ठिकाणी अजुनही "आमच्या घरी पुरुष घरातल्या कश्शालाही हात लावत नाहीत" हे वाक्य अतिशय अभिमानाने इनफॅक्ट किंचितश्या गर्वानेच उच्चारले जाते.

पण ही सवय त्यांच्या घरातल्या बायकांनी लावायला हवी >> precisely आईने मुलाला. या कथेतील 'तिने' देखिल आपल्या घोवाला आणि दिराला सांगायला हवेच. कारण त्या दिराच्या बायकोला असा 'मित्र' नाही मिळणार. Happy

बरोबर आहे विट्ठल. Happy या सवयी मुलानाही लावल्या पाहिजेत.
मुग्धटली ,
अनेक ठिकाणी अजुनही "आमच्या घरी पुरुष घरातल्या कश्शालाही हात लावत नाहीत" हे वाक्य अतिशय अभिमानाने इनफॅक्ट किंचितश्या गर्वानेच उच्चारले जाते. >> याचाही खूप राग येतो. बायकानी कामे करणे यातच त्यान्च्या आयुश्याचे चीज आहे असाच भाव असतो बोलण्यात जणु.

विद्या.

चक्रम Happy हाहा.
त्यातही स्त्रियाना असे दाखवणे हा वेगळाच विषय आहे. Happy तो पुन्हा कधीतरी.

विद्या.

कथा आवडली.

चुकताय विठ्ठल! एक लक्षात येतंय का की या घरातली माणसं अजिबात वाईट नाहीयेत. त्यांना सवय नाहीये म्हणून करत नाहीयेत. एकदा ही मुलगी त्या घरात रुळली आणि नवर्‍याला समाजवलं की नक्कीच तिच्या जावेला चांगला मित्र मिळेल. आणि तिच्या जावेचा नवरा तिचा चांगला मित्र असणारच आहे की.

ऋन्मेष, पते की बात! अशी माणसं असतात की नाही ते माहीत नाही पण स्वतः असं बनायला काय हरकत आहे? Happy

ह्याच्या अगदी विरुद्ध झालं माझ्या बाबतीत.. सासू सासरे परगावी गेले होते २ दिवस .. मी , माझा नवरा आणि नणंद तिघे होतो घरी.. मी pregnant असल्यामुळे माझी पाठ दुखत होती तरीही माझी नणंद एका कामाला हात लावत नव्हती उलट तिला सगळ्या गोष्टी हातात नेवून द्याव्या लागल्या..माझ्या सासूने तिला कामाची सवयच लावली नाही.. माझा नवरा माझी जमेल तितकी मदत करत होता..

Pages