निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना
निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ
शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न
आपण आधी बघितल्याप्रमाणे आज मोठ्या प्रमाणात निसर्गामधलं असंतुलन वाढतं आहे. ह्युमन चेंजमुळे पर्यावरण बदलत आहे. मानवाच्या आज आहे त्या प्रकारच्या अस्तित्वामुळे पर्यावरण मोठ्या प्रमाणात बदलतं आहे. ग्लेशियर्स वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढते आहे, अवकाळी पाऊस येतो आहे आणि इतरही अनेक गोष्टी होत आहेत. अशा वेळेस प्रश्न पडतो की, जर ह्या संकटाची व्याप्ती इतकी मोठी आहे आणि संपूर्ण मानवजातच जर त्यासाठी जवाबदार आहे, तर त्यातून मार्ग कसा काढायचा? ग्लोबल वॉर्मिंगची कारणं पृथ्वीवरच्या सर्व मानवांशी जोडलेली आहेत. ते थांबवायचं असेल तर सगळ्यांनाच बदलावं लागेल. हे शक्य दिसत नाही. शहरांसाठी जितके झाडं तोडले आहेत ते परत लावणं आणि वाढवणं शक्य दिसत नाही. एक टोक हे जिकडे तणावच तणाव आहे आणि दुसरं टोक संतुलनाचं. पण ते शक्यच दिसत नाही. कारण जर पूर्ण नदीची जलधारा एका दिशेने जात असेल, तर कोणी त्याच्याविरोधात किती काळ संघर्ष करू शकणार?
पण निराश होण्याचं कारण नाही. निसर्गात इतकंही असंतुलन नाहीय की आपण काहीच करू शकत नाही. मान्य आहे की अनेक गोष्टी बिघडल्या आहेत; कित्येक गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. पण अशाही अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. उदाहरणार्थ, गारपीट किंवा अवकाळी पाऊस. जेव्हा गारपीट किंवा अवकाळी पाऊस होतो तेव्हा शेतक-यांचं मोठं नुकसान होतं. आणि ते इथून पुढे होतच राहील. आता बदललेया पर्यावरणामध्ये दुष्काळ, पूर, अवकाळी पाऊस अशा गोष्टी नेहमीच होत राहतील. त्याविषयी सजग व्हावं लागेल. त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. पण आपण आपल्या शेतासाठी बरंच काही करू शकतो. शेतामध्ये योग्य पद्धतींद्वारे जमिनीचा कस टिकवून ठेवू शकतो. पिकांना अशा योग्य प्रकारे घेऊ शकतो ज्यामुळे एक- दोन पिके गेली तरी कमी नुकसान होईल. आपण कमी पडणा-या किंवा न पडणा-या पावसासाठी काही करू शकत नाही; पण आपण पडणारं पाणी वाचवू शकतो. इतकी क्षमता निसर्गाने आपल्याला अजूनही दिलेली आहे. अशाच कामांचं एक उदाहरण इथे बघूया.
बारीपाडा गावाची पंचमहाभूते- जल, जंगल, जमीन, जनावर आणि जन!
महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या बारीपाडाला जाताना उंच डोंगर आणि वनश्री लक्ष वेधून घेते. बारीपाडा हे शाश्वत विकासाचं एक तीर्थक्षेत्र आहे! प्रवाहाच्या विरोधात जाऊन सलग पंचवीस वर्षं स्वत:चा विकास करत आहे. हे गाव त्या अर्थाने आज 'गाव' किंवा विकासाचा एक प्रयोग राहिलेलं नाही. त्या नजरेतून त्याकडे बघता येणार नाही. आज विविध संस्था प्रकल्प पद्धतीने काम करतात; त्याही चष्म्यातून बारीपाड्याकडे बघता येणार नाही. एक प्राचीन कथा आहे. जेव्हा काही आंधळ्यांनी पहिल्यांदा हत्तीची ओळख केली, तेव्हा प्रत्येकाला तो वेगळा वेगळा दिसला. कोणाला वाटलं हत्ती दोरीसारखा लांबट आहे; कोणाला वाटलं हत्ती सुपासारखा पसरट आहे; कोणाला वाटलं हत्ती म्हणजे दगडी खांब आहे इत्यादी इत्यादी.
बारीपाड्याचंही तसंच आहे. काही जणांना बारीपाडा म्हणजे वनभाजी स्पर्धा; बारीपाडा म्हणजे चतु:सूत्री भातशेती; बारीपाडा म्हणजे श्रमदान; बारीपाडा म्हणजे निसर्गाचं वरदान लाभलेलं गाव असं वाटतं. असं वाटणं चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. पण हे एका मोठ्या विस्तृत गोष्टीकडे तुकड्या तुकड्यांमध्ये बघणं आहे. बारीपाड्याची अशी अनेक अंग आहेत. त्या अर्थाने बारीपाडा आणि चैतरामदादा अष्टपैलू आहेत!
अनेक लोकांचा समज आहे की, बारीपाडा हे गाव पुढे आलं ते सामुदायिक वन व्यवस्थापन आणि वन संधारणामुळे. सरकारी पातळीवर हे प्रयत्न लक्षणीय प्रकारे सुरू होण्याआधी बारीपाड्याने ते राबवले हे खरंच आहे. परंतु बारीपाड्याचं हे सूत्र एकमेव नाही. किंबहुना फक्त वन व्यवस्थापनातून प्रगतीचा मार्ग मिळेल, असा विचार त्या गावाने केला नाही. वन व्यवस्थापन हे त्याचं एक अंग होतं. रुढ अर्थाने 'वन व्यवस्थापन' असा शब्द वापरला जात असला तरी बारीपाडा ज्या आदिवासी संस्कृतीतून येतो; तिथे निसर्गाला देव मानलं जातं; निसर्गाला पवित्र मानलं जातं. तेव्हा व्यवस्थापन असा शब्द न वापरता ती ह्या जागत्या गावाची निसर्गाप्रती असलेली सहज स्वाभाविक कृती होती, असं म्हणणं जास्त संयुक्तिक राहील. निसर्गाच्या सर्वच अंगांबद्दल बारीपाड्यामध्ये हीच वृत्ती दिसते. जुनी झाडं त्यांनी वाचवली; नवी तर लावलीच; शिवाय त्या झाडांच्या आश्रयाला येणारे पशुपक्षीसुद्धा जपले. पूर्वी कोणत्याही अन्य गावाप्रमाणे इथलंही जंगल उजाड होण्याची दाट शक्यता होती. पण चैतरामदादांच्या नेतृत्वाखाली गावाने काळाच्या पुढे झेप घेतली.
वाहत्या पाण्याला अडवण्याचा सोपा मार्ग
वन संवर्धनापासून गावाने सुरुवात केली. निसर्गाची कृपा तर नेहमीच होते. जे लाभ घेण्यासाठी तयार आहेत; ज्यांच्याकडे रिकामं पात्र आहे; त्यांना नेहमीच निसर्ग भरभरून देतो. पण जर हेच पात्र स्वार्थाने किंवा अज्ञानाने भरलेलं असेल, तर. . . असो. एकदा वनातली झाडं उभी राहिली की, पाणी आलं. जलसंधारण झालं. विहिरी बारा महिने भरू लागल्या. दुर्मिळ होऊ लागलेली पूर्वीची विविध वनस्पती व भाजीपाला परत दिसू लागले. वनभाजी स्पर्धा हे त्यांना जपण्याचं एक आधुनिक माध्यम! वनांमध्ये पूर्वीचे पशु- पक्षी परतले. लाखेच्या झाडावर किडे आले; मधमाशाही आल्या. निसर्ग बारीपाड्याला देतच गेला. जसं पात्र मोठं होत गेलं, तसं निसर्ग जे देत होता, ते मिळायला लागलं.
शेतीमध्येसुद्धा पूर्वीच्या वाणांना गावाने वाचवलं. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. नवीन नवीन प्रयोग केले. ऊसाचे गु-हाळ उभं राहिलं. नंतर सेंद्रिय शेती आली. आंब्यांच्या बागा आल्या. स्ट्रॉबेरीसुद्धा फुलली. हे सर्व होत असताना पर्यावरणामधल्या सर्व घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करण्यात आलं. जल आणि जंगलाप्रमाणे जनावरंही आली. त्यांनाही जपलं गेलं. कोंबडी व शेळी घरोघरी दिसू लागली. जमीन तर सोबतीला होतीच. जल- जंगल- जनावर प्रसन्न झाल्यानंतर जमीनही आपोआप प्रसन्न झाली. शेतीमध्ये उत्पादन वाढलं. आणि हे सगळं होत असताना 'जन' सुद्धा मागे राहिले नाहीत. स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही चाकांच्या आधारे बारीपाड्याची धाव पुढे जात राहिली. काळाच्या पुढे जाऊन महिलांचे बचतगट आले आणि टिकले; महिलांचा गावामध्ये सहभाग वाढला.
आज चैतरामदादांना विचारलं की, बारीपाड्याने साध्य केलेली सर्वांत मोठी गोष्ट कोणती; तर ते सांगतात बारीपाड्याने एकच गोष्ट केली आणि ती म्हणजे जे मिळत होतं ते सर्व वाचवलं. गमावलं जाण्यापासून थांबवलं. जंगल वाचवलं. जल अडवलं. जमीन जपली. जनावरे सांभाळली. थोडक्यात ही बारीपाड्याला रुपांतरित करणारी पंचमहाभूते आहेत! जन जागे झाले. आज बारीपाड्यामध्ये प्रत्येक गोष्ट वाचवली जाते. निसर्गातील प्रत्येक गोष्ट जपली जाते. आणि म्हणूनच आज निसर्ग बारीपाड्यावर प्रसन्न आहे. बारीपाड्याच्या ह्या प्राप्तीचा नुकताच युएनडीपीच्या पर्यावरण- गाव पुरस्काराने गौरवसुद्धा झाला.
पण ह्या प्रगतीवर हे गाव समाधानी होणार नाही. निसर्गाचा आदर करणा-या ह्या गावामध्येही निसर्गाप्रमाणे अविरत पुढे जाण्याची वृत्ती आहे. शेणापासून वीजनिर्मिती, कमी जागेत अधिक उत्पादन, गावामध्ये रोजगार निर्माण करून जलाप्रमाणेच नवीन जनांनाही गावातच अडवणं असे अनेक प्रयत्न सदैव सुरू आहेत. ख-या अर्थाने पर्यावरणाच्या अथपासून इतिपर्यंत सक्रिय असलेलं हे गाव आहे! आता हे गाव खरं तर गावाच्या वेशीमध्ये मावत नाही. आता ते पर्यावरण केंद्रित विकासाचं दीपगृह झालेलं आहे.
अशा आणखी काही प्रयत्नांची चर्चा पुढच्या भागांमधून करूया. हा लेख बारीपाड्याच्या अभ्यासावर आधारित आहे. बारीपाडा ता. साक्री, जि. धुळे, महाराष्ट्र ह्याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी फक्त गूगल करा.
पुढचा भाग: निसर्ग, पर्यावरण आणि आपण ५: पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा
माझे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी- माझा ब्लॉग
शेतीमध्येसुद्धा पूर्वीच्या
शेतीमध्येसुद्धा पूर्वीच्या वाणांना गावाने वाचवलं. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. नवीन नवीन प्रयोग केले. ऊसाचे गु-हाळ उभं राहिलं. नंतर सेंद्रिय शेती आली. आंब्यांच्या बागा आल्या. स्ट्रॉबेरीसुद्धा फुलली. हे सर्व होत असताना पर्यावरणामधल्या सर्व घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करण्यात आलं. >>> याबद्दल अजून माहिती देऊ शकाल का ?
पूर्वीच्या वाणांचे फायदे / तोटे काय आहेत? आज जी नवीन वाणं आहेत त्यांच्याशी तुलना करता जूनी वाणं चांगली का वाईट?
आधुनीक तंत्रज्ञानाची जोड दिली म्हणजे काय केले? नवीन नवीन प्रयोग कुठले केले?
सेंद्रिय शेती म्हणजे नक्की काय केले? मानवनिर्मीत खते / जंतूनाशके पूर्णपणे वगळू शकले का? त्याने पिकावर काय परीणाम झाला (quality and quantity) ?
स्ट्रॉबेरीसारखे नाजूक पीक घ्यायला synthetic खते आणि जंतूनाशके नाही लागली का? नसल्यास कुठले पर्याय वापरले? मी पाहिलेल्या स्ट्रॉबेरीच्या शेतात प्रचंड प्रमाणात प्लॅस्टीक वापरले होते. त्याचा वापर इथे टाळता आला का?
चुकीच्या ठिकाणी काढलेले बरोबर
चुकीच्या ठिकाणी काढलेले बरोबर धागे...
मार्गी स्वत:ची वेबसाइट तयार करा...तुम्हाला अधिक वाचक मिळतील...
धन्यवाद माधव जी आणि
धन्यवाद माधव जी आणि विज्ञानदासू जी!
@ माधवजी- मी ह्या बारीपाडा विषयाचा अभ्यास करून एक पुस्तक लिहितोय. आपली इच्छा असल्यास आपल्याला मेलवर काही गोष्टी कळवेन. मला कळवाल- niranjanwelankar@gmail.com शिवाय तुम्ही नेटवरही बारीपाड्याविषयी माहिती सर्च करू शकता. चैतराम दादांचे व्हिडिओजसुद्धा आहेत.
"पूर्वीच्या वाणांचे फायदे / तोटे काय आहेत? आज जी नवीन वाणं आहेत त्यांच्याशी तुलना करता जूनी वाणं चांगली का वाईट?" -> असं काही नसतं. एक गोष्ट चांगलीच आणि दुसरी वाईटच असं नसतं. त्यामध्ये ग्रे कलरच्या कित्येक बाबी असतात.
@विज्ञानदासूजी- धन्यवाद. माझी वेबसाईट आहेच- अवश्य यावे: http://niranjan-vichar.blogspot.in/
पुनश्च धन्यवाद.
छान प्रयोग..
छान प्रयोग..