पहिल्या ट्रेकची गोष्ट.....

Submitted by रोहित ..एक मावळा on 18 May, 2016 - 01:19

ट्रेक म्हणजे काय रे भाऊ...?
काय अस खास ठेवलय त्या डोंगरात...
कशाला उगाचच तंगडतोड करायची..
खर म्हणजे आपल्याला झेपेल का ?
अशा नाना विविध प्रश्नांनी माझ्या मनाला भंडावुन सोडल होत. पण तरीही मी गोपिला होकार कळविला. डोंगर चढण हे तस माझ्यासाठी नवीन नव्हत.लहाणपणी उन्हाळ्याच्या सुट्टित गावाला गेलो की आम्ही जरंडा गाठायचो.
जरंडा म्हणजे आमचा जरंडेश्वर.डोंगरावर वसलेले हनुमानाचे मंदिर.अर्ध्या-पाऊन तासात आम्ही टुनटुन उड्या मारत जरंड्यावर पोहोचायचो.त्यामुळेच या ट्रेकला जायला तयार झालो.कमवायला लागल्यापासुन कुठेतरी स्वखर्चाने भटकण्याची हि पहिलीच वेळ होती.त्याचा आनंद तर होताच आणि कॉलेजच्या मित्रांसोबत वेळ घालवता येणार होता.माझ्या कॉलेजच्या मित्रांनी या आधी दोन-तीन ट्रेक केले होते.पण माझ्या आयुष्यातला असा हा पहिलाच ट्रेक... दिवसभर ऑफिस ... संध्याकाळी घर...अन सुट्टिच्या दिवशी आराम..अशा या रटाळ जीवनाला कलाटणी देणार ट्रेक ठरला.

No Destination... हे आमच्या ग्रुपचे नाव... अस म्हणतात नावात काय ठेवलय ...पण नावात खुप काही सामावलेल असत. खर म्हणजे आयुष्य हा एक प्रवास आहे आणि त्याचा पुरेपुर आनंद उपभोगता आला पाहिजे. या प्रवासात सु:ख दु:ख ऊन पावसासाखी असतात पण हिच तर जीवनची खरी गमंत आहे नाही का... जिथे प्रवास संपला तेथे आपण संपलो... म्हणुन .. नो डेस्टिनेशन.

डिसेंबर महिना...पुनवेची रात्र...अन गुलाबी थंडी.. आहाहा काय बरोबर वेळ साधली होती पहिल्यावाहिल्या ट्रेकची.ठिकाण ठरले ....हरिश्चंद्रगड ...हरिश्चंद्र नावाचा राजा होऊन गेला होता हे माहीत होत.पण असा काय गड असेल याची काय कल्पणा नव्हती.मग म्या... बॅग भरायला घेतली.दोन दिवसासाठीचे कपडे,प्यायला पाण्याची बाटली,खान्यासाठी सटरफटर अन थंडीसाठी ब्लँकेट असा जामानिमा घेऊन स्वारी निघाली.
कल्याण एस.टी स्थानकावर भेटायच अस ठरल.ठाण्याहुन कल्याणला जाणारी ट्रेन पकडली.या ट्रेकला सगळ्यांनी जय्यत तयारी केली होती.ग्रुपचे टीशर्ट वैगेर छापले होते. सगळ्या मित्रांची म्हणजे कॉलेजचे मित्र गोपी,भाविन्,सुधीर,रोहनआणि नव्याने भेटलेले करन आणि चेतन यांची कल्याणला गळाभेट झाली. माळशेजमार्गे नगरला जाणारी एस.टी पकडली.प्रवास करताना तशी झोप येत नव्हतीच.शहराच्या झगमगाटातुन बाहेर रस्त्याला लागलो.काळोखामुळे पुरेस बाहेरच दिसत नव्हत.मग बर्‍याच दिवसांनी भेटलेल्या मित्रांबरोबर गप्पा रंगल्या.दिड-दोन तासाच्या प्रवासानंतर माळशेज घाट लागला.घाटाची एक गमंत असते ना.. लहाणपणी जेव्हा आम्ही गावाला जायचो तेव्हा वाटेत लोणावळ्याचा घाट लागायचा.मग जरी रात्र झाली असेल तरी खिडकीतुन तो घाट न्याहाळायचा. एक वेगळच अप्रुप वाटायच.घाटाच्या वळणावळणाची एक वेगळीच मजा यायची.कोणाच अस होत असेल का माहीत नाही पण घाट चढला की माझे कान दडपतात.घाटावरचा गार वारा कानात शिरतो.अन आपण समुद्रसपाटीहुन उंचीवर आलोय याची जाणीव होते. बाहेर पिठुर चांदण पडल होत अन राकट सह्याद्रीची रांग चंद्राच्या प्रकाशात उजळुन निघाली होती. मन सुद्धा घाट चढल अन कंडक्टरने खुबी फाटा आल्याच सांगितल.पाठपिशव्या सांभाळीत फाट्यावर उतरलो अन सगळ्यांना एकदम हुडहुडी भरली.थंडिच तशी पडली होती.मग स्वेटर ,कानटोपी ,मफलर अशी एक एक थंडीवरची हत्यारे अंगावर चढवली.मोठमोठ्याने ओरडुन थंडीची मजा घेतली.नंतर भाविनला लक्षात आल की ट्रेकला छापुन आणलेली टी-शर्ट ची पिशवी एसटीतच राहीली.मग काय ... एकमेकांना शिव्या देऊन झाल्या अन आम्ही वाटेला लागलो.
चंद्रदेव आज आपल्यावर खुपच प्रसन्न झालेत म्हणुन टॉर्च बंद करुन आम्ही चालु लागलो.वाटेच्या बाजुला धरण होत.धरणाच्या कडेकडने पाच-सहा किमी चालुन आम्ही पहाटे पाचच्या आसपास पायथ्याच्या गावी म्हणजे खिरेश्वरला पोहोचलो.एका बंद असलेल्या हॉटेलच्या पडवीत बॅगा टाकल्या.झोपायचा प्रयत्न करत होतो.पण झोप काही येत नव्हती.बाहेर अजुन अंधार होताच.इथे उगाच थांबण्यापेक्षा लवकर उन्हाच्या आत पोहोचायच्या उद्देशाने निघालो.मळलेली वाट असल्याकारणाने चुकण्याची शक्यता कमी होती.पुढे थोड जंगल लागल.जंगल म्हणजे दाट झाडी अन त्यातुन जाणारी पायवाट.त्यामुळे एका मागोमाग रांगेत चाललो होतो.अन मधेच कसलातरी आवाज झाला.थोडावेळ आमची तंतरलीच.बॅटरीच्या उजेडात झाडीत बघितल पण काही दिसल नाही.माकड किंवा तत्सम काहीतरी असेल म्हणुन कानाडोळा केला अन चालु लागलो.आता थोड थोड उजडायला लागल होत.परत काहीतरी हालचाल झाली.वर झाडाची फांदी हलल्यासारख जाणवल.अन मग या महाशयांनी दर्शन दिल.


(सर्व फोटो Sony 810i च्या मोबाईल कॅमेरातुन काढलेत.अन वरचा फोटो काढताना उजेड फारसा नव्हता.)

खारुताई असेल अस वाटल होत पण त्याचा आकार अन झुपकेदार लांबलचक शेपटीनी खात्री पटली.शेकरु...सह्याद्रीच्या जंगलातील एक दुर्मिळ प्राणी अन त्याच दर्शन ट्रेकच्या सुरुवातीला झाल्याने आम्ही खुश झालो.

जंगल संपुन चढाईला सुरुवात झाली.थोड चालल्यानंतर सगळ्यांची इंजिन धापा टाकायला लागली.हळुहळु उजडायला लागल होत.अर्धा-पाऊन तासात आम्ही तोलार खिंडीत येऊन पोहोचलो.तेथे एक व्याघ्रशिल्प ठेवलेल दिसल.खिरेश्वर गावातुन किंवा खुबी फाट्यावरून बघितल तर हि खिंड इंग्रजी U च्या आकारासारखी दिसते.खिंडीतुन एक वाट कोथळ्या गावाकडे जाते.आम्ही डावीकडची माथ्यावर जाणारी वाट पकडली.पुढे कातळात खोदलेल्या पायर्‍या लागल्या.पाचशे ते सहाशे फुटांचा हा कातळटप्पा बघुन मन थंडगार झाल.आतापर्यंत फक्त पुस्तकातला इतिहास वाचला होता.अन आता खर अनुभवत होतो.

कातळट्प्पा पार करुन माथ्यावर आलो.सुर्यपण वर सरकला होता.खुबी फाट्यावरुन धरणाच्या बाजुने येणारी वाट वरतुन नजरेस पडली.

सुर्व्याने गरम केल्यामुळे थंडीची हत्यारे म्यान केली.आता फक्त चालायच होत.छोट्या छोट्या टेकड्या अन मधेच पठार अशी पायपीट होती.अन आजुबाजुचा निसर्ग सोबतीला होताच.त्यामुळे दमायला होत नव्हत.वेगवेगळ्या रंगाची जातीची फुले आणि झाडे डोळ्याला सुखावत होती.

एका ठिकाणी थांबुन घरून आणलेले सटरफटर पोटात ढकलले.अजुन बरच चालायच होत.पण वाट काय संपत नव्हती.एव्हढ कधी चाललो नव्हतो आयुष्यात त्यामुळे पाय बोंबलायला लागले होते.सुकलेल्या पाण्याचे ओढे मधेच वाटेला येऊन मिळाले होते की त्यातुनच हि वाट होती.पावसाळ्यात काय धम्माल असेल या वाटेला ना..
पाणी पिऊन तृष्ना भागवली अन परत पायपीट सुरु झाली.जवळ जवळ साडेतीन तासांच्या चालीनंतर आम्ही मंदिरापाशी येऊन पडलो.हो पडलोच ..अ़क्षरशा तिथल्या कातळावर अंग लोटुन दिले.गुदमरलेल्या पायांना शुजमधुन काढुन मोकळा श्वास दिला.

समोर हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसल.काळ्या पाषाणात बांधलल ते मंदिर पाहुन प्रसन्न वाटल.किती तरी ऊन-पावसाळ्यांचा अभिषेक झाला असेल ना या मंदिरावर.तरीही आपल अस्तित्व टिकवुन आहे.आपल्या पुर्वजांनी केलेल्या स्थापत्यकलेचा अभिमान वाटला.

मंदिराच्या बाजुला एक विहिर दिसली.एव्हढ्या उंचीवर पाणी पाहुन अप्रुप वाटल.त्या विहिरीला पुष्करणी म्हणतात हे नंतर समजल.पुष्करणी म्हणजे पाण्यापर्यंत पोचण्यासाठी असलेली पायऱ्या पायर्‍यांची विहिर.राजस्थानमधील पुष्कर गावी अश्या प्रकारची पहिली विहीर बांधली गेली, म्हणून पुष्करणी असे नाव पडले.

पुष्करणीतील पाण्याने हात-पाय धुऊन घेतले.मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेऊन मागच्या बाजुला आलो.मंदिराच्या आवारात अनेक गुहा दिसल्या.काहि गुहांमधे पाणी दिसल.तर काहि राहण्यासाठी होत्या.मंदिराच्या बाजुला एक दगडी पुल दिसला.मंगळगंगेचा उगम येथुनच असल्याचे समजले.पण बुद्धि गहाण ठेवलेल्या लोकांच्या क्रुत्रिम जगातल्या अनेक पाऊलखुणा बघुन खुप राग आला.त्या उगमापासुन डाव्या बाजुला अजुन एक गुहा दिसली.केदारेश्वर...त्या गुहेत एक भलीमोठी पिंड दिसली.अशी पिंड आयुश्यात पहिल्यांदाच पाहिली होती.पिंडिच्या चारी बाजुला थंडगार पाणी होत.बर्फासारख थंडगार अन नितळ.खालचा तळ दिसत होता.पिंडिच्या भोवताली ३ तुट्लेले आणी एक पुर्ण असे चार खांब दिसले.अस म्हणतात की हे चार खांब म्हणजे चार युगांचे प्रतिक आहेत.त्यातील तीन युग संपली म्हणुन तीन खांब पडलेत.

त्या बर्फावानी थंड पाण्यातुन शिवलिंगाला प्रदिक्षिणा घातल्या.अंगात एक वेगळ्याच प्रकारची तरतरी आली.गडावर आता बर्‍यापैकी लोक यायला लागली होती.राहायला जागा मिळणार नाही म्हणुन आम्ही मोर्चा गुहांकडे वळविला.डोंगराच्या पोटात खोदलेल्या गुहा पाहुन लय भारी वाटल.अशाच एका गुहेत गणपत्ती बाप्पा विराजमान झालले दिसले.काळ्या कातळ्यातल्या थंडगार गुहा पाहुन यांच्यापुढे.ए.सी. हि फिका पडावा.खर म्हनजे आता खुप थकलो होतो. घरुन आणलेल्या शिदोर्‍या उघडल्या.पोटातल्या आगीला शमवले. अन मग मी आणि भाविन तेथेच गुहेत लवंडलो.रात्री प्रवासामुळे जागरण झाल होत.त्यामुळे लगेच झोप लागली.बाकीचे लोग बाहेर भटकायला गेले.
थोड्या वेळाने जाग आली.गुहेतल्या गारठ्याने अंग पण जखडल होत.बाहेर उन्हाला येऊन बसलो तेव्हा बर वाटल.प्लास्टिकच्या पत्रावळ्या,पिशव्या ,बाटल्या काय काय नव्हत तिथे.आपण माणुसजात निसर्गाला नुसतच ओरबाडत असतो.निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर त्याचा आब राखला पाहिजे.एव्हढसुद्धा कळु नये काही लोकांना याची शरम वाटली.आम्ही केलेला कचरा एक पिशवित भरून ठेवला होता आणि तो जाताना घेऊन जाणार होतो.
तेव्हढ्यात गोपी,सुधीर पुढे जाऊन काहीतरी बघुन आले होते.अन त्याच्याबद्दल भरभरुन बोलत होते.तिकडे जाण्यासाठी उत्सुकता ताणली गेली.गुहेच्या जवळ गर्दि खुप वाढली होती अन सामान चोरीला जाऊ नये म्हणुन मग पाठपिशव्या घेऊन त्या दिशेने निघालो.डोंगराच्या कडेकडेने वळणावळण्याच्या वाटेने निघालो.या वाटेवर फारशी झाडी नव्हती.सुर्यदेवसुद्धा हळुहळु मावळतीकडे चालले होते.

कोकणकडा...डोळ्याच पारण फेडनार अस सह्याद्रीतील एक आश्चर्य म्हंटल तर वावग ठरणार नाही. जवळजवळ ४००० फुट खोल,अर्धा किलोमीटर लांब पसरलेल अन खोलगट वाटीसारखा आकार असलेला हा पश्चिमेला कोकणाच दर्शन घडविणारा कडा अचंबित करुन टाकतो. वार्‍याचा वेग एव्हढा होता की त्या कड्याच्या कडेला उभ राहुन बघु शकत नव्हतो.

झोपुन जरी खाली दरीत बघितल तरी खाली कोणीतरी आपल्याला ओढुन घेतय अस सारख वाटत राहत.निसर्गापुढे आपण किती खुजे आहोत याची जाणीव मनाला होतो.

काळाभिन्न कातळ,खोल दर्‍या ,तासलेले कडे अन आजुबाजुचे डोंगर असा हा रांगडा सह्याद्री पाहुन याच्या प्रेमात पडला नाही तर नवलच..

सह्याद्रीच हे रौद्र रुप पाहुन महाराष्ट्राला राकट देशा ..कणखर देशा..दगडांच्या देशा का म्हणत असतील याची प्रचिती येत होती.बराच वेळ हे सह्यसौंदर्य आम्ही न्याहाळात बसलो होतो.वार्‍याची गाज कानात भरुन घेतली.थंडगार काळ्या कातळाचा स्पर्श पायांना हवाहवासा वाटत होता.पुर्वेला आकाश निरभ्र झाल होत अन पश्चिमेला पांढर्‍या ढगांची दाटीवाटी झाली होती.सुर्य आता अस्ताला जाणारा होता अन आभाळभर मोठ्या पडद्यावर निसर्गाचा खेळ सुरु झाला.आतापर्यंत सुर्यास्त डोंगरांच्या आडुन किंवा शहरी सिमेंटच्या जंगलात टेरेसवरुन पाहिला होता.पण एव्हढ्या उंचीवरुन सुर्यास्त पाहणे म्ह़णजे अभुतपुर्व असा सोहळाच होता.इंद्रधनु जरी उमटले नव्हते तरी सप्तरंगानी सारा आसमंत भारुन टाकला होता.क्षितिजाकडे सुर्याची आगेकुच सुरु होती अन क्षणाक्षणाला पांढर्‍या ढगांच्या पडद्यावर विविध रंगाची रंगपंचमी चालली होती.उर भरुन आला होता अन टिमटिमत्या डोळ्यांनी ध्यानस्त होऊन हा सारा नजारा आम्ही पित बसलो होतो.

मनावर वेगळीच धुंदी चढली होती.कितीतरी वेळ आम्ही असेच बसलो होतो.कुणी कोणाशी बोलत नव्हत.निसर्गाशी मुकसंवाद चालु होता.काळोख दाटायला लागला तस थंडीने अंगावर शिरशिरी आली अन आमची पावली परतीकडे वळली.

गुहेपाशी आलो तर सर्व गुहा भरल्या होत्या.बाकी लोकांचा नुसताच गोंधळ चालु होता. अशा कोलाहालत झोप येणार नाही म्हणुन दुसरी जागा शोधायला निघालो.मंदिराच्या आवारातल्या गुहासुद्धा भरल्या होत्या.पुष्करणीच्या बाजुला तीन तंबु बांधले होते.कुठल्यातरी शाळेची पोर-पोरी सहलीसाठी आली होती.थंडी खुप वाढली होती अन भुकही सपाटुन लागली होती.मंदिराच्या समोर असलेल्या जागेवर उघड्या आकाशाखाली झोपयचा निर्णय घेतला.
बाजुलाच एकाने शेकोटी पेटविली होती.त्यामुळे त्याची थोडी ऊब मिळत होती.
गडावर एक बर आहे की जेवणाची सोय होते.पत्र्याच झोपडीवजा छोट हॉटेल जवळपासच्या गावकर्‍याने उभारल होत. सुधीर आणि चेतन तेथुन पिठल भाकरी घेऊन आले.मग काय सगळ्यांनी त्याच्यावर ताव मारला.पोटात भर गेल्यावर थोड हायस वाटल.थंडी तर खुप होती.गोपी तर काकडला होता.मी पांघरायला काळी घोंगडी घेउन आलो होतो.कानटोपी,हातमोजे अशी थंडीवरच्या हत्यारे परिधान केली.शेकोटीवर गप्पा सुरु झाल्या.जंगल आता कमी झाल्याने डोंगराच्या आजुबाजुला वाघाच अस्तित्व फक्त नावापुरतच उरलय अस तिथल्या गावकर्‍याकडुन कळल.वाघ...डुक्कर...भुत आणि माणसांच्या गप्पा मारुन झाल्यानंतर जमीनीवर अंग टाकल.
गावाला तस आम्ही उघड्या माळरानात झोपायचो.चांदण्याने भरलेल आभाळ डोळ्यात भरुन घ्यायचो.अन मग त्या चांदण्या मोजायचा अशक्य प्रयास चालु व्हायचा.वेगळीच मजा यायची.
पण आता आभाळ आल होत.पुनवेचा चांदोबा ढगांच्या आड लपाछपी खेळत होता.

सकाळचा सुर्योदय पाहायचा म्हणुन अलार्म लावला.दिवसभराच्या थकव्यामुळे कधी झोप लागली हे कळलेच नाही.मधेच जाग आली.शेकोटीवर अजुन काही लोकांच्या गप्पा चालु होत्या.परत झोपायचा प्रयत्न करत होतो पण थंडिमुळे झोप येत नव्हती.आकाश आता निरभ्र झाल होता.पोर्णिमेचा चंद्र पुर्ण भरात आला होता.गार वारा सुटला होता. बाजुला मित्रांच्या घोरण्याच्या आवाजाच लयबद्ध संगित चालु होत.डोक्यावर घोंगडी ओढुन घेउन परत मी पांघरुणात शिरलो.
साधारणतः पाचच्या सुमारास सुधीर आम्हाला उठवत होता.पण थंडी खुप वाजत होती त्यामुळे जागेवरुन उठायला नकोस वाटत होत.शरीराच्या थंडीला मनाने समजावल अन आम्ही तारामती शिखराकडे कुच केल.सगळ्यांच्या बॅगा सांभाळन्यासाठी भाविन मागे थांबला होता.अजुन अंधार होताच.तारामती शिखराकडे जाणारी वाट थोडी झाडीतुन जाणार होती.पहाटेचा गार वारा अंगाला झोंबत होता.अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर येउन पोहोचलो.
सुर्योदय व्हायचा होता पण आजुबाजुला उजडायला लागला होता.पश्चिमेला चंद्रसुद्धा हळुहळु मावळत होता.थोड्या वेळाने पुर्वेला क्षितिजावर लालसर लकेर उमटली.दिवसभर ज्याच्याकडे आपण डोळे फाडुन बघु शकत नाही तो सुर्याचा लाल गोळा हळुहळु वरती सरकत होता.सुर्याच ते बाल्यावस्थेतील रुप मोहुन टाकणार होत.लाल फळ समजुन म्हणुनच तर आपले हनुमंतराय याला गिळायला निघाले होते ना..

४८५० फुटांवर असलेल तारामती शिखर हे हरिश्चंद्रगडावरील सर्वात उंच असे ठिकाण आणि सह्याद्रीतील उंच शिखरांपैकी एक आहे.तारामतीच्या माथ्यावर छोटी छोटी दोन शिवलिंगे दिसली.वाटेवर गोमुख आढळली.खुबीफाट्यावरुन खिरेश्वरकडे येणारी धरणाच्या बाजुची वाट,माळशेज घाट,सिंडोला किल्ला अन गडाच्या आजुबाजुचे जंगल याचे विहंगम द्रुश्य नजरेस पडले.रोहिदास शिखराच सुद्धा दर्शन झाल.
पहाटेचा भन्नाट वारा कानात रुंजी घालत होता.प्रसन्न वाटत होत.तिथेच बसुन गडाचा आवाका न्याहाळत होतो.नैसर्गिक कडे लाभलेल्या या गडाला तशी तटबंदीची गरजच नाही.रौद्र असुन पण सुंदर अशा या गडाच्या प्रेमात पडलो होतो.रोहिदास ,तारामती,हरीश्चंद्र अशी नावे का पडली असतील यांना म्हणजे या गडाला दोन चार हजार वर्षापूर्वीचा पौराणिक इतिहास असणार याची खात्री पटली.मराठ्यांनी १७४७-४८ मध्ये हा किल्ला मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली असे इतिहासात डोकावल्यावर समजले.

तारामती शिखराच्या माथ्यावर पांढर्‍या स्फटिकासारखा हा खडक आढलला.

तारामतीच्या डाव्या बाजुने एक वाट बालेकिल्ल्याकडे जाते.पण आम्हाला बराच उशीर झाला होता.पाचनई गावातुन निघणारी साडेअकराची एस.टी पकडायची होती.म्ह्नणुन आम्ही शिखराहुन खाली निघालो.
मंदिराजवळील पुष्करणीत येउन हात पाय धुऊन घेतले.सटरफटर खाउन पेट्पुजा केली. तारामती शिखर अन त्याच्या पोटात खोदलेल्या गुहा,केदारेश्वर आणि मंदिर परिसर डोळ्यात परत साठवुन घेतला.

पाचनाई गावात जाण्यार्‍या वाटेने परतीचा प्रवास सुरु झाला.एका बाजुला अजस्र कातळभिंत अन दुसर्‍या बाजुला खाली उड्या मारत जाणार मंगळगंगा नदीच खोर अशी भन्नाट वाट होती.बर्‍यापैकी वापरात असलेली वाट होती.पावसाळ्यात जेव्हा चारी बाजुंनी धोधो पाणी वाहत असेल तेव्हा काय नजारा दिसत असेल असा विचार करत आम्ही वाट उतरत होतो.

दोन-अडिज तासात वाट उतरुन खाली आलो.घामाने ओलेचिंब झालो होतो.गावातल्या हापशीजवळ तोंड धुवुन घेतल.एस.टी निघुन गेली होती.आता राजुरला कसे जाणार या विवंचनेत आम्ही बसलो होतो.पण आमच नशीब बलवत्तर होत.गडावर ज्या शाळेची सहल आली होती.त्या सहलीतील बसवाल्याने राजुरपर्यंत सोडल.पाचनाई ते राजुरपर्यंतचा रस्ता पण मस्त डोंगररांगाच्या कडेकडेने वळणावळणाचा होता.सहलीतल्या पोरांबरोबर थोडी धमाल कली.त्या पोरांच्या टिवल्याबावल्या बघुन एकदम शाळेचे दिवस आठवले.मग राजुर-घोटी- कसारा असा जिपचा खडतर प्रवास घडला.अन शेवटी कसार्‍याहुन लोकल ट्रेनने घरचे ठाणे गाठले.
घरी आलो तेव्हा पाय धाय मोकळुन रडत होते.प्रवासामुळे अंग आंबल होत.पण अंतरी एक वेगळच समाधान वाटत होत.शरीराने जरी घरी आलो असलो तरी मन मात्र अजुनही तेथेच रेंगाळल होत.

पुनवेचा चांद ......अंधारात जंगलातल्या वाटेवरचा रोमांच.... .लाजारु शेकरु......काळाभिन्न कातळ........कातळात कोरलेली मंदिर अन गुहा....डोळ्याचा पारण फेडणारा कोकणकडा.... वार्‍याची गाज... विविध रंगाने भारलेली संध्याकाळ..क्षितीजापलिकडे हरवलेला सुर्यास्त आणि नव्या जगाची ओळख करुन देणारा सुर्योदय....जिवलग मित्रांची सोबत..अन बरच काही डोळ्यात साठल होत.मनाच्या गाभार्‍यात स्थानापन्न झाल होत.मेंदुत घुसल होत.अस काय झाल होत अचानक आयुष्यात.खर म्हणाल तर मी प्रेमात पडलो होतो पहिल्या भेटीतच...रांगड्या सह्याद्रीच्या अन निसर्गाच्या.

सह्याद्रीची हि ओढ अजुनही तशीच कायम आहे.
पुन्हा भेटुया.... तोपर्यंत नो डेस्टिनेशन...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुष्यात पहिला जुगार खेळावा आणि ज्याकपॉट लागावं असा आहे. पहिला ट्रेक तो पण पंढरीला वा :).
त्यात शेकरू पण दिसला. फोटू आणि वर्णन मस्तच

पुढील भटकंतीस शुभेच्छा
तोफखाना