मी गेली ४० वर्षे तरी रात्रीचा केवळ ५ तास झोपत आलोय. कॉलेज सकाळचे असायचे, म्हणून त्या काळात जी सवय लागली लवकर उठायची, ती आजही कायम आहे. रात्री साडे अकरा ते पहाटे साडे चार, एवढी झोप मला पुरेशी होते.
पण ती लागते मात्र अतिशय गाढ. अगदी मला कुणी उचलून नेले तरी जाग येणार नाही अशी.
पण तेवढी झोप मात्र मला हवीच. जागरण मला जमत नाही. कधी घडलेच तर दुसरा दिवस वाईट जातो. आताशा माझे इमिरेटस चे विमान पहाटे साडेचारचे असल्याने, ती सर्व रात्र जागतच काढावी लागते, पण मग एकदा विमानात बसलो, कि थेट दुबईलाच जाग येते. विमान धावले कधी, उडाले कधी आणि उतरले कधी, ते अजिबात कळत नाही.
तरीही काही रात्री मी जागवल्याच ( डोळे वटारू नका.. माड्या वगैरे नाही चढलो.. )
त्यांच्या या आठवणी. खरे तर इतक्या वर्षांनीही लक्षात रहाव्यात एवढ्या अविस्मरणीय आहेत त्या.
१) हैद्राबाद फेब्रुवारी १९८६
या रात्रीची तर तारीखही लक्षात आहे. १८ फेब्रुवारी १९८६. तारीख लक्षात राहण्याचे कारण म्हणजे त्या दिवसात भारतातून धूमकेतू दिसत होता. मी त्यावेळी सी. एम. सी. मधे नोकरी करत होतो. आणि त्या कंपनीच्या नियमाप्रमाणे नव्याने रुजू झालेल्या लोकांना ५ दिवसाचे इंडक्शन ट्रेनिंग घ्यावे लागत असे.
तर अशा ट्रेनिंगसाठी आम्ही देशभरातील तरुण मूले हैद्राबादला हॉटेल कर्ण मधे जमलो होतो. हॉटेल छान होते, आणि एकेका रुम मधे दोघे दोघे जण होतो. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच असे ट्रेनिंग असायचे मगची संध्याकाळ आम्हाला मोकळी.
तशी औपचारीक ओळख सकाळीच झाली होती. संध्याकाळी आम्ही चारमिनार परीसरात भटकत होतो. एका दुकानात मला छान बांगड्या दिसल्या. त्या मी बघत होतो आणि दुकानदाराने ज्या भावाला सांगितले त्या भावात खरेदी करायला तयारही झालो होतो. तेवढ्यात आमच्याच ग्रुपमधल्या दिल्लीच्या दोन मुलींनी, मला अडवले,
" दिनेशजी आप भी ना .. ये साहब तो कुछ भी बोल देंगे, ऐसे थोडी ना मान जाते.. " म्हणत माझ्यासाठी घासाघीस करायला सुरवात केली. त्यात दोनदा दुकानाच्या पायर्या उतरूनही झाल्या..बीबीजी, बीबीजी करत तो दुकानदार आमच्या मागे.
असे करत मूळ भावाच्या पावपट किमतीत खरेदी झाली. हे सगळे मला नवीनच होते. मी आधी ठरवल्यापेक्षा बरीच जास्त खरेदी केली. मग त्या दोघींना मी म्हणालो, " चाय तो बनती है ना जी.. " त्या म्हणाल्या, " हम चाय नही पिते जी, ज्यूस के लिये पुछो तो मान जाते शायद.. " पहिल्याच भेटीत असा मोकळेपणा आला होता.
तिथे ज्यूस आणि सोबत काजूची भजीही खाल्ली. मग आमचा ग्रुप वाढतच गेला. चार दिवस रोज उशीरापर्यंत भटकत रहायचो. आणि मग शेवटचा उजाडही संपला.
परतीची विमाने वेगवेगळ्या वेळेची होती. कुणाचे पहाटे चार वाजताचे तर कुणाचे सहा वाजताचे. परत कधी भेट्णार असे म्हणत आम्ही सर्वांनी पॅकिंग वगैरे करुन आमच्या रुममधे जमायचे ठरवले. गप्पा, पत्यांची देवाण घेवाण चालू होते ( त्या काळात इमेल्स नव्हत्या ) ऑफिसमधल्यांच्या नकला. ट्रेनिंग देणार्यांच्या नकला. कोण डुलक्या काढत होते आणि कोण गाढ झोपले होते ट्रेनिंगमधे त्याच्या आठवणी. मग अंताक्षरी वगैरे.. असे करत करत एकेक ग्रुप बाहेर पडत होता. तेवढ्यात पहाटेचे दोन वाजले, मग आता दोन तास तरी का झोपा म्हणत, तसेच गप्पा मारत बसलो.
एकाच कंपनीत होतो. तरी नंतर भेटायची शक्यता फार कमी होती. एकमेकांचा निरोप घेताना, फार हळवे व्हायला झाले.
त्यावेळी दिल्लीच्या दोघी मुलींनी उच्चारलेले निरोपाचे वाक्य, आजही विसरु शकत नाही. अगदी हसत खेळत गप्पा मारणार्या त्या दोघी, निरोप घेताना म्हणाल्या, "आपसे हात जोडके बिनती करते है, जिंदगीमे कभीभी किसीसे, हमारा नाम लेके ये ना कहना, कि ये दोनो इतनी रात गये, आपके कमरेमें थी... " नाहीच लिहिणार आजही ती नावे.
२) डिसेंबर १९८७ शेलू
माझे भारतातलेच नव्हे तर परदेशातीलही वास्तव्य ( एक केनयाचा अपवाद सोडल्यास ) कायम समुद्राच्या
जवळच झालेय. पण त्यामूळेच का माहित नाही, मला समुद्राचे अजिबात आकर्षण नाही. समुद्राच्या पाण्याने
माझ्या अंगावर रॅश येते, हेदेखील कारण असेल.
पण त्याचबरोबर मला नदीचे मात्र खुप आकर्षण आहे. नदी म्हणजे दुथडी भरून वाहणारी नव्हे तर झुळझुळ
वाहणारी. नितळ.. ! माझ्या आजोळची शाळी नदी तर मला अतिप्रिय. आम्ही जात असू त्या मे महिन्यात ती कोरडीच असे, पण त्यातही काही झरे असत.
नदीकाठी पाण्यात पाय सोडून गप्पा मारण्यासारखी मौज नाही. गोव्याला तिलारी, तामडी सुर्ला, सांखळी तसेच
न्यू झीलंड मधे हॅमिल्टन ला मी अश्या गप्पा मारत तिन्हीसांजा घालवलेल्या आहेत. पण नदीकाठी
पूर्ण रात्र जागत काढली ती डीसेंबर १९८७ ला.
माझी सहकारी विलासिनी राव, हिच्या वाढदिवसा निमित्त आम्ही सहल काढली होती. ठिकाण काहीतरी
वेगळे ( त्या काळात हटके, शब्द वापरात नव्हता ) हवे होते. ऑफिसमधून ८ जण जाणार होतो.
माझ्या घरी ट्रेकिंगचा टेंट होता. तो सहा जणांना पुरला असता. इतर दोघांनी उघड्यावर रात्र काढायचे ठरवले
होते.
ट्रेकिंग, हायकिंग ची पण बहुतेकांची तयारी नव्हती.. आता या सगळ्या अटीत बसेल असे ठिकाण ठरवता,
कर्नाळा, माथेरान सगळेच बाद होत गेले. मग एक ठिकाण निवडले ते शेलू.
वांगणीजवळ शेलू हे स्टेशन त्या काळात नव्यानेच बांधले होते. कुणीतरी म्हणाले कि मिले सूर .. मधल्या तनुजाच्या ओळी या ठिकाणी चित्रीत झाल्या होत्या ( ते खरे नव्हते ) पण नदी आहे त्यामूळे पाण्याची तरी सोय होईल म्हणून आम्ही तयार झालो. स्टेशन नवेच होते आणि आजूबाजूला अगदीच तुरळक वस्ती होती. स्टेशनपासून थोड्याच अंतरावर एक नदी वहात होती. काठावर काही झाडेही होती.
आम्ही संध्याकाळीच तिथे पोहोचलो. स्टेशन मास्तर आणि दोन गावकर्यांकडे तिथे टेंट ठोकला तर चालेल
का ते विचारले. त्यांनी अगदी खुशाल रहा असे सांगितले. स्टेशन मास्तरांनी सांगितले कि स्टेशनवर पाणी
मिळेल. गावकर्यांनी पण जेवण वगैरे हवे का ते विचारले.
जेवणाचे सामान आम्ही नेले होतेच. बैठे खेळ वगैरे खेळून झाले. तिथेच चूल मांडून जेवणही केले. आणि
अंधार पडल्यावर एकदम जाणवले कि मुंबईतून कधीही दिसत नसणार्या आकाशभर तारे तारका तिथून
दिसत होत्या. थोड्या वेळाने चंद्र उगवला आणि वातावरण एकदम जादूई झाले. नदीच्या
पाण्याला आगळीच चमक आली. गप्पांना रंग चढला. आमच्या पैकी काही तामिळ, तूळू बोलणारे तर काही
गुजराथी. आपापल्या भाषेतील गाणी वगैरे म्हणून झाली.
झोपायची आठवणच होत नव्हती.. आणि त्याला तसे कारणही होते, टेंट बाहेर कुणाला ठेवून बाकिच्यांनी
आतमधे झोपायचे, याला कुणाचीच तयारी नव्हती. अमंळ कुणाला डुलकी लागली, तर कुणीतरी काहीतरी
भन्नाट किस्सा सांगून त्याची झोप उडवायचा.
अगदी पहाटे पहाटे थोडेसे फटफटल्यावर आम्ही पहिली कर्जत लोकल पकडून घरी निघालो. त्या प्रवासात
मात्र सगळ्यांना गाढ झोपा लागल्या होत्या.
नंतरही मी शेलूला गेलो होतो, पण आता वस्ती वाढली आहे. त्या वेळचा निवांतपणा आता मिळणार नाही.
३) जूलै १९८८ जव्हार
जसे नदीचे तसेच पावसाचेही मला खुप आकर्षण आहे. या वयातही मला पावसात भिजावेसे वाटते आणि मी भिजतोही. पण या पावसाने एकदा मला रात्रभर भिजवत जागवले होते.
आमच्या घरचा टेंट होता तो माझ्या भावाचा होता आणि त्याने तो नियमित वापरलाही होता. पण मला हवा
असेल तर तो स्वतःचा ट्रेक कॅन्सल करुन किंवा इतर मित्रांचे शेअर करुन मला देत असे.
त्याच्या सारखे धाडसी ट्रेक करणे मला माझ्या त्यावेळच्या तोळामासा प्रकृती मूळे शक्यच नव्हते. ( माझे
त्यावेळचे वजन वट्ट ५२ किलो, उंची मात्र १७५ सेमी ) पण पावसाची हौस होतीच. मी आणि माझा मित्र
अशोक पटेल, असे दोघे पावसाळी सहलीवर निघालो. ठिकाण निवडले होते, जव्हार.
जव्हार त्यावेळी अगदीच तुरळक वस्तीचे गाव होते. एम आय डी सी ची डॉर्मिटरी तेव्हाही होती. राजवाडा तर
होताच. त्यापुर्वी आम्ही तिथे ऑफिसच्या पिकनिक साठी गेलो होतो, तेव्हा पासूनच मी जव्हारच्या प्रेमात
होतो.
आम्ही ठाण्याहून एस्टी ने निघालो. पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. जव्हारचा परीसर अत्यंत रम्य आणि हिरवागार. ठिकाण असे ठरवले नव्हते. उगाचच रस्त्यावरून भटकत जिथे आवडेल तिथे तंबू ठोकून रहायचे असे ठरवले होते. भटकता भटकता एक स्पॉट आवडला. रस्त्यालगतच होता. जवळच एक छोटा ओहोळ वहात होता.
तिथेच तंबू लावला. शेकोटी पेटवली. जेवण करण्याचा प्लान नव्हता कारण बराच खाऊ नेला होता सोबत.
तो खात खात गप्पा मारत बसलो होतो.
आकाश आधीपासूनच ढगाळ होते. आता आणखी दाटी झाली. वळवाच्या पावसासारखा वारा सुटला. वीजा
चमकू लागल्या. आणि आधी तुरळक पडत असणार्या ढगांनी बरसायला सुरवात केली. आम्ही दोघे लगेच तंबूत शिरलो.
झोप नव्हती आली म्हणून तंबूच्या खिडकीतून बाहेरची मजा बघत होतो. रस्ता जवळच होता पण वाहतूक
अगदीच तुरळक होती.
आधी हलक्याने पडणार्या सरींनी मग चांगलाच जोर धरला. वीजाही चमकू लागल्या. त्या थोड्या वेळाने थांबल्या
पण पावसाने मात्र जोर धरला. आम्ही ज्या ओहोळाच्या आधारावर तंबू ठोकला होता, त्यात बरेच पाणी वाहू लागले
त्याशिवाय त्याला एक पाळ फुटली आणि ती थेट आमच्या टेंट मधे आली. पाण्यात भिजून खराब होईल असे फार सामान नव्हते आमच्याकडे. होते ते पटापट प्लॅस्टीकच्या पिशव्यात भरले आणि तंबूच्या बाहेर आलो.
त्या ओहोळावर छोटासा पूल होता त्या पूलाच्या कठड्यावर दोघे बसून राहिलो.
गाव लांब होते आणि तसेही गावात जाऊन काय करायचे प्र्श्नच होता. मग तिथेच पाऊस थांबायची वाट बघत बसलो. वॉटरप्रूफ घड्याळे नव्हती त्यामूळे किती वाजले ते कळायला मार्ग नव्हता ( आमची घड्याळे आम्ही पॅक करुन टाकली होती.)
अशोकचा पांढरा आणि माझा पिवळा टी शर्ट होता, त्यामूळे अंधारात आम्ही एकमेकांना दिसत होतो. त्यामूळे रस्त्यावरून जे तुरळक ट्र्क टेंपो जात होते, त्यांनाही आम्ही दिसत असणार. पण त्या अरुंद रस्त्यावरूनही ते न थांबता भरधाव जात होते. अशोकला शंका आली कि ते चालक आम्हाला बहुतेक अमानवीय ( हा आताचा शब्द ) समजत असावेत.
मग आम्ही तशीच तिथे रात्र काढायची ठरवले. सुदैवाने पाऊस थोड्या वेळाने थांबला. प्लॅस्टीक बॅगेतले कपडे काढून आम्ही रस्त्यावरच बदलले. टेंट मधे पाणीच पाणी झाले होते पण तो जागेवर होता.
रात्रभर गप्पा मारल्या. अजूनही पावसाळी रात्री मला ती रात्र आठवते. अशोकची आठवण येते... ( नंतर तो पण हरवलाच.... )
४) नोव्हेंबर १९९०, मस्कत
मस्कत मराठी मित्र मंडळ ( मममिमं ) तर्फे मस्कतमधे सुंदर कार्यक्रम होत असत. आणि ऑक्टोबर ते फेब्रुवारी काळात मस्कतमधे सुखद थंडी आते. अश्याच एका गुरुवारी दारसेतच्या देवळात गेलो होतो तर तिथे, मालिनी राजूरकर यांचे गायन आहे असे कळले ( त्यावेळी त्या पंडीता अशी पदवी लावत नव्हत्या.. अर्थात कुठल्याही पदवीची त्यांना गरज नाही. )
कार्यक्रम आठ वाजता सुरु होणार होता आणि मी पाच वाजता तिथे होतो. मग घरी आलोच नाही. रूवी मधे भटकून
जेवून वगैरे साडेसातलाच दारसेतला पोहोचलो. तोपर्यंत मी मालिनीबाईंचे गाणे फार ऐकले नव्हते आणि त्या
काळात नेट काय सिडीज पण नव्हत्या.
कार्यक्रम नेहमीप्रमाणे स्टेजवर नव्हता तर हॉलमधेच एका कोपर्यात एक छोटासा मंच तयार केला होता.
मी अगदी पहिल्या ओळीतली जागा पकडली होती.
बाई आल्या सर्वांना नमस्कार केला, आपण काय गाणार आहोत त्याची माहिती स्वतःच दिली.. ( गायचा प्रयत्न
करते.. असे शब्द होते त्यांचे ) आणि अडाणा गायला सुरवात केली. ना स्वरसाथ ना तानपुरा. केवळ तो
आवाज. बाई अगदी पहिल्या दोन मिनिटातच रागाला भिडतात. अडाणा नंतर नंद गायल्या. ( त्या काळात
त्यांच्या नंद मधल्या एका बंदीशीतल्या शब्दांवर टिका पण झाली होती. ) दोन्हीचे श्रोत्यांवर गारुड. एका
आवर्तनाला दाद द्यावी तोपर्यंत बाईंनी दुसर्या आवर्तनाचे झळकते कडे फेकलेले असायचे.
आठ वाजता बाईंनी सुरवात केली आणि अकरा वाजता मध्यंतर झाले. त्या वेळात आम्ही साबुदाणा खिचडी वगैरे
चापून आलो तर बाई आपल्याच जागी बसून वही चाळत होत्या. साथीदारांना ( तबल्यावर कामत होते ) पण
त्यांनी मोकळीक दिली होती.
दहा मिनिटात बाई परत तयार. बाईंनी दूर्गा माता ही रागमाला गायला सुरवात केली. त्यांचे जे रेकॉर्डींग उपलब्ध
झाले ( ते नंतर ) त्यापेक्षा फार तबियतीने त्या गायल्या. मग चक्रधर गायल्या. आणि मग चाल पहचानी, या
टप्प्याला सुरवात केली. काय टप्पा रंगला म्हणून सांगू महाराजा. प्रत्येक सम लखलखीत. आणि प्रत्येक वेळी
काहितरी वेगळे. पुनरावृत्ती म्हणून नाहीच. कुणाचे डोळे पेंगतील याची शक्यताच नव्हती. मग बाईंनी
सईंया निकस गये, मै ना लडी थी ने मैफीलीची सांगता केली. रंगमहलके दस दरवाजे वर अप्रतिम कारीगरी
करून, न जाने कौनसी खिडकी खुली थी वर जीवघेणी करामत केली होती. रात्रीचे पावणेदोन वाजले होते.
आणि तिथून जाता जाता मला एकाने त्यांच्या दुसर्या दिवशीच्या सकाळच्या घरगुति मैफीलीचे आमंत्रण दिले.
सकाळी आठ वाजता.
पहाटे तीन वाजता मी घरी पोहोचलो. शुक्रवारी सकाळी करायची कामे ( म्हणजे कपडे धुणे, भाज्या चिरणे
करायला घेतली ) आणि कानात बाईंचे गायन गुंजन करु लागले. कपड्यावर ब्र्श मारताना मला चाल
पहचानीच आठवत होते. ( बाईंची एक आठवण, मी मग वाचली होती. मैफील ठरली कि बाईंची कामवाली
नेमकी रजेवर जात असे. मग बाई वॉशिंग मशीनवर पेटी ठेवून रियाज करत असत. आणि मग ती आक्रमकता
त्यांच्या गायनात उतरत असे. ) दोन तास तरी झोपू म्हणून अंथरुणावर पडलो, तर अजिबात झोप आली नाही.
न जाने कौनसी खिडकी खुली थी.......
सकाळच्या मैफीलीची वाट बघत बसलो आणि तासभर आधीच तिथे पोहोचलो. झाडू मारण्यापासून ( सॉरी, व्हॅक्यूम
क्लीन करण्यापासून ) सतरंजी अंथरण्यापर्यंत सर्व केले. आणि अगदी पहिल्या आसनावर बसलो. बाई
माझ्यापासून केवळ चार फुटावर. त्याही समोरासमोर. अगदी बाईंच्या वहीतले अक्षर दिसावे एवढ्या जवळ.
बाईंनी सुरवात केली ती बिलासखानीतल्या, अब मोरे कांता ने.. अक्षरशः प्रत्येक समेला अंगावर शहारा आणला
बाईंनी. दिड तास बाईंनी बिलासखानी रंगवला. शेवटच्या तानेवर खरेच तानसेन सोडून जातोय असे वाटले.
मग बाईंनी तोडी रंगवला. आणि दहा मिनिटाचे मध्यंतर. तेव्हाही बाई जागेवरच बसून.
मग बाईंना मराठी गायचा आग्रह झाला. बाईंनी शिवहरा हे भवहरा हे पद गायले. पांडूनृपती जनक जया गायल्या.
काही लक्षणगीते गायल्या. तोपर्यंत दुपार झाली होती मग सारंगाचे काही प्रकार गायल्या.
आज २५ च्या वर वर्षे झाली तरी बाईंची मूर्ती डोळ्यासमोरून हलत नाही. त्यानंतर देखील मी त्यांची मैफील ऐकली.
माझे भाग्य थोर म्हणून मला त्यांचे ऐन उमेदितले गाणे ऐकता आले. पुढे त्यांचे जेवढे म्हणून गायन उपलब्ध आहे,
त्याचा मी संग्रह केला ( दुर्दैवाने त्यांच्या काही कॅसेटवरचे राग, सिडी वर उपलब्ध झाले नाहीत. )
टप्प्याचे गारुड तर अजूनही उतरले नाही. पुढे मी इतर कलाकारांचे टप्पे ऐकले.. पण माझे मन त्यांना स्वीकारूच
शकत नाही.
५) डिसेंबर १९९९, सूर, सल्तनत ऑफ ओमान
भारतातून विमान पश्चिमेला उडाले कि सर्वात आधी जमीन दिसते ती सूर या ओमान मधल्या गावाची. हे गाव कासवांचे अंडी घालण्याचे आवडते ठिकाण आहे. ही जागा तशी मूख्य गावापासून लांब आहे. पण तिथे सरकारने उत्तम सोयी केलेल्या आहेत.
माझे मित्र मोंगिया ( सरदार ) आणि व्हीक्टर यांच्या ग्रुपसोबत आम्ही तिथे गेलो होतो. मस्कत ते सूर हे अंतर तसे काही शे किलोमीटर्सचे पण उत्तम रस्त्यामूळे ते सहज पार झाले. पुढचा टप्पा मात्र खडतर कच्च्या रस्त्यांमूळे जिकिरीचा आहे.
प्रत्यक्ष त्या जागेवर पोहोचल्यावर मात्र तिथे इतरही बरेच लोक आलेले दिसले. बहुतेकांनी जेवणाची तयारी चालवली
होती. उघड्यावरची वाळवंटातली जागा. आडोसा असा नव्हताच. मग आम्ही अर्धगोलाकार गाड्या लावून आडोसा
तयार केल्या. ( सरकारने पाण्याची, वॉशरुम्सची सोय केली होती ) आणि घरून मॅरीनेट करुन नेलेले चिकन भाजायला सुरवात केली. लेग्ज पीसेसच नेले होते आणि माझे जसजसे भाजून होत होते, तसे मित्र ते लंपास करत होते.
मध्यरात्रीच्या सुमारास कासवे तिथे अंडी घालायला येतात त्यामूळे तोपर्यंत जागत राहणे भाग होते. मग आमच्या
गप्पा, भसाड्या आवाजातली पंजाबी, मल्याळी गाणी .. चालूच होते.
मध्यरात्री तिथला सरकारी अधिकारी आम्हाला बोलवायला आला. आम्ही सगळे मिळून १०० एक जण नक्कीच होतो.
सगळे त्याच्यामागोमाग निघालो. तिथून १५/२० मिनिटे चालत गेल्यावर एक समुद्र किनारा दिसू लागला. अधूक
दिसणार्या पांढरट लाटांमूळे ते कळत होते, लाटांचा आवाज मात्र अजिबात नव्हता. तो अधिकारी आम्हाला
माहिती सांगत होता. ( ती कासवे आकाराने केवढी असतात, किती अंडी घालतात, ती किती दिवसात उबतात,
मग ती पिल्ले कुठे जातात वगैरे ) सगळे सांगून झाल्यावर तो आम्हाला आणखी लांब घेऊन गेला.
आणि त्यांनी सागितलेल्या वेळी ती प्रचंड मोठी कासवे समुद्रातून बाहेर येऊ लागली. बाहेर आल्यावर एका जागी थांबून खड्डा करायला सुरवात करायची. मनाजोगता खोल खड्डा झाला कि त्यात अंडी घालायला सुरवात करायची.
अर्धा तास हा कार्यक्रम चालायचा. मग तो खड्डा बुजवून परत वळून समुद्राकडे निघून जायची.
अंडी घालताना आम्ही त्याच्या भोवती कोंडाळे करून उभे होतो. त्याच्या पाठीवरून हात फिरवला तरी त्याची काही
प्रतिक्रिया नसायची. तो अधिकारी पण बॅटरीच्या उजेडात अंडी दाखवायचा. तेवढ्या परीसरात असे बरेच कार्यक्रम
चालले होते. त्या भागात किनार्यावर काही उंच कडे आहेत आणि सतत वाळूचा मारा बसल्याने त्यांचे विचित्र
आकार झालेले आहेत.
तेवढ्यात चांदण्याच्या प्रकाशामूळे म्हणा कि अंधाराला आमचे डोळे सरावल्या मूळे म्हणा, बॅटरीची गरज उरली नाही. तास दोन तास तिथे थांबून आम्ही परत मूळ जागी आलो. त्या अधिकार्याने दुसर्या दिवशी पहाटे तिथे परत
बोलावले होते.
आम्ही अंथरुण वगैरे काही आणले नव्हते. कार्सची कव्हर्स होती, तिच अंथरली आणि आडवे पडलो.
मोकळ्या वाळवंटातली, खचाखच चांदण्याने भरलेल्या आभाळाखालची ती रात्र. मला झोप लागणे शक्यच नव्हते.
काही वेळाने चंद्राची कोर उगवली आणि सगळीकडे तिचा प्रकाश व्यापून राहिला. पांढर्या वाळवंटातही,
दूरवर काही टेकड्या दिसू लागल्या.
काही वेळाने दूरवर भटके उंट दिसू लागले ( ओमानमधल्या वाळवंटात ते कॉमन आहेत ) काही जण तर १०० मीटर्स वर येऊन उभे राहिले. ते आणखी जवळ आले तर काय करायचे असा विचार करत मी टक्क जागा.
थोड्या वेळाने क्षितिजाजवळ हिरवट निळ्या चांदण्याची जोडी दिसली. हा काय प्रकार असावा ? पण इतरांना
दाखवू म्हंटले तर काही क्षणात ती गायब. थोड्या वेळाने परत दिसली. मग आणखी एक जोडी दिसली. मी
मित्रांना उठवले. कुणाचा विश्वासच बसेना डोळ्यावर. आणखीही काही जोड्या दिसल्या.
तेवढ्यात एकाला आठवले कि त्याच्याकडे नाईट व्हीजन दुर्बिण आहे. त्याच्यातून बघितल्यावर कळले कि ते
कोल्हे आहेत. आमच्या जवळपास चिकनची हाडे होती, त्याचा वास त्यांना लागला होता बहुतेक. आम्ही त्यांच्या
कडे बघत बसलो, पण सुदैवाने ते फार जवळ आले नाहीत.
पहाटे चार वाजता,तो अधिकारी परत बोलवायला आला.
परत त्याच किनार्यावर गेलो, अजून खुपच अंधार होता. पण लाटांवर काही निळे चमकदार ठिपके दिसू लागले.
त्या अधिकार्याने सांगितले कि ते खास जातीचे मासे आहेत आणि कधी कधीच ते दिसतात.
पहाटे अगदी फटफटता आकाशात पक्ष्यांची गर्दी होऊ लागली. ते कोल्हेही दूरवर घोटाळू लागले आणि पांढर्या
वाळूवर काही काळे ठिपके दिसू लागले. काही दिवस आधी घातलेल्या अंड्यातून पिल्ले बाहेर येत होती.
तीन सेमी व्यासाची ती छोटीशी पिल्ले, अनामिक ओढीने समुद्राकडे धाव घेत होती. रस्ता खडतर होता, कारण
त्या प्रवासात त्यांच्या वर आकाशातून पक्ष्यांचा आणि जमीनीवरुन कोल्ह्यांचा हल्ला होणार होता.
आजचा दिवस थोडा भाग्याचा कारण आज माणसांची गर्दी होती त्यामूळे पक्ष्यांना आणि कोल्ह्याना अटकाव होत होता. ( अर्थात त्यांच्यासाठी दुर्भाग्याचा ) तरीही मुसंडी मारून ते आपला वाटा उचलत होतेच.
काही कासवांची पिल्ले दिशा चुकून जमीनीकडे निघाली होती. खर तर त्या मार्गावर त्यांचा निभाव लागणे अशक्य. मी तसे एक पिल्लू उचलले आणि समुद्राजवळ सोडून आलो. अनेकांनी माझे अनुकरण केले. मग तर काय बटाटा शर्यतच सुरु झाली. पण ती वळवळी पिल्ले एका वेळी फार तर दोन नेऊ शकत होतो.
तेवढ्यात कुणीतरी बादली पैदा केली. त्यात पाणी भरून ती पिल्ले त्यात भरून तो समुद्रात सोडून आला.
मग सगळ्यांनीच त्याला मदत करायला सुरवात केली. पण तो बदमाश निघाला. बादली भरून पिल्ले चक्क, गाडीत
घालून निघून गेला. अर्थात जाता जाता अस्सल पंजाबी / मल्याळी शिव्या खाऊन गेला.
सूर्य उगवेपर्यंत हा प्रकार सुरु होता. मग आम्ही आवरा आवरी करून निघालो. वाटेत एक मशीद लागली. मशीद आहे म्हणजे पाण्याची सोय असणारच म्हणत आम्ही तिथे थांबलो. हात पाय धूताना, व्हीक्टर मला म्हणाला, " दिनेशभाई, कल वो ओमानी बोल रहा था ना कि ये कछुए मलेशिया तक जाते है लेकिन अंडे डालनेके लिये फीर ओमान आते है. कैसे आते है पता नही चलता. " मी दुजोरा दिला.. त्यावर तो म्हणाला, " मैने बहुत सोचा, फिर मुझे मालुम पडा. वो क्या है ना, वो कछुए इतने धीरे धीरे जाते है ना कि रास्ते का हर पत्थर, हर किनारा उनको याद
रहता है. फिर वापस आनेको कोई प्रॉब्लेमही नही ".. त्यावर आम्ही खो खो हसत सुटलो..
६) प्रबळगड, मे २००३
मी त्यावेळी पनवेलला नोकरी करत होतो. हर्षद पटवर्धन आणि साहिर इनामदार असे माझे दोघे आर्किटेक्ट मित्र आणि मी, असा प्रबळगडावर जायचा प्लान ठरला. दुपारी निघून रात्र गडावर काढायची असे ठरले होते.
माझी तयारी नव्हती कारण एकतर त्यांच्या तूलनेत माझा स्टॅमिना फार असणार नव्हता ( ते ऐन पंचविशीतले आणि मी .. जौ द्या.. ) त्याशिवाय दुसर्या दिवशी, माझ्या वाढदिवसानिमित्त माझी मानसकन्या, न्यू झीलंडवरून येणार होती.
तिच्यासाठी थोडे शॉपिंग करून, तिला आणायला एअरपोर्टवर पण जायचे होते मला.
पण त्या दोघांच्या आग्रहापुढे माझे चालले नाही. दुपारचे जेऊन वगैरे आम्ही शेडूंग फाट्याला पोहोचलो आणि
प्रबळगडाच्या सोंडेवरून वाडीवर पोहोचलो. त्या संपूर्ण सोंडेवर कुठेही सावली नाही, कि पाण्याची सोय नाही.
वाडीवर एक विहीर कसला, खळगा आहे. तिथे मात्र थंडगार पाणी उपलब्ध होते. तिथेच डोक्यावर पाणी ओतून घेतले
आणि आम्ही आडवे झालो. परत मी कच खाल्ली आणि मी आता वर येत नाही, इथेच थांबतो म्हणू लागलो. परत
त्यांचा आग्रह.
वाडीच्या समोरच प्रबळगडाचा उभा कडा आहे. त्यावर काही आम्ही चढाई करणे शक्यच नव्हते. उजव्या हाताला
एक ढोरवाट दिसत होती. त्यावरून निघालो. कड्याच्या कुशीत पोहोचल्यावर सावली मिळाली पण ढोरवाट
मात्र एका पठारावर गेली. गडावर जाणारी वाट काही दिसत नव्हती. वरून एक ओहोळ खाली येताना दिसला,
त्यात पाणी नव्हते, नुसतीच दगडाची उतरंड. त्यातूनच वर जाऊ असे ठरले. छाती एवढ्या उंचीचे ते दगड
एकमेकांना हात देत आम्ही पार करत होतो. ( काही ठिकाणी तर साहीर चक्क मला दोन्ही हातांनी उचलून वर खेचत होता. अर्थात त्याला ते सहज शक्य होते कारण त्यावेळी तो पहल्वान होता. ) शिवाय आमच्याकडे टेंट
आणि जेवणाचे सामानही होते.
बर्याच उंचीवर पोहोचलो आणि ती वाटही गचपणात लुप्त झाली. आता सूर्य मावळला होता. कसेही करुन वरच्या
पठारावर पोहोचायला हवे होते. तेवढ्यात हर्षलने काही आवाज ऐकले. गडावरती माणसे होती. त्यांना हाकारून
बघितले पण आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता.
त्या गचपणातून सरपटत कसेबसे वर पोहोचलो. तर हायवेवरुन दिसते ती झेंडावाली घुमटी समोरच होती.
म्हणजे आम्ही माथ्यावर पोहोचलो होतो. हर्षलने ती माणसे शोधून काढली. काही मुले बांबू गोळा करायला
आली होती. आम्ही त्यांना पाणी कुठे आहे ते दाखवा असे विनवले. त्यांनी एक कुंड दाखवले खरे पण त्यातले
पाणी पिण्याच्याच काय हात धुण्याच्या लायकीचेही नव्हते. आमच्याकडेही पाणी नव्हते ( गडावर पाणी असणार
असे आम्हाला वाटत होते ) आता वर रात्र काढण्यात अर्थ नव्हता. पण आल्या वाटेने खाली जाणेही शक्य
नव्हते ( वाटेत आम्ही काही जनावरांच्या विष्ठा बघितल्या होत्या )
ती मुले खाली जायच्या तयारीत होती. त्यांचा एक शॉर्टकट होता. त्यावरून आम्हाला न्यायची त्यांची तयारी होती.
त्यांच्यापैकी काही जणांनी आमचे सामान घेतले आणि बाकिच्यांनी आम्हाला. ती वाट प्रचंड उताराची होती
आणि त्यांचे तंत्र तर खासच होते. त्या अवघड वाटेवर एका ठिकाणी अगदी सेकंदभरही पाय न टेकवता ती उतरत
होती. आणि त्यांच्या मागे आम्ही. अवघड आडव्या वाटेवर तर ती मुळे दरीच्या बाजूला बांबू आडवा धरत आणि
त्या बांबूला धरून आम्ही उतरत असू. अक्षरशः अर्ध्या तासात आम्ही वाडीवर आलो.
वाडीवर पोहोचलो तर चांगलाच अंधार पडला होता. आता तिथेच रात्र काढणे भाग होते. आम्ही टेंट कुठे लावायचा
याचा विचार करत होतो, तेवढ्यात वाडीवरच्या लोकांनी त्यांच्या घुमटीजवळ जे छप्पर आहे, त्या खाली झोपा
असे सांगितले. न मागता पाण्याचा हंडा आणून दिला.
सुरक्षित जागी आल्यावर आमच्या जीवात जीव आला होता. ( खरं तर चढाईचा मार्ग चुकला होता. त्या वाटेवर
आम्हाला कुणीही भेटले नव्हते. वर गेल्यावर जर आम्हाला ही मुले भेटली नसती तर आम्हाला पाणीही लवकर सापडले नसते. खाली यायची वाटही सापडली नसती. ) त्या मूलांनी आमच्याकडून पैसे वगैरेही घेतले नाहीत.
थोडाफार खाऊ दिला त्यांना.
मग आम्ही मस्त फ्रेश होऊन जेवणाची तयारी केली. त्या घुमटीजवळून पनवेल शहराचे दिवे दिसत होते.
जेवण आटपले तेवढ्यात चंद्र उगवला. तो कडा आणि शेजारचे सुळके मस्त दिसू लागले. आडवे पडून गप्पा
मारत बसलो.
वयात बरेच अंतर असले तरी आमची घट्ट मैत्री होती, त्यामूळे विषयाचे बंधन नव्हते. रात्रभर चालणारे काही
एफ एम चॅनेल्स त्यावेळी सुरु होते ते ऐकत बसलो. थोड्या वेळाने रात्रीची येणारी विमाने दिसू लागली.
अगदी कुठले विमान आहे ते ओळखू यावे, इतपत ती खाली येत होती.
मग मला प्रत्येक विमानासोबत लेकीचे भास होऊ लागले. मी एकटाच त्या पठारावर भटकून आलो. ( त्यांचे देवस्थान
आहे ते आणि तशीही मला भिती वाटत नाहीच. ) त्या वेळी एका चॅनेलवर पहाटे पाच ते सात असा मराठीतून
कार्यक्रम सादर होत असे. तो देखील ऐकला. तो ऐकला, असे मी त्या चॅनेलच्या निवेदीकेला नंतर कळवले होते
आणि तिने कार्यक्रमात तसा उल्लेखही केला होता.
तो सुरु असतानाच दोघांना उठवले.. आणि त्या सोंडेवरून थाड थाड खाली उतरलो.. अर्थात लेकीसाठी वेळेवर
विमानतळावर पोहोचलोच.
( प्रबळगडाचे पाणी, असा माझा एक लेख जून्या मायबोलीवर होता, त्यात याचा उल्लेख होता. )
7) सिडने एअरपोर्ट - जानेवारी २०११
लेकीच्या वाढदिवसानिमित्त मला ऑकलंडला जायचे होते. तिथे जायला डायरेक्ट फ्लाईट नव्हते आणि नेटवर
शोधता मला क्वांटास वर एक डिल मिळाले. मुंबई-सिंगापूर-सिडने-ऑकलंड अशी विमाने होती. ती आयटनरी
बघताना असेही कळले कि सिंगापूर-सिडने या सेक्टर वर क्वांटास ए ३८० चालवणार होते. त्यावेळी ते नवीनच
आले होते आणि मी अजून त्याने प्रवास केला नव्हता. ( खरं तर काही दिवसापुर्वीच याच सेक्टरवर त्या विमानाच्या
इंजिनचा एक भाग तुटून खाली पडला होता आणि काही काळ ती सेवा स्थगितही झाली होती. )
ऑस्ट्रेलियाचा आणखी एक नियम असा आहे कि, जरी तूम्ही ट्रांझिट मधे असाल, त्या देशात विमान थांबले असता,
भले विमानातून बाहेरही येणार नसाल, तरी त्या देशाचा व्हीसा घ्यावाच लागतो. भारतीयांना तो मोफत मिळतो,
पण तो मिळवण्यासाठी एक दोन दिवस जातात. जिथे प्रवास संपणार त्या देशाचा व्हीसा, आधीच घेतलाअसेल,
तर हा विनासायास मिळतो. तर तो मी घेतलाही होता.
मी ते बूकिंग केले. मुंबई सिंगापूर, जेट एअरवेजचे विमान होते. त्या काऊंटरवर पण मला जरा वाद घालून, बॅग ऑकलंड पर्यंत बूक करवून घ्यावी लागली. ( पण ते व्हायचे नव्हते ) ए ३८० चे अप्रूप आधी वाटले होते पण प्रत्यक्षात तो अनुभव तितकासा चांगला नव्हता. इन फ्लाइट सर्व्हीस बेतास बात तर प्रत्यक्ष प्रवासात प्रचंड हादरे बसले. क्रू ला
ऊभे राहणे अशक्य झाले. मग वैमानिकाने जरा लांबचा वळसा घेतला. एवढ्या घोळात सिडनेला उतरायला उशीरच
झाला.
एखाद्या विमानतळावर बराच वेळ ट्रांझिट मधे असणे हे काही मला नवे नव्हते. सोल, सिंगापूर, हाँगकाँग, कोलंबो,
दुबई, नैरोबी, अबु धाबी, मस्कत, अदीस अबाबा, फ्रँकफुर्ट, ब्रसेल्स अश्या अनेक विमानळांवर मी असा टाईमपास
केलेला आहे. त्यामूळे सिडनेला उतरल्यावर मी एक्झिट न घेता, विमानतळावरच बसून राहिलो.
फारशी गर्दी नव्हती आणि दुकानेही हळू हळू बंद व्हायला लागली होती. आपल्याला काय करायचेय, म्हणत मी
बसून राहिलो. तेवढ्यात एक अधिकारी चौकशीला आला. मी त्याला ऑकलंडचा बोर्डींग पास दाखवला. तर तो
म्हणाला ते ठिक आहे, पण तू इथे नाही थांबू शकत. हा भाग रात्रीचा बंद होणार.
बाहेर म्हणजे थेट इमिग्रेशन काऊंटर पार करावा लागणार. व्हीसा असल्यामूळे त्याचाही प्रॉब्लेम नव्हता.
त्या काऊंटरवरच्या हिरोला, आफ्रिकेतून आलेल्या माणसाला कुठले सर्टीफिकेट दाखवायला सांगायचे तेच
आठवेना. येलो फीव्हर, येलो फिव्हर.. असे मीच त्याला सांगितले. बाहेर पडताना कस्टम्स वाल्या बाईने
परत अडवले. म्हणाली, बॅग कुठेय तूझी ? मी सांगितले ऑकलंड पर्यंत बूक केलीय. आतच असेल.
तर म्हणाली, नाही आत नाही ठेवता येणार. तू तूझ्याबरोबर ठेव. मी म्हंटले आता परत आत जाऊ ? तर म्हणाली,
थांब मी घेऊन येते.
बाहेर आणली तिनेच आणि एक्स रे मशीनमधे घातली. बर्याच वेळ निरिक्षण करून माझ्या ताब्यात दिली.
( त्या देशांचे क्वारंटाईन नियम मला माहीत असल्याने बॅगेत काही आक्षेपार्ह नव्हतेच, पण लेकीसाठीच्या
भेटवस्तू असल्याने, ती जरा मोठी होती ) बॅग ताब्यात घेऊन बाहेर आलो, तर तो भाग म्हणजे मिटींग पॉइंट. तिथे
काही फूड डिस्पेन्सर्स आणि एक एक्स्चेंज काऊंटर होता. थोडी करन्सी घेतली, आणि चिप्स घेतले, तेवढ्यात तिथला
माणूस म्हणाला, कि हा भागही आता बंद होणार.
अब मै कहाँ जाऊ ? रेल्वे काऊंटर वर गेलो तर तिथली बाई म्हणाली, आता शेवटची ट्रेन आहे पण परत यायला तूझ्या फ्लाइटच्या आधी ट्रेन नाही. टॅक्सी वाला म्हणाला, आता नेतो, पण परत येईपर्यंत थांबणार नाही.
मग म्हंटले थांबूया तिथेच.
अगदीच चिंचोळा असा भाग आहे तो. वेटीग एरीया आहे तिथे परळच्या एस्टी स्टँडवर वसतीला आलेले लोक
जसे झोपलेले असतात, तसे लोक झोपलेले. पाऊल ठेवायला जागा नाही. वॉशरुम मधे तर काही ऑसींचा
अक्षरशः नंगा नाच चाललेला.
परत बाहेर आलो. हातात भली मोठी बॅग ( नशीब तिला चाके होती ) तिला घेऊन बेंचवर बसलो तर बाजूच्या
कचरापेटीत अमाप सिग्रेटी टाकलेल्या. असह्य दुर्गंधी. बसणे अशक्य.
जिथून मला बाहेर काढले ( शेवटचे ) तिथले भले मोठे टिव्ही मात्र चालू ( ते कोणासाठी ) त्याच दिवशी त्या देशात
पूर आला होता, त्याची दृष्ये सतत दाखवत होते.
रस्त्यावर रहदारी नाहीच. मग ती बॅग घेऊन फेर्या मारू लागलो. अर्धा एक तास फेर्या मारतोय तोवर जोरदार
पावसाला सुरवात. मग मी परत त्या चिंचोळ्या भागात. नाही म्हणायला जवळ आयपॉड होते, त्यावर गाणी ऐकत
बसलो ( नाही, उभाच राहिलो. बसायला काहीच नव्हते )
चांगले ३ तास असा वेळ काढला. मग दूधवाला आला, पेपरवाला आला ( एअरपोर्टचा बरं ) असे करत करत
थोडी वर्दळ वाढली. पहाटे साडेचारच्या सुमारास गेट उघडले.. आणि मग मी आत. एरवी कुठल्याही एअरपोर्टवर
अगदी मजेत वेळ जातो माझा, पण सिडनेच्या नावाने कानाला खडा !!
८) ऑकलंड एअरपोर्ट.. जानेवारी २०१२
सिडनेचा अनुभव जेवढा वाईट तेवढाच ऑकलंडचा सुखद होता.
माझे कॅथे पॅसिफिकचे फ्लाईट सकाळचे होते म्हणून मी लेकीच्या घरून संध्याकाळीच निघालो. ( निघता निघता
माझे आणि माझ्या मैत्रिणीचे जोरदार भांडण. तिच्या मते ऑकलंड सर्वात सुरक्षित आहे आणि रात्री कितीही उशीरा मी तूला ड्रॉप करायला येऊ शकते. आताच जायची गरज नाही. अर्थात माझा त्याला ठाम नकार. ) ऑकलंड मला आता बर्यापैकी ओळखीचे असल्याने, संध्याकाळ तिथेच भटकत घालवली. ( तिथेच जवळ एक बटरफ्लाय पार्क आहे )
सिडनेच्या अनुभवावरून हा एअरपोर्टही रात्री बंद होत असणार असा माझा कयास. बोर्डावर रात्रीची विमानेही
दिसत नव्हती. पण बॅगेज सर्व्हीस काऊंटर उघडा दिसला. त्याला सकाळी किती वाजता उघडणार ते विचारून घेतले. ती वेळ मला सोयीची होती. बॅग त्याच्याकडे ठेवली.
तिथे भारतीय चवीचे काहीबाही मिळतेही पण ते न घेता जवळच्या सुपरमार्केटमधून खाऊ घेतला. आता म्हंटलं
रात्रभर बाहेर भटकत राहू. विमानतळाच्या बाहेर येऊन बघितले तर नादीला ( फिजी ) जाणारे एक विमान
रात्री उशीरा होते. म्हंटले तोपर्यंत तरी आत बसता येईल.
बॅगेज सर्व्हीस वाला मात्र काऊंटर बंद करून गेला होता. त्या विमानाचे चेक इन संपत आले होते. लास्ट अँड फायनल कॉल सुरु होते. मी वरच्या मजल्यावर गेलो. ऑकलंडला उतरलेले पहिले विमान तिथे अजूनही ठेवलेले
आहे. ते बघत बसलो. आणि मला तेवढ्यात एक ऑब्झरव्हेटरी दिसली.
उघडी आहे का बघू म्हणत तिथे गेलो, तर तिथला थाट काय वर्णावा. विमानतळाच्या दिशेने संपूर्ण काचेची भिंत
असलेली ती जागा. बसायला अत्यंत आरामदायी सोफा सेट्स आहेत तिथे. ( विनामूल्य प्रवेश आहे तिथे ) अगदी
अपर क्लास लाऊंजमधे असतो, तसे डेकॉर आहे.
शेवटचे नादीला जाणारे विमान टेक ऑफ करायच्या तयारीत होते. ते बघितले. ऑकलंडचा विमानतळ छोटासा असला तरी रम्य आहे आणि समोर विस्तीर्ण भाग मोकळा आहे. ते दृष्य बघत बसलो. माझ्या सोबत आणखी एक फॅमिली तिथे होती. त्यातल्या छोट्या मूलीला पत्ते खेळायसाठी पार्टनर हवा होता. बाकीचे सगळे आडवे झालेले.
मग ती किवी छोकरी आणि मी, बराच वेळ पत्ते खेळलो. काय तो डाव, मला शेवटपर्यंत कळला नाही. माझ्या हातातले पत्ते बघून तीच मला कुठला पत्ता टाकायचा ते सांगत होती.
मधेच तिला लहर आली म्हणून खाली पण जाऊन आलो. संपूर्ण विमानतळावर शुकशुकाट. जणू काही तो आम्हाला आंदणच दिल्यासारखा. क्वचित एखादा सुरक्षा रक्षक दिसला न दिसला ( कॅमेरे नक्कीच असणार म्हणा )
मधल्या मजल्यावर पण झोपण्यासाठी जागा होती.
रात्रीची विमाने नव्हती पण एअर न्यू झीलंडच्या विमानांच्या देखभालीचे काम सुरु होते.
मग मलाच काचले म्हणून पहाटे ३ वाजता मैत्रिणीला फोन केला. ती फोनची वाट बघत जागीच होती. जवळची सर्व
कार्ड्स आणि नाणी संपवून टाकली फोनवर.
असे गाढ विश्वासाचे वातावरण मी न्यू झीलंड मधे अनेकवेळा अनुभवतो. पहाटे पहिल्या विमानाच्या आधी
सर्व स्टाफ आला. आणि एअरपोर्ट जागा झाला. तिथेच गरम पाण्याचा शॉवरही घ्यायची सोय आहे. ताजा तवाना होऊन, लेकीला फोन केला आणि बॅग ताब्यात घेऊन काऊंटर वर चेक इन ला गेलो.
समाप्त...
मजा आली वाचून... अशा
मजा आली वाचून...
अशा रात्रींची नशा काही औरच असते.
मस्त लिहीलय. शीर्षक ही छानच!
मस्त लिहीलय. शीर्षक ही छानच!
छान लिहिले आहे डोळ्या समोर
छान लिहिले आहे
डोळ्या समोर प्रसंग घडतायत असे वर्णन .
दिनेशदा, भारीच ! मी एकदा
दिनेशदा, भारीच !
मी एकदा दिल्ली विमानतळावर जागून काढलेली रात्र आठवली.
तसेच जपानमधुन भारतात येताना अनेकवेळा मी पुर्ण रात्र जागून आवराआवरी करत असे,
आणि पहाटेची रेल्वे पकडून विमानतळावर जात असे. नंतर विमानात गाढ झोपणे.
याला अजुन एक कारण, सकाळी वेळेवर जाग येईल का अशी भिती असायची
मस्त लिहिलंय. प्रत्येक प्रसंग
मस्त लिहिलंय.
प्रत्येक प्रसंग एकदम हटके आणि कदाचित त्यामुळेच आयुष्यभर लक्षात रहाणारा !
दिनेश.... ~ अगदी "चित्रमय
दिनेश....
~ अगदी "चित्रमय जगत' अंक हाती घेऊन वाचत आहे एका प्रवाशाची डायरी....अनेक आठवणींनी खच्चून भरलेली... असे वाटत राहिले आणि शेवटी "समाप्त' विशेषण आल्यावर वाटू लागले की ते तिथे नसायला हवे आणि त्याऐवजी "क्रमशः" चे आयोजन करायला हवे होते....इतका आनंद मिळाला मला. एरव्ही प्रवासवर्णन हा प्रकार खूप वाचला आहे; तरीही ही रात्रछटा....(विशेषतः सिडने वातावरणातील तो काहीसा नकोसा वाटणारा अनुभव) फार सुंदरतेने नटली आहे....फोटो आल्बम पाहात आहे असेच वाटत राहिले.
मामांच्या प्रतिसादाशी
मामांच्या प्रतिसादाशी सहमत.अतिशय सुरेख लेख.
छान.
छान.
मला आधी शिर्षक पाहून जुन्या
मला आधी शिर्षक पाहून जुन्या मराठी चित्रपटावर लेख आहे असे वाटले.
https://www.youtube.com/watch?v=N44vD2LhU2I
आभार सर्वांचे. हे सर्व
आभार सर्वांचे. हे सर्व लिहिताना मलाही खुप छान वाटत होते.. खरे तर या रात्रींसोबत माझ्या मित्रमैत्रिंणींच्याही आठवणी आहेत. काही जण अजून संपर्कात आहेत.. तर काही हरवले.
महेश.. तो माझा अत्यंत आवडीचा चित्रपट !
छान लिहिलेय
छान लिहिलेय
खुप भारी लिहीलंय! वाचताना
खुप भारी लिहीलंय! वाचताना त्या रात्री आम्ही पण अनुभवल्यासारखे वाटलं!
दिनेश दा, मस्त मजा आली हे
दिनेश दा,
मस्त मजा आली हे ललित वाचुन.
खुप छान लिहिले आहे तुम्ही. >>खरे तर या रात्रींसोबत माझ्या मित्रमैत्रिंणींच्याही आठवणी आहेत. काही जण अजून संपर्कात आहेत.. तर काही हरवले << लिहा की तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या पण आठवणी.
मस्त.. एका पेक्षा एक
मस्त.. एका पेक्षा एक किस्से... खुप छान लिहीलय..
वा अतिशय सुरेख लिहिलंय, मी
वा अतिशय सुरेख लिहिलंय, मी ही त्या वातावरणात जाऊन आले .:)
मस्त अनुभव दिनेशदा. मजा आली
मस्त अनुभव दिनेशदा. मजा आली वाचायला.
मस्त वाटलं वाचून
मस्त वाटलं वाचून दिनेशदा.
काही आठवणी विसरता विसरत नाही आपण..
शीर्षकामुळे लेखक कोण याची
शीर्षकामुळे लेखक कोण याची पुन्हा खात्री करुन घेतली, मग वाचायचा धीर आला.
पहिल्या वाक्यालाच सलाम घातला, मला केवळ पाच तास झोप म्हणजे जागरणासारखीच. फक्त अधेमधे जागरणेही चालतात.
छान सूर लागलाय आठवणींचा.
छान अनुभव. एअरपोर्ट्सबद्दल
छान अनुभव. एअरपोर्ट्सबद्दल अगदी अगदी.
खुपच मस्त लिहिलयं दा.. तिथे
खुपच मस्त लिहिलयं दा.. तिथे असल्याचा फिल आला..
रात्र, मित्रमैत्रीणी, गप्पा.. खुप सही कॉम्बीनेशन आहे हे सारचं..
माझेपन काही अनुभव आठवले
फार सुंदर लेख, छान फिरवून
फार सुंदर लेख, छान फिरवून आणलंत आम्हालाही सगळीकडे, मस्त प्रसन्न वाटलं.
छान लेख, 'अविदितगतयामा
छान लेख, 'अविदितगतयामा रात्रिरेवं व्यरंसीत्' आठवून गेले.
फारच छान दिनेशदा.... मस्त
फारच छान दिनेशदा....
मस्त वाटलं वाचुन...
आर्टिकल शीप करत असताना अश्या अनेक रात्री ऑडिट च्या नावा खाली जागुन काढल्या मित्र्मैत्रिणीं बरोबर... त्या सगळ्या आठवल्या......
तुम्ही फार सुंदर लिहिता... एकदम प्रांजळ
४ रात्री वाचल्यात … ती जव्हार
४ रात्री वाचल्यात …
ती जव्हार वाली वाचतांना काटा आला अंगावर
आणि मममिमं वाली अप्रतिम
मस्त लिहीलयत दिनेशदा.
मस्त लिहीलयत दिनेशदा.
खूप छान लिहिलंयत! रंगून गेले
खूप छान लिहिलंयत! रंगून गेले तुमच्या लिखाणात.
मस्त लिहिलय. सगळ्या आठवणी
मस्त लिहिलय. सगळ्या आठवणी सुरेख.
खूप छान उतरल्या आहेत आठवणी
खूप छान उतरल्या आहेत आठवणी तुमच्या लेखणीतून.
अगदी साध्या, सोप्या शब्दांत मांडूनही वाचकाला खिळवून टाकण्याची आणि डोळ्यांसमोर प्रसंगानुरुप स्लाईड शो रन करत रहाण्याची तुमची खासियत, एकदम लाजवाब !!
खुप छान वाटलं सगळ्यांच्या
खुप छान वाटलं सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून..
खरंतर या अगदी वैयक्तीक आठवणी.. कुणाला का वाचाव्याश्या वाटतील असे वाटत होते, तरीही लिहून काढल्या, कारण असे लिहिल्यावर या मित्रमैत्रिणींच्या आठवणीने आजवर जसे व्याकूळ व्हायला होत होते, तसे आता होणार नाही. या लिखाणाने या आठवणी ताज्यातवान्या तर झाल्याच शिवाय मला पुनः प्रत्ययाचा आनंदसुद्धा देऊन गेल्या.
खूप छान लिहिलय. अनोखे अनुभव
खूप छान लिहिलय. अनोखे अनुभव आणि मस्त वर्णन शैली!
Pages