सैराट - अफाट स्टोरी टेलींग

Submitted by सोकाजीरावत्रिलोकेकर on 14 May, 2016 - 02:38

अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा येतो, तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला...सैराट बघितला तेव्हा!

प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून. सिनेमा हे एक माध्यम, प्रभावी माध्यम म्हणून संवेदनशीलतेने 'स्टोरी टेलींग' साठी आजपर्यंत बर्‍याच जणांनी हाताळले आहे. अलीकडच्या काळात विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप वगैरे सारखे कलाकार हे माध्यम फार हुकामातीने वापरताना दिसतात. मराठी चित्रपटात हे अभावानेच अनुभवायला मिळतं!

नागराज मंजुळे, सिनेमा हे माध्यम 'स्टोरी टेलींग' साठी किंवा मनातली खळबळ अतिशय प्रभावीपणे मांडण्यासाठी कसे हुकुमतीने वापरता येते ह्याची जाणीव करून देतो सैराटमधून. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कसलाही आव न आणता निरागस गोष्ट सांगण्याची शैली, सिनेमा हे माध्यम किती प्रभावी आहे आणि किती लवचिकतेने संवेदनशीलता अभिव्यक्त करण्यासाठी कसे प्रभावीपणे वापरता येते ह्याचे उदाहरण म्हणजे सैराट!

'नीयो-रियालिझम' ही एक सिनेमाशैली आहे जी नागराजने त्याच्या आधीच्या सिनेमांमधे वापरली आहे. सैराटमधे त्या शैलीला थोडा व्यावसायिक तडका देऊन एक भन्नाट प्रयोग यशस्वीरित्या हाताळला आहे. त्यामुळे सिनेमाची ऊंची वाढली आहे. प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून यशाची गणिते आखून तसं मुद्दाम केलं असं म्हणता येऊ शकेल. त्यात काही वावगं वाटून घ्यायची गरज नसावी कारण तो व्यावसायिक सिनेमा आहे आणि त्यातून पैसा कामावणे हा मुख्य उद्देश आहेच आणि असणारच! महत्वाचे म्हणजे हा प्रयोग मराठीत झालाय आणि यशस्वीरित्या हाताळला जाऊन प्रभावी ठरलाय.

करमाळा तालुक्यातल्या गावांमधला निसर्ग वापरून केलेले चित्रीकरण आणि त्याने नटलेला सिनेमाचा कॅनव्हास पाहून माझे आजोळ असलेल्या करमाळयाचे हे रूप माझ्यासाठी अनपेक्षीत होते. (त्या वास्तवाची जाण करून देणारा म्हणून वास्तववादी असं म्हणण्याचा मोह आवरता येत नाहीयेय Wink )

कलाकारनिवड अतिशय समर्पक, ती नागराजाची खासियत आहे हे आता कळले आहे. सिनेमा वास्तवादर्शी होण्यासाठी वास्तव जगणारी माणसं निवडण्याची कल्पकता सिनेमातली प्रात्र खरी आणि वास्तव वाटायला लावतात. रिन्कु राजगुरुने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिची निवड आणि नागराजाची कलाकार निवडीची हातोटी किती सार्थ आहे ह्याला एका प्रकारे दुजोराच दिला आहे. सिनेमातली प्रत्येक पात्रनिवड अफलातून आहे. प्रत्येक पात्राची वेगळी आणि स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. (प्रदीप उर्फ लंगड्याबद्दल काही इथे)

सिनेमाची कथा ३ टप्प्यांमध्ये घडते. तिन्ही टप्पे एकमेकांशी गुंफलेले आहेत. तिन्ही टप्पे ज्या ठिकाणी एकत्र गुंफले जातात ते सांधे अतिशय प्रभावीपणे जुळवले आहेत. प्रत्येक टप्प्याचे सिनेमाच्या गोष्टीत एक स्वतंत्र महत्व आणि स्थान आहे. त्या त्या महत्वानुसार प्रत्येक ट्प्प्याला वेळ दिला आहे आणि तो अतिशय योग्य आहे. नागराजाच्या स्टोरी टेलींग कलेच्या अफाट क्षमतेचा तो महत्वाचा घटक आहे. पहिल्या ट्प्प्यात एक छान, निरागस प्रेमकाहाणी फुलते जी सिनेमाची पाया भक्कम करते. चित्रपटाचा कळस, तिसरा टप्पा, चपखल कळस होण्यासाठी ही भक्कम पायाभरणी किती आवश्यक होती हे सिनेमाने कळसाध्याय गाठल्यावरच कळते.

मधला टप्पा, पहिल्या ट्प्प्याला एकदम व्यत्यास देऊन स्वप्नातून एकदम वास्तवात आणतो आणि वास्तव किती खडतर असतं हे परखडपणे दाखवतो. इथे डोळ्यात अंजन घालण्याचा कसलाही अभिनिवेश नाही. ही गोष्ट आहे आणि वास्तवाशी निगडीत आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे. अतिशय साधी प्रेमकहाणी गोड शेवट असलेली (गल्लाभरू) करायची असती तर मधल्या ट्प्प्याची गरज नव्हती. इथे नीयो-रियालिझम वापरून नागराज वेगळेपण सिद्ध करतो.

पण कळस आहे तो गोष्तीतला तिसरा टप्पा. दुसर्‍या ट्प्प्यातला वास्तवादर्शीपणा दाखवूनही गोड शेवट असलेला (गल्लाभरू) करता आला असता. पण संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला सिनेमा हे माध्यम प्रभावीपणे वापराण्याचे कसब असलेल्या नागराजचे वेगळेपण सिद्ध होते ते ह्या ट्प्प्यात! ज्या पद्धतीने शेवट चित्रीत केलाय तो शेवट सानकन कानाखाली वाजवलेली चपराक असते.

त्या शेवटाचे कल्पक सादरीकरण हे रूपक आहे, त्या चपराकीने आलेल्या सुन्नपणाचे, ज्याने बधीरता येऊन कान बंद होऊन येते आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपण!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

ही गोष्ट आणि आहे आणि वास्तवाशी निगडीत आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे.

>> इथे जरा टायपो झालाय बहुतेक.

(प्रदीप उर्फ लंगड्याबद्दल काही इथे)

>> _______/\_______

सोकाजीराव....

~ कित्येक वर्षानंतर "....तो शेवट सानकन कानाखाली वाजवलेली चपराक असते...." अशी चपराक बसल्यामुळे सुन्न होऊनच बाहेर आलो होतो. श्याम बेनेगल यांच्या "निशांत..." च्या सुन्नतेनंतरच बहुधा.

डझनावरी समीक्षणांची पानेच्यापाने वाचली....मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच....त्यामुळे को-या मनाने हे चित्तार असं काही हृदयावर उतरले आहे की त्याबद्दल डावेउजवे करायची इच्छाच राहिली नाही....त्या सुन्नतेच सारे काही आले आहे. छान लिहिले आहे तुम्ही.

छान!
सैराट वर एवढे सगळे धागे आणि प्रतिसाद येत आहेत त्यावरुनच कळत आहे की सैराट लोकांच्या मनात किती खोलवर वर रुजला जात आहे.

छान लिहिलंय! आवडलंय!

अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा येतो, तो कधी अनुभवलाय?
>>
सोशल मिडीयावर सिनेमाचा उहापोह होऊन सुद्धा शेवट परिणाम करतोच.

*सैराट सैराट*

*लेखक प्रदीप ढोबळे ९८२०३५०७५८*

७.२५ झाले. ग्लोमक्स माल. खारघर. संध्याकाळी ७.२० चा शो. डोअरकीपर दरवाजा उघडीत नव्हता. म्हणून मुद्दामून विचारले. “ काय आधीचा शो संपला नाही ?” “संपलाय. हाउसकीपिंग चालू आहे.” मी: “एवढा वेळ” तो बोलला “ आम्हालाही एवढ हाउस कीपिंग कधी कराव लागल नाही . अहो प्रत्येक शो हाउसफूल. प्रेक्षक चिप्स, समोसा, पॉपकान खाऊन खूप कचरा करतात. अगदी झोपडपट्टी पासून लोक येतायेत.” “अस होय म्हणजे सैराट आर्थिक मागासवर्गीय ह्यांचेही आकर्षण केंद्र बनलाय.” सैराट बद्दलची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचली. टाकीज मध्ये परिवारासोबत स्थानापन्न झालो आणि पडद्यावर सैराट सुरु झाला.

* सैराट म्हणजे आपणास पटते तसे वागणे; कोण काय म्हणेल ह्याची तमा न बाळगता. दुनियादारी गेली उडत.* माणसाच अस वागण हे कधी नैसर्गिक असत तर कधी समाज व्यवस्थेच्या अहंभावातून!! आर्ची परश्या सैराट आहेत – प्रेमासाठी. आणि प्रेम हि एक नैसर्गिक भावना आहे. सैराट आहेत ते एकदुसऱ्याला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी. तेवढाच सैराट प्रिन्सपण आहे. प्रिन्स आर्चीचा भाऊ. तो सैराट होतो जातीय अहंकारातून, जातीय श्रेष्ठत्वातून. म्हणून सराच्या गालफटात तो सहज झापड मारतो. परश्या आर्चीला बिलगलेले पाहून परश्याला मारत मारत त्याच्या घरासमोर आणतो व त्याच्या बापाला ताकीद देतो – उद्याच्या उद्या गाव सोडा. सोळा सतरा वर्षाच्या चुतीया प्रिन्सच्या पायावर डोके ठेवणारा आणि आपल्याच पोराला कानफटीत मारणारा – पराश्याचा बापही सैराट आहे. एका पाटलाच्या पोराच्या पायावर .. काय चूक आहे, कोण चूक आहे ...ह्याचा कुठलाच विचार न करता डोक ठेवणारा कोळी जातीतील पराश्याचा बाप – हि जाती व्यवस्थेची उतरंड नागराज मंजुळेनी बखुबी प्रदर्शित केली आहे. दिल्ली असो कि हैद्राबाद. एकटदुकट स्त्री दिसली कि तिच्यावर घाला घालणारी नराधम प्रवृत्ती हि सैराट आहे. तर जीवापाड प्रेम करणाऱ्या आर्चीला आपल्याच बॉससोबत बोलताना पाहून तिच्याशी भांडणारा ; तिला झापड मारणारा संशयी पुरुषी परश्या हि सैराटच आहे.

बारावीत ५५ टक्के मार्क असणाऱ्या मराठा आर्चीला ७२ टक्के मार्क घेणारा इमाव कोळी परश्या आवडतो. वाचन करणारा, सुंदर कविता लिहिणारा, एकहाती क्रिकेटची म्याच आपल्या गावच्या संघाला जिंकून देणारा, एका किकमध्ये बुलेट सुरु करणारा , आर्चीपेक्षा थोडा उजळ परश्या, कुण्या मुलीस न आवडला तर नवलच! तसाच तो आर्चीला हि आवडतो. आणि म्हणूनच आर्ची परश्याच्या आईला आत्या व परश्याला आय लव यू अगदी सहजगत्या म्हणते. पण हे एवढ सहज आहे का ? हजारो वर्षाची भारतीय जातीव्यवस्था ह्यास परवानगी देते का ? प्रेम असेलही पण प्रेम व्यक्त करता येऊ शकता का ? प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र ह्या देशात आहे का ? एकवीस्व्या शतकातही प्रेम जातीच्या भिंती ओलांडू शकते का ? हिंदू म्हणून धर्म जरी एक असला तरी जातीच्या कुंपणाच्या बाहेर प्रेम करता येत का ? *आर्ची अनभिज्ञ आहे आणि परश्या अचंभित !. ह्या I LOVE YOU मुळे फक्त परश्याच अचंभित होत नाही तर अचंभित होते येथील पुरुषसत्ताक समाज व्ययस्था. एवढा बोल्डनेस ... आणि तोही मुलीमध्ये .. ग्रामीण मुलीमध्ये ... मराठा पाटलाच्या मुलीमध्ये. --- अख्खी समाज व्यवस्था चरचर फाटून गेली. जाती व्यवस्थेतील दबंग व पुरुष सत्ताकाचे प्रहरी घाबरून गेले. त्यांच्या पायाखाली भूकंप झाला. भारतीय संविधानाच्या ताकतीने १८ वर्षाची पोरगी देशाचा राष्ट्रपती निवडू शकते ; पण स्वतःचे जीवन कंठीत करण्यासाठी पती निवडायचा तिचा अधिकार येथील समाज व्यवस्था नाकारते. कालजीर्ण अश्या सडक्या जाती व्यवस्थेवर बिनधास्तपणे प्रेमाच्या ताकतीने आर्चीने मारलेली लात म्हणजे तिचे शब्द : I LOVE YOU .*

आर्चीला माहित नाही कि पोलीसापेक्षा जबरदस्त असतात येथे सामाजिक पोलीस. पोलीसाची ताकद येते भारतीय कायद्यातून .. संविधानातून ; तर सामाजिक पोलिसाची ताकद येते हजारो वर्षाच्या समाज व्यवस्थेतून .. पुराणातून शास्त्रातून स्मृतीतून ... मनुस्मृतीतून ! .. जी प्रत्येकास सांगते , प्रतेकानी आपापल्या जातीला धरून , आपापली पायरी धरून मुकाटपणे जगले पाहिजे. पायरी सोडली तर मुडदा पडलाच म्हणून समजा. बाबासाहेब ANNIHILATION ऑफ CASTE मध्ये म्हणतात GO FOR INTERCASTE MARRIAGES. जाती मोडल्या तर भारत मजबूत राष्ट्र बनेल. पण महाभारत, कोळी कर्णाला, द्रौपदी स्वयंवरात भाग घेण्यासाठी नाकारत, कारण तू शुद्र आहेस; क्षत्रिय नाहीस. *परश्या कोळी व कर्ण कोळी दोघेही शूद्रच.* सामाजिक पोलीस म्हणजे पोरापोरींचे मायबाप भाऊ चुलते. आर्चीचा आमदार बाप , भाऊ प्रिन्स हे सामाजिक पोलीस आहेत. त्यांना माहित आहे कि ---- आहे ती समाज व्यवस्था टिकवली तरच आमच श्रेष्टत्व, आमची सत्ता कायम राहील. मग प्रसंगी ह्या सत्तेसाठी आपल्या पोटच्या पोरीचा बळी दिला तरी बेहतर ; आपल्या बहिणीचा गळा चिरावा लागला तरी बेहतर.

आर्ची-परश्याच प्रेम हे आता निव्वळ प्रेम न राहता , ते येथील हजारो वर्षाच्या जुनाट जाती व्यवस्थेला केलेलं आव्हान असत. आणि म्हणूनच संघर्ष पटतो. आर्ची परश्यात समोरासमोर संघर्षाला भिडण्याची ताकत नसते, त्यामुळे ते पळ काढतात. ह्यात साथ देतात त्यांचे मित्र सलीम व बनसोडे. *आर्चीचा बाप सत्तेच्या ताक्तिनी परश्या-सलीम- बनसोडे त्रिकूटावर अपहरण व बलात्काराचा प्रयत्न हे खोटे आरोप लावतो. सत्तेचा हा गैरवापर मंग्या नामंजूर करतो. मंग्या , आर्चीचा आतेभाऊ, जो आधी ह्या प्रेमाच्या विरोधात असतो , तोही त्यांना पळून जाण्यात थोडीफार मदत करतो. प्रिन्सला बापाची सत्ता मिळणार; मंग्यास काय ? नुसत ‘मराठ’ म्हणून मोठेपणाच सोंग काढीत जगण्यापेक्षा सत्याला ... प्रेमाला साथ दिलेली बरी. मंग्या हा अप्रस्थापित मराठ्याचा प्रतिनिधी आहे. मंग्यातील हे हृदय परिवर्तन तरुण पिढीतील मराठा युवकांनी समजून घेतले पाहिजे.* आर्ची, परश्या , सलीम , बनसोडे , मंग्याचा थोडा सहभाग ; प्रिन्स ची मुजोरी व ताकत खतम करू शकते. हे सर्व मिळून प्रीन्स्ची फायरवाल छेदतात आणि आर्ची परश्या पडत झडत का होईना प्रिन्सच्या तावडीतून सुटतात. आजही गावागावात, तालुक्यात,जिल्ह्यात असे अनेक प्रिन्स दिसतात. ज्यांनी कायद्याला व लोकशाहीला आपली रखेल बनून ठेवली आहे. ह्या प्रिन्सच्या तावडीतून ह्या देशातील लोकशाही मुक्त करायची असेल तर महिला, ओबीसी, बीसी, अल्पसंख्यांक व मंग्यासारखे परिवर्तनवादी उच्चजातीय ह्यांनी एक होणे गरजेचे आहे. सैराटचा गल्ला भरतायत हीच ती मंडळी. जातीयवाद्यांनी तर WHATSAAPP व सोशल मेडीयाचा वापर करीत हा सिनेमा बघू नये म्हणून खूप अपप्रचार केला होता. परंतु न्यायप्रिय मराठी माणसांनी ह्या प्रचारास बळी न पडता , मराठी सिने स्तुष्टीतील सर्व रेकॉर्ड ब्रेंक करीत सैराटचा एक नवा इतिहास रचला . *सैराटचा गल्ला हा आता गल्ला न राहता कल्ला झालाय प्रस्थापितासाठी. सैराट च्या यशाच्या निमित्ताने बहुजन समाजाने जर आपली हि ताकत ओळखली व एकजुटीने महाराष्ट्राच्या वापरली तर ह्या महाराष्ट्रातील राजकारणातून नालायक प्रिन्स बाद होतील; आर्ची-परश्याच्या प्रेमाचा विजय होईल , परश्या-सलीमचा भाईचारा वाढेल, मंग्या-परश्या-बनसोडे ह्यांच्यातील सामाजिक सदभाव वाढेल.* धाक दपटशाही, दबंगपणा, घराणेशाही नष्ट होईल, संवैधानिक शक्तीचा संचार होईल,, कायद्याचे राज्य येईल, मानवता वाढेल, महाराष्ट्र बदलेल आणि मग देश हि बदलेल. सैराट निमित्त ठरेल.........

जय भारत जय संविधान.
प्रदीप ढोबळे ९८२०३५०७५८

https://www.facebook.com/amol.bhalerao2/posts/1081672765204829?pnref=story

pra-saad , धन्यवाद ही लिंक दाखवल्याबद्दल!

ही सरळ-सरळ चोरी आहे! लेख अक्षरशः ढापलाय, ह्यावर काय आणि कारवाई करता येइल ?

- (हताश आणि चिडलेला) सोकाजी

लेख आवडला.

ही सरळ-सरळ चोरी आहे! लेख अक्षरशः ढापलाय, ह्यावर काय आणि कारवाई करता येइल ? >>
वृत्तपत्रात देखिल अशा रितीने मजकूर जमवला जातो काय आजकाल. Angry
अशक्य दुर्दैवी आहे हे.
'माझे आजोळ' सारखे उल्लेख असताना देखिल अशी हिंमत केली जाते Angry