सृष्टी सौंदर्य

Submitted by salgaonkar.anup on 5 May, 2016 - 04:18

दूर आभाळाच्या देशात अनेक प-या राहत होत्या. सगळ्याच अगदी सुंदर, प्रसन्न आणि सदैव आनंदी.
या सगळ्यांत आपलं वेगळेपण जपत होती, ती सोनेरी केसांची परी. पांढरा शुभ्र पायघोळ झगा, गुलाबी गाल, लाल चुटूक ओठ आणि कुणालाही मोहून टाकतील असे लांबसडक मोकळे सोनेरी केस.
अप्रतिम सौंदर्य आणि सगळ्यांना आपलसं करेल असा उत्तम स्वभाव म्हणूनच ती सगळ्यात वेगळी असली तरी सगळ्यांची लाडकी.
एके दिवशी सगळ्या प-या मिळून वा-यासोबत आभाळी लपंडाव खेळत असतात. अनेक प-या स्वतः भोवती काळे पांढरे ढग गुंडाळून त्यात लपून बसतात.
वारा साऱ्या पऱ्यांचा शोध घेण्यासाठी सैरा -वैरा पळत सुटतो. सोनेरी केसांची परीही एका क्षणाचाही विलंब न करता मोठाल्या ढगात उडी मारते आणि स्वतःला लपवून घेते.
थोड्या वेळाने सोनेरी परी ज्या ढगात लपून बसलीय त्य ढगात हळू हळू पाणी शिरू लागते आणि तो ढग पाण्याने जड होऊ लागतो. एकटी सोनेरी परी फार गोंधळून जाते.
बिचारी त्या ढगातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करते पण तिला मार्गच सापडत नाही.
प-यांचा शोध घेणारी वा-याची एक जोरदार थंड झुळूक येते आणि ढगात साठलेले पाणी थेंब बनून धरतीवर झेप घेते.
एका थेंबात अडकून सोनेरी परीही प्रचंड वेगाने जमिनीकडे झेपावते.
तो थेंब निळ्याशार समुद्रात पडतो. इतका विशाल समुद्र, त्यातले सागरी जीव या सा-याला घाबरून,
या सगळ्यांपासून स्वतःचा जीव वाचवत सोनेरी परी एका शिंपल्यात जाऊन बसते. हळूहळू तो शिंपला आपले तोंड बंद करतो आणि परी त्यात कायमची अडकून पडते.
आपण अडकून पडलोय या दु:खापेक्षा आपलं सौंदर्य अबाधित राहावं म्हणून देवाकडे प्रार्थना करते.
अनेक वर्ष उलटून जातात आणि एके दिवशी तो शिंपला आपले तोंड उघडतो तेव्हा अडकून पडलेल्या त्या सोनेरी परीचा एक सुंदरसा मोती झालेला असतो.
आजही समुद्रतळाशी अनेक शिंपल्यात मोती सापडतात. स्वतःच्या अपरिमित सौंदर्याने आपल्याला मोहात पाडतात.
म्हणूनच मित्रांनो सृष्टी सौंदर्याने जे आपल्याला मिळेल ते आपण जपायला हवं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users