सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक
सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर
सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .
सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .
सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .
सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .
सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!
सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .
सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!
सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस
सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड
सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड
सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात
सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक
सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम
सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!
सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक
सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस
सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस
सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद
सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!
सायकलीशी जडले नाते २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .
सायकलीशी जडले नाते २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना
सायकलीशी जडले नाते २५: आठवे शतक
सायकलीशी जडले नाते २६: २०१५ च्या लदाख़ सायकल प्रवासाची तयारी
सायकलीशी जडले नाते २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .
सायकलीशी जडले नाते २८: परत नवीन सुरुवात
नवीन मोहिमेच्या प्रॅक्टिस राईडस
ऑक्टोबरच्या शेवटी सायकलिंग नियमित करत राहिलो. मोठ्या राईडची घाई न करता छोट्या राईडस एंजॉय करत राहिलो. दोन आठवडे नियमित सायकल चालवत राहिलो तेव्हा ब-याच प्रमाणात लय परत मिळत गेली. लवकरच मोठ्या राईडस सुरू केल्या. ह्यावेळी मनात जी योजना सुरू आहे ती सलग ८- १० दिवस सायकल चालवण्याची आहे. म्हणून एक दिवसाचा स्टॅमिना उपयोगी पडणार नाही. अनेक दिवस मोठी राईड करण्याचा सराव करावा लागेल. १ नोव्हेंबरला ब-याच गॅपनंतर पहिलं अर्धशतक केलं. सायकलवर अर्धशतक पूर्ण केल्यानंतर होणारा तो आनंद! पुणे- नाशिक रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या चास कमान धरणापर्यंत राईड केली. इच्छा तर शतक करण्याचीच होती, पण शरीराचं ऐकून पाय आवरले. वेग अपेक्षेपेक्षा कमी राहिला. पण खूप मजा आली.
एक दिवस थांबून परत दोन मोठ्या राईडस केल्या. दुस-या राईडच्या वेळेस जास्त थकलो आणि घामसुद्धा जास्त आला. म्हणजेच शरीर अजून पूर्ण रिकव्हर झालेलं नाहीय. शरीराला आधीसारखा स्टॅमिना प्राप्त करण्यासाठी आणखी वेळ लागेल. तब्येतही इतकी चांगली वाटत नाहीय. बहुतेक शरीराचंच ऐकावं लागणार. पण हे असूनही राईडस सुरू ठेवल्या. मध्ये काही दिवस गॅपही पडत होती. योगासन- प्राणायामही सुरू ठेवले. नोव्हेंबरच्या शेवटी एक शतक करायचा विचार केला. शरीर काहीही म्हणत असलं तरी आपलं मन उड्या मारतच राहतं. त्यामुळेच चक्क वाटतंय की, दहा दिवस सलग शतक करण्याची मोहीम करता येऊ शकेल. पण एका खडतर राईडने पुन: विचार करायला भाग पाडलं. एका नेहमीच्या रस्त्यावर शतक करायला निघालो. पहिले दोन तास तर खूप सोपे गेले. बत्तीस किलोमीटर पूर्ण झाले. मग पंक्चरने सायकलला ब्रेक लावले. ह्याची तशी वाटच बघत होतो. ब-याच दिवसांनी पंक्चर काढलं. पण नीट झालं नाही. थोड्याच वेळाने परत पंक्चर. ह्यावेळी जरा जास्त काळजीपूर्वक बनवलं. आता सॉफ्ट हँड्सने ट्युब फिट करता येते आहे. टायर आतमधून तपासलं. ह्यावेळी दुस-या प्रयत्नात नीट झालं. पणा मला पंक्चर नीट शिकण्यासाठी अजून बराच प्रयत्न करावा लागेल. शतकाचा विचार सोडून सायकल वळवली. नंतर शेवटचे वीस किलोमीटर प्रचंड अवघड गेले. पंक्चरपेक्षा स्टॅमिना कमी असल्यामुळेच जास्त त्रास झाला. कसेबसे ७० किलोमीटर पूर्ण झाले.
पण पंक्चरची मालिका थांबली नव्हती. दुस-या दिवशी परत पंक्चर! आणि तेही एकाच जागेच्या जवळ. असं वाटतंय की, काही काटा टायरमध्ये आला असणार. टायर बाहेरून तपासलं. खरंच एक लोखंडाचा बारीक तुकडा टायरमध्ये आला होता. आता नीट केलं तर परत पंक्चर झालं नाही. प्रत्येक राईडनंतर सायकलचे टायर बाहेरून तपासले पाहिजेत व काही लागलं असेल तर ते काढायला पाहिजे, हा धडा मिळाला. प्रत्येक वेळी हे बघायला पाहिजे. त्यामुळे पंक्चरची शक्यता कमी होणार. असो. पुढच्या दिवसांमध्येही राईडस सुरू ठेवल्या. मन खरंच जिद्दी असतं. शरीराने कितीही इशारे दिले, तरी मन मन-मानीच करतं! त्यामुळे राईडस सुरू ठेवल्या आणि मोठ्या राईडची योजनाही सुरू राहिली. आता परत पंक्चरने त्रास दिला नाही. हळु हळु स्टॅमिना वाढतो आहे. एकदा चढाच्या रस्त्यामध्ये डिहायड्रेशनचा त्रास झाला. वेग कमी आहे, पण राईडस करू शकतोय.
डिसेंबर उजाडला तेव्हा मोठ्या एक्सपिडिशनची योजना बनलेली आहे. ह्यावेळी कोंकणात जायचं आहे. लदाख़नंतर माझी पहिली मोठी मोहीम असेल- जर मला सलग सायकल चालवता आली तर. . . ६ डिसेंबरला निघायचं आहे. इथेही काही चुका केल्या. एक तर मोठ्या मोहिमेच्या काही दिवस आधी थोडा ब्रेक घ्यायला हवा होता. तो घेतला नाही. शरीराने दिलेल्या इशा-यांकडे दुर्लक्ष केलं. मनाची झेप तशीच असते. मन स्वप्न बघत असतं. ह्यावेळी स्वप्न बघितलं की, सलग आठ दिवस राईड करेन आणि तीसुद्धा लॅपटॉप सोबत ठेवून. पहाटे ५ ते दुपारी ३ पर्यंत राईड करेन आणि त्यानंतर लॉजवर मुक्काम करून लॅपटॉपवर माझं काम करत राहीन. त्यामुळे सुट्टी आणि काम दोन्ही सुरू राहील. . मनामध्ये शंकाकुशंका तर खूप आहेत. आणि प्रत्यक्ष सायकल सूरू करेपर्यंत त्या राहतीलच. बघूया. . .
अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग