आज मी २१ किलोमीटर सायकल चालवली. मी आज एक चूक केली कि आजच दिल्ली वरून आलो होतो. मनाली मध्ये एक दिवस थांबायला पाहिजे होते. शरीर अनुकूल होण्यासाठी.
सकाळी ५ वाजता अलार्म वाजला. मी उठलो ७ वाजता. तंबूच्या बाहेर येउन पाहिले तर एक गाय तंबूला चिकटूनच बसली होती. तंबू वरती शेन पण टाकले होते. मग मी ते धुवून घेतले. सामान बांधायला आणि ते सायकल वर चढवायला साडे आठ वाजले. नऊला तेथून निघालो.
आज सामान बांधतानी एक गोष्ट वेगळी केली. तंबूला पुढे हैन्दलबारला घट्ट बांधून घेतले. त्यामुळे मागच्या चाकावरचे वजन कमी होऊन ते पुढच्या चाकावर आले. एकप्रकारे संतुलन साधलं गेलं. कैरियरला बैग आणि झोपायची पिशवी लटकावली. त्यावरती हवा भरायचा पंप. काल खूप त्रास झाला होता. सर्व सामान सारखे एका बाजूला येत होते. आज पुढे गेल्यावरच कळेल कि सामान व्यवस्थित बांधले गेले आहे का ते.
काल माझे लक्ष्य होत मढी. पण 13 किमी आधीच थांबावे लागले. त्यामुळे स्वतालाच स्वताची लायकी कळली कि चढाला किती वेगाने सायकल चालवू शकतो ते. आज पण रोहतांग पर्यंत चढचं आहे. ते पण ३० किमी. वेळ लागणार १० तास. पण कालच्या पेक्षा आज मी ठनठणीत आहे म्हणून हे अंतर १० तास नाही तर ८ तासात पार करू शकतो. मी नऊ ला निघालो होतो. रोहतांग पर्यंत पोहोचायला पाच वाजतील. तिथून पुढे उतारच आहे. आणि रोहतांगच्या पुढे गाड्यांची गर्दी पण राहणार नाही. त्यामुळे कोकसर पर्यंत चे 22 किमी चे अंतर सहज पार करू शकतो.
काल सायकल चालवतानी, रोहतांग वरून लोकं येत होती. आज रोहतांगला जातानी दिसत होती. पण शेवटी तोच खेळखंडोबा. मी सायकल कधी रस्त्यावरून चालवायचो तर कधी गाडी आली कि रस्त्याच्या खाली घालायला लागायची. ओबड धोबड रस्त्यावरून चालवायला दम लागायचा.
चार किलोमीटर पुढे गेल्या वर एका चहाच्या टपरी वर थांबलो. गरमागरम चहा घेतला. इथे कोणी दुकान नाही टाकू शकत. म्हणून हे लोकं जीप ने सामान आणतात. टपरी लावतात आणि संध्याकाळ झाली कि परत सगळे सामान घेऊन घरी.
सायकल वरून चढाई करणे खूप अवघड असते. प्रत्येक पैडल मारतानी जीव जातो. पण अंतर सुद्धा कमी होते.
गुलाबा सोडल्या नंतर.. पुढे ९ किलोमीटर आल्यावर जरा आराम करायला थांबलो. वरती बघितले तर गाड्यांची लाइन लागली होती. पूर्ण रस्ता चक्काजाम झाला होता. अजून सुद्धा मढी ४ किलोमीटर दूर होते. हा चक्काजाम मढी पर्यंत तरी असणार हे नक्की होते.
मला सायकल चालवताना बघून लहानसहान पोर मोठ्यांनी ओरडायची. "अरे देखो साइकिल"
दम घ्यायला थांबलो तर लोकं मला घेरायची. आणि विचारपूस करायची.
कहां से आये हो? कहां जाओगे?
लद्दाख।
हे भगवान! कितने दिन में?
आठ दिन में।
हे भगवान! कितने जने हो?
अकेला। हे भगवान!
तेवढ्यात एक कार माझ्याजवळ येउन थांबली. मग काय त्याच्या बरोबर माझे बोलणे सुरु झाले.
‘‘हेलो, यू आर फ्रॉम?”
“दिल्ली।”
“व्हेयर आर यू गोइंग?”
“लद्दाख।”
“ओ माई गॉड! बाइ साइकिल?”
“मैं बहुत अच्छी हिन्दी बोल सकता हूं। अगर आप भी हिन्दी में बोल सकते हैं तो मुझसे हिन्दी में बात कीजिये। अगर आप हिन्दी नहीं बोल सकते तो क्षमा कीजिये, मैं आपकी भाषा नहीं समझ सकता।”
त्यांनी ओके ओके म्हणत बोलणे थांबवले.
ब्यास नदी च्या कडेला तर गाड्यांची तर जत्राचं भरली होती. वरती मढी पासून मोठी रांग होती. गाड्या ची रांग पुढे सरकत नाही म्हणून पर्यटकांनी तिथेच मस्ती करायला सुरुवात केली होती. जे पर्यटक सकाळी ६ वाजता मनाली तून निघाले होते रोहतांग कडे, ते इथेच अडकून पडले होते. त्यांची रोहतांग ला पोहोचण्याची शक्यता हि कमी होती.
इथेच जेवून घेतले. तितक्यात अजून एक सायकलवाला भेटला. सचिन !! मुंबई वरून आला होता.
लेह ला चालला होता. त्याच्या बरोबर माझे बोलणे झाले. तो कलाकार आहे. पुतळे बनवतो. तसेच सिनेमासाठी सेट पण डिझाईन करतो. तो पण व्यास पुलावर थांबला होता मग पुढे गेला.
छोट्या गाड्यांचे तर खूपच हाल होत होते आणि मोठ्या गाड्यांचे त्याहून जास्त. हिमाचल परिवहन मंडळाची उदयपुर हून कुल्लू ला जाणारी बस पूर्ण पणे अडकली होती. तिच्या पुढे एक हि गाडी नव्हती. पण तिच्या मागे गाड्यांची लाइन लागली होती. माझ्याकडे सायकल असतानी सुद्धा अर्धा तास लागला बाहेर पडायला.
एक वाजता मढी ला पोहोचलो. सगळी दुकाने बंद होती. शेवटी एक दुकान उघडी मिळाली ती पण हिमाचल पर्यटनाची. इथे फक्त चहा,आम्लेट आणि सैंडविच मिळत होते. खूप गर्दी होती. मग २ सैंडविच बांधून घेतले. इथे पहीले सगळे मिळायचे. खाण्यापासून तर ते झोपण्याच्या खोली पर्यंत.
असे म्हणतात कि इथे एकदा जज साहेब आले. त्यांच्या बाबतीत काहीतरी वाईट झाले. मग काय त्यांनी कायद्याचे डावपेच खेळले आणि आता असे हाल झालेत. आनन फानन मध्ये हिमाचल पर्यटन मंडळाने तंबू ठोकून खाण्याची व्यवस्था केली. त्यांचे रेस्ट हाउस पण आहेत. पण ते सगळे फुल असतात. जाऊ दे... पुढल्या वर्षी तरी काहीतरी सुधार होईल.
रोहतांग कडे वरती तोंड करून पाहिले तर ढग जमा झाले होते. इथून रोहतांग 16 किलोमीटर होते. मला ५ तास तरी लागणार. आता २ वाजले होते. त्यामुळे पुढे जाऊन काही फायदा नाही. आज इथेच थांबावे. तितक्यात मुंबई चा सायकलस्वार सचिन पण तिथे आला. त्याला पण आज इथेच थांबायचे होते. झोपायला खोली भेटली नाही म्हणून आपला तंबू लावायला सुरुवात केली. सचिन कडे तंबू नव्हता पण झोपायची पिशवी होती.
असल्या सायकलींना कैरियर नसते. पण मी ते लाऊन घेतले होते. सचिन ने पण लावले होते. पण माझे कैरियर लावायची पद्धत वेगळी होती. मी मागच्या चिमत्याला होल पाडून त्यात कैरियर बसवले होते. तर सचिन ने मागच्या चाकाच्या एक्सलं वरतीच कैरियर फिट केले होते. त्यामुळे झाले काय तर मागच्या चाकाच्या डिस्क ब्रेक ची वायर वाकडी होऊन कैरियर च्या खाली आली होती. त्यामुळे ब्रेक लागणे अशक्य होते. मैक्यानिक चे लक्ष्य फक्त कैरियर कडे होते आणि असेच चालू कैरियर बसवून सचिन ला चालते केले होते. ह्या गोष्टी मुले सचिन पण चिंतेत होता. कारण रोहतांग सोडल्या नंतर ब्रेक ची खूप आवश्यता होती.
मग मी सचिन ला सांगितले कि आपण कैरियर काढून तार सरळ करू. परत कैरियर बसू मग ब्रेक चालू होईल. तुला पुढच्या ब्रेक वर अवलंबून रहायची आवश्यकता भासणार नाही. मग काय पंधरा मिनिटात त्याला ब्रेक ठीक करून दिला. सचिन म्हणाला तू नक्कीच इंजिनीअर आहेस. पण कोणता?
मी म्हणालो एवढा ब्रेक ठीक करून दिला. आता मला नाही वाटत कि मला काय सांगायची गरज आहे ते. तरी सांगतो रेल्वे मध्ये मैक्यनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.
गुलाबा मध्ये तंबू
रोहतांग च्या रस्त्याला खायची प्यायची व्यवस्था
इथून मढी ४ किलोमीटर दूर आहे.
चक्काजाम
सरदारजी खूप खुश झाला..सायकलवर लडाखला जाणाऱ्या बरोबर फोटो काढून
व्यास नदी
मढी
मढी पासून दिसणारी गाड्यांची लाइन
मढी मध्ये लावलेला तंबू आणि मी
(क्रमशः)