मेंदू, भावना व वर्तणूक : भाग २

Submitted by मंजूताई on 15 April, 2016 - 09:53

आधी म्हटल्याप्रमाणे आपला मेंदू एक सामाजिक संस्था आहे. प्रत्येक सेल्सची जागा ठरलेली आहे, अचूक कामाची विभागणी, कामाच्या स्वरूपानुरूप कर्मचाऱ्यांची संख्या असते. गंमत म्हणजे त्यांच्यात ना स्पर्धा असते ना भांडणं ! निमूटपणे आपआपलं स्वशिस्तीत काम करत असतात. असा हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव ‘मेंदू’ म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. अमेरिकन न्युरॉलॉजिस्ट ऑलीव्हर सॅक्स ह्यांनी ‘न्युरॉलॉजी ऑफ आयडेंटिटी’ संकल्पना मांडली आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत व त्या पुस्तकांवरून सिनेमेही बनवल्या गेलेत. ‘अवेकनिंग्ज’ हा पार्किसन रोगावर बनवलेला अप्रतिम चित्रपट ज्यात सॅक्सने भूमिकाही केली आहे,
मेंदू जो आपल्याला जन्मतः मिळाला आहे तो एखाद्या संगणक/फोन मधलं हार्ड वेअर आहे. मुलाचं व्यक्तिमत्त्व कसे असावे तसे त्यात सॉफ्टवेअर्स आपल्याला टाकायचे आहेत म्हणजेच तसे त्याला संस्कार, अनुभव, शिकवण द्यायची आहे त्यावरून त्याचा भावनिक बुद्ध्यांक ( EQ )ठरणार आहे. आजचं न्युरो सायन्स सांगतं, ‘स्वभावाला औषध नाही’ असं धाडसी विधान करू नये. स्वभावात बदल घडवायचा असेल तर फ्रंटल लोबमध्ये असणारे नर्व्ह सेल्स सहकार्य करायला तत्पर असतात पण प्रश्न असा आहे की, आपण प्रयत्न करतो का ? पालकत्व म्हणजे अनुकरण! मुलं तुमचं अनुकरण करत असतं... तुम्ही चिडके आहात, तुमचं मुलंही चिडकं होईल.. आनंदी असाल, आनंदी होईल. आता कळीचा मुद्दा असा आहे की अॅप्स आपण निवडतो का ज्याप्रमाणे मोबाईल्सचे निवडतो? आपण जसा एखादा मोबाईल विकत घेतो, त्यात काही गोष्टी असतातच. मात्र आपल्या गरजेनुसार काही अॅप्स आपल्याला टाकावे लागतात. भावनिक बुद्धिमत्तेचेही तसेच आहे. हे अॅप्स म्हणजे ‘भावनिक कौशल्य’ ! आपल्या इथल्या शाळा मुलाच्या आयक्युची व्यवस्थित काळजी घेतात, आपलं अर्ध अधिक ओझं हलकं करतात. आयक्यु ही ऐंशी टक्के जन्मतःच मिळालेली देणगी आहे आणि आपल्या मेहनतीने वीस टक्के वाढवता येतो. ह्याच्या अगदी उलट प्रमाण भावनिक बुध्द्यांक्याचं आहे. हा जो ऐंशी टक्के भावनिक विकास होतो तो मुलाला मिळालेल्या वेगवेगळ्या अनुभवातून व अनुकरणातून. मेंदूत मिरर न्यूरॉन्स आहेत ( हे माकडांवर केलेल्या प्रयोगातून सिद्ध झालंय) म्हणजे जे बघतील, ऐकतील तसं ते ग्रहण करतील, शिकतील. अनेकदा आठवी नववीतील मुलांना तुम्ही स्वतः ची ओळख एखाद्या विशेषणासहित द्या असं सांगा. तर ही मुलगा/मुलगी नाव सांगते .......... मी आळशी आहे ... ! तो तशी ओळख सांगतो कारण घरी त्याला सतत तू आळशी आहेस, असे म्हणत असतात (अनुकरण). मुलांवर प्रभाव पडतो किंवा संस्कार होतात ते त्याच्या पालकाचे. पालकाच्या व्याख्येत कोण कोण येतं? आईबाबा, संपर्कात येणारे घरातले इतर लोकं, शेजारी, मित्र, शिक्षक आणि ह्या आधुनिक जगातील सोबती रेडिओ, टीव्ही, अन सोशल मीडिया! मेंदूतला एक विशिष्ट भाग उद्दीपित केला तर आपल्याला आनंद मिळतो व ती गोष्ट वारंवार करावीशी वाटते. म्हणून आपल्याला काय करायचंय तर सुखद, सकारात्मक अनुभव द्यायचेत.IMG_6545.jpg
भावनिक बुद्ध्यांक जन्मतः मिळालेला वीस टक्के आहे बाकी आपल्याला त्याची बांधणी/जोडणी करायची आहे ती आपल्याला ज्ञानेंद्रिये व मनेंद्रियाच्या साहाय्याने. अनुभवातून मुलं शिकणारेत पालकांना ही अवघड जबाबदारी पेलायची आहे, ह्या माया ‘जाल’ (इंटरनेट) युगात. मानसशास्त्रात नवीन नवीन शब्दांची भर पडतेय. आजची ही पिढी आहे ती ‘नेटीव’ तर आपण ‘इमिग्रेंटस’ आहोत. एका पाहणीत असे दिसून आले आहे की जी मुलं ही यंत्र वापरतात त्यांची एकाग्रता फक्त तीन ते पाच सेकंद टिकते. तुम्ही निरीक्षण केले तर लक्षात येईल की ह्या मिडीयाने मुलांवर काय आघात केले आहेत ...सीरियलमधली एक फ्रेम फक्त तीन सेकंदाची असते.....जास्त वेळ ते एक गोष्ट पाहू शकत नाही...... फटाफट मुलं चॅनेल बदलत असतात.... त्यांना खूप लवकर बोअर होतं.... हे घडतंय ते त्यांच्या मेंदूत झालेल्या रचनात्मक बदलामुळे आणि हे बदल घडताहेत आपल्या जीवनशैली/वर्तणुकी/वागणुकीमुळे .
इमोशनल कोशंट हा शब्द हल्लीच ऐकायला किंवा वापरात येतोय पण भावनिक हुशारी (इमोशनल इंटेलिजन्स) ही संकल्पना जवळपास सगळ्या धर्मात आहे, आपल्या जीवनशैलीत आहे व रोजच्या व्यवहारात आहे. आज ‘हर्ड इम्युनिटी’ (कळप/समूह बधिरता) संकल्पना रुजवण्याची गरज आहे. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर पोलियोचा डोस सरसकट सगळ्या पाच वर्षाखालील मुलांना दिला जातो, समूळ उच्चाटनाकरिता. मला माझ्या मुलाचा भाबु चांगला होण्यासाठी त्याचे वर म्हटल्याप्रमाणे मुलांचे जे अनेक पालक आहेत त्यांचा भाबु चांगला असायला हवा कारण मुलं ह्या सगळ्या पालकांच्या अनुकरणातून शिकणार आहेत. हा विचार प्रत्येक पालकाने करायचा आहे, सांघिक पालकत्व अशी मोहीम/योजना राबवल्या जायला हवी. त्यासाठी ‘सेतू’ हे एक उत्तम व्यासपीठ आहे अशी अनेक व्यासपीठ तयार झाली पाहिजेत. आम्ही मुलांसाठी कार्यशाळा घेऊ लागलो व असे लक्षात आले की मुलांमध्ये ‘पिपल्स स्किल’ चा अभाव आहे त्यामुळे नोकरी मिळत नाही किंवा नोकरी टिकवू शकत नाही. IQ शाळेशी संबंधित आहे व EQ ( Emotional Quotient) व SQ (Spiritual Quotient ) तुमच्या जीवनाशी, जीवनशैलीशी निगडित आहे. मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे, असे आपण म्हणतो म्हणजेच त्याला अनेक प्रकारची नाती सांभाळावी लागतात. आजकाल आपण तासनतास दुसर्याशी सोशल मीडियावर गप्पा मारतो पण समोरासमोर आल्यावर काय बोलावं सुचत नाही, गप्पांना कुठून सुरुवात करावी समजत नाही. सणसमारंभामध्ये मुलं तुमच्या बरोबर यायला तयार होत नाही आणि समजा आलेच तर एका कोपर्यात बसून फोनवर खेळत बसतात. विचार केला तर घाबरायला होतं..... पुढची पिढी कशी असेल ? सहिष्णू की असहिष्णू? माणसांमध्ये हाणामारी होत असेल, तर तुम्ही काय कराल? ह्या प्रश्नांचं उत्तर मुलांना देता येत नाही. आजची ही ‘नेटिव्ह’ पिढी वयस्क झाल्यावर काय करतील ? काही करणं हा नंतरचा भाग आहे पण आधी हा प्रश्न आहे की ते यंत्रातून डोकं वर काढून आजूबाजूला बघतील का? आज ही काळाची गरज आहे की त्यांना मूलभूत सामाजिक कौशल्ये शिकवल्या गेलीच पाहिजे. त्यांना ह्या यंत्रांपासून दूर ठेवायचं नाहीये किंवा ठेवूच शकत नाही पण निर्बंध नक्कीच घालायला हवाय. लोकांशी तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे, लोकांमध्ये मिसळता आलं पाहिजे.
मुलांनी वाचलेलं असतं की जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर EQ चांगला असायला पाहिजे. ते विचारतात, EQ वाढवण्यासाठी पुस्तक सुचवा ना! पुस्तक वाचून EQ वाढवता येत नाही, हे पुस्तकी ज्ञान नाहीये त्यासाठी प्रयोग (प्रॅक्टिकल) करावे लागतात. त्यासाठी बाजारात जा, सणसमारंभात जा, वेगवेगळ्या लोकांशी बोला, त्यांचं निरीक्षण करा! ह्या मुलांना उद्या नोकरीला लागल्यावर वेगवेगळ्या वयाच्या, स्वभावाच्या लोकांबरोबर काम करायचंय..... कंपन्यांमधले अधिकारी भेटले की सांगतात नोकर्या आहेत पण चांगले उमेदवार मिळत नाही. चांगले नाहीत म्हणजे कसे आहेत ते ? ते वाईट आहेत का? नाही, ते ‘मक्ख’ आहेत. त्यांची भावनिक बुद्धिमत्ता अत्यल्प आहे, वेगवेगळी नाती (अधिकर्यांशी, सहकर्माचर्यांशी, हाताखालच्या सहकार्यांशी असलेलं नातं) सांभाळणं माहीत नाही.
तुमचा स्वभाव कसा आहे? कट्टरवादी की उदारवादी हाही इक्युचाच भाग आहे. एका सिम्पोझियम मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील देशविदेशातील तज्ज्ञ मंडळी जमली होती. त्यात एका आयआयटीयनचा विषय होता ‘भारतीय संस्कृती व नेतृत्व कला’ त्याने सांगितलं की संशोधनातून (देशातील मोठ्या कंपन्यांतील वीस अधिकार्यांशी झालेली प्रश्नोत्तरे) असं लक्षात आलं की ही कला स्पिरीच्युयल कोशंट्शी (कर्मयोगाशी), निगडित आहे. खेदाने सांगावे लागतेय गोलमनने सर्वप्रथम इक्युची संकल्पना मांडली पण कर्मयोगाचा संदर्भ वगळून. ही आपलीच संकल्पना नवीन बाटलीत घालून द्यावी लागतेय कारण पालकत्वाची परिभाषा बदलतेय. आजची तरुण पिढी ही ‘कोप’लेली पिढी (अँग्री यंग) आहे, ती ‘कोपअप’ करू शकत नाहीये. सध्या आपण पाहतोय महाविद्यालया, विद्यापीठांत काय घडतंय ते. त्याला अनेक कारणं आहेत विभक्त व छोटं कुटुंब, फेबुवर शेकडो मित्र पण प्रत्यक्षात ती एकाकी आहे. अविकसित संवाद कला, (आपण संवादात फक्त सात ते दहा टक्के शब्दांचा वापर करतो व साठ टक्के शरीराचा वापर करतो उदाहरणार्थ एखादं पत्र वाचन व प्रत्यक्ष समोरासमोर मारलेल्या गप्पा), स्पर्धा, ताणतणाव, माहितीचा भडिमार इ. आज तुम्हाला जगभरातील सगळी माहिती एका चुटकी व टिचकीसरशी मिळते , फक्त एक अपवाद वगळता ती म्हणजे स्वतःविषयी, स्वतःच्या अंतर्मनाविषयी. म्हणूनच साधारण SQ गाठायला आधी EQ च्या शिडीचा आधार घ्यावा लागतो.IMG_6464.jpg
WHO ला HIV वर काम करताना आढळून आलं की फक्त कंडोम व सुया देणे हा यावरचा उपाय नाही तर त्याच्या मुळावरच घाव घातला पाहिजे म्हणजेच वर्तवणूकच बदलली पाहिजे. त्यासाठी आपल्या वर्तणुकीत दहा जीवन कौशल्ये विकसीत करायला हवी. WHO नी सांगितलेली दहा जीवन कौशल्ये म्हणजे – स्व ओळख , आंतरव्यक्ती संबंध, प्रभावी संवाद, सहजाणीव , निर्णय क्षमता , समस्या निवारण , विश्लेषणात्मक विचारक्षमता , सृजनात्मक विचारक्षमता, तणाव नियोजन, भावनांचे प्रकटीकरण .
आज शाळेच्या नवव्या वर्गाच्या अभ्यासक्रमात व्यक्तिमत्त्व विकास ह्या अंतर्गत ही ‘ जीवन कौशल्ये ’ शिकविली जात आहेत, ही एक चांगली बाब आहे पण प्रश्न हा आहे की हे शिकवायला शिक्षक आहेत का ? आणि ते प्रभावीपणे शिकवल्या जातेय का ? खरंतर हा काही एखादा माहितीचा विषय नाहीये म्हणजेच शिकविता येण्यासारखा. हा विषय आहे समजून घेऊन गणितातील प्रमेय सोडवण्यासारखा, सोप्यापासून जटिल/अवघड प्रश्न सोडवण्याचा, अनुकरणातून शिकण्याचा.आहे.
सात वर्षापूर्वीच्या संशोधनात असं आढळून आलंय की सध्याचं जे चित्र आहे त्यात E to E gap (education to employability) वाढत चाललीये. आज सगळ्याच क्षेत्रात अभ्यासात हुशार असणार्या लोकांपेक्षा चांगली माणुसकीने वागणारी माणसं हवी आहेत. रिजनल कॉलेजेस व बिट्स सारख्या संस्थांनी humanities हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे पण मेडिकल कॉलेजवाल्यांना ह्या विषयाचं गांभीर्य कळलं नाहीये. अॅकॅडेमी, पर्सनल, लीडरशिप स्किल्स, टीम वर्क अशी कौशल्ये विकसीत करून ही तफावत भरून काढता येते. ही सगळी कौशल्ये सातवीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या विषयांवरचे प्रकल्प करायला देणे हा एक उत्तम मार्ग आहे पण त्यांच्यावर देखरेख करायला किंवा मार्गदर्शन करायला कोणी नाही. ते काम पालकांना करायचं आहे, देखरेखीचं) आणि त्यासाठी सामूहिकरीत्या केलेला प्रयोग निश्चित उपयोगी पडणार आहे ! सेतू च्या व्यासपीठाच/ उपक्रमांच महत्त्व हे त्या साठीच कदाचित!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्याच्या अगदी उलट प्रमाण भावनिक बुध्द्यांक्याचं आहे. हा जो ऐंशी टक्के भावनिक विकास होतो तो मुलाला मिळालेल्या वेगवेगळ्या अनुभवातून व अनुकरणातून. >>>>>>
या सुंदर लेखातून अशा अनेक महत्वाच्या गोष्टी समजल्या .... खूप सारे आभार्स ... Happy

>>आज सगळ्याच क्षेत्रात अभ्यासात हुशार असणार्या लोकांपेक्षा चांगली माणुसकीने वागणारी माणसं हवी आहेत.
अगदी नेमक्या शब्दात मांडलेत वेगाने बिघडत चाललेल्या समाजमनाचे चित्र.

पुर्वी एकत्र कुटुंबामुळे, वाडा, गल्ली, मोहल्ला अशा युनिट्समुळे वेगवेगळे बरे वाईट संस्कार होऊन लोकांचे व्यक्तिमत्व हे बहुरंगी, बहुढंगी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकेल असे होत असे.
जागतिकिकरण, दृकश्राव्य माध्यमे, दूरसंचार माध्यमे यांच्या अतिरेकाने हे सारे झपाट्याने हरवले. Sad

सेतूबद्दल अजुन माहिती मिळून प्रत्यक्ष काही करता आले तर आवडेल.

शशांक, महेश धन्यवाद !२० एप्रिल च्या लोकसत्ता व्यक्तिवेध मध्ये बिल कॅम्पबेल ह्यांचा गुगल व अ‍ॅपल्च्या घडणीत मोलाचा वाटा आहे श्री बिल्च्या मते "मी ज्या लोकांना नोकरीवरुन कमी केले , त्यात काम न करणारे कमी होते ...... वर्तणूक आणि स्वभाव हे अधिक नोकरी जाण्याचे कारण होते. "

ओह, पण वर्तणूक आणि स्वभाव हे नोकरी जाण्याचे कारण कसे असू शकते ?
म्हणजे मॅनेजमेन्टने ते जस्टीफाय कसे केले असेल ? काही कर्मचारी या निर्णयाला आव्हान देणारे पण असतील.

मंजूताई, मला अजुन एक मुद्दा विचारायचा आहे,
९० च्या दशकानंतर जन्माला आलेली बहुतांश मुले मुली जास्त आक्रमक आणि बंडखोर का वाटतात ?
या आधीपण असे होते की पुढची पिढी ही आधीच्या पेक्षा जरा चौकस आणि अ‍ॅग्रेसिव्ह असते.
पण गेल्या २ दशकांपासुन ही गॅप अचानक जास्तच जाणवू लागली आहे.
आजकाल मुलांमधे बेसिक नम्रपणा, आदर, धाक, भिती हे घाऊक प्रमाणात नसल्याचे आढळते, असे का ? Sad