ख्वाबो के परिंदे!
मूड ही काय अफलातून गोष्ट आहे राव! सकाळपासून कृपा आहे त्याची! काल रात्री झोपताना वाटलं पण नव्हत की इतका चांगला दिवस उजाडेल! सकाळी उठल्यापासून जरा तसं आहे म्हणजे! आज आणि मी सूर्यनमस्कार पण घातले नाहीत, एरव्ही अपराधी वाटतं आज त्याचा मागमूस पण नाही. काल नवीन आणलेलं शॉवर जेल भन्नाट निघाल! आंघोळ केल्याच सुख! शिवाय उकाड्यामुळे गेले कित्येक दिवस चहा पण घेतला नव्हता! आज सकाळपासून पाऊस न हवेत गारवा! मस्त दुध गुळाचा मसालेदार दाट चहा मगभरून! ते पण नेट बंद ठेऊन. नाहीतर ते whatsapp सुरु असलं की स्वत:चा असून पण वेळ स्वत:चा उरत नाही!
त्यानंतर तीन तास कौश्या न किऱ्या बरोबर Big-bang, Time-Axis, Big-chill यावर गप्पा मारल्या! आणि ते
पण गणिताशिवाय बरं का. गणित असल्याशिवाय विज्ञान न मानणाऱ्या डोक्याने पंगु असणाऱ्या लोकापैकी आम्ही नाही! गणित आलं की ते सिद्ध करां! आणि या सगळ्यात त्या विज्ञानाची तार्किक आणि वैचारिक उकलन होतच नाही! वैचारिक दृष्टीकोन पार गडबडतो! विश्वाचा उगम आणि त्याच्याशी काही संबंध नसलेला अनादी अनंत काळ यावर अखंड चर्चा! आपल्याकडे देवाला कालरुपी, निश्चल म्हणतात ते यासाठीच असावं! लोकाना ते कळत नाही आणि मग देव नाही म्हणून बोंबा मारत सुटायचं! अहो तुम्हाला conceptच कळली नाही! हीहीही! सुदैवाने मित्र पण तसेच भेटले! जरा बरं असतं असं कधीमधी बोललेलं! स्व:तच स्व:ताला हुषार वाटतो नाहीतर मंद झाल्यागत वाटत राहत!
आज जेवणात चपाती पण! इकडे आल्यानंतर तीन महिन्यांनी आज चपाती आणि मुगाची उसळ! घरी असलो की यालाच नाक मुरडतो आणि बाहेर तीच मेजावानी होते! मज्जा आहे मोरे तुमची! पण आणखी खरी मज्जा त्यानंतरच! एरव्ही शास्त्रीय ऐकत असतो त्यामुळे बाकी काही ऐकणं फार घडतच नाही! त्यात वाईट काही नाही म्हणा, सूर जास्त आवडायला लागले की शब्दांचा खेळ नाही म्हटलं तरी मागे पडत राहतो. म्हणजे आम्ही विश्वाचा अखंड काल पाहिला की पृथ्वीला किती वर्ष झाली याला काही महत्व राहत नाही! अगदी तस्स! वाह काय उदाहरण सुचलय! आज बुद्धी फास्टात सुरु!
मग आरती प्रभुंच नक्षत्रांचे देणे बघायला मिळालं! आणि ये रे घना सुरु झाल. काय रोमांच अंगावर! या शरीराचा वेडेपणा जरा कळत नाही! कुठे नेमकं मनाशी कनेक्ट होतं ते कळत नाही! मनात मोहर आला की याला पण हुक्की येते! हे इथे ऐकलं म्हणून मुद्दाम आशाबाईंच येरे घना येरे घना ऐकायला सुरु केलं! असा योग बऱ्याच दिवसांनी! बाहेर, मनात आणि कानात... येरे घना येरे घना! तीनही ठिकाणाचे घन वेगवेगळे तरी बरसणं एकजिनसी! मी तीनही ठिकाणी वाटला गेलेला तरी एकसंध! म्हणजे बाहेरचा घन सगळा परिसर चिंब करतोय! (हे असले शब्द म्हणायला काय मज्जा येते, चिंब, बिंब, टिंब, ढिंब, किंबहुना.. हीहीहीही) मनातला घन विचारांच वादळ थांबवतोय! (थांब!...... ) आणि कानातला त्याचं वादळ सांगतोय! आणि एवढ्या सगळ्याशी मी एकाच वेळी एकरूप! कसा काय बरे? हा क्षण फक्त माझा माझ्यासाठी! स्वत:च स्वतःमध्ये intensify झाल्यासारखा! अचानक आठवलं किशोरीताई मियामल्हाराच वातावरण सांगताना म्हणतात "पाऊस इथे इथे पडतोय आणि इथे इथे नाही, या पानावर पाउस आहे आणि त्या पानावर नाही. असं होत नाही. तो एक सबंध पाउस असतो! तसं वातावरण निर्माण झालं पाहिजे" ताई म्हणजे काय नव्हेच ते! आणि मला वाटत असं असूनही, मला दिसणारा, तुला दिसणारा आणि त्याला दिसणारा पाउस परत वेगळाच आणि आपलं वाटणं वेगळं म्हणून आपला मियामल्हार वेगळा! म्हणून काय पाऊस वेगळा होत नाही! तो एकसबंध तसाच दत्त म्हणून उभा! तसंच काहीसं माझ्या मनाचं झालं या घनांमध्ये! प्रत्येक घनाला वाटणारा मी वेगळा आणि मी इकडे एकत्र उभा! काय विचार सुचलाय! हुशारच मी म्हणजे!
आशाबाई म्हणजे खुळ्यासारख गात सुटणारी बाई राव! काय भन्नाट ते गायचं! येरे घना मध्ये गंधाराला कसा हलकासा केसाएवढा झोका दिलाय! म्हणजे एरव्ही तो शुद्ध गंधार जो अद्भुत शांती घेऊन येतो, त्या शांतीचा फक्त आभास होतो इथे! निषादापासून मध्यमापर्यंत एवढी स्वरांची गच्च गर्दी की झक मारत त्या घनाने यायला पाहिजे. न येऊन सांगतो कुणाला लेकाचा! आणि आरती प्रभूंचं आपलं काहीतरीच बरं का! त्या घनान येताना वारा आणला! घनच तो. त्याशिवाय कसा बरसणार! आता त्या वाऱ्यामुळ तुमच्या फुलांचा गंध रानावना गेला त्याला तो काय करणार! आता विचार सैरावैरा होणारच! विकार आहे तो! माणासाला चुकलाय थोडीच! आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर कुठलं घर न कुठलं दार! माणूस इकडे तिकडे वारा होऊन फिरणारच कि हो! कशाला नको नको म्हणायचं आणि म्हणणार तरी किती वेळा! आरतीप्रभूनाच जमणार ते! विरक्त स्वातंत्र्याची हुरहूर आणि म्हणून तो तसा गंधार? हे आपलं माझं वाटणं बर का! ते आज जरा डोकं चालू ना. मग हे असं सुचतं!
खरं हे ऐकताना, मला ख्वाबो के परिंदे आठवतं का माहित काय! कदाचित आशय सारखा असेल! अब जिंदगी पे है जिंदगी सी बरसी! हो बहुतेक सेम आशय! मग ते पण ऐकलं! हे पण ऐकताना मन असं पिसासारखं. हिचा आवाज पण सगळ्या हार्मोनिक्स मध्ये अल्लड उड्या मारतो की! ऐकताना मनाचं पीस! एकदा इथे न एकदा तिथे आणि तरीही सगळीकडे! काय भानगड आहे बुवा ही! मलाच असं होतं की सगळ्यांना? नाहीतर काय तरी माझ्यातच मेंटल घोटाळा असायचा! तरी बऱ मी ड्रग्ज बिग्ज घेत नाही! नाही तर आधीच हा असा माझा कल्पनाविलास ! दोन गाणी ऐकली तर हे एव्हढ , ड्रग्ज घेतल्यावर तर केव्हढ हॅल्युसिनेशन्स!
मज्जाच आहे! ते काहीही असो! आज मी हुषार म्हणजे हुशारच!
वेsssड.... निव्वळ वेडच...>>>>
वेsssड.... निव्वळ वेडच...>>>> फूल शांभवी सुरु केल्यापासुन रोजचा दिवस असाच आहे!
हा लेख अगदी हळुवार वाटला, रिमझिम् बरसणाऱ्या सरींसारखा.>>>>> धन्यवाद किल्ली
दुष्ट मित्रांना असं म्हणतात
दुष्ट मित्रांना असं म्हणतात (प्रेमाने अर्थात) की....
तुमच्यासारखे मित्र असताना शत्रुंची काय गरज...?
तस तुला रे बाबा ड्रग्जची काय गरज..
आपका मूड बना तो आप हमेशा सातवें आसमान मे..
Be Always Hallucinated..
आज माझ्या इथेही बाहेर पाऊस
आज माझ्या इथेही बाहेर पाऊस आहे, पण तुम्ही मन जास्त भिजरे केलय... आहा हा !!
Be Always Hallucinated>>>>
Be Always Hallucinated>>>> बेस्ट शुभेच्छा दिल्यात निरु, थांक्यु व्हेरी मच!
तुम्ही मन जास्त भिजरे केलय... आहा हा !!>>>> स्वप्नाली खूप खूप धन्यवाद
भिजरे हा काय भारी शब्द आहे!
अलवार अलगद लिखाण !
अलवार अलगद लिखाण !
अरे मी मिसलं होतं का हे..
अरे मी मिसलं होतं का हे..
खुप मस् लिहिलयं..
आता गाणी ऐकावी म्हणते..
वा!!! मस्त. माझा मूड असा होतो
वा!!! मस्त. माझा मूड असा होतो क्वचित. पण त्या मूड ची भयंकर भीती वाटते कारण त्यानंतर निराश मूड इनेव्हिटेबली येतो. असो. आपला हा मूड कायम रहाओ.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
तुमची ही एक रेशमी कविता आहे !
तुमची ही एक रेशमी कविता आहे !
इतक्या सुंदर मूड नंतर मनाला त्याहीपेक्षा आनंददायी काय असू शकेल ?
दोन महिने धुंवाधार बरसल्यानंतर येणारं श्रावणातलं कोवळं पिवळं उन्हंच ! आणि कानांत गाणं " मेंदीच्या पानावर मन अजून झुलतय गं"
( मला माहित नाही पर्थात असं श्रावण ऊन्ह वगैरे असतं कि नाही ! )
अप्रतिम लिहिलंय, असंच लिहीत
अप्रतिम लिहिलंयस, असंच लिहीत राहा

Pages