नववर्षाभिनंदन - सातमाळ रांग ट्रेक - भाग १(पुणे - नाशिक )

Submitted by तोफखाना on 15 March, 2016 - 09:49

ता . ३१ डिसेंबर २०१४
वेळ : १०.३० रात्री

सरत्या वर्षाला आपापल्या परीने निरोप देण्यास सज्ज असणारी तरुणाई …. कर्णकर्कश्य दाणाणारा D.J. …… फेसाळणारे मद्याचे ग्लास …. कुठे शोभेचे दारूकाम, असा सारा पसारा मागे सोडून नाशिक ला भरधाव निघालेली 'पुणे -नाशिक' बस. आजु-बाजुचे विश्व काळ्या अंधारात गुडूप आणि थंडी ने गारठले होतो, तरी पण ३ भटके जीव पुढील वाटचाली, भूतकाळामध्ये तुडवलेल्या घाट-वाटा, डोंगर आणि डोंगरी किल्ले, आलेले अनुभव, एन वेळी फसलेली मोहीम ह्यात रमलेले आहेत. त्यांना गाडीतल्या अंधाराचा आणि थंडी चा काही पडलेलं नाहीये. डोळ्यासमोर अख्खा सहयाद्री उभा आहे, तो पाहण्यासाठी त्यांना गाडीतल्या कृत्रिम प्रकाशाची तसूभर हि गरज नाही , किंबहुना अंगावर येणार काटा थंडी चा नसून, गत आठवणीचा उजाळा आणि भविष्यातील वेध ह्यांचा रोमांच पूर्ण आवेश असावा.

"समय ने किया ही इशारा … "….च्या तालावर रात्री १२.०० चे ठोके पडत असतानाच आसमंत शोभेच्या दारूने आणि धरणी पिण्याच्या दारूने उजळून निघत आहे. इतक्या वेळ निद्रिस्त विश्वात what's App रुपी चैतन्यमयी होत आहे, जो तो आलेल्या शुभेच्छा स्वीकारण्यात आणि त्याच परतवून (forward) करण्यात दंग झाला आहे….… थोड्या वेळापूर्वी भरात आलेलं हे जग हळू हळू परत निद्रिस्त होत आहे. थंडी आणि झोप ह्यांचा एकत्रित परिणाम असावा अस वाटत असतानाच 'The number you have dialed is not reachable' रहस्य-भेद झाला - मोबाईल ला रेंज नाहीये.

पहाटे ३.३० च्या सुमारास ब्रेक च्या साग्र संगीताने आणि धक्याने आम्ही नासिक मध्यवर्ती बस स्थानकात आलो ह्याची आम्हाला अर्धवट पेंगुळलेल्या अवस्थेत जाणीव करून दिली. बस वाहक अतिशय प्रेमाने थोडसं दरडावून सर्वाना लवकर लवकर खाली उतरण्यास प्रेरित करत आहे . बस च्या बाहेर पहिला पाऊल टाकता क्षणी थंडी ने आमची कडकडून गळाभेट घेऊन आपण नाशकात आहोत ह्याची जाणीव करून दिली. स्थानकात आणि फलाटावर देहाच्या असंख्य गुंडाळ्या पडल्या होत्या त्या मधून आमच्या ४ भटक्या ला शोधून काढण्याची अवघड जवाबदारी पार पाडून, आम्ही आमची 'चौकडी' पूर्ण केली.

आठवड्याची ५ दिवस त्याच त्या जग रहाटी मध्ये फिरून थकलेले- दमलेले आणि 'शुष्क जाहलेले जीव' मुळी कचकड्याच्या मॉल मध्ये काय रमणार !.
अशा शुष्क जीवांना नव - संजीवनी द्यावी ती सह्याद्रीनेच.

अहो का म्हणून काय विचारता ………. डोंगर माथ्यावर बेफाम, बेलगाम सुटलेला उधळलेला वाऱ्याचा 'वारू' , सरळसोट तुटून, 'उत्तुंग उभा ललकारी नभा' असे नामाभिधान सार्थ करणारे बेलाग आणि रौद्र कडे-कपार , पाताळाशी लगट करणाऱ्या आणि काळजात धस्स करणाऱ्या दऱ्या, मस्तकीच्या दागिन्याप्रमाणे माथाय्वर धारण केलेले गड कोट आणि किल्ले, प्रतिस्पर्धी मल्लास शड्डू ठोकून आव्हान देत संरक्षणार्थ उभ्या असणाऱ्या तटबंदी,बुरुज अन माच्या, केवळ थक्क व्हावं आणि आश्चर्य करावं अस स्थापत्य, कातळ फोडून कोरलेल्या गुफा, ध्यानमंदिर,धान्यकोठार, 'छीन्नी' मारू तिथून पाणी काढू अश्या दुर्दम्य इच्छाशक्ती ने कोरलेल्या पाण्याची टाकी, पायऱ्या, जंगलातून वाट काढताना मध्येच गवसणार थंडगार पाण्याचं टाक आणि त्याला लागून महादेव अथवा बजरंगबली ची विश्वासात्मक मूर्ती, नागमोडी वळणे घेत चढणारी - उतरणारी वाट, एन हंगामात मिळणारा रान-मेवा, पडणारा नाही तर अक्षरशः कोसळणारा, आणि नखशिखान्त भिजवून अंतर्बाह्य शुचिर्भूत झाल्याची अनुभूती देणारा वळीव.

म्हणून नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी ह्याचा विचार करताना ट्रेक शिवाय उत्तम पर्याय नाहीच मुळी, फक्त जोडून येणाऱ्या सुट्टीला साजेसा टेक आखून, पूर्ण करावा हा विचार ऑक्टोबर पासूनच मनात होता, त्यासाठी 'गडांचा राजा राजगड ते शिवतीर्थ दुर्गदुर्गेश्वेर रायगड'असा बेत होता पण त्या जागी 'सातमाळ ' मधील किल्ले करावे असा ठरलं आहे.

मुंबई हून परस्पर आलेला 'पियुष' आणि पुण्याहून आम्ही अर्थात 'अमेय' , 'योगेश्वर' आणि मी अर्थात 'पंकज'.

ओळखीचे सोपस्कार पार पाडून गळाभेट घेणाऱ्या थंडीला थोडं दूर करण्यासाठी आम्ही बस स्थानकातील चहाची 'टपरी' हुडकत होतो. टपरीवर चहा घेऊन आम्ही निघताना पहाटे ४. ०० वाजले होतो इतक्यात भगवंताच्या मूर्ती कडे अनन्यभावाने पाहणाऱ्या भक्ताप्रमाणे एक मनुष्य आम्हा चौघांकडे पाहत होता , मुळात आमचे कपडे, गोल hat आणि पाठीवरच्या ब्यागा पाहून तो थक्क होईन पाहत होता. तुम्ही ट्रेकर आहात का असा एक शंका वजा प्रश्न त्याने केला आणि कुठे जाणार विचारताच …. 'सातमाळ' अस आमची चौकडी बोलून गेली. त्यालाच जुन्या बस स्थानकाचा पत्ता विचारून आम्ही जुन्या स्थानकात डेरेदाखल झालो. पायात घुटमळनाऱ्या थंडी आमच्या उघड्या अंगाला (चेहरा, मान आणि तळहात)स्पर्शून जात होती, बाकीच अंग झाकला असला तरी उत्कट थंडीची जाणिव सर्वांगाला होत होतीच.

जुन्या स्थानकात येताच लक्ष वेधून घेतला ते फलाटावरील नावांनी, ताहाराबाद, सटाणा, मुळांनाबारी, कांचनबारी, इगतपुरी , बारी, इंदोरे, आंबेवाडी अशी एक ना अनेक नावं मनाला भूतकाळात घेऊन गेली नसती तर नवलच. नाशिक मुळातच ट्रेकपंढरी ५० हून अधिक किल्ले, सुळके, महाराष्ट्राचं एवरेस्ट कळसुबाई, भटक्यांच्या टोळक्यात AMK नावाने प्रसिद्ध असलेले अलंग, मदन आणि कुलंग हे दुर्ग त्रिकुट, मराठ्यांच्या साम्राज्य विस्तारात किंबहुना मराठ्यांचा दबदबा प्रस्थापित करणारी साल्हेर ची लढाई शिवाजी महाराज ज्या लढाई ला स्वतः उपस्थित राहिले ती कांचनबारीची खिंड आणि कांचन मांचन किल्ला, वणीची देवी आणि मार्केंडेय ऋषींनी पावन केलेले वणीचा डोंगर आणि मार्केंडेय पर्वत, पंचवटी , सीतागुहा अंजनेरी पर्वत ,पांडव लेणी अशी पौराणिक काळाशी सांगड घालणारी ठिकाणे, स्थापत्याचे दर्शन घडवणारे हरिहर, भास्करगड, सिन्नर चे भग्न अवशेष आणि भूगोलाचे वैविध्य दाखवणारा धोडप चा सुळका आणि त्याची खाच असलेली जगप्रसिद्ध माची म्हणजे एकूण काय तर निसर्ग, पौराणिक काळ, इतिहास आणि भूगोल ह्यांनी नाशिक प्रांताच्या मस्तकावर 'तथास्तु' म्हणत वरदहस्त ठेवला आहे .

जी हालत नासिक मध्यवर्ती बस स्थानकात होती त्याचीच पुनरावृत्ती जुन्या स्थानकात दिसत आहे, बुराडी घाटामधल्या 'बचेंगे तो और लडेंगे' असे म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदे प्रमाणे मिळेल त्या आडोश्या च्या आधारवर 'ठंड से बचेंगे तो और भी सोयेंगे' अश्या आवेशामध्ये देहाच्या गुंडाळ्या करून थंडीशी दोन हात करत आहेत. पहाटेची वेळ आणि फलाटावर बस नसल्याने पेपर वाहतूक करणारी मंडळी आम्हाला पाहून ४ शिट मिळाली असा सुस्कारा सोडत असल्याचं त्या अंधारात हि जाणवत आहे. दिसायला ४ असलो तरी सोबतच्या ४ ट्रेक ब्यागा मिळून ८ आहोत हा हिशेब चालकाच्या मनाला चाटून गेला असावा हि खात्रीच आहे.

चालक : कुSSSठे जायचं आहे ……… स्स्स्स (बहुदा थंडी मुळे उच्चार लांबले होते)
आम्ही : देवीच्या गडावर (वणीला)जायचा आहे.
चालक : चला सोडतो.
आम्ही : किती पैसे होतील प्रत्येकी आणि अंदाजे वेळ किती लागेल.
चालक : म्हंजी बघा लाल डबा ७४ रुपये घेते आम्ही round figure ७० घेऊ आणि दीड तास लागेल … (पुढचं वाक्य चालक महाशयांनी गुटखा पुडी सोबत तोंडात टाकल)

पुढचा प्रवास peppermint च्या (सु)वासाने होणार होता ह्याची खात्री आता पासूनच पटत आहे.
त्या तत्सम trax मध्ये पुढे कि मागे अशी बसवण्याची प्रात्याक्षिके पार पडून सरतेशेवटी बैठक व्यवस्था खालील प्रमाणे
(पहिली रांग ) चालक, पंकज ,अमेय
(दुसरी रांग) पियुष, योगेश्वर आणि बाकीचे सहप्रवासी
(मागची रांग) ४ ट्रेक ब्याग, २ सह प्रवासी आणि अर्धवट आत-बाहेर असा चालकाचा मदनीस.

गाडी बस स्थानकाच्या बाहेर पडताच बोचरी हवा अधिकच झोंबू लागली अश्या वेळी अर्धवट आत-बाहेर बसलेला इसम स्वतःला थंडी पासून वाचवण्यासाठी काय करत असेल ह्या विचारानेच अंगावर अधिक काटा आला. गाडी ने आता बऱ्यापैकी वेग घेतला आहे .

काळोख्या जंगलात सावजावर डोळे रोवून शिकार करणाऱ्या वाघाप्रमाणे, 'सापुतारा - नाशिक' मार्गावर त्या अंधारात आमची गाडी आपले दोन डोळे रोवून मार्गक्रमण करत आहे . गोदावरी नदीचा पूल ओलांडून नाशिक शहराची वेस सोडण्याचा अवकाश डाव्या हाताला किल्ले 'रामशेज' त्या भयाण अंधारात हि पुसटशी ओळख दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र एकदा इरेला पेटला कि डोक्यावरची 'किम्याश' (मुघल बादशाह के सर का ताज) सुद्धा खाली आणतो याची पुरेपूर जाणीव औरंगजेब ला सुद्धा आली ती ह्या रामशेज मुळे, शिवाजी महाराज नाही आता काय तो महाराष्ट्र असं समजून आलेला आलमगीर ५ वर्ष भुंड्या डोक्याने संपूर्ण भारताने पाहिला तो ह्या रामशेज मुळेच. 'धन्य तो रामशेज आणि धन्य ते अज्ञात मावळे'…!!!

भानावर आलो तेच चालक साहेबांनी लावलेल्या भावगीतामुळे. 'अहिराणी' ह्या बोलीभाषेतील गाणं ते, कुणी 'डोंगरकन्या' आईला (वाणीच्या देवीला) साद घालत, तुझी पूजाअर्चा कशी करू विचारत आहे. शब्द अगदीच कळत नसले तरी पण सूर अन संगीत मनाला भिडत आहे. 'Music is universal language' हे तिथं समजलं. अगदीच आम्ही काही पहाटे उठत नसलो तरी ट्रेकचा दिवस त्याला अपवाद, सकाळी भीमसेनजी त्याचं 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल' एकूण जाग करतात, त्याचीच अनुभूती घेत आहे.

धरणीकंप झाला अस वाटावं इतका जोराचा धक्का लागला पुढचा गाणं एकूण , साक्षात 'आर्यन्स' च 'आंखोमे मै तेरा हि चेहरा' हे गाणं आणि टीन - एज वाला शाहीद डोळ्यासमोर. अधात्मातून direct भौतिकमधे प्रवेश , एखादा सूर सप्तकात लागला आणि ताम्बोर्याची तार तुटली अस वाटत आहे. पण चालक साहेब आधीच्या भक्तिभावानेच हे पण गाणं ऐकत आहेत आणि थांबा आला कि वर्तमानपत्रांचा गठ्ठा 'भिरकावत' (वाटत) होते, ते पण अचूक. बस नसली तरी प्रत्येक थांब्यावर गाडी थांबत होती गठ्ठे पडत होते. सुमारे अर्धा तासाने थंडीचा जोर अधिकच वाढला होता 'ओझरखेड' धरण जवळ आला ह्याची खुण. ह्या नंतर दिंडोरी मग वणी हा साधा हिशोब. चालक साहेबांनी गाडीच्या steering wheel भोवती हात अधिकच घट्ट केला आणि सावरून बसले 'घाट सुरु होत होता'. 'पुढे वळण आहे', 'गतिरोधक आहे' अश्या इशारा वजा महिती फलक हे त्याच्या दृष्टीने अस्तित्व्यातच नव्हते. गाडी, steering wheel, आणि रोड बस्स इतक साध गणित. गुगल म्याप पेक्षा जास्त स्पष्ट रोड त्याचा डोक्यात होता, हाताखालचा रोड , पहाटे ची वेळ, रस्त्यावर कोणीही नाही म्हणजे 'मैं हुं तुम हो समा हैं' अशी सुवर्ण संधी. त्याची गाडी आता वाऱ्याशी स्पर्धा करत होती 'फेरारी' प्रमाणे आणि हा 'शुमाकर. कोणीतरी म्हणल्या प्रमाणे महाराष्ट्र हि रत्नांची खाणच. मला तो चालक असाच एक दुर्लक्षित अनघड रत्न वाटत होता. गठ्ठे टाकण्यातील अचूकता आणि गाडी चालवण्यातील कसब वादातीत. थोड्या वेळात घाट संपला पण गाडीचा स्पीडो मीटर चा काटा कुठेही ८० च्या खाली नाही. थंडी मध्ये कपाळावर घर्म बिंदू आल्याचे क्षण.

थोड्या वेळात peppermint सुवास आला 'पैसे तयार ठेवा, स्टाप येत आहे' उतरल्यावर पैसे वैगरे देण्या-घेण्याचा चा सोपस्कार पार पाडून गाडी अंधारात गायब झाली … 'अमेय' ची कानटोपी घेऊनच. 'इदं न मम' अस म्हणणार तोच पियुष ने जादाची कानटोपी पुढे केली 'घे रे अमेय …… मला पण बस मधेच मिळाली आहे वर हा खुलासा'. जुन्या बस स्थानकातून वणी हे ६५ किमी अंतर सुमारे एक तासात. पण देवीचा गड काही केल्या दिसत नव्हता मग साक्षात्कार झाला आम्ही गडाच्या खाली होतो घाटाच्या खाली गावामध्ये. सप्तशृंगी गड अजून वरच आहे. थंडी आम्हाला घेरून वाकुल्या दाखवत ऊभी आहे, तीनही बाजूने सातमाळ चे अभेद्य डोंगर अन कडे अंधारात सुद्धा लक्षात येत आहेत. वणीच मंदिर अजूनही दिसत नाहीये, गाव अजूनही साखर झोपेमध्येच आहे. बराच पल्ला गाठायचा आहे, अजून उजाडायचा बाकी आहे. कुठ्लाश्या बंद दुकानासमोर सर्व समान ठेऊन जरा विसावा घ्यावा म्हणून ४ जण जरां टेकलो आहोत ………आता फक्त एकच प्रतीक्षा,

सूर्योदय नवीन वर्षा चा पहिला सूर्योदय '१ जानेवारी २०१५' चा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच लिहीलंय. उत्कंठावर्धक. पुढे काय झालं ?

रच्याकने : आयडी जबरदस्त आहे.
ट्रेकला काय काय खाल्लं ते पण सांगा नक्की.

झकास सुरूवात केली आहेस पंकज, प्रचि पण येऊ दे.

तुझा लेख वाचूनच, थोडे अवांतर : नाशिक प्रांत हा तर माझा हि विक पॉईंट. माझ्या वडीलांचे जन्म गाव ' पिंपळनेर'. दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आई वडील आजी सोबत जाणे होई. तेव्हा तू लिहील्याप्रमाणे जुन्या सी बी एस वरील ते फलाटावंरील नावे तेव्हा ही खुणावयाची मुल्हेर, हरणबारी, सैंदाणे, नवापूर, नदुंरबार, अक्कलकुवा यादी तर वाढत जाणारी आहे. पण त्या वेळी ती स्थानकावरील भयंकर गर्दी, कशीबशी गाडीत जागा मिळवायची, त्यातच जर खिडकी मिळाली तर आनंद होई तो वेगळाच. भावड बारीतून सातमाळा ओलांडून बागलाण प्रातांत प्रवेश होई. पुढे डोलबारी मग मांगी तुंगी पिसोळ आणि डेरमाळ यांना छेदून जाणारी सेलबारी पार करून पिंपळनेरला पोहचायचे. खरच तो प्रवास ते दिवस खुपच भारी. एस टी बस च्या नावाच्या पाट्या वाचणे हा एक माझा आवडता उद्योग. बर्याच वेळा मी नजर चुकवून गुपचूप जाऊन स्थानकातल्या सर्व गाड्यांच्या पाट्या वाचून यायचो, त्या बद्दल मोठ्यांच्या ओरडा आणि मार ही खाल्ला आहे.
पिंपळनेर मध्ये ब्राम्हण गल्लीत आमचे घर होते. त्याच्या थोडे पुढे गांधी चौकात उजव्या बाजूला सरकारी दवाखान्या जवळ छोट्या टेकडीवर एक पीर आहे. किती तरी वेळा मी त्या पीराच्या टेकडीवर जाऊन तासन तास मांगी तुंगी पहात बसायचो. या प्रातांतच असल्यामुळे असेल कदाचित पण तेव्हापासूनच साल्हेर मुल्हेर मांगी तुंगी यांची ओळख. आज निसर्गात भटकण्याची आवड, डोंगर पालथे घालायचे वेड हे बहुधा त्या वेळेमुळेच रूजले असावे.
असो जास्त काही खरडत नाही. पण तुझा लेख वाचून त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या.

पुढच्या भागाची वाट पहातोय....

जबरी रे पंक्या .. फ़ाइनलि लिहायला सुरुवात केलीस तर .. छान जमून आलंय सगळं, वाचताना फिरून फिरून तिथंच रेंगाळतोय.... पुढील भागाची प्रचंड ओढ लागलीय ... मायबोलीवर तुझी शब्दरूपी तोफ सतत धडाडू दे ...

कवि मी, मी _आर्या, यो , अनुराधा ६६६ आणि लिंबू जी

प्रतिसादा बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

लिंबूजी : थंडी बद्दल पुढे येईलच सारा काही, थोडक्यात सांगायचा झाला तर चुलीवरून काढून बाजूला ठेवलेलं सूप पाच मिनिटात गार झालेले पहिला आहे.

पुढील भाग टंकत आहे लवकरच इथे प्रकाशित करेन.