सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

Submitted by मार्गी on 15 March, 2016 - 03:11

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस

दुखापत व नंतरच्या राईडस

सप्टेंबर २०१४ मध्ये नियमित सायकल चालवल्यानंतर काही दिवस परत गॅप पडली. जेव्हा असं होतं, तेव्हा प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करावी लागते. हळु हळु लय प्राप्त करावी लागते. ऑक्टोबरमध्ये परत राईडस सुरू केल्या. छोट्या राईडचा आनंद घेतला. परभणीजवळच्या रस्त्यांवर सायकल चालवली. परत एकदा मोठी राईड करण्यासाठी निघालो. आता हे रस्ते पाठ झाले आहेत! कोणत्या रस्त्यावर किती अंतरावर कसा खड्डा आहे, कुठे किंचित चढ आहे हे सर्व पाठ झालं आहे. परभणीजवळच्या तीस किलोमीटरपर्यंतच्या राईडस तर अंगणातल्याच वाटतात. आत्मविश्वासामुळे असा फरक पडतोच.

३० ऑक्टोबरची सकाळ. काही दिवसांची गॅप असूनही चांगला वेग मिळाला. आजच्या राईडमध्ये एकूण ६० किलोमीटर करण्याचं उद्दिष्ट आहे. परभणीपासून मानवत रोडला जातो आहे. तिथे एका हॉटेलात माझ्या आवडीचे पोहे मिळतात. पहिल्या एका तासात वीस किलोमीटर ओलांडले. जास्त कुठे थांबलो नाही. थोडा वेळाने उजव्या पायाच्या गुडघ्यात वेदना सुरू झाली. पाय सरळ करून बघितला, पायाला थोडा आराम दिला, तरी फरक नाही वाटला. पोहे खाण्यासाठी थांबलो तेव्हा पायांना थोडा आराम मिळाला. पण परतीचा प्रवास सुरू केल्यावर परत पाय जास्तच दुखतोय. पाय वेगवेगळ्या कोनात पेडलवर ठेवून चालवून बघितलं. पण हळु हळु जास्तच दुखतोय. अर्थात् अजून सायकल चालवू शकतोय. परभणीही जवळ येतं आहे. त्यामुळे लिफ्ट घेण्याचा विचार केला नाही. नंतर नंतर तर सायकलवरून उतरताना आणि परत बसतानाही त्रास सुरू झाला. परभणीत पोहचेपर्यंत अशी वेळ आली, की शेवटचे दोन किलोमीटर- बस स्टँडपासून घरापर्यंत ऑटोने जावं लागलं. इतकी वाईट अवस्था झाली. उजवा गुडघा हलवताही येत नाहीय. आता काय करावं?

त्या दिवशी पायाला पूर्ण आराम दिला. हळु हळु पाय ठीक झाला. संध्याकाळ होताना गुडघा हलवता येतोय. पण असं झालं कशामुळे? सायकल चालवण्यात तर काहीच बदल केला नव्हता. मग आठवलं की, काहीच दिवस आधी श्रीनगरमध्ये ट्रेकिंग करताना तोच पाय दुखला होता आणि नंतर जम्मूमध्ये फिरतानाही मी लंगडतच होतो. कदाचित तोच प्रॉब्लेम असणार. हो, तसंच आहे! त्या वेळी लवकर खाली उतरताना गुडघ्याच्या लिगामेंटला थोडी दुखापत झाली. ती अजून बरी झालेली नसावी. किंवा थोडीच रिकव्हर झाली असावी. कारण दोनच दिवसांआधी मी छोटी ३० किलोमीटरची राईड केली होती, त्यावेळी काहीच त्रास झाला नव्हता. आजच्या मोठ्या राईडमध्ये २५ किलोमीटर नंतरच हळु हळु त्रास सुरू झाला. गुडघ्याला नी कॅप लावल्यानंतर थोडं बरं वाटलं. बाबा डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं दोन आठवडे सायकलिंग बंद! चांगली गोष्ट अशी आहे की, ही इंज्युरी छोटीशीच आहे. आराम केल्यावर आपोआप बरी होईल. पण त्यामुळे परत पंधरा दिवस सायकलिंग बंद. बाकी हालचालीमध्ये काही त्रास नाहीय.

वीस दिवसांनंतर एक छोटी अकरा किलोमीटरची राईड केली. काही त्रास नाही झाला. उत्साह वाढला, पण तरी घाई केली नाही. एक आठवडा थांबलो. आता मोठी राईड करून बघायला हवी. परभणीपासून ४८ किलोमीटर अंतरावरच्या पाथरी गावात साईबाबांचं जन्मस्थान आहे. तिथे जाण्याचा विचार केला. नेहमीप्रमाणेच राईड सुरू केली. फक्त ह्यावेळी नी कॅप लावून सायकल चालवतो आहे. छोटे छोटे टारगेटस समोर ठेवून निघालो. पहले बारा किलोमीटर नॉन स्टॉप, नंतर पाण्याचा ब्रेक, नंतर दहा किलोमीटर्सवर चहा असं. काहीच त्रास होत नाहीय. इतक्यात होणारही नाही. पुढे गेल्यावरच कळेल. आणि तसंच झालं. तीस किलोमीटरनंतर परत त्रास सुरू झाला. हळु हळु गुडघा दुखायला लागला. थोडा वेळ सहन करत पुढे गेलो. पाथरीमध्ये साईबाबा मंदीर बघितलं. परत फिरलो. जास्त दुखतंय हळु हळु पण सायकल चालवता आली तोपर्यंत चालवली. मानवत रोडपासून लिफ्ट घेतली. कारण पुढे चालवत राहिलो असतो तर जास्त दुखत गेलं असतं. वेळेमध्ये सायकल थांबवल्याने पुढे त्रास वाढला नाही. नी कॅप वापरणं सुरू ठेवलं.


पाथरी- साईबाबा जन्मस्थान

चार दिवसांनी परत सायकल चालवली. एक छोटी तीस किलोमीटरची राईड केली. त्यामध्ये चांगला वेगही मिळाला आणि दुखलंही नाही. अर्थात् आता मी दुस-याच गेअरवर सायकल- २-५, २-६ अशी चालवतो आहे. आधी जेव्हा ३-४ व ३-५ वर चालवली होती, तेव्हाही गुडघा दुखला होता. त्या काँबीनेशनमध्ये गुडघ्यावर जास्त ताण येतो. क्रँप्सही येऊ शकतात. त्या तुलनेत २-५ किंवा २-६ पर्याय ठीक वाटतोय. दुस-या दिवशी परत ४० किलोमीटरची राईड केली. अर्ध्या वाटेनंतर गुडघा खूप दुखला. पण गमतीची गोष्ट म्हणजे तिरपा पाय करून पेडल मारताना दुखणं कमी झालं. त्यामुळे अगदी कमी वेगात आणि २-३ व २-२ अशा लोअर गेअर्सवर हळु हळु आलो. थांबत थांबत पेडल मारत राहिलो. दुखत असतानाही सायकल चालवल्याचा आनंद झाला. थोडी रिस्क होती, पण पुढे जेव्हा मोठ्या एक्सपिडिशनला जाईन, तेव्हा आणखी जास्त गलितगात्र अवस्थेत सायकल चालवायची आहे. क्रँप्स आलेले असतील, एक एक पेडल कठिण होईल, तेव्हा सायकल चालवता येण्यासाठी आज अशा स्थितीत चालवल्याचा फायदाच होईल. असो.

त्यानंतर अगदी रोज राईडस सुरू केल्या. पूर्ण बरं व्हायच्या आधी नी कॅप लावूनच अनेक सलग अर्धशतक केले. ४० किमी नंतर रोज ५० व मग ६० किमी राईडस सुरू केल्या. चार रस्ते निवडले आणि त्यांच्यावर आळीपाळीने राईडस सुरू केल्या. पहिल्यांदाच एका आठवड्यात सात अर्धशतक झाले! नऊ दिवसांमध्ये ५०० पेक्षा जास्त किलोमीटर्स झाले. आणि काहीही त्रास झाला नाही. थकवाही हळु हळु कमी होत गेला. कारण आपण शरीराला जितकं जास्त थकवत जातो, तितकं ते कमी थकत जातं! रोज ६० किलोमीटर तर डोळे झाकून चालवू शकेन, असा आत्मविश्वास मिळाला. २०१४ वर्ष संपता संपता सायकल चालवण्यातली रंगत अजून वाढली!

   पुढील भाग २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण गुडघा बरा कशाने झाला शेवटी? सीट खाली असेल/ पुढे-मागे सेट नसेल तरी गुडघे दुखतात.
आम्हांला हेवा वाटतोय. आधीपासून आपणही अशीच प्रत्येक राईड नोट डाऊन करायला हवी होती.. Sad

पण गुडघा बरा कशाने झाला शेवटी?<<< मला सुद्धा हिच शंका आहे.

प्रत्तेक राईड वाचताना वेगवेगळी मजा येते आहे.

>>>> आम्हांला हेवा वाटतोय. आधीपासून आपणही अशीच प्रत्येक राईड नोट डाऊन करायला हवी होती.. <<<< सहमत. Happy पण अजुनही वेळ गेलेली नाहीये... अन माझ्या तर फारशा राईड्स झाल्याच नाहीयेत. Happy
शिवाय हे फोटो सहित देतात त्यामुळे अधिक वाचनीय व दृष्टीसुखाचे होतात लेख...... Happy

अवांतरः
दुर्दैवाने गुढगेदुखी मलाही आहे Sad तेविस चौविस वर्षांपूर्वी शाखेवर "युद्धनौका' असा खेळ खेळत असताना (प्रत्येकाने पाठुंगळीस एक बाल स्वयंसेवक घ्यायचा, अन मैदानावर दिल्या जागेत त्यांनी युद्ध खेळायचे, म्हणजे ढकलाढकली - मारामारी नव्हे, जो पडेल तो हरला, तर मी एका बालास पाठिंगुळी घेतले होते, खेळ रंगात आलेला, अन कसे कोण जाणे, दगडाला अडखळून मी पडू लागलो, तो तोल सावरत, पाठीवरील बाल खालि पडून त्यास इजा होऊ नये म्हणून एक गुढगा जमिनीवर आदळवुन पाय मुडपुन जमिनीत रोवून धरला तर दुसरा पाय मुडपुन हनुमान बैठक धरली, तोवर माझ्या युद्धनौकेवर आलेल्या अन्य दोन नौका त्यांचाही तोल गेल्याने माझ्याच अंगावर आदळल्या..... या सगळ्यांच्या ओझ्यामुळे गुढग्यास चांगलीच जखम झालीच, पण लंगडूही लागलो. तेव्हा काय? नुसते खोबरेल तेल माखुन लावले..... तशात दुसरे दिवशी खोपोली-पनवेल दरम्यानच्या "इरसाळ" गडावर ट्रेकला गेलो. चढताना काही जाणवले नाही. जखम ओलीच होती, पण उतरताना दे माय धरणी ठाय असे झाले. एक जाड काठी (फांदी?) शोधुन काढली चांगली पुरुषभर उंचीची, अन दुखरा पाय त्या काठीला चवड्यातुन अधांतरी गुंडाळून (काठीला पायाने कैंची मारुन) त्या पायाचा सर्व भार त्या काठीवर टाकुन काठी दोन्ही हाताने गच्च पकडुन, पाठीवर सॅक, अशा अवस्थेत एका पाय जमिनीवर, दुसरा पाय काठीला लटकवुन हाताने काठी पुढे पुढे नेऊन रोवत लंगडत लंगडत तीव्र उतार उतरलो. पाय जमिनीवर टॅकववत नव्हता. तसेच ट्रक्/बस/लोकल वगैरे बदलित बदलित निगडिला पोहोचलो, तो स्टेशनपासुन सरळ सपाट रस्त्यावर जाण्यासही, काठीचाच वापर करावा लागला. इथवर पोहोचेस्तोवर दोन्ही आडसंड्यात गोळे येउ लागलेले.
कसातरी घरी पोहोचलो अन झोपुन गेलो.
तेव्हांचा तो दुखावलेला गुढगा आजही त्रास देतो. कोणताही ट्रेक चढताना मला काहीच वाटत नाही, पण उतारावर गुढग्यावर अतिरिक्त भार येऊन भयानक दुखतो. तेव्हा कायम सोबत पेनकिलर, विविध मलमे/स्प्रे वगैरे ठेवावेच लागते.
अवांतर समाप्तः

तर बोध काय घ्यायचा? की ट्रेक/सायकलिंग वा केव्हाही कुठेही घराबाहेर पडायचे, तर विंचवाचे बिर्हाड पाठीवर असल्याप्रमाणे, आपले सर्व औषधी कीट सोबत ठेवायचेच ठेवायचे. Happy तुम्हाला तिथेच लगेच काही पेनकिलर व मलमे लावता आली असति, तर थोडा रिलिफ मिळाला असता.
दीर्घ कालिन आयुर्वेदिक उपचारांमधे बैद्यनाथचे महानारायण तेलाने गुडघ्यावर हलकेच मालिश रोज करावे. Happy त्याने उतार पडतो. Happy

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

@ हेम, @ स- सा; गुडघा आपोआप बरा झाला; नंतर पुनः कधीच दुखला नाही. खपलीने जखम भरून यावी तसं. Happy