व्हिव्हियाना हाईट्स - भाग २

Submitted by विश्वास भागवत on 7 March, 2016 - 11:59

भाग १ इथे

http://www.maayboli.com/node/57947
- - - - - - - - - - - - - -
आवाज होताच क्षितिज वायूवेगानं किचन कडे झेपावला, त्याच्या पाठोपाठ सगळेच किचन मध्ये आले. तिथे ते काळं मांजर टेबल वर उभं राहून गंजातल दूध पीत होत. त्याने काचेचा ग्लास खाली पाडला होता व त्याचे जमिनीवर पडून तुकडे झाले होते. सिद्धार्थ ने त्याला हाकललं तर ते त्याच्याच कडे पाहून गुरगुरु लागल, शेवटी जेव्हा क्षितिज नी त्याला हुसकवला तेव्हा ते पळत बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडलं.

झाल्या प्रकाराने सगळेच अवाक झाले होते, ह्या मांजराला कोणीही आत्तापर्यंत बिल्डिंग मध्ये पाहिलं नव्हतं. हा प्रकार सुरु झाल्यापासूनच मांजर दिसू लागलं असल्यामुळे सगळ्यांनाच त्याच ह्याच्याशी काही संबंध असावा असा गाढ संशय आला होता.
- - - - - - - - - - - - - - -

आज पूजेचा दिवस होता, क्षितिज सोबत ती घटना झाल्यापासून बरोबर एक आठवडा झाला होता.

त्या फ्लॅट मध्ये मीना धांडे च भूत असल्याची गोष्ट बिल्डिंग मध्ये कानोकान झाली होती. क्षितिजची गोष्ट सगळीकडे पसरली होती.
पेंटहाऊस तो गेला तेव्हापासून बंदच होतं. त्यानंतर मनोज धांडेने अर्थातच असं काही असल्याचा तीव्र नकार केला होता व अपेक्षित असल्याप्रमाणे क्षितिज ने खोटं बोलल्याचा दावा केला होता. मात्र सगळ्यांची खात्री झाली होती ह्यात त्याचा समावेश आहे. सातव्या मजल्यावर जायला सर्व मुलांना बंदी करण्यात आली होती, त्यांच्यावर सगळे लक्ष ठेवून होते. मोठे पण क्वचितच सातव्या मजल्याकडे जात व गेले तरी एकटे जायला टाळत. सिद्धार्थ ने वैशाली आणि आपल्या बाळाला तिच्या माहेरी पाठवून दिले होते. मध्यंतरी मनोज ने आणलेले सारे भाडेकरू कुलकर्णींनी त्यांना हि घटना सांगून परत जायला लावले होते. सिद्धार्थ ने आपल्या ओळखीतल्या एका वरिष्ठ ऑफिसर ला मीना धांडे च्या मृत्यू ची फाइल पुन्हा उघऊन चेक करायची विनंती केली होती आणि त्यामुळे धांडे मागे पोलीस चकरा वाढल्या होत्या.
एके दिवशी कंटाळून मनोज धांडे कुलकर्णीकडे आला व त्याने त्यांच्यासमोर हे सगळं थांबवण्याकरता पूजेचा प्रस्ताव ठेवला, पूजेचा सारा खर्च करण्याची तयारी पण दाखवली होती. धांडेमधला बदल पाहून सगळे आश्चर्यचकित झाले होते मात्र लगेच हो म्हणून 2 दिवसांनी पूजा ठेवल्या गेली होती.

पूजेकरता रविवार ठरला होता, आजूबाजूच्या सर्व परिसरात ही गोष्ट अल्पावधीतच पसरली असल्यामुळे बरेचशे बाहेरचे लोक पण पूजा पाहायला आले होते. सगळ्यांनी खास आग्रह करून क्षितिजलाही बोलावून घेतलं होतं.
पूजेकरता कोणी महाराज किंवा पंडिताची अपेक्षा करण्याऱ्या सगळ्यांना पूजा करवणारा पाहून धक्का बसला होता. लाल भडक डोळ्यांचा, दारूचा वास तोंडाला येत असलेला आणि अत्यंत भयावह स्वरूपाचा तांत्रिक धांडेनी शोधून आणला होता. त्याने सकाळी येताच सगळ्यांना आपापल्या फ्लॅट च्या बाहेर निघायला सांगितलं होतं. बिल्डिंग च निरीक्षण करत तो सातव्या मजल्यावर आला व त्याच्या पाठोपाठ सारे लोक, त्याने एक लांब श्वास घेतला आणि ओरडला, "इथे एक सैतानी ताकद आहे, एका निपुत्रिक आत्मेचा निवास आहे, तिला अर्भक हवेय ज्याला ती आपलं म्हणू शकेल.
तुला इथून जावं लागेल, इथे तुझं घर नाहीय आता, जा." तो मोठ्याने गरजला आणि त्याने राख दाराच्या दिशेला फेकली, ती राख हवेतच आगीचा लोळ होऊन दारापुढे विझली.
मांत्रिक सगळ्यांना घेऊन खाली आला, त्याने बिल्डिंग च्या चारही बाजूला चार खिळे ठोकले. त्या खिळ्यांना एक लाल काळा धागा बांधून त्याने एक वेस निर्माण केली. सगळ्यांना त्या वेशीबाहेर यायला सांगून तो स्वतः आत शिरला, आत्मेला आवाहन करून त्याने सोबत आणलेली बकरी दाखवली आणि एका झटक्यात हातातल्या तलवारीने तीच शीर वेगळचं केलं. "ये आणि ग्रहण कर तुझं भोजन आणि सोड हि जागा.", तो पुन्हा किंचाळला. 30-40 सेकंद असेच गेले आणि अचानक तो घुमू लागला. विचित्र आवाज करत ओरडू लागला. गुडघ्यावर सरपटत त्याने त्या बकरीचं मांस कच्च खायला सुरवात केली. आयाबहिणींना ते पाहून भोवळ आली, मुलांनी रडायला सुरवात केली आणि पुरुषांच्याही अंगावर शिसारी आणि काटा आला. बऱ्यापैकी मांस खाऊन मांत्रिकाच शरीर अचानक कोसळलं. ते पुन्हा उभं राहिला तेव्हा तो उन्माद राहिलेला नव्हता, मांत्रिक ओरडला, " तिची आत्मा पुढे गेलीय, आता इथे काहीही राहिलेला नाहीय."

तो बाहेर आला, सगळे त्याच्यापासून थोडे दूरच सरकले. सरळ चालत तो धांडे जवळ गेला, धांडे ने मुकाट्याने 500 चं बंडल त्याच्या हातात सोपवलं. " ये बिल्डिंग अब रहने को मेहफुझ है, धागा खुद निकाल लेना और अंदर जा सकते हो फिर...", एवढं बोलून तो चालता झाला. सगळ्यांनी निश्वास सोडला, शेवटी हे सगळं संपलं होत.
मात्र आत्तापर्यंत त्या मांत्रिकाकडे एकटक पाहत असलेल्या क्षितिज च्या चेहऱ्यावर एक विचित्रच हसू उमटलं.

----------------------------------------

"चियर्स..!", क्षितिज ने वैभव समोर ग्लास उंचावून म्हणाला. रात्रीचे बारा वाजले होते आणि क्षितिज आणि वैभवची ओली पार्टी सुरु होती. एक काळं मांजर येऊन क्षितिज च्या मांडीवर बसलं होत आणि तो त्याला प्रेमानं कुरवाळत होता.

"ए हिचकॉक च्या बापा, आता सांग तरी काय सस्पेन्स आहे ते... आज त्या व्हिव्हियाना ला काय प्रकार सुरु होता आणि तुझा काय संबंध आहे त्या सगळ्याशी? नेमकं त्या दिवशी पूल खेळून गेल्यावर झालं काय? आणि हे मांजर कुठून आलं तुझ्याकडे?", वैभव करवादला. गेल्या आठ्वड्याभरापासून क्षितिज त्याच्या फ्लॅट वर थांबला होता. वैभव क्षितिज चा अगदी बेस्ट फ्रेंड, कॉलेज मध्ये दोघं सोबतच होते आणि क्षितिज चा स्वभाव वैभव चांगलाच जाणून होता. क्षितिज एखाद्या गोष्टी बद्दल शांत बसून असला म्हणजे हमखास त्याच्या मनात काहीतरी सुरु आहे व ते सगळं संपल्यावरच आपल्याला कळेल हे वैभव ला चांगल्या रीतीने माहिती होतं. क्षितिज चांगला असला तरी त्याची ग्रे साईड वैभव ला माहिती होती आणि त्याचा रावणाच्या दहा डोक्यांसारखा चालणार मेंदू ही तो चांगलाच जाणून होता. मागच्या आठवड्यात त्यामुळे जेव्हा क्षितिज अगदी वेळेवर त्याच्या इथे येऊन टपकला तेव्हा पासून त्याने आत्तापर्यंत काहीही विचारले नव्हते मात्र आता त्याला राहवून नव्हतं होत.
"सांगतो.", क्षितिज हातातला पेग संपवून समोर झुकला. टिपॉय वरच्या डब्यातून त्याने एक विल्स काढून शिलगावली, हातामधल्या ग्लास मध्ये आइस बकेट मधून दोन बर्फ़ाचे तुकडे टाकले आणि त्यावर त्याची आवडती 'Vat 69' ओतली. एक घोट पिऊन आणि मोठ्ठा झुरका ओढून त्यानें सांगायला सुरवात केली.
"तुला माहितीच आहे त्या दिवशी पूल खेळल्यावर जेवण करून मला निघायला उशीरच झाला होता. फ्लॅट ला जाता जाता मला एक मांजर रस्त्यात दिसलं, तेच हे न्यूटन. मला आवडलं म्हणून मी त्याला फ्लॅट वर घेऊन गेलो. धांडे ला सरप्राईस विसीट द्यायची फार सवय आहे. त्या दिवशी न्यूटनला घेऊन बसलो असतांना अचानक 11 वाजता धांडे आला. मी दार उघडलं, साला फुल चढवून आला होता. आत्ताच आणलेला न्यूटन माझ्या पायात घुटमळत होता. त्याला पाहताच धांडेचा विक्षिप्तपणा बाहेर आला, त्याने आपल्या टोकदार बुटाने बिचाऱ्या मुक्या जीवाला लाथ हाणली तीच हि जखम. मी लगेच त्याला जवळ घेतलं. धांडे ची गच्ची पकडली तर त्याने शिवीगाळ सुरु केली आणि मला लगेच 24 तासात विना डिपॉसिट फ्लॅट सोडायला सांगितलं, तसं न केल्यास पोलीस केस आणि माझ्या एच.आर. ला कंप्लेंट करायची धमकी पण देऊन तो निघून गेला. मी धांडे चा विक्षिप्तपणा ऐकला होता पण अनुभवत पहिल्यांदाच होतो. तो जाताच मी न्यूटनला औषध केलं आणि रात्रभरात माझा प्लॅन तयार केला. व्हिव्हियाना मधल्या सगळ्यांशी त्याचं भांडण होतं. सोसायटीतल्या लोकांनी त्याच्या विरुद्ध एकट्यानं जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र कधी एकत्र त्याच्या विरोधात न आल्यामुळे त्याचा फावत होतं. त्याच्यावर खुनाचा आळ आला असता तर सगळे एकत्र येतील हे मी ताडलं आणि त्याच्या बायकोच्या भुताची गोष्ट विणली ती तर तू आज दहा लोकांकडून दहा वेगवेगळ्या प्रकारे ऐकलीच आहे तिथे माझ्यासोबत आलास तेव्हा.
माझ्या कॉलेज च्या दिवसातील अभिनयाचा अनुभव माझ्या चांगल्याच कामी आला, सोबतच सायकॉलॉजी चा अभ्यास असल्यामुळे मी सोसायटीतल्या सगळ्यांचे प्रेशर पॉंईंट्स व्यवस्थित हाताळून मी ह्या कल्पित आत्म्याची गोष्ट रचली. त्यांना धांडे च्या विरोधात उभं करायला, संशय निर्माण करायला खूप मेहनत करायची गरज मुळी पडलीच नाही, त्याच्या वागण्यामुळे आणि माझ्या विश्वासार्हतेमुळे त्यांनी एकही प्रश्न ना विचारता स्वतः धांडेन खून केला असा निष्कर्ष काढला. त्यांना खरंतर खोट बोलतांना, त्यांच्या लेकरांच्या जीवाला धोका आहे हे पटवतांना मला खरंतर अत्यंत अपराधी वाटत होतं मात्र धांडे ला अद्दल घडवायला हे गरजेचं होतं. त्याचे भाडेकरू परत जाऊ लागले, त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला आणि मांत्रिकाला तब्बल पन्नास हजार द्यावे लागले ते वेगळंच.", क्षितिज खळखळून हसला.

"म्हणजे मीनाचं भूत वगैरे काही नव्हतंच? तो फ्लॅट नॉर्मल आहे", वैभव ने विचारलं?

"नाही रे, असं खरच काही नव्हतं, मी राहिलो मला स्वतः काहीच नाही जाणवलं, आणि आपण विज्ञानाचे शिलेदार रे, अश्या गोष्टींवर तू कसा विश्वास ठेवतो हेच मला कळत नाही. ", क्षितिज उत्तरला.

"नाही रे, माझ्या नात्यात एक काका आहे. अत्यंत प्रामाणिक आहेत. त्यांना सिद्धी प्राप्त आहे म्हणतात सगळे आणि अश्या गोष्टींचं त्यांना खूप ज्ञान आहे म्हणे.", वैभवने एक झुरका मारत सांगितलं.

"पहा बाबा मला माहिती नाही त्या बाबतीत जास्त पण एवढं माहितीय की सर्वात मोठा सैतान माणूस, त्याच्या आतल्या सैतानासमोर सर्व गोष्टी फिक्या आहेत. मुक्या प्राण्याला लाथ मारणाऱ्या धांडे नामक सैतानाला मी आज धडा शिकवून आलोय ह्याचच समाधान आणि हो, आजचा तो मांत्रिक, निव्वळ नाटक करत होता, माझ्याहीपेक्षा मोठा अभिनेता निघाला तो, काय ते घूमणं आणि कच्ची बकरी खाणं, मेथड ऍक्टर साला. इथे सैतानी ताकद आहे म्हणे. आदल्या दिवशी लोकांकडून चौकशी करून आला असेल आजू बाजूच्या. फुकटाचे पन्नास हजार हबकावले धांडे कडून, आज विदेशी पित असेल बार मध्ये बसून एखाद्या", क्षितिज पुन्हा हसला.

तेव्हड्यात क्षितिज चा फोन खणाणला.
रात्री एक वाजता कोण फोन करतंय असा विचार करत त्याने फोन बाहेर काढला. फोन सिद्धार्थ चा होता. वैभवने पण आश्चर्याने क्षितिज कडे पाहिले. फोन का आला असेल ह्याच उत्तर तो उचलल्याशिवाय भेटणं शक्यचं नव्हतं.
क्षितिजने फोन उचलला, थोडं ऐकताच त्याच्या हातातला ग्लास निसटून खाली पडला व खळ्ळ आवाज करून फुटला. वैभवला पुढचं बोलणं ऐकू येत नव्हतं पण क्षितिज प्रचंड हादरलेला दिसत होता. हो मी लगेच येतो सांगून त्याने फोन ठेवला आणि वैभव कडे पाहिलं. वैभव त्याच्याचकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होता.

"धांडे वर पेंटहाऊस मध्ये हल्ला झाला थोड्या वेळाआधी, त्याच्या हातावर चाकूने वार झाले आहेत म्हणे." क्षितीज थरथरत म्हणाला.

----------------------------------------------------

(क्रमश:)

भाग ३ इथे
http://www.maayboli.com/node/57973

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चालू आहे. त्या काळ्या मांजराचं नाव एकेठिकाणी न्यूटन आणि लगेच पुढच्या ओळीत टॉमी झालंय का चुकून ?

छान आहे. पटापट टाका भाग.

धांडेने न्युटन ला लाथ मारली पण तुम्ही टॉमीला औषध लावलंय Happy तेवढं बदला.

अरे अजून क्रमशः आहे का? मी काल मोबाईलवर वाचली, तेव्हा क्रमशः नव्हते. आणि मला पण ती पूर्ण झाल्यासारखीच वाटली. Happy
कचा च्या कथांसारखी.. पुढचं सगळं वाचकांनी समजून घ्यायचं. Happy

सगळ्यांना मनभरून धन्यवाद,
@मित & सस्मित : धन्यवाद, आवश्यक तो बदल केला आहे. टॉमी माझं मांजर, चुकून त्याचं नाव टाकल्या गेलय.

त्या काळ्या मांजराचं नाव एकेठिकाणी न्यूटन आणि लगेच पुढच्या ओळीत टॉमी झालंय का चुकून ? >> मला पन जाणवलं..
मस्त लिहिलाय हा भाग सुद्धा.. पुढील भाग लवकर येऊ द्या..