सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

Submitted by मार्गी on 2 March, 2016 - 15:56

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

जेव्हा जून- जुलै २०१४ मध्ये नंदुरबारला फिल्ड असाईनमेंट करत होतो, तेव्हा अनेकदा जवळच्या डोंगरामध्ये सायकल चालवण्याचं स्वप्न पडत होतं. सातपुडा! खूप डे- ड्रिमिंग करून झालं. शेवटी तसं जुळून आलं. फिल्ड असाईनमेंटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जाण्यासाठी परभणीवरून निघालो, तेव्हा सायकलसुद्धा सोबत होती. नुकतंच चांगलं शतक झाल्यामुळे उत्साह वाढलेला आहे. २० ऑगस्टच्या दुपारी परभणीवरून निघालो. इथून थेट नंदुरबारला जाणारी बस नाही. पण नंदुरबार जवळच्या साक्रीपर्यंत जाते. तिथपर्यंत टपावर टाकून सायकल नेईन आणि तिथून पुढे चालवत जाईन. पहिल्यांदाच इतक्या दूरच्या राईडसाठी सायकल नेतोय.

वाटेत जाताना जिथे कुठे बघण्याची संधी मिळेल, तिथे सायकलची स्थिती बघण्याचा प्रयत्न करतोय. सावलीवरून कळतंय की, सायकल सुरक्षित बांधलेली आहे किंवा एखाद्या शोरूमच्या ग्लासवरून दिसतं आहे की, सायकल ठीक आहे, तेव्हा थोडी चैन पडते आहे. एसटीचे धक्के सायकलला किती बसत असतील अशी काळजी वाटते आहे. पण प्रवास चांगला झाला. अपेक्षेनुसार पहाटे चार वाजता साक्री गावात पोहचलो. आता पहिला प्रश्न सायकल बसवरून खाली उतरवण्याचा आहे. खाली उतरवण्यासाठी कोणीही नाही. घनघोर रात्र असल्यामुळे बस बस स्टँडच्या बाहेरच उभी केली आहे. मी वर जाऊन बघण्याचा विचार केला. पण काहीच कळत नव्हतं. मग कंडक्टरनेच थोडी मदत केली. त्याने वर जाऊन सायकल खाली माझ्या हातात दिली. कशीबशी सायकल खाली घेतली. काही प्रवासी बसलेले आहेत. त्यांना मदतही मागितली, पण ते नुसतेच बघत राहिले. असो.

सायकल तपासली. काहीच झालं नाहीय. सर्व ठीक आहे. टायर्स, ब्रेक, गेअर सगळं उत्तम. आता पहाटेच्या उजेडाची वाट बघावी लागेल. इथून सुमारे ६७ किलोमीटर मला जायचं आहे आणि तेही सकाळचे साडेनऊ वाजायच्या आत. कारण त्यानंतर प्रोजेक्टचं काम सुरू होईल. त्यामुळे आराम करायला वेळ नाहीय. चहा- बिस्किटांचा नाश्ता केला आणि सव्वा पाच वाजता सायकल सुरू केली. रस्ता गूगल मॅपवर बघितलेला आहेच. रस्ता सरळच जाईल, फक्त दोन- तीन वळणं आहेत. आणि रस्ता छोट्या डोंगरांमधून जाईल, पण मोठे घाट नाही आहेत. एक अगदी रोमँटिक राईड सुरू झाली!

अर्धा तास जवळपास अंधारातच सायकल चालवली. आतला रस्ता लागला तशी वाहतुक एकदम कमी झाली. पण काय मजा येते आहे! पावसाळी वातावरणातली प्रसन्न सकाळ! हळु हळु फटफटलं आणि प्रकाश आला. हळु हळु वाहनं सुरू झाली. आणि त्याबरोबरच सुंदर नजारेही सुरू झाले! आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेरा तास बसमध्ये बसूनही शरीर ताजतवानं आहे. काहीच थकवा जाणवत नाहीय. आज पहिल्यांदा वेळेच्या मर्यादेत राईड करतोय. साडे नऊ पर्यंत नंदुरबारच्या थोडं पुढे जायचं आहे. रस्त्यात थांबण्यासारखं ठिकाणही नाहीय. त्यामुळे न थांबता जात राहिलो. हा सगळा ट्रायबल बेल्ट आहे. पण रस्ता अगदी चकाचक आहे. दूरवर पवनचक्क्या दिस्त आहेत. एकामागोमाग एक डोंगर समोर येत आहेत.

आता तर रस्ता अगदी पवनचक्क्यांच्या मधूनच जातोय! आधी कधी पवनचक्की इतक्या जवळून बघितली नव्हती. खूप मजा येतेय. पवनचक्कीची मंजुळ घरघर! इतक्यात वाटेमध्ये एक छोटा क्लाइंबसुद्धा लागला. वाटलं नव्हतं. ह्या रूटवर थोडाच चढ आहे, इतकं बघितलं होतं. पण हा छोटा असला तरी‌ क्लाइंब निघाला. अर्थात् माझा वेग चांगला आहे आणि पुढे मोठा उतार मिळणार आहे. मनातल्या मनात स्वत:ला अनेक धन्यवाद देतोय की, अशा अपूर्व राईडवर येण्याची इच्छा झाली‌ आणि आलोसुद्धा!

एका तिठ्यावर रस्ता विचारावा लागला. सकाळ झाल्यामुळे आता लोक दिसत आहेत. निजामपूर नावाचं एक गाव लागलं. एका बाईकस्वाराने सायकलला तिरपी टक्कर मारली! समोर व आजूबाजूला न बघता चालवणारे लोक! अर्थात् काहीच झालं नाही आणि न थांबता पुढे निघालो. जवळपास अर्धं अंतर झालंय आणि अजून तीस किलोमीटर तरी बाकी असावेत. आता हळु हळु भूक लागते आहे. पण इथे नंतर गावच लागत नाहीय, हॉटेल कुठून असणार. आणि परत एक क्लाइंब आला. सगळ्यात छोट्या ग्रेडचा. आता कदाचित मोठा उतार लागेल. पण रस्ता सरळच जाताना दिसतोय. सुंदर नजारे असले म्हणून काय झालं, हळु हळु शरीर थकायला लागलं. नंतर मग उतार मिळाला. आता हा उतार किमान पंधरा- वीस किलोमीटर तरी चालेल.


रूट मॅप


छोटे क्लाइंब

उतारामुळे परत स्फूर्ती आली आणि गतीसुद्धा वाढली. त्यामुळे सुमारे तीन तासांमध्ये ५० किलोमीटर पूर्ण जाऊ शकलो आणि एका गावात नाश्त्याचं हॉटेलही मिळालं. घाईघाईत नाश्ता करून पुढे निघालो. नऊ वाजले आहेत. थोडं अंतर बाकी आहे. नंदुरबार शहर जवळ येत गेलं. उतार चालूच राहिला. नंदुरबार शहर ओलांडलं आणि प्रकल्पाच्या जागी पोहचलो. साडे नऊ वाजले आहेत. अर्थात् जेमतेम सव्वा चार तासांमध्ये मी हे ६७ किलोमीटर ओलांडले! विश्वास बसतच नाहीय. खरं पाहिलं तर खूप मोठी जोखीम होती. जर सायकल पंक्चर झाली असती, तर वेळेवर पोहचणं शक्यच नव्हतं. पण मी स्वत:च्या इच्छेला मान दिला आणि आलो निघून. आता फ्रेश होऊन लगेच फिल्डवर जायचं आहे. इथले लोकही चकित आहेत- सायकलवर साक्री ते नंदुरबार? आता पुढचे डोंगर बोलवत आहेत. योगायोगाने त्याच दिवशी सातपुड्यातल्या फिल्डवर जाणं झालं! खरोखर अगदी ड्रीम- राईड झाली ही! मला किती बरं सद्बुद्धी झाली इथे सायकल आणायची!

पुढील भाग १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users