डिजिटल सावली
काळी सावळी असली म्हणून काय झालं?
माझं, माझ्या सावलीवर बेहद्द प्रेम आहे.
कारण तीची-माझी पक्की सोयरीक आहे.
बर्या-वाईट दिवसात, रात्री-बेरात्रीही
माझ्या मनात वादळ घोंगावतं,
त्याच्या लाटा तीच्या अंगावर खळाळतात.
मी कधीमधी खंतावतो तेंव्हा
ती हताश सुस्कारे सोडते.
आमच्यातील अनुबंध कालातीत आहेत,
वादी-संवादी सुरांच्या जोडी इतके पुरातन..
आताशा मात्र तीचं अगदीच बिनसलंय,
सारखी फुरंगटून बसते, चिड-चीड करते.
तीला कुरंगी रहायचा कंटाळा आलाय,
एव्हढंच नव्हे, तीला आता डिजिटल व्हायचंय.
"ब्लक अॅन्ड व्हाईटचा जमाना गेला,
त्यालाहि एक जमाना झाला," म्हणते.
कुणीतरी आपल्यावर लादलेला बेरंग झुगारून
करून पहावं मिक्स अअॅन्ड मॅच, तिला वाटतं.
"कसल्या संम्वेदना आणि स्पंदनं घेउन बसलायस,
कुठल्या श्रद्धा अन मूल्यांसाठी डोळे गाळतोयस?
आज-काल सायबर स्पेस मधे सारं काही मिळतं,
डिजिटल फॉर्मॅटमधे, रेकोर्डेड असतं.
'एडिट' होतं 'सेव्ह' किंवा 'डिलिट' होतं ,
'कट अॅन्ड पेस्ट'हि सहज करता येतं.
तुझी नव-निर्मिती इथे हवीय कुणाला?
जरा इंटरनेटवर जाउन तर पहा.
आपण फक्त 'डायल अप' करायचं,
काय हवं ते 'डाऊन-लोड' करून घ्यायचं.
आवडलं तर लाइक म्हणायचं,
नाही तर अनलाइक करायचं.
तुझं म्हणजे अगदीच जुनाट खोड झालंय,
तू तरी बदल, नाहीतर मला फारकत तरी दे."
-बापू करंदीकर