पद्मा आजींच्या गोष्टी ४ : वकिलाचे औषध

Submitted by पद्मा आजी on 14 February, 2016 - 14:44

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
तुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार. अभिप्राय पाठवत राहा अशी विनंती.

फार जुनी गोष्ट आहे ही. मी लहान होते. प्रायमरी शाळेत असेन. आम्ही तेव्हा अमरावतीला रानड्यांच्या वाड्यात राहत होतो. मोठे होते घर. बंगल्या टाईपच होते. समोर बाग केली होती वडिलांनी. त्यांना हौस होती फार. बागेत बसून सारखे पुस्तके वाचायचे ते. आम्ही भावंडेही सारखे बाहेर खेळत असू. वरती मोठी गच्चीही होती.

त्या काळी एकदा अमरावतीला न्युमोनिया (Pneumonia) ची साथ आली होती. पूर्ण शहरात. प्रत्येक घरात एक तरी न्युमोनिया चा पेशंट असायचा. माझ्या सगळ्या मैत्रिणीच्या घरी ही कोणीनकोणी तर आजारी.

मला तर भीती वाटायची फार की मी आजारी पडते की काय. तापाची तर होतीच पण खेळायला मिळणार नाही त्याचे काय?

पूर्ण शहरातल्या साथीने डॉक्टरही सगळे हैराण झाले होते. तसे तर तेव्हा डॉक्टरही फार नव्हते. लोकांना लांब लांब जावे लागे डॉक्टर शोधत शोधत.

आम्ही वाचलो की काय साथी पासून असे म्हणता म्हणता झाले एक दिवस माझी आजी आजारी पडली न्युमोनिआने. सुदैवाने माझ्या वडिलांचे होते तीन-चार डॉक्टर मित्र. म्हणून थोडे बरे होते. एक डॉक्टर आला लगेच. त्याने काही औषधे दिली पण काही फरक पडला नाही. दोन दिवस गेले. आजी फार कळवळायची.

मग वडिलांनी काय केले -- त्यांना बरीच औषधे माहिती होती आयुर्वेदाची. जवस, त्यात कांदा आणि सुंठ असे एका पातेल्यात टाकून त्याला कढविले व पोटीस बनविले. ते पोटीस त्यांनी आजीच्या छातीवर आणि पोटावर लावले.

दोन दिवसांनी हाउस कॉल करत करत डॉक्टर आला तर चकित पडला. आजीचा ताप उतरलेला. धाप लागणे बंद. थोडा खोकला उरला होता तेवढाच. म्हटला केले काय? कुठलाच पेशंट बरा होत नाही लवकर आणि तुम्ही कशा झाल्या?

मग वडिलांनी सांगितले त्याला पोटीस बद्द्ल. चांगले आहे, चांगले आहे म्हणत गेला धावत दुसरी कडे.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पाच वाजता 'वकील साहेब, वकील साहेब' म्हणून बाहेर आवाज. वडिलांनी दरवाजा उघडला तर समोर एक माणूस. म्हणाला "डॉक्टर साहेब तुमच्या औषधबद्द्ल बोलले काल. कृपया मला द्या औषध. भाऊ आजाराने फणफणला आहे."

वडील म्हणाले, "अरे मी तर वकील आहे. मी काय तुला औषध देणार. घरातले माणूस होते म्हणून प्रयोग केला. तू डॉक्टरकडून घे औषध. मी सांगितले आहे, त्याला कसे बनवायचे ते."

पण माणूस काही जायला तयार नाही. मग शेवटी वडिलांनी थोडे पोटीस उरले होते ते त्याला परत गरम करून दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा उघडतो तो काय, बाहेर पाच जण उभे. कालच्या माणसाच्या भावाला गुण आला म्हणून तो अजून लोक घेवून आला होता. बरेच प्रयत्न केले पण ऐकायला तयार नाही.

मग काय वडिलांनी आईला सांगितले चूल पेटवायला. तिने एका मोठ्या भांड्यात पोटीस बनविले. वडिलांनी देताना बजावून सांगितले "पुढे कोठे सांगू नका. मी डॉक्टर नाही. मला वेळ नाही."

"हो हो. अजिबात नाही." असे म्हणत ते लोक गेले.

झाले! ते लोक जावून तास उलटत नाही तर अजून लोक दारात.

लोकांनी वडिलांना इतका आग्रह केला की काही सोय नाही. लोकांचे तरी काय. साथीची भीती. सगळे घाबरलेले. डॉक्टर ही किती पुरा पडणार. वर घरी माणूस आजारी. आश्या वेळी थोडा आधार ही फार मोठा वाटतो.

एकंदरीत कल बघता वडील काही म्हणण्या आधीच आई म्हणाली माझ्या बहिणीला "की ठेव भांडे चुलीवर" आणि मला पिटाळले तिने वाण्या कडे जवस आणि कांदे आणायला.

मग काय. गर्दी व्हायला सुरुवात झाली. पोटीसने फायदा ही झाला फार. वरून लावायची गोष्ट होती म्हणून वडील पण देत होते. बाकीच्या डॉक्टर मित्रांनी पण पेशंट पाठविले. आईने तर बाहेर बागेतच मोठी चूल मांडली आणि एक मोठे भांडे उकळत होते तिथे कायम.

लोक पैसे द्यायचे पण वडिलांनी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. कितीही नाही म्हणा तरी मग लोक कधी गहू नाही तर बाजरी, जवस, नाहीतर फळे घेऊन यायचे. वडील तर ओरडायचे त्यांच्या वर. पण लोक गोष्टी बागेत ठेवून पळून जात.

जवळ जवळ दोन महिने आम्हा सगळ्यांना एकच काम. चूल लावा. पोटीस बनवा. पुड्या करा आणि लोकांना द्या. जवस आणि कांद्याच्या वासाने डोके भणभणून जायचे अगदी. शाळेत बेंचवर मुली बाजूला बसायला टाळायच्या. पण बरे वाटायचे जेव्हा लोकांना फायदा व्हायचा तेव्हा.

अशा प्रकारे जवळ जवळ दोन महिने वडिलांनी वकिली बाजूला ठेवून डॉक्टरगिरी केली आणि मी कंपाउंडरगिरी.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाय नाय... पोटीस म्हणजे, वर जसं कांदा, जवस इ दिलंय ते शिजवून कापडात पुरचुंडी बांधतात. ती पुरचुंडी म्हणजे पोटीस. वेगवेगळ्या प्रकारानी करतात कांदा शक्यतो असतो. गळू लवकर पिकून गळवायचा असल्यास आजी करून द्यायची पोटीस. हा एक मला माहीत असलेला प्रकार.

पद्मा आजी,
तुमच्या सगळ्याच गोष्टी साध्या सोप्या आणि मस्त असतात. लिहीत राहा.

योकु म्हणतात ते बरोबर आहे. पोटीस कापडात बांधलेलं असतं. ते गरम करून त्याचा शेक देतात. गळू लवकर पिकावं आणि त्याचा निचरा व्हावा म्हणून, छातीतला कफ बाहेर पडावा म्हणून. बहुदा दोन पुरचुंड्या बांधल्या जातात. एक तव्यावर आणि एक पेशंटच्या अंगावर. अंगावरची पुरचुंडी थंड होईपर्यंत तव्यावरची गरम होते. मग अदलाबदल. असं कितीही वेळा करता येतं.

टीना,

पोटीस म्हणजे विरविरीत कपड्या मध्ये गुंडाळलेले सहन होण्या ईतके गरम मिश्रण त्वचेवर ठेवणे. जेव्हा मिश्रणात कांदा, लसुन वगैरे असते तेव्हा त्वचा आणि मिश्रणामध्ये कापड ठेवावे.
आद्त्रता टिकून राहण्यासाठी काही वेळा त्याच्यावर प्लास्टिक पण वापरतात.

पद्मा आजी मस्तच आहे गोष्ट. अगदी परकर पोलकं घालून तुमच्या भोवती बसून ऐकण्यात जशी मजा आली असती तशीच आली अगदी. ......... +१

पद्मा आजी, तुम्ही गोष्टी सांगत राहा, आम्ही ऐकत राहतो. अगदी निर्मळ गोष्टी आहेत तुमच्या.