या सगळ्या धावत्या कथेला एक साइडट्रॅकही होता. माझ्या एका क्लायंटचे काम प्रिटींगमधे होते. ते शुक्रवारी दुपारी मिळणार होते. ते तिथून घेऊन अमरावतीसाठी ट्रान्स्पोर्ट मधे त्याच दिवशी टाकायचे होते. अमरावतीला जाणारी प्रायवेट लग्जरी बस साडेसात वाजता नाशिकहून निघते. दुसरी व शेवटची आठ वाजता निघते. त्यानंतर अमरावतीला जाणारी बस नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ते पार्सल सात वाजताच्या आत ट्रान्स्पोर्टमधे टाकणे गरजेचे होते. सगळे फिक्स असल्याने मला त्याची काळजी नव्हती. पण हे अचानक गुजरातला जायला निघायला लागल्यामुळे सगळे ठोकताळे बिघडणार अशी शंका मला आली. कारण शुक्रवारी मी पोचलो नाही तर शनिवारी प्रिंटीग प्रेस बंद असल्याने ते पार्सल मला मग रविवारी मिळाले असते आणि मग रविवारी संध्याकाळी ते ट्रान्स्पोर्टला गेले असते. क्लायंटला ते सोमवारी मिळाले असते. पण क्लायंटने ताकिद दिलेली असल्याने कुठल्याही परिस्थितीत ते त्याला शनिवारीच सकाळी मिळणे आवश्यक होते. ह्या परिस्थितीची जाणीव येताच मला काळजी वाटू लागली. मी तसे रेडकरला बोललोही. तर आपण चार वाजेपर्यंत नाशिकमध्ये परत पोचू असा त्याने विश्वास दिला होता. तरी शंकेची पाल चुकचुकत होती.
सदाशेठ फॉर्मात आला होता. गप्पांचा फड रंगला होता. खड्डे आणि स्पीडब्रेकरची मोजदाद माझे शरिर उत्साहाने करत होते. वीसेक किमी गेल्यावर गाडी आतल्या रस्त्याला वळली. पंढरीनाथ यांचे घरून त्यांचे कपडे-बॅग घ्यायची होती. त्या छोट्याशा गावात भर रात्री आम्ही घुसलो. मोठ्याने बडबड चालू होती. रेडकर बोलला, "अरे, आरडाओरडा करू नका नाहितर लोक आपल्याला चोर समजून मारतील." खरंच रात्रीचा एक वाजला होता ना! आम्ही तिथून पटकन निघालो. परत रस्त्याला आलो. सुमारे सत्तर-ऐंशी किमी झाल्यावर सदाशेठला पेंग यायला लागली. त्याने शिस्तीत गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. मला म्हणाला की प्लीज, तुम्ही घ्या साहेब आता.
मी जागा बदल केली. स्टीअरिंग हाती घेतले. ड्रायविंगसीटवर बसल्यावर गाडी वेगळीच भासत असते. तुम्ही कुठल्याही कारमधे इतर कुठल्याही ठिकाणी बसून कितीही प्रवास केलेला असू दे, ड्रायवर सीटमधे पहिल्यांदा बसाल तेव्हा त्या कारमध्ये खरंच पहिल्यांदा बसतोय असा फील येतो. कारण त्या क्षणाला तुम्ही खरोखर कारशी तादात्म्य पावत असता. तुम्हाला चार चाकं फुटलेली असतात. तुमची फुफ्फुसं गाडीचं इंजिन झालेली असतात. मन अॅक्सिलेटर आणि हृद्य ब्रेक झालेलं असतं. नजर मोठी होते, सहसा न दिसणार्या गोष्टी, वस्तू, हालचाली दिसायला लागतात. इथे थोडी गंमत होती. रात्रीच्या अंधारामुळे व वेळ कमी असल्याने बैठ्या जागेवरुन बटन्स, स्विचेस इत्यादींचे निरिक्षण करण्यास वेळ आणि परिस्थिती नव्हती. फक्त स्टीअरींग, गीअर्स आणि क्लच-ब्रेक-अॅक्सि या पंचमहाभूतांशी ओळख करून प्रवास सुरु केला. म्हटलं सविस्तर ओळख होईलच नव्या मैतरणीशी... चालता बोलता.
नव्या वाहनात पहिल्यांदा चालवतांना बसतो तसा, अंदाज नसल्याने, पहिला गचका बसताच दारुड्यांना जणू स्वर्गाचे आमंत्रण आल्याचा साक्षात्कार झाला. सगळे ओरडले, "ओ साहेब, जरा सांभाळून". मी म्हटलो, "लेको, प्यायली तुम्ही आहे. मी नाही. त्यामुळे जरा अजून दहा-वीस किमी सहन करा. सदाशेठचे हिशोब चुकते करेपर्यंत."
स्कॉर्पियो. महिन्द्रा अँड महिन्द्रा ला वाहनबाजारात प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी एक फ्लॅगशिप एसयुव्ही. संपूर्णपणे भारतात संशोधीत आणि निर्मिती झालेली, अख्या जगात निर्यात होणारी महिन्द्राची शान आणि भारताचा मानही. सुमारे २१०० सीसीचं दमदार एमहॉक इंजिन आणि अग्रेसिव स्टायलिंग. ही गाडी २००२ मध्ये पहिल्यांदा बाजारात आली आणि तिने सगळ्यांचा बाजार उठवला. महिन्द्राने तिला ग्लोबल पोझिशनिंग देण्यासाठी अगदी रीच, हटके, जाहिराती केल्या. तिला एक वेगळी उच्च दर्जा, उच्च-श्रीमंत वर्तुळात नेऊन ठेवणारी इमेज देण्याचा प्रयत्न केला. पण गावागावात, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून, रस्ते नसलेल्या खेड्यांमधून सुसाट धुरळा उडवत जेव्हा पांढर्या स्कॉर्पोयो धावू लागल्या तेव्हा मस्तवालपणा, टगेगिरीला आपली एक ओळख मिळाली. गावोगावच्या पुढार्यांना, राजकिय नेत्यांना आपला प्रेझेंस जाणवून देण्यासाठी एक दमदार मार्ग मिळाला. सुबत्ता, सत्ता, पॉवर, दहशत या शब्दांचा दुसरा अर्थ एक पांढरी स्कॉर्पियो इतकाच उरला. जागतिकिकरणाने आलेल्या सुबत्तेचे वारे गावागावांमधून शिरले ते ह्या पांढर्या स्कॉर्पियोंच्या दुधाळ लाटांमधूनच. महिन्द्रा आणि आपल्या सर्व भारतीयांच्या सुदैवाने स्कॉर्पियोची आपल्या मनात झालेली ही इमेज निर्यात होणार्या देशांमधे पोचली नाही. अन्यथा एकही स्कॉर्पियो निर्यात झाली नसती. भारतात अनेक गाड्या येतील, जातील. स्कॉर्पियोने जनमानसावर सोडलेली छाप कुणालाच जमलेली नाही आणि जमणारही नाही. तुम्ही मारुती८०० चे नाव घ्याल, ती फक्त त्या काळातल्या नवश्रीमंतांची नवलाई. पण सर्व स्तरांमधल्या लोकांना स्पर्श करून जाणारी (कधी कधी अक्षरशः), भारतीय समृद्धी-सत्तेचे-संस्कृतीचे प्रतिक बनली फक्त स्कॉर्पियो.
असे बरेच विचार डोक्यात घोळत होते. ही लाँच झाली २००२ मध्ये, मी तीत बसायला २०१५ उजाडले. काय काय असतं आयुष्यात. बसलो ते थेट चालवायलाही मिळाली. तीही नव्या मॉडेलची नवीनवी गाडी. काय काय असतं आयुष्यात.....
मागे बसलेले पंढरीनाथ गुगलमॅपवरून संभ्रमित मार्गदर्शन करत होते. गुगलबाई त्यांना लाडे लाडे, "उजवीकडे वळा ना गडे, डावीकडे वळा ना गडे" सुचवत होती. ती बाई सांगत असलेले रस्ते पुढ्यात दिसत नसत हा भाग वेगळा. हे सगळं घडत असतांना, तुमच्या लक्षात आलेच असेल, नीट रस्ता कुणालाच माहित नव्हता. बोंबला! माझ्या डोक्याची मंडई झाली. अरे हे काय चालंलय तरी काय...?
मग उरलेली लोकं रस्ता सुचवायला लागली. मग मला कळले हे नेहमीचेच जाणारे आहेत. तरी नेहमी रात्रीचेच जात असल्याने नीट रस्ता लक्षात येत नव्हता. आम्ही कुबेर नावाच्या ठिकाणी जात आहोत. अजून सुमारे तीनशे किमी बाकी आहेत. रात्रभर मलाच चालवायला लागणार हे स्पष्ट होते. दोन तीन ठिकाणी रस्ता चुकल्यासारखा वाटल्याने विचारून खात्री करून घ्यायला रस्त्यावर काळं कुत्रं नव्हते. मग गुगललाच शरण जावे लागे. मध्येच एकदा कुणीतरी ओवरकॉन्फीडन्समधे, अर्धवट काहीतरी सांगून फ्लाय-ओवरच्या खालून निघून सरळ जायचं एवढंच सांगितलं. फ्लायओवरच्या खालून निघून रेल्वे फाटक ओलांडून पुढे चांगले वीसेक किमी गेल्यावर कळले की ये वो रस्ता नही. अगदी अगदी निर्जन रस्त्यावर पुढे बाइकवर दोघे जातांना दिसत होते. मी भरधाव त्यांच्या मागे गाडी घातली. त्यांना हॉर्न मारून पोलिसस्टाइलने बाईक थांबायला भाग पाडले. ते एक पंचविशीतले कपल होते. दोघेही मुस्लिम दिसत होते. मुलगी-मुलगा दोघेही टेन्शनमधे आलेले दिसत होते. कारण आम्ही जिथे थांबलेले होतो तिथून कितीही ओरडले तरी पंचवीस किमीच्या परिसरात चिटपाखरू नव्हते साद द्यायला. त्याची अवस्था लक्षात घेऊन आम्ही शांतपणे त्याला रस्ता विचारला. तो बोलला, तुम्ही फार पुढे आलात, आता मागे जा. आम्ही म्हटले, अरे इतकं पुढे आलोच आहोत तर इथून पुढेच जाता येणार नाही का? तो म्हणाला, जाता येइल हे खरे पण साठ-सत्तर किमी अजून वाढतील. मी मुकाट गाडी फिरवली. परत येऊन त्याच रेल्वे क्रॉसिंगवर थांबलो. आता फाटक बंद होते. मी गाडी बंद केली आणि उतरून एक नंबरला गेलो. पुढे रस्त्यात कुठेही थांबणे धोकादायक असू शकले असते वा काहीही. सुशेगाद दोन रेल्वे इकडून तिकडून गेल्यावर फाटक उघडले. राइट मारून आम्ही आता राईट रस्त्यावर लागलो.
पुढे येणारा रस्ता मिश्र पद्धतीचा होता. कुठे चांगला, कुठे वाईट. बरीच कामे सुरु होती. कधी प्रचंड पटांगणाएवढे रस्ते तर कुठे बॉटल-नेक्ड. कुठे नुसती खडी तर कुठे भक्कम टाररोड. कधी घाट लागायचा, विचित्र वळणे, अनोळखी... पुढच्या वाहनांचे प्रखर दिवे. संथ ट्रक्सचे हत्तींसारखे हळूहळू, रोरावत चालणे. इनोवा, तवेरा गाड्यांचे झुईं झुईं करत मुंग्यांसारखे मधल्या जागांमधून वाट काढत जाणे. सिंगल-लेन रोडवर रात्रीचे वाहन चालवणे अतिशय थकवून टाकणारा प्रकार आहे. तुम्ही सेफ डिस्टंस म्हणून जी जागा सोडता, तिथेच अलगद येऊन कुठलं तरी वाहन ते डिस्टंस अनसेफ करून टाकतं. मग तुम्ही आणखी मागे येता. मग कालांतराने कळतं, रांगेत तुम्ही इतरांना आपली जागा देत देत मागे चालला आहात. याचा कंटाळा येऊन तुम्ही ओवरटेक करायला जाता तेव्हाच नेमकी पुढल्या बाजुने एक दहा-बारा ट्रकांची लांबच लांब रांग येत असते. मर्फी'ज लॉ, यु नो. पण स्कॉर्पियो घाटावर चढायला अगदी संयत वाटत होती, तेवढाच काय तो सुकून. लो-एन्ड टॉर्कची गंमत छातीत गुदगुली करते, झोका घेतांना वर जातो तशी हळुवार....
सर्व घाट-घुट, छाट-छुट रस्ते पायदळी तुडवल्यावर तो ऐतिहासिक क्षण, तो रस्त्यांचा भिष्म-पितामह आला. शरपंजरी पडलेल्या भिष्माचार्यांच्या देहात जेवढे तीर नसतील तेवढे दगड ह्या रस्त्यात रुतून बसलेले. हा रस्ता किती लांब होता ते ठावूक नाही. तो दोन किमी होता की दोनशे हे काहीच आठवत नाही. आठवते ते इतुकेच की मी जणू रात्रभर शून्य गतीने ह्या रस्त्यावर किती दगडं आहेत हे मोजत होतो. चारही चाकांची कसरत चालली होती. आदळआपट वाचवत होतो. कारण गाडीत झोपलेली गलितगात्र जनता उठून माझ्या नावाने शंख करु नये म्हणून. इथे स्कॉर्पियोच्या मर्यादा उघड्या पडत होत्या. लो-एन्ड टॉर्क असला तरी स्टीअरींग कंट्रोल उत्तम नाही, सस्पेन्शन सरकारी हापिसातल्या बाबुंसारखे मख्खं अन् तटस्थ बसलेले. त्यांना माझ्या कसरतीची दयामाया काहीच वाटत नव्हती. "तुम्ही काट्या-धोंड्यांतून जाताय का मखमली चादरीवरून, आम्हाला काय घेणे-देणे नाही, कायद्यात आहे म्हणून सस्पेन्शन बसवून दिले आहे. ते काम करतंय की नाही याच्याशी आमचा काय संबंध नाय. आम्हाला तर वाटते, तुम्हालाच गाडी चालवता येत नसेल." असे, सरकारी भाषेत काहीसे, आनंद महिन्द्रा माझ्याशी फोनवरुन बोलून सांगतोय असा भास होत होता. हा रस्ता एक नाइटमेअर झाला होता. तो संपायचे काही नाव घेत नव्हता. शेवटी गाडी थांबली आहे की काय असा संशय येऊन एक एक प्रवासी जागा झाला. सगळे जागे झाले असे बघताच मी त्यांनाही दगडं मोजायच्या कामावर रुजू करून घेतले. तसं मग त्यांनी गुजरात मॉडेलच्या नावाने किर्तनाचा कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली.
कसा-बसा तो रस्ता संपला. मग दोन्हीकडे दाट जंगल असलेला रस्ता सुरु झाला. हा होता बरा, पण अजब रंगसंगतीवाला होता. सुमारे पंधरावीस किमी पर्यंत हा समांतर तीनचार पट्यांनी बनलेला होता. काळे-पांढरे-तपकिरी-पांढरट. एखाद्या चित्रकाराने काळ्या कॅनवासच्या लांबच लांब पट्टीवर पांढर्या रंगाच्या ब्रशने फटकारा ओढत जावा तसा.... जास्त खड्डे वैगेरे नसल्याने हा रस्ता मला आवडला. तो कोणत्याही रंगाचा असता तरी मला आवडलाच असता कारण त्याने माझी एका भयंकर अनुभवातून सुटका केली होती. दोन्ही बाजूने दाट जंगल असल्याचा उलगडा दुसर्या दिवशी झाला. आम्ही अभयारण्यातून जात होतो हे दुसर्या दिवशी घरी येऊन रस्ता गूगलून पाहयल्यावर कळले.
बर्याच ठिकाणी सहापदरी हायवे बांधण्याचे काम सुरू होते बहुतेक. एकदा असाच वळणा-वळणांवरून, छोट्या रस्त्यांवरून येताच समोर असा छान सपाट, गुळगुळीत रस्ता दिसला. हर्षोल्हासाने अॅक्सिलेटरवर पाय देऊन उभा राहिलो. पण लगेचच ५० मीटरवर गतीरोधक टाकून तो दिव्य रस्ता बांधणार्याने आमच्या खडे पैरपर दंडा मारला. आमच्यासकट आमच्या सहप्रवाशांच्या पाठीत कणा आहे याची जोरदार खात्री यानिमित्ताने करून घेण्यात आली. तीही दोनशे मीटरमधे तब्बल चार वेळा. तो प्रिय समारंभ इतक्या सौहार्द्रतेने पार पडला की पुढे हेमामालिनीच्या गालासारखा गुळगुळीत रस्ता आला तरी आम्हाला आमचे संतुलन ढळू देण्याची अजिबात हिम्मत झाली नाही.
रात्रीचा अंधार, रोरावणारे ट्रक्स, वेगवेगळ्या आकाराचे अजस्त्र धूड. प्रवास हाच एक थांबा असतो, एक जग असतं, एक गाव असतं. कित्येक वाहनांमधून कित्येक कुटूंबाचे पोट भरणारे कर्ते स्टीअरिंग व्हील धरून बसलेले असतात. त्यांना त्यांचे गाव, कुटूंब कित्येक दिवस दिसत नाही. ह्यांच्या पोटात चार गरम घास पडावेत म्हणून आपली गावं सोडून निर्जन ठिकाणी धाबा टाकून बसलेले सरदराजीलोक. ह्या लोकांचे भावविश्व टिपायला आपल्याकडे शब्द नाहीत बुवा. तसे पाहिले तर जगात प्रत्येकजण कष्ट करतो. प्रत्येकाची आपआपली कहानी...
ह्या रोरावणार्या महासागरात, मीही आपली एक कहानी घेऊन अनिश्चिततेच्या लाटांवर स्वार झालेलो. अनोळखी रस्त्यांवर, अनोळखी गाडीमधे, अनोळखी लोकांसोबत, अनोळखी प्रवासात, अनोळखी गंतव्याच्या दिशेने एक अनोळखी भावना मनात ठेवून तरंगत चाललो होतो. पुढे... पुढे... अजून पुढे....
-----------------------------------------------------------------------------------------------
क्रमशः
(पुर्वप्रकाशित. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. लेखकः संदीप डांगे.)
मस्त चालल्ये गाडी
मस्त चालल्ये गाडी
शेवटचे भाग कधी टाकणार? लिहा
शेवटचे भाग कधी टाकणार? लिहा पट्पट
मस्त आहेत आत्तापर्यंत वाचलेले
मस्त आहेत आत्तापर्यंत वाचलेले तीनही भाग.
मस्त...आम्हीपण अदृश्यावस्थेत
मस्त...आम्हीपण अदृश्यावस्थेत स्कॉर्पियो मधे आहोत. इतक डीटेलवार लिहल आहे.आवडल.