एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग २

Submitted by नानाकळा on 9 February, 2016 - 10:47

पहिला भाग

आमची वरात पिंपळगाव सोडून पुढे निघाली. रमेशभाऊ येणार नाही हे कळले. त्यांची वॅगनार त्यांच्या घराच्या दिशेने निघून गेली. स्कॉर्पिओ सुसाट निघून गेलीच होती. लोखंडे पंधरा बॉक्सेस खांद्यावर घेऊन चालत असल्यासारखा गाडी चालवत होता. आपण नेमकं काय करायला ह्या लोकांसोबत आलोय हेच मला कळेनासे झाले होते. गाडी हायवेवरून परत कुठल्यातरी छोट्या रस्त्याला वळती झाली. हा रस्ता नक्की गुजरातकडे जातो काय याची काहीच खात्री नव्हती. हा टूर कशाचा आहे, काय चाल्लंय काय? सोळाव्या बॉक्सला इतर पंधरांसोबत अजून किती काळ जमवून घ्यावे लागेल? डोकं फिरायला लागलं. अर्धी रात्र इथेच होत आहे. पुढे काय वाढून ठेवलंय देव जाणे.

परत लोखंडे-रेडकरांचे दोन-तीन फोन झाले. तेव्हा लोहणेरे हे माणसाचे नाव नसून गावाचे नाव आहे असे कळले. आम्हाला ह्या पेट्या घेऊन कंपनीने तिथे नियुक्त केलेल्या माणसाकडे वॅगनार सकट सोपवायच्या होत्या. सकाळी तो त्या विवक्षित डीलरकडे पोचवणार होता. ह्या रस्त्यावरच ते गाव येण्याआधी दोन-चार हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आणि बार. त्यातल्या एका हॉटेलसमोर ती स्कॉर्पिओ थांबलेली दिसली. लोखंडे बोलला, "इथेच थांबलेत जेवायला ते लोक, आपणही कार देऊन परत इकडेच यायचंय. साहेब बोल्ले इकडे त्या मोरेला घेऊन येऊ नका. परस्पर बाहेरच पिटाळा त्याला."

(मागच्या काही दिवसांमधे भरपूर भटकंती झाली, त्यात एक गोष्ट निरिक्षणात आली ते की एखाद्या भागाची समृद्धी, श्रीमंती ही त्या भागात किती बार-हॉटेल्स आहेत त्यावरून लक्षात येते. लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि तो फक्त दारू-मटणात उडवायचा इतकीच त्यांना अक्कल आहे. दोन मोसम कठीण गेले की मग सरकारपुढे हात पसरायचे. असो.)

आम्ही ते हॉटेल ओलांडून पुढे गेलो, एका गावात घुसलो, मुख्य रस्त्यावर थांबलो. गावात चिटपाखरू नसल्यागत चिडिचूप होते, वाजले होते साडे-अकरा. गावात कोण जागं नसतं. भयाण शांततेला कापत एक पोलिस वॅन सुसाट वेगाने आमच्याकडे येतांना दिसली. आता डिक्की-खोला, काय घेऊन चाल्लात, कुठून आलात वैगेरेची सरबत्ती होऊन दोन-पाचशे इकडे तिकडे होणार याचा अंदाज आला. ती वॅन आली तशी आम्हाला वळसा घालून निघून गेली. मला उगाचच जीव भांड्यात पडल्यासारखं वाटलं. प्रस्तुत परिस्थितीत उगाचच टरकणे साहजिकच होते.

लोखंडेने त्या गावातल्या व्यक्तीला, मोरेला फोन केला होताच. तोही रात्री-बेरात्री उठवतात म्हणत शिव्या घालत आला. आल्यावर दोघांची बातचित झाली. त्यात मोरेला पगार मिळाला नसल्याने तो नाराज असल्याचे जाणवत होते, लोखंडे त्याला दुजोरा देत होता. त्याचे एकूण बोलणे ऐकून मला वाईट वाटत होते. कुणाला पगार मिळाला नाही की वाटतेच. (पुढे दहा दिवसांनी मोरेचा तीन महिन्यांच्या सॅलरीचा हिशोब माझ्यासमोरच झाल्यावर हेच वाईट मला रेडकरबद्दल वाटत होते. मोरेमहाशयांचे फक्त पाच टक्के पैसे बाकी होते, तेही रेडकरने लगेच खिशातून काढून देऊन टाकले. बाकी वेळोवेळी दिले गेले होते. तरी रडगाणे...) आम्ही त्याला घेऊन परत हॉटेलकडे निघालो, मोरे सतरावा बॉक्स होता. पण आता पाच मिनिटच -खरोखरचे- राहीले असल्याने दुर्लक्ष केले.

हॉटेलच्या बाहेर वॅगनार मोरेला सुपूर्द केली, त्याने ती घेतली आणि निघून गेला. मी हा जो हॉटेल-टु-गाव-गाव-टू-हॉटेल हा प्रवास उगाचच घडला त्याबद्दल बोलावे की नाही ह्या विचारात हॉटेलमधे शिरलो. आम्ही मंडळींना शोधत होतो. सर्च वारंट असल्यासारखे एक एक डायनिंग हॉल आम्ही शोधत होतो. कारण तिथे बराच भुलभुलैय्या होता. समोर गार्डन-रेस्टोरंट, मागे छोटे छोटे झोपड्यांच्या आकारातले क्युबिकल्स. दोन वेगळी होटेल्स पण इण्टरनली कनेक्टेड. आमची मंडळी नेमक्या कुठल्या जागी बसली हेच कळत नव्हतं. आणि हॉटेलमधे इतर कोणीही ग्राहक नव्हते. शेवटी चारवेळ ज्या एसी हॉलसमोरनं गेलो तिथेच हे बसले होते. आत गेलो तर रेडकर, पंढरीनाथ, सदाशेठ बसलेले होते. अ‍ॅन्टीक्विटी, ब्रीझर ठेवलेली. हस्तांदोलनं झाली आणि मला पिण्याचा आग्रह केला. मी रात्री कदाचित , कदाचित काय निश्चितच गाडी चालवायला लागेल म्हणून नको म्हटले. ते बराच आग्रह करत राहिले. लोखंडेसाठी दोन बीअर आल्या. सिगरेट आली. गप्पा सुरु झाल्या. मी ऐकत आणि बघत होतो, कुणाचं काय चाल्लंय. रेडकर दारू घेत नाही असे कळले. त्याला इतरांना पाजून मजा बघायचा काही छंद आहे का हे बघत होतो.

तेवढ्यात निरंजनसेठ आला, सोबत मोरेही आला. मोरे इथे येऊ नये अशी रेडकरची ताकिद होती. कदाचित छोट्या हुद्द्यांवरच्या लोकांना ह्या बैठकीत बसवू नये असे वाटत असावे. पण आता आला तर काय म्हणतो ते बघायचे होते. निरंजनसेठला आग्रह झाला पण त्यानेही घेतली नाही. मोरेला आग्रह झाला, 'जेवलोय आता, नको मला' म्हणत त्याने सहा-सात पेग व्हिस्कीचे फटाफट मारले. आणि मग पद्धतशीर मोरेचे वस्त्रहरण सुरू झाले. ह्या कार्पोरेट गप्पा स्पष्ट नसतात, अंगावर येणारे आरोप झटकून टाकण्याची नजाकत आणि त्याच वेळेला आपल्या चुकीसाठी दुसर्‍याला कारणीभूत ठरवण्याचा सहजपणा केवळ लाजवाब! रेडकरच्या प्रश्नांना मोरे चलाखीने उत्तर देत होता, लोखंडे मोरेला कचाट्यात पकडत होता कधी पाठीशी घालत होता. सगळा प्रसंग मजेदार होता.

जेवणाची ऑर्डर द्यायची वेळ झाली तेव्हा बारा वाजले होते. हॉटेलवाल्याने गाशा गुंडाळला होता. "आता किचन बंद झाले" "कामगार जेवत आहेत" ह्याशिवाय महाशयांकडे उत्तर नव्हते. दंगा होणारच होता. किचन बंद होण्याआधी उपस्थित ग्राहकांना तशी सूचना द्यायची असते हे मॅनेजर-कम-मालकाला काही केल्या समजत नव्हते. शेवटी मी मध्यस्थी करून मालकाला समजावले आणि जे काही लवकर होण्यासारखे असेल ते द्यावे अशी विनंती केली. दोन-तीन प्लेट मसाला भात आणि आम्लेट आले, जे अजिबात चांगल्या दर्जाचे नव्हते. प्राप्त परिस्थितीवर उपाय नसल्याने हॉटेलमालकाला शिव्या घालत सगळ्यांनी दोन दोन घास खाऊन घेतले. अशा समयी यापेक्षा जास्त शहाणपणा कोणता होता?

झोकांड्या खात सदाशेठ ड्रायविंगसीटवर बसले, त्यांना मी स्वतः जाऊन म्हटले, तुम्ही उतरा मी चालवतो. दारू प्यायलेल्या माणसाच्या क्षमतेवर शंका घेणे जरा महागात पडते पण अपघात झाल्यावर जे महागात पडते ते त्यासमोर बाकी सर्व स्वस्तच. माझी सदाशेठ ह्या प्राण्याशी ओळख जुनी असली तरी तो फार गूढ प्रवृत्तीचा असल्याने कशावर काय प्रतिक्रिया देइल ह्याचा अंदाज येत नाही. त्याने शेवटी ऐकले नाहीच. मला जेवढं जमेल तेवढं चालवतोच असं म्हणून त्याने सीट सोडायला नकार दिला पण शेजारी तुम्हीच बसा असा आग्रहही केला. सगळे स्थानापन्न झाल्यावर आम्ही निघालो. लोखंडे प्लान के मुताबिक बॅकसीटवर ताणून मोकळा झालेला.

स्कॉर्पिओत बसायची ही माझी पहिलीच वेळ. ही नवी कोरीच! फक्त चार महिने झालेली. सदाशेठ सुसाट होता. स्पीडब्रेकर, खड्डे हे त्याच्या जगात नव्हते आणि त्यामुळे आमच्या जगात त्याशिवाय काही नव्हते. निरंजन, पंढरीनाथ व रेडकर मधल्या सीट्स वर, मी, सदाशेठ पुढे आणि लोखंडे मागे.

सदाशेठ, निरंजनशेठ आणि पंढरीनाथ हे कृषीसेवाकेंद्र म्हणजे शेतीसंबंधीत उत्पादने विकणारे दुकान चालवणारे दुकानदार. रेडकर एका कंपनीचा मालक. लोखंडे त्याच कंपनीचा नोकर आणि या सर्वांमधे विसंगत मी. रात्र अजून बाकी आहे. आताशी साडेबारा वाजलेत. पुढचा मार्ग मला अजूनही माहित नाही.

एक स्कॉर्पिओ. सहा जण. काळोख चिरत गुजरातच्या दिशेने. मी अंधाराकडून अंधाराकडे.

............................

क्रमशः

(पुर्वप्रकाशित. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. लेखकः संदीप डांगे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users