मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान

Submitted by अ'निरु'द्ध on 7 February, 2016 - 04:23

मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान...

( या मालिके मधील पुढचा भाग....

मसाईमारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव

नैरोबी एअरपोर्टला उतरल्यावर मसाईमाराला (Masai Mara) पोहोचेपर्यंत दुपारचे ४-४.१५ उजाडले. आमच्या गाईडच्या सांगण्यावरून मग आम्ही हॉटेलमध्ये जाऊन चेक इन करणे, फ्रेश होणे याऐवजी संध्याकाळची पार्क राउंड घ्यायचा पर्याय स्विकारला .
त्यामुळे साहजिकच आम्हांला आमच्या "मारा सिंबा" जंगल लॉजमध्ये प्रवेश करायला रात्र उजाडली.
त्या रात्रीच्या जंगल लॉजचे पहिले दर्शन...

प्रचि ०१ : रिसेप्शन कडे जाणारा पाथ वे......

प्रचि ०२ : लॉजच्या वेगवेगळ्या भागात जाणारे व्हरांडे...

त्या काळी मसाई माराच्या सभोवताली बरीच हॉटेल्स असली तरी प्रत्यक्ष जंगलाच्या अंतर्भागाच्या भोवतालच्या वापर क्षेत्रात फक्त ३ जंगल लॉजेस होती. जंगल लॉज ह्या संकल्पनेत हॉटेल बांधताना त्यातील जास्तीत जास्त बांधकाम हे स्थानिक नैसर्गिक वस्तूंचा वापर करून बांधलेले असावे लागते. हे हि लॉज त्याला अपवाद नव्हते. बांबू, लाकडाचे बुंधे, लाकडी फळ्य़ा, सुतळी दोरा ह्यांचा वापर कठडे, Lamp Post, भिंती याच्यासाठी केलेला वरच्या प्रचिं मध्ये दिसतोच आहे.
ह्या वातावरणातलं आख्खं जंगल लॉज बघण्याची खरं तर खूप उत्सुकता असायला हवी होती, पण आदल्या दिवसाची ऑफिसची शेवटच्या दिवसाची कामं आटपायची घाईगडबड, Last Minute Packing, विमानतळ गाठणे, रात्रीचा विमानप्रवास आणि दिवसभराची दगदग ह्यामुळे आम्ही जेवून झाल्यावर रुम मध्ये जाऊन पाठ टेकणेच पसंत केले. आणि त्यातही दुसऱ्या दिवशी सकाळची ५.४५ ची पार्क राउंड आमची वाट पहात होतीच. त्यामुळे आमचं लॉज आणि त्याचा परिसर बघायला त्या रात्री तरी सवड आणि इच्छाशक्ती नव्हती.
दुसऱ्या दिवशीच्या पार्क राउंडसाठी अलार्म लावला तरी उत्सुकतेने अलार्मच्या आधीच जाग आली. प्रातर्विधी आणि आन्हिक आटपूनही ५/७ मिनिटे बाकी होती म्हणून आमच्या रुमच्या बाल्कनीत डोकावलो.
बाल्कनीमधून आमच्या जंगल लॉजला कवेत घेणारी मारा नदीची लहानशी उपनदी "तालेक" वहात होती. अचानक काठाजवळच्या पाण्यात खळबळ माजली आणि त्यातून पहाता पहाता ही घोरपड काठावर आली.

प्रचि ०३ : Nile Monitor......

या नव्या शोधा मध्ये रमायला फुरसत नव्हती कारण पार्क राउंडसाठी वेळेत पोहोचायचे होते. पण ह्या सकाळच्या पार्क राउंडनंतर परत आल्यावर वाट पहात होता एक निवांत ब्रेकफास्ट........ आणि संध्याकाळच्या ४.०० च्या पार्क राउंडपर्यंतचा फुरसते -ए -आलम....
ब्रेकफास्ट झाल्यावर आम्हाला आमचे मारा सिंबा जंगल लॉज explore करायची संधी मिळाली.
आमचे जंगल लॉज आजूबाजूची अधे मधे येणारी झाडे तोडायची नसल्यामुळे त्याच्या आजूबाजूने इतस्ततः पसरलेले होते.
जरा प्रशस्त जागा मिळाली की गवताने शाकारलेले उतरतं छप्पर मिरवणारा अधांतरी Dining Area, त्याला लाकडी बुंध्याचा कठडा आणि अशा विविध छोट्या मोठ्या Dining Area ला जोडणारे लाकडीच कठड्याचे Passages…

प्रचि ०४ :

प्रचि ०५ : लाकडी फळ्यांची जमीन असलेल्या नदीकाठच्या Dining Area चे जवळून दर्शन.....

प्रचि ०६ : नदी आणि निसर्गाच्या सानिद्ध्यातला लाकडाच्याच कैचीवर अधांतरी बसवलेला Dining Area चा कोपरा....

प्रचि ०७ : संपूर्ण जंगल लॉजच्या परिसराला कवेत घेऊन वहाणारी तालेक नदी.....

प्रचि ०८ : तालेक नदी....

प्रचि ०९ : त्या नदीमधले आमचे प्रेमळ, निवांत शेजारी....

प्रचि १० : आणि त्यांच्या खेळकर, प्रेमळ मारामाऱ्या.....


प्रचि ११ : नदीच्या पावसाळ्यातल्या वाढणाऱ्या पातळीनुसार उंचावर बांधलेला Dining Area
(परिसरातल्या प्राण्यांना नदीकडे जाताना येताना त्रास होऊ नये आणि माणसं आणि त्यांनी बांधलेल्या इमारती, Structures ह्या प्राण्यांच्या मधे मधे येऊ नयेत म्हणून हे लाकडी खांबावर बांधकाम करण्याचे प्रयोजन)...

ब्रेकफास्ट नंतर हे सगळ निवांतपणे बघत रमत गमत आम्ही आमच्या खोलीकडे निघालो कारण काल रात्री अंधारामुळे आणि दमल्यामुळे हे काही पहाताच आलं नव्हतं.

प्रचि १२ : जागेवरच्या चढ उतारांमध्ये बदल न करता त्यानुसार वेगवेगळ्या पातळ्यांकडे जाणारे पायऱ्या-पायऱ्यांचे चढ उताराचे Passages...

हे संपूर्ण जंगल लॉज एका Single छताखाली नसून झाडा झाडांमधल्या मोकळ्या जागेतल्या तळ किंवा तळ+१ च्या वेगवेगळ्या हट्स , लॉजेस मध्ये विखुरलेलं होतं.

प्रचि १३ : आमच्या लॉजकडे जाणारा लाकडी पूल...

प्रचि १४ : आमची एकमजली जंगल कुटी (बाहेरून)....

प्रचि १५ : संपूर्ण जंगली लाकडांचा जिना...

प्रचि १६ : जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तूंचा वापर केलेली आमची कुटी...

प्रचि १७ : कुठेही भपका नाही, संपत्तीचे, अतिरिक्त वस्तूंच उगाच मांडलेले प्रदर्शन नाही...
एका प्रदेशात असून दुसऱ्या प्रदेशातलं वातावरण डिझाईन करुन वर त्याचा टेंभा मिरवणारा कृत्रिमपणा नाही...
संपूर्ण स्थानिक अनुभूती देणारी, स्थानिक संस्कृतीचा परिचय करून देणारी , संयत डिझाईन असलेली , स्थानिक वस्तूंनी बांधलेली किमान गरज भागवणारी, आरामदायक MINIMALISTIC स्थानिक कुटी....

प्रचि १८: आणि सकाळी जिच्या Potential ची ओझरती झलक दाखवलेली आणि पुढील चार दिवस माझ्या सुख निधानास कारणीभूत ठरलेली नदीकाठची जंगलामधली लाॅग हटची बाल्कनी...

प्रचि १९ : बाल्कनीतून शेजारच्या तळमजली कुटीच्या छपरावरून दिसणारी नदी ,झाडं....

प्रचि २०: बाल्कनीमध्ये गेलो तेव्हा हे महाशय निवांत बसले होते. Velvet Monkey....

ही माकडं आपल्या ईथल्या माकडांसारखीच दिसली तरी ह्या माकडांची खासियत म्हणजे अगदी परीकथेतल्या नीळसर रंगाचे असलेले यांचे वृषण....

प्रचि २१: त्यानंतर जवळच्या झाडावर आलेला Lilac Breasted Roller.....

प्रचि २२ : नदीच्या पाण्यातून समोरच्या फांदीवर येऊन बसलेला खंड्या (Woodland Kingfisher).....

प्रचि २३ : पिवळा Black Headed Oriole.....

प्रचि २४ : नदीतून अधून मधून फेऱ्या मारणारी मगर....

प्रचि २५ : नदीच्या पलीकडच्या काठावरच्या झाडावर बसलेलं Hamerkope पक्षाचं जोडपं....

प्रचि २६ : ह्याच जोडीतला एक पक्षी दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यावर आला तेव्हा....

प्रचि २७ : मध्येच एक निळसर काळा पक्षी नजरेला नजर भिडवून, खुन्नस देऊन गेला. (Rupell's Starling)...

प्रचि २८ : त्याचाच दुसरा जोडीदार....

प्रचि २९ : नंतर तर एक अल्लड , खेळकर पक्षी दोन पायात दोन बारक्या फांद्या पकडून त्यावरून घसरत घसरत आम्हाला बघायला आला....

प्रचि ३० : दुपारी जेवायला restaurant मधे जाताना सामोरा आला मोकळ्यावरती फिरणारा Marabu Stork....

प्रचि ३१ : आम्ही जेवायला जाताना आमच्या पाऊल वाटेवरून पुढे पुढे पळणारे कबुतर..... (Laughing Dove)

पहिल्याच दुपारी जेवताना जवळ जवळ ८० ते १०० मुंगुसांचा कळप , खर तर झुंडच, इकडे तिकडे बघत पण कोणतीही भय भीती न बाळगता, थोड्याश्या उंचावलेल्या restaurant च्या खांबाखालून आणि आजूबाजूच्या मातीच्या जमिनीवरून नदी किनारी गेली. काय नव्हतं त्या कळपात..? नर मादी तर ओळखता आले नाही, पण आइबाबांच्या पायात येणारी, लुडबुडणारी, अंगाला अंग घासणारी क्युट पिल्लं बघून डोळ्याचं पारणं फिटलं.
असं काही घडू शकतं याची कल्पनाच नव्हती म्हणून आमच्यापैकी कोणाकड़ेच Camera सोबत नव्हता.. आमची रूम तिथून 200 मीटर लांब. पण तिथल्या वेटर्स नी सांगितल की काही काळजी करु नका. हा त्यांचा जवळ जवळ रोजचाच परीपाठ आहे पण दुर्दैवाने अशी झुंड नंतरच्या 3 दिवसात कधीच बाहेर पडली नाही, निदान आम्ही Dining Area मधे असताना....
शेवटच्या संध्याकाळी मात्र ३/४ मुंगुस गेटच्या जवळ दिसले.
Camera सरसावेपर्यन्त त्यातलं एकच पाठीमागे राहिलं....
पण ते मात्र मुंगुसाच्या त्या Typical Pose मधे..

प्रचि ३२ : (Banded Mongoose)....

आदल्या दिवशीच्या पहाटेच्या अनपेक्षित आणि अवचित अनुभवामुळे पुढचे सर्व दिवस पहाटे लवकर उठून बाल्कनी मधून नदी काठावरची हालचाल टिपणे हा आमचा रोजचाच परीपाठ होऊन गेला.

प्रचि ३३ : पहाटे पहाटे समोरच्या जंगलातून नदीच्या पलिकडल्या काठावर पाणी प्यायला आलेल हरीण...

जंगलामुळे आजुबाजुच्या झाडावर माकडांची, पक्षांची ये-जा असायची तर नदीमुळे नदीच्या पात्रात आणि किनारी पाणी प्यायला येणाऱ्या प्राण्यांची गर्दी आणि पाणपक्षांची चहलपहल..
दुसऱ्या दिवशी सकाळी तर एक मजाच झाली. एक Egyption Goose बदक, बहुतेक बाबा असावेत, ते त्यांच्या ८ पिल्लांना नदीच्या पलिकडल्या काठावरून नदी पात्रातुन पोहत पोहत घेऊन चालले होते..
पोहता पोहता बाबांनी पिल्लांना अलिकडच्या काठाजवळ आणल. तिथे पिल्लांची आई झाडामागे उभी होती.
तिच्या एका क्वॅक नी आठही पिल्लांची पलटण क्षणार्धात दाहीने मूड करून त्यांच्या बाल क्वॅक क्वॅकच्या किलकिलाटात आईकड़े वळली. आणि ज्या आनंदाने, लगबगीने काठावर येत तिच्या कुशीत शिरली. त्यांची ती गळाभेट, तो किलकिलाट, तो आनंद यांनी भारलेले ते अवघे काही क्षण किती दिवस, महीने,वर्ष गेली तरी नक्कीच विसरु शकणार नाही.

प्रचि ३४ :

प्रचि ३५ : या Family चा पुढ़चा प्रवास मात्र पुढ़े बाबा, मागे आई, आणि मधे पिल्लं असा झाला.
हेच कुटुंब मग एरवीही अधून मधून आम्हाला दिसत राहीलं.....

प्रचि ३६ : पाण्यावर येणाऱ्या कोंबड्या.....

Helmeted Guineafowl...

प्रचि ३७ : पाण्यावर आलेला African Sacred Ibis.....

प्रचि ३८ : आणि सोबत Hadada Ibis.....

जर निसर्गप्रेमी असाल तर जंगल लॉज मधले वास्तव्य म्हणजे खरंच एक अद्भुत अनुभव आहे. इथे रुममध्ये टेलीव्हिजन नाही, फोन नाही, बटण दाबून order सोडता येईल अशी व्यवस्था नाही. पण निसर्गाशी एकरूप होणारे डिझाईन, नैसर्गिक झाडांची केलेली जपणूक, नैसर्गिक चढ उतार न बदलता त्या अनुषंगाने केलेले विविध बांधकामाचे नियोजन आणि ह्या सर्वांमध्ये सहजपणे फिरणारे, नदी किनारी येणारे जाणारे प्राणी पक्षी...
ज्या हॉटेलमध्ये आपले शेजारी पाणघोडे, मगरी आणि वरच्या प्रकाशचित्रांमधले प्राणी पक्षी असतील, तर त्यातील वास्तव्य किती सुखकारक, आनंददायक आणि मनावरचा ताण हलके हलके कमी करणार (unwinding) असेल.
सकाळ आणि दुपारच्या पार्क राउंड मध्ये मसाई माराच्या जंगलातले प्राणी, पक्षी बघणं, जंगल लॉजच्या परिसरात तिथल्या प्राण्या-पक्षांचं निर्भयपणे आणि घरच्यासारखे वावरणं पाहणं, Dining Hall च्या कठड्याशेजारी बसून नदीतल्या प्राण्यांच्या क्रीडा पाहणं आणि रुममध्ये गेल्यावर बाल्कनीमध्ये वेताच्या खुर्चीत बैठक मारून किंवा कठड्यावर ओठंगून आजूबाजूच्या झाडावरचे कधी बागडणारे तर कधी निवांत पक्षी पहाणं किंवा बाल वानरांच्या लीला अनुभवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नदी मधल्या आणि तिच्या दोन्ही काठावरच्या प्राण्यापक्षांच जीवन पाहणं ज्यात त्याचं प्रियाराधन आलं, मातापित्यांचं वात्सल्य आलं, बछड्या-पिल्लांचा लडीवाळपणा आला, लुटूपुटुच्या आणि खऱ्याखुऱ्या मारामाऱ्या आल्या, अन्नासाठीचा झगडा आला, जीवाच्या भीतीने आलेली सावधता आली; राग, लोभ, सामर्थ्याचं प्रदर्शन आलं आणि वयोमानानुसार आलेलं निवांतपण अथवा क्षीण झालेल्या शक्तीनुसार आलेली अगतिकता सुद्धा आली.
काय दिलं नाही त्या बाल्कनीने किंवा नदी आणि नदी किनाऱ्यानी ….?

या जगात जे जे नाट्य घडू शकतं ते ते सारं नाट्य तिथे घडत होतं, पूर्वीही घडलं होते आणि या पुढेही घडणार होतं.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा सर्व भावनांचा आविष्कार, त्यामधली विविधता, त्याचं सतत बदलणार वातावरण..... हे "शाश्वत" होतं .
तिथे आनंद मिळाला, सुख लाभलं, समाधान प्राप्त झालं. ताणतणाव निमाले, चिंता-विवंचना, काळज्या विसरल्या गेल्या. माझ "मी" पण कळलं सुद्धा आणि "मी" पण सरलं सुद्धा. आणि ती शाश्वतता हि कळली आणि तेही ५ दिवसांच्या जंगलाच्या, अरण्याच्या वास्तव्यात...

एक MINI वानप्रस्थच म्हणा नं…

म्हणुनच पूर्वी आयुष्य पुरेपूर आणि भरभरून उपभोगल्यावर माणसं आत्मशोधासाठी वानप्रस्थाश्रमात अरण्यात जात असतील कां...?
आजही तो नदीकिनारा, ते जंगल आणि "तीरावरच्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही " अशी संथ वाहणारी "तालेक" माई आठवते..... आणि पुन्हा एकदा साद घालते तिच्या सर्व पशु पक्षांसह...
माझे आनंद निधान असलेल्या ह्याच त्या लॉग हटमधल्या बाल्कनीत येउन बसण्यासाठी ……!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sunder!

छानच.

अप्रतीम फोटो आणी सुरेख निवेदन! धन्यवाद निरु. तुमचे निसर्गप्रेम आम्हालाही आनन्द देत. >> +१

फारंच मस्त लिहिलंय निरुदा ....
सुर्रेख फोटो आणि अप्रतिम मनोगत ... Happy

तिथे आनंद मिळाला, सुख लाभलं , समाधान प्राप्त झालं . ताणतणाव निमाले, चिंता-विवंचना, काळज्या विसरल्या गेल्या . माझ "मी" पण कळलं सुद्धा आणि "मी" पण सरलं सुद्धा. आणि ती शाश्वतता हि कळली आणि तेही ५ दिवसांच्या जंगलाच्या, अरण्याच्या वास्तव्यात... >>>> क्या बात है ...

म्हणुनच पूर्वी आयुष्य पुरेपूर आणि भरभरून उपभोगल्यावर माणसं आत्मशोधासाठी वानप्रस्थाश्रमात अरण्यात जात असतील कां...?>>>>>> आपली सगळी उपनिषदे अशीच अरण्यात निर्माण झाली असल्याने त्यांना आरण्यकेही म्हणतात.... Happy

अप्रतिम , सुरेख , मनमोहक फोटो आणि माहितीसुद्धा.
अतिशय छान आणि मस्त झाली असेल तुमची ट्रीप जेओग्रफिक सफारी झाली असेल .

स्निग्धा, वत्सला, जागूताई, इंद्रधनुष्य, हिम्सकूल, विशाल, सायू, सामी, केदार१२३, चनस आणि पद्मावती... प्रतिसादांबद्दल आभार...
शशांकजी... आभार आणि आरण्यकांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद... Happy

उत्तम लेख आणि फोटो अत्त्युत्तम. तुम्ही फोटो काढणार आहात म्हणून अगदी पोज दिल्या सारखे पक्ष्यांचे फोटो... निव्वळ अप्रतिम.
प्राची ३२ मध्ये असलेला मुंगुस मिरकॅट सारखा वाटला.

@ दिनेशदा.... <<<अगदी बिंधास्त तिथल्या ट्राफिकमधून पायी फिरत असतो. तो दिसायला बेंगरुळ असला तरी त्याची उडायची स्टाईल मात्र खुप सुंदर असते.>>>>

अगदी, अगदी दिनेशदा...
नैरोबी एअरपोर्टवर आम्हाला घ्यायला गाडी आली होती.. आता प्राणी पक्षी बघायचे ते जंगलात मसाई माराला म्हणून मी कॅमेर्‍याची बॅग डिकीत टाकली. मग सफारी वाल्याने 5 दिवसांच सामान त्याच्या पुढे टाकलं..
वाटेत सकाळचा ट्रॅफिक जॅम लागला.. आणि त्याच ट्रॅफिकमधे फिरत होते.... उंचे पुरे मराबू स्टाॅर्क.. (प्रचि 30) रस्त्यावरुन, फुटपाथवरुन.. एकदम बिनधास्तपणे.. आणि आजूबाजूच्या लोकांनाही त्याच काही विशेष वाटत नव्हतं.
They Were Part and Parcel of the Traffic. ईमारतींच्या Compound Wall वर पण होते.. कॅमेरा नव्हता म्हणून हळहळलो.... पण मनाची समजूतही घातली. एवढे आहेत- परतताना भेटतीलच.... जातात कुठे.....
पण गेले.. नाही दिसले City मधे परतीच्या प्रवासात...
ती दवडलेली संधी आजही मनाला हुरहुर लावते..
जंगलातले प्राणी काय, सगळेच टिपतात...
पण रस्त्यावरुन, फुटपाथवरुन.. एकदम बिनधास्तपणे फिरणारे पक्षी Were Really Unique..
आणि हे पक्षी चालताना मला आठवण करून देतात एखाद्या हात मागे बांधून, पुढे वाकून चाललेल्या पेन्शनर माणसाची...
R.K. लक्ष्मणचा Common Man च म्हणा ना..

सुंदर लिहिलं आहे. फोटो तर अतिशय छान. अशा हटके ठिकाणांच्या ट्रीप्स पण प्लॅन करायला हव्यात खरं तर.

निरु,
नैरोबी वेस्ट च्या नकुमाट सुपरमार्केट समोरची प्रचंड बाभळीची झाडे म्हणजे यांचे कायमचे निवासस्थान. यांचे पिल्लाना वाढवायचे काम चार सहा महिने चालते. पिल्ले पण आपल्या कोंबडीएवढी मोठी असतात.

याच्या चोचीत खुप ताकद असते. बाभळीची ओली फांदी पण काडकन तोडू शकतो. विंग स्पॅन पण भरपूर असतो.

आणि कॉमन मॅनची उपमा अगदी परफेक्ट !!

वाह!!!!!!!! सुंदर लिखाण, अप्रतिम फोटोग्राफी..... बघताना संपूच नयेसे वाटणारे फोटोज..
अजून पाहायचे आहेत फोटोज तुमच्या जवळच्या स्टॉक मधले..
आणी प्रवास वर्णनाचे डीटेल्स ही !!

Pages