नुकतीच पासपोर्टच्या व्हेरिफ़िकेशनसाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. डॉक्युमेंट्स दिल्यावर तिथल्या माणसाने त्यांच्या मोठ्या साहेबांच्या सहीसाठी २ तासांनी परत यायला सांगितलं. पण जा-जा ये-ये करण्यात वेळ गेला असता, शिवाय या कामासाठी रजा काढलीच होती, तर तिथेच थांबावं असं मी ठरवलं. पोलीस स्टेशनचं नवीन बांधकाम झालेलं दिसत होतं. पासपोर्ट व्हेरीफिकेशनचा विभाग पोलीसस्टेशनच्या सर्वसाधारण विभागांपासून वेगळा काढलेला होता. त्यामुळे जागा भरपूर होती, बसायला बाकंही होती. तिथे काही बायका-पुरुष बसलेले होते. त्यातल्या एका बाकाजवळ मी गेले, कडेला बसलेल्या बाईंना जरा सरकायला सांगितलं आणि लोकलट्रेनमधल्या चौथ्या सीटसारखी मी त्या बाकावर त्यांच्या शेजारी टेकले. आता हाताशी वेळच वेळ होता, मग मोबाईल काढला आणि व्हॉटसॅप उघडलं. थोड्यावेळाने पलिकडलं कुणीतरी उठून गेल्यामुळे शेजारच्या बाईंनी सरकून मला नीट बसायला जागा दिली. मी मोबाईलमधून डोकं वर काढून त्यांना हसून ‘थँक्स’ म्हटलं. मोबाईल बॅगमध्ये ठेवून इकडेतिकडे नजर टाकली.
आता गर्दी जरा वाढली होती. सहज मनाला चाळा म्हणून कोण-कोण आहे वगैरे उगीच पाहत होते, इतक्यात
समोरच्या व्हेरिफ़िकेशनच्या टेबलावर बसलेल्या सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसाने माझ्या बाजूच्या बाकावरच्या कुणाला तरी मोठ्या आवाजात विचारलं, "हाज को जाने का है?"
माझी नजर आपसूक त्या दिशेला वळली, तर साधारण ऐंशीच्या आसपास वय असलेल्या एक आजी दिसल्या. लखनवी सलवार-कुर्ता, लेस लावलेली ओढणी स्कार्फ़सारखी डोक्यावर घेतलेली, एक पाय वर घेऊन निवांतपणे बसलेल्या होत्या. पाय लोंबकळत राहणं त्यांच्या वयाला झेपणारं नसावं. त्या पोलिसाकडे शांतपणे पाहात म्हणाल्या, "हाँ! वहीं जाऊंगी।"
त्या बाईंचं वय पाहून मला या वर्षी हाज यात्रेच्या ठिकाणी झालेली दुर्घटना आठवली आणि मी न राहवून आणि काहीसं धसकून जाऊन त्यांना म्हटलं, “तुम्हाला झेपेल का आता? तिकडे खूप गर्दी असते ना? तुम्हाला चालायला जमलं नाही तर?”
त्यावर त्या माझ्याकडे बघून तेवढ्याच शांतपणे म्हणाल्या, "मै उमराह करुंगी।"
हे मला काहीतरी नवीनच कळत होतं. असं काही वेगळं कानावर पडलं, तर त्याबद्दल अधिक माहिती करून न घेता गप्प बसणं इथे कुणाला येतंय? थोडक्यात, हे संभाषण जरा वाढवावं असं मला वाटायला लागलं. पण कसं? मी क्षणभर विचारात पडले. त्या आजींसोबत आणखीही काही मंडळी होती हे आता माझ्या लक्षात आलं. एक मध्यमवयीन बाई, तीन-चार तरुण बुरखाधारी मुली, त्यांच्या सोबत तरुण मुलं, मध्यमवयीन पुरुष, एक-दोन काका, सगळेच माझ्यासारखे सहीसाठी तिथे थांबलेले होते. त्यांच्यापैकी एक मुलगी माझ्याकडे पाहून हलकंसं हसली. पुढे आणखी काही बोलावं का, बोलावं तर कुणाशी, हे मला कळेना. मी जरा अस्वस्थपणे त्या मुलीलाच विचारलं, "जब भीड नहीं होती तब नहीं जा सकते? मी तर कुठल्याही तीर्थक्षेत्राला ऑड सीझनलाच जाते, जेव्हा कुठला सण नसेल, तिथे गर्दी नसेल, आरामात दर्शनही करता येतं. आजींनीही खरं म्हणजे असंच यात्रा नसतानाच जाऊन दर्शन घेतलं पाहिजे.”
माझं वाक्य संपल्याक्षणीच आपण फार बोलून गेलो की काय अशी मला उगीचच धाकधूक वाटायला लागली. पण त्या मुलीने दिलेल्या उत्तराने ती लगेच नाहीशीही झाली. “जा सकते हैं, ना,” ती म्हणाली, “वहाँ कोई दर्शन नही होता, सिर्फ़ रिच्युअल्स होते है. हाज यात्रा स्पेसिफ़िक पिरियडमधेच होते... (मला कुंभमेळा आठवला)... इतर वेळी उमराह करता येते.”
आजींच्या त्या शब्दाचा अर्थ आता मला कळला. "हाँ, फ़िर तो आजीको तकलीफ़ नही होगी!” मी खूश होऊन म्हटलं. मला आनंद नक्की कशाचा झाला होता? आजींना त्रास होणार नाही याचा? की माझी धाकधूक नाहीशी झाल्याचा? नक्की सांगता आलं नसतं. पण आता माझी भीड आणखी जराशी चेपली होती. ““वैष्णवदेवीला जाताना डोली मिळते तशी मिळते का तिथे?” मी विचारलं. “मक्केत वरती चढायचं वगैरे नसतं, पण चालावं बरंच लागत असेल ना? आम्ही टीव्हीवर बघतो ना, खूप मोठा परिसर दाखवतात.””
"कुछ ना कुछ मदद मिल ही जाती है। पण हाजच्या वेळेला गर्दीचा फार त्रास होतो. त्याची एक विशिष्ट वेळ असते ना. जगभरातून सगळे त्याच वेळेला तिथे येतात. उनमे हम भारत के मुस्लिम कुछ अलगही दिखते हैं।"
“म्हणजे?”
“म्हणजे अफ्रिकेतले मुस्लिम खूप लंबेचौडे असतात, यूं बडे बडे! बहोत डर लगता है उन्हे देखकेभी. वो इत्ते लंबे लंबे और हम इत्ते छोटे छोटे! यंदा तर एकाच दिवसात लाखो यात्रेकरू जमले. त्यामुळे तो अपघात झाला. क्रेन कोसळली. वहाँ के लोगोंका पूरा अंदाजाही गलत निकला। दरवर्षी अपघात होत नाही, पण गर्दीत कितीतरी माणसं हरवतात... दोन-तीन दिवसांनी परत सापडतातही.”
मला ते ऐकून आश्चर्य वाटलं. इतक्यात आणखी एक मराठी बाई आली आणि डॉक्युमेंट्स कुठे द्यायचे वगैरे मराठीतच विचारुन नंबरात बसली. त्यामुळे तुटलेला आमच्या संभाषणाचा धागा पुन्हा पकडून मी म्हणाले, “अरे बापरे! मग दोन-तीन दिवस रहावं लागत असेल त्या गर्दीत आपलं माणूस मिळेपर्यंत...”
"हो, तसंही कमीतकमी एका महिन्यासाठीच जातात ना यात्रेला.” इतका वेळ मी या लोकांशी हिंदीतूनच बोलत होते. पण त्या बाईशी मला मराठीत बोलताना पाहून त्यांनी आता आपणहून माझ्याशी मराठीत बोलायला सुरुवात केली होती.
मी : “(परत एकदा) अरे बापरे! एक महिना राहायचं? इतक्या लाखो लोकांना महिना-महिनाभर राहायला हॉटेल्स आहेत का? जेवणार कुठे? पाणी कसं पुरवतात? अंघोळी?”
"अंघोळीसाठी पाणी मिळतं, पण इथून बादली, तांब्या, अंघोळीचा साबण, कपड्यांचा साबण वगैरे न्यावं लागतं. राहायला हाज कमिटीने तिकडे व्यवस्था केलेली असते. राहायच्या जागी अन्न शिजवायचीही व्यवस्था केलेली असते. इथून विमानातून डाळ, तांदूळ वगैरे कोरडं धान्य घेऊन जायचं."
मी : “एक महिना पुरेल इतकं वाणसामान इथून न्यायचं?” हाज यात्रा, तिथली व्यवस्था यांच्याबद्दलची माझी उत्सुकता आता चांगलीच चाळवली होती.
"हो. प्रत्येक माणसाला काही किलो सामान नेणं अलाऊड असतं, त्यात हे सामान न्यायचं."
“आणि आपलं माणूस हरवलं तर कसं शोधणार?” मी पुन्हा यात्रेत हरवणार्या आणि २-३ दिवसांनी सापडणार्या लोकांकडे वळले. “तोपर्यंत त्या हरवलेल्या व्यक्तीची किती हालत खराब होत असेल!”
एक मुलगी : “माझे आई-वडिल गेले होते ४ वर्षांपूर्वी, तेव्हा आई हरवली होती. ३ दिवसांनी मिळाली. हरवल्यावर तिथल्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं आणि हरवलेल्या माणसांसाठीच्या जागेत नेलं होतं. तिथे सगळं खाऊपिऊ घातलं ३ दिवस. आपलं माणूस हरवलं तरी मिळून जातं. आपण शोधत राहायचं. बरीच माणसं हरवत असतात तिथे यात्रेदरम्यान, ते चालायचंच.” आपण नेहमी अगदी सहज म्हणतो, गाड्यांना गर्दी चालायचीच, उकाडा चालायचाच, त्या धर्तीवरच ती हे अगदी सहज असल्यासारखं बोलत होती.
तरी गर्दीत आपलं कुणीतरी हरवणं ही कल्पनाच मला सहन होईना. “तिकडे कायदे पण कडक आहेत असं ऐकलं आहे. त्यामुळे माणूस हरवलं तरी तसा धोका नसेलच", मी म्हटलं. तिथल्या गर्दीत हरवणार्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची खात्री करून घेणं मला अत्यावश्यक वाटायला लागलं.
दुसरी मुलगी : “अरे, नहीं! हरवणार्यांचं सोडा, माझी आई आणि भाऊ गेले होते दोन वर्षांपूर्वी, फार हाल झाले तेव्हा त्यांचे. तिथे जाऊन त्यांना आठ दिवसच झाले होते, आणि माझ्या आईला ते डोक्यात रक्त येतं ना, ते झालं अचानक...”
“ब्रेन हेमरेज?”
दुसर्या मुलीचा भाऊ : “हाँ, दिदी, तेच झालं अम्मीला. अचानक बेशुद्ध पडली. हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हणून एक टॅक्सी बोलावली, तिला त्यात झोपवली, आणि दागिने-पैसे वगैरे ठेवलेली बॅग घेऊन तडक निघालो.”
मी : “खूप खर्च झाला असेल ना? कसं मॅनेज केलंत?”
दुसरी मुलगी : “सरकारी हॉस्पिटल होतं, तिथे खर्च होत नाही.”
तिचा भाऊ : “मी इतका घाबरलो होतो, आणि बरोबर कुणीच नाही. मला अरेबिक भाषाही येत नाही. मी हातवारे करत हिंदीतच बोलायला लागल्यावर तो टॅक्सी ड्रायव्हरही हिंदी बोलायला लागला. हिंदी बोलणारा भेटल्यावर मला खूप बरं वाटलं. तो पाकिस्तानी होता; खूप चौकशी करत होता. सामान काय काय आहे विचारत होता.”
मी : “सांगितलंत की काय?”
भाऊ : “हो, तो इतकी चौकशी करत होता आणि हॉस्पिटलला नेत होता, त्यामुळे मी काही न सुचून सांगून टाकलं. हॉस्पिटलला पोहोचल्यावर अम्मीला स्ट्रेचरवर घालून आत नेलं आणि परत टॅक्सीकडे सामान न्यायला आलो तर ती पैसे आणि दागिन्यांची बॅग नाहिशी झाली होती. टॅक्सीवाला कबूलही होईना. नंतर अम्मीचं ब्रेनचं ऑपरेशन झालं तिथेच. मी इथे भारतात फोन लावून सगळं सांगितलं. तिकडे पैसेही पाठवता येत नव्हते. मग भारतातून तिथल्या आसपासच्या भागात, मदिनाला वगैरे नोकरीला गेलेले २-३ लोक होते नातेवाईकांच्या ओळखीचे, त्यांना निरोप पाठवल्यावर ते तिथे आले आणि त्यांनी पैसे दिले. ३ आठवड्यांनी अम्मीला थोडं समजू लागलं. माझा व्हिसा २ दिवसांत संपणार होता. त्याच्या आत मला तिथून निघायला हवं होतं, नाहीतर मला अरेस्ट झाली असती. अम्मी तर अजून हॉस्पिटलमध्येच अर्धबेशुद्ध होती. मग तिथे डॉक्टरांना सांगून अम्मीला हॉस्पिटलमधून व्हिलचेअरवर बसवून एअरपोर्टवर नेलं. तिला युरिन बॅग लावलेली पाहून विमानात शिरु देईनात. मी खूप मिनतवार्या केल्या, पण नाहीच. इथून एक डॉक्टर बरोबर घेऊन जाणार असाल तरच जाऊ देऊ असं सांगितलं. आता मी स्पेशल डॉक्टरला मक्का ते मुंबई कसं आणू? पैसेच नव्हते. मग कुठून कुठून जॅक लावून, कुछ भी उल्टा सीधा करके तिला आणि मला एकदाचं विमानात घेतलं गेलं. इकडे घरच्यांनी हॉस्पिटलची व्यवस्था केली होती. एअरपोर्टवरुन अम्मी डायरेक्ट हॉस्पिटलला गेली, ती आणखी एक महिन्याने घरी आली.”
दुसरी मुलगी : “परक्या देशात हे संकट, त्यात त्या पाकिस्तानी ड्रायव्हरने लुटलं. अम्मीला हॉस्पिटलला नेणं अर्जंट होतं, त्यामुळे पोलीस-केस वगैरेचा तर विचारही करता आला नाही. पण तिथल्या भारतीय लोकांनीच ओळखपाळख नसताना मदत केली. तो प्रसंग आम्ही कधीही विसरणार नाही!”
मी : “तुम्ही हाज कमिटीला नाही सांगितलंत? तिथल्या आपल्या एम्बसीत जायलाही कुणाची मदत मिळाली नसेल ना? तिथे यांच्याजवळ बसायला कुणी बाईही मिळाली नसेल. तिथे बायकांसाठी सगळे वेगळे रिवाज आहेत ना?” माझ्या गाडीने माझ्या नकळतच ट्रॅक बदलला होता.
तिसरी स्त्री : “अरे, कुछ पूछो मत! तिथे बायकांची अवस्था अगदीच वाईट आहे! पण त्यांना सुरूवातीपासूनच तशीच सवय लावली जाते. घरातून एकटीने बाहेर पडायचं नाही, पडलंच तर सोबत कुणीतरी पुरूष असला पाहिजे. एखादी बाई घराच्या आसपासच एकटी बाहेर दिसली तरी रस्त्यातले इतर पोलिसांना फोन करतात. घराची दारं-खिडक्याही बंद ठेवाव्या लागतात.”
मी : “तुरुंग आहे का तो? असं कसं घरात बसून राहणार आणि काय करणार दिवसभर? तब्ब्येतीचं काय?”
“तिसरी स्त्री : हो ना! बायकांना जनावरासारखं वागवतात तिथे! घरातच बसून जेवायचं-खायचं, टीव्ही बघायचा, बस्स. खरेदीला जायचं तर बंदिस्त गाडीतून, नाहीतर नवर्याला सांगायचं. माझी एक कझिन लग्न करून तिकडे गेली. इतकी छान होती, हसतमुख, तिथे हे सगळं तिला झेपलंच नाही. आजारी पडायला लागली बिचारी सारखी! तिला परत आणावं लागलं भारतात. अरे, भारतासारखा दुसरा देश नाही! इथे बायकांना जितका मोकळेपणा मिळतो तसा आमच्या समाजात इतर कुठेही मिळत नाही!”
मला हे वाक्य जरा अतिशयोक्तीचंच वाटलं. “वेस्टर्न कंट्रीजमध्ये मिळतो की मोकळेपणा...” माझ्या अल्पमतीप्रमाणे मी एक मुद्दा मांडून पाहिला.
तिसरी स्त्री : “अति मोकळेपणा मिळून उपयोग काय! त्यामुळेही बायकांना हीन वागणूकच मिळणार ना! तिथे ते टोक आणि मुस्लिम देशांमध्ये दुसरं टोक! तरी, इतर अरब देशांपेक्षा कतार, दुबईमध्ये परिस्थिती जरा बरी आहे. पण भारतच सगळ्यात उत्तम आहे. इथे आम्ही मुस्लिम असूनही मोकळेपणाने फिरू शकतो, हवं तिथे जाऊ शकतो. आम्हाला वाटेल तितकं आम्ही शिकतो, हवी ती नोकरी करतो, एकट्या हिंडतो, इतरांशी मैत्री करू शकतो, इथे आम्हाला आदर, सन्मानाने वागवलं जातं. आम्ही इथेच खूश आहोत. आमचं नशीबच, की आम्ही तिकडे जन्म नाही घेतला. इथल्या स्वातंत्र्याची इतकी सवय झाली आहे, की त्या मुस्लिम देशांमध्ये आम्ही नाही राहू शकणार! तिथले पुरूषही कोण जाणे असं का वागतात. बातम्यांमधून नाही नाही ते कानावर येतं. किती सहजी टेररिस्ट बनतात! कुणीही यावं, अल्लाच्या, इस्लामच्या नावाने त्यांना भडकवावं आणि यांनी भडकावं?! इथे भारतात आम्हाला सर्व प्रकारच्या लोकांच्यात मिळूनमिसळून राहण्याची सवय आहे. त्यामुळे इथे आमच्या मुलांना असं भडकवणं सोपं नाही. इथे कोणत्याही समाजाचे लोक असोत, एकमेकांवर विश्वास असतो सगळ्यांचा!”
चौथी स्त्री : “तिथल्या लोकांना मोकळेपणाने श्वास घेणं माहितीच नाहीये बहुतेक! इथे कुणाची भीती नाही वाटत.”
इतका वेळ त्या ऐंशी वर्षीय आजी नुसत्या ऐकत होत्या. आता त्या देखील संभाषणात उतरल्या आणि त्यांनी स्वतःचं - बहुतेक अनुभवसिद्ध - तत्त्वज्ञान ऐकवलं - “अरे, अपनी माँ की कोखसे जैसे पैदा हुए, वैसेही अगर आप बडे हो जाओ, तो गलतियाँ नहीं होगी, गुनाह नही होंगे। उधर के बच्चोंको वहीं समझमें नहीं आता और गलत रास्ते पकड लेते हैं।”
‘इधर के’ आणि ‘उधर के’ असे वेगवेगळे मला प्रथमच दिसत होते.
पहिली मुलगी : “आजकाल लग्न करायचं म्हटलं तरी निवडलेला नवरा स्मगलिंग किंवा असल्या वेड्यावाकड्या वाटेला तर लागला नसेल ना अशी शंकाच आधी मनात येते. तिकडचा असेल तर फारच! इथला असेल तर ही भिती तशी कमी असते.”
आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. इतक्या वेळात मला माझ्या फोनची, व्हॉटसॅपची आठवणही झाली नव्हती. तेवढ्यात एका पोलिसाने आम्हाला एका खोलीच्या बाहेर जमा व्हायला सांगितलं. ते सहीवाले साहेब आले होते बहुतेक. आम्ही सगळे आणि आमच्या गप्पा ऐकणारा आणखी १०-१२ जणांचा श्रोतृवर्ग असे सगळे तिथून हललो. त्या खोलीबाहेर उभे राहूनही आम्ही आपापला नंबर येईपर्यंत अगदी पूर्वापार ओळख असल्यासारखे बोलत होतो. ती तरुण मुलंही "भाभी, आपका नंबर आने तक बैठ जाओ, हम आपको आवाज देंगे" म्हणत त्यांच्याबरोबरच्या बायकांबरोबर मलाही बसायला सांगत होती. पण फ़क्त आजी बसल्या आणि आम्ही बाकी सगळे खोलीच्या दाराशी कोंडाळं करुन उभे राहिलो.
माझं काम झाल्यावर निघताना बाय बाय करुन सगळ्यांचा निरोप घेतला. आपल्या देशाबद्दल ऐकलेल्या कौतुकाच्या चार शब्दांची पुंजी घेऊन परतले. खरंच खूप अभिमान वाटत होता. माझ्या घरातल्या एखाद्या वयस्कर आजींप्रमाणेच मी त्या आजींची चौकशी केली होती. विषय कुठून सुरू झाला होता आणि कुठे संपला होता! गप्पांना जाणूनबुजून कुणीच, कुठलंच वळण लावलेलं नव्हतं. मग जाणवलं, की ती मंडळी ‘आपल्या’ देशाबद्दलच तर बोलत होती आणि आपल्या देशाचा सर्वांना अभिमान असतोच, त्यांनाही होता... असायलाच हवा!
आणखी एक लक्षात आलं - त्या तरुण मुली आल्या तेव्हा काळ्या बुरख्यात होत्या. त्या लोकांनी चहा मागवला तेव्हा त्यांनी बुरखा थोडा वर करुन तो प्यायला. पण थोड्यावेळाने त्यांचे पडदे पूर्णपणे वर गेले होते, त्या इतक्या परपुरुषांसमोर हसतखेळत बोलत होत्या. त्यांच्या घरी त्यांच्या धर्माप्रमाणे रीत म्हणून बुरखा घेणं आवश्यक असेल, पण समाजाची रीतदेखिल त्यांना आश्वासक वाटलीच!
पोलीसस्टेशनसारख्या जागी विश्वास आणि अविश्वास यांतला फरक अगदीच नकळतपणे माझ्यासमोर आला होता.
- अश्विनी
अश्विनी, लेख खूप आवडला. दोन
अश्विनी, लेख खूप आवडला. दोन मुस्लिम कुटूंबांशी खूप मैत्री आहे. भाविक श्रोता मिळाला की हे लोकं किती मोकळेपणी बोलतात याचा अनुभव आहे.
असहिष्णुतेच्या नावानी ओरडणार्यांचे "बोलवते धनी" वेगळेच असतात. असो.
लिहीत रहा.
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
अश्विनि, छान लेख. खरोखर
अश्विनि, छान लेख. खरोखर पोसिइटिव वाट्ले. शुगोलशी सहमत.
बाकी, एक घरचा अनुभव, माझ्या घरि दोन मेड आहेत .मुस्लिम, गेली ८ वर्शे घर लावुन धरले आहे. त्याच्या मुळेच आज मी नोकरी करु शकते. मी घरि नसताना लेकाची (वय ४ वर्श) पुर्ण काळजि घेतात. याच महीन्यात कान्दिवलि मध्ये भीशण आग लागलेली असताना आधी मुलाला सुखरुप शाळेतुन घरी आणुन (माझ्या साबा पायानी अधु आहेत) मगच स्वतचे घराचे काय झाले ते पाहण्यास गेल्या. त्यातल्या एकीच्या मुलीच्या लग्नात मी त्याना केळ्वण केले होते. दोघी माय लेकी अतिशय उत्साहाने आल्या होत्या.
अनु, अल्पना, जिज्ञासा,
अनु, अल्पना, जिज्ञासा, हर्पेन, राधिका, मित, क्रिश्नन्त, शुगोल, सनव, अश्विनि दिक्षित धन्यवाद
मंजू, नीरजा... नोटेड
गजा, तू दिलेल्या प्रतिसादाची नक्कीच दखल घेतली आहे. मौल्यवान आहे
नीधपने मन्जुडीला १०० दिलेत,
नीधपने मन्जुडीला १०० दिलेत, मी लाख देईन. अश्विनी, लिहीत रहा. तुझा माबोवरचा वावर मला कायम निशीगन्धासारखा वाटत आलाय, जे फूल देवाला वाहीले जाते आणी वातावरणात सात्विकता उत्पन्न करते.
बाकी माझा रुमाल.
सुरेख अनुभव!
सुरेख अनुभव!
अश्विनी अतिशय उत्तम लेखन आणि
अश्विनी अतिशय उत्तम लेखन आणि सुंदर अनुभव..
केश्वे, तू कशाला स्पष्टिकरणं
केश्वे, तू कशाला स्पष्टिकरणं देत बसली आहेस? >>>> मंजुडी +१
अश्वे छान लिहीलयस. लली बोली
अश्वे छान लिहीलयस. लली बोली वैसा लिखते रहो
गप्पांमधून पोचलेल्या भावना
गप्पांमधून पोचलेल्या भावना आवडल्या. प्रातिनिधीक आहेत की नाही हा वेगळा विषय होईल. भारतात असलेले स्वातंत्र्य भारतीय मुस्लिम स्त्रियांना 'नेमके पुरेसे' वाटणे थोडे साहजिकही असू शकेल. म्हणजे युरोपिअन स्त्रियांना (किंवा युरोपातील मुस्लिम स्त्रियांना वगैरे) ते कमी वाटेल व काही बाबी बंधनकारकही वाटतील. त्या स्त्रिया इथल्याच असल्याने येथे त्यांची एक कंफर्ट लेव्हल होती ह्यालाही एखादा मार्क मिळावा असे वाटते. अनौपचारीक गप्पांमध्ये नेहमीच लोक खुलून बोलतात व त्यामुळे काही नवीन गोष्टी समजू शकतात, तसेच झालेले आहे असे वाटले. माझ्या अनुभवातील तरी सर्व मुस्लिम माणसे स्वभावाने अतिशय दिलखुलास आणि मिसळू पाहणारी होती. त्यामुळे त्यांना आक्रमक बनवणारे कोण असतील ह्याचा साधारण अंदाज येतोच.
सुरेख लेख, अतिशय पॉसिटिव्ह
सुरेख लेख, अतिशय पॉसिटिव्ह आणि सहजसोपी शब्दरचना. तुम्ही ट्रायबल भागात मदत करायला नियमितपणे जाता हे वाचून तुमच्याबद्दलचा आदर दुणावला.
तुमची लेखनशैली ललित लेखाला अगदी साजेशी आहे. तुम्ही फारसं ललितलेखन करीन नाही हे ऐकून आश्चर्य वाटलं.
काही लोकांना हे अविश्वसनीय
काही लोकांना हे अविश्वसनीय वाटतेय यात जराही आश्चर्य नाही. यासाठी माझा येथील पहिला प्रतिसाद होता
खूप छान लिहीलंयस अश्विनी,
खूप छान लिहीलंयस अश्विनी, आवडलं.
खूप सुंदर लिहिला आहे लेख.. मी
खूप सुंदर लिहिला आहे लेख.. मी स्वत: शारजा मध्ये राहते त्यामुळे या समाजातील बायकांची घुसमट जवळून बघायला मिळते. अर्थात आताच्या पिढी मधील मुले मुली थोडे आधुनिक होत आहेत. पण सौदी मध्ये बायकांचे हाल खूप ऐकायला मिळतात. त्यामाणे इथे समाज खूप सुधारित आहे. पण तरीही भारता सारखा मोकळे पणा कुठेच नाही या वाक्याला १००% अनुमोदन. असेच लिहित रहा. शुभेच्छा.
छान लिहिले आहेस केश्विनी.
छान लिहिले आहेस केश्विनी. लिहीत रहा ग अधूनमधून
केश्वे, तू कशाला स्पष्टिकरणं
केश्वे, तू कशाला स्पष्टिकरणं देत बसली आहेस? >>>> खूप अनुमोदन !
केश्विनी प्रत्यक्षात खूपच
केश्विनी प्रत्यक्षात खूपच मनमोकळी आणि प्रचंड बोलकी असल्याने अशा अनौपचारिक गप्पा तिने मारल्या असतील यात मलातरी अविश्वसनीय काही वाटत नाही. मुळात लेखाचा फोकस या गप्पांमधून जे "स्वतःला" (म्हणजे इथे लेखिकेला) जाण्वलं ते सांगण्याचा आहे. समाजाबद्दल जनरलाईज्ड स्टेटमेंट तिने केलेलं नाही आणि तो उद्देशही नाही.
मलातरी हिंदु मैत्रमैत्रीणींपेक्षा मुस्लिम फ्रेंड सर्कल फार मोठं आहे. अगदे उठबस म्हणावी ती "याच" लोकांमध्ये आहे. "बेस्ट फ्रेंड" जीवाभावाची सखी मुस्लिम आहे. त्यामुळे या आणि अशा विविध विषयावर चर्चा आणी गप्पा चिक्कार झालेल्या आहेत. वादविवाद तर कायमच चालू राहतात. वर कुणीतरी आमिर खान आणि असहिष्णुतेचा विषय काढला आहे. मुळात किरण रावला भारतात असुरक्षित वाटण्याइतकं काय घडलं याची मला कल्पना नाही. जागतिक स्तरावर होत असलेल्या इस्लामिक रॅडिकलायझेशनचे कित्येक परिणाम भारतामधल्या मुस्लिम समाजावर होतच अस्तात तरीही सर्वसामान्य मुस्लिम भारतीय व्यक्ती भारताबद्दल अतिशय प्रेम आणि अभिमान बाळगून आहे हे मात्र कित्येक उदाहरणामध्ये अनुभवलेलं आहे.
केश्विनी, छानच लिहिलं आहेस. लिहित रहा ही प्रेमळ धमकी.
सोन्याबापू यांची
सोन्याबापू यांची प्रतिक्रियाही आवडली हे लिहायचे राहिले. रिस्पेक्ट! (I do wish you a good life
)
.
.
रश्मी, तात्या, हिम्या, मामी,
रश्मी, तात्या, हिम्या, मामी, कवे, बेफिकीर, स्वीट टॉकर, आशिका, राधोदय, प्राची, पराग, नंदिनी, फारएण्ड धन्यवाद
ज्या बायकांना ब्रेम हॅमरेज
ज्या बायकांना ब्रेम हॅमरेज म्हणजे काय ते माहीत नाही अशांच्या तोंडी युरोप अमेरीकेतल्या व्यक्तीस्वातंत्र्याबद्दलची मतं वाचून मला ते खटकलं. म्हणून मी ते नोंदवलं होतं.
याला कुणी टेपा लावण्याचा आरोप म्हणो, स्पष्टीकरणं मागवलीत म्हणोत, मला काय त्याचं. माझा मुद्दा मला क्लिअर आहे अगदी.
मुस्लीम जगतात काय वातावरण आहे त्याबद्दल शंकाही नाही आणि आक्षेपही नाही. त्या पार्श्वभूमीवर भारतात मुस्लीम महिलांना काय स्वातंत्र्य मिळते ते अगदी उठून दिसते यात काय शंका ? त्या बोलल्याच असतील. उलट सर्वसाधारण मुस्लीम धूर्तपणे नाही तर मोकळेपणे बोलतो हेच पुढे आलंय त्यात. पण ते मत नाही पटलं. म्हणजे आपल्यापेक्षा जिथे स्वातंत्र्य आहे ते बाद. याबद्दल विचारणा कराविशी वाटली तर ते त्या बायकांचं मत असणार आहे.
केवळ एव्हढ्यासाठी ते पटतंय का अशी विचारणा केली होती. किती तो गदारोळ त्यावर ?
म्हणजे भारतीय संस्कृती अगदी परफेक्ट. मीठ मसाला हळद वगैरे अचूक प्रमाणात असं लिहीलेलं होतं. यावाक्यावरून जर गैरसमज होत असतील तर लेखावरून काही समज , गैस होऊ शकतात आणि त्याबद्दल विचारणा केली जाऊ शकते हे धक्कादायक वाटल्यासारखं का दर्शवलं जातंय ?
लेखात टेपा लावल्या, मुद्दाम केलं का हे सर्व गौण मुद्दे आहेत .
कपोचे, तुमचा मुद्दा काय आहे?
कपोचे, तुमचा मुद्दा काय आहे? वरच्या लेखात भारतीय संस्कृती एक नंबर भारी आहे असं लेखिका कुठे म्हणाली आहे? बरं, कुणी भारताचं कौतुक केलं, तर कुणाला चांगलं वाटणंही चूक आहे का?
बाकी, अश्विनीने मागच्या कमेंट मध्ये लिहिलेलं ते पटलंच. तुम्ही त्या मुस्लीम महिलांबद्दल 'रेशिअल प्रोफायालिंग ' करताय. विचार करा. लेखात त्या महिला किती शिकलेल्या आहेत, कुठल्या पार्श्वभूमीच्या आहेत याची जर माहिती नाही तर ती माहिती लेखिकेला आहे का? हे विचारणे जास्त संयुक्तिक का सरळ सरळ त्यांना 'अडाणी बायका' म्हणून कप्पेबंद करणे? स्वतःचेच आपल्या राजकीय बाजूप्रमाणे समज करून घेऊन मीठ मसाला हळद ही पहिलीच कमेंट नाही आवडली.
बाकी युरोप अमेरिकेतील व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलायला ब्रेन हॅमरेजची माहिती असणे हा क्रायटेरिया मस्त.
अमितव ब्रेन हॅमरेज बद्दल
अमितव
ब्रेन हॅमरेज बद्दल वाचा लेखात. वाचता वाचता असंच मत झालंय. असं होऊ नये असं का म्हणत आहात ?
लेखिकेला दोष देत नाही. त्या महिलांच्या मताबद्दल मी विचारतोय. भारताला कुणी चांगलं म्हणण्याने युरोप अमेरिकेपेक्षा आपल्याकडे जास्त व्यक्तीस्वातंत्र्य येत असेल किंबा ते वाइट आहे हे सिद्ध होत असेल तर माझं तर्कट गंडलं हे मान्य करता येईल. बघा पटलं तर...
आणखी एक
त्या बायका शिकल्या असतील किंवा नसतील.
मुस्लीम देशांपेक्षा स्वातंत्र्य आहे -मुद्दा मान्य
युरोप अमेरिकेतला मोकळेपणा वाईट - हा मुद्दा मान्य आहे का ?
मी अगदी स्पष्टपणे हा मुद्दा मांडला आहे. शंकेला वाव आहे का ? मी इथे रजा घेतोय.
अश्विनीच्या लिखाणाला शुभेच्छा !
युरोप अमेरिकेतला मोकळेपणा
युरोप अमेरिकेतला मोकळेपणा वाईट >> मला स्वतःला विचारात असाल तर मान्य नाही. म्हणून सगळ्यांना तसच वाटावं का? अजिबात नाही. पसंद अपनी अपनी. हेड कवरिंग, फेस कवरिंग कुणाला काय करायचं हे तुम्ही आम्ही ठरवू नये.
म्हणून मुस्लीम बुरखाधारी बायकांना सरसकट अडाणी म्हणण समर्थनीय आहे का? अजिबात नाही.
मुस्लीम बुरखाधारी बायकांना
मुस्लीम बुरखाधारी बायकांना सरसकट अडाणी म्हणण >> हे कशावरून ठरवलंय ?
भारतातल्या महिलांच्या गळचेपीवरून अमेरिकेतल्या वातावरणाचे दाखले देत नाहीत का इथे कुणी ? इथे तशा पोस्टी नसतील का ? त्यांचं मत चुकीचं आहे का एव्हढंच विचारलं होतं. तुम्ही म्हणताय ते चुकीचं आहे. बस्स झालं..
>>>>>kapoche | 18 January,
>>>>>kapoche | 18 January, 2016 - 21:06
अश्विनी,
त्या बायका मोकळेपणे बोलतात याबद्दल शंकाच नाही. त्यांचा अजेण्डा असेल असं वाटत नाही. तसंच त्यांना आलेले अनुभव खोटे असतील असेही नाही. पण अशा अडाणी बायांनी युरोप वगैरेबवगैरे, तिथल्या मोकळ्या वातावरणाबद्दल जे मत मांडलेय त्याबद्दल सहमत असशील का ? त्यांना त्याबद्दल कितपत जाण असेल वगैरे ? >>>>>
अतिशय सुंदर लिहिले आहे. अ
अतिशय सुंदर लिहिले आहे. अ थ्रेड ऑफ वॉर्म्थ रन्स थ्रू धिस एंटायर रईट अप.
त्या मुळे याचे परिवर्तन वादविवादात झाले अन नेहेमीच्या कलाकारांनी .. यशस्वी इ...... हिरिरीने भाग घेतला व ही खेदाची बाब आहे .
कापोचे यांचं सकाळी अड्ड्यावर
कापोचे यांचं सकाळी अड्ड्यावर मनसोक्त चर्चा करूनही समाधान झालेलं दिसत नाहीये
ब्रेन हेमरेज आणि युरप अमेरिकेतल्या मोकळीकीची चर्चा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या बायका आहेत.
आणि ब्रेन हेमरेज माहिती नाही असं असण्यापेक्षा ऐकणाऱ्याला (म्हणजे इथे केश्विला) माहिती नसेल असं गृहीत धरून त्याच्या पातळीवर उतरून बोलूया असा विचार करून 'दुसऱ्या मुलीने' 'Dोक्यात रक्त येतं ना' असा संदर्भ दिलेला असू शकतो.
अमितव काय गडबड आहे तुमच्या
अमितव
काय गडबड आहे तुमच्या बाबतीत ?
१. त्यां अडाणी असाव्यात असं का वाटलं याचं किती वेळा स्पष्टीकरण द्यायचंय ?
२. या वरून सगळ्या नकाब वाल्या बायका अडाणी असतात हा निष्कर्ष कसा निघतो ?
३. हा तुमचा मुद्दा तरीही टॅण्जेण्ट आहे. कि खूप ताणलंय म्हणून निषेधाचा मुद्दा शोधायचाय म्हणून शोधलाय ?
माझा तर्क कुठे गंडला आहे का याबद्दल योग्य पोस्ट आली तर मला ते मान्य करायला कठीण जाणार नाही. तोपर्यंत पुरे .
सुंदर अनुभवाचे तेवढेच सुंदर
सुंदर अनुभवाचे तेवढेच सुंदर कथन.
अशाच गप्पा मारत राहा आणि लिहित राहा
Pages