नुकतीच पासपोर्टच्या व्हेरिफ़िकेशनसाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. डॉक्युमेंट्स दिल्यावर तिथल्या माणसाने त्यांच्या मोठ्या साहेबांच्या सहीसाठी २ तासांनी परत यायला सांगितलं. पण जा-जा ये-ये करण्यात वेळ गेला असता, शिवाय या कामासाठी रजा काढलीच होती, तर तिथेच थांबावं असं मी ठरवलं. पोलीस स्टेशनचं नवीन बांधकाम झालेलं दिसत होतं. पासपोर्ट व्हेरीफिकेशनचा विभाग पोलीसस्टेशनच्या सर्वसाधारण विभागांपासून वेगळा काढलेला होता. त्यामुळे जागा भरपूर होती, बसायला बाकंही होती. तिथे काही बायका-पुरुष बसलेले होते. त्यातल्या एका बाकाजवळ मी गेले, कडेला बसलेल्या बाईंना जरा सरकायला सांगितलं आणि लोकलट्रेनमधल्या चौथ्या सीटसारखी मी त्या बाकावर त्यांच्या शेजारी टेकले. आता हाताशी वेळच वेळ होता, मग मोबाईल काढला आणि व्हॉटसॅप उघडलं. थोड्यावेळाने पलिकडलं कुणीतरी उठून गेल्यामुळे शेजारच्या बाईंनी सरकून मला नीट बसायला जागा दिली. मी मोबाईलमधून डोकं वर काढून त्यांना हसून ‘थँक्स’ म्हटलं. मोबाईल बॅगमध्ये ठेवून इकडेतिकडे नजर टाकली.
आता गर्दी जरा वाढली होती. सहज मनाला चाळा म्हणून कोण-कोण आहे वगैरे उगीच पाहत होते, इतक्यात
समोरच्या व्हेरिफ़िकेशनच्या टेबलावर बसलेल्या सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसाने माझ्या बाजूच्या बाकावरच्या कुणाला तरी मोठ्या आवाजात विचारलं, "हाज को जाने का है?"
माझी नजर आपसूक त्या दिशेला वळली, तर साधारण ऐंशीच्या आसपास वय असलेल्या एक आजी दिसल्या. लखनवी सलवार-कुर्ता, लेस लावलेली ओढणी स्कार्फ़सारखी डोक्यावर घेतलेली, एक पाय वर घेऊन निवांतपणे बसलेल्या होत्या. पाय लोंबकळत राहणं त्यांच्या वयाला झेपणारं नसावं. त्या पोलिसाकडे शांतपणे पाहात म्हणाल्या, "हाँ! वहीं जाऊंगी।"
त्या बाईंचं वय पाहून मला या वर्षी हाज यात्रेच्या ठिकाणी झालेली दुर्घटना आठवली आणि मी न राहवून आणि काहीसं धसकून जाऊन त्यांना म्हटलं, “तुम्हाला झेपेल का आता? तिकडे खूप गर्दी असते ना? तुम्हाला चालायला जमलं नाही तर?”
त्यावर त्या माझ्याकडे बघून तेवढ्याच शांतपणे म्हणाल्या, "मै उमराह करुंगी।"
हे मला काहीतरी नवीनच कळत होतं. असं काही वेगळं कानावर पडलं, तर त्याबद्दल अधिक माहिती करून न घेता गप्प बसणं इथे कुणाला येतंय? थोडक्यात, हे संभाषण जरा वाढवावं असं मला वाटायला लागलं. पण कसं? मी क्षणभर विचारात पडले. त्या आजींसोबत आणखीही काही मंडळी होती हे आता माझ्या लक्षात आलं. एक मध्यमवयीन बाई, तीन-चार तरुण बुरखाधारी मुली, त्यांच्या सोबत तरुण मुलं, मध्यमवयीन पुरुष, एक-दोन काका, सगळेच माझ्यासारखे सहीसाठी तिथे थांबलेले होते. त्यांच्यापैकी एक मुलगी माझ्याकडे पाहून हलकंसं हसली. पुढे आणखी काही बोलावं का, बोलावं तर कुणाशी, हे मला कळेना. मी जरा अस्वस्थपणे त्या मुलीलाच विचारलं, "जब भीड नहीं होती तब नहीं जा सकते? मी तर कुठल्याही तीर्थक्षेत्राला ऑड सीझनलाच जाते, जेव्हा कुठला सण नसेल, तिथे गर्दी नसेल, आरामात दर्शनही करता येतं. आजींनीही खरं म्हणजे असंच यात्रा नसतानाच जाऊन दर्शन घेतलं पाहिजे.”
माझं वाक्य संपल्याक्षणीच आपण फार बोलून गेलो की काय अशी मला उगीचच धाकधूक वाटायला लागली. पण त्या मुलीने दिलेल्या उत्तराने ती लगेच नाहीशीही झाली. “जा सकते हैं, ना,” ती म्हणाली, “वहाँ कोई दर्शन नही होता, सिर्फ़ रिच्युअल्स होते है. हाज यात्रा स्पेसिफ़िक पिरियडमधेच होते... (मला कुंभमेळा आठवला)... इतर वेळी उमराह करता येते.”
आजींच्या त्या शब्दाचा अर्थ आता मला कळला. "हाँ, फ़िर तो आजीको तकलीफ़ नही होगी!” मी खूश होऊन म्हटलं. मला आनंद नक्की कशाचा झाला होता? आजींना त्रास होणार नाही याचा? की माझी धाकधूक नाहीशी झाल्याचा? नक्की सांगता आलं नसतं. पण आता माझी भीड आणखी जराशी चेपली होती. ““वैष्णवदेवीला जाताना डोली मिळते तशी मिळते का तिथे?” मी विचारलं. “मक्केत वरती चढायचं वगैरे नसतं, पण चालावं बरंच लागत असेल ना? आम्ही टीव्हीवर बघतो ना, खूप मोठा परिसर दाखवतात.””
"कुछ ना कुछ मदद मिल ही जाती है। पण हाजच्या वेळेला गर्दीचा फार त्रास होतो. त्याची एक विशिष्ट वेळ असते ना. जगभरातून सगळे त्याच वेळेला तिथे येतात. उनमे हम भारत के मुस्लिम कुछ अलगही दिखते हैं।"
“म्हणजे?”
“म्हणजे अफ्रिकेतले मुस्लिम खूप लंबेचौडे असतात, यूं बडे बडे! बहोत डर लगता है उन्हे देखकेभी. वो इत्ते लंबे लंबे और हम इत्ते छोटे छोटे! यंदा तर एकाच दिवसात लाखो यात्रेकरू जमले. त्यामुळे तो अपघात झाला. क्रेन कोसळली. वहाँ के लोगोंका पूरा अंदाजाही गलत निकला। दरवर्षी अपघात होत नाही, पण गर्दीत कितीतरी माणसं हरवतात... दोन-तीन दिवसांनी परत सापडतातही.”
मला ते ऐकून आश्चर्य वाटलं. इतक्यात आणखी एक मराठी बाई आली आणि डॉक्युमेंट्स कुठे द्यायचे वगैरे मराठीतच विचारुन नंबरात बसली. त्यामुळे तुटलेला आमच्या संभाषणाचा धागा पुन्हा पकडून मी म्हणाले, “अरे बापरे! मग दोन-तीन दिवस रहावं लागत असेल त्या गर्दीत आपलं माणूस मिळेपर्यंत...”
"हो, तसंही कमीतकमी एका महिन्यासाठीच जातात ना यात्रेला.” इतका वेळ मी या लोकांशी हिंदीतूनच बोलत होते. पण त्या बाईशी मला मराठीत बोलताना पाहून त्यांनी आता आपणहून माझ्याशी मराठीत बोलायला सुरुवात केली होती.
मी : “(परत एकदा) अरे बापरे! एक महिना राहायचं? इतक्या लाखो लोकांना महिना-महिनाभर राहायला हॉटेल्स आहेत का? जेवणार कुठे? पाणी कसं पुरवतात? अंघोळी?”
"अंघोळीसाठी पाणी मिळतं, पण इथून बादली, तांब्या, अंघोळीचा साबण, कपड्यांचा साबण वगैरे न्यावं लागतं. राहायला हाज कमिटीने तिकडे व्यवस्था केलेली असते. राहायच्या जागी अन्न शिजवायचीही व्यवस्था केलेली असते. इथून विमानातून डाळ, तांदूळ वगैरे कोरडं धान्य घेऊन जायचं."
मी : “एक महिना पुरेल इतकं वाणसामान इथून न्यायचं?” हाज यात्रा, तिथली व्यवस्था यांच्याबद्दलची माझी उत्सुकता आता चांगलीच चाळवली होती.
"हो. प्रत्येक माणसाला काही किलो सामान नेणं अलाऊड असतं, त्यात हे सामान न्यायचं."
“आणि आपलं माणूस हरवलं तर कसं शोधणार?” मी पुन्हा यात्रेत हरवणार्या आणि २-३ दिवसांनी सापडणार्या लोकांकडे वळले. “तोपर्यंत त्या हरवलेल्या व्यक्तीची किती हालत खराब होत असेल!”
एक मुलगी : “माझे आई-वडिल गेले होते ४ वर्षांपूर्वी, तेव्हा आई हरवली होती. ३ दिवसांनी मिळाली. हरवल्यावर तिथल्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं आणि हरवलेल्या माणसांसाठीच्या जागेत नेलं होतं. तिथे सगळं खाऊपिऊ घातलं ३ दिवस. आपलं माणूस हरवलं तरी मिळून जातं. आपण शोधत राहायचं. बरीच माणसं हरवत असतात तिथे यात्रेदरम्यान, ते चालायचंच.” आपण नेहमी अगदी सहज म्हणतो, गाड्यांना गर्दी चालायचीच, उकाडा चालायचाच, त्या धर्तीवरच ती हे अगदी सहज असल्यासारखं बोलत होती.
तरी गर्दीत आपलं कुणीतरी हरवणं ही कल्पनाच मला सहन होईना. “तिकडे कायदे पण कडक आहेत असं ऐकलं आहे. त्यामुळे माणूस हरवलं तरी तसा धोका नसेलच", मी म्हटलं. तिथल्या गर्दीत हरवणार्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची खात्री करून घेणं मला अत्यावश्यक वाटायला लागलं.
दुसरी मुलगी : “अरे, नहीं! हरवणार्यांचं सोडा, माझी आई आणि भाऊ गेले होते दोन वर्षांपूर्वी, फार हाल झाले तेव्हा त्यांचे. तिथे जाऊन त्यांना आठ दिवसच झाले होते, आणि माझ्या आईला ते डोक्यात रक्त येतं ना, ते झालं अचानक...”
“ब्रेन हेमरेज?”
दुसर्या मुलीचा भाऊ : “हाँ, दिदी, तेच झालं अम्मीला. अचानक बेशुद्ध पडली. हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हणून एक टॅक्सी बोलावली, तिला त्यात झोपवली, आणि दागिने-पैसे वगैरे ठेवलेली बॅग घेऊन तडक निघालो.”
मी : “खूप खर्च झाला असेल ना? कसं मॅनेज केलंत?”
दुसरी मुलगी : “सरकारी हॉस्पिटल होतं, तिथे खर्च होत नाही.”
तिचा भाऊ : “मी इतका घाबरलो होतो, आणि बरोबर कुणीच नाही. मला अरेबिक भाषाही येत नाही. मी हातवारे करत हिंदीतच बोलायला लागल्यावर तो टॅक्सी ड्रायव्हरही हिंदी बोलायला लागला. हिंदी बोलणारा भेटल्यावर मला खूप बरं वाटलं. तो पाकिस्तानी होता; खूप चौकशी करत होता. सामान काय काय आहे विचारत होता.”
मी : “सांगितलंत की काय?”
भाऊ : “हो, तो इतकी चौकशी करत होता आणि हॉस्पिटलला नेत होता, त्यामुळे मी काही न सुचून सांगून टाकलं. हॉस्पिटलला पोहोचल्यावर अम्मीला स्ट्रेचरवर घालून आत नेलं आणि परत टॅक्सीकडे सामान न्यायला आलो तर ती पैसे आणि दागिन्यांची बॅग नाहिशी झाली होती. टॅक्सीवाला कबूलही होईना. नंतर अम्मीचं ब्रेनचं ऑपरेशन झालं तिथेच. मी इथे भारतात फोन लावून सगळं सांगितलं. तिकडे पैसेही पाठवता येत नव्हते. मग भारतातून तिथल्या आसपासच्या भागात, मदिनाला वगैरे नोकरीला गेलेले २-३ लोक होते नातेवाईकांच्या ओळखीचे, त्यांना निरोप पाठवल्यावर ते तिथे आले आणि त्यांनी पैसे दिले. ३ आठवड्यांनी अम्मीला थोडं समजू लागलं. माझा व्हिसा २ दिवसांत संपणार होता. त्याच्या आत मला तिथून निघायला हवं होतं, नाहीतर मला अरेस्ट झाली असती. अम्मी तर अजून हॉस्पिटलमध्येच अर्धबेशुद्ध होती. मग तिथे डॉक्टरांना सांगून अम्मीला हॉस्पिटलमधून व्हिलचेअरवर बसवून एअरपोर्टवर नेलं. तिला युरिन बॅग लावलेली पाहून विमानात शिरु देईनात. मी खूप मिनतवार्या केल्या, पण नाहीच. इथून एक डॉक्टर बरोबर घेऊन जाणार असाल तरच जाऊ देऊ असं सांगितलं. आता मी स्पेशल डॉक्टरला मक्का ते मुंबई कसं आणू? पैसेच नव्हते. मग कुठून कुठून जॅक लावून, कुछ भी उल्टा सीधा करके तिला आणि मला एकदाचं विमानात घेतलं गेलं. इकडे घरच्यांनी हॉस्पिटलची व्यवस्था केली होती. एअरपोर्टवरुन अम्मी डायरेक्ट हॉस्पिटलला गेली, ती आणखी एक महिन्याने घरी आली.”
दुसरी मुलगी : “परक्या देशात हे संकट, त्यात त्या पाकिस्तानी ड्रायव्हरने लुटलं. अम्मीला हॉस्पिटलला नेणं अर्जंट होतं, त्यामुळे पोलीस-केस वगैरेचा तर विचारही करता आला नाही. पण तिथल्या भारतीय लोकांनीच ओळखपाळख नसताना मदत केली. तो प्रसंग आम्ही कधीही विसरणार नाही!”
मी : “तुम्ही हाज कमिटीला नाही सांगितलंत? तिथल्या आपल्या एम्बसीत जायलाही कुणाची मदत मिळाली नसेल ना? तिथे यांच्याजवळ बसायला कुणी बाईही मिळाली नसेल. तिथे बायकांसाठी सगळे वेगळे रिवाज आहेत ना?” माझ्या गाडीने माझ्या नकळतच ट्रॅक बदलला होता.
तिसरी स्त्री : “अरे, कुछ पूछो मत! तिथे बायकांची अवस्था अगदीच वाईट आहे! पण त्यांना सुरूवातीपासूनच तशीच सवय लावली जाते. घरातून एकटीने बाहेर पडायचं नाही, पडलंच तर सोबत कुणीतरी पुरूष असला पाहिजे. एखादी बाई घराच्या आसपासच एकटी बाहेर दिसली तरी रस्त्यातले इतर पोलिसांना फोन करतात. घराची दारं-खिडक्याही बंद ठेवाव्या लागतात.”
मी : “तुरुंग आहे का तो? असं कसं घरात बसून राहणार आणि काय करणार दिवसभर? तब्ब्येतीचं काय?”
“तिसरी स्त्री : हो ना! बायकांना जनावरासारखं वागवतात तिथे! घरातच बसून जेवायचं-खायचं, टीव्ही बघायचा, बस्स. खरेदीला जायचं तर बंदिस्त गाडीतून, नाहीतर नवर्याला सांगायचं. माझी एक कझिन लग्न करून तिकडे गेली. इतकी छान होती, हसतमुख, तिथे हे सगळं तिला झेपलंच नाही. आजारी पडायला लागली बिचारी सारखी! तिला परत आणावं लागलं भारतात. अरे, भारतासारखा दुसरा देश नाही! इथे बायकांना जितका मोकळेपणा मिळतो तसा आमच्या समाजात इतर कुठेही मिळत नाही!”
मला हे वाक्य जरा अतिशयोक्तीचंच वाटलं. “वेस्टर्न कंट्रीजमध्ये मिळतो की मोकळेपणा...” माझ्या अल्पमतीप्रमाणे मी एक मुद्दा मांडून पाहिला.
तिसरी स्त्री : “अति मोकळेपणा मिळून उपयोग काय! त्यामुळेही बायकांना हीन वागणूकच मिळणार ना! तिथे ते टोक आणि मुस्लिम देशांमध्ये दुसरं टोक! तरी, इतर अरब देशांपेक्षा कतार, दुबईमध्ये परिस्थिती जरा बरी आहे. पण भारतच सगळ्यात उत्तम आहे. इथे आम्ही मुस्लिम असूनही मोकळेपणाने फिरू शकतो, हवं तिथे जाऊ शकतो. आम्हाला वाटेल तितकं आम्ही शिकतो, हवी ती नोकरी करतो, एकट्या हिंडतो, इतरांशी मैत्री करू शकतो, इथे आम्हाला आदर, सन्मानाने वागवलं जातं. आम्ही इथेच खूश आहोत. आमचं नशीबच, की आम्ही तिकडे जन्म नाही घेतला. इथल्या स्वातंत्र्याची इतकी सवय झाली आहे, की त्या मुस्लिम देशांमध्ये आम्ही नाही राहू शकणार! तिथले पुरूषही कोण जाणे असं का वागतात. बातम्यांमधून नाही नाही ते कानावर येतं. किती सहजी टेररिस्ट बनतात! कुणीही यावं, अल्लाच्या, इस्लामच्या नावाने त्यांना भडकवावं आणि यांनी भडकावं?! इथे भारतात आम्हाला सर्व प्रकारच्या लोकांच्यात मिळूनमिसळून राहण्याची सवय आहे. त्यामुळे इथे आमच्या मुलांना असं भडकवणं सोपं नाही. इथे कोणत्याही समाजाचे लोक असोत, एकमेकांवर विश्वास असतो सगळ्यांचा!”
चौथी स्त्री : “तिथल्या लोकांना मोकळेपणाने श्वास घेणं माहितीच नाहीये बहुतेक! इथे कुणाची भीती नाही वाटत.”
इतका वेळ त्या ऐंशी वर्षीय आजी नुसत्या ऐकत होत्या. आता त्या देखील संभाषणात उतरल्या आणि त्यांनी स्वतःचं - बहुतेक अनुभवसिद्ध - तत्त्वज्ञान ऐकवलं - “अरे, अपनी माँ की कोखसे जैसे पैदा हुए, वैसेही अगर आप बडे हो जाओ, तो गलतियाँ नहीं होगी, गुनाह नही होंगे। उधर के बच्चोंको वहीं समझमें नहीं आता और गलत रास्ते पकड लेते हैं।”
‘इधर के’ आणि ‘उधर के’ असे वेगवेगळे मला प्रथमच दिसत होते.
पहिली मुलगी : “आजकाल लग्न करायचं म्हटलं तरी निवडलेला नवरा स्मगलिंग किंवा असल्या वेड्यावाकड्या वाटेला तर लागला नसेल ना अशी शंकाच आधी मनात येते. तिकडचा असेल तर फारच! इथला असेल तर ही भिती तशी कमी असते.”
आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. इतक्या वेळात मला माझ्या फोनची, व्हॉटसॅपची आठवणही झाली नव्हती. तेवढ्यात एका पोलिसाने आम्हाला एका खोलीच्या बाहेर जमा व्हायला सांगितलं. ते सहीवाले साहेब आले होते बहुतेक. आम्ही सगळे आणि आमच्या गप्पा ऐकणारा आणखी १०-१२ जणांचा श्रोतृवर्ग असे सगळे तिथून हललो. त्या खोलीबाहेर उभे राहूनही आम्ही आपापला नंबर येईपर्यंत अगदी पूर्वापार ओळख असल्यासारखे बोलत होतो. ती तरुण मुलंही "भाभी, आपका नंबर आने तक बैठ जाओ, हम आपको आवाज देंगे" म्हणत त्यांच्याबरोबरच्या बायकांबरोबर मलाही बसायला सांगत होती. पण फ़क्त आजी बसल्या आणि आम्ही बाकी सगळे खोलीच्या दाराशी कोंडाळं करुन उभे राहिलो.
माझं काम झाल्यावर निघताना बाय बाय करुन सगळ्यांचा निरोप घेतला. आपल्या देशाबद्दल ऐकलेल्या कौतुकाच्या चार शब्दांची पुंजी घेऊन परतले. खरंच खूप अभिमान वाटत होता. माझ्या घरातल्या एखाद्या वयस्कर आजींप्रमाणेच मी त्या आजींची चौकशी केली होती. विषय कुठून सुरू झाला होता आणि कुठे संपला होता! गप्पांना जाणूनबुजून कुणीच, कुठलंच वळण लावलेलं नव्हतं. मग जाणवलं, की ती मंडळी ‘आपल्या’ देशाबद्दलच तर बोलत होती आणि आपल्या देशाचा सर्वांना अभिमान असतोच, त्यांनाही होता... असायलाच हवा!
आणखी एक लक्षात आलं - त्या तरुण मुली आल्या तेव्हा काळ्या बुरख्यात होत्या. त्या लोकांनी चहा मागवला तेव्हा त्यांनी बुरखा थोडा वर करुन तो प्यायला. पण थोड्यावेळाने त्यांचे पडदे पूर्णपणे वर गेले होते, त्या इतक्या परपुरुषांसमोर हसतखेळत बोलत होत्या. त्यांच्या घरी त्यांच्या धर्माप्रमाणे रीत म्हणून बुरखा घेणं आवश्यक असेल, पण समाजाची रीतदेखिल त्यांना आश्वासक वाटलीच!
पोलीसस्टेशनसारख्या जागी विश्वास आणि अविश्वास यांतला फरक अगदीच नकळतपणे माझ्यासमोर आला होता.
- अश्विनी
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलय.
छान लिहिलय.
खूप छान लिहीले आहे. अनोळखी,
खूप छान लिहीले आहे.
अनोळखी, परधार्मिय लोकांशी छान मनमोकळ्या गप्पा झाल्या. मुस्लीम जगापेक्षा आपला देशच बरा असं त्यांना वाटतं आणि युरोपाइतका मोकळेपणाही नको हे सुद्धा !! मोकळेपणाने देखील स्त्रियांवर अत्याचारच होतात असं त्यांनी सांगितलं यावरून आपली संस्कृती अगदी परफेक्ट आहे हे त्यांना सुद्धा वाटतं हे कळालं. तिखट, मीठ, हळद, मसाले अगदी योग्य प्रमाणात ...
मस्त लिहिले आहेस!
मस्त लिहिले आहेस!
तिखट, मीठ, हळद, मसाले अगदी
तिखट, मीठ, हळद, मसाले अगदी योग्य प्रमाणात ... >>> हे अमान्य. आपल्या देशातही संस्कृतींची विविधता आहे. समता आहे तशी विषमताही आहे. त्यामुळे "योग्य प्रमाणात" हे उगाच स्वताला परफेक्ट म्हटल्यासारखे वाटतेय. असो, धाग्याचा हा विषय नसावा, पण कौतुकाची ही थाप पटली नाही ईतकेच
खुप आवडले! जेंव्हा विचित्र
खुप आवडले!
जेंव्हा विचित्र घटनेत बाजु घ्यायची वेळ आली तर...जाती पाती धर्मा वर घ्यावी का माणुस या एका आणि एका सत्यावर घ्यावी?स्वत:च्या जात धर्माचा अभिमान माणुसपण मिटेल इतका ताणावा का? याचे उत्तर अश्याच प्रसंगामधे मिळते.
अश्विनी जी.. हा अनुभव हे प्रातिनिधीक मानले तर.. आपल्या सारख्या सामन्यांचे मोठे यश आहे हे. सहिष्णुता या पेक्षा वेगळी नसावी.
सगळ्यांना धन्यवाद . अनुभव,
सगळ्यांना धन्यवाद :-). अनुभव, thought process तर चालूच असते. पण काही विशेष जाणवलं तर शब्दरुप द्यायचा नक्की प्रयास करेन.
लले, माझी गाडी सहजासहजी सुरु होत नाही. धक्का द्यावा लागतो
बी, हो खरंच उर्दू ही एक गोड भारतीय भाषा आहे. विजयनगरच्या लढाईच्या दरम्यान निर्माण झालेली ही सैनिकी भाषा आहे. भारतात आलेले अरब, तुर्की सैनिक व लोकल भाषेच्या मिश्रणातून इथे भारतातच उगम पावली आणि प्रसारीत झाली. पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा तिकडे फार कमी लोकांची भाषा उर्दू होती. जास्त करुन पंजाबी, सिंधी व बलुची भाषा तिथे बोलली जात असे. पण आता उर्दू तिकडली मुख्य भाषा झाली.
सोन्याबापू, अहो आम्ही छोट्याश्या प्रसंगांनीही मनात देशाचा अभिमान फुलून येणारे आणि तुम्ही तर त्याच देशाच्या अभिमानापायी तळहातावर शीर घेतलेले. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.
पूनम, अगं आमचा संवाद ही एक सहज क्रिया होती. आपोआप घडत गेली. ना तिथे वेष मध्ये आला, ना भाषा, ना धर्म. कॉमन होतं फक्त तिथल्या प्रत्येकाच्या मनात दाटून आलेलं आपल्या देशाचं कौतुक. कुठूनतरी सुरु झालेला विषय हा फक्त निमित्तमात्र. आपल्या मनातल्या भावनांची आपल्याला कल्पना असते पण त्यांचंच प्रतिबिंब पलिकडेही पडलेलं दिसलं की सगळं आरपार होवून जातं....तसंच झालं.
ऋन्मेष, सार्वजनिक ठिकाणी इतक्या जणांबरोबर इतक्या गप्पा मारण्याची पहिली वेळ होती. पण आपल्या मायबोलीच्या एका उपक्रमात कुर्ल्याच्या एका मुस्लिम बाईंकडून पुण्याच्या अंधशाळेतील मुलींसाठी आपण काही सामान घेतो. त्या कामासाठी त्यांच्याकडे गेले की त्या बाईंशी मी इतकं मोकळं नेहमीच बोलते अगदी त्यांच्या टिपिकल मुस्लिम घरात बसून. त्यांच्या वृद्ध सासूबाईही तिथे असतात त्याही एक बुजुर्ग म्हणून गप्पा मारतात. माझ्यासमोरच नमाज पढतात. उन्हातून गेले असेन तर टिपिकल मुस्लिम घरांमध्ये असतं तसलं कसलंतरी सरबत प्यायला लावतात. मध्यंतरी त्यांच्याकडे ऑफिसमधल्या मैत्रिणींबरोबर गेले होते तेव्हा त्या बाई घरी नाहीत हे दारातच कळलं. पण तरी तसंच निघून न जाता मला त्यांचं दार किलकिलं करुन त्यांच्या साबांना हाक मारुनच पुढे जावंसं वाटलं आणि तसंच मी केलं. माझा मुस्लिम सुतार तर मला मोठ्या बहिणीसारखंच वागवतो. रमजानात रोजे असतानाही एकदा माझे वडिल व मेड माझ्या घरी एकटे असताना पाण्याचा काही मेजर प्रॉब्लेम झाला तेव्हा उपाशी पोटी दुसर्या साईटवरुन माझ्या घरी धाव घेतली होती. ह्या राखीपौर्णिमेला तो घरी आला होता काही सुतारकामाचं बोलण्यासाठी तेव्हा मी जस्ट पूजा करुन देवाला राखी बांधणारच होते. ते बघितल्यावर त्यानेही त्याचे मनगट पुढे केले. मीही बांधून टाकली. माणसांकडे सतत संशयाने पाहण्यापेक्षा माझ्याकडून माणसातल्या चांगूलपणावर जास्त विश्वास ठेवला जातो. तिथे स्टेटस, जात, धर्म काहीच मॅटर करत नाही.
नीरा, <<<स्वत:च्या जात धर्माचा अभिमान माणुसपण मिटेल इतका ताणावा का? याचे उत्तर अश्याच प्रसंगामधे मिळते.>>> खरं आहे.
असो, त्या गप्पांसारखा माझाच प्रतिसाद लांबला
केश्वे, छान लिहिलंयस.
केश्वे, छान लिहिलंयस.
माणसांकडे सतत संशयाने
माणसांकडे सतत संशयाने पाहण्यापेक्षा माझ्याकडून माणसातल्या चांगूलपणावर जास्त विश्वास ठेवला जातो. तिथे स्टेटस, जात, धर्म काहीच मॅटर करत नाही.>>>+++१
लांबू देत प्रतिसाद. मस्त लिहिलायस.
अश्विनी ओके उन्हातून गेले
अश्विनी ओके
उन्हातून गेले असेन तर टिपिकल मुस्लिम घरांमध्ये असतं तसलं कसलंतरी सरबत प्यायला लावतात.
>>>>
रूहअफजा का? लाल रंगाचे.. दूध टाकल्यास गुलाबी..
छान लिहीलयस आणि छान चौकशी ही
छान लिहीलयस आणि छान चौकशी ही केलीयस.
उत्तम लेख आणि अनुभव! असे
उत्तम लेख आणि अनुभव!
असे अनुभव जास्तीत जास्त लोकांना येवोत आणि त्यांच्या डोळ्यावरील झापडे गळून पडोत हीच सदिच्छा!
इधर के उधर के अश्विनी के....
इधर के उधर के अश्विनी के.... मस्त लिहीले आहेस.
अतिशय सुंदर लेख. फार छान
अतिशय सुंदर लेख. फार छान अनुभव.
छान अश्विनी आवडेश एकदम
छान अश्विनी आवडेश एकदम
मस्त!
मस्त!
केश्विनी, मस्त अनुभवकथन.
केश्विनी, मस्त अनुभवकथन.
सुंदर लेख...आवडला
सुंदर लेख...आवडला
छान आहे. आवडल. पोलिस स्टेशन
छान आहे. आवडल. पोलिस स्टेशन मधे बसुन एवढी चवकशी? पोलिस स्टेशनचा गुण म्हणायचा?
यूरो . तळमजल्यावर ते जरातरी
यूरो :हाहा:. तळमजल्यावर ते जरातरी पोलिस स्टेशन वाटत होतं. पण पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा विभाग पहिल्या मजल्यावर वेगळा काढलेला होता आणि पोलिस स्टेशनची बिल्डिंग नविन होती त्यामुळे एखाद्या ऑफिससारखंच वाटत होतं. तिथे टेबलवरचे पोलिस आणि पोलिसीणी युनिफॉर्ममध्ये नव्हते, पोलिसी खाक्यात बोलतही नव्हते आणि तिथे व्हेरिफिकेशनसाठी येणार्यांची इतकी ये-जा होती की त्यांचं आमच्याकडे लक्षच नव्हतं. त्यांच्यामागे भुणभूण न लावता आम्ही बसलो असल्याने त्यांना बरंच होतं. सह्यावाले मोठे साहेब फक्त युनिफॉर्ममध्ये आले होते.
केश्वि, चां.चौ. अश्याच करत जा
केश्वि, चां.चौ. अश्याच करत जा म्हणजे उत्तमोत्तम असेच लेख आम्हाला वाचायला मिळतील. तू फार छान लिहीले आहेस.
Idhar ke udhar ke aani
Idhar ke udhar ke aani Ashwini k maastach!
मस्त लिहीले आहेस केश्विनी! हा
मस्त लिहीले आहेस केश्विनी! हा अनुभव शब्दांकित करून ठेवल्याबदद्ल धन्यवाद.
व्वाह मस्त अनुभव छान शब्दबद्ध
व्वाह मस्त अनुभव छान शब्दबद्ध केलाय
छान अनुभव कथन! वाचताना मुकादम
छान अनुभव कथन! वाचताना मुकादम चाचांची आठवण झाली. त्यांची दोन मुले नोकरीसाठी सौदीला होती काही काळ. परत आल्यावर सांगायची - 'इथल्या सारखा मोकळा श्वास तिथे नाही घेता येत. ते लोकं ही आम्हाला वेगळं वागवायचे. इथे कसे आपण एकत्र रहातो तसे तिथे नाही.'
>>माणसांकडे सतत संशयाने पाहण्यापेक्षा माझ्याकडून माणसातल्या चांगूलपणावर जास्त विश्वास ठेवला जातो. तिथे स्टेटस, जात, धर्म काहीच मॅटर करत नाही.>> हे फार आवडले.
सुंदर अनुभव आणि छान लेख
सुंदर अनुभव आणि छान लेख अश्विनी.
सुंदर लेखन
सुंदर लेखन
मस्त आहे अनुभव .
मस्त आहे अनुभव .
अश्वे, चांगला अनुभव सुंदर
अश्वे, चांगला अनुभव सुंदर रीतीने शब्दबद्ध केलाहेस.. खूप आवडली ही अनौपचारिक मुलाखत!!!
पॉझिटिविटी निर्माण झाली वाचून..
‘इधर के’ आणि ‘उधर के’ बाय
‘इधर के’ आणि ‘उधर के’ बाय अश्विनी के
मस्त लिहिलयस एकदम.
Pages