"चौकटी बाहेरचा - चॉक अॅण्ड डस्टर"
बऱ्याचदा न समजत्या वयातलं हातातलं पहिलं खेळणं असतं ते पेन किंवा स्केचपेन. भिंतीवर रेघोट्या मारायच्या, जमिनीवर खडूने गिरवून ठेवायचं असं करताना आपण मोठे होत जातो आणि आपल्या हातात कधी पेन्सिल येते ते कळतही नाही. मग ABC, 1-2-3 सुरू होतात आणि जसजसे आपण मोठे होत जातो तसं हातात येतं ते पेन. शाळा, कॉलेज, करियर याबरोबर पेनांचे ब्रँडस बदलत जातात आणि एकवेळ अशी येते की तुमची साईन ‘सिग्नीचर’ बनते! तुम्ही नावलौकिक मिळवून उच्चपदाला पोहोचता. तुमच्या शिक्षकांच्या संपूर्ण वर्षाच्या सॅलरी एवढी सॅलरी तुम्ही मंथली कमावता पण ज्या हातांनी तुम्हाला पेन्सिल पकडायला शिकवलेलं असतं, जे शाळेत सतत उभे राहून, फळ्यावर गिरवून गिरवून ती अक्षरं आपल्या भावी आयुष्यात उपयोगी पडतील अशा तऱ्हेने शिकवतात, ज्यांच्या हातातल्या खडूने अनेकांच्या साईन्स सिग्नीचर्स बनतात त्या खडूंचं पुढे काय होतं? त्या खडूंच्या हातांचं समाजातलं स्थान काय? त्यांना काय त्रास असू शकतात? आणि या त्रासांमध्ये असताना अवचितपणे एखादी ‘सिग्नीचर’ कशी खडूच्या मदतीला धावून जाते हे पाहायचं असेल तर ‘चॉक अॅण्ड डस्टर’ इज मस्ट!
शाळेच्या ग्राऊंडपासून चित्रपटाची फ्रेम सुरू होते आणि आपण प्रेक्षक म्हणून युनिफॉर्म घालून मनाने कधी शाळेच्या ग्राऊंडमध्ये पोहोचतो हे समजतही नाही. नकळत मुलांबरोबर त्यांच्या भावविश्वात एकरूप होऊन जातो. जुही चावलाची हसरी एन्ट्री ‘तारे जमिन पर’ मधल्या निकुंभ सरांची- आमिरखानची आठवण करून देते पण ती तेवढ्यापुरतीच. पुढे जुहीने स्वतःची एक वेगळी प्रतिमा उभी केली आहे. सायन्स टीचर दाखवलेली जुही ही डान्स आणि क्राफ्टस्ध्येही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे भाग घेताना दाखवली आहे. एक उत्तम टीचर, काळजी घेणारी सहकारी, अन्यायाच्या विरोधात त्वेषात चिडून उठलेली शिक्षीका ते विजयी झाल्यावर संयमाने आपले भविष्याचे प्लॅन सांगणारी ज्योती- जुहीने चांगल्या तऱ्हेने रंगवली आहे. 'ज्योती'च्या भूमिकेत जुही चावला अशी दिसली आणि वावरली आहे की ती अगदी सेंट पर्सेंट 'गर्ल नेक्स्ट डोअर' वाटते. सहजाभिनय हा काही तिच्यासाठी नवीन नाही.
विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं नातं, शिक्षकांची स्वतःची आयुष्य, त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार, एज्युकेशन सिस्टीममधील पॉलिटीक्स, शिक्षकांचे एकमेकांबद्दलचं प्रेम- आदर अशा अनेक पैलूंना स्पर्श करत ‘चॉक अॅण्ड डस्टर’ पुढे सरकतो. एका मध्यमवर्गीय शिक्षकांची धडपड आपण ह्यापूर्वीही पाहिलेली आहे. अडचण, त्यातून बाहेर पडत असताना नवीन संकट अशी सगळी कहाणी आपल्याला तोंडपाठ असते. तेच आपल्याला या चित्रपटात दिसतं. विरार स्टेशन, ट्रेनची गर्दी, पहिल्या वहिल्या स्वतःच्या कारचा आनंद हे सगळं चित्रपटाच्या कथेमध्ये सहजरित्या येऊन जातं. शबाना आझमींनी- विद्या तितक्याच ताकदीने उभी केली आहे. त्यांचा सहजाभिनय आपल्याला आपल्या शालेय दिवसातील एखाद्या शिक्षकाची आठवण करून देतो. तर दिव्या दत्तची एन्ट्री आणि तिची खेळी बघून आपण थक्क होतो.
दिग्दर्शक जयंत गिलीटर यांच्या चित्रपट विषयक बारकाईने केलेल्या अभ्यासाला दाद द्यावीच लागेल. गोष्टींचा केलेला अभ्यास, त्यातून नोंदविलेले निरीक्षण आणि त्याची चित्रपटात वेळोवेळी लागलेली लिंक यामुळे चित्रपट पाहताना समाधान वाटते. ‘चॉक अॅण्ड डस्टर’ हे छोटेसे शब्द चित्रपटाचा खूप मोठा कॅनवास कव्हर करतात. क्वचित एखाद्या चित्रपटाचा पहिला भाग इंटरमिशनच्या भागापेक्षा जास्त चांगला जमून येतो पण इथे मात्र दोन्ही भागांमध्ये तेवढीच उत्सुकता आहे. तीच पकड आहे. खुसखुशीत संवाद आणि अनेक परिस्थितीजन्य गुजराती भाषिक विनोदांना पडद्यावरील कलाकारांच्या उत्तम टायमिंगची जोड मिळाल्याने धम्माल येते. भावनिक दृश्यंही अतिरंजन न करता खूपच संयतपणे हाताळली असल्याने एकंदरीतच कथा बरीच पकड घेते. कसलेल्या शिक्षकांची गणिती प्रमेय सोडविण्यासाठी वापरलेली ‘S-C-T’ची खास ट्रीक आणि त्यातून मुलांचे सोप्यारितीने समजणे, शिकवण्याची प्रचंड आवड हे प्रसंग दिग्दर्शकाने अगदी बारकाईने उभे केले आहेत. अक्षरश: काहीही अनपेक्षित न घडणारं कथानक केवळ आणि केवळ चारही प्रमुख कलाकारांच्या लाजवाब कामामुळे बघावंसं वाटतं. गिरीश कर्नाड, जॅकी श्रॉफ, उपासना सिंग, समीर सोनी यांनी आपापले अभिनय संयत आणि उत्तमपणे वठवले आहेत.
चित्रपटाचं लेखन राजीव आणि नितू वर्मा यांनी केलं आहे. पटकथेत बारीक-सारीक तपशील उत्तम प्रकारे सांभाळले आणि पेरलेही आहेत. चित्रपटात ह्या कथा-पटकथेचा वाटा अनन्यसाधारण आहे. गाण्यांना इथे काही वाव नव्हताच. पण ’ए जिंदगी’ हे एक गाणं बॅकग्राऊंडला वाजतं, जे सोनू निगमने गायलेलं आहे आणि ते गाणं पूर्णपणे श्रवणीय आणि स्मरणीय आहे.
• मध्यंतरानंतर पुढे काय होतं?
• हॉस्पिटलच्या खर्चाकरिता लाखो रुपये कसे जमा करतात?
• कॉन्टेस्टमध्ये कोण जिंकतं?
• त्या पैशांचे काय करायचं ठरवतात?
वगैरे सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देऊन सिनेमा एका वेगळ्याच शेवटावर संपतो. खरंच असे असते का? आणि असे असते तर ते 'का' असते? हे दोन प्रश्न घेऊन आपण बाहेर येतो. 'चॉक अॅण्ड डस्टरचा' प्रवास संपतो आणि मनाला एक समाधान मिळते की या चित्रपटामुळे तरी का होईना शिक्षकांच्या मागण्यांकडे, त्रासाकडे आपल्या समाजाचे लक्ष जाईल, त्यांना योग्य तो न्याय मिळेल याच्या समाधानात आपण घरी परततो.
रोना-धोना, प्रेम, हाणामारी, पोलिस या मेलोड्रामाच्या बाहेर जाऊनही एक वेगळे जग असते हे अनुभवायचे असेल तर 'चॉक अॅण्ड डस्टर' इज मस्ट! गो फ्रेंड्स. इट्स अ बिग ट्रीट!!!
रेटिंग - *** १/२
निक्षिपा
(स्मृती आंबेरकर)
सुंदर लिहिलंय. अश्या
सुंदर लिहिलंय. अश्या चित्रपटांची प्रसिद्धी फारशी होताना दिसत नाही, त्यामूळे इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच बघेन.
मस्त परीक्षण! नक्की बघणार!
मस्त परीक्षण! नक्की बघणार!
मस्त लिहिलयं.. चित्रपटगृहात
मस्त लिहिलयं..
चित्रपटगृहात बघायचा प्रयत्न नक्की करेल
दिनेशदा +१
दिनेशदा +१
ट्रेलर पाहिला आहे ह्या
ट्रेलर पाहिला आहे ह्या सिनेमाचा तेंव्हाच मनात घर करुन केला.
सुंदर परिक्षण लिहिले आहे. धन्यवाद.
सुंदर परिक्षण
सुंदर परिक्षण
मस्त लिहिलयं..
मस्त लिहिलयं..
मस्त परीक्षण ! ट्रेलर मलाही
मस्त परीक्षण !
ट्रेलर मलाही आवडलेला.
जुही चावला या अश्या भुमिकेत बघायला आवडेल.
सर्वांचे मनापासून धन्यावाद!
सर्वांचे मनापासून धन्यावाद! चित्रपट परिक्षणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तुम्हाला आवडलं वाचून खूप आनंद झाला.. पुन्हा एकदा थँक्स
Juhi Chawla, Shabana Azmi,
Juhi Chawla, Shabana Azmi, Zarina Wahab, Girish Karnad and Divya Dutta >>>> ही लिस्ट वाचूनच उत्सुकता वाटतेय चित्रपट बघायची. इथे थियेटरमध्ये तर लागणार नाही कदाचित पण नेटफ्लिक्स इ. वर आला तर नक्की बघणार. चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
परिक्षणाबद्दल धन्यवाद. वाचून
परिक्षणाबद्दल धन्यवाद. वाचून एकदम उत्सुकता वाटली. आधी ह्या चित्रपटाबद्दल माहिती नव्हतं. परिक्षण वाचुन मग आत्ताच ट्रेलर बघितलं. आता सिनेमा जरूर बघेन. असेच नवीन व चांगले चित्रपटांबद्दल कळवत रहा
छान लिहिलयं परिक्षण. मला एक
छान लिहिलयं परिक्षण.
मला एक प्रश्न नेहमी पडतो , हे परिक्षक लोक रेटींग देण्यात येवढे चिक्कु का असतात ?
Juhi Chawla, Shabana Azmi,
Juhi Chawla, Shabana Azmi, Zarina Wahab, Girish Karnad and Divya Dutta >>>> ही लिस्ट वाचूनच उत्सुकता वाटतेय चित्रपट बघायची.+१
नक्की पाहणार. परिक्षण आवडलं.
छान परीक्षण
छान परीक्षण
ट्रेलरमधे जुही अजून तशीच
ट्रेलरमधे जुही अजून तशीच फ्रेश दिसतेय. तेच मोहक हास्य !!