म्हटलं तर आपले आयुष्यच एक जुगार असते. पुढच्या क्षणाला काय होणार आहे हे माहीत नसतानाही आपण पुढच्या कित्येक वर्षांचे प्लानिंग करत जगत असतो. आपल्याला वाटत असते की आपल्या डावाचे पत्ते आपल्या हातात आहेत, बस्स थोडी नशीबाची साथ मिळायला हवी. पण कोणास ठाऊक, कदाचित आपणच कोणाच्यातरी हातातला एक पत्ता असू...
बोअर झाली असेल फिलॉसॉफी तर थेट मुद्द्यावर येतो आणि ते लिहितो ज्यासाठी हा कु ऋ कु प्रसिद्ध आहे.
म्हटलं तर जुगार हा खेळच. बस्स या खेळावर पैसा लावला जातो. ज्यात कौशल्याचा भाग तुलनेत कमी आणि नशीबाचा जास्त असतो. यात जिथे कौशल्याची गरज असते तिथे मी अगदी ईयत्ता पहिली "फ’ मध्ये असतानाच प्रावीण्य मिळवले होते. चिमुकल्या हातांनी दोन-दोन पत्त्यांचे जोड एकसाथ पिसणे, जमीनीपासून दोन इंच वर हवेत कात्री मारणे, पाणीपुरीवाल्या भैय्याचा हात जसा झपझप चालतो तसे लोकांनी पत्ते उचले उचले पर्यंत वाटून मोकळे होणे, ईत्यादी मूलभूत कला अंगात नांदत होत्या. बदाम सत्ती, पाच-तीन-दोन, मुंगूस, मेंडीकोट वगैरे खेळ मला लवकरच बोअर वाटू लागले होते. तीन पत्ती उर्फ फ्लश आणि रमी या खेळांकडे ओढा वाढू लागला होता. पण माझ्या दुर्दैवाने म्हणा, माझ्या वयाच्या कोणाला ते खेळता यायचे नाहीत. आणि बिल्डींगमधील मोठी माणसे मला आपल्यात खेळायला घ्यायची नाहीत. मग एकलव्यासारखे त्यांना खेळताना बघू लागलो. एक दोनदा त्यांनी हटकले, पण कोणाच्या हटकण्याला मी तेव्हाही दाद द्यायचो नाही. माझा चिकटपणा, अभ्यासू वृत्ती आणि या खेळावरचे प्रेम पाहून त्यांनी एकदा मला सहजच खेळायला बसवले. कारण तो ट्रायल गेम होता. त्यावर पैसे नव्हते लागले. पण माझ्यासाठी माझी ईभ्रत लागली होती. धडधडत्या अंत:करणानेच मी बसलो..
जणू याच दिवसाची मी वाट बघत होतो. आपले कर्तब, आपली धडाडी त्यांना तर दाखवायची होतीच, तसेच स्वत:लाही आजमवायचे होते. हात थंडगार पडले होते. तरीही सवयीने पत्ते पिसले गेले, झरझर वाटले गेले. पुढे फार काही मोठा ईतिहास घडला नाही, पण लहान वयात मोठ्या माणसांच्या मांडीला मांडी लाऊन पत्ते खेळणारा म्हणून मी पंचक्रोशीत ओळखू जाऊ लागलो. माझ्या वयाच्या मुलांमध्ये मला एक वेगळीच इज्जत मिळू लागली. तीच इज्जत आपल्यालाही मिळावी म्हणून ते माझ्याकडून रमी शिकू लागले. त्याच सोबत मी त्यांना आणखी एक मूलमंत्र शिकवला. तो म्हणजे जुगाराचा फील यायला हवा असेल तर डावावर पैसे लागायला हवेत. फार शक्य नसतील तर दोन पाच रुपये लावा. ते देखील शक्य नसेल तर काचेच्या गोट्या लावा. पण लावा आणि ते जिंकायसाठी खेळा.
गुरू ! द ग्रेट गॅंबलर ! ग्रॅण्डमास्टर ! अश्या विविध नावांनी मी ओळखलो जाऊ लागलो. या पदव्या मी आनंदाने मिरवू लागलो. ईथेच माझा परतीचा मार्ग बंद झाला. लौकिकाला जागायला मी शाळेतही माझे जलवे दाखवायला सुरुवात केली. ऑफ पिरीअडला आमच्या वर्गात जुगाराचा अड्डा भरायचा. सहा आकड्यांचा ठोकळा किंवा छापा काटा दर्शवणारे नाणे, एवढे भांडवल हा अड्डा सुरू करायला पुरेसे होते. पोरांनी ईंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली तसे मी शाळेत पत्ते आणायला सुरुवात केली. जी पोरे आधी ऑफ पिरीअडला मैदानावर खेळायला जायचंय असा हट्ट करायची, ती आता वर्गातच सुखासुखी नांदू लागली. ज्या लोकांना जुगार खेळण्यात रस नसायचा त्यांना मॉनिटर पुढच्या बेंचवर बसवून वाचनाचा अभ्यास द्यायचा. आणि पाठीमागे आमचा खेळ रंगात यायचा. त्या आधी मॉनिटर माझा एक वर्गमित्र होता, त्यानंतर जिगरी दोस्त झाला. जुगार जर चांगल्या स्पिरीटमध्ये खेळला गेला तर तो लोकांना जोडायचे काम करतो. कौरव-पांडवांसारखे झगडलेच पाहिजे असे जरूरी नसते.
हे सर्व चालू असताना आणखी एक गोष्ट मी सर्वांच्या आधी शिकलो. आणि ती म्हणजे जुगार खेळणारा कधी हरतो तर कधी जिंकतो, पण त्यांना जुगार खेळवणारा सदैव जिंकतोच.
एक अड्डा शाळेत उघडला होता तर एक अड्डा बिल्डींगमध्ये उघडला. बिल्डींगमधील खेळ हलकाफुलका मनोरंजक असा हाऊजी होता. कारण आमच्या बिल्डींगमध्ये याला जुगार म्हणून बघितले जायचे नाही. सणावाराला तर कौटुंबिक रूप यायचे या खेळाला. पारंपारीक बायकाही आमच्यात सामील व्हायच्या. त्यामुळे घरी समजले तरी टेंशन नव्हते. माझे दुकान मी दर आठवड्याला शनिवार रविवारी थाटायचो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर रोजच चालायंच. या खेळाचे व्यसनही असे आहे की लोकं दुपारी जेवून खेळायला बसले की थेट रात्रीच्या जेवणापर्यंत तिथेच पडीक. संध्याकाळी चहा पिण्यापुरते तेवढे घरी जाऊन यायचे.
नियमानुसार प्रत्येक डावाच्या जमणार्या रकमेवर मला दहा टक्के कमिशन मिळायचे. या खेळालाही भांडवल काय, तर एकदाच काय ते हाऊजीचे नंबर घ्यायचे. पंचवीस-तीस रुपयांचे हाऊजीचे पुस्तक घेतले की त्यात ६०० तिकिटे आली. एका तिकिटाची किंमत दोन रुपये धरली तरी एकूण १२०० रुपयांना ती विकली जाणार. ज्यात माझे कमिशन १२० रुपये सुटायचे. एका सुट्टीच्या दिवसात एक पुस्तक सहज संपायचे. एकंदरीत नेट प्रॉफिट किमान नव्वद रुपये. त्या वयात ही माझ्यासाठी फार मोठी रक्कम होती. यासाठी एक मेहनत घ्यावी लागायची ती म्हणजे प्रत्येक डावाला नंबर काढायची. पण मग यासाठी एखादा हौशी मुलगा पकडायचा किंवा एखाद्या लहान पोराला ठराविक डावांचे पाचदहा रुपये देत बसवायचे. नव्वद रुपये कमावणार्याला पंधरा-वीस रुपये नोकरांवर खर्च करणे जड नव्हते.
अर्थात हाउजी बिल्डींगच्या कॉमन पेसेजमध्ये खेळली जायची पण कोणाचे घर रिकामे मिळताच एक छुपा अड्डा तिथेही भरायचा. तिथे मात्र जुगार एके जुगार!
कोर्या करकरीत वह्यापुस्तकांचा वास आणि नव्याकोर्या पत्त्यांच्या कॅटचा स्पर्श, यात एक वेगळीच नशा असते. ती चटक मग सहजी सुटत नाही. जोपर्यंत कोणाची मजबूत पडत नाही. एक दिवस आम्हाला पडली. ज्या घरात आमचा डाव ऐन रंगात आला होता तिथे धाड पडली. एकेकाच्या आईबापांनी आपापल्या पोरांना तुडव तुडव तुडवला. बिल्डींगमधील काही मोठ्या पोरांनीही हात साफ करून घेतला. नेमके त्या दिवशी मी नसल्याने वाचलो. आता हे माझ्या सुदैवाने की दुर्दैवाने हे माहीत नाही. कारण सुधारायची एक संधी गमावून बसलो. ईतर पोरे मात्र बरेपैकी सुधारली. नवा व्यापार खेळायला सुद्धा घाबरू लागली. पण माझी उपासमार होऊ लागली तसे मी बाहेरचा रस्ता धरला. तिथे पहिल्या वळणावरच मला झटपट लॉटरी भेटली.
तिकीट फाडायचे नंबर स्क्रॅच करायचा शेवटचे दोन नंबर लागले की पाच-दहा रुपयांच्या तिकीटीचे पन्नास ते शंभर मिळायचे. कधी दणादण नंबर लागायचे तर कधी खिसा रिकामा व्हायचा. काही दिवसांनी समजले की या जुगारात आपण जिंकलोय कमी आणि हरलोच जास्त आहोत. तिकीटेही ते लोकच छापत आहेत, कोणत्या नंबरवर बक्षीस आहे हे देखील ते लोकंच ठरवत आहेत. थोडक्यात आपण यात सरळसरळ गंडवले जात आहोत. मग काय, टाटा बाय बाय.
याच काळात मला जुगाराचा आणखी एक प्रकार समजला. नरेपार्कला गणेशोत्सवात जत्रा भरायची. एक जत्रा वडाळ्यालाही भरायची. दोन्हीकडे जत्रेतील मनोरंजनाच्या नावावर अगदी राजरोसपणे जुगाराचे खेळ चालायचे. त्यातील माझा आवडता प्रकार म्हणजे, तीन ठोकळे असायचे. प्रत्येकाच्या सहाही बाजूंना आकड्यांऐवजी सहा चिन्हे! ईस्पिक बदाम, चौकट किलावर, चंद्र तारा! समोर टेबलावर अंथरलेल्या कापडावर हीच सहा चिन्हे असायची. आपण दहा-दहा रुपये हव्या त्या चिन्हांवर लावायचे. मग तो माणूस एका वाटीत ते तिन्ही ठोकळे खळखळवून सोडायचा. आपण लावलेले चिन्ह आले की दहाचे वीस मिळायचे, दोन ठोकळ्यांवर तेच चिन्ह आले की तीस, तिघांवरही आले की चाळीस. खरे तर या जागी वीस-तीस-चाळीस ऐवजी वीस-चाळीस-साठ असे असायला हवे. पण मग हीच त्याची कमाई होती.
ईतरही काही गेम असायचे, चिमणी-पोपट, पिंग पॉंग बॉल, सात नंबर वगैरे पण त्यातील जिंकायची प्रॉबॅलिटी कमी असल्याकारणाने तसेच ते ईतके मनोरंजक नसल्याने मी ते क्वचितच खेळायचो. खरे तर मी नास्तिक स्वभावाचा आणि ग्रहतारे भूतभविष्य यांवर विश्वास न ठेवणारा मनुष्य. पण एकदा का लक सुरू झाले की आपण जिंकत सुटतो आणि फिरले की बस हरतच राहतो यावर मात्र त्यावेळी माझा ठाम विश्वास असायचा. म्हणून आधी त्या स्टॉलवर जाऊन मनातल्या मनात एखादे चिन्ह धरत काही डाव खेळायचो. आणि आपले मनात धरलेले बरोबर येत आहे हे बघताच मग खरोखर खेळायला उतरायचो. बहुतांश वेळा हे काम करून जायचे.
तसेच चिटींग करणे हा जुगाराचा एक अविभाज्य घटक. किंबहुना द्यूतकलेतच याचाही समावेश होतो. आणि या उपकलेतही आम्ही तरबेज होतो. स्टॉलवाला टेबलावर ठोकळे टाकताना आम्ही खेळणारे समोर असायचो. पण माझा एक मित्र साईड व्यू ला उभे राहायचा. स्टॉलवाला जेव्हा ठोकळ्यांची वाटी खळखळवून उपडी करायचा तेव्हा तो आपल्या तीक्ष्ण नजरेने काही दिसते का ते बघायचा. जर काही दिसलेच तर आम्हाला इशारा करत कन्फर्म सांगायचा. एवढा वेळ जे आम्ही दहा-वीस रुपये लावत असायचो ते त्या डावाला शंभरची नोट लावायचो. फटक्यात पैसा वसूल!
एकदा एकाला संशय आल्याने त्याने आम्हाला हटकले होते. मात्र ते तेवढ्यापुरतेच. त्याचा पुढे राडा झाला नाही. आम्ही आमचा मोर्चा दुसर्या स्टॉलवाल्याला लुटायला वळवला.
असो, तर या जत्रांचा एक फायदा होता. व्यसन लागले तरी ते मर्यादेत राहायचे. म्हणजे संध्याकाळी तिथे पोहोचलो की पहाटेपर्यंत आम्ही तिथेच पडीक. वा कधी कधी दुपारच्या उन्हातही जायचो खरे. पण आठ-दहा दिवसांनी जत्रा उठली की आपसूकच हा खेळ बंद व्हायचा.
पण यालाच तडा देणारा एक नवा अड्डा आम्हाला सापडला, आणि तो म्हणजे विडिओ गेम पार्लर.
आधी वाटायचे की तिथे लहान मुलांचे विडिओ गेम्स असतील. कारण डेकोरेशनही लहान मुलांना आकर्षित करण्यासारखे झगमग असायचे. तेथील दरवाजाही काळ्या काचेचा असायचा किंवा पडदा लावून असायचा जेणेकरून आतले काही दिसायचे नाही. त्यामुळे कधी आत डोकावण्याचा प्रश्न आला नाही. पण एके दिवशी एका मित्राने खबर काढली की ते छोटेखानी कसिनोच आहेत. जिथे रेल्वेस्टेशनवरच्या वजनयंत्रासारखी मशीन आहेत. ज्यात कॉईन टाकून नंबर सिलेक्ट करायचे आणि छू बोलायचे. लाईटीचे चक्र फिरून आपल्या नंबरवर आले की छन छन छन.. जिंकलेले पैसे लुटायचे.
३८० रुपये! आजही तो आकडा लक्षात आहे जो मी पहिल्यांदा तिथे जिंकलेलो. आत शिरताना ५० रुपये खिशात होते तर बाहेर पडताना ४३०! पुढे दुसर्या दिवशीही १२० रुपये जिंकलो आणि काही दिवसांसाठी मी विसरूनच गेलो की तो एक जुगार आहे जिथे आज जिंकलो तर उद्या हरणार. उद्याही चुकून जिंकलोच तर परवा नक्की हरणार. जणू काही आपल्यातील सुप्त अलिबाबाला चाळीस चोरांचा खजिनाच हाती लागला आहे या आविर्भावात वावरत होतो. पुढचे चार दिवस कॉलेजलाच न गेल्याने तिथेही जाणे झाले नाही, पण या चार दिवसांत मला अक्षरशा त्याची स्वप्ने पडायची. स्वप्नातही खन खन खन करत ते कॉईन्स माझ्या अंगावर पडायचे. विनासायास मिळणारा फुकटचा पैसा माणसाला कसा वेडा करतो ते मी अनुभवत होतो. कॉलेज सुटताच आपसूक पावले तिथे वळायची. कोणी सोबत असल्यास ठिक नाहीतर एकटाच. पण हळूहळू जुगाराच्या मशीनने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. जिंकायला कमी आणि हरायला जास्त लागलो. जिंकल्यावरही कुठे थांबायचे हे न समजल्याने जिंकलेलेही हरायला लागलो. एक गोष्ट मात्र तेव्हा मी चांगली केली होती ते म्हणजे रोजच्या रोज किती आले आणि किती गेले याचा हिशोब ठेवायचो. पहिल्या आठवड्याच्या शेवटी मी जे जवळपास ७००-८०० रुपयांपर्यंत जिंकलेलो ते महिना दिड महिना खेळल्यानंतर शंभरच्या आत आले होते. एके दिवशी मग सारासार विचार केला. मशीनच ते. त्याची सेटींग आपण हरावे आणि त्या पार्लरवाल्याने जिंकावे अशीच असणार. तसेच यात काही चिटींग करून जिंकायचा स्कोपही नाही. आजवरच्या हिशोबानुसार मी सुदैवाने ३०-४० रुपये प्लस मध्येच होतो. मग थांबायचे ठरवले. ते आजवर तिथला रस्ता धरला नाही.
कॉलेजच्या स्टडी नाईटसचा अविभाज्य भाग होता जुगार. रात्री दहा ते पहाटेची पहिली कावकाव कानावर येईपर्यंत चालायचा. नाही म्हटले तरी सातआठ जण असायचोच. मी त्यातला नेहमीचा फंटर. एकेक करत जो बाद व्हायचा तो अभ्यासाचे पुस्तक हातात घ्यायचा. डाव संपताच अभ्यासाचे पुस्तक बाजूला सारत नवीन डावाला सुरुवात. हे असे रात्रभर चालायचे. पण मित्रमित्रच आपापसात खेळतील त्याला जुगार खरे तर म्हणायला नको. कारण जो जिंकेल तो सकाळी चहा नाश्त्याची पार्टी द्यायचा. बरेचदा त्याचे बिल जिंकलेल्या रकमेपेक्षा जास्त भरायचे. म्हणून मग आम्ही गिर्हाईक शोधायला सुरुवात केली. आमच्या ग्रूपबाहेरील पोरांना खेळायला आमंत्रित करू लागलो. सुरुवातीला त्यांना आपला कच्चा खेळ दाखवत जिंकू द्यायचो, मग डावावर पैसे लावून खेळायला सुरुवात करताच त्यांचा खिसा साफ करायचो. अर्थात आम्ही तिघे चौघे यात पोचलेलोच होतो, त्यामुळे जिंकणे अवघड जायचे नाही. तरीही एखादा चांगला खेळणारा आणि चांगले नशीब घेऊन आलेला भेटला तर थोडीफार चिटींग करत त्याला गुंडाळायचो. अर्थात त्याला जराही संशय न येता, कारण अंडे देणारी कोंबडी निसटू द्यायची नसायची.
या जुगारांच्या रात्रीचे कैक किस्से आहेत. किंबहुना एकंदरीतच जुगाराशी संबंधित बरेच किस्से आहेत. पण ते सारे या लेखात घेऊन याचा प्रबंध करण्याऐवजी माझ्या आत्मचरीत्रासाठी त्याला शिल्लक ठेवतो.
लेख क्रमांक १ मध्ये मी मस्करीतच म्हणालो होतो की जर ईंजिनीअर झालो नसतो तर छोटामोठा चोर होत स्वत:चे आणि बायकापोरांचे पोट भरले असते. पण जुगाराबाबत कॉलेजला असताना मात्र मला सिरीअसली असे वाटायचे की मस्तपैकी एखादा जुगाराचा अड्डा काढावा, आपल्या आवडीचा खेळ थोडा आपणही खेळावा, बराचसा इतरांना खेळवावा, आणि दिवसाच्या शेवटी रोज आपणच जिंकून घरी जावे.
पण शाळा सुटली पाटी फुटली .. कॉलेज सुटले तसे जुगार सुटला .. नोकरीला लागल्यावर स्वताच्या कमाईचे पैसे जुगारात उडवावेसे वाटले नाही. अर्थात आधी आईवडीलांचे होते म्हणून उडवायचो असेही नाही, पण या काळात अगदी जवळच्या नात्यात जुगारामुळे एका हसत्याखेळत्या सुखवस्तू कुटुंबाची वाताहात झालेली पाहिली. घरातल्या कर्त्या पुरुषाने स्वत:ची आयुष्यभराची मिळकत आणि बापजाद्यांची कमाई तर उधळलीच, पण पैश्यांसाठी तगादा लावून कमावत्या बायकोलाही लंकेची पार्वती बनवून ठेवले. कर्ज काढून सण साजरे करू नये असे म्हणतात, पण जुगार खेळून कर्जबाजारी होऊ नये हे आपले आपल्यालाच समजायला हवे. जुगाराची कीड मला लागण्याआधीच मला त्याची चीड येऊ लागली आणि मी या वाईट व्यसनातून अलगद निसटलो ते कायमचाच!
__________________________
अवांतर - पहिल्या लेखाच्या शब्दखुणात चोरी टाकल्याने त्याचे लेखन चोरी असे झाले होते, जी मी कधी केली नसल्याने शब्दखूण बदलली होती. पण या लेखाच्या शब्दखुणात जुगार टाकलेय. कारण माझे लेखन म्हणजे एक जुगारच असते. जमते तेव्हा लोकं डोक्यावर घेतात, नाहीतर माझ्यासह पायदळी तुडवतात.
तर पुन्हा एकदा आभारी आहे,
तुमचाच ऋ ..
ऋणम्या, किती फेकशील किती
ऋणम्या, किती फेकशील किती पकवशील
आई गं! काय लिहिलंय, काय
आई गं!
काय लिहिलंय, काय लिहिलंय!
'खुदा जाने के , मैं फिदा हूं।'
साती, धन्यवाद सस्मित, हे मी
साती, धन्यवाद
सस्मित, हे मी एका लेखात बसवायला प्रत्येक भागाला बस उपर उपर छू के लिहिलेय. अन्यथा यामागे कित्येक किस्सेही दडलेत. ते लिहिले असते तर त्यातील डिटेलिंग बघून हे अनुभवाशिवाय शक्य नाही हे आपल्याला समजले असते आणि फेकणे, पकवणे या आरोपातून आपण मला मुक्त केले असते
(No subject)
चल तुझ्या तिसर्या
चल तुझ्या तिसर्या व्यसनाबद्दल लिही.- मायबोलीवर अनेक धागे विणत बसणे.:खोखो:
माझीही करमणूक होते हे नसे थोडके.:फिदी:
अरे पहिलीतल्या मुलाला पत्ते
अरे पहिलीतल्या मुलाला पत्ते कुटणे येउ शकते हे वाचुनच माझ्या संस्कार्क्षम का काय म्हणतात त्या मनाला पहिला धक्का बसला. मग पुढे वचताना बरेच धक्के बसले रे. अगदीच खोटं लिहिलस असं म्हणायचं नाहीये पण बर्याच गोष्टी पकाव वाटल्या.
चिमुकल्या हातांनी दोन-दोन पत्त्यांचे जोड एकसाथ पिसणे, जमीनीपासून दोन इंच वर हवेत कात्री मारणे, पाणीपुरीवाल्या भैय्याचा हात जसा झपझप चालतो तसे लोकांनी पत्ते उचले उचले पर्यंत वाटून मोकळे होणे, ईत्यादी मूलभूत कला अंगात नांदत होत्या>>>>>>>>>> आर यु सिरीयस? पहिलीत? तुझं माहित नाही पण साधारण पाच-सहा वर्षांची असतात रे सामान्य मुलं पहिली इयत्तेत.
ऋन्मेऽऽष, व्वा !! अगदी
ऋन्मेऽऽष,
व्वा !! अगदी "सर्वगुणसंपन्न" आहेस की रे
अहो सस्मित, अगदीच शैक्षणिक
अहो सस्मित, अगदीच शैक्षणिक पहिली फ घेऊ नका, कारण वाटत नाही तरी मी 'अ' तुकडीत होतो
नेमक वय आठवत नाही पण सांगायचा मुद्दा हा की ज्या वयात एखाद्या लहान मुलाला पत्ते व्यवस्थित पकडता येणे कौतुकाचे वाटते तेव्हा माझा पत्ते पिसायचा वा वाटायचा वेग अफाट होता आणि त्यावरून कौतुक व्हायचे.
हे भग्गु!!!!!!
हे भग्गु!!!!!!
हे काय परचूरन, छूट पूट
हे काय परचूरन, छूट पूट लिहिलंय...
लग्नाबद्दल लिही !
हे सर्व चालू असताना आणखी एक
हे सर्व चालू असताना आणखी एक गोष्ट मी सर्वांच्या आधी शिकलो. आणि ती म्हणजे जुगार खेळणारा कधी हरतो तर कधी जिंकतो, पण त्यांना जुगार खेळवणारा सदैव जिंकतोच.
>>
वाह वाह!
हे फेकलय, अशागत वाटात
हे फेकलय, अशागत वाटात नाही.
किंबहुना ३०/४० वर्षांपूर्वीच्या आमच्या पिढीला तर वाया जायला जी महत्वपूर्ण कारणे होती त्यात जुगार/मटका/लॉटरी हे होतेच होते. व त्या ठिकाणी पाऊलही ठेवले नाही असे सांगणारा विरळाच म्हणावा लागेल.
आम्हिही अशी यच्चयावत ठिकाणे पालथी घातलि होती, पण निव्वळ औत्सुक्यापोटी. खिशात दमडाही नसताना तो जुगारावर लावणे हे शक्यच नव्हते, व घरातुन आईची शिकवण अशी जबरदस्त होती की "फुकटचे काही मिळते" यावर तेव्हाही विश्वास नव्हता, आजही नाहीये. व ज्यांना फुकटचे "दोन नंबरचे" मिळते, ते त्यांना पचतही नाही हा मूलमंत्र आईनेच शिकवला होता व त्याचा प्रत्ययही तेव्हापासुन आजवर घेतच आलोय.
सबब जुगार वगैरे वाईट सवयींपासुन देवदयेने व आईवडिलांच्या पुण्याईने मी लांबच राहु शकलो.
लिंबूजी धन्यवाद मटका आमच्या
लिंबूजी धन्यवाद
मटका आमच्या मागच्या पिढीतील. मटका किंग रतन खत्री बरोबरच संपला. पुन्हा चालू झाला नाही आणि खेळायची इच्छा अपूरीच राहिली.
हर्पेन, लग्नाबद्दल?? लग्न एक जुगार की लग्न एक वाईट सवय?? नक्की काय लिहायचे??
माझ्या वाईट सवयी-लग्न करणे
माझ्या वाईट सवयी-लग्न करणे
लग्न एक जुगार असं म्हणतात ना
लग्न एक जुगार असं म्हणतात ना त्याबद्दल म्हणतोय मी
लग्न ही सवय कशी होईल
सवय, आपले लग्न झाले आहे ह्याची करून घ्यावी लागते
सगळ्यांनाच जमते असे नाही ते
लग्न झाले तरी झालेच नाही असे सांग / वागतात कित्येक जण
मिलोर्ड गुन्हेगार के
मिलोर्ड
गुन्हेगार के कबूल-ए-जुर्म और तमाम गवाहो को मद्देनजर रखते हुये
रून्मेष नाम का ये शख्स अथवा डुप्लीकेट आयडी लोगोङ्को नये नये धागे निकालकर गुमाराह करणे की कोशीस कर रहा हई
इसलीये जज साहिब माबो प्रशासक से दरखवास्त हई की इज आयडी को तुरंत बरखास्त करके जेल मे दाल दइया जाये
दॅट्स ऑल युवर ओंनर
व्वा !! अगदी "सर्वगुणसंपन्न"
व्वा !! अगदी "सर्वगुणसंपन्न" आहेस की रे डोळा मारा
>>> प्रसन्न, सर्व(अव)गुणसंपन्न म्हणायचंय का तुला?
लहानपणीचा चिकटपणा इथेही पुरून
लहानपणीचा चिकटपणा इथेही पुरून उरलेला दिसतोय. इथे म्हणजे मायबोलीवर.
ह्या सगळ्या स्वप्नरंजनाला नाताळची सुट्टी आहे की नाही?
(No subject)
एवढं मोठ्ठ लिहीलेलं स्क्रोल
एवढं मोठ्ठ लिहीलेलं स्क्रोल करूनच दमले. वाचणं दूरची गोष्ट!
सर्व(अव)गुणसंपन्न म्हणायचंय
सर्व(अव)गुणसंपन्न म्हणायचंय का तुला?
>>
अहो कंसात अव कशाला... मी शीर्षकातच लिहिलेय की वाईट सवयी
सायो, येस्स. नाताळची सुट्टी.. २५-२६-२७.. टू डेज अॅण्ड थ्री नाईट्स विथ फ्रेण्डस अॅण्ड आपापली गर्लफ्रेण्ड.. प्लान बनला तर मायबोलीला त्या काळात विश्रांती
ज्यांना फुकटचे "दोन नंबरचे" मिळते, ते त्यांना पचतही नाही हा मूलमंत्र आईनेच शिकवला होता व त्याचा प्रत्ययही तेव्हापासुन आजवर घेतच आलोय.
>>>
लिंबूजी, संस्कार नेहमी अश्या आदर्श फिलोसॉफीनेच लावले जात असले तरी प्रत्यक्षात असे काही नसते.
ज्याचे मन खात नाही त्याला काहीही पचते. न्यायनिवाडा करणारा कोणताही देव वर बसला नाहीये हेच खरेय
असो, हा टोटली वेगळाच विषय झाला.
एवढं मोठ्ठ लिहीलेलं स्क्रोल करूनच दमले. वाचणं दूरची गोष्ट!
>>>>
काय करणार, आयुष्यात उडपटांग धंदेच एवढे केलेत. कमसे कम एवढी लांबी तर होणारच लेखाची. इन्फॅक्ट हे बरेच शॉर्ट शॉर्ट करून लिहिलेय.
Tumchi gf vachte ka ho he
Tumchi gf vachte ka ho he lekh;)
वा, वा, नाताळच्या सुट्टीत
वा, वा, नाताळच्या सुट्टीत तुझ्या चकलीच्या सोर्याला सुट्टी मिळायची आशा आहे ह्यानेच मनाला उभारी आली अगदी.
टोटल अजून किती वाईट सवयी
टोटल अजून किती वाईट सवयी येणार आहेत ?
ज्याचे मन खात नाही त्याला
ज्याचे मन खात नाही त्याला काहीही पचते. न्यायनिवाडा करणारा कोणताही देव वर बसला नाहीये हेच खरेय स्मित>> वा, काय बोललात! सहमत.
दक्षिणे.... समझदार को इशारा
दक्षिणे....
समझदार को इशारा काफी है !!
संस्कार नेहमी अश्या आदर्श
संस्कार नेहमी अश्या आदर्श फिलोसॉफीनेच लावले जात असले तरी प्रत्यक्षात असे काही नसते.
ज्याचे मन खात नाही त्याला काहीही पचते>>
काय तत्त्वज्ञान!
महान एकदम!
>>>> ज्यांना फुकटचे "दोन
>>>> ज्यांना फुकटचे "दोन नंबरचे" मिळते, ते त्यांना पचतही नाही हा मूलमंत्र आईनेच शिकवला होता व त्याचा प्रत्ययही तेव्हापासुन आजवर घेतच आलोय.
>>>
>>>> लिंबूजी, संस्कार नेहमी अश्या आदर्श फिलोसॉफीनेच लावले जात असले तरी प्रत्यक्षात असे काही नसते.
ज्याचे मन खात नाही त्याला काहीही पचते. न्यायनिवाडा करणारा कोणताही देव वर बसला नाहीये हेच खरेय स्मित
असो, हा टोटली वेगळाच विषय झाला. <<<<<
असे काही नसते ही तुमच्या देहाधारीत व निव्वळ पंचेद्रियाधारीत समजुत.
ती ति घटना घडताना, मन खात नसेल, तर ती ती घटना घडवुन आणणे (लुबाडणूक वगैरे) शक्य होते इथपतच तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण ते केले, वास्तवात कायद्याच्या दृष्टीने "पचलेही" गेले असे वाटले/भासले/घडले, तरीही, जर नीट पणे बघितलेत, तर अशा प्रत्येक व्यक्तिची देहस्तरावरील उतारवयातील वाटचाल, वा अन्य क्वचित वेळेस घात/अपघात यामुळेचा धोका अशांचा निरीक्षणाद्वारे अभ्यास केल्यावर असेच दिसते, की बाह्यतः अशा व्यक्ति कितीही सुखी/संपन्न आहोत असे प्रदर्शन करीत असल्या तरी त्यांची मानसिक व शारिरीक स्थिती वाळवीने पोखरलेल्या झाडाच्या वाळक्या बुन्ध्याप्रमाणे झालेली असते. आजुबाजुला नजर टाका, अशी असंख्य उदाहरणे दिसतील.
कित्येकदा, आईबापाचे पापाचे फळ त्यांचे मुलाबाळांनाही भोगावे लागते, वा अशाप्रकारचे फळ भोगण्याकरता अशा अशा पापी आईबापांचे पोटी जन्म अशीच ती रचना असते. हे देखिल आजुबाजुला बघता येते.
सांगायचा मुद्दा असा की "निव्वळ मन खात नाही" म्हणून सर्व काही पचले असे होत नाही. स्रुष्टी/ग्रहतारे यांचे परिणाम असे होऊ देत नाहीत व आयुष्याच्या विशिष्ट वळणावर "पश्चा:ताप" नामक अग्नित होरपळून निघावे लागते जे असह्य असते.
आता काहीजण पश्चा:तापाच्या अग्निपासुन लौकर सुटका व्हावी म्हणून "कबुलीजबाब टाईपचे धागे" काढून केल्या कर्मातुन/कर्मफलातुन मुक्त व्हायचा केविलवाणा पण स्तुत्य प्रयत्न करतातही, पण तो प्रयत्न हे देखिल पश्चा:तापाचा चटका बसु लागल्याचेच लक्षण होय असे माझे ठाम मत आहे.
हे संजय लीला भन्साळी.(हे
हे संजय लीला भन्साळी.(हे वाक्य हे भगवान च्या चालीवर वाचावे)
हे सन्जय तेरी लीला अगाध है, डोकं भन्साळलं ज्यायला !
भाग्या, हो माझे हे लेख
भाग्या,
हो माझे हे लेख गर्लफ्रेंडला वाचायला दिलेत. कारण हे माझ्याशी संबंधित आहेत. जगदुनियेला वाचायला इथे टाकतोय मग तिचा तर हे जाणून घेण्याचा पहिला हक्क आहे.
तुर्तास तिला व्हॉटसपवर टाकलाय. तुम्ही इथे छान छान प्रतिसाद दिलेत तर ईथलीही लिंक देईन
सुजा,
कल्पना नाही किती लिहेन. एक लिहिताच कित्येक वाईट सवयी डोक्यात फेर घालून नाचू लागल्यात. जेव्हा एखादी अशी सवय आठवेन जी मी इथे लिहायला कचरेन आणि मी इथे काहीही बिनधास्त लिहू शकतो हा माझा अहंकार गळून जाईल तेव्हा थांबेन.
लिंबूटिंबू,
आपण यावर नंतर सविस्तर वा स्वतंत्र धाग्यात बोलूया.
पण किती वाईट लोकांचे वाईटच झाले आणि किती चांगल्या लोकांचे वाईट झालेच नाही असा एखादा सर्व्हे मिळाला तर बरे होईल. अन्यथा आपण आपापल्या श्रद्धेवर मुद्दे मांडत एका न संपणार्या चर्चेत अडकून बसू
Pages