डुंगोबा ते किल्ले निवती..!

Submitted by Yo.Rocks on 22 November, 2015 - 22:14

ध्यानी मनी नसताना जेव्हा ट्रेक होतो त्याची मजा काही औरच.. पण अंगारकी चतुर्थीचा उपवास, फॉर्मल कपडे व सोबतीला बायको ती पण साडीमध्ये ! जात होतो फिरायला पण घडला खरे तर ट्रेकच !! निमित्त होते ते किल्ले निवतीची सफर... !

कोकणात गावी जाणे झाले की त्यानिमित्ताने एक तरी पर्यटन स्थळ बघून घ्यायचे हे समिकरण अलीकडेच दोनेक वर्षापुर्वी ठरवलेले.. एकतर जाणं कमी त्यात मोठी सुट्टी गणपतीला घ्यायची असते सो या सगळ्यात अख्खा कोकण पहायचा कधी हा प्रश्नच आहे.. त्यात कोकणातला एकेक कोपरा मनाला भुरळ पाडतो नि खरच आयुष्य कमी पडेल इतका या कोकणचा आवाका.. लोक कुठे कुठे नि कसे म्हणून राहतात.. डोंगराच्या कुशीत, सड्यावर, नदीकाठी, समुद्रकिनारी, दाट जंगलात.. हे सगळ सगळ पहायच आहे.. अनुभवायचे आहे.. मग ते पर्यटन स्थळ असो की साधं गाव असो..

डिसेंबर नुकताच उजाडला होता.. आईला गावाहून आणायचे निमित्त झाले नि तीन दिवसासाठी मी आणि बायको कोकणभेटीला निघालो.. त्यात एक दिवस किल्ले निवतीला फिरून यायचे हे आधीच ठरवलेले ! म्हणावी तशी थंडी अजुन काही सुरु झाली नव्हती.. अंगारकी चतुर्थीचा दिवस..

माझा एकुलता एक उपवासाचा दिवस नि बायकोचा देखील उपवास.. कुडाळ एसटी स्थानकावरुन सकाळी ८.३० वाजता सुटणारी किल्ले निवतीची एसटी पकडण्यासाठी सकळीच घर सोडले.. स्थानकाबाहेरच्या हॉटेलात साबुदाणा वडा घाईघाइतच खाल्ला नि अगदी वेळेवर स्थानकात पोचलो.. म्हणून बायकोला बाहेरच थांब सांगून एसटी कधी येईल विचारायला चौकशी केंद्रावर गेलो तर कळले एसटी बाहेर आहे निघायच्या तयारीत.. हे ऐकताच मी बाहेर धूम ठोकली तर एसटी खरच उभी होती पण बायको गायब !! इकडे तिकडे बघितले पण ही दिसलीच नाही.. हिला फोनेपर्यंत निवतीची एसटी मला कट मारून गेली पण !!! एसटी गेली नि आमच्या सौ. एका दुकानातून उपवासी चिवड़ा घेऊन बाहेर येताना दिसल्या ! शॉट ! दिवसाची सुरवात या पहिल्या ठिणगीने झाली हे सांगायला नकोच..

मागे आम्ही दोघेच दुधसागरला जातानासुद्धा अशीच ट्रेन समोरून गेली होती.. आता पुन्हा चौकशी केंद्र गाठले तर कळले थेट साडे दहाला एसटी.. काही फायदा नव्हता.. सगळाच उशीर होणार होता.. आम्हाला सहाच्या आत पुन्हा घरी पोचायचे होते.. नि वाट पाहणे कधीही त्रासदायक ! आम्ही काय करायचे या विवंचनेत असताना बाजूला उभे असलेले मास्तर म्हणाले की तुम्हाला किल्ले निवती ला जायचे असेल तर श्रीरामवाडी ची एसटी पकड़ा.. तिकडून एक डोंगर चढून जावे लागेल.. समुद्र छान दिसतो.. पुढे डुंगोबा चे देऊळ लागेल मग पालिकडेच किल्ले निवती आहे..इति माहिती ऐकताना डोळ्यासमोर आपसुकच चित्र उभे राहीले की डोंगरावर मंदीर असेल.. शांत परिसर.. लाटांची गूंज ऐकू येईल.. मंदिरातल्या कट्यावर बसून समुद्र न्याहाळता येईल.. विश्रांती घेऊन मग पलीकडे किनाऱ्यावर जिथे डोंगराची सोंड उतरत असेल तिथून किल्ले निवती !! वाह ! काल्पनिक चित्रातून बाहेर पड़त लगेच डन डना डन केले !

श्रीरामवाडीची एसटी बरोबर नऊच्या टोल्याला हजर ! एक नवीन गाव पण पहायला मिळणार म्हणून जास्त उत्सुक होतो.. कोकणात सगळी गाव दिसायला तशी सारखीच पण तरीही हवीहवीशी.. प्रवासात नाही म्हटले तरी आड़ आलेल्या गावांमध्ये कमळांनी भरलेले पाटपरुळयामधले तलाव, कौलारु घरावर बसलेला सांड म्हणावा इतका मोठा धनेश पक्षी अस बरच काही दिसले.. आम्ही कुठल्या दिशेने जातोय हे माहीत नव्हते वा स्टॉप कधी येणार काही पत्ता नव्हता.. दीडतासात एका गावात उतरवले गेले.. पण चौकशी केल्यावर कळले शेवटच्या स्टॉप ला उतरायला हवे होते.. एक आजोबा होते ते म्हणाले शेवटच्या स्टॉपला वाट आहे.. डोंगर चढ़ावा लागेल.. पुढे डुंगोबा मंदिर आहे.. वाट अगदी सरळ नाही पण जाऊ शकाल.. इति.. मला मात्र शेवटचे वाक्य खटकले..म्हटल बघू पुढे पण चौकशी करू.. ऑटो ने 50 रुपयाच्या बोलीवर अर्धा एक किमी अंतरावर श्रीरामवाडीच्या शेवटच्या स्टॉप ला सोडले.. त्यानेही 'डुंगोबासाठी अस जा तस जा.. काही अडचण नाही.. प्रसिद्ध आहे.. बरीच लोक ये - जा करतात वगैरे' म्हटले नि आमच्या आशा अजुन पल्लवीत केल्या..

अकराच्या सुमारास वाटेला लागलो.. सुरवातीलाच चढण लागते.. जेमतेम चार माणस जाऊ शकतील अशी लाल मातीची पाऊलवाट.. दोन्ही बाजूला डौलदार वृक्ष.. माजलेले झाडीझुडुपांचे रान.. फुललेली आकर्षक रंगाची मोहक रानफुलं.. नि दुरवरून ऐकू येणारी लाटांची गूंज.. सगळ काही आल्हाददायक...!

- -

- - -

पंधरा-एक मिनिटांतच डावीकडचे रान मोकळे झाले व निवतीचा सुंदर समुद्र किनारा नजरेस पडला.. किल्ले निवती व निवती ही दोन वेगवेगळी गावं आहेत.. गफलत नसावी.. ! कुडाळवरून किल्ले निवती व नुसते निवती अश्या दोन्ही ठिकाणी जायला एसटी आहेत.. मुळात हे गाव उंचावर असल्यामुळे पटकन ऊंची गाठल्यासारखे वाटते.. आम्ही वरती चढून मोकळ्या माळरानावर आलो.. कोणाचीच जाग नव्हती वा कुठले घर दिसत नव्हते तेव्हा अंदाज बांधत उजवीकडे जाणाऱ्या वाटेकड़े वळालो.

काही अंतरावर एक चीरे वापरून बांधलेले कुंपण लागले.. बरोबर मध्ये ते कुंपण तुटलेले अर्ध्या अवस्थेत दिसले नि इथेच 'श्री डुंगेश्वर देवस्थान'चा छोटा फलक दिसला.. ! पण तो फलक दिशा सांगत नव्हता.. ! शिवाय फलकाच्या उजवीकडे नि डावीकडे जाणाऱ्या दोन वाटा यामुळे गोंधळ उडाला.. विस्तीर्ण अश्या या माळरानावर आम्ही दोघेच.. डावीकडची वाट निश्चित झाडीत लपलेल्या घराकडे जात असणार म्हणून आम्ही उजवीकडची वाट पकडली.. पुन्हा एकदा पाऊलवाट नि दोन्ही बाजूस झाडी सुरु.. सातभाई,कोतवाल, बुलबुल नि सूर्यपक्षी यांचीच काय ती वर्दळ.. डोईवर सूर्य तळपू लागलेला नि आम्ही कधी डुंगोबा ला पोचतोय असे झालेले.. म्हणजे किल्ले निवती चा मार्ग मोकळा..!

थोड पाचेक मिनिट चाललो तेव्हा कुठे एकच घर लागले . कोणी दिसले नाही म्हणून तसेच पुढे गेलो तर पुन्हा वाटेला दोन फाटे फुटले.. परिसर भन्नाट शांत होता.. उगीच दुपारची चुकामुक नको म्हणून मागे येऊन घरात हाक दिली.. चुकीची वाट पकडल्याचे कळले नि माघारी फिरलो.. आता पुन्हा त्याच फलकाजवळ ! त्या घरवाल्यांनी विजेचा खांब आहे तिकडून वाट जाते सांगितलेले.. पण इथे दोन खांब अंतर राखून होते नि एक वाट कुंपणापलीकडे जात होती.. कुंपण ओलांडायचे की नाही या संभ्रमात तेव्हा पुन्हा खात्री करण्यासाठी डावीकडच्या घराकडे जाणारा रस्ता पकडला.. चोहुबाजूंनी आंबा, नारळ अश्या झाडांच्या वेढयात टुमदार घर विसावलेले.. फ़क्त दिसायलाच प्रसन्न नाही तर त्या परिसरात प्रवेश केला नि विलक्षण गारवा जाणवला.. अंगणात मोहक अबोलीचा गंध दरवळत होता.. माडाच्या झाडाखाली शीतल छायेत दाटीवाटीन असलेल्या अबोलीच्या ताटव्याची ती किमया होती..

घरच्या ओट्यावर एक ताई त्या अबोलीचाच गजरा गुंफण्यात मग्न होती.. मी बाहेरच उभा राहून बायकोला रस्ता विचारण्यासाठी पाठवले.. ते कुंपण ओलांडूनच रस्ता असल्याचे कळले.. निघण्यापूर्वी ताईने आपुलकीने एक गजरा सप्रेम भेटही दिला.. बायकोच्या कपाळी कुंकू लावूनच ताईने पाठवले.. त्या पाच मिनिटाच्या आदरतिथ्याने अजिबात भारावलो नाही ! त्यांच्या काळजात भरली शहाळी...!!

आम्ही आता योग्य मार्गी लागलेलो.. मध्यान्ह ओलांडून गेली तरी आम्ही अजुन पोचतच होतो.. एव्हाना किल्ले निवतीबद्दल उत्सुकता कमी झाली होती.. नि डुंगोबाचा ध्यास लागला होता.. त्याचा पत्ता लागला की तिकडून किल्ले निवती.. ! पुढे वाटेत कुठेही गरज नसताना आता मात्र अजुन एक दिशादर्शक फलक लागला..

समोरच आम्हाला जंगलाने वेढलेला दुसरा डोंगर दिसू दिसला.. पण आमची वाट पुढे उतरणीला लागली.. नि चक्क जंगलात घुसली.. म्हटल मंदिर गेल कुठे ?? बर कुणाला विचारयाचे तर सगळा सुनसान परिसर..

- - -

- - -

पण वाटेत अधुनमधून भगवा दिसत असल्याने वाट बरोबर होती हे समजत होते.. दोन्ही बाजूच्या वृक्षदाटीने आता आसमंतही झाकून घेतले.. चार फूट रुंदीची पाऊलवाट आता केवळ दोन फुटाची बनली.. उतार कायम होता तेव्हा डोंगर उतरतोय हे लक्षात आले होते.. मग देवस्थान गेले कुठे नि निवतीला इकडून जायचे कसे.. मनात नुसता कल्लोळ उठला.. पुढे वाटही बिकट होत चालली.. दिडेक फुट रुंदीच्या वाटेमुळे आजुबाजूच्या झाडीशी झटापटी होऊ लागली.. अगदी सरळ अशी वाट नव्हतीच.. अधुनमधून झाडांची जाडजूड मुळं ओलांडावी लागत होती तर कधी आड़ येणाऱ्या वेलींचा अडथळा पार करावा लागत होता.. काही ठिकाणी आड़ येणाऱ्या वेली बांधून ठेवल्या होत्या.. पण त्यांना कितीसे थोपवणार.. पुढे तर अगदी काट्याकुट्यांच्या बोगदयातून वाकून जावे अशी वाट.. बर या गुंत्यात कुठे सरपटणारे जीव पायाखाली नाही आले म्हणजे झाल..

जल्ला हे सगळ आमच्या पोषाखाला साजेस नव्हतच.. साहजिकच आता ठिणगी नाही तर बायकोचा भडका.. जल्ला मी पण वैतागलो होतो.. एवढं प्रसिद्ध देवस्थान मग वाट का नाही चांगली.. मंदीर वगैरे नसून नक्कीच आश्रम वगैरे असावे असे वाटू लागले.. बर समोर दहफुटा पालिकडच नि आजुबाजुला दोन फूटा पालिकडच दाट झाडीमुळे काही दिसत नव्हतं.. सकाळी ते मास्तर सांगत असताना मनात उमटलेल्या त्या काल्पनिक चित्राचे एव्हाना केव्हाच तुकडे पडलेले..!

कुठलाही धोका नको म्हणून माघारी परतायचा विचार मनात येत होता.. पण काही मिनिटांत उजव्या बाजूला खाली वाहत्या पाण्याचा आवाज ऐकू आला.. पाहिले तर काही बायकांची धुणी-भांडी सुरु होती.. झाड़ीमुळे काही स्पष्ट दिसत नव्हते तेव्हा तसेच पुढे गेलो.. उतार संपला एकदाचा..! सपाट वाट सुरु झाली पण जंगल मात्र तेवढेच.. थोड़ पुढे गेलो नि अचानक मोकळ्या जागेतील भगवा रंग डोळ्यात भरला.. या जागेचे वर्णन काय करावे.. गुढमय शांतता.. त्यात दाटीवाटीने बसवलेल्या असंख्य भगव्या निशाणांचा भड़क रंग.. हा परिसर लांबूनच बघताना समोरून मुंगूस आडवे गेले..! हेच ते श्री डुंगेश्वर देवस्थान..डुंगोबा !

साध छप्परदेखील नसलेले पण येथील प्रसिद्ध असे हे श्री देव डुंगोबा देवस्थान.. भगव्या निशाणांच्या आश्रयाखाली एक शिवलिंग नि पुजेची दोन तीन भांडी.. आजुबाजूला झाडांच्या मूळांचा विळखा आणि तोरण म्हणून बहुसंख्येने असलेल्या घंटांच्या माळा.. ! बस्स बाकी काही नाही.. मागच्या बाजूस तीन-चार मोठी पातेली व भांडी ठेवलेली दिसली. म्हणजे भक्तजनांची ये-जा असावी.. बाकी हा परिसर अगदी स्वतःच ध्यान धारणेत हरवलेला.. या चिडीचूप परिसरातील शांतता ही तुम्ही घ्याल तशी असते.. मग काहीजणांना ती सुखावह वाटते तर काहीजणांना भयावह वाटते..!!!

- - -

(नंतर मिळालेल्या माहितीनुसार कळले की स्थानिक लोक या जंगलाला देवराई म्हणतात.. देवाचे जंगल म्हणून या भागात (जिथे जंगल सुरु होते तो भाग) वुक्षतोड तर नाही पण झाडाचे साध पानदेखील खुंटत नाहीत म्हणे. म्हणूनच ती वाट एवढी बिकट बनली असावी.. आणि येथील स्थानिक लोकांचा विघ्नहर्ता नि या जंगलाचा देवता म्हणजे श्री देव डुंगोबा _/\_ )

वाट इथेच संपत होती.. उजव्या बाजूला असलेला वाहता ओहोळ इथे मात्र स्थिराप्रज्ञेत होता.. आता पुढे काय करायचे हा गोंधळ असल्याने आम्ही लगबगीने आल्या वाटेने माघारी फिरलो.. जिथे धुणीभांडी करण्यास बायका आल्या होत्या त्यांना आवाज दिला.. पण उतरायचे कुठून हेच त्या दाट झाडीत समजत नव्हते.. शेवटी एकीने वरती येऊन खाली उतरण्याची वाट दाखवली.. तो ओहोळ पार करून पलिकडच्या वाटेने तिने आम्हाला गावात सोडले ! म्हणजे ओहोळ पार करणे गरजेचे..

किल्ले निवती कुठेय विचारल्यावर ह्याच गावाला किल्ले निवती म्हणतात कळले.. पण किल्ल्यावर जायचे म्हटल्यावर तिने वाट दाखवली.. डावीकडे किल्ले निवतीचे एसटी बस स्थानक लागले नि मागेच समुद्रकिनाऱ्याकडे जाणारी वाट.. आम्ही मात्र उजवीकडच्या रस्त्याने समोरची टेकडी चढायला घेतली.. तिथेच किल्ला दिसणार होता..

दुपारचा एक वाजत आलेला.. तळपते उन नि आतापर्यंत झालेली बरीच तंगडतोड यांमुळे हैराण व्हायला झाले.. शेवटी अर्ध्या वाटेतच बायकोने माघार पत्करली.. वाटेतील घरच्या गेटवर सावली बघून बसली.. पाचेक मिनिट पुढे जायचे होते पण आता ती तयार नव्हती.. तरी बरीच मजल मारली होती.. 'मग इथेच रहा.. येतो पटकन' म्हणत मी धावतच पुढे गेलो.. पुढच्या वळणापर्यंत ती दिसत होती.. या वळणावरती किल्ले निवतीचा समुद्रकिनारा व समुद्रात घुसलेला डोंगरसदृश मोठा खडक हा नजारा खूपच छान दिसतो.. मनात म्हटल इथ नंतर जाऊ..

- - -

वळण घेतले की वरती पोचलो.. पण किल्ल्याचे अवशेष कुठे दिसले नाही.. या वरच्या पठारावर एक पत्र्याच घर होत.. इथून पलिकडच्या कड्यावर गेलो नि समोरच दृश्य पाहून थक्क झालो.. अथांग समुद्र नि पांढऱ्याशुभ्र वाळूचा लांबच्या लांब पसरलेला सुंदर समुद्रकिनारा.. जोडीला नारळाच्या बागेची किनार.. हाच तो भोगव्याचा समुद्रकिनारा.. लाटांची किनाऱ्यासंगे सुरु असलेले हितगुज सोडले तर बाकी सगळे शांत शांत.. असा निवांत समुद्रकिनारा पाहण्याची मजा काही औरच..

- - -

डावीकडे पाहीले तर झाडीत लपलेला बुरुज नजरेस पडला पण तिथे जाणे अशक्य वाटले.. शिवाय काळ्या तोंडाची वानरं तिथे बसली होती.. तेव्हा जवळ जाण्यात अर्थ नव्हता.. दोनेक मिनिटांतच माघारी फिरलो.. बस्स एवढाच किल्ला कसा असा विचार करतच वळणावर पोचलो.. दुरवर असलेल्या बायकोला आलोच सांगत पुन्हा शोधात निघालो तर वळणानंतर लगेच डावीकडे वाट दिसली.. पायऱ्या दिसल्या.. हा परिसर अगदीच दुर्लक्षित व झाडीझुडुपाच्या अडगळीत फसलेला दिसला.. मग ते सुरवातीला वाटेच्या दोन्ही बाजूस लागणारे खंदक असो वा अवशेष.. दुपारचे टळटळीत उन, तिथे थांबलेली बायको नि या सन्नाटात मी एकटा त्यामुळे पुढे जाण्यास निरुत्साही होतो.. शिवाय रान खूपच माजले होते.. म्हटल दोन चार पावल पुढ जाऊ तोच बाजूच्या झाडीतून जोरात आवाज आला.. क्षणभर माझ्यावर कुणाचा हल्ला होतोय असेच वाटले नि कोण आहे हे न बघताच मी भरवेगात मागे फिरलो.. कुणास ठाऊक क्षणभर काळजात धस्स झाल होत.. नक्कीच वानर असणार नि मला बघून दुसऱ्या झाडावर पळाल असणार असा अंदाज बांधला.. तिकडे तो घाबरला असणार नि इकडे मी.. आता पुन्हा जाण्यात पॉइंट नव्हता कारण मघाशी मोठी टोळी पाहिली होती त्यांची.. तसाच अर्धवट किल्ला बघून मागे फिरलो..

- - -

- - -

आता आम्ही पुन्हा किल्ले निवती बस स्थानकाजवळ आलो.. संध्याकाळी पाच शिवाय एसटी नव्हती आणि ती नेहमी येतेच असही कोणी ठामपणे सांगत नव्हते.. 'श्रीरामवाडीला जा.. शॉर्टकट आहे.. तिथून साडेतीन-चारच्या सुमारास एसटी नक्की येते' असे कुणीतरी सांगितले नि बायकोच्या कपाळावर आटया पडल्या.. म्हटल बघू म्हणत आम्ही स्थानकामागच्या किनाऱ्यावर गेलो.. इथे एक जेट्टी बांधली आहे नि जेट्टीला लागूनच डाव्या अंगाला असलेला नारिंगी खडकाचा छोटा डोंगर समुद्रात घुसलेला दिसतो.. याला जुनागड म्हणतात.. आम्ही इथे सहज चढून गेलो तेव्हा आजुबाजूने वेढलेल्या समुद्राचे निळेभोर पाणी बघून प्रसन्न वाटले.. आजुबाजूचा डोंगर परिसर नि पसरलेला समुद्र.. वेळ काढून बघत बसावे अशी ही जागा.. पण आमचे लक्ष घड्याळावर होते.. उनात जास्त उभे राहवत नव्हते तेव्हा आम्ही काढता पाय घेतला..

- - -
खडकावरुन समोर दिसणारा निवती किल्ल्याचा डोंगर

- - -

आता पुन्हा मुळ रस्त्यावर आलो.. दोन वाजत आलेले.. श्रीरामवाडी शिवाय पर्याय नव्हता.. तेव्हा मुख्य रस्त्याला सोडून आम्ही उजवीकडच्या गल्लीत शिरलो.. सुपारी-नारळ अश्या विविध झाडांच्या गर्द सावलीत ही घर विसावली आहेत.. घर मागे पडली नि एका मोकळ्या जागेत सिमेंटची विहीर लागली.. पाउलवाटेेने ओहोळाजवळ आणून सोडले..

- - -

पाण्याने जवळपास तळ गाठला होता तरीसुद्धा खात्री म्हणून मीच आधी पाण्यात उतरलो.. फार नाही पण गुडघ्यापर्यंतच पाणी लागले.. पालिकडे पोचलो नि कुठे वाट दिसते का आधी पाहीले तर समोरच झाडी पलिकडे डुंगोबा देवस्थान दिसले.. आणि मार्ग लक्षात आला.. ! दोन डोंगराच्या घळीत कुठेतरी जंगलाच्या एका कोपऱ्यात आडोश्यात असलेले हे डुंगोबा देवस्थान माझ्या ध्यानीमनी देखील नव्हते.. प्रसिद्ध देवस्थान म्हटले की भव्य मंदीर, येण्या-जाण्यासाठी बऱ्यापैंकी रस्ता असला काही प्रकार नव्हता.. . असो नमस्कार करून आम्ही पुन्हा जंगली ट्रेकला आरंभ केला.. ट्रेकच झाला हा.. श्रीरामवाडीवरून डोंगर चढायचा.. दुसऱ्या बाजूने जंगलातल्या घळीत उतरायचे.. नि पुन्हा किल्ल्यासाठी लाल रस्त्याच्या वाटेने दुसऱ्या डोंगरावर चढायचे ! एरवी ठिक होते पण उपाशी पोटी नि फॉर्मल कपड्यात.. !

सुरवातीला त्रासलेली बायकोही आता रिलॅक्स झालेली..

काहितरी वेगळं पहायला मिळाल्याचे समाधान वाटत होते.. श्रीरामवाडीत पोचायला सव्वातीन वाजले.. म्हणजे वेळेत आलो.. या श्रीरामवाडीच्या मागे असणाऱ्या समुद्रावरदेखील जाता येते.. पण आम्ही आता मात्र स्टॉपजवळ असणाऱ्या दुकानातून केळावेफर घेऊन निवांतपणे खात बसलो.. मांजरीची पिल्लं होतीच टाइमपासला.. त्यांच्यासोबत खेळताना एसटीची वाट बघणे रटाळवाणे वाटले नाही..

तसे म्हणा एसटी येइपर्यंत थोड़ी दागदुग होतीच.. कारण पुन्हा आता काही धाडस, तंगडतोड वगैरे करायची इच्छा नव्हती.. आता घरची ओढ़ लागलेली.. चहा घेइपर्यंत थोड़ी उशिराने का होईना एसटी आली नि आम्ही निश्चिंत झालो..

श्रीरामवाडी ते कुडाळ ते आमचे तेर्से बांबार्ड्याला असलेले घर असा प्रवास करत आम्ही अंधार पडायच्या आतच घरी पोचलो.. घरी काकीला डुंगोबाबद्दल सांगितले तर तिलाही ते देवस्थान ऐकून माहीत होते.. म्हणजे ख्याती आजुबाजूच्या गावांमध्ये पण आहे हे समजून गेलो.. तरीपण तिथे जाणारी वाट कशी वाट लावते हे तीला वा आईला बोललो नाही.. बायकोलाही सांगून ठेवले होतेच.. उगीच दोन शब्द ऐकायला लागले असते..!

एकंदर आजची अंगारकी चतुर्थी चांगलीच लक्षात राहणार होती.. किल्ले निवतीच्या मोहापायी नकळत ट्रेकच झाला होता.. शिवाय अगदी साध्या रुपात तरीही लक्षवेधक वाटणार्‍या श्री डुंगोबा देवस्थानाचे दर्शन घडलेले.. आता पुन्हा कधीतरी वेळेचे गणित जमवून फक्त किल्ले निवतीवर वेळ काढायचा आहे.. सूर्यास्त होइपर्यंत तासनतास बसून रहायचे आहे.. नभात उमटलेले मावळतीचे रंग पहायचे आहेत.. कितीही पाहिले वा अनुभवले तरी मनाची ओंजळ काही भरणार नाही.. पण अश्या अविस्मरणीय आठवणीच मग पुढच्या भटकंतीसाठी एक नवी उमेद निर्माण करतात.. तेव्हा पुन्हा कधीतरी कुठल्या आडवाटेवरी... तोपर्यंत _/\_

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलाच ट्रेक झाला कि. सौ रॉक्स यांना विशेष प्रणाम. साडीमध्ये एवढे पार करुन जायचे सोपे काम नाही.

समुद्र पाहिल्यावर मात्र सर्व त्राण दूर होतात. सुंदर फोटो.

सुर्रेख वर्णन केलेस रे ..... फोटोही मस्तच अग्दी ... Happy

अवांतर - अनोळख्या ठिकाणी त्यात अशा गर्द रानात वा फारच सुनसान माळावरही एकट्या-दुकट्याने जाणे जरा जास्तच धाडसाचे नाही का वाटत ?? Happy

सुंदर वर्णन...

किल्ले निवतीचा आणि बोगवेचा समुद्रकिनारा तर अप्रतिम!

यो. मस्तच. नकळत भारीच तंगडतोड चाल झाली म्हाणायची.

चांगलाच ट्रेक झाला कि. सौ रॉक्स यांना विशेष प्रणाम. साडीमध्ये एवढे पार करुन जायचे सोपे काम नाही.>>> सेन्या +१

धन्यवाद:)

शशांक सर.. कोकणात फिरताना अश्या सुनसान जागा बऱ्याच असतात.. त्यामुळे अनोळखी जागा असली तरी वाटत नाही काही..

यो, तुझे नाही पण स्मिताचे खुप कौतूक वाटले. तूझ्या या धाडसी सफरीत ती साथ देते.. ग्रेट.. तूम्हा दोघांना अशीच नवीन नवीन जागी भेट देण्याची संधी मिळो.. अशी शुभेच्छा !

बाप्रे,दरवेळी हाच शब्द वापरायला लागतो तुझ्या ट्रेकिंग अ‍ॅडवेंचर्स करता..
स्मिता ची खरंच कमाल आहे !!!
तुमच्यामुळे कोकणातील अननोन डेस्टीनेशन्स बद्दल कळत असते.. मस्त वर्णन केलंयस

सुंदर वर्णन.. समुद्रकिनारा मस्तच Happy
सौ रॉक्स यांना विशेष प्रणाम. साडीमध्ये एवढे पार करुन जायचे सोपे काम नाही.+ ११११

मजेदार झालो हा ट्रेक!

त्या पाच मिनिटाच्या आदरतिथ्याने अजिबात भारावलो नाही ! त्यांच्या काळजात भरली शहाळी...!!>>>

यो, काळजात घुसनारी बारकी शहाळी खडे गावतत? Happy

तुम्हां उभयतांस सलाम, छान प्रचि व वर्णन.
निवति व किल्ले निवति दोन्ही ठीकाणीं ४-५ वेळां गेलोय. पण माझ्यासारख्या सरळमार्गी बावळटाला कुठला असला रोमान्सभरा रस्ता मिळायला !!!
किल्ले निवतिवरून होणारं समुद्राचं व खालच्या किनार्‍याचं दर्शन अविस्मरणीय !!