फाटक

Submitted by घायल on 19 November, 2015 - 06:17

दिवस जात नाही..

ही रॉकचेअर मुलीने घेऊन दिलेली. लाकडी बॅटन पट्ट्या रुतायच्या म्हणून हिने मऊ गादी करून आणली होती. तिच्या साडीचा अभ्रा शिवलाय गादीला. खुर्चीत पहुडलं की गुंगी येऊ लागते. असा किती वेळ जातो कोण जाणे, पण हिचा स्पर्श जाणवायला लागतो. माझ्या आजूबाजूला ती व्यापून राहीलीय असं वाटत राहतं. बरं वाटतं..

एव्हढ्यात मनोहर मिलच्या भोंग्याच्या आवाजाने जाग येते. दुपारचे तीन वाजून दहा मिनिटं. शिफ्ट बदलत असते. दुपारचा एक प्रहर आ वासून शिल्लक असतो. भिंतीवर हिचा सकाळी साफ केलेला फोटो. तिची करुण नजर पाहवत नाही. हे कारुण्य का तिच्या नजरेत ?
नेहमी हा प्रश्न मनात येतो. खरं तर या प्रश्नाचा चाळा दुपारचा प्रहर संपायला मदत करतो.

संध्याकाळ झाली की गजबजलेलं शहर दिसतं इथून.
तसं हे घर उंचावर आहे. एकाकी आहे. बरंच जुनं.

लोड बेअरिंग स्ट्रक्चर आहे. मधे पोर्च. व्हरांडा. व्हरांड्याच्या दोन्ही बाजूंना दोन शयनगृह. शयनगृहांच्या भिंतींचे कोपरे गोलाकार असल्याने इटालियन वास्तुकलेचा फील येतो. पोर्चमधून व्हरांडा लांघून गेलं की मुख्य द्वार आहे. दोन दरवाजांचं. केव्हढं भलं थोरलं दार आहे. बिजाग-यांचा आवाज येतो हल्ली. पण तेलपाणी केलं की ठीक होईल.

आत आलात की भव्य दिवाणखाना आहे. दारातूनच समोरच्या बाजूला दोन्ही बाजूने वर जाणारे जिने लक्ष वेधून घेतात. दोन्ही जिने लाकडी आहेत. जिन्यांच्या मधल्या भागात जिथे भिंत पुढे आलेली आहे तिथे एक चित्रं लावलंय. मागे गेलेल्या खालच्या भागात फायर प्लेस आहे. उजवीकडच्या जिन्याच्या सुरुवातीला उजवीकडे स्वयंपाकघर दिसतं. डावीकडच्या जिन्याला न्हाणीघर आणि बाहेर जायचा रस्ता आहे. या रस्त्यावर त्रिकोणी रंगाची रंगवलेली टोपी आहे. हो काही गोष्टी घरापासून दूर असाव्यात असं मानणा-याची रचना आहे ही. शौचकुप हो. सगळ्या सुविधा आहेत. पण घरात नको म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे जरा दूरच घेतलंय. त्याच्या बाहेरही मोरी आहे. पाण्याचा रांजण. नळ वगैरे.

दिवाणखान्यातले जिने जिथे संपतात तिथे एक पॅसेज तयार होतो. मधल्या बाजूला काचेचा दरवाजा आहे. दोन हाताला दोन दारं आहेत. ती दिसणार नाहीत या जागेवरून. त्यांच्या खिडक्या मागच्य बाजूला खुलतात. उजवीकडच्या खोलीत मी असतो. या खोलीच्या खिडकिशी पडीक. इथून दिवाबत्तीला शहरातले दिवे दिसतात. झगमग दिसते. लांबूनचा या दृश्य़ाचा मी भाग बनतो.
मुलीने कितीतरी वेळा ही हवेली विकून शहरात फ्लॅट घ्यायचा आग्रह केला होता. कितीतरी वेळा पाहूनही आली होती. सगळ्या सुखसुविधा असलेल्या स्कीम्स होत्या. ज्येष्ठांसाठी विरंगुळां केंद्र, बागा, वाचनालयं.

पण या वास्तूची सवय झालीय. ती सुटत नाही. हे असं निवांतपण हा आता स्थायीभाव झालाय इथल्या प्रत्येक घटकाचा. त्यात बदल झालेला कुणालाच चालणार नाही.

बाहेरचा पोपटी रंग खूपच फिक्कट झालाय. त्यावर धूळही चढलीय. त्यामुळं नेमका रंग सांगता येणं अवघड आहे नव्या माणसाला. जिन्याला पॉलीश करावं लागेल. लिनोनियम एक तर टाकून तरी द्यायचं किंवा मग कुणालातरी बोलावून ते स्वच्छ करून आणायचंय. बरीच कामं आहेत करण्यासारखी. उद्या नक्की असं ठरवतो. पण आला दिवस असाच जातो.

ज्यांच्याकडे काम आहे त्यांचा हेवा वाटतो. लोक बिझी कसे काय असतात याचं नवल वाटू लागलंय हल्ली. एकच चक्कर होते दिवसभरात. फाटकाशी डबेवाला येऊन जातो. सातमजली डबा असतो त्याचा. दिवसभराचं जेवण असतं त्यात. जेवणतरी काय म्हणायला.

काय लागतं म्हाता-या जिवाला ?
डाळ भात. मोड आलेली कडधान्यं. ही पण फारशी पचत नाहीत. पूर्वी वरून मीठ मसाला टाकत असे. आता त्याचाही कंटाळा येतो. थोडंसं डोकं चालवून गहू लावलाय कुंड्यातून. सकाळी गव्हांकुर मिळण्यासाठी. पण कित्येक दिवस तोडण्यासाठी गेलोच नाही तिकडे.
कधी कधी भाजी असते दिलेली. उकडलेला भोपळा किंवा मग रताळं. डबा आला की त्यातलं सारं वेगवेगळ्या भंड्यात काढून घ्यायचं आणि फ्रीजमधे सारून द्यायचं हा शिरस्ता मात्र मोडला नाही. डबा फाटकात ठेवून द्यायचा धुवून पुसून. डबेवाला म्हणतो, तुम्ही नका धुवत जाऊ. मी त्याला आत बोलावतो. पण तो घाईत असतो. नेहमीच.

फाटकातून निघून जातो. बाह्य जगाशी संपर्क त्याच वेळी तुटतो. कधी काही विशेष झालं असेल तर समजायचा हाच एक मार्ग. पत्रं देखील डबेवालाच आणून देतो. पोस्टमन एव्हढ्या उंचावर येत नाही. अन्न गरम करण्यासाठी उठलं की त्यात सकाळचा वेळ जातो.
नेमकं काय खाल्लं हे आठवत नाही. दूध तेव्हढं उकळून पिल्याचं ध्यानात राहतं. या श्रमाने मग थकवा येतो. नजर अधू झालीय. चक्कर येते. काठीचा आधार घेत खुर्ची गाठतो. मग नाहीच उठवत.

या दिनक्रमात काहीच बदल झालेला नाही. किती दिवस, महीने, वर्षं सरली..

नाही आठवत !

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ओघवते लिखाण आहे. सॉरी माझा वाचनाचा स्पीड जास्त असल्याने अधाश्यासारखी भर्कन वाचली. पुढचे येऊ द्या.

आवडलं. फायर प्लेस चा उल्लेख वाचून घर नक्की कोणत्या प्रांतात आहे हे जाणून घेण्याची नवी उत्सुकता वाटली.

रश्मी , अनु. आभार आपले

अनु
जिथपर्यंत कथा सुचतेय तिथपर्यंत गावाचं नाव अजून आलेलं नाही कुठे.
अवांतर म्हणून - जिथे ब्रिटीशकालीन बंगले आहेत त्यात काहीं मधे फायरप्लेस आहे. पुण्यात एअरपोर्ट रोडला अनेक आहेत. गरज म्हणूनही आणि काही ठिकाणी गरज नसताना ही दिसतात फाप्ले. कारण माहीत नाही. बहुतेक कोण वापरणार त्यावर ठरत असावं..