कबुतर जा जा जा …।

Submitted by कविता क्षीरसागर on 22 October, 2015 - 09:17

कबुतर जा जा जा …।

अहो उगीच गैरसमज करून घेऊ नका ह . मी काही या कबुतराबरोबर कुणाला चिट्ठी पाठवत नाहीये की कसला संदेसा . अन संदेसा असलाच तर तो या कबुतरालाच आहे की ' बाबा जा , जा . माझ्या आयुष्यातून , माझ्या नजरेसमोरून दूर कुठेतरी निघून जा "
आता तुम्ही म्हणाल की " का गं बाई, या छान , गोंडस पक्षाबद्दल तुला एवढा राग का ? किती निरुपद्रवी अन गोजिरवाणा दिसतो तो . "
पण हेच तुम्ही आमच्या बिल्डींग मध्ये वा आजूबाजूच्या मंडळींना विचाराल तर ते सांगतील की हा निरुपद्रवी वाटणारा पक्षीही किती ना ना प्रकारे उपद्रव देऊ शकतो ते . अहो इथे राहणे मुश्किल केलय यांनी .!

पूर्वी मलाही कबुतर आवडायचं . त्याचं ते माना वेळावून इकडे तिकडे पाहणं , त्याच्या मानेवरच्या , गळ्यावरच्या निळसर जांभळट छटा हे सारं कसं लक्ष वेधून घ्यायचं . तसं फार जवळून कबुतर पाहण्याचा योग काही आला नव्हता . "दुरून डोंगर साजरे " या उक्तीप्रमाणे लांबूनच पाहिलेलं आणि साजरं वाटलेलं .

पण इथे राहायला आल्यापासून कबुतरांनी आमच्याशी जास्तच जवळीक साधलेली आहे . भर वस्तीत दुसर्या मजल्यावर आम्ही राहतो . हे घर घेताना आजूबाजूची माणसं , चांगले शेजारी , शाळा , ऑफिस , बाजार सारं काही जवळ या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि मनासारखं मिळालं म्हणून हरखून गेलो . पण ज्या दिवशी आम्ही इथे शिफ्ट झालो तेव्हा या मोकळ्या घरात आमचं पहिलं स्वागत केलं ते या कबुतर महाशयांनीच .

बहुधा घराची खिडकी उघडीच राहिली होती . त्यातून हे महाशय सरळ आत आले पण बाहेर जायचा रस्ता काही त्यांना सापडेना . मग घरभर नुसती फडफड फडफड . त्यातून मी झुरळ , उंदीर , पाल अशा प्राण्यानाही घाबरून किंचाळणार्या जातीतली असल्याने माझा तर घासाच कोरडा पडला . तरीही शुक शुक करून त्याला हाकलण्याचा बराच निष्फळ प्रयत्न मी केला . त्याला बाल्कनीचे दार उघडून दिलं , सगळ्या खिडक्या उघडून दिल्या . म्हटलं बाबा जा आता , तुला सगळी दारं मोकळी करून दिलीयत . (बहुतेक त्यालाही आमच्या घरात आजच्याच मुहूर्तावर शिफ्ट व्हायचं होतं )

पण त्याचा हा बेत हाणून पाडायचा आम्ही चंगच बांधला . आमचं शिफ्टिंगचं काम राहिलं बाजूला आणि सगळे लागलो त्याच्या पाठीमागे , तसं ते जास्तच गोंधळून गेलं . कधी माळ्यावर तर कधी धुणं वळत घालायच्या दांडीवर , कधी ओट्यावर तर कधी बाहेरच्या खोलीत असा त्याचा मुक्त संचार सुरु झाला . शेवटी माझ्या "शूर " भावाने झडप घालून त्याला टोवेलमध्ये पकडलं आणि उचलून बाल्कनीत नेले तेव्हा कुठे आमची या समर प्रसंगातून सुटका झाली आणि आम्ही शिफ्टिंगचे काम करू शकलो . अशा तऱ्हेने या नव्या घरात सलामीलाच इथल्या कबुतरांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली .

त्या नंतर आमच्या बाल्कनीच्या माळ्याचा तर त्यांनी मस्तपैकी कबुतरखानाच करून टाकला . बघावं तेव्हा कबुतरांच्या जोड्या बसल्यात आपल्या गुटर्गु ss गुटर्गु ss करत . असला वैताग येतो या त्यांच्या सततच्या आवाजाने की काही विचारू नका . जे लोकं आवडीने कबुतरं किंवा तत्सम पक्षी पाळतात न त्यांच्या बद्दल मला अतिशय नवल वाटतं . त्याचं सगळं काही ही लोकं कसं काय करत असतील आणि ते ही आवडीनं , त्याचं तेच जाणोत . पण मला तरी ही अशी पक्ष्यांची फालतू जवळीक अजिबात आवडली नाही . त्यातच भर म्हणून आमच्या बाल्च्कानीत सगळीकडे त्यांनी घाण केलेली . सगळीकडे त्यांच्या शिटच्या पांढऱ्या शुभ्र रांगोळ्यांच्या ठिपक्या पुसता पुसता माझा जीव जायचा . शिवाय काड्या , कापूस, पीसं , पान असं त्यांच्या घरट्याचं "बांधकाम साहित्य" इथे रोज येउन पडलेलं असायचं , ते वेगळंच . नंतर नंतर आमच्या बाल्कनीच्या माळ्याचा त्यांना इतका लळा लागला की सहकुटुंब सहपरिवार तर ते यायचेच , शिवाय चिमण्या , कावळे अशा आपल्या पक्षी मित्रांसकट कलकलाट करण्यात त्यांना धन्य वाटू लागले .
पहाटे कुठे आपण साखरझोपेत छान स्वप्न पहात असावं तेव्हा त्यांच्या फडफडाटानं झोपेचं चांगलं खोबरं व्हायचं. तेही एकवेळ ठीक होतं पण मी एवढ्या आवडीनं लावलेली तुळशीची रोपं भूईसपाट होऊ लागली . पालक , कोथिम्बिरिने मातीतून डोकं वर काढले रे काढले कि त्यांच्यावर हल्ला होऊ लागला . एकदा तर माझी तुळशीची कुंडी कठड्यावरून सरळ खाली पडून टाकली . बरं तर बरं खाली कुंच्या डोक्यावर पडली नाही.

मग मात्र माझं डोकंच सणकलं . म्हटलं आता बस झालं . यांचा कायमचाच बंदोबस्त केला पाहिजे .
त्याचदिवशी मग मी जाळी बसवणार्या माणसाला बोलावलं आणि मग काही दिवसातच आमची बाल्कनी जाळी लावून पुर्णपणे बंद करून घेतली . वरती पत्रा पण बसवून एक छोटी खोलीच केली . आता बाल्कनीच्या कठड्यावर बिनदिक्कत पणे कुंड्या ठेवता येतात . गुलाब, जुई , जास्वंद , तुळस, मोगरा अशी मस्त झाडं लावली.

पण तरीही कबुतरं आमच्या बाल्कनीच्या पत्र्यावर सारखी नाचत राहतात , पत्रा तडतडू लागतो , जणू ताशे वाजवल्यासारखा आवाज होतो . कधी कधी त्या जाळीवर कबुतरं क्षणभरासाठी टेकतात आणि माझ्याकडे आपल्या लालसर डोळ्यांनी मला खिजवल्यासारखे टकमक पाहतात आणि मी पुन्हा पुन्हा त्यांना म्हणत राहते " कबुतर जा जा जा …!!"

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंतर मात्र २ दिवसांनी अंड आपोआप गायब.काय झाल नक्की काय माहित.<<<<<
कावळ्याने उचललं असणार नक्की. कावळे टपलेले असतात. Proud

कविता क्षीरसागर >> भावना दुखावल्या नाहीत. मी फक्त ह्या प्रश्नाची दुसरी बाजू मांडायचा प्रयत्न केला!! कबुतरांचा उपद्रव होतो, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होतो हे कबुलच आहे पण हे प्रश्न इतक्या टोकाला जाण्याचे कारणही माणूसच आहे!!

मग येऊदे की बिबटे बिन्धास शहरात आणि फिरूदे. त्यांच्या हक्कांच्या जागांवर पण माणसाने अतिक्रमण केलं आहेच. >>>> फिरुच देत रमड…. त्याशिवाय माणसाला कळणार नाही की आपलाच त्रास जास्त आहे प्राण्यापक्ष्यांना!!! माणूस जोवर स्वत:ला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे मानत राहील तोवर हे प्रश्न सुटणार नाहीत!!!!

खरेतर मुबलक अन्न उपलब्ध असण्याबरोबरच कबुतरांच्या नैसर्गिक भक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे कबुतरांची संख्या वाढली आहे (मांजरी फार उंचावरील कबुतरे मारून खाऊ शकत नाहीत). कबुतरांच्या नैसर्गिक भक्षकांची संख्या कमी होण्याचे कारण परत माणसाने केलेली वृक्षतोड आहे!!! तेव्हा प्राण्यांचा आपल्याला उपद्रव होतो हे म्हणण्यापेक्षा आपण निसर्गाला किती उपद्रव करत असतो हे पाहणे महत्वाचे नाही काय????

आपण निसर्गाला किती उपद्रव करत असतो हे पाहणे महत्वाचे नाही काय? >>> हे मात्र अगदी बरोबर. मला केवळ त्यात कावळे आणि कबूतर असा भेदभाव पटला नव्हता म्हणून मी थेट बिबट्याबद्दल लिहीलं इतकंच Happy आपण सगळ्या गोष्टींची वाट लावली आहे आणि अजून लावत चाललो आहोत ही वस्तुस्थिती आहे. पण ही चर्चा या धाग्यावर अस्थानी होईल असं वाटतं म्हणून हा विषय इथेच थांबवते.

पण ही चर्चा या धाग्यावर अस्थानी होईल असं वाटतं म्हणून हा विषय इथेच थांबवते.<<<<
Exactly!
मानवाने पर्यावरणाची वाट लावली आहे हे सर्वमान्य सत्य आहे. पण इथेही तोच विषय पुन्हा आणण्याचे प्रयोजन दिसत नाही.
'घरी होणारा कबुतरांचा उपद्रव' हा या लेखाचा विषय आहे. आणि तो कविता क्षीरसागर यांनी उत्तम प्रकारे लिहिलाय. तेंव्हा त्याच संदर्भाने प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे. Happy

या लेखाच्या निमित्ताने झालेली चर्चा खूपच सकस आणि वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी वाटली .लेखावर आलेल्या एवढ्या भरघोस प्रतिसादाबद्दल खरेच सर्वांचे मनापासून धन्यवाद .

कबुतरं एक नंबरचा लोचट आणि आळशी पक्षी हे अगदी खरं. इतर कुठल्या पक्ष्याच्या जवळ जायचा प्रयत्न सोडा जरा खुट्ट झालं तरी उडतात. हा धावत पकडायला गेलो तरी ढिम्म.
दिवाळीतल्या केपा/ टिकल्या असतात ना त्या जवळ ठेवा, आणि कबुतर आलं की एक फटाका फोडायचा (आठवा परिंदा) . त्या आवाजाने मात्र फडफड करून उडतात ती. असं १-२ दिवस वारंवार करा. नाही येत मग. लहानपणी घरासमोर एक मोठ्ठ पिंपळाचं झाड होतं, त्यावर कायम प्रचंड संख्येने कबुतरं. सुट्टीत त्यांना घाबरवून त्रास देणं हा फार आवडता छन्द. Lol त्या केपांच्या आवाजाने घरचे, दाराचेही त्रस्त. एका केपेत बघा किती पक्षी.

Pages