द(इन्)फेमस गोल्डन ट्रँगल

Submitted by वर्षू. on 9 October, 2015 - 21:18

यस्स!! तोच गोल्डन ट्रँगल, लहानपणापासून ज्याच्याबद्दल इतक्या अदभुत गोष्टी ऐकलेल्या होत्या ,त्यांच्यामुळे
या ट्रँगल ला एक रहस्यमयी वलय प्राप्त झालं होतं, माझ्या मनात.
खरंतर गोल्डन ट्रॅंगल चा अँगलच , चिंगमाय ची ट्रिप आखायला कारणीभूत होता.
मेखाँग आणी रुआक नदी च्या संगमावर थायलँड्,म्यांमार आणी लाओस या तिन्ही देशांच्या सीमा एका त्रिकोणात
मिळतात . या त्रिकोणात कोणतेच सरकार नाही. त्यामुळे इथे पिकणारे वारेमाप अफू चे पीक, चीनी व्यापारी
सोने देऊन विकत घेत. म्हणून या त्रिकोणाला गोल्डन ट्रँगल असे नांव पडले.
अंमली पदार्थांचा व्यापार म्हंजे गोल्डन ट्रँगल असाच अर्थ आहे आग्नेय देशांत.
सातव्या शतकापासून चीन मधे अफू ,औषधाच्या स्वरूपात प्रचलित होता. त्या काळात इतर देशांतून चीन मधे अफू, आयात केला जाई.पुढे पुढे तंबाखूत अफू मिसळून सेवनाचे प्रमाण इतके वाढले चीन मधेच अफू ची लागवड करण्यात आली. ही लागवड मंग जमातीचे आदिवासी करत. त्यांचा सारा माल, चीन मधेच खपून जाई. नंतर
इंडोचायना वर राज्य करणार्‍या फ्रेंच वसाहती मोठ्या प्रमाणात अफू विकत घेऊ लागल्या.
पुढे माओ च्या लाल सैनिकांनी चंकाई शेक ला हाकलून लावल्यावर, मंग आदिवासी स्थलांतर करून थाय . म्यांमार परिसरात गेले. त्यामुळे या भागांत अफू उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.
१९५० मधे इराण आणी चीन मधे अफू लागवडी वर कायद्याने बंदी आणल्याने ही साऊथ ईस्ट एशिया मधे अफू ची लागवड प्रमाणाबाहेर होऊ लागली.
विएट्नाम युद्धा च्या काळात, बेसुमार अमली पदार्थांच्या चालणार्‍या बेकायदेशीर व्यापारामुळे गोल्डन ट्रँगल ला ख्याती मिळाली. ८० च्या दशकात पश्चिमी देशांत अफूची मागणी जोरदार वाढली.या व्यापारातून मिळणारा अफाट पैसा, अमेरिकन गुप्तहेर संस्था , लाओस मधे गुप्त कारवाया आणी छुप्या युद्धांकरता वापरू लागली.
आता मात्र थायलँड , तीव्रतेने अफू उत्पादनावर नियंत्रण घालण्याचे काम करत आहे. इथे अफू ची लागवड करणे बेकायदेशीर आहे. पण लाओस सारख्या गरीब देशात स्थानिक लोकं अजूनही अफू चा सर्रास उपयोग करतात. इथे दळणवळणा करता साधने, चांगले रस्ते फारच कमी असल्याने आधिकार्‍यांना या व्यापारावर नियंत्रण घालणे कठीण जाते. लाओस मधे हॉटेल्स, रेस्टोरेंट्स्,ट्रेकिंग संस्था उघडून पर्यटन उद्योग वाढवण्याकरता सरकार कार्यरत आहे. इथे पर्यटकांना अफूपानाची परवानगी नाही.
थायलँड आणी लाओस या देशांनी अफू वर कठोर नियंत्रणाला सुरुवात केलीय , म्हणून कि काय आता सोनेरी त्रिकोणातला म्यांमार देश, अफू उत्पादनात आघाडीवर आलेला आहे.

तर अशी ख्याती ,असा इतिहास असलेल्या या त्रिकोणा वर जायला , चिंगमाय च्या राहत्या हॉटेलमधूनच एक दिवसीय ट्रिप बुक केली. त्याप्रमाणे सकाळी ७.३० वाजता ,चिंगराय ला जायला निघालो. चिंगमाय शहरापासून साडे तीन तासांच्या अंतरावर असलेले चिंगराय शहर , थायलँड च्या उत्तरेकडचे सर्वात शेवटले शहर.
शहराच्या बाहेर असलेले हे टेंपल ऑफ हेल .. चक्क.. आपल्याकडील नरकाची इमॅजिनरी दृष्ये , थाय रुपात इथे चितारलेली आहेत. हे मंदीर अजून निर्माणाधीन आहे..
शुभ्र दगडातले मंदिर, कसल्याश्या आरश्यांचे, अभ्रका चे तुकडे मिसळून बांधले जात आहे. ऊन्हात चमचम करते हे मंदीर..पण आम्ही गेलो त्या दिवशी आभाळ होतं त्यामुळे ते नुस्तच शुभ्र शुभ्र दिसत होतं.

इथेही बाप्पा चं वेगळ्या रुपातलं दर्शन

सोनेरी रंग पे मत जाओ.. हे प्रसाधन गृह आहे.. Proud

चिंगराय मधून गोल्डन ट्रँगल ला जायचे प्रवेश द्वार.. इथून लाँच मधून तास भर फिरवून लाओस मधे उतरवतात. पण त्यापूर्वी तुमचे पासपोर्ट्स , गाईड जवळ जमा करावे लागतात..

थायलँड चा किनारा

पाचच मिनिटात मागे थायलँड चा किनारा , डावीकडे म्यांमार चा किनारा तर उजवीकडे लाओस चा किनारा दिसू लागतो.. पर्वत्,हिरवाई,नदी तीच.. पण किती वेगळे देश..

हा पहा म्यांमार, पण इथे उतरायची परवानगी नाही..


तो समोर लाओस


इथे उतरून थोडी विश्रांती घ्या.. अर्ध्या किलोमीटर च्या आरक्षित क्षेत्रात जे शॉपिंग सेंटर आहे फक्त तिथेच फिरा..
इथले विक्रेते थाय भाषा बोलू शकतात आणी आनंदाने थाय बाथ ( आंघोळ नाही.. करंसी ) घेतात.

इकडे विविध बाटल्यांमधे निरनिराळ्या जातीचे साप भरलेली दारू का दारू भरलेले साप विकायला होते.. ते कोण लोकं घेत होते,ते सांगायची काही गरजे का?? Wink

आम्ही आपलं लोकल बिअर ला म्हटले,' लाओ ' तर लगेच उघडून हजर केला कॅन..

परतीच्या रस्त्यावर जरा आडबाजूला असलेल्या लाँग नेक ट्रायबल भागात थांबलो. हे लाँग नेक विलेज , टूरिस्ट्स ना आवर्जून दाखवतात.. इथेही रिस्ट्रिक्टेड एरियातच प्रवेश दिला जातो.
येथील मुलींच्या गळ्यात वयाच्या पाचव्या वर्षांपासून , पितळी वायर्स हसळ्याटाईप गुंडाळल्या जातात. पूर्ण आयुष्यभरात तीन वेळा हा कार्यक्रम होतो.पूर्वी च्या काळात जंगली प्राण्यांच्या आक्रमणापासून रक्षण व्हावे म्हणून हा उपाय योजला गेला होता. पण आता हा प्रकार टूरिस्ट्स्ना आकर्षित करण्याच्या हेतूने केला जात असावा..
या लहानग्या शाळेत न जाता , आई किंवा एखाद्या वयस्कर स्त्री बरोबर या मर्यादित क्षेत्रात हातमागावर स्कार्फ्स, शाली विणत बसतात आणी सगळ्यांबरोबर आनंदाने फोटो काढून घेतात.
या गोड पोरींना पाहून कसेसेस झाले.. इतक्या लहान वयात पितळी वायर्स गळ्याभोवती गुंडाळल्याने त्यांच्या मानेला लांबी मिळते पण कण्यातली ताकद नष्ट होते. वायर्स काढल्यावर त्यांना तोल सांभाळणे कठीण जाते..
धडधाकट स्त्रियांना स्पाँडेलायटिस च्या पेशंट सारखे करून टाकलेले पाहून बेचैन वाटलं..

हे जडगोळं ६ किलोचं लोढणं Angry

हा फोटो ही जवळ जवळ सगळ्या दुकानातून दाखवतात

आता त्यांच्या गळ्यातल्या रिंग्स चे ओझे आमच्याच मनावर येऊन बसले होते जणू.. सर्व जणांनी परतीचा प्रवास
मुक्यानेच पार पाडला..

हाँ, थोडा वेळ चिंगराय मधे पायी फिरायची हौस ही पूर्ण करून घेतली होती. एखाद्या देशाची अगदी शेवटली सीमा पाहण्याची पहिलीच वेळ!! अगदी साधारणसा दिसणारा पूल पायीच ओलांडला कि लगेच बर्मात प्रवेश करता येणार होता. पण इमिग्रेशन चे नियम कडक रीतीने पाळले जातात इथे. सायकल रिक्षा, दुचाक्या मजेने पूल क्रॉस करून बर्मात प्रवेश करत होत्या.. ते पाहून गम्मत वाटली..

तो नाल्यापलीकडे बसलेला माणूस दिसला का?? तो बर्मात आहे बर्का.. इकडून ओरडून त्याच्याशी सहज बोलता आले असते

ते पाहा .. इमिग्रेशन क्रॉस करायच्या गेट मधून पलीकडचे म्यांमार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो आणि लेखन दोन्ही छान.

ते गळा बांधणे मात्र अंगावर आले. डिस्कव्हरीवर दाखवलं होतं. एक मुलगी ते काढून मान पण दाखवत होती, नाही बघू शकले. तसंच एकदा चीनमधली पूर्वीची मुलींचे पाय बांधायची प्रथा पण दाखवली, बापरे हे सर्वच अंगावर आलं माझ्या, नाही बघू शकले.

अन्जू,इमॅजिन , जे आपल्यालाबघायचे ही धैर्य होत नाही,ते या स्त्रिया लहापणापासून सहन करत असतात.. Sad
याच्या मागे सुंदरतेच्या , कल्चरल आयडेंटिटी च्या वेडगळ कल्पना कारणीभूत आहेत. Angry

छान लिहिलाय लेख Happy
पण
<<<यस्स!! तोच गोल्डन ट्रँगल, लहानपणापासून ज्याच्याबद्दल इतक्या अदभुत गोष्टी ऐकलेल्या होत्या ,त्यांच्यामुळे
या ट्रँगल ला एक रहस्यमयी वलय प्राप्त झालं होतं, माझ्या मनात.>>> चुकून बर्म्यूडा ट्रँगल आणि गोल्डन ट्रँगल ची गल्लत झालेली वाटली ह्या वाक्याने Happy

harshalc.. गल्लत बिल्लत कुछ नै.. बर्मुडा ट्रँगल बद्दल जे काही वाचलं होतं त्यामुळे त्याच्याबद्दल फक्त भीती वाटलेली,मुद्दाम तिथे जाण्यासार्खं अजिबात वाटलं नाही !!! याउलट चीन,ओपियम वॉर ,ड्रग स्मगलिंग बद्दल वाचून
गोल्डन ट्रँगल प्रत्यक्षात पाहायची उत्सुकता होती. Happy

अश्वी.. ती मुळं म्हंजे कसली तरी जडीबुटी आहे. कोणत्याही आजारा वर फक्त चायनीज ट्रेडिशनल हर्बल औषधी
वापरणारी मोठाली हॉस्पिटल्स आहेत इकडे. तिथे आर्थोपिडिक डिपार्टमेंट मधे मोठाल्या काचेच्या बरण्यांतून निरनिराळे साप्,जडीबुटी,कसल्याश्या द्रव पदार्थात बुडवून ठेवलेले पाहिलेत.

किरू, थांकु थांकु Happy

ओके Happy

कोणत्याही आजारा वर फक्त चायनीज ट्रेडिशनल हर्बल औषधी
वापरणारी मोठाली हॉस्पिटल्स आहेत इकडे

ह्म्म.... खेळाच्या मैदानात वापरल्या जाणा-या शक्तीवर्धक औषधांबद्दल वाचताना एक उल्लेख वाचलेला की चायनीज खेळाडु त्यांच्या जडीबुटींच्या माध्यमातुन स्टेरॉईड्ससारखा परिणाम देणारी शक्तीवर्धके वापरतात आणि बाकी जगाला या जडीबुटी माहित नसल्यांने हे खेळाडू पकडले जात नाहीत. चायनिज लोकांचे खेळांवरचे वर्चस्व अर्थातच स्तिमित करणारे आहे, पण हाही एक वेगळा मुद्दा आहे तो त्यांचे विरोधक अधुन मधुन उगाळत असतात.

वर्षू, वर्णन शैली उत्तमच आहे, पण मुद्दम हून जाऊन तिथे पाहण्यासारखे अथवा एन्जॉय करण्यासारखे काय आहे समजले नाही.

रंगावर जाऊ नका, थायबाथ, बीअर लाओ, Lol

तो नाल्यापलीकडे बसलेला माणूस दिसला का?? तो बर्मात आहे बर्का.. इकडून ओरडून त्याच्याशी सहज बोलता आले असते <<< मलाही अशा गोष्टींचं कौतुक वाटतं. आम्ही शाळेत असताना आमच्यात अशा चर्चा केल्या जात की प. बंगाल आणि बांगला देशाच्या सीमेवर काही घर आहेत म्हणे त्यांचा दिवाणखाना भारतात तर स्वयंपाकघर बांग्लादेशात!

लाँग नेकची पितळी सळई नरड्यावर रुतून गेली.

वर्षू, मस्त लेख! पण त्या पितळी गळे पाहून वाईट वाटलं.
वाघा बॉर्डरवर, आम्हाला असच वाटलं होतं, जाऊन यावं जरा तिकडे. Proud

मस्तच !

तीच लिंक दिलीय की मी मागच्या पानावर! त्यात नेदरलँडस नी बेल्जीयम ची सीमारेषा बघा, एका हॉटेलमधे, रस्त्याच्या मधेच वगैरे देशांच्या सीमा आहेत. युएस आणि कॅनडा पण तसंच.
http://www.popfotos.com/25-crazy-international-borders-that-show-the-tru...

रॉबिनहूड.. अरे पसंद अपनी अपनी, हॉबी अपनी अपनी.. त्याला का क्यूं असं विचारलं तर माझ्या जवळ काय उत्तर असणार यावर..जे तुम्हाला पटेलच Happy

बाकी तुमच्या प्रतिसादामुळे सध्या टीवीवर दाखवत असलेली बल्ब्स ची अ‍ॅड आठवली.. ती पंकज कपूर आणी रणबीर कपूर ची..
आता का ते विचारू नका!! Happy Happy

साधना.. नेवर स्टडीड धिस.. पण असेलही खरं तू म्हणतेस ते पर सबूत मॅगता है Happy
पण मी नेहमीच चायनीज मेडिसिन्स घेत असे. खूप इफेक्टिव असतात..

यस्स.. सोनू छान माहितीपर आहे तू दिलेली लिंक..

छान चालु आहे मालिका...
त्या रिंग असणार्‍या बायकांबद्दल वाचलय बघितलय..
त्या रिंग काही वर्षानंतर काढल्यावर मान तुटल्यामुळे जीव जाईपर्यंत त्रास होतो असही वाचलयं .. बापरे झाल होतं..

वर्षू ..........छान गं हेही!
पण गळ्यात त्या रिंगा हे फारच अमानवी वाटलं. जसं चायनात पूर्वी सौंदर्याचं लक्षण म्हणजे बारिक पावलं असं मानून मुलींची पावलं बांधत.
आणि हो............फोटो मस्तच!

अन्जू,इमॅजिन , जे आपल्यालाबघायचे ही धैर्य होत नाही,ते या स्त्रिया लहापणापासून सहन करत असतात.

अगदी खरं वर्षुताई. ते बघताना माझ्या मनात हेच आलं, की जणू आपल्या बांधतायेत गळ्यात असं आणि ते चायनीज लोकांची प्रथा त्यावेळी पण, आय अ‍ॅक्चुअली फील (कल्पनेने), त्यामुळे अंगावर आलं. कसं सहन करत असतील, किती त्रास होत असेल. बापरे. नको अशा प्रथा.

लेख, वर्णन, फोटो, सगळंच छान जमलंय.

रिंगांबद्दल - काही वर्षांनंतर काढायच्या म्हटल्या तरी त्या काढता येत नाहीत कारण हळुहळु मानेचे स्नायू डोक्याचं वजन सपोर्ट करण्याच्या ताकतीचे राहात नाहीत. सामाजिक दबावामुळे या बायका खूपच अमानुष ट्रीटमेंट घेत असतात. जपानमध्ये काळे दात हे बायकांच्या सौंदर्याचं प्रतीक एकेकाळी समजलं जात होतं. तेव्हां काही जडी बुटी लावून त्यांचे दात काळे केले जायचे. त्या बिचार्‍यांना चॉइस नसायचा.

मात्र आजसुद्धा उंच टाचांच्या चपलांमुळे पायांना आणि पाठीला त्रास होतो हे वैद्यकीय सत्य माहीत असूनही कित्येक बायका हाय हील्स घालतातच की? By choice !

Pages