म्हसरावर ध्यान ठिवा

Submitted by जव्हेरगंज on 7 October, 2015 - 12:21

तर मंडळी, डोळ्यात जरा पेंग याय लागलीय. तरीबी तुमाला सांगतुच.
व्हय, बांधावरच घडलं आसं.
मी दारं धरत बसलू होतू. म्हशी लिंबाखाली बांधल्या व्हत्या. कालवाडाचं दावं जरा लांब ठिवूनच बांधलं व्हतं, न्हायतरं म्हशी त्येला ढोसरतात.
रानात चिटपाखरु नव्हतं. ह्यो ऊनाचा कार.

तेवढ्यात लाईट गीली. कटाळा करत उठलू, आन हीरीवर मोटर चालु कराय चाललू.
जाताना वाटत शितली दिसली.बहुतेक खुरपाय चालली व्हती. घट्ट साडी नेसली व्हती, आंग कसं एकदम भरल्यालं वाटत हुतं. सरळ माझ्याकडचं येत चालली.
"कारं राजाभाव हीरीवर चालला व्हय?" हातातलं खुरपं डोक्यावर धरत तिनं ईचारलं.
"व्हय, लाईट गीलती, बघतू आलीय का, मक्यावर पाणी सोडलयं" मी बी आपलं टावेलानं तोंड पुसत पुसत बोललू.
"बराय बाबा, पाणी तरी हाय हीरीला, बायकु कुठं दिसत न्हाय?" हीला नस्त्या चौकश्या.
"आसलं घरीच , घर सारवाय काढलयं"
"सरपानाला काय आसल तर बघु कारं? सकाळच्याला पाणी तापवायला हुईल तेव्हढचं" आस्सं, म्हंजी हीला सरपानाला आमचचं शेत घावलं तर.
"आगं बघकी, त्या तिथं एक बाभळ वाळलीय, बघ काय घावतयं का, काटकुटं बघुन जा" म्या तिला वाट मोकळी करुन दिली.
तशी शितली पुढं गीली. ही शितली मजी पवाराच्या रामाची बायकु. बाय नुसती उफाड्याची. माझ्यासंग आपणहुन बोलायची.
मी आपला बुजरा गडी, परक्या बायशी बोलताना जरा चार हात लांबच ऱ्हायचू. पण ह्या शितलीसंग गुलुगुलू बोलू वाटायचं. लय दिसापस्न नजर ठिवून व्हतु पर काय हातात घावली न्हाय.
हिरीवर गीलु. लाईट आली नव्हती. थुडी वाट बघुन परत मळ्यावर आलू.
शितली खुरप्यानं लाकडं तोडत व्हती.
म्या उगाच इचारायचं म्हणून ईचारलं.
"काय गं, इकटीला येवडा भारा झेपल का? नस्ता न्हीव लागतू घरापतुर"
"कशाला राजाभाव, मला सवय हाय, तसबी सरपान सांच्यालाच न्हेनार हाय, आता नुसतचं बांधून ठिवतीय"
"आसं, मग आता कुठं दौरा हाय?"
"लय ऊन झालय बघ, आता पलिकडं माळयाच्या खोपीत जाऊन पडणार हाय, तेवढच बरं वाटतं जीवाला, सांच्याला जाताना ह्यो भारा बी घीऊन जाईन"
आयला बराय हीचं, माळ्याच्या खुपीत आतापतुर हरीभाऊचा कब्जा हुता. पण म्हातारं गेलं पंधरा दिवस लेकीकडं गेलतं. खुपीत आता कोणच न्हवतं. मी पण ऊन्हाचं तिकडचं पालथा पडायचू.
शितलीनं भारा बांधुन लिंबाच्या झाडाखाली ठिवला. साडीवरनं पालापाचुळा झटकला.
म्हशीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली "कालवाड का लांब बांधलीयं? सावलीत बांध की लिंबाच्या"
"आगं म्हशी ढोसऱ्यात्यात, सारखं त्यंच्यावर ध्यान ठिवाय लागतं"
" बरं राजाभाव, जाव कारं? डोकं लय ठणकायला लागलयं, ह्या उनात नकू नकू झालयं" शितली खुपीकडं जात जात म्हणाली.
"चालतयं की, मी हाय हीतच, काय लागलं तर सांग" मी आपला तिला पाठीमागनं बघत बोललू.
शितली बांधावरनं खुपीकडं निघाली, जरा पुढं गीली नसल तर मधनचं माझ्याकडं वळुन बघत म्हणाली "आली आसल तुला बी झोप तर यी रं म्हागणं, खुपीत लय जागा हाय".
डुलक्या चालीनं शितली पुढं पुढं जात ऱ्हायली. माझ्याकडं एकदा नजर रोखुन झटक्यात खुपीत शिरली.
मायला हीचा डाव समजायला जरा येळच लागला. पर शेवटी हातात घावलीच म्हणायची.
शितली खुपीत झुपली आसलं. मलाबी थुडी जागा ठिवली आसलं. आता डोळ्याला बी जरा पेंग याय लागलीय. तवा मंडळी, मी हाय खुपीत , तुम्ही तेवढं म्हसरावर ध्यान ठिवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर मंडळी, डोळ्यात जरा पेंग याय लागलीय. तरीबी तुमाला सांगतुच.>>>>
मी हाय खुपीत , तुम्ही तेवढं म्हसरावर ध्यान ठिवा.>>>>

अरारारारा, कुटच्या येळेला तुमी गोष्टी सांगत बसला राव! Wink
मज्जा आली वाचायला.

आरं तिच्या! ह्यो बराय. आमी म्हसरावर ध्यान ठिवायचा आन तुमी खोपीला जाऊन मजा मारनार! आमालाबी कळूंद्या की तितली गोस्टं. Biggrin
आ.न.,
-गा.पै.

जव्हेरगंजा.....लै गब्रू हाईस गड्या ! आमास्नी वाटलं पयल्यांदा की ह्यो बाबा आनंद यादवाच्या गोतावळ्याच्या मार्गांनं आमास्नी शेतातून फ़िरवून आणतूया की काय !! पन गडी पट्टीचा पवणारा निघाला....वाचणा-यांना म्हसरं कालवाडं सांबाळायला सांगून आपन हिरणीकडे तुरुतुरु गेलाया.....दसरा आलायच तोंडावर तवा ह्यो उधळणार आता सोनं !!

आडमिन टीमच्या मेम्ब्रांस्नी सांगायला पायजे.

अशोकराव _/\_
आडमिन टीमच्या मेम्ब्रांस्नी सांगायला पायजे.>>>> हे आणि कश्यापाई हो?

बाकी म्हसरावर नीट ध्यान ठिवा रै...!
सर्वांचे आभार...!!

आरं तिच्या! ह्यो बराय. आमी म्हसरावर ध्यान ठिवायचा आन तुमी खोपीला जाऊन मजा मारनार! आमालाबी कळूंद्या की तितली गोस्टं....>> +१

Pages