अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ

Submitted by मार्गी on 7 October, 2015 - 02:10

सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी

पिथौरागढ़! पारंपारिक मान्यतेमध्ये विष्णूच्या दुसरा अवताराची- कूर्मावताराची भूमी अर्थात् कूर्मांचल म्हणजेच आजचं कूमाऊँ! पिथौरागढ़ त्यातला महत्त्वाचा जिल्हा. इथे एक दिवस मुक्काम होता. महाराष्ट्रातून सुरू झालेल्या दोन दिवसाच्या प्रवासानंतर थोडा आराम झाला. इथली थंडी पुढच्या थंडीला जुळवून घेण्यासाठी उपयोगी आहे. इथे एक गोष्ट लक्षात आली. देशाच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या प्रदेशांमध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्येसुद्धा संध्याकाळी सात वाजेपर्यंत उजेड असतो. पण दिल्लीहून येताना बघितलं होतं की, तिथे तर साडेपाच वाजताच अंधार पडतो आहे. पिथौरागढ़मध्ये तर आणखी लवकर दिवस संपला. संध्याकाळी पाच वाजताच अंधार पडला. म्हणजेच हिमालयाचा हा भाग देशाच्या मध्यवर्ती भागाच्या तुलनेत दोन तास पुढे आहे असं वाटत आहे!

इथून पुढे आता खरा प्रवास सुरू करेन. जोशीमठच्या पुढे बद्रिनाथच्या जवळ जाण्याची योजना योजना आहे- जिथपर्यंत रस्ता चालू असेल तिथपर्यंत. जोशीमठाच्या जवळची काही ठिकाणंसुद्धा बघायची आहेत. जोशीमठापासून जवळच औली नावाचं हिलस्टेशन आहे. त्याला भारतातलं स्कीइंगचं आघाडीचं स्थान मानलं जातं. जानेवारी २०११ मध्ये तिथे पहिले दक्षिण आशियायी पर्वतीय खेळसुद्धा झाले होते. औलीबद्दल अधिक माहिती एका अद्भुत ट्रेकरच्या ब्लॉगवर मिळू शकते. ह्या ब्लॉगवर वाचून औलीचं ठरवलं आहे. पण आपण जे ठरवतो, ते होत नाही आणि जे होतं ते ठरवलेलं नसतं! पिथौरागढ़मधून निघेपर्यंत तरी सर्व काही अपेक्षेनुसार सुरू आहे.

कडक थंडीमध्ये पहाटे पाच वाजता बाहेर पडून रोडवेज बस स्टँडचा रस्ता धरला. एका ट्रकवाल्याने लिफ्ट दिली. बस स्टँडवर बस उभीच आहे. बसचा कंडक्टर "थल मुवानी बागेश्वर" म्हणून आवाज देतोय. ही बस खरोखर अजब आहे. एकच बस तीन मार्गांवर जाणार आहे. एक मार्ग आहे थलपासून मुन्सियारीपर्यंत. कालच कळालं होतं की, मुन्सियारी गावामध्येही बर्फ पडला आहे. बसचा पहिला मार्ग मुन्सियारी आहे. दुसरा मार्ग थलपासून वेगळा होईल- तिथून ही बस मुवानी, बागेश्वर आणि हल्द्वानी मार्गे दिल्ली इतका मोठा प्रवास करेल. ज्याप्रमाणे ट्रेनचे दोन रूट असतात, तसेच ह्या बसचेही तीन रूट आहेत! त्यामुळे थेट बागेश्वरचं तिकिट नाही मिळालं. थलपर्यंतचंच तिकिट मिळालं.

अजूनही पूर्ण रात्रच सुरू आहे. साडे पाच वाजता रात्रीच्या अंधारातच बस निघाली. बरेच प्रवासी आहेत. सगळ्यांनी थंडीसाठी भरपूर तयारी केलेली दिसते आहे. बस निघाल्याबरोबर बसमध्ये गाणी सुरू झाली! ही गाणीही वेळेनुसार बदलत गेली. भोले बाबाच्या प्रदेशातून प्रवास होत असल्यामुळे सुरुवातीला साहजिक भोलेनाथाची गाणी लागली! भगवान शिव, तांडव नृत्य कथा, देवी पार्वतीने श्रीरामाची घेतलेली परीक्षा अशी गीतं सुरू झाली! “सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नम: शिवाय!!” वाटलं पाहिजे ना की, भोलेनाथाच्या प्रदेशातून फिरतोय!

अंधारातच पिथौरागढ़च्या बाहेर असलेलं आयटीबीपीचं केंद्र पार झालं. पुढे नजारा सुरू झाला. पण अजूनही घनदाट अंधार आहे. खूप उशीरा म्हणजे तासाभराने बुंगाछीना गावानंतर हळु हळु उजाडलं. बाहेरच्या गोष्टी दिसू लागल्या. इथून सुरू झाला रमणीय नजारा. . . त्याचं वर्णन शब्दांमध्ये करता येऊच शकत नाही. अक्षरश: नदियाँ पहाड़ झील और झरने जंगल और वादी!

रस्त्याला लागून रामगंगा नदी सोबत आली. उंच उंच पर्वतांच्या तळालगत वाहणारी ही नदी. ह्याच नदीच्या किनारी असलेलं थल गाव आलं. इथून ॐ पर्वत अजून जवळ आलेला दिसतोय. तो पिथौरागढ़मधूनही दिसतो.
थलपासून बस पुढे निघाली. आता दिवस सुरू झाला आहे. त्यानुसार बसमधली गाणीही बदलली. आता जुन्या हिंदी गीतांची मैफल सुरू झाली. “जो बात यहाँ पर है, कहीं पर नहीं!” अशी जुन्या काळातली गाणी ह्या प्रवासाला अगदी साजेशी आहेत! एका जागी रात्री झालेल्या पावसामुळे रस्ता बंद झाला आहे. काही दगड रस्त्यावर आलेले आहेत. ते काढण्याचं काम अजून सुरू आहे. पण त्याला अजून वेळ लागेल, म्हणून बस वळली आणि दुस-या मार्गाने बागेश्वरच्या दिशेला निघाली. हा रस्ता बेरिनाग जवळच्या चौकोड़ी घाटातून जातो. सतत मनोरम दृश्ये येत आहेत. एका जागी केबिनमध्ये (किंवा बाल्कनीमध्ये!) बसलेल्या लोकांना अचानक दिसलं की बर्फ पडतोय. अरे वा! चौकोड़ी घाटामध्ये बर्फ पडतोय तर! ह्याची उंची २००० मीटरहून जास्त आहे. आणि हवामान ढगाळ असल्यामुळे पाऊस झाला व आता बर्फ पडतोय. बस थांबली नाही, त्यामुळे फोटो काढता आले नाहीत. पुढे रस्ता खाली उतरल्यानंतर बर्फ कमी होत गेला आणि मागे राहिला.


थल गावातून दिसणारा हिमाच्छादित ॐ पर्वत

नजारे आणि थंडीचं वातावरण मनासाठी अगदी सुखद आहे. पण हळु हळु शरीराने तक्रार सुरू केली. बागेश्वरला पोहचेपर्यंत थंडी शरीरात खोलवर पोहचली. थंडी अशीच आत शिरते. हळु हळु वाजत जाते. तेव्हा मनाची प्रतिक्रिया आणि शरीराची प्रतिक्रिया अगदी वेगळी होते. बागेश्वरमध्ये शरयू नदीने स्वागत केलं. पण बस स्टँड पुढे असल्यामुळे नदीजवळ थांबता आलं नाही. बसमधून उतरल्यानंतर आधी चहा शोधला. अशा थंडीत चहा हवाच. पण बस स्टँडजवळ कुठेच चहा तयार नाहीय. अकरा वाजले आहेत. पण असं वाटत आहे की, अजूनही सकाळच सुरू आहे. एका हॉटेलात पोळी- भाजी घेतली. पण बोटं थंडीमुळे अगदी आखडली आहेत. घास हातातच घेता येत नाहीय. कसं तरी जेवून घेतलं आणि पुढे जाण्यासाठी बस शोधली. थेट कर्णप्रयागला जाणारी बस तर आता मिळणार नाही. तसंही मला थेट कर्णप्रयागला जायचंही नाहीय. आज ग्वालदाम किंवा बैजनाथपर्यंतच जायचं आहे. त्याऐवजी ह्या अद्भुत प्रदेशात थोडं तरी आतमध्ये जाऊन फिरायचं आहे. लवकरच बैजनाथला जाणारी प्रायव्हेट बस मिळाली. बागेश्वरपासून बैजनाथ जवळ म्हणजे वीस किलोमीटरवर आहे. दुपार झाली आहे, असं वाटतच नाही आहे. पण घड्याळ तसं दर्शवतं आहे. त्यामुळे विचार केला की आज बैजनाथमध्येच मुक्काम करावा. इथे थोडं फिरताही येईल. शिवाय ग्वालदाममध्ये हॉटेल महाग असेल, हेसुद्धा कळालं.

बैजनाथला पोहचायला फार वेळ लागला नाही. तिथलं मुख्य आकर्षण नागर शैलीतला मंदीर समूह हे आहे. त्याबद्दल सोबतच्या प्रवाशांकडे चौकशी केली. दोन- तीन जणांना विचारून पक्की माहिती करून घेतली. लोकही इतके साधे आणि सरळ आहेत की, जेव्हा बसमधून उतरण्यासाठी दाराजवळ गेलो, तेव्हा त्यांनी स्वत:हून कंडक्टरला सांगितलं, ह्याला ह्या पूलाजवळ उतरवा, त्याला मंदीर बघायचं आहे. इतकी सौजन्यशील माणसं! निसर्गाशी असलेली जवळीक अगदी उठून दिसते आहे. . .


बैजनाथमध्ये स्वागत करणारी गोमती नदी

बैजनाथमध्ये उतरल्यानंतर शांत वाटलं. गोमती नदीवरच्या पुलाच्या थोडं आधी उतरलो. समोरच गोमती नदी. . . छोटसं गांव. गर्दी अजिबात नाही. शहर नसल्यामुळे एक प्रकारचा साधेपणा सगळीकडे दिसतोय. इथे लगेच चहा मिळाला. उत्तराखंडच्या पहाडामध्ये चहामध्ये साखरेऐवजी गूळ किंवा मिशरी वापरतात. पण इथे नेहमीचा साखरयुक्त चहाच घेतला. समोरच मंदीर आहे. चहा पिता पिता हवी ती सगळी माहिती करून घेतली. कूमाऊँ मंडल विकास निगमचं सरकारी हॉटेल इथून फार लांब नाहीय.

गोमतीच्या तीरी असलेलं मंदीर बघितलं. नंतर हॉटेल बघून तिथल्या डॉर्मिटरीमध्ये सामान ठेवून दिलं. रात्री मुक्कामाची व्यवस्था झाली. नंतर बैजनाथचे इतर दोन मंदीर बघण्यासाठी परत फिरायला निघालो. तीन किलोमीटर चालत फिरलो. छोटसं पहाडी गांव! सर्व परिसर वस्तुत: अपूर्व नजारा आहे! दूरवर ढगांची टोळी दिसते आहे. बर्फाच्छादित पर्वत थोडे दूर आहेत. त्यांच्याआधी ढग आणि खालचे डोंगर आहेत.


लक्ष्मी नारायण मंदीर


भ्रामरी देवी मंदीर

घड्याळात संध्याकाळचे पाच वाजत आहेत. पण वाटतच नाहीय की, सकाळची दुपार झाली आणि आता संध्याकाळ होते आहे. प्रदीर्घ सकाळच सुरू आहे, असं वाटतंय. अविस्मरणीय नजारे आणि स्वप्नभूमीचं मनसोक्त दर्शन घेतलं. पुन: एकदा चहाचा आस्वाद. अहा हा. इथे मोठ्या प्रमाणात भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा मिळत आहेत. उत्तराखंडच्या सर्व प्रवासामध्ये प्रत्येक ठिकाणी- रस्त्यात- बसमध्ये- हॉटेलमध्ये ह्या शेंगांनी सोबत केली! आता लवकरच दिवस मावळेल. साडेपाचपर्यंत तर रात्र झाल्यासारखं वाटतंय. हॉटेल सुनसान आहे. दोन- चार लोक आहेत फक्त. त्यातल्या दोन जणांना तर मंदिरात भेटलोही आहे. एकट्या व्यक्तीला इतक्या दूरवर फिरताना बघून त्यांना आश्चर्यही वाटलं.

रात्र पडली तसं झोपेचं बोलावणं आलं. मध्य भारताच्या तीन तास आधीच दीपनिर्वाण झालं. पण काय दिवस होता हा . . . .

पुढील भाग: अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ३ नयनरम्य ग्वालदाम आणि कर्णप्रयागमार्गे जोशीमठ

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुरेख वर्णन.... तुमच्याबरोबर फिरतोय असं वाटतंय अगदी .... (थंडी सोडून... Happy Wink )

फारच सुरेख वर्णन.... तुमच्याबरोबर फिरतोय असं वाटतंय अगदी >> + १
मला तर थंडीही वाजायला लागली मी एसी बंद केला

वा... मस्त...

ह्या भागात मे २०१४ ला फिरले होते. त्यामुळे लिखाण खुप ओळखीचे वाटते आहे.

बैजनाथला डोहातल्या १-१, २-२ मिटर लाम्बीच्या माशाना फुटाणे खाउ घातले की नाही ?

अर्रे वा नवी मालिका Happy सुरेख भटकंती आणि फोटो मस्त!

आम्ही आपल सुट्ट्यांची तजवीज करत २ वर्ष लदाख प्लान करत बसलोय Proud