गणपती बाप्पा - दर्शन २०१५ (माझगाव, वाशी)

Submitted by तुमचा अभिषेक on 20 September, 2015 - 18:03

गेले ते दिवस !
मित्रांबरोबर आधी माझगाव-भायखळा करत मग लालबाग-परळ विभागातील एकूण एक गणपतींचे संध्याकाळपासून पहाटेपर्यंत दर्शन घेत फिरणे. सोबत वडापाव, भाजीपाव, चहा आणि कांदाभजी हा ठरलेलाच मेनू, आणि त्यासाठी ठरलेलेच फिक्सड कॉन्ट्रीब्यूशन. साली महागाई पण कधी त्या दिवसांत झाल्याचे आठवत नाही. दोन रुपयांचा वडापाव कित्येक वर्षे दोन रुपयांनाच मिळायचा.

सारेच बदलले!
सण साजरी करायची रीतभातही आणि भक्तांची दर्शन घ्यायची पद्धतही.
आता रांगा फक्त नवसाच्या गणपतीलाच लागतात.

असो, आपल्याला काय!
जमेल तसे गणपतीदर्शन आपले चालूच असते. मित्रांच्या जागी फॅमिली आली. आधी बायकोच सोबत असायची, गेल्या वर्षापासून मुलगीही आली. तिला लायटींग बघायला आवडते म्हणून यंदा सारे गणपती रात्रीच करायचे ठरले. सुरुवात बायकोच्या मर्जीनुसार लालबागच्या राजापासून करायचा विचार होता, मात्र तेथील गर्दीचा विचार करत मुलीला नेणे योग्य नाही म्हणून टाळले आणि लालबागचे ईतर गणपतीही नंतर करूया म्हणत सुरुवात आमच्या माझगाव विभागापासूनच करायचे ठरवले. गणेशचतुर्थीचा मुहुर्त आणि सुट्टीचा फायदा उचलत पहिल्याच दिवशी सुरुवात केली.

शेजारचीच अंजीरवाडी,
आम्ही गेलो तेव्हा आरतीची वेळ झालेली. लोकांची गर्दी जमत होती.

प्रचि १

01 anjirwadi 1.JPG

थोडी वाट काढत जवळून दर्शन घेतले, आणि लोकांची डोकी चुकवत जवळून एक फोटो काढायचा अर्धयशस्वी प्रयत्न केला. अर्धी डोकी आलीच.

प्रचि २

02 anjirwadi 2.JPG

पहिल्याच गणपतीला आरतीसाठी थांबलो असतो तर तेवढाच करून घरी परतावे लागले असते. म्हणून तिथूनच परतायचे ठरवले.
बाहेर पडेपर्यंत गर्दी वाढली होती. एक फोटो लांबून पुर्ण मंडपाचा काढला.
एक वैशिष्ट्य म्हणजे हे पुर्ण मंडप एअर कंडीशनड आहे. चांगलाच खर्चा केला आहे. त्यामुळे आरतीला थांबलो असतो तरी मुलीची गर्मीने हालत झाली नसती.

प्रचि ३

03 anjirwadi 3.JPG

बाहेर पडलो. समोरच अंजीरवाडीचे गणपतीचे प्रसिद्ध संगमरवरी मंदीर आहे. ते सुद्धा मस्त लायटींग करत सजवले होते. त्याचे दर्शन लांबूनच घेतले. त्याचा फोटो मात्र काढायचे राहून गेले अन तेथून पुढच्या गणपतीला निघालो.

अंजीरवाडीतूनच एक आडवा रस्ता जातो तो थेट श्रीनिवासला नेऊन सोडतो. हा गणपती माझगावचा राजा म्हणून ओळखला जातो. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही चाळ पडून आज जवळपास पंधराएक वर्षे झालीत, यांची नवीन बिल्डींग काही बनत नाहीये. पण तरीही जगाच्या पाठीवर कुठे कुठे विखुरले गेलेले सारे चाळकरी या दिवसांत एकत्र येत गणेशोत्सवाची परंपरा तशीच शाबूत ठेवतात हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

प्रचि ४

04 shrinivas 1.JPG

मुर्तीची भव्यता समजावी म्हणून एक फोटो बालिकेसोबत.
(तसेही आमच्याकडे देव म्हणजे ‘जय जय बाप्पा’ असल्याने गणपतीबाप्पाच आमचा फेव्हरेट देव आहे.)

प्रचि ५

05 shrinivas 2.JPG

श्रीनिवास मधून आणखी एक शॉर्टकट गल्ली बायकोला नव्याने दाखवत तुळशीवाडीपाशी येऊन पोहोचलो आणि प्रवेशद्वाराशीच असलेल्या चायनीज गाडीच्या वासाने चाळवलेल्या भूकेवर नियंत्रण ठेवत आत शिरलो.

प्रचि ६

06 Tulsiwadi.JPG

पुढचा नंबर होता हत्तीबागच्या गणपतीचा. इथे मात्र आरती चुकवणे शक्य झाली नाही, कारण ती आधीच सुरूही झाली होती. आतापर्यंतचे सारेच गणपती शंभर दोनशे पावलांच्या अंतरावर असल्याने फारसा वेळही झाला नव्हता, त्यामुळे इथे आरतीला थांबलो.

प्रचि ७

07 Hattibag.JPG

त्यानंतर समोरच मापलावाडी. तिथे चलचित्र चालू होते. तसे नेहमीच असते. त्यासाठी जिंकलेल्या विविध बक्षीसांची आरासही मंडपात मांडलेली असते. यंदा मोदींचा `स्वच्छता अभियान' हा विषय निवडला होता. मुलीला ते एवढ्यात समजावून समजणार नाही आणि आपल्याला तर स्वच्छतेचे महत्व माहीतच आहे या विश्वासाने ते पुर्ण न बघता फक्त गणपतीच्या पाया पडूनच तिथून निघालो. या नादात तिथला फोटो राहिला.

पुढे जवळच ताराबाग पडते. तिथे मात्र उलटे झाले आरतीने आम्हाला चुकवले. आम्ही पोहोचलो तेव्हा आरतीमंडळ मंडपातून बाहेर पडत होते. ताम्हाणातल्या दिव्याची आरती तेवढी मिळाली.

प्रचि ८

08 Tarabaag.JPG

तिथून बाहेर आलो तसे नजरेच्या टप्प्यात असलेली रोषणाई आणि पुढचे गणपती आम्हाला खुणावत होते. मात्र मध्ये एके ठिकाणी आरतीसाठी थांबलो त्यात वेळ गेला होता. मुलीचा स्टॅमिना संपेपर्यंत देवदर्शन खेचायचे नव्हते, आणि तसेही पहिल्याच दिवशी सहा हा आकडा काही वाईट नव्हता. त्यातही जवळचे आपले वाटणारे गणपती झाले होते. (या वरील सर्व गणपतींना आम्ही वर्गणी देत असल्याने आपले बोलू शकतो Happy )

---

गणपतीचा दिवस दुसरा बिल्डींगमधील घरगुती गणेशदर्शनासाठी राखीव होता. अन्यथा पाच दिवस हा हा म्हणता संपले असते तर ते पुन्हा मिळाले नसते.
त्या पैकी हा आमच्या शेजारचा गणपती.
फोटोत तितकासा अंदाज येऊ नये, पण आमच्या बिल्डींगमधील सर्वोत्कृष्ट मुर्ती नेहमी यांचीच असते.

प्रचि ९
शेजारचे बाप्पा

09 gade.JPG

त्यानंतर गेले दोन दिवस, म्हणजे शनिवार आणि रविवार, बायकोच्या माहेरचे, म्हणजे वाशीचे गणपती बघून झाले. त्याचेही फोटो आहेत. पण त्यात आपलेपणा, जिव्हाळा तुलनेत कमी वाटत असल्याने तेथील फोटो द्यायचा मान एखाद्या नवी मुंबईकरासाठी राखून ठेवतो.

मात्र सासुरवाडीचा मान ठेवत माझ्या बायकोच्या कॉलनीतील गणपतीचा फोटो तेवढा देतो Happy

प्रचि १०
सासुरवाडीचे बाप्पा

10 panchshil.JPG

आणि सरतेशेवटी हा आमचा गणपती ..
मोठ्या काकांकडे असतो, आणि आम्ही आता तिथे जात नाही..
पण तरीही गणपती आपलाच वाटतो आणि आहे Happy

प्रचि ११
घरचा बाप्पा

11 naik 1.jpg

प्रचि एवढेच आणि आमच्याच विभागाचे दिले असले तरी गणेशदर्शनाला क्रमश: बोलू शकतो. कारण गुरुवारची बकरी ईदची आणि शनिवारची साप्ताहिक सुट्टी अजून बाकी आहे Happy

धन्यवाद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, धन्यवाद Happy

मानवमामा, काही नाही हो, तेच ते पुराणे घीसेपीटे दर तिसर्‍या घरात होणारे वाद .. जायदाद का बटवारा अ‍ॅण्ड ऑल, चालायचंच Happy