कथासाखळी- सावळ्याची पुळण!

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 15:50

कथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.

=========================================================
सावळ्याची पुळण!

सावळ्याची पुळण! बाबांच्या गावाला आणि आजोळाला जोडणारा एक वाळूचा पसरट पट्टा..

काय आहे असं त्या जागेत की, जागेपणीही मला तिथल्या केवडयाचा गंध धुंद करतो, त्यात मिसळलेली समुद्राची खारट चव जाणवते, रेतीचे बारीक कण नाकात टोचायला लागतात, नजरेतल्या निळाईत हळूहळू काळपट लाल रंग उतरायला लागतो, समुद्राच्या गाजेचं वादळात रूपांतर होतं नि टपटप थेंबांनी पायाखालच्या वाळूत खड्डे पडू लागतात, तेव्हा जाणवतो आजूबाजूला पसरलेला अथांग एकटेपणा आणि मी! वादळ रोरावत मोठं होतं... लाटा खवळून मला आणखी आत, आणखी आत खेचू लागतात, पायाखालची वाळू सरकते, पाय निसटतात, सगळं शरीर हलकं हलकं होत पाण्याखाली जातं, मला ओरडायचंय, किंचाळायचंय, पण आवाजच फुटत नाही, डोळे बंद होतात आणि आता हळूहळू तो समोर येतोय...नाका-तोंडातून विचित्र आवाज काढत...

"समीपा!! ए, अगं काय मूर्खपणा आहे हा?"
"अं.. काय झालं?" मी भानावर येत म्हणाले.
"अरे यार, आम्ही सगळे प्रेझेंटेशन बनवतोय आणि तू मात्र आरामात खिडकीत बसून झोप काढणार का? वॉट द हेल! ऊठ आणि कामाला लाग, काय?"
"हो... हो... येते.." कसंबसं म्हणून मी वॉशरूमकडे वळले.

धबाक्कन फ्लशचा आवाज आला आणि टक्‌टक्‌ हील्स् वाजवत एक उंच, बारीक मुलगी बाहेर आली. तिचे कुरळे, जेल केलेले केस एसीतसुद्धा वळवळ केल्यासारखे हलत होते. हात धुऊन वाळवताना तिने आपल्याच धुंदीत रॅपसारखं काहीतरी गुणगुणायला सुरुवात केली आणि लालभडक लिपस्टिकमधून तिचे शुभ्र, टोकदार दात चमकले.
लक्ष देऊन ऐकल्यावर, "सांग, सांग....लांब.....लगेच जा.. तो आला.. तर.. मर!" असं अर्धवट काहीसं ऐकू आलं. शेवटच्या शब्दालाच तिने आरश्यातून माझ्याकडे रोखून पाहिलं आणि ओठांच्या कोपर्‍यातून हसत बाहेर निघून गेली.

सुन्नपणे फेसवॉश लावून तोंडावर पाण्याचे हबके मारले...काय होतंय मला...काहीच समजत नाहीये...ती मुलगी खरंच इथे होती की नाही??

"समे, आज खूप काम झालं ना गं? शेवटी शेवटी तू तर झोपेत वाटत होतीस" नलिन बाइक चालवता चालवता विचारत होता. नलिन पद्मनाभन, माझा शाळेेपासूनचा मित्र. रादर, एलकेजीत असताना आमच्या आयांनी घडवून आणलेली मैत्री, कारण आमची घरं एकाच कॉलनीत होती आणि त्यांना आमची वाहतूक करणं सोपं जायचं. पण ती मैत्री कॉलेज आणि आता एकच कंपनी, एकच प्रोजेक्ट मिळाल्यामुळे जास्त टिकून राहिली.
"नाही रे, ती तन्वी बघ किती कष्ट घेतेय प्रोजेक्टसाठी. पण आपणच तेवढे काँपिटंट नाही बहुतेक. मला फार काही सुचत नाहीये अजून. "
"चिल बेब! नो बिग डील, तन्वी करतेय ना मन लावून, मग करू दे ना.. आपण फक्त मम म्हणायचं. हेहेहे.."
"नलिन, तू शाळेपास्नं असाच आहेस. मुलींना फक्त यूज कर तू.."
"एss काहीपण काय बोलतेस? उलट उशीर झाला की तुला नेहमी घरी सोडतो मी. हां, तन्वीचा घेतो कधी कधी फायदा... कारण मी तरी इतकं काम आणि विचार एकाच वेळी नाही करू शकत.." तन्वी म्हणजे आमच्या प्रोजेक्टमधली हुश्शार कलिग!
"ओहोहो, सो स्वीट ऑफ यू! असं का ही ही म्हणणार नाहिये मी. थॅंक्यू बिंक्यू तर अजिब्बात नाही, कळलं ना? दात दाखवू नको इतके!! चल आलं घर. सी या.."

स्कार्फ काढत एका हाताने नलिनला बाय करून वळते तोच थंड हवेची एक जोरदार झुळूक आली आणि वाळकी पानं फरशीभर खरखर करत उडाली. रात्रीच्या शांततेत तो आवाज खूप भयाण वाटत होता. शहारून पळतच गेट उघडून आत गेले आणि बेल वाजवायला हात पुढे केला तोच हाताला काहीतरी चिकट, ओलसर लागलं. सेलच्या उजेडात पाहिलं तर दारापासून, डोअरबेलच्या बटणापर्यंत लालभडक रक्ताचे ओघळ!
"आईsss बाबाsss तनयssss.." मी किंचाळत सुटले...

=========================================================
नियमावली:

१) कथेचा शेवट अतिरंजीत चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

==========================================================
हिम्सकूल | 17 September, 2015 - 14:22

डोअरबेलच्या बटणापर्यंत लालभडक रक्ताचे ओघळ!
"आईsss बाबाsss तनयssss.." मी किंचाळत सुटले... >>>>>

माझा आवाज ऐकून तिघेही धावत पळत दारापाशी आले आणि त्यांनी दार उघडलं.. आणि आवाजामुळे नलिन पण बाईक तशीच सोडून धावत आत मधे आला होता...

माझी अवस्था बघून सगळेच हादरले होते... रक्ताचे ओघळ बघून माझे डोळे गोल गोल फिरायला लागले होते... अगदी आखियां मिलायो कभी आखियां चुराओ मधल्या माधुरी सारखे... आणि मी धप्पकन खालतीच पडले... आणि बेशुद्ध पडले..

" काय हो, हिला हे असं अचानक काय झालंय " जया अरविंदला विचारत होती.. तेव्हा अरविंद कुठल्या तरी विचारात गढून गेले होते... आणि तनय आणि नलिन खिदळत सुटले होते... कारण मगाशी जो पिझ्झा डिलिव्हरीचा मुलगा येऊन गेला तेव्हा त्याने बेल वाजवताना फुटलेल्या सॉसच्या पिशवीचा हात बेल वर मारला होता आणि सगळी बेल लाल केली होती हे फक्त त्यांनाच लक्षात आले होते...

अरविंदांना त्यांचा भूतकाळ आठवत होता... समीपा लहान असताना नेहमीच अशी बेशुद्ध पडायची पण त्याची जयाला काहीच कल्पना नव्हती कारण ती त्यांची दुसरी बायको होती.. पहिली बायको अशीच मधूनच किंचाळायची आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता... समीपाचे पण तसेच होईल की काय अशी भिती वाटत होती त्यांना कारण हे असं पहिल्यांदाच घडत होतं समीपाच्या बाबतीत ....

==========================================================

प्रकु | 17 September, 2015 - 15:08

दारापासून, डोअरबेलच्या बटणापर्यंत लालभडक रक्ताचे ओघळ!
"आईsss बाबाsss तनयssss.." मी किंचाळत सुटले... धडाधडा दार बडवलं... बेल वाजवण्यासाठी बेलकडे हात नेला. तिथे लागलेल्या रक्ताने मला एकदम शिसारी आल्यासारखं झालं. पण मी मनातली भीती बाजूला सारून पटापट शक्क्य तितक्या वेळा बेल वाजवली...

आत बेल वाजतच नव्हती.. असकस झालं..? बेलतर नेहमी चालूच असते.
मी परत दार बडवायला लागले. अंगातलं त्राण गेल्यासारख वाटत होतं.. दारावरच्या माझ्या थापा क्षीण क्षीण होत असल्याच मला जाणवत होतं...

एका क्षणासाठी माझं डोकं एकदम रिकाम झालं.. वातावरणातला थंडावा कपड्यातून आत जाऊन, कातडीच्या आत आत पाझरत झिरपत चाललेला मला जाणवला... तो हाडांपर्येंत पोहोचला तसं अंग एकदम शहारलं... शरीर आक्रसल गेलं... मेंदू गोठल्या सारखा झाला होता, श्वास आत घेऊन ठेवलेला पण तो पुन्हा बाहेर सोडवेना...

काहिच ऐकू येत नव्हतं... कदाचित.., कदाचित काहि नव्हतच आजूबाजूला ऐकायला.... लांबवर होतं खरं काहीतरी, ओळखीचा आवाज होता, घोंगावणाऱ्या वाऱ्याचा... आणि...? आणि काय बरं... मी कान देऊन ऐकायचा प्रयत्न केला... समुद्र..?

"शिट् ! फिरलंय डोक माझं" मी स्वःताला सावरायचा प्रयत्न केला. काहीतरी तरंग शरीरातून बाहेर पडावे तसा तो आलेला शहारा निघून गेला... शरीर सैलावल, श्वासोच्छवास नियमित झाले तशी मी भानावर आले...
मला फटाफट काहीतरी करायला हवं होतं...

"आईsss बाबाsss तनयssss.." मी पुन्हा जोरात किंचाळले, जोरात दार बडवले पण त्याचा उपयोग होत नाहीये हे एव्हाना माझ्या लक्षात होतं...
काहीतरी वेगळं करायला हवं होतं. नक्की काय कराव तेच सुचेना.
खिडकी..! यस्स, खिडकी फोडून आत डोकावून पाहता येईल म्हणून मी पटकन मागे वळून बागेत खिडकी फोडण्यासाठी म्हणून काहीतरी शोधायला लागले..

'साला या नलिनला फोन करायला हवा. मी आत जाईपर्येंत तरी थांबायचं ना. ती तन्वी असती तर बरोबर थांबला असता. नालायक नुस्ता' मी सेलवर त्याचा नंबर काढला. नेमकी फोनला रेंज नव्हती.

'रेंजलाही आत्ताच मरायचं होतं.? फक् यार. उद्याच्या उद्या हे सिम काढून फेकणारे मी. बॅटरीपण संपलीचेय जवळजवळ. एवढा एक फोन होऊन जाऊदे देवा.' मी रेंज पकडण्यासाठी फोन वर करून इकडे तिकडे जाऊन पाहू लागले. तेवढ्यात माझा पाय कशालातरी लागला. मी दचकून खाली बघितलं. लाकडाचं ओंडक्या सारखं काहीतरी घरंगळून पुढे गेलं होतं. मी नीट निरखून पाहिलं. ती मुसळ होती.

'आयला मुसळ.? इथे कशी.? असो. याने खिडकी नक्कीच फुटेल.' म्हणून मी ती मुसळ उचलली आणि मागे दाराकडे वळाले. दाराच्या शेजारीच खिडकी होती जी फोडायचा माझा विचार होता..

मुसळीवर तोच चिकट ओलसरपणा होता. बेल आणि दाराच्या अनुभवावरून तो कशाचा आहे हे माझ्या लक्षात आलच होतं. पण माझं मन एव्हाना कणखर झालं होतं. मुसळीवरची पकड आणखी घट्ट करून मी खडकीकडे मोर्चा वळवला..

तेवढ्यात मला दार जsरासं किलकिलं झाल्यासारखं वाटलं. कडी न लावता नुसत लोटून ठेवल्यावर होतं तसं. मगाशी एवढ बडवल तेव्हा उघडलं नाही न आता हे अस उघड कस.? आत कोणी आहे कि काय.?

मी सावधपणे दाराकडे जाऊन मुसळीच्या टोकाने दार ढकलायचा प्रयत्न केला. नुसत टक् करून मुसळ टेकली दाराला तर दार एकदम सताड उघडलं. मी झट्कन मागे झाले. न जाणो कोणीतरी हमला करण्याच्या तयारीत लपून बसलेलं असाव.

मी दारातून डोळे फाडून आत पाहण्याच्या प्रयत्न करत होते. पण काहि दिसेल तर शपथ. अर्धा एक मिनिट वाट पाहिली. काहीच हालचाल नाही. आई, बाबांच्या, तनयच्या काळजीने माझा जीव जात होता. मी त्यांच्या नावाने पुन्हा हाका मारायला सुरुवात केली. 'आईssss, बाबाsss, कुठे आहात तुम्ही.? तनsssय...'

काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यांची मला जरा जास्तच काळजी वाटायला लागली. नाना शंका मनात येत होत्या. आता ते सुखरूप असल्याच डोळेभरून पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं. मी मनाचा हेका करून सावधपणे घरात पाऊल टाकलं.

निरव शांतता होती. मी दारातून परत एकदोनदा हाका मारल्या पण आवाजपण जोरात फुटत नव्हता. तसाच अंदाज घेत मी जरा पुढे झाले. मुसळीने मी जमिनीचा अंदाज घेत होते.

अर्र.! हे काय..? मुसळ फरशीवर आपटण्याचा आवाजच येत नाहीये.? अस कस.?
मी खाली वाकून फरशीला हात लावला.

वाळू होती खाली. समुद्रकिनारी असते तशी.!

इतक्या वेळात बेमालूमपणे वाढलेला वाऱ्याचा आणि समुद्राचा आवाजपण मला एकदम जाणवला. समुद्र चांगलाच जवळ होता बहुतेक. काहि कळेचना मला. मी सेफ साईड म्हणून मागे दाराच्या दिशेला सरकले. तिथून अॅटलिस्ट मला जवळच राहणाऱ्या नलिनला बोलवता आलं असत.

दार.? अरे यार दार.? अस कस होऊ शकत.? आत्ताच तर मी आत आले इथून.

हाताला नुसती भिंत लागत होती. मला चांगलाच घाम फुटायला लागला. श्वासोच्छवास जलद झाले. हालचाली एखाद्या सापळ्यात अडकलेल्या श्वापदाप्रमाणे जलद होत होत्या. मी जीवाच्या आकांताने भिंती चाचपडून दार शोधत होते.

अचानक माझ्या कानाला एक मानवी आवाज जाणवला. मगापासून येतोय बहुतेक हा. श्शी काय मूर्ख आहे मी. मला आत्ता जाणवला हा आवाज. मला जरा हायसं वाटलं.

त्या आवाजाकडे जायच्या दृष्टीने मी कान देऊन तो आवाज ऐकू लागले.

कोणीतरी मुलगी काहीतरी गुणगुणत होती. रॅप. रॅपसारखं काहीतरी. काये बरं.? ऐकलंय कुठेतरी.
समे समे सांग, सांग.!
ज्जाशील कुठे तू लांब, थांब.!
..........

==========================================================

maitreyee | 17 September, 2015 - 21:39

अरविंदांना त्यांचा भूतकाळ आठवत होता... समीपा लहान असताना नेहमीच अशी बेशुद्ध पडायची पण त्याची जयाला काहीच कल्पना नव्हती कारण ती त्यांची दुसरी बायको होती.. पहिली बायको अशीच मधूनच किंचाळायची आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता... समीपाचे पण तसेच होईल की काय अशी भिती वाटत होती त्यांना कारण हे असं पहिल्यांदाच घडत होतं समीपाच्या बाबतीत ....

इतक्यात समोरून रेखा आली. रेखा म्हणजे अरविंदांची तिसरी बायको.
रेखा! स्टाइल केलेले , जांभळे हायलाइट करून मोकळेच सोडलेले भरघोस केस, घार्‍या डोळ्यांना लावलेला ग्लॉसी आय मेकप, कोरऊन रंगवलेली लिप स्टिक, ओठावर कृत्रिमरित्या लावलेला तीळ, फ्लोअर लेंग्थ फ्लोई ड्रेस, नावाला शोभेल अशी ग्लॅमरस बाई होती ती. तिला पाहताच जया अरविंदांना बाय करून निघालीच पण रेखाने तिला हटकलेच.
"वेल वेल!! नाइस टू सी यू अगेन !! " छद्मी हसत रेखा म्हणाली.
"मी निघतच होते रेखा, इथे जवळच आले होते म्हणून तनय - समीपाला हाय करायला आले होते . डोन्ट वरी !!" जया हे उघड म्हणाली पण मनात म्हणत होती , " तसंही थांबायचंय कुणाला, तू असताना मला अनकंफर्टेबल वाटतं, ते घारे डोळे, जिवंत आहेत असे वाटावे असे केस..... ईक्स !! डायन कुठली ! "
"या राइट! झालं ना हाय करून ? गुडबाय अन गुडनाइट' तीक्ष्ण नजरेने तनय आणि अरविंदांकडे बघत रेखा म्हणाली. तशी ते दोघे समीपाला घेऊन निमुटपणे नलिन ला बाय करून घरात शिरले!
जरा पाणी शिंपडल्यावर समीपा शुध्दीवर आली.
"व्हॉट्स गोइंग ऑन अरु ? ही समीपा काय असे खुळ्यासारखे डोळे फिरवत होती??" समीपाला बारकाईने निरखत रेखा म्हणाली.
अरविंदांनी थोडक्यात काय झाले ते सांगितले अन म्हणाले
" डार्लिंग, मला असे वाटतेय जे हेमाच्या बाबतीत झालं तेच समीपाच्या बाबतीत होत आहे. तिलाही "ती" दिसायला लागलीय!! हो तीच !! वळवळणार्‍या केसांची रक्त पिपासू चांडाळीण!! "
"व्हॉट रबिश अरु! अन तू पण समीपा???" एवढेच बोलून रेखाने त्यांना वेडात काढले.
जास्त काही न बोलता मग आपल्या खोलीत निघून गेली.
कपडे बदलून नाइटी चढवून हँड लोशन लावत असताना तिच्या डोळ्यात एक चमक आली. आपल्याच केसांना कुरवाळत ती आता आरशासमोर उभी होती. तिच्या ओठांवरचं अस्फुट हसू खळकन फुटलं. अन मग ते वाढतच गेलं ....

Happy Happy

==========================================================

पराग | 17 September, 2015 - 23:26

कपडे बदलून नाइटी चढवून हँड लोशन लावत असताना तिच्या डोळ्यात एक चमक आली. आपल्याच केसांना कुरवाळत ती आता आरशासमोर उभी होती. तिच्या ओठांवरचं अस्फुट हसू खळकन फुटलं. अन मग ते वाढतच गेलं ....

तिला स्वतःच्या 'कर्तुत्त्वाचं' खूप कौतूक वाटत होतं! अरविंदांचं व्यक्तिमत्त्व खरतर अगदी साधं होतं. शिवाय स्वभावही साधा. मात्र हुशारी आणि कामाचा दांडगा उरक ह्यावर त्यांनी बरीच मोठी मजल मारली होती! स्वतःच्या व्यवसायात मोठी मजल मारली होती शिवाय एकुलते एक असल्याने वडिलोपार्जित पैसा अडकाही बराच होता. मात्र अतिशय तत्त्वनिष्ठ माणूस असल्याने बक्कळ पैसा असुनही त्यांची जिवनशैली साधी होती. मुलांनाही ते साध्या जिवनशैलीचे बाळकडू नेहमी पाजत असत. फाजिल लाड, खर्च हे मुलांना तसेच बायकोलाही कधीच करू दिले नाहीत. पहिल्या बायकोचा अकाली मृत्यू झाल्याने ते अधिकच कोषात गेले आणि स्वतःला कामात बुडवून घेऊ लागले. मात्र समिपाची त्यांना फार काळजी वाटत असे. अश्यातच त्यांच्या आयुष्यात जया आली. समिपाची पूर्ण जबाबदारी जया घेईल ह्याची खात्री वाटल्यावर त्यांनी जयाशी लग्न केलं. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. दीडच वर्षात तनयच्या रूपाने संसाराला चौथा कोन मिळाला. मात्र अजून दोन वर्षांनी सुखाच्या संसाराला पुन्हा दृष्ट लागली.

व्यवसायानिमित्त होणार्‍या भटकंतीदरम्यान त्यांची रेखाशी ओळख झाली. खरतर रेखासारखीने आपल्यापेक्षा पुर्णपणे वेगळ्या असणार्‍या अरविंदांकडे आकर्षित होण्याचं काहीच कारण नव्हतं. पण रेखा अत्यंत पाताळयंत्री. अरविंदांच्या व्यवसायाची आणि असणार्‍या संपत्तीची तिने खडानखडा माहिती मिळवली आणि पैशासाठी ह्या माणसला गळाला लावायचच ह्याची कंबरकसून तयारी करायला लागली. आधी जयाशी मैत्री करून तिने घरात प्रवेश मिळवला आणि मग मुलांशी दोस्ती केली. नंतर समिपाच्या मनात सावत्र आईबद्दल भरवायला सुरूवात केली. समिपा हा अरविंदांचा विक पॉईंट. त्यामुळे तिला त्रास होतो आहे हे त्यांना सहन होईना. एकडे जयाशीही गोड-गोड बोलून त्या दोघांमध्ये भांडणं होतील ह्याची पुरेपुर काळजी घेतली. भांडणं पराकोटीला पोहोचून शेवटी त्याची परिणती घटस्फोटात झाली.

मात्र मुलांना रेखाचा इतका लळा होता की निदान तनयसाठी तरी तू माझ्याशी लग्न कर असं अरविंद म्हणू लागले. समिपा तोपर्यंत बरीच मोठी झालेली होती आणि ह्या वयात वडिलांचं अजून एक लग्न हे तिला पटत नव्हतं. मात्र वडिलांसाठी आणि भावासाठी तिने काहीही न बोलण्याचं ठरवलं. रेखा आता बर्‍याच मोठ्या संपत्तीची मालकीण झालेली होती. मात्र सगळी संपत्ती आपल्या नावावर करणं तिला अजून जमलेलं नव्हतं.

जरी आत्ता रेखाला आपल्या कर्त्तुत्त्वामुळे खुषीचं हसू येत असलं तरी मघाचा प्रसंग आठवून ती अचानक गंभीर झाली. समिपाला चक्कर येण्याआधी खरच 'ती' दिसली होती ?? तिनेच अरविंदांना त्यांचा संसार टिकणार नाही असा शाप दिला होता. पहिल्या बायकोला ती दिसल्याने मृत्यू झाला. दुसरा संसार आपणच मोडला. पण मग आता शाप देणारी सुषमा आपल्या मागे लागली की काय ?? 'ती'ची गोष्ट खरी असेल आपलं काय होणार ? मृत्यू की आणखी काही. रेखा मनातून चरकली. काय गरज होती तेव्हा अरविंदांना 'ती'च्याशी म्हणजे सुषमाशी असं वागायची ???

==========================================================

maitreyee | 18 September, 2015 - 08:22

सुषमा ! एक व्हॅम्पायर !! साधी सुधी नव्हती ती.
दिसायला कृश अन फिकट्गोरी दिसली तरी पौर्णिमेच्या रात्री तिच्यात हजार हडळींचं बळ चढायचं ! जंगलात जाऊन वाघ सिंह किंवा गेला बाजार अस्वलाचं रक्त प्यायल्याखेरीज तिची तहान भागायची नाही. तशी सभ्य घरातली असल्याने फक्त प्राण्यांचंच रक्त पिऊन ती गुजराण करत असे. माणसाला तोंड लावलं नव्हतं तिने . इतर व्हँपायर्स तिला व्हेजिटेरियन म्हणायचे.
गेले दोनशे वर्षे एकाच कॉलेजात एकाच इयर मधे काढली असल्यामुळे कॉलेज तिला महा बोरिंग वाटायचं! ते ते म्हातारे होईपर्यन्त तेच ते लेक्चर्स देणारे प्रोफेसर्स, तीच ती काही बुजरी काही गुंड मुलं, त्याच त्या फ्र्यन्डशिप्स, प्रेमं,पथेटिक छेडछाडी, राडे, बदलणार्‍या , बदलून पुन्हा येणार्या फॅशन्स, सगळं तेच ते, काही नाविन्य नाहीच.
अन ध्यनी मनी नसताना तो दिवस उजाडला. तरुण देखणा अरविंद तिच्या केमिस्ट्रीच्या क्लास मधे आला!!
तो यायच्या आधी त्याचा गंधच सुषमाला खुळावून गेला! त्या गंधाने धुंद होऊन ती स्वतःवर कन्ट्रोल कसातरी मिळवत असताना तो सरळ येऊन तिच्या शेजारी बसला !! आत्ताच्या आत्ता याच्या भरदार मानेत आपले सुळे रुतवावे अशी इच्छा तिला अनावर झाली.. पण त्याच वेळी त्याच्याकडे ती आकर्षितही झाली होती.
त्याला डोळ्यांनी पिऊ की त्याचं रक्त पिऊ अशी द्विधा मनःस्थिती होऊन ती सैरभैर झाली.
त्याच्या मादक गंधाने बेभान होऊन भलते सलते होऊ नये म्हणून शेवटी लॅब मधून प्रॅक्टिकल संपायच्या आतच ती धावत बाहेर आली तेव्हा कुठे तिच्या जिवात जीव आला. अन नेमका अरविंदही तिच्या मागून आला!
"एक्स्क्यूज मी मिस... " "अरे बाबा जीव प्यारा असेल तर जा ना इथून " असं मनात म्हणात तिने त्याच्याकडे प्रशनार्थक चेहर्‍याने पाहिले. " तिच्या नजरेला नजर मिळताच तोही विजेचा झटका बसल्यासारखा चमकला असे तिला वाटले! "काही नाही तुझं जर्नल लॅबमधेच विसरलीस तू " असं म्हणून त्याने जर्नल पुढे केले.
"ओह थॅन्क्स!" म्हणत तिने हात पुढे केला . तर त्याने आधी त्याचा हात तिच्या हातात दिला "हाय, मी अरविंद !"
"हलो मी सुषमा " कसेतरी हसत ती म्हणाली पण त्याच्या हसण्ञात स्वतःला पार हरवून बसली .
हळु हळू हो नाही करता करता त्यांची ओळख वाढली. येता जाता गप्पा, कॉफी असे टप्पे पार होत गेले ! तिला आता त्याच्या सहवासाची (की वासाची ) चटक लागली होती.त्याच्या मनाचा थांग मात्र तिला लागत नव्हता. ही रिलेशनशिप पुढे कुठे जाणार हे तिलाही सांगता येत नव्हते.
अन अचानकच तो दिवस उजाडला. कॉलेजच्या त्यांच्या वर्गाची ट्रिप जाणार होती.
ट्रिप्ला जायचं म्हणून सुषमा खास दिलखेचक पारदर्शक टॉप अन जीन्स घालून आली. अरविंदाची आतुरतेने वाट पहात असताना दुरुन त्याचा गंध आला आणि बाइक वरून तो येताना दिसलाही, पण आज एक नको नकोसा गंधही त्याच्या बरोबरीने येत होता!!
अरविंद जवळ आला तेव्हा तिला दिसले. आज निळ्या स्वेटर मधे तो जास्तच यम्मी दिसत होता . पण हाय! एक नाजुक लिंबू कलरची साडी नेसलेली , केसांची वेणी , वेणीत गजरा अशी एक बया त्याच्यासोबत होती!! "हाय सुषमा , मीट हेमा माय फियान्से" अरविंदने एन्ट्रीतच डायलॉग मारला!! आणि सुषमाचे जग गर्र्कन तिच्याभोवती फिरले

लिहा पुढे!

(मेयरांच्या स्टेफनीताई मला क्षमा करा !) Happy

==========================================================

नीधप | 24 September, 2015 - 12:41

>>>> पण हाय! एक नाजुक लिंबू कलरची साडी नेसलेली , केसांची वेणी , वेणीत गजरा अशी एक बया त्याच्यासोबत होती!! "हाय सुषमा , मीट हेमा माय फियान्से" अरविंदने एन्ट्रीतच डायलॉग मारला!! आणि सुषमाचे जग गर्र्कन तिच्याभोवती फिरले <<<<

लवकरच कॉलेज संपले आणि अरविंद-हेमाचे लग्न धूमधडाक्यात पार पडले. इतर मित्रमंडळींबरोबर सुषमालाही आमंत्रण होते. सुषमाने मुद्दामून नाजूक लिंबू कलरची पण जरीची साडी, त्यावर डाळिंबी रंगाचा ब्लाऊज, केसांची वेणी आणि वेणीत भरगच्च गजरे असा दिलखेचक जामानिमा केला होता. क्षणभरासाठी का होईना अरविंद घायाळ झालाच.

सुषमाला ट्रिपच्या वेळेस बघितलं तेव्हापासून हेमा अस्वस्थ होती. केवळ नवर्‍याची मैत्रिण म्हणून नव्हे तर अजून काहीतरी अनाकलनीय कारण होते की सुषमाचा विचार जरी आला तरी तिचा थरकाप उडत असे.

खरंतर हेमाशी लग्न हा एक प्रकारचा व्यवहारच होता. अरविंद प्रचंड गरीब घरातला. वालावल जवळच्या एका छोट्याश्या खेड्यातला. वडील लहानपणी वारलेले. आई गावातल्या श्रीमंताकडे पोळ्या लाटायला जायची. आईबरोबर अरविंद पण जायचा. अभ्यास करत बसायचा. श्रीमंताची मुलगी हेमा मोठी गोड होती. त्याच्या बरोबरीने ती पण अभ्यासाला बसायची. ते इतके श्रीमंत होते की त्यांचे मूळ आडनाव कुणाच्याच लक्षात नव्हते. कागदोपत्री त्यांचे आडनाव श्रीमंतच झाले होते.

अरविंदची दहावी झाली आणि श्रीमंतांनी त्याचे मार्क बघून त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलायचे ठरवले. त्याला कॉलेजात घातले. वालावलमधे कॉलेज नव्हते त्यामुळे अरविंद शहरात गेला. शिक्षणात रमला.

इकडे हेमा १४-१५ वर्षांची होती तेव्हा आजीबरोबर काळश्याला कुणाच्या तरी लग्नाला गेली होती. काळश्याहून कर्लीची खाडी पार करून तरीने वालावलला परतताना मध्यात आल्यावर कुणीतरी हाताने उचलून उलटवावे तशी तर उलटली. हेमाची आजी तिथेच बुडून गेली. हेमाला तरीचा दांडा मिळाला आणि ती कशीतरी तरंगत राह्यली. पुढे काही तासांनी वालावलच्या बाजूला कुणाला तरी ती दिसली आणि तिची सुटका झाली. पण तोवर हेमा बेशुद्ध झालेली होती.

नवसासायासाने वाचलेली एकुलती पोर अशी बेशुद्ध आणि आपल्या आईचा मृत्यू या दोन्ही गोष्टींनी श्रीमंत फारच खचून गेले. दरवर्षी नियमित राखण दिलेली आहे, सगळं काही वेळच्या वेळेला केलेलं आहे तरी हे असं का?

हेमा अजूनही ग्लानीतच होती. पण मधेच 'रमा रमा' असं काहीतरी बरळत होती. कुणाच्या तरी दिशेने हात उंचावत होती. हे काहीतरी बाहेरचं आहे असं सर्वांनी ओळखलं. डॉक्टरी उपचार तर चालू होतेच. पण जो जे सांगेल ते सगळे उपाय, दानधर्म श्रीमंतांनी केले.

अखेर एक आठवड्याने हेमा शुद्धीवर आली. पण ती आमूलाग्र बदलली होती. हेमा या नावाला ती क्वचितच ओ देई. कुणी विचारलं तर माझं नाव निरमा, रमा, निर्मला यातलं काहीतरी सांगे. अचानक कपडे धुवायची प्रचंड आवड तिला उत्पन्न झाली होती. १४-१५ वर्षांच्या अल्लड हेमाच्या जागी विशीतली आणि अति गंभीर अशी निरमा तयार झालेली होती.

तिला बघून अरविंदच्या आईला काहीतरी आठवे पण ते फारसे सोयीचे नव्हते त्यामुळे ती विसरून जाई. तरी श्रीमंतांच्या आईने चोरीचा आळ घेतल्यामुळे पुरात उडी टाकून जीव दिलेली तिच्या भावाची दहा वर्षाची मुलगी निर्मला तिच्या डोक्यातून हटत नसे. तिला कपडे धुण्याची खूप आवड होती त्यामुळे लाडाने अरविंदची आई निरमा म्हणत असे.

हेमा जाग्यावर यायचे लक्षण दिसेना. अरविंदच्या आईला पाह्यली की हेमा सगळे विसरून तिच्या गळ्यात पडून रडत रहायची. एरवी बघावे तेव्हा न्हयीवर जाऊन कपडे धूत बसायची. पण अधूनमधून हेमासारखेही वागायची. हेमाची लांबची मावशी सुषमा एकदा हेमाला भेटायला येऊन गेली होती तेव्हा हेमा नखशिखांत थरथरली होती. भितीने गळाठून गेली होती. लहानपणी हीच मावशी आली की हेमाची कळी खुललेली असे. श्रीमंतांना काही कळेनासे झाले होते.

अरविंदचे शिक्षण संपत आले. अखेरचे वर्षच राह्यले होते. सुट्टीसाठी अरविंद घरी आला तेव्हा त्याला सगळा बदललेला माहौल जाणवला. वयात आलेल्या हेमाला बघून अरविंदची नजर भुललीच. शहरात अनेक दिलखेचक सुंदर्‍या त्याने पाह्यल्या होत्या पण हेमा काहीतरी वेगळीच होती. तिची नजर पूर्वीच्या हेमाची नव्हती पण तो बहुतेक मोठे झाल्याचा बदल असावा अशी त्याने समजूत करून घेतली.

अरविंद आसपास असताना हेमा कपडे धुवायला जात नाही. शहाण्यासारखी वागते हे बघून श्रीमंतांनी अरविंदच्या आईकडे शब्द टाकला. अरविंदला मधला प्रकार काही माहित नव्हता त्यामुळे तो हो म्हणाला. त्यांचा साखरपुडा झाला. मग एकदा ते दोघे फिरायला गेलेले असताना हेमाने त्याला सांगितले की मला निरमाच म्हण. अरविंदला आपली चोरटी आणि रासवट बहिण निर्मला आठवली आणि तो नखशिखांत हादरला.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षात सुषमाशी थोडी मैत्री झाली आणि अरविंद अजूनच अस्वस्थ झाला होता. पण आता पर्याय उरला नव्हता. कॉलेजचं एक वर्ष पूर्ण करून हेमाशी लग्न करायचे आणि श्रीमंतांच्या इस्टेटीचा वारस जन्माला घालायचा एवढेच ध्येय समोर उरले होते. बाकी सर्व बाजूंनी नाकाबंदी झालेली होती.

अश्या तर्‍हेने हेमा किंवा निरमा आणि अरविंदचे लग्न झाले.

==========================================================

maitreyee | 24 September, 2015 - 16:47

हेमा अन अरविंदाच्या लग्नाचा सत्यनारायण आटोपला. आज प्रथमच नवदंपत्याला एकांत मिळणार होता.
एखादी नववधू अशा वेळी मोहरून गेली असती! पण हेमाचं वेगळंच होतं. तिला आता संध्याकाळपासून प्रचंड अस्वस्थ वाटत होतं.
त्याचं कारण होतं लग्नात आलेली सुषमा! लग्नाचे विधी चालू असतानाही सुषमाची एकटक रोखलेली नजर तिला अस्वस्थ करत होती. हे डोळे !! तेच ते डोळे ... पण कसं शक्य आहे ??
त्यालाही कारण होतं...
काही वर्षांपूर्वीची गोष्ट, अरविंदाची मामेबहीण निर्मला त्यांच्याकडे आली होती. आत्याबरोबर तीही हेमाच्या घरी कामाला यायची.पहिल्यांदा श्रीमंतांच्या वाड्यात पाऊल टाकताच निर्मला पार भारावून गेली होती! हेमाच्या आवडती मावशी सुषमाही त्या वेळी वाड्यात होती. वाड्यतल्या मौल्यवान वस्तूंवर भिरभिरणारी निर्मलाची नजर सुषमामावशीच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नव्हती. एकदोनदा तिने निर्मला ला हटकले देखिल होते काही बाही हातात घेतलेले पाहून.
त्या दिवशी हेमाचा वाढदिवस होता! सुषमा मावशीने तिला एक सुंदर सिल्क चा पांढरा शुभ्र फ्रॉक आणला होता.
तो फ्रॉक, काळे बूट, निळे मोजे आणि डोक्याला निळा बो अशा ड्रेस मधे गोल गोल गिरक्या घेताना निर्मलाने हेमाला पाहिले.

हेमा अगदी परीसारखी दिसत होती त्या फ्रॉक मधे. निर्मलाचं मनच बसलं त्या फ्रॉक वर! खेड्यात राहणार्‍या तिच्यासाठी ती भलतीच अप्रूपाची गोष्ट होती!
संध्याकाळची तयारी करायला म्हणुन हेमाने तो फ्रॉक बदलला अन ती आंघोळीला गेली. ती संधी साधून परकराच्या ओच्यात तो सुंदर फ्रॉक लपवून निर्मलाने बाहेर धूम ठोकली! सुषमा मावशीच्या नजरेतून ते सुटलं नाहीच. हेमाला हाका मारत ती निर्मलाच्या मागे धावली . हेमाही बाहेर येऊन काय झाले ते बघायला मावशीच्या मागे पळाली.
धावत निर्मला त्या दिशेने गेलेली दोघींना दिसली तेव्हा मावशी चरकली. या बाजूने कुठे जातेय ही? इथून तर अरुंद वाट , एक घसरडा खडक अन खाली नदीत तो मोठा डोह आहे! गावातल्या सासुरवाशिणींचा हक्काचा सुसाईड पॉइन्ट! त्यामुळे तिथे अनेक अतॄप्त आत्म्यांची पण जत्रा भरलेली कायम! पोरीला काही झालं म्हणजे!! लोकाची पोर! मावशी अन हेमा तिला थांबवण्यासाठी ओरडतच धावत तिथे पोहोचल्या.:त्या आपल्याला धरायला येतायत असं वाटून निर्मला अजून जोरात पळाली! परिणाम व्हायचा तोच झाला!
निर्मलाच्या समोरची वाट आता संपली होती. समोर एक खडक तेवढा होता ज्यावर कशी बशी ती उभी होती घाबरून त्या दोघींकडे बघत आणि डोहाकडे पाठ करुन! सुषमा मावशीने हात पुढे ही केला तिला थांब म्हणून सांगायला! पण .. पण उशीर झाला होता. निर्मलाचा पाय घसरला अन ती मागे कोसळू लागली ! आपण आता खाली पडणार हे दिसल्यावर निर्मलाची ती घाबर्लेली नजर अचानक बदलली! त्या नजरेत आता एक अंगार होता!
तीक्ष्ण नजरेने त्या तेवढ्या क्षणात पडता पडता तिने मावशीकडे अन हेमाकडे पाहिले अन ती किंचाळली! "सोडणार नाही!! कधीच सोडणार नाही तुम्हाला !! " तिच्या त्या नजरेने अन अघोरी आवाजने क्षणभरासाठी हेमा आणि मावशी जागच्या जागी थिजल्याच! अन त्या भानावर येण्यापुर्वी निर्मला मागे डोहात दिसेनशी झाली!
क्षणभर तो शुभ्र फ्रॉक हवेत उडाला अन तोही निर्मला पाठोपाठ त्या डोहाने गिळला!!
भयंकर घडल्याच्या धक्क्याने मावशी - भाचीची वाचाच बसली काही वेळ! थरथरत घरी आल्या कशाबशा.
हेमाचा तो वाढदिवस तर झाकोळाला गेलाच पण त्यानंतर तिने वाढदिवसच साजरा करणे बंद केले, सुषमा मावशी दुसर्‍याच दिवशी ट्रंक भरून गावी परत गेली पण थोड्याच दिवसात तिच्या गूढपणे "नाहीशी" होण्याचीच बातमी श्रीमंतांच्या घरी आली! हेमाला त्याही दिवशी ती निर्मलाची नजर अन तो आवाज अचानक आठवला अन ती शहारली होती!
अन नंतर अचानक तो बोटीचा अ‍ॅक्सिडेन्ट, बोट उलटताना पाण्यात दिसलासा वाटणारा आता चिखलाने अन रक्ताने माखलेला "तो " पांढरा फ्रॉक ...तेव्हापासून हेमा पारच बदलली होती.
अजून विचित्र गोष्ट म्हणजे हेमाचे लग्न ठरल्यावर काही दिवसांनी अचानक सुषमा मावशी "परत आली होती"!
पण ती भेटायला आल्यावर हेमा हादरलीच होती. ही सुषमा मावशी तिची आवडती सुषमा मावशी नव्हतीच! बाकी कुणाला काही कळले नाही , पण हेमाला बरोबर कळले होते. या सुषमा मावशीच्या रुपात काहीच बदल नव्हता पण नजर!! नजर बदलेली होती - जी हेमाच्या चांगलीच ओळखीची होती!! हेमा तिच्याशी बोलूच शकली नाही, दूर दूरच राहिली!
हवापालटासाठी श्रीमंतांनी तिला अरविंदर्बरोबर फिरायला पाठवलं, अन नेमका अरविंद तिला कॉलेजात घेऊन गेला अन तिथे तिला भेटली सुषमा! अरविंद ची मैत्रिण! अन तिच्याशी हात मिळवताना हेमा पांढरी फटक्क पडली होती. सुषमा मात्र तिच्याकडे छद्मी हसत रोखलेल्या नजरेने बघत होती... ती नजर ....!!
आताही सजवलेल्या खोलीत बसून हेमा त्या आठवणीने शहारली!! एका अनामिक भितीने तिला ग्रासलं!!
तित्तक्यात दार वाजलं! तिला थोडा बुडत्याला आधार आल्यासारखं वाटलं .. आला वाटतं अरविंद..... ?!
"अरविंद ??? "
"...."

==========================================================

नीधप | 24 September, 2015 - 22:54

>>> आताही सजवलेल्या खोलीत बसून हेमा त्या आठवणीने शहारली!! एका अनामिक भितीने तिला ग्रासलं!!
तित्तक्यात दार वाजलं! तिला थोडा बुडत्याला आधार आल्यासारखं वाटलं .. आला वाटतं अरविंद..... ?!
"अरविंद ??? "
"...." <<<

बाहेर अक्षरशः स्मशानशांतता होती. दार परत वाजलं. आतमधून कडी लावलेलीच नव्हती. दार तर नुसतेच लोटलेले होते. अरविंद असेल तर सरळ आत येईल ना. निदान ओ तरी देईल.
"अरविंद तू असशील तर ये ना आत. दार का वाजवतोस?"
दार अजून जोराने धडधडले.
हा अरविंद नाही नक्की. मग कोण? जे कोण आहे ते दाराबाहेरच आहे. दार वाजवतंय.
ती गप्प बसून राह्यली. अचानक बाहेरची स्मशानशांतता खळ्ळकन फुटली. अरविंद आणि मित्रांचे आवाज आले.
"सुषमा तू काय करतेस इथे?" मित्रांपैकी कोणीतरी म्हणाले.
दार उघडले गेले. कुणीतरी अरविंदला आत ढकलले आणि कुणी काही म्हणायच्या आत दार बंद करून बाहेरून कडी लावली गेली. हे नॉर्मलच होतं.
दार उघडले गेले तरी मगाशी दार वाजवणारे जे काय होते ते आत आले नाही. म्हणजे आतल्या माणसांनी दार उघडल्याशिवाय किंवा आत ये म्हणल्याशिवाय ते आत येऊ शकणार नाही हे हेमाच्या लक्षात आले.

अरविंदला अजूनही हेमाने त्याला 'मला निरमा म्हण!' सांगितल्याचे आठवत होते. हेमाकडे दुर्लक्ष करून तो झोपायला निघाला.
"आपलं लग्न तुला मान्य होतं ना? मग आता असं काय? साखरपुड्यानंतर काहीतरी विचित्र वागतोयस तू."
अरविंदने काहीच उत्तर दिले नाही.
"आज रात्री मला तुला काही सांगूदेत. मग तू कसं वागायचं ते ठरव. प्लीज." तिची कळकळ जाणवून अरविंदने तिची विनंती मान्य केली.
हेमाने तरीच्या अ‍ॅक्सिडेंटची आणि नंतरची सगळी कथा सांगितली. ती बेशुद्ध होती तेव्हाही तिला काय चाललंय ते समजत होते पण शुद्धीवर येता येत नव्हते हे ही सांगितले. त्या काळात आणि नंतरही तिचा हेमा की निरमा असा सतत लढा चालू असतो. एवढे दिवसांच्या स्वतःच्या आत असलेल्या निरमाच्या सहवासाने तिला निरमा कशाने, कुठल्या शब्दांनी, कुठल्या कृतींनी जागृत होते हे समजले आहे. अरविंदशी लग्न ठरल्यावर नेमके अरविंदने त्यातले काहीतरी केल्याने निरमा जागृत झाली होती. ती जागृत झाली की मग तिला भुईसपाट करायचा लढा प्रत्येक वेळेला आधीच्यापेक्षा अवघड असतो. पण तिला जागृतच न होऊ देणे हे अगदीच शक्य आहे. असे सांगून हेमाने एक पाकीट त्याच्या हाती दिले. ज्यात तीन शब्द आणि दोन कृती दिलेल्या होत्या. हेमाच्या आजूबाजूला १० फुटाच्या परिसरात त्या पाचही गोष्टी कायमस्वरूपी टाळल्या तर निरमा कायम सुप्तावस्थेतच राहील हे नक्की होते. तसे झाल्यास अरविंद व हेमाचा संसार सुखाचा होईल हे नक्की. मात्र ते पाकिट व त्यातला कागद कधीही कोणाच्या हाती पडता कामा नये. अरविंदाच्या मित्रमैत्रिणींच्या तर नाहीच नाही. इथे खरेतर तिला सुषमा म्हणायचे होते पण ते नाव घेणे तिने टाळले.

अरविंदाला हे सगळे अजिबात अचाट वा अतर्क्य वाटले नाही. त्याला चक्क हेमाची बाजू पटली. अचानक हेमाबद्दल प्रेम उफाळून आले. बाहेरून दार धडकवण्याचा आवाज आला. अरविंद दार उघडायला जाणार तेवढ्यात हेमाने अडवले. तो इशारा समजून अरविंदाने दार व इतर गोष्टींचा अनुल्लेख करायचे ठरवले. आणि सुहागरात या विषयाकडेच कॉन्सन्ट्रेट केले.

==========================================================

maitreyee | 25 September, 2015 - 04:44

गोष्टीतल्या सुहागरातीचं एक आहे, ती एकदा चालू केली की सकाळची किलबिल , न्हाऊन आलेल्या तिला त्याने पुन्हा ओढणे असे बारीक थांबे घेत डायरे़क्ट ओकार्‍या चिंचा अन मग ट्यँहा वर आल्याखेरीज पुढे काही मेजर घडत नाही!
अरविंदा अन हेमाच्या सुहागरातीने पण ते ठराविक थांबे घेतले.
आता हेमा डिलिव्हरीच्या कळा देत होती, अशा वेळी फाउल होऊ नये म्हणून बाहेर अरविंद चिंतातूर चेहर्‍याने येरझार्‍या घालत होता. हेमाची मावसबहीण जया त्याला धीर देत होती .
बाळ आडवं आलं असावं. हेमाची काही सुटका होत नव्हती.
ती इतकी थकली की तिला ग्लानी आली. शुद्धी- बेशुद्धीच्या सीमारेषेवर असताना तिला अचानक समोर निर्मला दिसली!! ती तिला बोलावत होती! "नाही! मी येणार नाही! मला माझं बाळ आणी अरविंदबरोबर जगायचंय !! तू जा इथून !" हेमा बरळत होती . पण निर्मला पुढे पुढेच येत राहिली! हेमा आता काकुळतीने तिला विनवू लागली "अग मी तुझं काय वाकडं केलंय गं ? सोड ना मला !" पण निर्मला ऐकणार नव्हतीच.

बाहेर अरविंदला डॉक्टरांनी हाक मारली " मि. अरविंद! व्हेरी सॉरी! आम्ही खूप प्रयत्न केले पण तुमची बायको अन बाळी दोघींनाही नाही वाचवू शकलो !!" अरविंद वर आभाळ कोसळलं, पण तशाही परिस्थितीत त्यांना शेवटचं बघायला तो खोलीत धावला !
आत जाताच त्याचे पाय जणु जमिनीला खिळले! हेमाच्या देहाजवळ एक धूसर आकृती उभी होती! निर्मला !! तिच्या हातात अरविंद- हेमाचं बाळ होतं अन ते ती घेऊन जायच्या बेतात होती !! अरविंद थरथरत ओरडला "थांब!! थांब ! " त्या आकृतीने गर्र्कन वळून पाहिले अन ती खदखदून हसली "काही फायदा नाही तुझी हेमा कधीच गेलीय इथून. आता तुझ्या लेकीला पण मी घेऊन चाललेय ! अरविंदच्या पायतले बळच गेलं!
लहान मुलासारखा रडत तो गयावया करू लागला " निर्मला!! नको प्लीज नको माझ्या लेकीला नेऊस! तिला तरी माझ्याजवळ ठेव ! दया कर!!"
निर्मला घोगर्‍या आवाजात म्हणाली " लेक हवीय तुला ? मग एक अट आहे माझी! बोल करशील कबूल ?"
"हो वाट्टेल ते घे! प्रॉमिस !" अरविंद ने आशेचा किरण दिसताच जास्त विचार न करता प्रॉमिस केले.
" मी मेले तरी मला अजून सगळे चोर म्हणून ओळखतात ! मला हा डाग धुवून ह्वाय ! सगळ्यांनी वाहवा केली पाहिजे माझी ! सगळ्यांची मी आवडती झाले पाहिजे! तुझ्याकडे १८ मिनिटे आहेत!"
"काय अठरा मिनिटे फक्त ?"अरविंद हबकलाच!
"मूर्खा आमच्या जगातली अठरा मिनिटं. म्हणजे तुझ्या जगातली अठरा वर्षं! बास झाला तेवढा टाइम! तेवढ्या वेळात तू हे डाग धुवायचं काम केलं नाहीस तर मी पुन्हा येऊन तुझ्या लेकीला घेऊन जाणार! लक्षात ठेव!!" असं म्हणुन निर्मला हवेत विरुन गेली आणि चमत्कार व्हावा तसं त्यांच्या चिमुकल्या समीपाने ट्यँहा केले!!
त्या दिवसापासून अरविंदाने समीपासाठीच जगायचे ठरवले.
तिच्यासाठी म्हणून त्याने जयाशी दुसरे लग्न पण केले. (किती हा त्याग!) मग दुसरी सुहागरात करणं आलं! मग पुन्हा तो चिंचा - ओकार्‍या - ट्यँहा सीक्वेन्स या नादात त्या निर्मलाचा डाग धुवायचा बारीकसा तपशील तो विसरूनच गेला! जयाने तनय ला जन्म दिला होता . समीपाशी पण ती छानच वागत होती. पण कसे कुणास ठाऊक अरविंद आणि तिचे नंतर बिनसतच गेले . जयाने मग डिव्होर्सच घेतला.
झालं परत बिचारा अरविंद! पुन्हा त्याने रेखाशी लग्न केलं. फक्त मुलांसाठीच. (दुसरा काय हेतू असणार! ). आताशा त्याला ते सत्यनारायण, सजवलेली खोली असल्या सोपस्कारात काही राम वाटेनासा झाला होता. सुहागरात मात्र तेवढी केली त्याने .
मग असेच दिवस गेले .. म्हणजे रेखाला नाही गेले ! तिने चिंचा ओकार्‍या आणि ट्यँहा सीक्वेन्स ऑप्शन ला टाकला होता. नुस्तेच दिवस निघून गेले. समीपा चा अठरावा वढदिवस जवळ आला . रेखाने मॉल मधे जाऊन तिच्यासाठी एक मस्त पांढरा शुभ्र सॅटिन चा इन्व्हिनिंग गाउन आणला !
समीपा तो ड्रेस ट्राय करायला तिच्या खोलीत गेली ....

==========================================================

maitreyee | 27 September, 2015 - 04:57

समीपा ड्रेस घालून बघायला म्हणून खोलीत गेली अन अचानक जागीच थबकली. खोलीत अचानक थंडी अन कुंद हवा पसरली होती. विचित्र अभद्र अंधार दाटला होता. तिला कसल्यातरी अनामिक भितीने घेरलं .आता चक्कर येऊन पडणार असं वाटायला लागलं. अचानक दोन अदृष्य हात येऊन तिचा गळा दाबू लागले ! तितक्यात- राधक्का , अरविंदांची आई म्हणजे समीपाची आज्जी आत आली. अन जादू झाल्यासारखं ते मळभ मागे हटलं! अरविंदही तोवर धावत आत आल्यावर त्यांना तिथे निर्मला दिसली ! ती समीपाला "न्यायला " आली होती! "अरविंदा, तुझा टाइम संपला! तू वचन मोडलंस!!" असं कर्कश्य ओरडताच अरविंदांना एका क्षणात सारं आठवून खोली गर्रकन फिरली त्यांच्या भोवती! आता ती त्यांचं ऐकणार नव्हती! राधाक्कांनी कशी बशी निर्मलाची गयावया करून त्यांनी तिच्या कडून अजून ३ मिनिटाचा - म्हणजे ३ वर्षाचा टाइम मागून घेतला .
पण या वेळी निर्मला दुरून समीपावर लक्ष देऊनहोती. तिला तिचं अस्तित्व जाणून देत होती!
अरविंद ला काय करावं सुचत नव्हतं . आता हिचा डाग धुवायचा तर कसा ? निर्मलाची अट विचित्रच होती.
वॉशरूम मधला इन्सिडन्स, मग घरी आल्यावर पुन्हा रक्ताचे ओघळ दिसणे यानंतर त्यांनी तातडीची फॅमिली मीटिंग घेतली. राधाक्का मुसमुसत होत्या . "तरी सांगत होते मागेच, सावळ्याला बोलवा म्हणून. पण तुझा विश्वास म्हणून नाही. आता पोरीच्या जिवावर बेतलंय, आता तरी ऐक माझं म्हातारीचं" त्या अरविंदांना म्हटल्या.
हो ना करता अरविंद सावळ्याला भेटायला तयार झाला .
सावळ्या म्हणजे गावाकडचा मांत्रिक होता. गावबाहेर पुळणीच्या टोकाला त्याचं एकच झोपडं होतं . त्या पुळणीला सावळ्याची पुळण असंच म्हटलं जायचं. तिथे सावळ्याचे कसले कसले तंत्र मंत्र चालायचे.सावळ्याची दहशत असल्याने तिकडे कुणी कामाशिवाय फारसं फिरकायचं नाही. मात्र गावच्या लोकांना विश्वास होता की सावळ्याला "त्या जगाचं" सगळं सगळं कळतं! .
अरविंदानी त्या दिवशी त्याच्या घरात पाऊल टाकताच तो म्हणाला " ये! वाटच पहात होतो !"
अरविंद चमकलाच! .पण खरी दचकायची वेळ अजून पुढेच होती . त्याने हात एका पोतडीत घालून एक फ्रॉक बाहेर काढला ! एके काळी पांढरा फ्रॉक असावा आता त्याचं पार जुनेरं झालं होत. त्यावर रक्त आणि चिखलाचे डागही होते. "बघतोस काय ? घे ! " अरविंदाला काही कळेना. सावळ्याने त्याच्या कानात काही कुजबूज केली, अरविंदाने अवाक होत मान डोलावली तशी सावळ्याने सरळ त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.
घरी येताच त्याने तो फ्रॉक सगळ्यांना दाखवला . राधाक्कांनी तो लगेच ओळखला.
तो फ्रॉक समीपाला देऊन त्याने तिला सर्व नीट समजावले.
समीपाने दुसर्‍या दिवशी कंपनीत क्लायन्ट किंजल डिटर्जन्टला त्यांच्या प्रॉडक्ट कँपेनबद्दल झक्कास पैकी प्रेझेन्टेशन दिले. कपडे धुवायच्या नव्या डिटर्जन्ट पावडर चे नाव "निरमा " सगळ्यांनाच फार आवडले.
कंपनीत मिळालेल्या डिटर्जन्टचं प्रमोशनल सँपल वापरून समीपाने "तो " फ्रॉक स्वच्छ धुतला. काय पांढरा स्वच्छ निघाला!! सगळे डाग निघाले!! दुसर्‍या दिवशी सगळी मंडळी गावी गेली.
सावळ्याच्या पुळणीकडे आज सगळा गाव लोटला होता. फुकट काही मिळणार म्हटल्यावर लोटणारच!
मध्यभागी "इतर डिटर्जन्ट नी धुतलेले ऑफव्हाइट फ्रॉक" आणि बाजूला निरमाने धुतलेला पांढरा शुभ्र फ्रॉक अडकवले होते.त्याभोवती सगळे लोक गोल करून बसवण्यात आले. सावळ्याने दिलेला मंत्र सर्वांनी एका सुरात म्हटला "हेमा, रेखा, जया और सुषमा, सब की पसंद निरमा " "सब की पसंद निरमा" ! ऐकायला इतके मस्त वाटले की समीपाने लिहूनच घेतला तो मंत्र जाहिरातीत वापरायला!
प्रसाद म्हणून सर्वांना निरमाचे एकेक सँपल मिळाले.
अशा रितीने आख्ख्या गावतले सर्व डाग धुतले गेले, निरमा प्रसिद्ध आणि सब की पसंद ठरली आणि समीपाला आशीर्वाद देऊन कायमची निजधामाला गेली !
समीपाला कंपनीत प्रमोशन मिळले त्यामुळे आता ती नलिन फिलीन सारख्यांबरोबर न राहता थोरा मोठ्या बॉसेस बरोबर सोशलाइज करू लागली आहे, अजून तिने लग्न किंवा सुहागरातीसाठी कुणाची निवड केलेली नाही.
त्यामुळे तिच्या लग्नाची गोष्ट पुढच्या वर्षी बघू!

गणपती बाप्पा मोरया !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages