Submitted by सुप्रिया जाधव. on 15 September, 2015 - 23:44
वळण कोणते राजरस्त्यात आले
तुझ्या चाहुलींचा पदन्यास चाले
निघाले कुठे अन कुठे पोचले हे
जिथे पावलो-पावली द्वंद्व चाले
विचारीत होतीच आकाशगंगा
तुझ्या अंतरंगी करी कोण दंगा ?
कसे नांव घ्यावे असे मी कुणाचे
कुण्या एकटीचा कुठे चंद्र सांगा ?
नदीला अचानक असा पूर आला
जिच्यातून सन्दर्भ वाहून गेला
पुसावे कुणी नेत्र पाणावलेले
कशाला पुन्हा व्यर्थ तू हट्ट केला ?
किनाऱ्यास गाठावया लाट येते
किती काय देते किती काय नेते
तिला काय कळणार त्याची अवस्था
परतणे कुणाचै कसा जीव घेते ?
टिके राज्य कायम कुठे या सुखाचे
झणी पावसाळा झणी ऊन जाचे
बदलत्या ऋतूंना शरण जा अता तू
नको चोचले फ़ार पुरवू मनाचे
-सुप्रिया
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा