दु:ख राहे शून्य, जाहलो अनन्य,
घेता झालो धन्य , झोप दुपारची!!
असं कुणीतरी म्हटलेलंच आहे……………………………..कोणी म्हटलं नसेल तर आत्ताच मी म्हटलं असं समजा ! खर तर दुपारची झोप हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि नाजूक विषय! आज याविषयी लिहून मला काही ठराविक प्रकारच्या लोकांवर सूड उगवायचा आहे. पहिला प्रकार म्हणजे जे स्वतः दुपारी झोपत नाहीत आणि दुसरा प्रकार म्हणजे जे दुपारी झोपू शकत नाहीत म्हणून जे झोपतात त्यांना तुच्छ समजणारे जन!
दुपारची झोप हा प्रकार जाणून घेण्यासाठी लागणारी रसिकता (काही लोक त्याला आळस म्हणतात…हाय रे दुर्दैव….अशा लोकांचे!) फार कमी जणांकडे असते. म्हणजे “छे! दुपारी काय झोपायचं!” अस म्हणणारा माणूस एक तर अरसिक असतो किवा तो तुमच्यावर जळत असतो! बर, नुसती रसिकता असून चालत नाही, जिद्द आणि चिकाटी हवी, म्हणजे कामात कितीही व्यस्त असलो तरी दुपारी झोपणारच अशी भीष्मप्रतिज्ञा करण्याचे आणि ती पाळण्याचे सामर्थ्य हवे. भीष्मप्रतिज्ञा या शब्दाबद्दल कुणीही आक्षेप घेऊ नये, कारण भीष्मदेखील समस्त कौरव-पांडवाना सकाळी युद्धाचे लेसन्स देऊन दुपारी झोपत नसतील कशावरून?
या झोपेचे पण वेगवेगळे प्रकार असतात! काही लोक वामकुक्षी आणि दुपारची झोप यामध्ये गफलत करतात! वामकुक्षी म्हणजे दुपारी येणारी अगदीच सामान्य अशी डुलकी जी फार फार तर अर्धा तास टिकू शकते! पण दुपारची झोप हा प्रचंड आणि राजेशाही प्रकार आहे. मस्त सुट्टीचा दिवस, एक च्या दरम्यान झालेलं पोटभरून जेवण (त्यात जर मत्स्याहार असेल तर अहाहा), पेलाभर मठ्ठा आणि वाऱ्याची हलकी झुळूक, हातात पुस्तक. ….अस सगळं जमून आल्यावर दोन तीन तास जी समाधी लागते तिला दुपारचे झोप अस म्हणतात! त्यामुळे या झोपेला वामकुक्षी म्हणणे म्हणजे कोल्हापूरच्या झणझणीत मिसळीची पुणेरी मिळमिळीत मिसळेशी तुलना करण्यासारखे आहे! पुणेरी लोकांनी वाईट वाटून घेऊ नये, कारण पुण्यातले दुकानदार म्हणजे दुपारच्या झोपेचे Brand Ambassador आहेत….का ते सांगायची गरज नाहीच! विषयांतर सोडून द्या! शाळेत असताना मी दुपारी झोपायचो, शिक्षकांच्या विरुद्ध दिशेला केलेल्या तोंडाला हातांच्या तळव्याचा टेकू द्यायचा आणि पुस्तकात तोंड खुपसल्याचे नाटक करून झोप काढायची! पण यासाठी साधना (साधना म्हणजे तपश्चर्या या अर्थी, “ती साधना काय सुंदर दिसते” अशी साधना नव्हे) हवी! जेव्हा शिक्षकांना आपण अशा अवस्थेत सापडतो तेव्हा साधना कमी पडल्याने निद्रादेवीचा कोप झाला असे खुशाल समजावे! उन्हाळ्यात फॅनखाली उघड्या फरशीवर पडल्यावर येणारी झोप वेगळी, पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज ऐकत येणारी झोप वेगळी, भर थंडीत चहा पिऊन रजाईत शिरून घ्यायची झोप वेगळी! ही सगळी त्या निद्रादेवीची विविध रूपे!
पट्टीचे गाणारे, पट्टीचे खाणारे असतात तसे पट्टीचे दुपारचे झोपणारे पण असतात माझ्यासारखे! (आणि बऱ्याचदा ह्या तिघांची पट्टी जुळते कारण तीन्ही ठिकाणी रसिकता लागते.) आम्हाला रात्रीचे जागरण चालेल पण दुपारचे जागरण म्हणजे काळ्या पाण्याचे शिक्षा! पण अशा आमच्यासारख्या लोकांचं सुख ज्यांना बघवत नाही असे लोक आम्हाला त्रास देतात. आणि बऱ्याचदा त्या स्त्रिया असतात. म्हणजे नवऱ्याने दुपारी झोपू नये म्हणून मुद्दाम दुपारी भिंतीवरची जळमटे काढणे (जेणेकरून एखादे जळमट नवऱ्याच्या नाकात जाऊन त्याला अशी शिंक यावी कि त्याला तर जाग यावीच पण आजूबाजूच्या घरात झोपलेल्या इतरेजनांच्या झोपेचं पण वाटोळ व्हावं), स्वच्छ असलेली भांडी जोरजोरात आवाज करत पुन्हा पुन्हा घासणे अशी कामे बायका करतात असे मी माझ्या काही विवाहित (बिचारे!) मित्रांकडून ऐकले आहे. आया सुद्धा महाबिलंदर असतात. पोराने दुपारी झोपू नये म्हणून बऱ्याच युक्त्या लढवतात. एकतर त्यांना आपल्या पोराचे वीक-पॉईण्ट्स माहीत असतात. मी दुपारी झोपायला लागलो कि माझी आई मुद्दाम गुलाबजामून (जाम कि जामून ह्यात जरा माझा गोंधळ आहे) तळायला घेणे, रसमलाई साठी रबडी तयार करणे अशा गोष्टी करते. वर आणि मला म्हणते “बाबू, तुला झोप आली असेल ना, झोप हो तू! ” म्हणजे इकडे झोप न तिकडे गुलाबजामून अशी विचित्र अवस्था होते माझी! बर काही लोक जे दुपारी झोपू शकत नाहीत ते अफवा उठवतात कि दुपारी झोपल्याने नैराश्य येते, पोटाचा घेर वाढतो, वगैरे..पण असं म्हणणाऱ्या किती तरी लोकांच्या वाढत्या पोटाचा घेर मी पहिला आहे. आणि ज्याला नैराश्य यायचच आहे त्याला काहीही कारण चालते अगदी “भारतात मंदी आली” ते “साबुच्या खिचडीत मीठ कमी पडलं” पर्यंत कुठल्याही करणावर नैराश्य येणारे लोक मी पाहिले आहेत! काही लोकांना तर त्यांच्या आयुष्यात सगळच ठीक सुरुय याच नैराश्य येत, कारण काय तर “काहीच कसं चुकीचं घडत नाहीय?” आता बोला!
उलट दुपारच्या झोपेमुळे उत्साह येतो, आनंद शोधण्याची वृत्ती वाढते. जेव्हा कामाला किंवा कॉलेजला जायचं म्हणून आपण सगळ आवरतो आणि अचानक जाण रद्द होऊन सुट्टी मिळते, त्यावेळी आज दुपारी झोपायला मिळणार या गोष्टीमुळे जो आनंद होतो तेवढा आनंद कोलंबसाला पण अमेरिका सापडल्यावर झाला नसेल (झाला असेलही कदाचित. इतके दिवस हलणाऱ्या बोटीवर काढल्यावर त्याला देखील दुपारी झोपायला शांत जागा सापडल्याचा आनंद झाला असेल!)
एका संशोधनानुसार दुपारी झोपणारे लोक न झोपणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आनंदी असतात. दुसऱ्या एका संशोधनातून याच्या विरुद्ध निष्कर्ष सिद्ध झाला आहे …पण मी मुळातच नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार करतो त्यामुळे पहिल्या संशोधनावर माझा जास्त विश्वास आहे आणि दुसऱ्या संशोधनातले संशोधक अरसिक होते असा माझा दावा आहे! तरी या पहिल्या संशोधनाला ध्यानात घेऊन शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस या सर्व ठिकाणी Lunch Time नंतर दोन तासांची झोपेची सुट्टी असावी अशी माझी “अखिल भारतीय दुपारनिद्रा” संघटनेतर्फे मागणी आहे! त्यासाठी आम्ही संसदेसमोर लवकरच भव्य “जांभाई आंदोलन” करणार आहोत. ज्यामध्ये दुपारी २ ते ५ संसदेसमोर बसून मोठ्याने एकसाथ जांभया देणे हा कार्यक्रम आहे! नाहीतरी संसदेच्या आत बसून आपले मंत्री संत्री देखील हेच उद्योग करतात, त्यामुळे जांभयांची भाषा त्यांना लवकर कळेल! हल्ली आरोळ्या देऊन कोणी ऐकत नाही, जांभया देऊन तरी ऐकतात का ते बघू!
खूप लिहिलं! दुपारचे दोन वाजले आहेत! दुपारची झोप माझी वाट पाहत आहे…..हे निद्रादेवी तुझी अशीच अखंड कृपा माझ्यावर राहो…….ऽऽऽऽऽ!
मुकद्दर में रात की नींद
मुकद्दर में रात की नींद नही..
तो क्या हुआ..
हम भी मुकद्दर के सिकन्दर हैं...
दोपहर को सो जाते हैं..
व्हॉट्सअॅप साभार..
अंजली
अंजली
छान आहे. दुपारची झोप हा विषयच
छान आहे. दुपारची झोप हा विषयच तसा विशेष आहे.
मला बर्याच ठिकाणी पुलंच्या शैली चा भास झाला
धन्यवाद ऱोहीणी!
धन्यवाद ऱोहीणी!
पहिल्या संशोधनाला ध्यानात
पहिल्या संशोधनाला ध्यानात घेऊन शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस या सर्व ठिकाणी Lunch Time नंतर दोन तासांची झोपेची सुट्टी असावी अशी माझी “अखिल भारतीय दुपारनिद्रा” संघटनेतर्फे मागणी आहे! त्यासाठी आम्ही संसदेसमोर लवकरच भव्य “जांभाई आंदोलन” करणार आहोत. ज्यामध्ये दुपारी २ ते ५ संसदेसमोर बसून मोठ्याने एकसाथ जांभया देणे हा कार्यक्रम आहे! नाहीतरी संसदेच्या आत बसून आपले मंत्री संत्री देखील हेच उद्योग करतात, त्यामुळे जांभयांची भाषा त्यांना लवकर कळेल! हल्ली आरोळ्या देऊन कोणी ऐकत नाही, जांभया देऊन तरी ऐकतात का ते बघू!>>>>
मला दुपारी झोप येत नाही.
मला दुपारी झोप येत नाही. त्यामुळे यातलं प्रत्येक वाक्य मला टोचत होतं. आणि तुम्ही म्हंटल्याप्रमाणे मी जळून माझ्या नवऱ्याची दुपारची झोप कमी केली आहे. फार चांगली निरीक्षणे आहेत.
मलाही दुपारी झोपून उठलं की
मलाही दुपारी झोपून उठलं की नैराश्य येतं. खूप वैफल्याची भावना येते. मला वाटतं मेंदूतील रासायनिक क्रिया (१००%). रात्री झोप लागत नाही ते नाहीच.
लेख फार आवडला.
पणा आम्हा पुणेकरांना कशाला हो खेचलत मधे
मी मुंबईचा आहे ... कधीही
मी मुंबईचा आहे ... कधीही कुठेही झोपू शकतो... संध्याकाळी 5 ते 7 झोपून... डिनर करून परत 9 ला झोपू शकतो....
ट्रेन मध्ये झोपू शकतो... जेंव्हा वेळ
मिळेल झोप कम्प्लिट करण्याची पॉवर असते मुंबई कराकडे ...
म्हणजे मुंबईकरांचं आणि
म्हणजे मुंबईकरांचं आणि नेपोलियनचं काहीतरी नातं आहे.
Pages