श्रीलंका सहल - भाग २ अ - हॉर्टॉन प्लेन्स नॅशनल पार्क

Submitted by दिनेश. on 6 September, 2015 - 16:15

श्रीलंका सहल - भाग १ - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/55306
श्रीलंका सहल - भाग १ - एअरपोर्ट ते नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55355

हॉर्टोन प्लेन्स नॅशनल पार्क.. https://en.wikipedia.org/wiki/Horton_Plains_National_Park या जागेबद्दल मी नेटवर वाचले होते त्याचवेळी तिथे जायचे ठरवले होते. पण मनात थोडी शंका होती कारण गेली काही वर्षे मी असा ट्रेक केलेला नाही. फार जास्त नसला तरी १० किलोमीटर चालायचे होते. शेवटी निर्धार केला आणि ट्रेक पुर्ण केलाच.

हे एक उंचावरचे पठार आहे. हेरिटेज साईट म्हणूनही त्याला मान्यता मिळालेली आहे. कधी गवताळ प्रदेश, तर कधी घनदाट जंगल असे करत आपण तो ट्रेक पुर्ण करतो. हा ट्रेक तिथल्या नियमाप्रमाणे केवळ आखलेल्या वाटेवरुनच करावा लागतो. ती वाट सोडून जायची अजिबात परवानगी नाही. ( तसे कुणी तिथे बघायला नसते, पण कुणीही असला अघोचरपणा करताना दिसले नाही. ) हा ट्रेक गाईडशिवाय करता येतो ( वाट चुकायची शक्यताच नाही ) तरीपण मी थिवांकाला सोबत घेऊन गेलो.

या ट्रेकमधे एक धबधबा ( बेकर्स फॉल ) लागतो तसेच दोन खास जागा लागतात. एक आहे एंड ऑफ वर्ल्ड ( आणि दुसरी लेसर एंड ऑफ वर्ल्ड ) या जागेवरून ८७० मीटर्स खाली उभा कडा आहे. इथून अप्रतिम नजारा दिसतो.

पण एक गोम अशी कि इथले हवामान अगदी बेभरवश्याचे. कधीही पाऊस पडू शकतो तर कधीही धुके दाटू शकते. खास करून दुपारनंतर असे अचानक हवामान बिघडू शकते, म्हणून सकाळी सातच्या आत तिथे पोहोचणे गरजेचे असते.

नुवारा एलियापासून इथे जायला साधारण २ तास लागतात. रस्ता खुपच वळणावळणाचा आहे आणि सतत चढा आहे. आधीच नुवारा एलियाला येताना आपण उंचावर आलेले असतो आणि तिथून पुढे हा चढ आहे.

ठरल्याप्रमाणे आम्ही पहाटे ५ वाजता हॉटेलमधून निघालो. ब्रेकफास्टचे बॉक्सेस तयारच होते ( चहा मात्र रुमवरच घेतला होता. ) इतक्या पहाटेही रस्त्यावर वाहतूक होतीच. एकदा हॉर्टॉन च्या रस्त्याला लागल्यावर मात्र, समोरून येणार्या गाड्या कमी झाल्या, पण आमच्यासारखेच पहाटे निघालेले बरेच लोक होते.

रस्ताभर धुकेच होते पण अधूनमधून जिथे धुके विरळ होत असे तिथे हिरवा रंग व्यापून असे. शेवटपर्यंत चांगला रस्ता आहे. पार्किंगलाही बरीच मोठी जागा आहे. गाडीतून बाहेर पडायला नको वाटत होते कारण बोचरी थंडी आणि भन्नाट वारा होता.

तिथे रिसेप्शन आहे. काही हॉटेल्सही आहेत. रहायचीही सोय आहे. तिकिट काढून आम्ही आत गेलो. आता सपाटून भूकही लागली होती. हॉटेलमधून जो बॉक्स दिला होता, त्यात सॅडविच, केक, फळे, म्यूसली बार, ज्यूसेस असे बरेच कायकाय होते. सगळे संपवणे अशक्यच होते.

बाहेर सूर्य उगवलेला दिसत होता तरी ढगांचेच साम्राज्य होते. आकाशातही आणि जमिनीवरही. त्या अंधारात मला एक धूसर सांबराची आकृती दिसली. ( त्याने पण मला बहुतेक बघून ठेवले होते कारण नंतर स्वतःहून भेटायला आला. )

इथे वातावरण कधीही बदलत असल्याने उन्हासाठी टोपी, थंडीसाठी स्वेटर आणि पावसासाठी छत्री असे सगळेच जवळ ठेवावे लागते. मी यापैकी काहीच घेतले नव्हते. येईल त्याला तोंड देऊ, अशा निर्धाराने निघालो.

इथे एक छोटी चौकी आहे, तिथे आपले सामान चेक करतात. प्लॅस्टीकच्या बॅगा असल्या तर काढून ठेवाव्या लागतात. पण जेवणखाण असेल तर हरकत घेत नाहीत. पाण्याची बाटलीही जवळ ठेवावी लागते कारण आतमधे पाण्याची सोय नाही. पाण्याच्या बाटलीचे लेबल मात्र तिथे काढून घेतात.

चौकीजवळ आल्यावर मात्र हवामान आश्चर्यकारकरित्या निवळले. अगदी लख्ख प्रकाश पडला. समोर दिसणारा रस्ता खुपच रम्य होता. Rhododendron arboreum र्होडोडेन्ड्रॉन ची फुले जागोजाग दिसत होती ( याला भारतीय नाव आहे ना ? ) यात मी अनेक छटा बघितल्या आहे इथे मात्र गुलाबी रंगाच्याच दोन तीन छटा दिसत होत्या. सिंहला भाषेत या झाडाला अशोका म्हणतात. आपल्याकडे हिमालयात ही झाडे खुप आहेत. तिथे स्थानिक लोक त्याचे सरबत करतात असेही वाचल्याचे आठवतेय.

सुरवातीला दगडी बांधलेला रस्ता आहे, मग मात्र कचा पण रुळलेला रस्ता आहे. आधी आपण एक छोटी नदी ओलांडतो ( तिथे ट्राऊट्स दिसतात, पण ते मूळचे तिथले नाहीत. त्या संबंधी एक माहितीफलक तिथे आहे. ) मग थोड्याच वेळात या रस्त्याला दोन फाटे फुटतात. नेटवर बहुतेकांनी आधी एंड ऑफ वर्ल्ड कडे जाण्याचा सल्ला दिला आहे. पण थिवांकाने मात्र आधी बेकर्स फॉलकडे जाण्याचा सल्ला दिला. त्याच्यामते तसे केल्यास चढ उतार व्यवस्थित विभागले जातात ( ते खरेही आहे )

हा रस्ता आधी माळरानातून जातो. दोन्ही बाजूला रम्य टेकड्या दिसत राहतात. रस्त्याच्या कडेने अनेक रानफुले दिसतात. काही ओहोळही लागतात. त्यांचे पाणी फारच नितळ आहे. ट्रॅक सोडायची परवानगी नाही म्हणून, नाहीतर ते पाणी चाखायची मला खुप इच्छा होत होती.

मग हा रस्ता मधेच गर्द जंगलात शिरतो. दोन्ही बाजूंनी १० फुटाच्या पलिकडचे दिसणार नाही एवढे किर्र रान आहे. डोक्यावर सावली देणारी झाडेही आहेत. आजूबाजूला खसफस, किरकिर, टुकटुक असे आवाज येत असतात पण त्या आवाजाचा मालक मात्र सहसा दिसत नाही.

थोड्याच वेळात धबधब्याचा आवाज येऊ लागतो. हा बेकर्स फॉल. इथे जाण्यासाठी थोडे खाली उतरावे लागते ( पण व्यवस्थित पायर्या आहेत ) या धबधब्याच्या समोरच एक सज्जा आहे. तिथले फोटो देतोच, पण धबधबा बघायचा तर वाहताच बघायला हवा म्हणून एक छोटीशी क्लीपही देतोय. दुसर्या एका बाजूने धबधब्याच्या डोहाकडेही जाता येते पण त्या पाण्यात उतरणे धोक्याचे आहे.

मग आपण तसेच पुढे जात राहतो आणि अचानक जगाचा अंत जवळ येतो. ही जागा खरेच फार रम्य आहे. तिथे थोडा वेळ थांबावेच. बहुतेक जण तिथे सोबत आणलेला डबा खातात. मला तिथे एक माझ्यासारखीच फुलवेडी किवी बाई भेटली. हे बघ इथले फूल बघितलेच का ? ते वरती बघ असे आमचे एकमेकांना सांगणे चालले होते.
तिथे एक रानमेव्याचे झाड होते. त्याची फळे खाल्ली तर चालतात असे तिनेच सांगितले. ती कशी निवडायची ते पण तिनेच दाखवले. मग मी पण हात साफ करून घेतला. या रानमेव्याला चव अशी फारशी नसते, पण तिथे तो उपलब्ध असणे, आपल्या हाताने तोडून तो खाणे यातच मज्जा.

तिथे आम्हा दोघांना फिजिओहा या फळाचे झाड दिसले पण खात्री नव्हती. ( खर्या फिजिओहाची फुले लाल असतात, तिथली गुलाबी होती ) हा आमचा टाईमपास चालला होता कारण समोरची दरी ढगांनी भरली होती. आणि तिथले सर्व पर्यटक ते ढग कधी दूर होताहेत त्याची वाट बघत होते. एखाद दोघे कंटाळून गेलेही. पण बहुतेक जण थांबून राहिले. दहा मिनिटातच ढग दूर झाले आणि खालची गावे स्पष्ट दिसू लागली.

अगदी तळाची गावं, तिथले चहाचे मळे स्पष्ट दिसू लागले. दूरवर एक नदीही दिसू लागली. ( अगदी स्वच्छ हवा असेल तर दूरवरचा समुद्रही दिसतो तिथून ) समोरचा हिरवागार डोंगरही सुंदर दिसत होता. तिथे बराच वेळ रेंगाळलो.

परत घनदाट जंगलात शिरलो. तिथून जरा खाली आणखी एक अशी जागा आहे. त्या वाटेत मधे मधे न्यू झीलंडचा राष्ट्रीय वृक्ष असलेल्या फर्नची मोठी झाडेही दिसत होती
तिथे मला झाडात एक हिरवागार सरडा दिसला (Calotes nigrilabris कॅमेलिऑन नाही... ) पण तो बराच चपळ होता. तिथली
खासियत असणारी निळी माकडेही दिसली पण तिही फोटो काढून घेण्याच्या मुडमधे नव्हती ( फारच माकडचाळे चालले होते ) पण माकडांना खायला द्यायची पद्धत त्यांच्यात नाही आणि माकडांनाही त्याची चटक लागलेली नाही.

या सर्व ट्रेकभर पायाखालच्या मातीचे रंगही सतत बदलत होते. एका ठिकाणी थरावर थर दिसले, वेगवेगळ्या रंगाचे. एकंदरीत हा ट्रेक फार मजेत पार पडला. थकवा अजिबात जाणवला नाही. पाण्याची एक बाटली पुरली. ( एरवी एवढ्या अंतरात मला खुप तहान लागली असती. ) हवामानाचा अजिबात त्रास झाला नाही. आम्ही बाहेर पडल्यावर मात्र परत ढग दाटून आले.

पार्किंगच्या जागेपासून जरा दूरवर मला एका झाडावर जांभळी फुले फुललेली दिसली. ट्रेकमधे जी गुलाबी फुले दिसली होती, त्याच प्रकारची होती. मी त्या टेकाडावर चढून गेलो. नीट अँगल मिळण्यासाठी त्या जाळीतच शिरलो, मनासारखे फोटो काढून झाले तेवढ्यात मागे काहितरी असल्याचे जाणवले. बघतो तर दोन फुटावर एक भले मोठे श्रीलंकन सांबर उभे. माझी कोंडी झाली कारण मागे ती जाळी आणि वाटेवर हा बाबा !

त्याला खायला द्यायलाही माझ्याकडे काही नव्हते. माझ्यावर हल्ला करायचा विचार दिसत नव्हता, ( तशी त्याला शिंगेही नव्हती ) माझ्याकडे रोखून ( प्रेमाने हो ) बघत होता. मला काय वाटले कुणास ठाऊक, मी त्याचे फोटो काढायला सुरवात केली. आणि काय सांगू, तेवढ्यावर खुष होऊन स्वारी निघूनही गेली. त्याच अपेक्षेने आला होता का तोच जाणे.

पार्किंगमधल्या गाडीकडे गेलो. ब्रेकफास्टमधला ज्यूस आणि एक सफरचंद तसेच राहिले होते. ते खाऊ म्हणत डिकी उघडली तर मागे आणखी एक सांबर येऊन ऊभे. याच्या डोक्यावर मात्र व्यवस्थित शिंगे होती. बॉक्समधे केळ्याची साल होती ती त्याला दिली. तर त्याची नजर माझ्या हातातल्या सफरचंदाकडे गेली, मग तेही त्याला दिले. पण त्याचेही फोटो काढलेच.

खुप मस्त वाटत होते. हा ट्रेक तसा कुणालाही जमण्यासारखा आहे. दमवणारे चढ उतार नाहीत. पायात ट्रेकिंग शूज असणे मात्र आवश्यक आहे. आम्ही तो उलट्या दिशेने केल्याने, समोरून येणारे फार दिसत होते. पण त्यातही बहुसंख्य युरोपियनच होते. काही श्रीलंकनही दिसले, पण भारतीय अजिबातच नाहीत.

वाटेत आधी थोटुपाला कंद नावाचे शिखर ( खरं तर तिथे जायचा रस्ता ) लागतो. साधारण तासाभराचा चढ आहे तो. ( श्रीलंकेतील तिसर्या क्रमांकाचे शिखर ) पण माझ्यात तेवढा उत्साह नव्हता. या शिखराचा रामायणात संदर्भ आहे असे तिथे लिहिलेय. थिवांका म्हणाला, रावणाचे विमान तिथे उतरले होते. असेल बॉ, विमान असेल तर विमानतळही असणारच ना. त्यांच्याकडचा हवाईजादा चित्रपट कधी येतो ते बघू या.

पण मी म्हणालो ना कि काही झाडांमूळे मला न्यू झीलंडची आठवण येत होती... पुढचा थांबा तोच होता. म्हणजे अगदी थेट तो देश नाही.. पण मग काय.. ते पुढच्या भागात.
पण झालेय असे कि याच भागात खुप फोटो आहेत, म्हणुन ते अ आणि ब अश्या दोन भागात देतो.

1) Airport of Ravan.. Thotupala kanda

2) Someone is watching

3) Mist

4) And greenery too

5) The Sun was already up there..

6) These flowers are called Asoka in Sinhala language

7) these trees were everywhere

8) Slowly it was getting clear

9) So here we start

10)


11) This creeper wasn’t Bougainville

12 )

13) The trek begins

14) These fish were introduced there… and they spoiled the balance.

15 ) Just a board is enough for all visitors…

16 )

17 )

18)

19)

20)

21)

22)

23)

24)

25)

26)

27)

28)

29)

30)

31)

32)

33)

34)

35)

36)

37) Dustbins were provided.. and they were used and emptied too..

38) so we enter the thick forest

39)

40)

41) Way to Bakers Fall

42 ) ye Nelu Nelu kya hai ?

42) Observatory in front of the fall

https://www.youtube.com/watch?v=Fc4LDx1tRXs clip uploaded by me !

43 )

44) The giant Fern.. New Zealand’s national tree

45 ) Thick moss on a tree


46)

47)

48) How green is my valley… Thiwanka says…


49) These flowers were tiny… couldn’t go near them to get a clear snap.

50)

51)

52) I wish I could taste the water of this stream..

53)

54)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह.. सुंदर.. किती ब्यूटीफुल ट्रेक आहे.. चढाचा आणी १० किमी..म्हंजे तसा खूप सोपा नसणार पण आजूबाजू चं वाईल्ड सौंदर्य पाहात मजेत क्रॉस झालाय..
सांबरा चा धुकाळ फोटो, मस्त मिस्टिरिअस आलाय..

बरंय माकडांना माणसांनी खाऊ ची सवय नाहीये लावलेली , मोठा न्यूसंस वाचला..
आयेम टेंप्टेड टू गो टू श्रीलंका...
त्यांचा हवाईजादा.. Biggrin

आभार...

बी, तिथे झाडांमधे खुप विविधता आहे. त्यामूळे खुप छान वाटते. शिवाय अजूनही बरीच जंगले शाबूत आहेत.

Malaa paN tasech vaaTale hote, paN tyaachee faLe tithalyaa paxyaansaaThee nashechaa padaarth aahe. Kaaraveebaabat tase vaachale naahee.

https://en.wikipedia.org/wiki/Strobilanthes_callosus हि नेलू म्हणजे कारवीचीच चुलतबहीण दिसतेय. पण आपल्या कारवीच्या बिया खाऊन पक्ष्यांना नशा येते का ?

पण सांगू नका...नाहीतर त्यांना चटक लागायची. वाईट सवयी लवकर लागतात !!!

वा!

तिन्ही भाग आज सलग वाचून काढले. सुरेख वर्णन आणि फोटोज्!
(छानपैकी दहा-बारा दिवस रजा काढून श्रीलंकेत फिरून यायचा इरादा पक्का होतोय :))

हे सगळे वाचताना व फोटो पाहताना परीकथेतले वर्णन आहे की काय असे वाटत होते .... Happy

अप्रतिम .... Happy

सुपर्ब..
जेलस ऑफ यु दा..
मला पन जावस वाटतय आता..
काही काही जागा पाहुन वाईल्ड चित्रपटाची आठवण झाली..
आणि तुम्हाला ज्या स्ट्रिम च पाणी चाखावस वाटल ते पाहुन पु ल देशपांडे गार्डन ची Wink

आणि हे काय सांबर चे फोटो नै दिसताय कुठ..तुम्ही तर काढले म्हणताय ना..मग ?

हे सगळे वाचताना व फोटो पाहताना परीकथेतले वर्णन आहे की काय असे वाटत होते >>> शशांकजी याना अनुमोदन ..अतिशय उत्कंठावर्धक लिखाण आहे.

केवढा भरभरुन वरदहस्त निसर्गाने या देशाला दिलाय! प्रत्येक सीन म्हणजे चित्रकाराना आव्हान! Happy