"येडाय का तु?"

Submitted by जव्हेरगंज on 6 September, 2015 - 05:56

कुटीबाहेर रविकिरणांची तांबुस सकाळ पसरली. हरितालिकेचा गाभारा रामप्रहरी दणाणला. तपोवनातल्या वैराग्याचा निद्राभंग झाला. कुटीबाहेर येऊन सुर्यस्नान करत तो उकिडवा बसला.

कुळस्वामीनी कोवळ्या ऊन्हात आन्हिकं उरकत होत्या. गायींच्या गळ्यातल्या घंटा मंद किणकिणत होत्या. कळप घेऊन बालगोपाळ अरण्यात निघाले. कान्हा पण आला असेल त्यांच्यात, मंत्रमुग्ध बासुरी घेऊन. यशोदेला चुकवुन.
पाणवठ्यावर गौळणींची लगबग चालली होती. गोपिका खिदळत बाजाराला निघाल्या होत्या.

वैरागी प्रसन्न मुद्रेनं महाद्वाराकडे निघाला.
द्वापारयुगात इंद्रप्रस्थाचे सिंहासन क्षणभर हेंदकाळले. होमहवनात साधुसंत अविरत मंतरले.
पुरोहितांची दिंडी राजमार्गावर दुमदुमली.

वैराग्याचे भिक्षापात्र सखोल होते. त्याच्या तळाशी गतजन्मीचे वैफल्य साचले होते. प्रधानाकडं सहस्त्रमुद्रांची तो आळवणी करणार होता.

शेजारुन अश्वमेघांचा एक रथ सजुन मार्गस्थ झाला. राजवाडा त्याच्या दृष्टीक्षेपात आला. द्वारावरच्या पहारेकऱ्याने चमकुन त्याच्याकडे पहात आरोळी ठोकली.
"आरं कोण परधान? आन कोंचा राजवाडा? हि मुन्शीपाल्टी हाय,
येडाय का तु? कुटल्या जगात जगतुय?"

लोंबकाळण्याऱ्या माणसांना वाहणारी सिटीबस रस्त्यावर पाहुन वैरागी काळाठिक्कर पडला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

dipti Joshi | 6 September, 2015 - 06:52 नवीन
कथेचा काही सन्दर्भ लागत नाही
>>>>>>
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
व्यनी केलाय.

छान जमलं आहे.

"आरं कोण प्रधान? आण कुठला राजवाडा? हि मुन्शीपाल्टी हाय,
येडाय का तु? कुठल्या जगात जगतुय?"
तत्क्षणी लोंबकाळण्याऱ्या माणसांना वाहणारी सिटीबस रस्त्यावर पाहुन वैरागी काळाठिक्कर पडला.

हे अनपेक्षीत होतं