पातीच्या कांद्याची भाजी

Submitted by योकु on 24 August, 2015 - 12:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- एक पातीच्या कांद्याची जुडी त्यातल्या कांद्यांसकट (८ ते १० नग असतात बहुधा एका जुडीत)
- तेल
- तिखट
- हळद
- मीठ
- हल्दिराम भुजिया सेव चं एक साधारण साईजचं पाकीट

क्रमवार पाककृती: 

- पात + त्याबरोबरचे कांदे स्वच्छ करून बारीक चिरून घ्यावेत
- तेलावर मोहोरी, हळद, लाल तिखट घालून कांदा परतावा. एक वाफ आली की पातही घालून नीट परतावं. मीठ घालावं.
- वाफेवरच भाजी शिजू द्यावी. नीट शिजली की भाजीच्या प्रमाणात भुजिया शेव घालून पुन्हा एकदा परतून भाजी खायला घ्यावी.
- साधा पराठा, तेल लावलेली पोळी याबरोबर ही भाजी चवदार लागते.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसं
अधिक टिपा: 

- मीठ घालतांना जरा जपून. भाजी आक्रसते वाफ धरल्यावर आणि भुजिया शेवेतही बर्‍यापैकी मीठ असतंच.
- पातीचा कांदा फार जून नको, फारच उग्र असतो मग बहुतेकवेळेला.
- बाकी काही मसाला घालायची गरज नाही यात. शेवेचा खमंगपणा मस्त लागतो. पिवळी शेव + हिरवीगार कांदापात दिसायलाही छान दिसतं.
- हवं असेल तर फोडणीमध्ये लसूण परतून घेता येईल.

माहितीचा स्रोत: 
ऑफिसमधल्या कलीगच्या डब्यात खाल्ली होती. त्याला विचारलं तर म्हणाला की आईनी केलीय. मग मी माझ्या अंदाजानी करून पाहिली मस्त होते. करून पाहा. :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योकु शेव संपवायची मस्त आयडीया दिलीस. माझ्याकडे खुप जास्ती लसूण शेव शिल्लक आहे. विकांताला कांद्याची पातही आणलेली आहे. आता आज संध्याकाळी करून टाकतो. झटपट होईल भाजी. सोबत मस्त लिंबू आणि पोळ्या घेतो.

शेवेची आयडिया भारी! मीठ खरंच अगदी हलक्या हातानं घालावं लागेल. भाकरीबरोबरही मस्त लागेल ही भाजी.

खारी बुंदी घालुन पालक आणि थोड़ी मेथी अशी करते मस्त होते.संजीव कपूरची रेसिपी आहे.
आता कांद्याच्या पातीची अशी करीन. छानच होईल.

अरे वा मस्त भाजी.

हेमाताई खारी बुंदी, आयडीया मस्त.

भिजवलेल्या डाळी घालून आपण वेगवेगळ्या भाज्या करतोच. पण तळलेली मुगडाळ, चणाडाळ मिळते. त्या घालुन पण परतलेल्या भाज्या छान होतात. पालेभाज्या, घोसाळे, शिराळे वगैरे.

शेवेची आयड्या भारी, करून बघणेत येईल.

(स्पेसिफिकली हल्दीरामची शेव म्हणजे वैदर्भीय रेसिपी दिसते. :P)

हो छान होतात हेमाताई. डाळ जरा उशीरा घालते म्हणजे खातानापण थोडा कुरकुरीतपणा रहातो आणि विशेष म्हणजे एकदा सहज केलेला हा प्रयोग नव-याला खुप आवडला. मग करते अधुनमधुन. दोन्ही डाळी घालते.

भारी ! डाळीचं पीठ लावून नेहेमी करते पण डाळीच्या पिठाची शेव वापरुन करता येईल हे कधीच सुचलं नाही.
लवकरात लवकर करणार !