Submitted by संतोष वाटपाडे on 5 August, 2015 - 06:50
स्वप्नात तुला बघताना
मी एक कुशीवर निजतो
पाऊस जरीही नसला
तव आठवणींनी भिजतो...
वेचतो ओंजळीमध्ये
प्राजक्त फ़ुले पडलेली
ओठावर जाणवते मज
नाजूक कळी रुतलेली..
मोहरतो बावरतो मी
सावरतो कोसळतो मी
स्पर्शांच्या हिंदोळ्याने
बरसतो नि सळसळतो मी..
मकरंद तुझा ओघळतो
मी भ्रमर होऊनी टिपतो
तू कूस बदलते अलगद
मी मागे सरतो लपतो...
स्वप्नात तुझ्या खांद्यावर
डोके ठेवून मी बसतो
त्या निश्चल समयी मजला
माझा संसार गवसतो...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा