कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे

Submitted by मामी on 24 July, 2015 - 18:46

हा ' माझी उन्हाळ्याच्या सुट्टीतली ट्रीप' या विषयावरील निबंध नव्हे. त्यामुळे मी हे पाहिलं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), ते पाहिलं (आता खालील फोटोंत तुम्हीही पहा), मी हे खाल्लं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), अमेरीकेत जाऊन आल्यानं भारतातील अडचणी कशा ठळक दिसतात (आता तुम्ही या विषयावर भांडा), अमेरिकेत जाऊन आल्यानं अमेरिकेचे दोष कसे अधोरेखित होतात (आता तुम्ही या विषयावर भांडा) हा सगळ्या मुद्द्यांना दुय्यम ठरवण्यात आलं आहे. अर्थात या रसाळ मुद्द्यांचा पूर्ण अनुल्लेख करून त्यांची मजा घालवण्याइतकी मी अरसिक खासच नाही, त्यामुळे पुढे मागे हे मुद्दे आलेच तर होऊन जाऊ द्या!

तर लेखमालेचा मुख्य उद्देश आहे की इतरांना अशी ट्रिप जर करायची असेल तर आम्ही ही ट्रिप कशी आखली याची माहिती आणि उपयोगी पडतील असे (माझ्या अल्पमतीनुसार) काही पॉइंटर्स देणे.

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत अमेरिकेत तेही कॅलिफोर्नियात जाण्याचं ठरवून त्याप्रमाणे माहिती शोधाशोध सुरू झाली. मी आधीही बहिणीबरोबर कॅलिफोर्नियात जाऊन आले होते. पण त्यावेळी सगळी ट्रिप तिनंच आखली होती. (इन फॅक्ट तिच्या या घरबसल्याबसल्या नेटवरून केलेल्या ट्रिप प्लॅनिंगमुळे मी चांगलीच इम्प्रेसही झाले होते.) यावेळी सगळी आखणी आमची आम्हालाच करायची होती.

बेसिक प्लॅन असा होता: लॉस एंजेलिस, डिस्नीलँड (हे लॉस एंजेलिस पासून जवळच असलेल्या अनाहिम नावाच्या भागात आहे.), तिथूनच बस पकडून लास वेगास ( हे साधारण पाच तासाच्या अंतरावर आहे.), लास वेगासहून ग्रँड कॅनियन, मग पुन्हा लॉस एंजेलिस, पॅसिफिक कोस्टल हायवेवरची ठिकाणे बघत बघत दोन रात्री मुक्काम करून लॉस आल्टोस, योसेमिटी नॅशनल पार्क, सॅन फ्रान्सिस्को.

माबोवर अमेरिका, कॅलिफोर्निया आणि तत्सम शब्द सर्चमध्ये देऊन काही माहिती मिळवली. बरंच गुगलूनही झालं आणि मग एक धागाही काढला. ( त्या धाग्यावर कुपर्टिनो की क्युपर्टिनो की कूपर्तिनो यावरून कोणी नम्र भाषेत सुचना न केल्यानं धागा यशस्वी झाला नाही हा माझा दोष नव्हे). तर ते असोच.

एका धाग्यावर गोगांनी आखलेल्या एका टूरचे काही डिटेल्स वाचले. ते ही उपयोगी ठरले.

जाण्याआधी काही गोष्टी ठरवल्या होत्या. एक म्हणजे हाताशी वेळ भरपूर असल्याने जास्तीत जास्त रोड ट्रान्स्पोर्ट वापरायचा. तेवढंच जास्त साईटसिईंग होतं. म्हणजे विमानानं एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यापेक्षा बस वापरायची (हे मुख्यत्वे एले ते लास वेगासकरता). दुसरं म्हणजे, फ्लेक्सिबिलिटी करता म्हणून ट्रीपची सगळीच्या सगळी बुकिंग्ज आधीपासूनच करायची नाहीत. आणि तिसरं हे की, शक्यतो अपार्टमेंट अथवा घर हायर करायचं. अर्थात या करता त्या त्या ठिकाणी निदान आठवडाभर राहणं गरजेचं. यापेक्षा कमी कालावधीकरता व्हेकेशनल रेंटिंग सहसा मिळत नाही.

आधी मारे कार हायर करण्याची स्वप्नं बघत होतो. लायसन्स वगैरेचाही काही प्रॉब्लेम नव्हता कारण कॅलिफोर्नियात भारतातील इंग्लिशमधलं लायसन्स चालतं. पण मुळात दोघांनाही ड्रायव्हिंगचा कंटाळा. त्यात उजवीकडचं ड्रायव्हिंग, अशा ड्रायव्हिंगचा शून्य अनुभव, एलेचा ट्रॅफिक, अमेरिकेतील लांबच्या रोड ट्रिप्सबद्दल स्वतःवर नसलेला भरवसा असे अनेक फॅक्टर्स बघता शेवटी पब्लिक ट्रान्स्पोर्ट आणि टूर्स यांचा सहारा घेण्याचं ठरवलं.

ठरवल्याप्रमाणे सगळी ट्रिप आधी पूर्णपणे न आखता साधारण पुढचे एक दोन टप्पे आखत गेलो. त्यामुळे बरीच फ्लेक्सिबिलिटी राहिली. शिवाय काही गोष्टी शेवटपर्यंत नक्की होत नव्हत्या. त्यामुळे आधीपासून खूप काटेकोरपणे बुकिंग्ज वगैरे केली नाहीत हे बरंच झालं. अर्थात याचा थोडाफार तोटाही झाला.

आमच्या ट्रीपदरम्यान बीएमएमच्या निमित्ताने सिअ‍ॅटलला राहणारी बहिण एलेमध्ये येणार असंही कळलं. तिनेही बीएमेम नंतर आमच्यासकट एले ते सॅन फ्रान्सिस्को अशी पॅसिफिक कोस्टल हायवे ची रोडट्रिप करण्याचं ठरवलं. त्यामुळे या रोडट्रिपपुरता ड्रायव्हर मिळाल्यानं कार घेण्याचं ठरलं. पुढे तिनंही तीन आठवड्याची सुट्टी काढली आणि मग कार हायरचा कालावधी वाढला. ते पुढे येईलच.

तर येणार येणार म्हणताना अखेर तो दिवस आलाच......

भारतातून ३ जूनला निघालो. विमानाचं मुंबई-एले आणि एले-मुंबई बुकिंग http://www.goibibo.com तर्फे केलं होतं. तसंच https://www.airbnb.co.in/ या साईटवरून एलेच्या अपार्टमेंटचं बुकिंग केलं होतं. हे अपार्टमेंट बुक करताना नेटवर वाचून साधारण कोणता एरीया चांगला याची माहिती घेतली. http://www.tripadvisor.in/ या साईटवर चांगली चर्चा वाचायला मिळाली. शिवाय हाताशी कार नसल्याने सबवे स्टेशन, बस स्टॉप पासून जवळ, साधारणपणे प्रेक्षणीय स्थळांपासून जवळ हे ही घटक लक्षात घेणं गरजेचं होतं. ही प्रोसेस जरा मोठीच होती. पण हॉलिवुड बुलेवार्डला हॉलिवुड-व्हाईन स्टेशनच्या अगदी जवळ एक छान २ बेडरूमचं अपार्टमेंट मिळालं. एलेमध्ये बसस्टॉप्स स्टेशन जवळ आणि प्रत्येक मेजर रस्त्यांच्या क्रॉससेक्शनला आहेत. भर म्हणून एले विमानतळापासून निघणारी फ्लाय-अवे बस अगदी घरासमोर येऊन थांबली. हा बोनसच होता. हॉलिवुड बुलेवार्डला अगदी रात्रीही व्यवस्थित रहदारी होती, शेजारीच पँटाजेज हे थिएटर असल्याने उशीरापर्यंत वर्दळ असे. थोडक्यात, हवा होता तसा सेफ एरीया मिळाला.

एलेमध्ये साधारण आठवडाभर राहून मग डिस्नीलँडच्या रिझॉर्टमध्ये जाऊन रहायचे असा आणि इतपत प्रोग्रॅम भारतातूनच ठरवला गेला. डिस्नीलँडहून बसनं लास वेगासला जाण्याचेही ठरवले होते. अर्थात डिस्नीच्या आणि त्यापुढच्या प्रोग्रॅमच्या तारखा ठरवल्या नव्हत्या आणि त्यामुळे बुकिंगही केलं नव्हतं.

लास वेगासहून अनेक टूर्स ग्रँड कॅनियनला जातात. त्यापैकी एखादी सुटेबल टूर घेण्याचं ठरवलं होतं. या टूर्सपैकी एक दिवसाची की ओव्हरनाईट की दोन रात्रींच्या मुक्कामाची की हेलिकॉप्टर टूर असे अनेक ऑप्शन्स बघत होतो. नक्की काहीच ठरवलं नव्हतं. लास वेगासला (गेला बाजार एलेला) जाऊन ठरवू असं मनात होतं. पण इथून निघायच्या आठवडाभर आधीच एक फॅमिली फ्रेंड भेटायला आला. तो नुकताच कॅलिफोर्नियाची टूर करून आला होता. त्याने ग्रँड कॅनियन एक दिवसात न उरकण्याचा सल्ला दिला आणि शक्यतो आतमधीलच लॉजमध्ये राहण्याचाही सल्ला दिला. झालं..... मग त्या दृष्टीनं सर्च सुरू झाला.

सगळ्या टूर कंपन्या नॅशनल पार्काबाहेर दोनेक मैलांवर असलेल्या हॉटेलात उतरवतात, त्यामुळे तशी टूर घेण्याचा ऑप्शन आता बाद झाला होता आणि आता हे बुकिंग आमचं आम्हालाच करावं लागणार होतं. अर्थात टूर न घेतल्यानं लास वेगास ते ग्रँड कॅनियन हा प्रवास कसा करायचा असा एक वेगळा प्रश्न उभा रहात होता. तो तूर्तास बाजूला ठेवला आणि ग्रँड कॅनियनच्या बुकिंगवर लक्ष एकत्रित केलं.

ग्रँड कॅनियनमध्ये ५ की ६ लॉजेस आहेत. पण भर समर सिझनमध्ये आयत्यावेळी आम्हाला कोण बुकिंग देणार होतं? तरीही नशीब आजमवायचं ठरवलं. यावापाई लॉजमध्ये थोडीफार बुकिंग्ज अव्हेलेबल दिसत होती. मग एलेमधले काही दिवस + डिस्नेमध्ये ४ रात्री + लास वेगास मध्ये ३ रात्री आणि मग ग्रँड कॅनियन असा हिशोब करून इथे असतानाच १८ तारखेचं यावापाई लॉजचं बुकिंग मिळत होतं ते करून टाकलं. आता हे बुकिंग मिळाल्यावर एकच रात्रं काय रहायचं इतक्या सुंदर जागी? असा विचार मनात बळावत चालला. यावापाई मध्ये १७ किंवा १९ चं बुकिंग मिळत नव्हतं. पण पुढचं पुढे पाहू म्हणत सतत सगळ्या लॉजेसमध्ये जागा शोधत रहायचं असं ठरवलं. कदाचित कोणी आयत्यावेळी कॅन्सल केलं तर मिळेल असा आशावादी विचार मनात ठेऊन शोधाशोध सुरूच ठेवली. अगदी काही नाही तर एक रात्र राहून परत येण्याची तयारी होतीच.

बरं या सगळ्या घडामोडीत अजून एक गोष्ट पार्श्वभूमीवर होतीच... बहिणीला सुट्टी कधी मिळणार? तिचा प्रोजेक्ट संपणार असेल तर नविन प्रोजेक्ट जॉईन न करता ती गॅप घेणार आहे का? मुळात प्रोजेक्ट संपणार आहे का? प्रोजेक्ट संपला तरी बीएमेमच्या नाटकाच्या प्रॅक्टिस मुळे ती येऊ शकणार नाहीये का? बीएमेम मध्ये तिचं नाटक नक्की कोणत्या दिवशी आहे? (ते नंतर काही दिवसांनी ३ तारखेला असल्याचं कळलं). त्यामुळे ४ तारखेला पीसीएच करता कूच करायचं हे नक्की झालं. बरं ती नक्की कोणत्या आणि कोणत्या कोणत्या टप्प्यांवर आमच्याबरोबर असणार आहे हे न कळल्यामुळे पुढची अपार्टमेंट बुकिंग्ज आधी करता येईनात. ती आणि तिची फॅमिली जर येणार असतील तर मोठं घर लागणार होतं.

भारतातून निघताना ही स्थिती होती : मुंबई-एले आणि परतीची विमानतिकिटं, एलेचं अपार्टमेंट आणि ग्रँड कॅनियनचं १९ तारखेचं बुकिंग! अशा या तुटपुंज्या शिदोरीवर निघाली की मंडळी !!!!

(क्रमशः)

पुढचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, आता मी तुमच्या सोलिड्ड मागे लागणार हां!!! सध्या मी पण planning या स्टेज ला आहे. आणि तुमचा हा धागा...अगदी मुँह माँगी सौगात मिळाल्यासारखं वाटतंय मला!!

मस्त वर्णन!!! पुढल्या सगळ्याच भागांच्या दारुण प्रतीक्षेत!!!

हा धागा चालु केल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वर्षी ३ आठवड्याची west coast Trip करायची असे सध्या तरी ठरवले आहे. त्यामुळे तुमच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.

पहिलाच पॅरा.... मामी चं सिग्नेचर ईश्टाईल लिखाण.. मस्त Lol

मामे , रिअली ब्रेव प्लॅन.. प्रवासदेवतेच्या कृपेने सफल झालेला.. लिही पटापटा आता.. फिर आगे का हाल...

लिखाणाची स्टाईल मस्तच आहे. पुढच्या भागांत काय काय असेल याची उत्सुकता लागून राहिली आहे.
पटापट लिही पुढचे भाग.

मामे, भेटते सांगून टांग दिलीस ते पण लिही यात >>> ऊप्स ही कमेंट राहिलीच की!

रमडे, सॉरी हा. अगं इतक्या सगळ्या गदारोळात राहूनच गेलं बघ. आता तूच ये मुंबईत मला भेटायला.