मागिल भाग म्यानमा -६ http://www.maayboli.com/node/54449
म्यानमा - ७
म्यानमार मधल्या शेवटच्या मुक्कामी इनले लेक ला जायला आता निघालो होतो. बगॅनहून हेहो (heho) इथे जाणारी फ्लाईट मँडलेला थांबली आणि मँडले नं बघता सोडून दिल्याची खंत परत एकदा वाटली. माझ्या मूळ आराखड्यामध्ये मँडले घेतले होते पण अधिक माहिती काढतांना असे लक्षात आले की ज्या मँडले पॅलेसच्या जेल मध्ये टिळकांना कैदेत ठेवले होते तो भाग मिलीट्रीच्या ताब्यात आहे, जिथे आत जायची परवानगी मिळत नाही. या मॅंडले राजवाड्याचा फक्त काही भागच प्रवाशांना बघता येतो. अर्धा उत्साह तिथेच गळून पडला..उरला सुरला मँडलेचे फोटो बघतांना गळाला. एक दोन स्तूप आणि एक यु-बेन ब्रिज या शिवाय तिथे जास्त काही नव्हते. येंगॉन, बगॅनमध्ये स्तूप आणि मंदिरदर्शन भरपूर होणार असल्याने मँडलेत जाण्याऐवजी मी इन ले लेक भागातला एक दिवस आणखी वाढवला.
हेहो विमानतळापासून नुआंगश्वे गाव एक तास दूर होते. विमानतळा बाहेर टॅक्सीवाले चढे भाव सांगत होते. तिथून गावात जायला बसची सोय पण नव्हती. माझी चलबिचल बघून एक टॅक्सीवाला म्हणाला, शेअर मधे चालणार असेल तर आणखी दुसरे कोणी बघतो. पहा म्हटले लगेच. पाच दहा मिनीटांत तो एका फिरंगी जोडगोळीला घेऊन आला. पुढचा एक तासाचा प्रवास डोंगर घाटातून रमत गमत झाला. टॅक्सी शेअर करणारे कपल ऑस्ट्रेलियाचे होते. ते देखिल बगॅनहून इथे येत होते. नवरा स्टीव गप्पिष्ट असावा. त्या आधी ते कंबोडियाच्या अंगकोर मंदिरांमधे जाऊन आलेले. म्यानमार सरकारने बगॅनची पुरेशी प्रसिद्धी केली तर येत्या काही वर्षात बगॅन अंगकोर पेक्षाही जास्त गर्दी खेचणारे ठिकाण होईल असे त्यांचे म्हणणे पडले. मला म्हणाला बगॅनमध्ये एक मुलगा माझ्या खूप मागे लागला खडे घेण्यासाठी. किंमत विचारली तर म्हणाला तुझे घड्याळ दे, त्या बदल्यात हे पाच सहा माणिक असलेली पुडी तुला देतो. ते माणिक खरे का खोटे माहित नाही पण माझे घड्याळ सेल मध्ये १० डॉलरला घेतलेले, त्यामुळे घड्याळ देऊन माणिक घेऊन टाकले.
नुआंगश्वे हे एक प्रकारे तालुक्याचे गाव. इथून कालव्यातून बोटीने पुढे इनले लेक ला जायचे. नुआंगश्वे मध्ये राहून दिवसभराची बोटट्रिप करून हॉटेलवर परतता येते किंवा इनले लेकच्या काठाशी रिसोर्ट आहेत तिथेही राहता येते. रस्त्यावर भरपूर ट्रॅव्हल एजंटांनी आपली ऑफिसे थाटली होती, पैकी एका पिझ्झा रेस्टॉरंट शेजारच्या ट्रॅवल एजंटचे नाव एका बॅकपॅकर वेबसाईटवर सुचवलेले होते. तिने इनले लेकचा नकाशा दाखवत लेकमध्ये आणि लेकच्या काठाशी काय काय बघता येईल याची नीट माहिती दिली. त्यातल्या मोनॅस्ट्रींना काट मारून बाकी ठिकाणे दाखव असे मी तिला सुचवले. मला इनले लेकचा निसर्गरम्य भाग आणि काठावर वसलेली गावे बघायची आहेत, शॉपींग करण्यात मोनॅस्ट्री बघण्यात रस नाही याची तिला कल्पना दिली. तिने ते सगळे त्यांच्या भाषेत नौकाचालकाला समजावून सांगितले. त्याला इंग्लिश येत नाही हे मला सांगितले पण बरोबर ठिकाणी घेऊन जाण्याची खात्री दिली.
आजच्या उरलेल्या अर्ध्या दिवसात इनले लेकचा सुरूवातीचा भाग आणि इंडेन हे गाव दाखवून न्यु मी (नौकाचालकाचे नाव) मला परत नुआंगश्वेला परत आणणार होता.
नुआंगश्वेच्या जेट्टीतल्या होड्यांच्या गर्दीतून आमची होडी बाहेर काढून आमचा प्रवास सुरू झाला. नुआंगश्वेला इनले पाशी जोडणारा कालवा म्हणजे नौकाचालकांसाठी हायवे होता जणू. मागे इंजीन लावलेली आमची होडी इन ले लेकच्या दिशेने सुसाट निघाली होती. कालव्याच्या दोन्ही बाजूला भाताची शेते होती. मधूनच नारळाची केळीची झाडे आणि त्याच्या सोबत लहान मोठ्या झोपड्या.
१.
२.
३.
या कालव्यातून होडी इनले लेक मध्ये शिरताच नाटकातल्या सारखा दृष्यबदल झाला. नजर जाईल तिथवर पाणीच पाणी. मघाचे गढुळलेले गायब, त्याजागी इथे निळेशार. क्षितीजापाशी डोंगरांची माळ. तळ्यात अनेक कोळी आपापल्या लहानशा होड्या घेऊन मासेमारी करतायत. बहुतेकांच्या डोक्यावर उन्हापासून रक्षण करणारी वेताने विणलेली टोपी. एकेकटे मासेमारी करत असल्याने पायाने वल्हवायचे आणि हातांनी जाळे फेकून मासे पकडायचे कसब अफलातून होते. काही जणांकडे मासे पकडायचे एक वैशिष्ट्यपूर्ण कोनाच्या आकारातले जाळे होते. त्या जाळ्यात त्यांना मासे आणि मला आणखी सुरेख फोटो मिळत होते.
४.
५.
६.
७.
पुढे जाऊ लागलो तसे त्या तळ्याला रस्ते फुटले. डावीकडून उजवीकडून पुढच्या वेगवेगळ्या भागात जाता येणार होते. उजव्या बाजूला होडी वळवत न्यु मीने इंडेन गावाच्या काठावर होडी आणली. लहानसे खेडेगाव होते. समोर एक पटांगण, त्याच्या बाजूला एक शाळा...घरांपेक्षा सुवनिअर शॉप्स जास्त होती. समोर जाऊन एका लहानशा टेकडीवर सतराव्या शतकातले शेकडो लहान लहान स्तूप होते. ज्याचा आता सरकार 'जिर्णोद्धार' करत होते.
८.
९.
१०.
११.
१२.
परतीला सुर्यास्ताची वेळ झाली होती. कोळीलोक, पक्षी आणि प्रवासी सगळे आपापल्या आसर्याला परतत होते.
१३.
१४.
१५.
दुसर्या दिवशी पहाटे नुआंगश्वेचे हॉटेल सोडले आणि सामानासकट होडीतून इनले लेकच्या दक्षिण दिशेला असलेल्या लेक रिसोर्ट कडे निघालो. इतक्या भल्या पहाटे मासेमार आपल्या कामाला लागले होते. धुक्याआड धुसर झालेली त्यांची घरे आणि त्या समोर शांतपणे होडी वल्हवत जाळी सोडून बसलेले कोळी. सुर्योदय झाला तसा सगळा आसमंत सुवर्णझळाळीने नाहून निघाला. तळ्यातले पाणी सुद्धा सूर्यकिरणे विरघळून सोनेरी झालेले.
१६.
१७.
१८.
१९.
आता न्यु मी ने होडी थोडी किनार्याकडे घेतली. बांबूच्या कुंपणांवर पक्षांची शाळा भरलेली. त्या पलिकडे होडीत भाजीपाला भरून कुणाची आठवडी बाजाराला निघण्याची गडबड चाललेली. तर कोणी घराच्या आत चूल पेटवून घरकामाला लागलेले.
२०.
२१.
२२.
२३.
२४.
२५.
२६.
एखादे गाव जसे जवळ येई तसे पाणी पुन्हा गढुळ होत होते. बांबूचे खांब तयार करून गावागावात वीज पोचवली होती. एका रेशीम हातमाग केंद्रापाशी होडी थांबली. हे रेशीम बनत होते कमळाच्या देठातल्या धाग्यापासून. एरवी कुणी सांगितले असते तर विश्वास ठेवला नसता पण इथे प्रत्यक्ष बघायला मिळाले. कमळधाग्या शिवाय रेशमाचे आणखी पण अनेक प्रकार. एक प्रकार इतका मऊ मुलायम की लहानशा अंगठीमधून साडी एव्हडे कापड आरपार. ढाक्याची काडेपेटीत मावणारी ती प्रसिद्ध मलमल नक्कीच या रेशमाची बहिण असणार.
२७.
२८.
२९.
३०.
३१.
३२.
जेवणासाठी न्यु मी ने जवळच्या एका तळ्याकाठच्या रेस्टॉरंटकडे होडी वळवली. इन ले लेक हे म्यानमारच्या शान स्टेट मध्ये आहे. हे शान राज्य सगळ्या बर्मात चविष्ट जेवणासाठी प्रसिद्ध. मुख्य म्हणजे त्यांच्या अन्नाची चव आपल्या चवीशी मिळती जुळती. सॅलड्स वर तिळ आणि दाण्याची फोडणी. चिकन, नुडल्स मध्ये मसाले जरा सढळ हस्ते वापरलेले. पोटभर जेवण करून सुस्तावलो.
३३.
३४.
वेगवेगळ्या पाणरस्त्यांतून आमची होडी पुढे जात होती. थोडे समोर पाण्यातच एक मोठे प्रवेशद्वार लागले. हे चक्क मला जिथे राहायचे होते ते रिसोर्ट होते. सगळे रिसोर्ट तळ्यात. जी काय बाहेरच्या जगात जा ये करायची ती होडीतून. खोली म्हणजे शेजारी शेजारी असलेली लाकडी कॉटेजेस होती. खोली नको इतकी मोठी होती. मच्छरदाण्या वगैरे सरंजामाने लहानपण आठवले.
३५.
३६.
संध्याकाळी होण्या आधी पुन्हा एकदा बाहेर पडलो. पुढच्या भागात तळे अतिशय निमुळते झाले होते. काही ठिकाणी तर जलपर्णीने सगळे तळे व्यापले होते ज्यातून बोट कशी हाकणार याची चिंता वाटे पण न्यु मी सराईतपणे त्यातून मार्ग काढत असे. संध्याकाळ ही बहुतेक इनलेवासियांची आंघोळीची वेळ होती. दर काही अंतरावर लोक स्नानसंध्या उरकत होते. अशावेळी टुरिस्ट बनून होडीतून हिंडण्याचा मला जबरदस्त संकोच वाटू लागला. पण आता इलाज नव्हता. याच भागात दोन किनार्यांना जोडणारे लहानलहान बांबूचे पूल होते. एक टिचकी मारली तर पडून जाईल असे वाटावे.
३७.
३८.
३९.
४०.
४१.
४२.
सूर्य ढळू लागला तशी आजूबाजूची जिवंत हालचाल नाहिशी होऊ लागली. मी पण न्यु मीला होडी परत हॉटेलकडे वळवायला सांगितली. माझ्या खोलीबाहेर पक्षांची संध्याकाळची सभा अजून संपली नव्हती. उद्या दुपारी माझा परतीचा प्रवास सुरू होणार होता. न्यु मी ला उद्या सकाळी परत न्यायला ये सांगून बाल्कनीत बसून राहिलो. काहीवेळाने समोरचे पाणी, डोंगर सगळे काही अंधारात लुप्त झाले. रात्री कॅमेर्यात गेल्या आठवडाभराचे फोटो बघता बघता पुन्हा एकदा एक एक दिवस आठवू लागला. आठ नऊ दिवसांत जे काही अनुभवले ते अतुलनिय होते, पुरेपूर तृप्त करणारे. तरीपण पावसाळ्यातले बगॅन....बलून राईड...हुकवलेले मँडले हे सगळे बघायचे आहे. हे राहून गेलेले अनुभव घ्यायला मला पुन्हा इथे परत यायचे आहे...अगदी नक्की.
*समाप्त*
सुंदरच झाली हि मालिका !
सुंदरच झाली हि मालिका ! कमळाच्या देठात बिसतंतू असतो हे माहीत होते पण कधी बघितले नव्हते.
सुंदरच फोटो.
मस्त
मस्त
सुंदर आणि फोटोंनी तर अजुनच
सुंदर आणि फोटोंनी तर अजुनच रंगत आली
सुंदर फोटोज आणि माहिती !
सुंदर फोटोज आणि माहिती !
संपलीपन एवढ्यात या भागामधील
संपलीपन एवढ्यात
या भागामधील एकुण एक प्रचि सुपर्ब..
संपुर्ण लेखमालिका म्यानमा या नावाने आणि अंतिम भाग म्यानमार..असे का ?
फोटो बघूनच डोळ्यांचे पारणे
फोटो बघूनच डोळ्यांचे पारणे फिटले.
आता लेख सावकाश वाचायला लागेल.
धन्यवाद, इतक्या अपरिचित देशाची इतकी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल.
ऑस्सम!!! गुंगवून टाकणारे
ऑस्सम!!! गुंगवून टाकणारे फोटोज आलेत, अगदी एक से बढकर एक!!!
बर्मा कडे नेक्स्ट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून पाहायची दृष्टी , या मालिके मुळे मिळालीये!!
आणी.. बर्मा हा फक्त एकच देश आहे जिथे लोटस स्टेम फायबर पासून सिल्क बनवले जाते.. फार नाही ,या परंपरेला शंभरेक वर्षांपूर्वी पासून सुरुवात झाली!!
संपली यात्रा ???
ह्या भागातले फोटो सगळ्यात
ह्या भागातले फोटो सगळ्यात जास्त आवडले.
सुंदर झाली मालिका
मस्तच.
मस्तच.
एकदम झकास... फोटो तर कमालीचे
एकदम झकास... फोटो तर कमालीचे सुंदर आलेत.. पोस्ट प्रोसेसिंग केलेले वाटत तर नाहीयेत.
अप्रतिम. मी एकदा बेत केला
अप्रतिम. मी एकदा बेत केला होता बर्माला जायचा पण तो रद्द करावा लागला कारण त्यावेळी तिथे कसलातरी भयाणक संप सुरु होता.
काय फोटो आलेत एकेक, वा वा
काय फोटो आलेत एकेक, वा वा !
सुरेख मालिका आणि या शेवटच्या भागाने अगदी कळस गाठून सांगता झाली आहे. इमारती, रंग, पर्यावरण किती नेटकं दिसतंय सर्व.
धन्यवाद, इतक्या सुंदर देशाची
धन्यवाद, इतक्या सुंदर देशाची तितकीच सुंदर ओळख करून दिल्याबद्दल
अप्रतिम
अप्रतिम
छान लेखमालिका.
छान लेखमालिका.
अप्रतिम
अप्रतिम
मस्तच...
मस्तच...
संपुर्ण लेखमालिका म्यानमा या
संपुर्ण लेखमालिका म्यानमा या नावाने आणि अंतिम भाग म्यानमार..असे का ?
इतके दिवस तिथे असल्याने त्यांच्या प्रमाणे त्यांच्या प्रथेप्रमाणे आणी आता परतीचे वेध मग आपल्या प्रमाणे .
अर्रे! बेश्टच!! हा भाग (फोटो)
अर्रे! बेश्टच!!
हा भाग (फोटो) सर्वात जास्त आवडले!
सुंदर लेखमालिका!! अप्रतिम
सुंदर लेखमालिका!!
अप्रतिम फोटो!!!
अप्रतिम सगळे भाग . मी या
अप्रतिम सगळे भाग . मी या वर्शिच बर्मा चा प्लन करत होते . मस्त माहिति मिळालि.
खूपच सुंदर मालिका! एकदम नवीन
खूपच सुंदर मालिका! एकदम नवीन प्रदेश आणि त्याची सचित्र अप्रतिम ओळख! धन्यवाद!
एक से एक फोटो आहेत आजच्या
एक से एक फोटो आहेत आजच्या भागातले !
इतके छान फोटो इथे दिल्याबद्दल
इतके छान फोटो इथे दिल्याबद्दल धन्यवाद. घरबसल्या ब्रह्मदेश फिरवुन आणलात की.... थ्यान्क्स अगेन. आता आधिचे धागे एक एक करीत बघतो.
सर्वांना धन्यवाद. टीना, जेम्स
सर्वांना धन्यवाद.
टीना, जेम्स बाँड चूक सुधारली आहे.
खूप सुंदर मालिका, फोटो तर
खूप सुंदर मालिका, फोटो तर खल्लास आहेत. तुमच्यामुळे हा देश थोडाफार तरी समजला. धन्यवाद.
ती खरच चुक होती होय.. मला
ती खरच चुक होती होय..
मला जेम्स बाँड चा प्रतिसाद वाचुन वाटल की कन्व्हींस होउन जाव कि काय
मस्त झाली ही मालिका. ह्या
मस्त झाली ही मालिका. ह्या भागातले फोटो खूप आवडले.
वा सुंदर मालिका., या भागातले
वा सुंदर मालिका., या भागातले फोटो तर खासच
टीना, जेम्स बाँड चूक सुधारली
टीना, जेम्स बाँड चूक सुधारली आहे.
मी ते चुक आहे अस समजुन मुळी तो प्रतिसाद दिलाच नव्हता. मी वर म्हटलय तसच मला वाटल्याने लिहीले होते.
कृपया गैरसमज नसावा.
Pages