(हा ट्रेक करताना पाऊस व धुक्याचे प्रमाण प्रचंड असल्याने फोटो काढणे शक्य झाले नाही. तरीही फोटोंची कमी भरून काढण्यासाठी लेखनाच्या पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण भटकंती मायबोलीकरांच्या डोळ्यासमोर चितारण्याचा प्रयत्न केला आहे.)
पावसाची थोडीफार का असेना सुरूवात झाली होती, बरेच दिवसापासून आमच्या जुन्या ग्रुप चा ट्रेक काही ठरत नव्हता. मग तोंड पुस्तकावर सर्व जुन्या भिडूंना आवाहन केले, चांगला प्रतिसाद मिळाला.नेहमीप्रमाणे ७-८ जण तयार झाले व त्यातले काही मोक्याच्या वेळी टांगारू झाले, उरलो आम्ही ४ आणि ट्रेक ठरविला नाणे घाटातून चढाई करून भोरांड्याच्या दारातून खाली उतरायचे.
भोरांड्याचे दार ही वाट करायची हे, खुप दिवसापासून मनात होते पण योग येत नव्हता. या वेळी ते ठरविले, पण या वाटे बद्दल कोणाला काही जास्त माहीती नाही. फारच कमी हौशी ट्रेकर व काही गावकरी इथून ये जा करतात, अन्यथा सर्वच सरळमार्गे नाणेघाटातून येणे पसंद करतात.
ठरल्याप्रमाणे सकाळी ६ वाजता मी, निखिल आहिरे, मयुर पुणतांबेकर आणि उत्तम शिंदे कल्याण बस स्थानकात शिरलो. प्रचंड अस्ताव्यस्थता, घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी, साफ सफाईचा पार बोर्या वाजला होता. ते पाहून कल्याण बस स्थानक प्रशासन व एस टी महामंडळबद्ल काय वाटले ते सांगायला नको.
लगेचच माळशेज घाट मार्गे जाणार्या कल्याण - शिवाजीनगर एस टी त बसलो, दोन-अडीच तासात नाणेघाट फाटा उतरलो. वातावरणात बर्यापैकी गारवा होता, आजुबाजूला डोंगरांनी हिरवळ धारण करायला सुरूवात केली होती. हिरवा रंग, समोर असलेला सह्याद्री चा कातळ त्यावर पावसाचे दाटून आलेले काळे ढग. एकंदरीत मस्तच माहौल तयार झाला होता. या आधीही नाणेघाट झाल्यामुळे, काही अडचण न येता, आरामात रमत गमत, जुन्या ट्रेकच्या गप्पा टप्पा करत अडीच - तीन तासात नाणेघाटाच्या गुहेत पोहचलो.
प्राचीन सातवाहन कालीन नाणेघाट हा व्यापारी मार्ग सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी तयार केला असावा. सातवाहन कालीन राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचे पैठण अऩ कोकणात कल्याण व सोपारा ही जुनी बंदरे जोडण्यासाठी, जुन्नर जवळ डोंगर फोडून हा मार्ग केला गेला दगडी पायवाट, वाटेत असणारी पाण्याचे टाके, विसावा घेण्यासाठी गुहा तसेच व्यापार्यांकडून जकात जमा करण्यासाठी रांजण आज ही हे सर्व इथे पहायला मिळते. ( या बद्दल भरपूर माहिती ट्रेकींगच्या पुस्तकात व आतंरजालावर आहे )
जरा वेळ गुहेत विसावलो, पहातो तर लगेच ढगांची गर्दी जमु लागली आणि रिमझिम पावसाला सुरूवात झाली. गुहेच्या बाहेर आल्यावर डाव्या हाताला पाण्याची टाकी आहेत समोरच आणि वरच्या अंगाला काही लहान गुहा आहेत, थोडी फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न केला.नंतर घरून आणलेला जेवणाचा डब्बा खाऊन बाहेर पडलो. मध्येच माबोकर जिप्सी बरोबर भेट झाली. भेटून आनंद झाला.
पावसाची बारीक उघडझाप चालू होती आणि धुक्याचे लोट ये जा करत होते. एकंदरीत वातावरण खुपच छान झाले होते. सरळवर पठारावर दाखल झालो समोरच धुक्यात लपलेला जीवधन दिसला. नानाच्या अंगठ्यावर गेलो इथे पण धुके ये जा करत होते. धुके हटल्यावर खाली दुरवर कोकणात वैशाखरे, टोकावडे ही गावं दिसली. उत्तरेला भैरवगडाचे हलकेसे दर्शन झाले. तर दक्षिणेला धाकोबा, दुर्ग, आहुपे घाटाचा कडा व गोरख मच्छिंद्र अधुन मधुन दिसत होते.
पठारावर बरीच गर्दी जमु लागली होती, तिथेच घाटघर गावातील दोन स्थानिक तरूण भेटले. थोड्या बोली चाली नंतर त्यांना विचारले, "आम्हाला भोरांड्याच्या दाराने खाली उतरायचे आहे वाटेबद्दल सध्याची स्थिती कशी आहे ?" कारण पावसाचे सुरूवातीचे दिवस वाटेबद्दल खात्री करून घेतलेली बरी. नाणेघाटाच्या उजव्या बाजूला एका टेपाडच्या बाजूने एक सरळ वाट खाली उतरते तिलाच भोरांड्याचे दार म्हणतात. खाली उतरून भोंराड्यात अथवा मोरोशीत जाता येते. पाऊस एव्हाना चांगलाच बरसु लागला होता त्यात धुकेही वाढत होते. शेवटी त्यांच्यापैकी एकाला आम्ही विचारले, " तूच चल आम्हाला घाटाच्या तोंडापर्यंत / दारापर्यंत वाट दाखवायला." कारण आम्ही चौघेही पहिल्यांदाच तिथून जाणारे, दुपार झालेली पाऊस आणि त्यात धुके. या वातावरणात पठारावर आम्ही जर वेळ घालविला असता तर पुढचे गणित अवघड झाले असते.
थोड्या वाटाघाटी नंतर एक जण तयार झाला, नाव - गणेश लोखंडे. वाटेतल्या एका झापातून छत्री घेऊन आमच्यापुढे चालू लागला. आपल्या मोबाईलवर लाऊड स्पीकर ने ९० च्या दशकातील कुमार शानु, नदिम श्रवण ची गाणी ऐकत ऐटीत चालला होता. यामुळे आमचे आणि त्याचे बोलणे यात गोंधळ उडत होता. एक गोष्ट चार वेळा विचारल्यावर त्याला ते समजायचे पण गाणी महत्वाची असो तर...
पठारावरील करवंदे खात खात असंख्य खेकड्यांची बिळे चुकवत अर्धा तासाच्या चालीनंतर भोरांड्याच्या दारापाशी आलो.ती उतरती नाळ बघून मला तर त्रिगुणधारा- डोणीदार घाटाची आठवण आली.
परत धुके जमायला सुरूवात झाली, खाली दरीत काहीच स्पष्ट दिसत नव्हते. बर्यापैकी खडी उतरण नाळेतले मोठ मोठाले धोंडे आणि दगडी. साधारण पणे उतरताना हा ओढा उजव्या हाताला असावा, ही थोडी माहिती होती. वाट थोडी डावीकडून पुढे सरळ खाली उतरून, ओढ्याच्या साथीने एका पुलाजवळ मुख्य मुरबाड माळशेज रस्ता आहे तिथे निघते. तिथेच 'भोरांडा द्वार वॉटर फॉल' हा बोर्ड लावला आहे.
सरळ दिशेला न चुकता गेलात तर एका तासात उतरून जाल. असे तो गणेश म्हणाला. मी आणि निखिल ऐकेमेंकाकडे पाहत राहिलो. त्याचे आभार मानून आम्ही हळुहळु वाट उतरायला लागलो, नाळेत पाऊल टाकताच टपाटप पावसाला सुरूवात झाली.काही मिनिटातच पाऊस धो धो कोसळु लागला व धुके दाट होऊ लागले. नाळ बर्यापैकी तीव्र उताराची होती, खाली मोठाले दगड त्यात खेकड्यांची जत्रा. अरूंद अशा वाटेच्या कातळभिंती वरून पाण्याचे लोट वाहू लागले, बराच अंधार दाटून वातावरण एकदम पालटले.
आम्ही पूर्ण शांत चित्ताने, अत्यंत सावधगिरीने उतरत होतो. पहिल्या दहा ते पंधरा मिनिटातच थोडे खाली आल्यावर डावीकडे कड्याला चिकटून जाणारी वाट दिसली, ओढ्यातून बाहेर त्या वाटेवर सरकलो, वाट हळुहळु उतरू लागली. भर पावसामुळे आणि वार्यामुळे ठिक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. तरी सुध्दा या भागातली ऊंच ऊंच व दाट झाडी पाहून बरे वाटले, या वाटेचा वापर कमी असल्यामुळे म्हणा अथवा फारशी ये-जा नसल्यामुळे मानवनिर्मित खाणा खुणा किंवा कचरा वगैरे असे काही नव्हते ही पण एक चांगली बाब म्हणा. पाऊण तासात एका ओढ्यापाशी आलो, नाळेतल्या मुख्य ओढ्याचे बहुतेक दोन भाग झाले होते. मुख्य पुढची वाट दिसेनाशी झाली होती. खाली तीव्र उतरण आणि प्रचंड प्रमाणात झाडा पाचोळा, पावसाने पण चांगलेच झोडपले होते. रेन कोट, ज्याकेट वगैरे पार ओलेचिंब आणि साथीला गार वारा व धुके.
थोडे पुढे उजवीकडे सरकल्यावर, तिकडच्या ओढ्या पलीकडे एक वाट सरळ उजवीकडून वळसा मारत पुढे जात होती, वाट अत्यंत ठळक होती. पण दिशेनुसार मनात शंका आली, कारण आम्हाला तर सरळ खाली उतरायचे होते. मग मी आणि निखिल आम्ही त्या वाटेवर पुढे जाऊन पहायचे ठरविले, त्या जागेवर उत्तम व मयुर यांना थांबायला सांगून, आम्ही दहा ते पंधरा मिनिटे त्या वाटेवर चालत होतो. मग ध्यानात आले ही वाट जरी ठळक असली तरी ती ओढ्याला धरून खाली उतरत नाहीये. ही कदाचित लाकुडतोडे किंवा गुराख्याची वाट असेल ? किंवा पदरातून सरळ आडवी मोरोशी किंवा भैरवगडाच्या दिशेला तर जात नसेल? मनात बर्याच शंका कुशंका निर्माण झाल्या. ( जर कोणा जाणकाराला या वाटेबद्दल माहीत असेल तर मला जरूर कळवा. ) पुन्हा माघारी आलो, वेळ आजिबात वाया घालवून चालणार नव्हते. डावीकडे पाहिले तर तिकडच्या ओढ्यातून पण मार्ग दिसत नव्हता.
जरा वेळ शांतपणे विचार केला. सरळ दिशा धरून समोरच्या सटकणार्या कातळावरून सावकाश उतरून पुढे गेल्यावर झाडीत एक वाट अस्पष्टशी दिसली. पुढे जात वाटेतल्या फांद्या काडक्या बाजूला सारत हळुहळु खाली उतरू लागली. मध्येच वाट नाहीशी होत मग पुन्हा उजव्या डाव्या बाजूने अंदाज घेत मुळ वाटेला लागत होतो.
नाणे घाटाच्या तुलनेत ही वाट कमी वापरातली असल्यामुळे जरा अवघड जात होते, पण तरीही हा एक वेगळाच अनुभव होता. नेटाने पुढे पुढे जात होतो. एव्हाना पाऊस कमी झाला होता व धुकेही गायब झाले होते. आम्ही बरेच अंतर खाली उतरलो होतो. मागे वळून सरळ पाहिले तर भोरांड्याच्या दारावर धुके ये जा करत होते. म्हणजेच आम्ही दिशेप्रमाणे योग्य वाटेला होतो. काही मिनिटातच उतरण कमी झाल्यावर नाळेतला मोठा ओढा उजव्या हाथाला लागला. तसेच थोडे पुढे गेल्यावर काही ठिकाणी सिमेंट बंधार्याचे काम केलेले दिसले. जरा पुढे आल्यावर लगेच सिमेंट कॉंक्रीटची पायवाट आणि मुरबाड माळशेज मार्गावरचा पुल दिसला.
बाजुच्या ओढ्यात तोंड हातपाय धुवून निवांत झालो. परतीच्या वाटेवर कल्याण कडे जाणार्या गाडीची वाट पाहू लागलो. एक ही एस टी थांबली नाही शेवटी एका टेम्पो वाल्याने टोकावडे पर्यंत सोडले, मग तिथून खचाखच गर्दीने भरलेल्या एस टी ने कल्याण ला परत आलो. एका दिवसात दोन सुंदर घाटवाटांची यात्रा घडली होती.प्राचीन असा नाणेघाट व त्याचा शेजारी भोरांड्याचे दार.
वाचा.
वाचा.
एकदमच संक्षिप्त लेख आहे थोडे
एकदमच संक्षिप्त लेख आहे थोडे वर्णन अजून छान वाटले असते आणि प्र.चि. सुद्दा
अप्रतिम फोटो. पुढील पावसाळी
अप्रतिम फोटो.
पुढील पावसाळी भटकंतीस शुभेच्छा
लेख एव्हढाच का? फोटो पण टाक
लेख एव्हढाच का? फोटो पण टाक आणखी.
नाणेघाटाच्या वाटेलाच भोरांड्याचे दार म्हणता का?
तुम्ही नाणेघाट पठारावर होता आणि आम्ही त्याच दिवशी ढगांमुळेच चार तास जीवधन पायथ्याच्या रानात भरकटलो होतो. पठारावरून चालायला सुरुवात करणार तोच ढगांनी सर्व आसमंत आपल्या कवेत घेतला आणि आम्हाला जंगलसफारी घडवली.
इथे भरकटण्याची हि दुसरी वेळ. जवळपास सहा-सात वर्षांपूर्वी पावसाळ्यात जीवधनची वानरलिंगी सर केली होती आणि त्यावेळेस कॅंप नाणेघाटाच्या गुहेत होता. संध्याकाळी परत कॅंपवर येताना असच ढगांनी आपले पांघरूण घातलं आणि आम्ही भरकटलो. त्यावेळेस नाणेघाटाच्या पठारावर रात्रीचा कोणाचाच वावर नसायचा. पठारावरची ती घर हल्लीच झाली आहेत. पावसाने सुद्धा थैमान घालायला सुरुवात केली आणि आमची बोबडी वळली. कारण काळोख पसरायला सुरुवात झालेली, त्यातच संध्याकाळी परत गुहेत यायच आहे म्हणून सोबत फक्त कोरडा खाऊ होता. तो पण संपला होता. शेवटी थकून आहोत त्याच जागी भिजत रात्र काढावी लागली. एक प्लास्टिकच कापड होत बरोबर तेच आलटून पालटून अंगावर घ्यायचो. अक्षरशः भयानक अनुभव होता.
अप्रतिम फोटो... भोरांड्याचे
अप्रतिम फोटो... भोरांड्याचे दार मस्तच
सतिश... भयानक अनुभव
योगेश, छान झाला पिटुकला
योगेश,
छान झाला पिटुकला ट्रेक. पावसाळ्यात जरा धोकादायक वाटतो आहे.
तुम्ही विचारली ती वाट विकीम्यापिया वर धुंडाळून पाहिली. बहुतेक भैरवगडाच्या दिशेने जाते. प्रत्यक्ष गडावर जाईल का याची शंकाच आहे. मी त्या प्रदेशाचा जाणकार नाही.
आ.न.,
-गा.पै.
वा छान लेख मस्त लिहिलय अजुन
वा छान लेख मस्त लिहिलय
अजुन प्रचि येऊदेत.
पु.ले.शु.
सुंदर
सुंदर
मस्त लिहिलय , प्र.ची. अजुन
मस्त लिहिलय , प्र.ची. अजुन हवेत ,
<<त्याच जागी भिजत रात्र काढावी लागली>> आम्ही तिथेच एक रत्र चुकल्यामुळे काढली पण त्या वेळी थंडी चे दिवस होते.
योगेश, मस्तच आणी पहीला
योगेश,
मस्तच आणी पहीला प्रयत्नपण छान जमलाय. माझे याला येता येता राहीले. असो, परत कधीतरी
धन्यवाद मित्रानो.
धन्यवाद मित्रानो.
सतिश भाई - भयानक खतरनाक
सतिश भाई - भयानक खतरनाक अनुभव, बहुतेक वेळा धुक्याने मुळ वाट सापडत नाही. आजुबाजुचे काही दिसत नाही, दिशा पटकन लक्षात येत नाही.
गा.पै - धन्यवाद, ती वाट जाणकाराना विचारणे चालु आहे. पाहुया प्रयत्न करुन.
मनोज साहेब - परत कधीतरी नक्की.
योगेश भैरवकडे जाणारी
योगेश
भैरवकडे जाणारी वाट.
माझ्या अंदाजाप्रमाणे ती वाट मोरोशी गावातच येणार. कारण कड्याच्या शेजारून गेल्यास गर्द रानातून आपण भैरवचे पठार असलेल्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचतो. जिथून वर चढणे अवघड आहे कारण इथल्या सगळ्याच खिंडी तीव्र उताराच्या आहेत आणि प्रस्तरारोहणाशिवाय वर चढणे शक्य नाही.
मागे एकदा, माळशेज घाटात कड्याच्या शेजारून रस्त्यावर अथवा गावात न येता भटकण्याचा वेडपट विचार मनात आलेला. पण मोरोशीला गावात यावेच लागते. भैरवचे पठारावर पाय ठेवण्यापूर्वी आपल्याला एक सोंड पुढे दरीच्या दिशेने गेलेली दिसते. जिथे सगळीच ट्रेकर्स मंडळी फोटो काढण्यासाठी वाट वाकडी करून जातात. या सोंडेला पुढील टोकाला खाली तीव्र उतार आहे. मागे, या सोंडेचा वरच्या बाजूने अर्धवट मागोवा घेतलेला, पण खरा अभ्यास करायचा तर हिच्या पायथ्याला जाण्याची गरज आहे. तरीही सोंडेचा वरचा टप्पा प्रस्तरारोहणाच्या साधनांशिवाय शक्य नाही. काही गोष्टी एकाच नजरेत लक्षात येत नाहीत, परत एखादी चक्कर मारावी लागेल.
मस्त रे ... आम्ही पन केल होत
मस्त रे ...
आम्ही पन केल होत नानेघाट ..भोरांड्याच्या दाराने..
http://www.maayboli.com/node/35215
क्या बात है!!! मस्त वर्णन
क्या बात है!!!
मस्त वर्णन योगेश
खाली तीव्र उतरण आणि प्रचंड प्रमाणात झाडा पाचोळा, पावसाने पण चांगलेच झोडपले होते. रेन कोट, ज्याकेट वगैरे पार ओलेचिंब आणि साथीला गार वारा व धुके.>>>>>यामुळेच फोटो कमी काढले गेले असतील ना?
पहिला फोटो भारीच.
मस्त.. पुढच्या ट्रेकसहीत
मस्त.. पुढच्या ट्रेकसहीत लेखनासाठी शुभेच्छा रे
धन्यवाद रोहित, जिप्सी, आणि यो
धन्यवाद रोहित, जिप्सी, आणि यो !
भन्नाट ट्रेक! पहिल्याच फोटूवर
भन्नाट ट्रेक!
पहिल्याच फोटूवर फिदा!
भोरांड्याचं दार म्हणजेच "गुणे घाट" असू शकेल, असं वाटतं.
भोरांड्याचं दारात दुतोंडी पाण्याचं टाकं दिसलं का? सहज शक्य असेल, तर फोटू टाकू शकशील का?
भोरांड्याचं दार आणि मोरोशी भैरव कॉम्बो करायचाय कधीतरी...
हा एकच फोटो आहे.
हा एकच फोटो आहे. भोरांड्याच्या दाराच्या सुरूवातीचा जिथून घाट उतरायला सुरूवात होते. बरोबर असलेला दिपक लोखंडे इथपर्यंत सोबत होता. सवयीप्रमाणे त्याला विचारले की घाटात काही पाण्याची टाकं किंवा कातळकोरीव पायरा वगैरे काही तर तो नाही म्हणाला.
एकतर प्रचंड धुके ,उतरायला सुरूवात केल्यावर लागलीच जबरदस्त अंधारून आल आणि त्यात हे धुके. वाट सुरूवातीलाच सरळसोट उतरते. त्या वातावरणात अरूंद खिंडीतला तो कातळ आणि त्यावरून वहात येणारे पाण्याचे लोट त्यामुळे लवकरात लवकर अतंर पार करायच्या नादात इतरत्र खास लक्ष देऊन पहाता आले नाही.
साईदा,या मोसमात भैरवगडाला जोडून हि वाट पुन्हा एकदा करू.