वृक्षारोपण आणि आपण

Submitted by मामी on 21 May, 2015 - 13:58

फेसबुकवर सध्या एक मेसेज फिरत आहे - खात असलेल्या फळांच्या बिया साठवून ठेवा आणि पावसाळ्यात कुठे फिरायला गेलात तर त्या आजूबाजूला टाका, निदान काही तरी रुजतील. तेवढाच पर्यावरण हरित करण्यास आपला हातभार.

कल्पना खरंच खूप छान आहे. सध्या आंबे, फणस, जांभळं वगैरेचे दिवस आहेतच. त्यामुळे या सगळ्या फळांच्या बिया एकत्र करून ठेवायला हरकत नाही. शिवाय ही खास आपल्या भूमीतील झाडं. मग ही झाडं रुजवायला थोडा अजून सजग हातभार लावता येईल का?

समजा प्रत्येकानं / किंवा एखाद्या गटानं मुद्दाम यंदाच्या पावसाळ्यात असा प्रयत्नपुर्वक उपक्रम हाती घेतला तर?

वर उल्लेख केलेल्या बिया तर आहेतच पण शिवाय जर शक्य असेल तर दुकानांतून खास इतर बिया अथवा झाडेच विकत घेतली आणि पाऊस सुरू झाल्यावर आठवडाभरानं गावा / शहराबाहेरच्या एखाद्या वापरात नसलेल्या जमिनीच्या तुकड्यावर लावली तर?

एकटे जाऊन लावा, कुटुंबासकट जाऊन लावा, मित्रमैत्रिणींबरोबर जाऊन लावा, एखाद्या संस्थेतर्फे मोहिम काढून लावा, गटग करून लावा ..... एक बी लावा, एक झाड लावा, ट्रकभर झाडे लावा ...... पण लावा!

कोणकोणती झाडं आवता येतील बरं? फुलांची लावण्यापेक्षा फळांची, उपयोगी झाडं लावण्यावर कटाक्ष ठेवला तर? म्हणजे फळझाडं, मोठे वृक्ष, भाज्या वगैरे लावल्या तर?

एक यादी करतेच. यादी करताना स्थानिक उपयुक्त झाडं आणि वृक्ष लक्षात घेतले आहेत. सह्जपणे रुजणारी आणि मेंटेनन्स न लागणारी झाडं निवडली आहेत.

फळझाडं : आंबा, फणस, जांभूळ, नारळ, सीताफळ, चिकू, केळी, पपया

याव्यतिरिक्त इतर वृक्ष : वड, पिंपळ

भाज्या : मिरच्या, टोमॅटो, अळूचे कंद, सुरण, रताळ्याचे कंद, शेवगा, वाल, भोपळा, घोसाळी, कारली

यात अजून भर घालता येईल. मूळ कल्पनाही अधिक कशी चांगली राबवता येईल याचा विचार करता येईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages