लेखकराव आणि ज्ञानपीठ

Submitted by वरदा on 27 April, 2015 - 00:54

तर, ज्ञानपीठ सोहळा पार पडला. श्री. भालचंद्र नेमाडे यांचे हार्दिक अभिनंदन!

एक बंडखोर नव्या दमाचा मूर्तीभंजक लेखक ते रा.रा. पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोच्च पुरस्कार आनंदाने स्वीकारून फर्ड्या इंग्रजीत भाषण करणारे देशीवादाचे कट्टर पुरस्कर्ते मा. श्री. लेखकराव असा प्रवास वाटेत जनस्थान पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार इ. थांबे घेत घेत सुफळ संपूर्ण झाला.
(साहित्याचं नोबेल मिळायची शक्यता नसल्याने प्रवास संपूर्ण असं लिहिलं आहे)

नेमाडेंच्या साहित्याला पुरस्कार मिळू नये, ते महत्वाचे लेखक नाहीत, असं अजिबातच म्हणायचं नाहीये. पण एकूणच 'नेमाडेपंथ', त्यांच्या साहित्यिकांविषयीच्या पूर्वापारच्या भूमिका, विलायती आडातून भरलेले लेखनशैली/ नॅरेटिव्ह चे, देशीवादाचे पोहरे उदाहरणार्थ वगैरे भलतंच मनोरंजक आहे ब्वा!!

वि.सू. - कॉन्ग्रेस वि. भाजपा आणि इतर राजकीय विषयांवर अर्वाच्य आणि शिवराळ भाषेत उणीदुणी काढणार्‍या मंडळींनी त्यांची गटारगंगा कृपया या धाग्यावर वहावू नये. इथे साहित्य, साहित्यिक भूमिका, विचारसरणी, तद्विषयक मतमतांतरे, मतभेद इ. असले तरी वैयक्तिक टीका न करता सभ्यपणे चर्चा करणे अपेक्षित आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळणे म्हणजे शक्ती कपूरला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यासारखे आहे.

[पूर्वप्रकाशित मत]

वि सू देण्याचं प्रयोजन कळलं नाही. या विषयाशी कॉन्ग्रेस वि. भाजपा चा संबंध नाही. त्यामुळे "ते" ( कदाचित त्यात मीही आलो) इथे येणार नाहीत.

या बातमीबरोबरच आणखीही एक बातमी वाचून बुचकळ्यात पडलो. कुमार सप्तर्षी यांनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारला, पतंगराव कदमांच्या हस्ते. भारती "विद्यापीठा" तर्फे. व्यासपीठावर "कार्यवाह" विश्वजीत कदमही होते. आयुष्यभर प्रस्थापितांविरुद्ध लढा देणारे सप्तर्षी शंभर टक्के प्रस्थापित संस्थेकडून मिळणारा पुरस्कार शंभर टक्के प्रस्थापित व्यक्तीच्या हस्ते घ्यायला का तयार झाले असावेत?

पुरस्कार मिळालेल्यांचे अभिनंदन.

विकु, मोदींच्या हस्ते पुरस्कार दिला गेला ही बाब लक्षात घेऊन वि सू दिली आहे. तसाही काहीही संबंध नसतानाही आपल्याकडे कुठलाही धागा कुठेही वहावू शकतोच Proud

सप्तर्षींबद्दल सहमत.

मला नाही खटकलं त्यांनी इंग्रजीतून भाषण करणं. भाषणातले मुद्दे महत्वाचे होते.

एकुणच ज्ञानपीठ असल्याने ते पंतप्रधानांच्या हस्ते स्विकारणे यात गैर काय? पंतप्रधान मोदीं आहेत म्हणून खटकलं असेल तर पुरस्कार स्विकारताना अशीच तडजोड तेंडुलकरांनीही केली आहे. त्यांनी सरस्वती पुरस्कार विद्याचरण शुक्लांच्या अह्स्ते स्विकारला होता. महत्व पुरस्काराचं आहे. कोणाच्या हातून स्विकारला त्याला फारसं महत्व देण्यात काय अर्थ.

नेमाडेंना इतरांच्या आणि इतरांना नेमाडेंच्या खोड्या काढण्याची सवयच झाली आहे कोणत्याही निमित्ताने. वैयक्तिकरित्या बोलायचे तर कादंबरीतकार नेमाडे मला या सर्वापेक्षा कितीतरी थोर वाटतात त्यामुळे त्यांच्या बाकीच्या कसल्याही गोष्टीकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही. लेखक पुस्तकाच्या पानातून दिसतो तो आणि तेवढाच खरा.

एकीकडे कशाला पाहिजे इंग्रजी म्हणून गळा काढायचा आणि इंग्रजीतच भाषण ठोकायचं हा दुटप्पीपणा अजिबात आवडल नाही

नेमाडे इंग्रजी भाषेच्या विरोधात नाहीत. ते स्वतः इंग्रजीचे प्रोफेसर आहेत. शालेय शिक्षण मातृभाषेतून द्यावे, इंग्रजी शाळेत घालू नका. असा त्यांचा आग्रह आहे. विपर्यास करु नका सारिका.

"ज्ञानपीठ पारितोषिक" लेखकाच्या आयुष्यभरातील साहित्य सेवेबाबत प्रदान केले जाते. १९८२ पूर्वी एखाद्या लेखकाच्या विशिष्ट कलाकृतीसाठी ते देण्यात येत असे पण आता नियमावलीत बदल केला असल्याने ज्या कुणाला ते जाहीर होते त्याच्या किंवा तिच्या एकूणच साहित्य कलाकृतीबद्दल आहे असे मानले जावे. भालचंद्र नेमाडे यांच्या आग्रही मताबद्दल (विषय कोणताही असो) आजकाल डावी मते हिरीरीने मांडली जात आहेत हे तर जालीय तसेच वर्तमानपत्रात नित्यनेमाने प्रकटणार्‍या पुरवण्यातून स्पष्ट दिसते आहेच. पण म्हणून "कादंबरीकार भालचंद्र नेमाडे" यांचे साहित्य दुय्यम ठरविण्याचा जो अकारण प्रघात पडल्याचे आढळते...चर्चातून...तो त्यांच्यावरच नव्हे तर एकूणच मराठी साहित्याच्या दृष्टीने सकस नाही हे मी एक कट्टर नेमाडेप्रेमी वाचक याच नात्याने इथे म्हणू शकतो.

राज्य पुरस्कारापासून ज्ञानपीठापर्यंतच्या त्यांच्या पारितोषकीय वाटचालीविषयी माझे काहीही मत नाही कारण हे पुरस्कार त्याना कधीच मिळाले नसते तरी नेमाडे यांचे आमच्या मनातील स्थान कधीच ढळले नसते. पारितोषिक मिळाले म्हणून ते थोर झाले वा लेखकराव झाले असे नाही तर त्यानी ते स्थान आपल्या कादंबर्‍यांनी प्राप्त केले आहे हे नि:संशय. वाङ्मयाच्या इतिहासात आंदोलने होणे क्रमप्राप्त असते. वस्तुनिष्ठता आणि आत्मनिष्ठता, बहिर्मुखता तसेच अंतर्मुखता अशा लाटांची आवर्तने त्या त्या कथाकादंबर्‍यांकवितांच्याबाबतीत उठतात, लेखक-समीक्षक-प्रकाशक यांच्यात चर्चा झडत राहतात. टपून बसलेले टीकाकार आपल्या लेखण्या सरसावून बसलेले असतात आणि अशा प्रसंगी एखाद्या प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या पारितोषिकाने लेखकाच्या साहित्यसेवेला (मग त्याचे लिखाण जनमान्य असो वा नसो) गौरविण्यात आले म्हणजे "हा लेखक ह्या पारितोषिकाला किती अपात्र आहे" हे ठासून सांगणारे पतंग आकाशात भिरभिरत राहातात. आज नेमाडे यांचे नाव आले आणि त्यावर फेर्‍या झडत राहिल्या आहेत. जर स्वातंत्र्योत्तर काळात अशाच दर्जाचे देशी पारितोषिक माधव ज्यूलिअन याना जाहीर झाले असते तर आचार्य अत्रे यानी मराठ्यातून लेखक आणि संबंधित समिती यांच्यावर शब्दआगीचे झोत सोडले असते हे उघडच आहे. आणखीनही काही उदाहरणे देता येतील पण विस्तारभयास्तव हे एकच पुरेसे आहे.

मुद्दा असा की ज्ञानपीठ मिळाले म्हणून आता नेमाडे तमाम मराठी वाचकांच्या गळ्यातील ताईत होतील असे मानण्याचे बिलकुल कारण नाही. त्याना मानणारे पारितोषिक मिळाले वा ना मिळाले तरीही मानत राहतीलच. जे नाही मानत त्यानाही आपल्या मताचा हक्क आहे व ते मांडत राहतील.

रा.रा.भालचंद्र नेमाडे याना उदाहरणार्थ वगैरे काय फरक पडतो ?

इंग्लिश कम्पलसरी करु नका हा त्यांचा मुख्य स्टँड. बाकी सगळी त्यांची नेहमीच्या स्टाईलची सेन्सेशनल विधाने.

मी माझ्या वयाच्या दोन वेगवेगळ्या टप्प्यावर कोसला वाचली. ती मला कधीही ग्रेट वाटली नाही. यापुढे मला आणखी प्रगल्भता ( रीड : शहाणपण ) यायची शक्यता कमीच आहे तरी आणखी ८/१० वर्षांनी परत वाचेन म्हणतोय !!

माफ करा या धाग्यावर अवांतर आहे, पण रोहित शर्माच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे वाचले आणि नेमाड्यांना ज्ञानपीठ वगैरेचे काही वाटेनासे झाले. आता मी वर म्हटल्याप्रमाणे शक्ती कपूरला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला तरी वाईट वाटणार नाही.

भालचंद्र नेमाडेंचे कोणतेही साहित्य मी वाचलेले नाही. आणि त्यांची मतेही मला माहित नाही त्यामुळे त्यांच्या विषयी काहीही टिप्पणी मी करू शकत नाही.

भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जर त्यांना प्राप्त झाला आहे त्याअर्थी त्याचे साहित्यमुल्य नक्कीच चांगले असणार हेमावैम.

नेमाड्यांना पुरस्कार मिळाला यात चूक काहीच नाही, उलट खूप आनंदच आहे. पण ज्ञानपीठ ज्यांच्या हातून घ्यावे लागते ते ज्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात त्या विचारांना आत्तापर्यंत केलेला विरोध पुरस्कार स्वीकारताना (अगदी इंग्रजीतून का होईना) अधोरेखीतही झाला नाही.
वैषम्य पुरस्काराचे नाही तर या विरोधाभासाचे आहे.
लेखक पुस्तकाच्या पानातून दिसतो तेवढाच खरा हे नेमाड्यांच्या बाबतीत तरी त्यांच्यावर फार अन्याय करणारे ठरेल.

दिनेश एखादे पुस्तक आवडणे न आवडणे, किंवा ती ग्रेट वाटणे हा वैयक्तिक आवडी निवडीचा भाग असतो. शहाणपणाचा नाही.

शक्ती कपूरला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला तरी वाईट वाटणार नाही. > विवेक ऑबेरॉयला मिळणार आहे. का मिळणार आहे ते मात्र विचारु नका Wink

नेमाडे इंग्रजी भाषेच्या विरोधात नाहीत. ते स्वतः इंग्रजीचे प्रोफेसर आहेत. शालेय शिक्षण मातृभाषेतून द्यावे, इंग्रजी शाळेत घालू नका. असा त्यांचा आग्रह आहे. विपर्यास करु नका सारिका.>>>>>>

बाकीच्यांनी मराठीत शिकावे, म्हणजे ज्यांना इंग्रजी येते त्यांचे महत्व कायम राहील. सर्वांनाच इंग्रजी बोलता आले तर ह्यांना कोण विचारणार.

मातृभाषेतून शिकल्यावर इंग्रजी बोलता येत नाही का टोच्या?>>>>>> येऊ शकते, पण तुलनात्मक द्दृष्ट्या खूप कमी लोकांना ते जमते. त्या ऐवजी जर बालपणापासुन इंग्रजीच शिकवली तर आपोआप इंग्रजी बोलता येण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते.

नेमाडेंच्या साहित्याला पुरस्कार मिळू नये, ते महत्वाचे लेखक नाहीत, असं अजिबातच म्हणायचं नाहीये >> झालं तर मग. Happy
पुरस्कार स्वीकारताना त्यांनी इंग्रजीतून भाषण करायच्याऐवजी मातृभाषेतून करायला हवं होतं असं म्हणणं आहे का? किती विजेत्यांनी आजवर तसे केले आहे? माहीती मिळाली तर हवीच आहे.

येऊ शकते, पण तुलनात्मक द्दृष्ट्या खूप कमी लोकांना ते जमते. त्या ऐवजी जर बालपणापासुन इंग्रजीच शिकवली तर आपोआप इंग्रजी बोलता येण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते. <<<
याबद्दल काही डेटा उपलब्ध आहे का? हे अनुमान मला पूर्ण चुकीचे वाटते.
इंग्रजी माध्यमात शिकूनही धड ना इंग्रजी धड ना हिंदी धड ना मराठी अशी अवस्था असलेली खूप जनता माहितीये.
मराठी माध्यमात शिकून उत्तम इंग्रजी बोलणारे, लिहिणारे असेही खूप माहितीयेत.

बाकी मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवू नका असं नेमाड्यांचं मत आहे ते पटू शकतं किंवा न पटू शकतं. तुमच्या कानावर कुणी बंदूक ठेवली नाहीये ते सांगतात तसंच वागायला. पण असे मत असणार्‍याला ज्ञानपीठ कसे काय दिले गेले असा सूर आहे काहींचा तो महान विनोदी आहे.

Nee, nemade he boltat ani lihitat, the baghta tyanchyashivay dnyaanapeethasathi yogya vyakti nahi. Bhyrappannahi ata lavkarach ha puraskar milava hi ichchha. Happy

Nahi nahi. VicharasaraNee kuThwar nyayachi, hach Kay to farak. Baki mooL hetoo sarakhech.
Aso. Ata ratri devanagaritoon maza mhaNana neeT liheen.

Comparing Nemade and Bhairappa is like comparing apples and oranges. बाकी भैरप्पांना यात ओढण्यामागे काय कारण असावे याची कल्पना करता येते. Wink

शर्मिला फडके खरच कि काय ? म्हणजे आम्ही इतके दिवस पेपर मध्ये वाचत होतो , टी वि वर बघत होतो तो सगळा भास होता काय ?
नेमाडे इंग्लिश ला विरोध करत होते तेव्हा बरोबर वाटत होता . पण त्याने इंग्लिश मध्ये भाषण करून आपण खरच गुलाम आहोत हे त्यांनी दाखवून दिलं .
खरं तर इंग्लिश ची सक्ती कशासाठी हवी ? रोजच्या आयुष्यात विनाकारण इंग्लिश मध्ये बोलून इतरांवर छाप पडण्याचा खटाटोप कशासाठी ?
रशिया , फ्रांस , चीन , जपान , जर्मन हे लोक कुठे इंग्लिश वापरतात ?त्यांचं कुठे काय अडतं ? त्यांच्या प्रगतीत कुठे काय फरक पडतो? उलट इंग्लिश लोकच त्यांची भाषा शिकून घेतात . आमचे client जपानी आहेत (I .T फिल्ड बरं का ) . ते अगदी professional email सुधा जापनीज भाषेतून लिहितात . आणि मग भारतीयाच असलेला दुभाषा ते इंग्लिश मध्ये translate करून सांगतो .
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे देश शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून देतात . अगदी science च सुधा . त्यामुळे पटकन भेजात शिरतं आणि आणि त्यात गोडी हि निर्माण होते .म्हणून ते लोक पुढे असतात . याउलट आपल्याकडे किचकट इंग्रजीत विषय शिकवल्यामुळे केवळ मार्क मिळवण्या पुरता शिक्षणाचा उपयोग होतो . प्रगतीसाठी नाही

नेमाड्यांनी मराठीत भाषण करायला हवे होते. इतरांसाठी ते भाषण हिंदी वा इंग्रजीत भाषांतरीत करून देता आले असते. अर्थात नेमाडे व पंथाच्या कोलांट्याउड्या खूप आहेत. ते विविध प्रकारे प्रसिद्धी झोतात राहण्याचा प्रयत्न करत राहिले हे मान्यच.
भाषण अजून वाचलेले नाही. त्यामुळे त्यांनी काय मुद्दे मांडलेत ते बघितलेले नाही.

वरदा तुझा मुद्दा काय आहे नेमका? लेखकाचा लेखकराव झाला असा? याचे उत्तर माझ्यासाठी तरी होच. कारण
१. ज्ञानपीठ त्यांना कुठलेच लॉबींग न करता मिळाले असेल असे मला तरी वाटत नाही. चंद्रकांत पाटील त्या कमिटीवर होतेच. नेमाड्यांनी स्वतः किती लॉबींग केले माहिती नाही.
२. त्यांनी सर्व पुरस्कारांचा सोहळा दिमाखात उपभोगला.

या सगळ्यामुळे नेमाडे आवडेनासे होतील असे मुळीच नाही. नेमाडे कादंब्रीकार कादंब्रीकार म्हणुन मला नेहेमीच आवडत राहतील.

हे नेमाडे ह्यांच्याविषयी नाही पण एकूण लेखकाची त्याच्या लिखाणातून तयार होणारी प्रतिमा आणि प्रत्यक्ष जीवनातले त्या व्यक्तीचे आचरण ह्यातली तफावत दोन वेळा फार प्रकर्षाने अनुभवली आहे. बऱ्याच थोर व्यक्तींचे पाय मातीचेच असतात हे मान्य आहेच पण तरी लेखकाच्या बाबतीत मला थोडी आशा होती. कारण ज्याला शब्दांची ताकद वापरता येते त्याला शब्दांचे अर्थ देखील चांगले माहिती असतात ऐसी मेरी खुशफेह्मी थी! . But alas, as humans most writers are also on equal footing. तुकोबा म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले कारण खरोखर विचार करतो तसं आचरण करणं भयंकर कठीण काम आहे! आणि तसं करू शकणाऱ्या व्यक्ती फार फार थोड्या असतात. कुठेतरी एक फार छान वाक्य वाचलं होतं: Your beliefs don't make you a better person, your behavior does. Now I believe in the behavior of the person rather than his/her beliefs!

मी नेमाड्यांचं एकही पुस्तक वाचलेलं नाही, तरीही त्यांनी ईंग्रजीत भाषण केलं ह्यात मला तरी काहीही गै र वाटत नाही. त्यांच्या समोरचा ऑडीयन्स कॉस्मॉपॉलिटन होता. भाषांतरकार भाषांतर करतात पण त्यात भावना ओतल्या जात नाहीत. "ये हृदयीचे ते हृदयी " घालण्यासाठी लेखकानी सर्वांना समजणार्‍या भाषेत भाषण दिले तर हरकत कशाला?

पुलंना "साहित्य अकादमी" पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी पण ईंग्लीश मधे भाषण केले होते आणि त्याला पण भरपूर पुल टच होता.

http://cooldeepak.blogspot.in/2014/12/i-cannot-love-it-enough-pula-deshp...

नेमाड्यांच्या लिखाणावर आक्षेप घ्यायचा नाही, त्यांना ज्ञानपीठ मिळालं यावर आक्षेप घ्यायचा नाही, त्यांनी इंग्रजीचे प्रोफेसर असून फर्ड्या इंग्रजीत भाषण काब्रं केलं यावर आक्षेप घ्यायचा नाही, मग वाद कशावर घालायचा?
Wink

मला कादंबरीकार म्हणून नेमाडे आवडतात, मग ते प्रत्यक्षात कसेही असोत.
त्यांनी बहुभाषिक गटासमोर इंग्रजीत भाषण केलं यात काही वावगं वाटत नाही. ते इंग्रजी वापरूच नका म्हणत नाहीत तर मराठीतून/ मातृभाषेंतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे म्हणतात त्यामुळे ते इंग्रजीत बोलले यावर आक्षेप नाही.
मोदींकडून ज्ञानपीठ स्विकारले यावर आक्षेप नाही. दुसराही कुणी सोम्या गोम्या पंतप्रधान असता तरी त्याच्या हातून स्विकारावाच लागला असता.
आजकालच्या जगात लॉबींग करावे लागते यावरही आक्षेप नाही.

अरे बापरे, आता 'चर्चा' कश्यावर करावी बरं?

Pages