खालील "मुहुर्ताची वेळ" ,हा साप्ताहिक सकाळच्या सध्याच्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा या विषयावरील दुसरा लेख. त्या आधी गेल्यावर्षी याच कालावधीत याच विषयावरचा पहिला लेखंही प्रकाशित झालेला होता. तो अंतरजालावरंही उपलब्ध आहे. ही त्याची लिंक . ही लिंक देण्याचे कारण म्हणजे हा दुसरा लेख,त्या पहिल्या लेखाचाच साधारणपणे पुढचा भाग आहे. तेंव्हा तो लेख वाचल्यास या लेखातील आशय व मुद्यांची संगती अधिक नीट लागू शकेल.
============================================
हा फोटो कॉपीमधला लेख तेथे सा.सकाळच्या धोरणानुसार काहिसा संपादित झालेला आहे. म्हणून मूळ कच्चा मसूदाहि येथे खाली देत आहे.
============================================
हा मूळ मसुदा...
"अहो...म्हायत्ये हो तुम्ही फार पुरोगामी गुर्जी आहात ते.. पण तरी कायतरी एक वेळ विवाहमुहुर्त म्हणून हवी की नको? की मेंढरांचा कळप आत आल्यावर कवाड लावतात...तसं लग्न लावायच..सगळी जमल्यावर? "
काही वर्षांपूर्वी ,एका (क्लाएंट..) यजमानाघरी चाललेल्या लग्नाच्या कार्यक्रम रूपरेषा चर्चेत, हा माझ्या अंगावर आलेला बाण! तेंव्हा तर मी बराचसा नवखाही होतो..आणि या पौरोहित्याच्या क्षेत्रात अनुभवाला-पारखाही! त्यामुळे बुद्धी ज्याला कौल देइल,ती प्रत्येक गोष्ट भावना(मन) स्विकारेलच असं नाही..मग ते खरं असो,अगर खोटं! हा धडा फार पटकन मिळाला. मग मनात क्षणभर विचार केला..असला हा मुहुर्ताचा प्रकार धर्मशास्त्रातंही उत्तरकालीन,तरिही एकदा काहि विधी करायचे निश्चित झाले..की त्याला काहितरी वेळ निश्चित करणे आलेच की? मग त्या यजमानांना..विवाह मुहुर्ताच्या दिवशी वधुवरांना(आणि त्यांनाही!) अनुकूल अशी एक वेळ काढून दिली..आणि न जमणार्या छापिल मुहुर्तांच्या कचाट्यातून त्यांना सोडविले. पण हा प्रसंग मलाही बरेच काही शिकवून गेला. त्यातही एकदा धर्म म्हटलं,की ते कसही काहिही असो..तो सारा भावनेचाच विषय असतो ना? मग तिथे बुद्धी गणित बांधण्यापुरतीच उपयोगात आणायला हवी,आणि ते सोडवायला भावनाच!
मग विचार असा केला,की मुहुर्त कुठे नाहीत?
शाळा भरायला आणि सुटायला...मुहुर्त आहे.
ऑफिसांना ..मुहुर्त आहे.
येश्टी,रेल्वे,विमान सुटायला...मुहुर्त आहे.
घरातून कामाला निघण्याचा ...मुहुर्त आहे.
डॉक्टरला ऑपरेशनांचा... मुहुर्त आहे.हे सगळीकडे मुहुर्त आहे...मुहुर्त आहे... असं उत्तर, आमच्या कोकनातल्या द्येवलात घातलेल्या गार्हान्यातल्या 'होय..म्हाराजा!' सारखं यायला लागलं. चला...म्हटलं,उत्तर सापडलं! पण आमची मेली बुद्धी गप बसू देइल होय आंम्हाला? छ्या! आजाबात न्हाय! तीनी लगेच सांगितलच.. "आओ दिवेकर गुर्जी.. , शाळा हापीस रेल्वेचे मुहुर्त-काढले जात नाय...,ठरवले जातात.आनी त्यास्नी 'येळ' म्हनत्यात,मुहुर्त न्हाई! मुहुर्तात सुब/असुब असतं,आनी येळेत फकस्त टाइम असतुया!"
हे उत्तर मिळालं आणि मग एकदम सर्व चित्र स्पष्ट झालं. मुहुर्तात जर आपण काहि शुभ/अशुभ गृहीत धरत असू,तर प्रचलीत धर्मशास्त्र निर्णयानुसारच जायला लागणार.पण तसं काहिही गृहीत नसेल..तर ती एक कार्यक्रम करण्याला अनुकूल अशी फक्त आणि फक्त वेळच असेल..आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ती घ्यायची तर फक्त पंचांगशुद्धी पाहुन घ्यावी लागेल. मग पंचांगशुद्धी.. म्हणजे तरी काय हो? तर पंचांगात दिलेलं दिनमान..म्हणजे 'योग्य दिवस,प्रतिकूल दिवस,चांगला,शुभ्,अशुभ.. ' हे! पण आता त्यातंही अडकणे नसले उपयोगाचे तर काय हो करावे दिवेकरभट? मग ते असे करावे,की सरळ बुद्धीगम्य निर्णय घ्यावा. आणि आपल्या सोयीचा असा कोणताही दिवस निवडावा. किंवा आपली ही अपेक्षा सांगून ज्योतिषाकडनं काढून घ्यावा.
लोकहो, वरती केलेला सगळा उहापोह आपण क्षणभर बाजुला ठेऊ. आणि असा विचार करू.., की ही गरज आपल्या मनाला नेमकी कशी आहे? आणि का आहे? माझ्या मते दोन तीन कारणं असू शकतात.
१)धर्मशास्त्रातलं हे परंपरेनी चालत आलेलं सगळंच्या सगळं बाजुला टाकुन द्यायला मन तयार होत नाही.
२) तुमचं सगळं पटत हो...पण लोक काय म्हणतील? हे लोकं-भय निर्णयावर येऊ देत नाही.
३)आंम्हाला हवं तेंव्हा मंगल कार्यालय वगैरे उपलब्ध नाही..असं तात्कालीक कारण आहे म्हणून!यातील पहिलं कारण असेल,तर मी तुम्हाला यातल्या खर्या/खोट्याच्या वादात जाणिवपूर्वक न नेता एव्हढच सांगिन की मानवाच्या प्राथमिक समुहजीवनाचा(टोळी किंवा ट्राइब'चा) काळ आठवा..ज्यावेळी सृष्टी त्याला अत्यंत प्रतिकूल होती,आणि धर्म ही गोष्ट आजच्या सारखी ऐसपैस तर सोडाच्,उलट ती नीट हिशोबातंही आलेली नव्हती. तेंव्हाही माणूस ह्या गोष्टींशिवाय जगत होता.आणि त्याची मानसिक/ऐहिक सुखदु:ख्खंही अगदी फार वेगळी नव्हती. (ह्यावर कुणी आजच्या अपडेट समाज जीवनाचा दाखला दिला आणि आक्षेप घेतला,तर त्याला उत्तर एव्हढच की रोटी/कपडा/मकान..एव्हढ्याच गरजा मूलंभूत असतात.त्यांची रुंदी नव्हे!) तेंव्हा आपल्या मनाला आता ही नवी सवय लाऊन घ्यायला काहिही हरकत नाही. आणि त्यात काहि वाइटंही नाही.
दुसर्या कारणाचा परामर्श घ्यायचा,तर लोकंभय उडवून लावणं ही गोष्ट सोपी नाही,हे आपण प्रामाणिकपणे मान्य करूनच पुढे जाऊया. आता.. हे लोकंभय म्हणजे तरी काय हो? तर अश्या प्रसंगी आपणच दुसर्यांशी जे व्यक्त होत असतो..तेच हे लोकंभय आहे. धर्म.. या क्षेत्रातला कोणताही निर्णय, (मग तो योग्य/अयोग्य..जो असेल तो!) बुद्धिनीच घ्यायला हवा..आणि औषधाच्या कडू गोळी प्रमाणे तो जिभेवर ठेऊन पचवायलाही हवा. आणि त्याची सुरवातंही ते लोकंभय वाटत असतानाच करायला हवी..कारण??? - "अभी नही..तो कभी नही!" आणि समजा..यावेळी जमली नाही,तर पुढच्या वेळी तरी ही सुरवात करायला हवीच हवी..पण दरवेळी प्रयत्न हवा आणि तो मात्र निकराचाच हवा हो...तरच हे आपणच निर्मिलेलं लोकंभय नाहिसं होइल. कदाचीत आपण लहान मूल होतो..तोपर्यंत ह्या गोष्टींमधे, लोक-आपल्याला "तो बघ बुवा आला,बुवा आला!" करत होते.पण आता एकदा तरी मोठे होऊन या "बुवा आला"च्या आरोळीलाच आपल्या पर्यंत न येण्याची वेळ आणवुया. म्हणजे पुढे चालून ती त्यांच्यावरंही येणार नाही!
तिसर्या कारणाला तर काही चिंताच करायची गरज नाही. आपत्काल हा (हो..हो..धर्मशास्त्रातंही) युद्धासारखा असतो..आणि प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असतं... मग अजुन काय सांगावे?
या सगळ्याचा एकाच वाक्यात समारोप करायचा झाला..तर एव्हढच सांगता येइल,की.. आपण धर्म पाळायचा असतो,धर्मानी आपल्याला पाळायचं नसतं.
============================
=============================================
खुसखुशित लेख.
खुसखुशित लेख.
आवडला लेख, पण अजून सविस्तर
आवडला लेख, पण अजून सविस्तर लिहाच. एखादी वेळ नेमकी शुभ का मानतात वगैरे !
दोन्ही लेख आवडले!
दोन्ही लेख आवडले!
दिनेश @पण अजून सविस्तर लिहाच.
दिनेश
@पण अजून सविस्तर लिहाच. एखादी वेळ नेमकी शुभ का मानतात वगैरे !>>> त्यावर मी लिहिण्यापेक्षा आपण प्रकाश घाटपांडे यांच्या ब्लॉगवर जा. तेथे ज्योतिष विषयाची मूलगामी शास्त्रशुद्ध चिकित्सा वाचावयास मिळेल. त्यात ह्या सगळ्याच शुभशुभाचा विस्ताराने धांडोळा घेतलेला आहे.
http://faljyotishachikitsa.blogspot.in/2006/03/prakash-ghatpande.html
http://faljyotishachikitsa.blogspot.in/