पाहून घे महात्म्या
पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने
तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने
चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने
संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने
आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने
इतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्या
बदलेल भाग्य निव्वळ, तू घाम गाळल्याने?
मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही
हकनाक तूच मरशिल, गळफास घेतल्याने
शेती कसून दाखव, विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने
लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे?
नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने!
डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने
- गंगाधर मुटे 'अभय'
=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने
अगदी खरे आहे. अलीकडेच माझ्या पाहण्यात असे काहीसे होत आहे. दुर्दैवी आहे.
एकूणच भावना पोहोचल्या.
डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने
व्वा.
बदलेल भाग्य निव्वळ, घाम गाळल्याने?
ह्यात दोन मात्रा कमी आहेत. का घाम असे असावे बहुधा.
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने
समीर सर, काऊजी धन्यवाद! समीर
समीर सर, काऊजी धन्यवाद!
समीर सर, टायपो दुरुस्ती केली आहे.
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने
मग ह्यात काय चूक आहे ? गाईला माता म्हणू नये कि काय ?
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने
मग ह्यात काय चूक आहे ? गाईला माता म्हणू नये कि काय ?
......... सारिकाजी, अगदि रास्त मुद्दा उपस्थीत केला आपण
तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण
तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
...इथे कोणाला गाडले हे समजत नाही. विचार असतील केले असे हवे.
........ चुक्भूल द्यावी घ्यावी
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने
मला लागलेला अर्थः एकीकडे आईला वृद्धाश्रमात ठेवले जाते तर दुसरीकडे गाईला माता म्हणण्याचा आग्रह धरला जातो.
माता ह्या शब्दाचे महत्त्व जाणता तर आई बापांना वृद्धाश्रमात लोक कसे ठेवू शकता ही तक्रार आहे.
गाईला माता म्हणू नये कि काय ?
गाईला माता म्हणा पण आई-वडिलांना रस्त्यावर सोडू नका म्हणजे झाले.
माझ्या नात्यामधे काहींनी घर स्वतःच्या नावावर करून आईला वृद्धाश्रमात सोडून दिल्याचे काही दिवसांपूर्वी झाले.
अश्या मुलांनी हा शेर वाचावा.
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने
....... समीरजी, तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ तोच गझलकाराचाही उद्देश दिसतो पण येथे पहिली ओळ आईला वृद्धाश्रमात ठेवणार्या एका व्यक्तीला (particular)तर दुसरी ओळ सर्व लोकांना(general) उद्देशून असल्याचे जाणवते. म्हणतात ऐवजी म्हणतोस असते तर प्रश उपस्थीत झाला नसता..
गाईला माता म्हणा पण
गाईला माता म्हणा पण आई-वडिलांना रस्त्यावर सोडू नका म्हणजे झाले.>>>
तेच म्हणायचय मला पण . पण गाईला मध्ये घुस्मडण्याची गरज नवती. आईला वृद्धाश्रमात ठेवणारा म्हणजे अतिशय असंस्कृत असलेला गाईला तरी काय माता म्हणणार ?
मला वाटतं आपण सगळेच शेराचा
मला वाटतं आपण सगळेच शेराचा भुगा करतोय. आई-वडिलांना रस्त्यावर सोडणारे अनेक नसते तर वृध्दाश्रम ही संकल्पना आलीच नसती. कवितेत असंस्कृत नसलेल्या पण संस्कृत आहोत असे दर्शविणा-या लोकांवर टीका आहे.
शेर महान नसला तरी त्याचे प्रयोजन आहे. काही गझल भावनिक अंगाने वाचायला हव्यात असेही वाटते.
तुमचे विचार गाडुन तुमचा पूर्ण
तुमचे विचार गाडुन तुमचा पूर्ण पराभव केला ... अशी ती ओळ आहे.
>>>लक्ष्मीस आणखी मी, सांगा
>>>लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे?
नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने!
डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने<<<
व्वा व्वा
तांत्रिक गफलती खाली दिल्या आहेतः
>>>मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही
हकनाक तूच मरशील, गळफास घेतल्याने<<< मरशिल असे करायला हवे आहे.
>>>शेती कसून दाखव, तू विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने<<< 'तू' उडवा. तो दोन मात्रा वाढवत आहे.
चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने<<< छान शेर! 'ते' नंतरचा स्वल्पविराम काढला तरी चालेल.
संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने<<< करंट अफेअर्सवरील उत्तम शेर! भाडखाऊ ही एक शिवी आहे. तिचा अॅक्च्युअल अर्थ फार हिडीस आहे. तुम्हाला फक्त क्रोध व्यक्त करायचा असेल तर दुसरा शब्दही चालावा. भाडखाऊच म्हणायचे असेल तर त्याची दोन कारणे असू शकतात. तुम्ही ज्या सभोवतालात ही कविता ऐकवता तेथे भाडखाऊ ह्या शब्दाच्या मूळ अर्थापेक्षा त्यातून प्रकट होणारी भावना अधिक प्रचलीत झालेली आहे हे एक कारण आणि निव्वळ त्रागा व्यक्त करणे हे दुसरे कारण! मला येथे दुसरे कारण असावे असे वाटत आहे. तो तुमचा 'राजकीय' चॉईसही असू शकतो व त्यावर कोणीही गदा आणू शकत नाही, स्पेशली काव्यक्षेत्रात तरी! 'दिल्लीत पोचल्याने' हा भाग फार आवडला.
>>>इतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्या
बदलेल भाग्य निव्वळ, तू घाम गाळल्याने?<<<
हा एकमेव शेर 'प्रामाणिक' शेर वाटला. बाकीचे शेर प्रभावी शेर रचण्याच्या हेतूमधून आलेले शेर वाटले.
सोयरसुतूक<<< असा शब्द आहे का
सोयरसुतूक<<< असा शब्द आहे का तिकडे? इकडे सोयरसुतक असे म्हणतात.
हे फारच तांत्रिक आहे, पण तरी नोंदवावेसे वाटले इतकेच.
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!
समीरसर, आभार
बेफिकीर साहेब, खूप खूप धन्यवाद! __^__
'शिल" बदलले, "तू" उडवला
आणि स्वतःचा उर बडवला
बेफिकीर तुम्ही आहात का मी?
काही कळेनासं झालंय राव!